जाण आई बापाची(भाग:१)

जाण आई बापाची(भाग:१)

🌱वि४🌿या व्हाट्सअप्पग्रुपवरून

जाण आई बापाची (भाग:-१)



Source: INTERNET
-निखिल खोडे, ठाणे

            आई एकमेव स्त्री जी माझ्यावर जन्मा आधीपासून प्रेम करते आणि बाबा जे स्वतःपेक्षा सर्वात जास्त जीव लावते ते खरच! यांच प्रेम आणि माया कधीही न संपणारी... स्वतःच आयुष्य आपल्या मुलांसाठी खर्च करणारे आई वडील सर्वात श्रेष्ठ आहे.

              घरची परिस्थिती बिकट... घरात बारा शिवारचे दारिद्र्य... मातीचे घर.. पावसाळ्यात घरात पाणी येईल याची भिती,.. हातावरच पोट.. काम केलं तर खायला मिळणार ही परिस्थिती... दुसऱ्या कडून कर्ज घेऊन मक्त्याने केलेल्या शेतीत सतत नपिकी... त्यानंतर दुसऱ्याकडे मजुरी करण्याशिवाय पर्याय नाही... सावकाराचे टोमणे... मदत करायला कोणीच नाही... आणखी खूप साऱ्या अडचणी असुन सुद्धा मला व माझ्या ताईला काटकसर करून का होईना आमच्या शिक्षणाचां खर्च, सण उत्सवाच्या वेळी नविन कपडे व आणखी कुठल्याही गोष्टी असो ... कधीच कमी नाही पडली. खरच आई बाबा तुम्ही महान आहात.

                वयाने जसजसा मोठा होत गेलो तसा कळायला लागल की आपल्या आई वडिलांनी खुप जास्त कष्ट घेतले आपल्याला मोठ करण्यात. लहानपणी प्रत्येक गोष्टीत पुरवलेली माझी हौस,  कोणत्याच गोष्टी साठी मनाई केली नाही परंतु त्यांच्या साठी मी आजपर्यंत काय केले हाच प्रश्न कधी कधी पडतो. लहानपणी आई बाबा सोबत शेतात कामाला गेल्यावर त्यांच्या कपाळा वरून पडणारा घाम आठवला की आजही हृदय भरून येत. म्हणूनच आई म्हणायची की आमच्या साठी काहीही नको.. सावलीत काम बघा रे. आज जाणीव होते त्या गोष्टीची की का आईबाबा का असे बोलायचे.

                 आई बाबा ना सांगावस वाटते की तुम्ही केलेल्या प्रत्येक कष्टाची, मेहनतीची, काटकसरीची व त्यागाची जाणीव आहे मला. आता फक्त आयुष्यात एकच स्वप्न आहे की माझे आई-बाबा म्हणेल की पोराने काहीतरी करून दाखवलं. वाट आहे त्या दिवसाची ... प्रयत्न करतोय. सरतेशेवटी धन्यवाद परमेश्वराचे ज्याने मला  स्वर्गाहून सुंदर आई-बाबा आणि ताई दिली त्याबद्दल हाच परिवार सात जन्मी मिळो.!!



source: INTERNET
-शिरीष उमरे, नवी मुंबई

आई... काय ताकद आहे शब्दात ! जननी ती माझी ! नऊ महीने मी तिचा अंग होतो आणि ती नाळ जी जुळते ती अनंतकाळासाठी !! माझा अणुरेणु तिचा असतो ... तिची कुस माझी च असते.. मायेची निस्वार्थ सावली जणु वात्सल्याची साय... माझी माय !!

बाप म्हणजे माझा आधारवड ! ज्याच्या अंगाखांद्यावर खेळण्यात बालपण जाते... त्याच्या पारंब्यांवर झुलता झुलता तारुण्यात अलगद येणे हे अदभुत च ! मग काय केमिकल लोचा होतो काय माहीत... बापाचा राग यायला लागतो... जिवनातल्या पायवाटेवरचे खडे रुतु नये म्हणुन त्याने अंथरलेला हात अडथळा वाटु लागतो... त्यानेच चालायला शिकवले हे विसरुन आपण त्याचाच विरोधात धावायला लागतो... मग येतो जगाचा खराखुरा खडतर महामार्ग... स्वप्नाचे विश्व संपुन पुढची कठीण वाटचालीत आठवतो आपला बाप... पदोपदी.. आठवतात त्याने आपल्यासाठी केलेला व लपवलेला त्याग... आपल्या प्रत्येक अडखळण्यामागे सावरायला असलेला त्याचा अदृश्य हात... मग कळते त्याच्या घामाची व आटवलेल्या रक्ताची कीमंत... तरीही कसला इगो असतो काय कळत नाही... व्यक्त होता येत नाही त्याच्यापाशी.. तो बांध तुटतो तेंव्हाच जेंव्हा आपण स्वत: बाप होतो.... हमसाहमसी रडलो होतो मिठी मारुन त्याला... माझ्या डोळ्यात कृतज्ञेतचा पुर तर त्याच्या डोळ्यात लेकरु बाप झाला याचे कौतुक... मग त्याचातला आजोबा बघतांना परत जाग्या होतात सुुप्त मनातल्या  लहानपणाच्या गोड आठवणीचे मोहोळ ... तोपर्यंत कुठल्या मनाच्या तिजोरीत लपल्या असतात ह्या भावना कुणास ठाऊक !!

आता मला बनायचे असते माझ्या आईची आई व बापाचा बाप !! कर्तव्य म्हणुन नाही कींवा परतफेड म्हणुनही नाही... हा सहजिवनाचा सहज मार्ग असतो... आपल्या संस्कृतीला सलाम ! कीत्येक वर्षापासुनचा हा अविट गोडवा पिढ्यानपिढ्या वारसाहक्काने पुढे चालतच आहे....


source: INTERNET
-अमोल धावडे

प्रथम माझ्या आईला आणि वडिलांना नमन....
आई वडील यांचे उपकार कधीही न फिटणारे असते त्यामुळे आई वडिलांना कधीही दुखवू नका. मला वडिलांचे प्रेम खुप कमी भेटले कारण मी पाच वर्षाचा असताना त्यांना देवआज्ञा झाली. वाईट वाटते की खुप कमी वेळ वडिलांचा सहवास लाभला. वडील गेल्यानंतर आम्हा चार भावंडांची जबादारी आई वर येऊन पडली. चार भावंड आम्ही त्यांचं सर्व शिक्षण याचा न झेपणारा खर्च तरी आईने खुप सारे कष्ट करून आम्हा सर्वांचे शिक्षण पूर्ण केले बहिणीची लग्न केली.

आत्तापर्यंत माझे शिक्षण पोटाला पीळ मारून करत राहिली आईचे स्वप्न आहे की मुलाने खूप मोठे होऊन नाव कमवावे माझ्यासारखे कष्ट त्याच्या वाटायला येऊ नये त्यामुळे तिने माझे स्वप्न पूर्ण केले आता मला तिचे स्वप्न पुर्ण करायचे आहे.

आईने माझ्यासाठी खुप सारे कष्ट सोसले आहे त्याची परतफेड म्हणून आईचे स्वप्न पूर्ण करावयाचे आहे व तिच्या चेहऱ्यावर आनंद पहायचा आहे. माझ्या आयुष्यात आईला कधीही दुःख होणार नाही यांची काळजी मी नेहेमी घेईल कारण तीने मला जन्म दिला व आज मी जे आही आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे.
माझे माझ्या आईवर खुप प्रेम आहे.  Love you aai........



Source: INTERNET
-मुकुंद बसोळे,लातूर

स्थळ- गण्या आणि मन्याचे लाडके गाव.....'टेंभुर्णी'...ह्या गावाला निसर्गाने खूप काही दिल होत....मस्त चोहीबाजूने डोंगर आणि त्या डोंगराच्या कुशीत निश्चितपणे असलेलं गाव....जसं काही आईच्या कुशीत 'बाळ'झोपलं आहे....निवांत...मजेत..... आपल्याच धुंदीत.....सकाळी सकाळी सूर्यदेव 'पृथ्वी'मातेच्या उदरातून उगवून आपलं मायेचं पांघरून ह्या गावावर घालत असत....आणि घसा कोरडा पडल्यावर तेवढ्याच 'मायेनं' तहान भागवायला  नदी होतीच....असं निसर्गाचं देणं लाभलेलं गण्या आणि मन्याचं अप्रतिम गाव.......'टेंभुर्णी'..... एका सकाळी मन्या घाई गडबडीत रस्त्यावरून.... बस स्टँड कड जात होता....तेंव्हा अचानक त्याला गण्या घावला पण गडबडीत त्याच त्याच्याकडे लक्षच गेलं नाही.....

गण्या-  "ऐ...ऐ.... 'चेन्नई एक्सप्रेस' कुठं निघाला बे येवढ्या घाई गडबडीत....आणि ते सुद्धा मला न सांगता....

मन्या-  (नेहमीचंच 'ख्या-ख्या' हसत..)  आबे तुला तर नाही पाहिलं न बे मी....'मुंगसावणीचं' आलास अचानक....

गण्या- ऐ.... बंबूऱ्या....पण चालला कुठं आहिस तू एवढ्या घाई गडबडीत.....

मन्या- काही नाय रे....थोडं तालुक्याच्या गावाला जावं म्हणतोय....

गण्या-(पाठीत धपाटा घालून) तालुक्याच्या गावी चाललायस.....ते पण मला सोडून....हानीन तुला लै....बरं जाऊदे कोणता पिकचर (चित्रपट)  आलाय....मी पण येणार आहे तुझ्याबरोबर.....पिक्चर बघू...भेळ खाऊ...मजा करू...चल....

मन्या-  (चेहऱ्यावर गंभीर भाव, डोळयांच्या कडा 'ओल्या' झालेल्या) नाय रे मी 'पिक्चर' बघायला नाय चाललोय.... माझं थोडं दुसरंच काम आहे....

गण्या- (गण्याने 'मन्याच्या' चेहऱ्यावरील गंभीर भाव लगेच 'टिपले' काही झालं तरी तो चड्डीदोस्त होता 'मन्याचा')  ऐ.... बंबूऱ्या.....'चड्डीदोस्त' ना आपला तू आणि माझ्यापासून काय लपवतोस रे....भाड्या....चल बस गाडीवर शेताकडे जाऊ.....(मन्या त्याला नकार देऊ शकला नाही आणि ते शेताकडे आले....एका झाडाखाली गण्याने गाडी थांबवली....मन्या अजून कसलातरी विचार करत होता....त्याची विचाराची तंद्री गण्याने मोडली)....हम्म आता बोल....काय झालं....(हे ऐकून आतापर्यंत थांबवलेला 'मन्याचा' 'अश्रू' चा बांध फुटला..... तो हमसून हमसून रडू लागला....गण्या त्याच्याकडे नुसताच बघत होता...)

गण्या- (शेवटी कंटाळून) तुझं रडणं झालं असलं तर सांग आता काय झालंय....

मन्या- ( याच सुद्धा रडणं आता थांबलं) गण्या अरे यार 'मायला' आणि 'बाप्पा' ला भेटायला   'वृद्धाश्रमाला' जात होतो तालुक्याला...आबे ज्या बापाने मला आपलं पोट रिकामं ठेऊन मला जगवलं.... ज्या 'मायच्या' कुशीत निर्धस्तपणे मी लहानपणी झोपलो....ज्या बापाने मला रांगायला, चालायला ,पळायला शिकवलं....पळता पळता कुठे ठेच लागली तर त्या जखमेवर आईने मायेने हळद लावली...त्या हळदीची सर आज कुठल्याच 'मलमाला' येणार नाही...ज्यांनी मला निवारा दिला...त्यांनाच आज मी बेघर केलं बे....(हे सांगताना 'मन्याच्या' डोळ्यात दुःख स्पष्ट दिसत होतं...)

गण्या- आबे मग आन ना त्यांना घरी तुझे कुणी हात धरलेत का...आबे 'मन्या' आपण कितीही मोठे झालो तरीही आईच्या कुशीत झोपण्याचा 'आनंद' काही औरच असतो...( हे सांगताना कुठेतरी रमल्यासारखे भाव होते तोंडावर...)

मन्या- आबे मला काय नको वाटतंय का....पण बायडी ऐकत नाही बे....

गण्या- ओ...होहोहो.... इथं आहे तर गोम....(काहीतरी विचार करत...आणि विचार करून काहीतरी सुचलंय असे भाव चेहऱ्यावर आणून.....) चल मी करतो सगळं बरोबर.... ( आता गण्याने गाडी मन्याच्या घराकडे आणली....ते दोघं मन्याच्या घरी हॉल मध्ये बसले होते....)

गण्या-( मुद्दाम मोठ्या आवाजात) मन्या... काही वेळापूर्वी  तेरे सालेसाहब का फोन आया था ना?...काय म्हणत होते ते.....

मन्या- आबे कधी...काय बोलतोयस तू....

गण्या- (डोळे वटारून) आबे आपण नाही का चौकात बसलो होतो...तेंव्हा....अर्ध्या तासापूर्वी....

मन्या- (अजून सुद्धा गोंधळलेलाचं पण डोळे वाटरल्यामुळे त्याने फोन आला होता ते मान्य केलं) हम्म...अर्ध्या तासापूर्वी ना...हो आला होता ना आला होता...त्याच काय....

गण्या-  (आवाज अजून मोठा करून) आबे  किती विसारभोळा आहेस तू...सालेसाहब... तुझ्या सासू सासर्याना आता 'वृद्धाश्रमात' ठेवण्याचा विचार करत होते ना...चूक आहे बे ते....

मन्या- ( आता कुठे याला आपल्या चड्डीदोस्ताचा गेम लक्षात आला होता...आता हा सुद्धा मोठ्या आवाजात...)  हो तर बे ते साफ चुकीचं ना...पण काय करावं आता आपण काय त्याना सांगू शकतो...वहिनी आणि सासू च पटत नाही ना....( हे ऐकून मण्याची बायडी हॉल मध्ये आली)

बायडी- (मोठयाने...जवळ जवळ ओरडतच) काय म्हणताय तुम्ही...सुन्या आईला आणि बाबाला 'वृद्धाश्रमात' ठेवणार आहे...थांबा त्याची खडपट्टी च घेते चांगली....दया तो फोन इकडे....

गण्या- अहो वहिनी हे काय करताय....अहो सुनीलरावांच्या बायकोच आणि सासू च पटतं नाही...मग राहुद्या ना त्यांना तिथे....तिथे तर त्या निवांत राहतील....

बायडी- अहो...हे काय बोलताय तुम्ही भावजी....अहो असं कसं राहू द्या म्हणताय तुम्ही.....अहो ज्या आईने त्याला रात्रंदिवस कष्ट करून सांभाळलं,आपलं मायेचं पांघरून त्याच्या अंगावर घातलं...ज्या आईने त्याच्या जखमेवर हळद लावली आणि ज्या बापाने  त्याला रांगायला,चालायला, पळायला शिकवलं.....आयुष्याच्या प्रत्येक संकटात खंबीर साथ दिली...त्याना तो असे कसे बाहेर ठेऊ शकतो.....

गण्या- (दीर्घ निश्वास घेऊन)  वहिनी असाच विचार फक्त एकदा 'मन्या' बाबतीत सुद्धा करून बघा....बस येवढच सांगायचं होत मला....
(हा घाव चांगलाच 'वर्मी' बसला होता....आणि संध्याकाळी मन्याचे 'माय आणि बप्पा' घरी होते..... आणि मन्याच्या डोळ्यात त्या दिवशीपासून 'खुषी' मावत नव्हती आणि असा 'चड्डीदोस्त' दिल्यामुळे तो देवाचे आभार मानत होता....


source: INTERNET
-कु.समीर भाऊ इंदुलकर, पेण (रायगड)

      खरं तर या विषयावर काही लिहताना मनाला प्रश्न पडतो की खरच मी ,तुम्ही आपण सर्वजण "जाण आईची बापाची" या विषयावर लिहायला पात्र आहोत का ? किंवा फक्त या विषयावर काही चांगले शब्द लिहून त्यांची म्हणजे आपल्या आई वडिलांची महती त्यांचे कार्ये जगासमोर मांडू शकू का ? तर याच उत्तर आहे .नाही. खर तर संपूर्ण समुद्राची शाइ आणि आकाशाच कागद केला ना तर तेही कमी पडेल. थोडक्यात सांगायचं झालं तर आई वडीलांविषयी लिहायला आपल्याला शब्द अपुरे पडतील,आपली विचार करण्याची शक्ती कमी पडेल.
पण त्यांचे कार्ये आपण आपल्या शब्दात लिहू शकणार नाही .कारण त्यांची माया,त्यांचं उपकार,त्यांचं आपल्या प्रति असणार प्रेम ,त्यांनी आपल्या साठी घेतलेली मेहनत,कष्ट, हे फक्त शब्दातून व्यक्त करणे शक्य नाही.

    माझ्या आईवडीला विषयी सांगायचं तर मला वडिलांचं प्रेम जास्त काही मिळालं नाही मी ११ वर्षाचा असताना माझे पप्पा अनंतात विलीन झाले .पण जेवढे दिवस मी त्यांच्यात सोबत होतो त्या दिवसामध्ये त्यांच्या कडून भरपूर प्रेम,माया,चांगली शिकवण सर्व काही मिळालं .आजही त्यांची आठवण आली की डोळ्यात अश्रू यायला लागतात. मला आजही आठवत मी सहावीत असताना पप्पा आजारी होते आणि तालुक्याच्या ठिकाणी मी आणि पप्पा गेलो होतो.खरं तर पप्पा दवाखान्यात आले होते आणि मी त्यांच्या बरोबर एक सोबत म्हणून आलो होतो. पण ते दवाखान्यात न जाता सरळ मला एका कपड्याच्या दुकानात घेऊन गेले आणि मला माझ्या शाळेचा त्यांच्या कडून शेवटचा ड्रेस घेऊन दिला होता.त्यांना विचारलं पप्पा आपल्याला तर दवाखान्यात जायचं आहे हे कपडे कशाला ? तेव्हा त्यांनी मला उत्तर दिलं दवाखान्यात जाऊ कधीतरी तुला अगोदर शाळेचा ड्रेस, पुढे तुला खूप शिकायचं आहे. बस्स खर तर त्यांच्या निधनांनंतर त्यांच्या याच शब्दांमुले माझी शिकण्याची परिस्थिती नसताना सुद्धा मी आज एम.ए.च शिक्षण घेतलं.

   आई विषयी बोलायचं झालं तर कोणत्या शब्दात तिची महती मांडू हेच कळत नाही.एक सुंदर वाक्य आहे की.. "आई सारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही."' 'आई म्हणजे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर यांचं मिलन करून देणारी शक्ती म्हणजे आपली आई .

   माझ्या वडिलांच्या निधनांनंतर आम्हा तीन भावंडांची   जबाबदारी तिने उचचली लोकांच्या शेतात कष्ट करून आम्हाला लहानाचे मोठे केले आमचं शिक्षण पूर्ण केलं.अजूनही घरातली प्रत्येक जबाबदारी स्वतःवर घेऊन ती पूर्ण करते, अशी माझी आई.शाळेच्या सहलीला जाताना शेतात मजुरी करून मुलांच्या सहलीचा हट्ट पूर्ण करायची , आपल्या मुलांना शाळेत कोणत्याच  शालेय साहित्याची कमी पडू नये म्हणून भर उन्हात काबाडकष्ट करून ते साहित्य पुरवण्यात आर्थिक बाजू भक्कम करायची .रात्रीच्या वेळी अगोदर आपल्या मुलांना जेवू घालते आणि स्वत मात्र उपाशी राहते जेणेकरून माझी मुले उपाशी राहणार नाही.ती आई फक्त आईच नाही तर साक्षात ईश्वराचं रुप आहे...
    
  अश्या माझ्या महान ,थोर , देवाहून ही श्रेष्ठ माझ्या आई पप्पांना शतशाः प्रणाम

source: INTERNET
-जयश्री खोडे, मुंबई
                  
                  आई वडील हे असं व्यक्तिमत्वे आहेत की आपण त्यांच्याबद्दल जेवढे बोलण्याचा
वा लिहण्याचा प्रयत्न करू तेवढं कमीच आहे.

            मराठीमधील प्रसिद्ध कवी यशवंत यांनी आपल्या कवितेतून म्हटले आहे की,
"स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी "!!  ही ओळ लिहून आई या शब्दाची महती थोडक्यात सांगितली आहे.

              घरची परिस्थिती खूप हलाखीची असून सुध्दा आम्हा दोघा बहीण भावाला कशाचीही कमी पडू दिली नाही. मुलगा - मुलगी असा भेद ही कधी मी माझ्या घरी बघितला नाही. आम्हाला समान वागणूक मिळाली. शिक्षण असो की कोणतीही गोष्ट त्यामध्ये आमच्या आई - वडिलांनी तफावत केली नाही.

             खरं सांगायचं झाल्यास  माझ्या सर्वात जवळचे म्हणजे माझे बाबा. बाबाच शिक्षण जरी  तिसरी पर्यंत झालं असेल तरी त्यांना शिक्षणाबद्दल खूप कळकळ नेहमीच राहिली . त्यांना नेहमी वाटायचं की  माझी मुलगी खूप शिकायला पाहिजे. आई ने जरी माझ्या शिक्षणासाठी विरोध केला असेल पण त्यांनी मला नेहमी आधार दिला . माझ्या शिक्षणासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. आयुष्यात मी खूप चुका केल्या पण त्यांनी मला नेहमी माफ केलं आणि समजाऊन घेतल.
            आता बऱ्याच प्रमाणात आईचे ही विचार बदलेले आहे तरी सुद्धा मला माझे बाबा खूप जवळचे वाटतात . आई ने मला ९ महिने पोटात ठेऊन मला जन्म दिला त्यामुळे आईची मी खूप आभारी आहे. आई - वडिलाचे ऋण परतफेड करणे शक्यच नाही पण प्रयत्न नक्की च करेल.

            बाबांना म्हणाली होती  की मला मुंबई ला जायचं आहे नोकरी करायला तर आधी त्यांनी नाही म्हटले पण नंतर दादांकडे बघुन त्यांनी मला परवानगी दिली. मुंबई मध्ये मी दादांसोबत आली त्यांना कोणत्या नात्याने हाक मारावी हे मला कळत च नाही कारण त्यांनी मला कधी गुरु  म्हणून मार्गदर्शन केलं तर कधी माझे भाऊ म्हणून माझ्या निर्णयामध्ये सोबत राहीले, कधी बाबा बनून माझी काळजी घेतली तर कधी आई म्हणुन ताप आला किवा मला काही झालं तर प्रेमाने मला जेवण बनवुन खाऊ घातले त्यामुळे मला कधी कळलच नाही की मी त्यांना काय म्हणू....

माझ्या मध्ये आता असलेला आत्मविश्वास , स्वतः बद्दलच प्रेम , माझे विचार मांडणे हे सर्व मी त्यांच्या पासून शिकली.. माझ्यासाठी तेही आई बाबा पेक्षा कमी नाही.

              असं म्हणतात की घरच्या मोठ्या लोकांनीच कर्तव्ये पार पाडायची असतात पण माझा लहान भाऊ याला अपवाद आहे.. तो माझ्यापेक्षा वयाने लहान आहे पण दिसायला मोठा दिसतो. मोठ्या भवासारखी काळजी घेणारा माझा लहान भाऊ.. तो सर्व जबाबदाऱ्या घरातील वडीलधार्यासारखा पार पाडतो .

          या सर्वांबद्दल शब्दात सांगणे खरच खूप कठीण आहे , एवढच बोलू शकते ह्या सर्व व्यक्ती माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत.

source: INTERNET
-संदीप बोऱ्हाडे, वडगाव मावळ(पुणे)

   आई आणि वडील या दोनही लोकांची सोबत आपल्या जीवनाचा अनंतकाळापर्यंत सर्वांना हवी असते...पण यामधील एकाने समजा मध्येच साथ सोडली तर..??
जीवन अंधारमय होऊन जातं दरोरोजच्या आठणींने आणि नकळत डोळ्यांमध्ये अश्रू येतात..

 अशीच एक दिवस माझ्या आईने एक्सिट घेतली या जीवनातून. तेव्हा मी होतो फक्त 10 वर्षाचा
आईशिवाय कोणत्याच गोष्टीची कल्पनाही करता येत नाही.
एकही दिवस असा जात नाही की आई आठवत नाही. आई ज्या दिवशी  सोडून गेली..त्या दिवशी तर माझा अर्धा जीवच निघून गेला होता..पण आयुष्य सुंदर आहे जगायला पाहिजे. या विषयानिम्मित थोडेसे आईबद्दल..

 ज्यावेळी तुझी सोबत महत्वाची होती, नेमकी त्याच वेळी एक्झिट घेतलीस. आजपर्यंत या गोष्टीला 16 वर्ष होऊन गेली.
तुझ्या सोबतचा एकही फोटो नाहीये. अगदी तुझा स्वतःहाचा  फोटो देखील माझ्याकडे नाहीये. आयुष्यभर खस्ता खाण, अपयश पचवण, तरी पुन्हा पुन्हा उभं रहाणं म्हणजे काय असत हे तुझ्यामुळ अनुभवलं. तरीही तु कधीही खचली नाहीस. खुप काही केलस तु, तरी आमच्यासाठी सारं काही करत होतीस.

 गेल्या 15 वर्षात अनेक प्रसंग आले. पण खचलो नाही. जिथं आमची आई खचली नाही तिथं आम्ही तरी कसं खचणार ! स्वाभिमान म्हणजे काय हे तु शिकवलंस.

 आम्हीही चुकतोय, धडपडतोय. तुझ्यानंतर वडीलच सगळं काही. आई आणि बाप दोघांची भूमिका वडीलांनीच आजपर्यंत निभावली.
आज बऱ्यापैकी स्थितीत आहोत. पण हे सगळं पाहायला तु आज नाहीस. तू असतीस तर खूप खूप पुढे गेलो असतो. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. फक्त प्रयत्न आपल्या हातात. तुझ आयुष्यात नसण सहन होत नाही.

तु सोबत नसण्याने जे गमावलयं ते शब्दात मांडता येत नाही...अपयश आल्यावर तुझी खूप जास्त आठवण येते. पण नवं काही मिळवलं की तुझ नसणं जास्त छळत. स्वतंत्र विचार करायला, निर्णय घ्यायला तु शिकवलं. आणि चुकलं तर त्याची जबाबदारी घ्यायलाही तुच शिकवलं.

एक मात्र नक्की की तुझ्या नसण्यामुळे जे आयुष्यात नुकसान झाले आहे ते कधीही भरून येऊ शकत नाही..आणि त्याची कायम खल मनात राहील. आजही तुझ्याच नावाने माझी ओळख आहे. आयुष्यात सर्वांना आई वडिलांची साथ अनंत काळापर्यंत मिळो..!!

Lot of Miss U..


source: INTERNET
-अंजली आमकर, रत्नागिरी

मी आकाश, वय 22 वर्षे पूर्ण, राहणार : पत्ता नाही, पूर्ण नाव माहिती नाही. कुटुंबा विषयी माहिती देखील मला माहिती नाही. मला जेव्हा समजू लागले तेव्हा मी अनाथ आश्रमात होतो. वयाची मर्यादा पूर्ण झाल्यावर ते आश्रम ही पोरके झाले.  माझ्याकडे साधी एक डिग्री होती जेव्हा मला आश्रम सोडावे लागले. आई वडील कोण हेच माहिती नाही तर घरदार नातेवाईक कुठून असतील?
आश्रमात माझ संपूर्ण बालपण गेल. आश्रमातुनच मला शाळेत शिकायला मिळाले.  शाळेत शिकु लागलो तस तसा माझा मनातील प्रश्नतील गोंधळ सुरु होऊ लागला. "ऐ आई मला पावसात जाऊ दे..अशी बाल गीत शिकवू लागले की मला हे "आई" म्हणजे काय ते कळतच नसे. कारण मी जिथे राहतो तिथे फक्त अंकल, काकी, मावशी आणि भाऊ इतकेच शब्द व नाती समजली. मग ही आई, बाबा, आत्या, मामा वैगरे काय ते कळेना. जर ही बाकीची नाती पण सर्वाना असतात मग मला का नाही ?
मला आठवत मी शाळेत असताना जेव्हा जेव्हा "माझे आई आणि बाबा"  या विषयावर निबंध लिहायला सांगायचे. तेव्हा तेव्हा माझ्या निबंधाच्या वहीचे पान कोरेच राहिले. "मी लिहू काय?"  मला काहीच समजेना. कारण कधी अशी हाक कोणाला मारली देखील नाही. तर मला काय माहित असणार...त्यावेळी प्रत्येक जण मला "आई बाबा" याचे वेगवेगळे अर्थ समजावून देऊ लागले.  
माझ्या एका वर्ग मित्राने सांगितले की,  सकाळी शाळा भरताना आणि सूटताना जे मुलांना घेऊन येतात व घरी घेऊन जातात. त्यांना कपडे आणि खाऊ देतात ते "आई-बाबा" असतात. पालक सभेला जे येतात ते "आई बाबा". कोणी तरी असं हि  सांगितलं कि आई बाबा म्हणजे "मम्मी पप्पा". जी घरात जेवण बनवते ती मम्मी व नोकरीला जातात ते पप्पा असतात. मला हे सर्व आश्रमात असताना अंकल आणि मावशी करते मग मला वाटले हेच  माझे आई-बाबा आहेत का? मग मी त्यांना अंकल आणि मावशी अशी का हाक मारतो ? आई बाबा असे का नाही म्हणू शकत? तेव्हा मावशीने समजावल की "ज्यांच्या पोटातून जन्म घेतो ती 'आई' व ज्याच नाव आपल्या नावा पुढे लावतात...जो आईचा नवरा म्हणजे "बाबा".  हा एक नवीन अर्थ समजल्यावर माझा अजुनच गोंधळ वाढला...व अनेक असे प्रश्न पडले की ज्याचे उत्तरे अजुनही सापडले नाही. "मला जन्म दिला कोणी?" जर शाळेत सर्वाना आई बाबा आहेत तर मला का नाही? माझे नाव का असे आहे? प्रत्येकाला घर असत तर मला कोणी व का इथे ठेवले? देव सर्वाना "आई बाबा" देतो किंवा आई बाबा देवासारखे असतात तर देवाने माझ्यावर का अन्याय केला?

असं म्हणतात कि , "समुद्राची शाई , हिमालयाची लेखणी आणि आकाशाचा कागद करून आई बाबांचे गुणगान लिहिण्यासाठी बसलो तरी त्यांचे प्रेम शब्दात मांडता येणार नाही. सर्व गोष्टी पैशाने विकत मिळतात पण आई बाबा विकत मिळू शकत नाही. त्यांच्या इतकं प्रेम हि कोणाला करता येणार नाही.
सर्वजन आई बाबाचे  गोड़वे गातात.... एकमेकांवर प्रेम करतात... काळजी घेतात...पण मी अजूनही "आई बापची जाण"  यासाठी पूर्णतः पोरका आहे. लहानपणी जसा गोंधळलेलो होतो आज ही तसाच गोंधळलेलो आहे. माझे जे आई बाबा आहेत ज्यांनी मला इथं सोडून गेले . त्यांच्या विषयी कधी राग येतो तर कधी तितकंच प्रेम हि वाटत. पण यातील काहीच मला व्यक्त करता येत नाही.... जेव्हा कधी पेपर मध्ये वाचतो कि  नोकरी निमित्त किंवा घरात अडचण म्हणून आपल्या आई बाबांना वेगळं करतात किंवा आश्रमात सोडून येतात. तेव्हा खूप अस्वस्थ होऊन जातो. एका बाजूला आमच्या सारखी मुलं जे "आई बाबा" शोधत असतो... त्यांच्यासारखं प्रेम शोधत असतो. तर दुसऱ्या बाजूला अशी मुलंही आहेत जे "आई बाबा" ना आश्रमात सोडत असतात.

"जाण आई बापाची" साठी बहुतेक सर्व जण आई बाबा यांनी काय काय केलं ....व मुलं आई बाबा साठी काय काय करतात... किंवा त्यांच्या सोबतच्या न विसरू शकणाऱ्या आठवणी सांगतात. पण अशी हि मुलं आहेत जे यापासून पोरके आहेत व त्यांची एकही आठवण नाही. पण तरीही एक अशी जाण आहे जी आपण सहज समजू शकत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************