अव्यक्त प्रेम - भाग १ (पहिला)


महेश कामडी,नागपुर.
        प्रेम म्हणजे काय? , मला माहिती नाही,
पण प्रेमाचे पहिले पाऊल म्हणजे मैत्री हे तर जवळपास सर्वांनाच माहिती असणार.
माझी एक मैत्रीण आहे, जी माझ्यासोबत कधी बोलायची नाही. कधी माझ्याकडे बघायची किंवा नाही तेही माहिती नाही, कारण मी पण तिच्याकडे कधी बघायचं अस आठवत नाही.
माझ्या शेजारीच असायची (माझ्या बहिणीची जवळची मैत्रीण)
10 पर्यंत असच काही, नंतर clg
Clg पासून थोड फार बोलण हसन🙂 पण मनात मात्र काहीही नाही 2 वर्ष अशीच निघून गेली पण आता मात्र बोलण वगरे सुरू झाले होते. मैत्रीचं शिडी चढत होतो.
आता मात्र clg संपल होत, फक्त दिसायची तर घरी
तिची admission दुसऱ्या clg ला आणि मी दुसऱ्या येथूनच संपर्क तुटला😔
पण अचानक एक दिवस तिची मला फेसबुक वर फ्रेंड रिक्वेस्ट आली(मन में लड्डू फुटा🤩)
मग असच बोलण सुरू झाले. जवपास दीड - दोन महिने असेच निघाले fb वरती बोलण्यात, एक दिवस तिला मो. न. मागितला मनात भीती होती देणार की नाही किंवा का हवा कशाला हवा विचारेल पण असल काहाही न घडता reply मध्ये मो. न. होता😇🤗
मग सर्वांचे आवडते WhatsApp वरती बोलणे सुरू झाले.
पण अजूनही मनात प्रेम हा विषय आलेला नव्हता माझ्या तरी, तिचं तिलाच माहीत.
ती समोरच्या शिक्षणाकरिता दुसरीकडे गेलीच, आणि तिथेच थोड दूर जवळ मी पण राहतो, मग आता काय बोलणे भेटणे या सर्व गोष्टी सुरू झाल्यात कधी बोललो तर तासनतास फोन वर गप्पा मारत आणि याच सर्व गोष्टी घडतांनी मी कसा तिच्याकडे आकर्षित होत गेलो कळलेच नाही.
आज पण असच सुरू आहे.
तिच्या मनात काय आहे माहिती नाही.
आणि माझी कधी या बद्दल तिला बोलण्याची हिम्मत झाली नाही
हेच माझ अव्यक्त प्रेम(स्वानुभव)

*पुढे काय करायचं याबद्दल suggestion द्याल रविवारी*🙂
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

जगताप रामकिशन शारदा,बीड.

एक वर्षाच्या गँपनंतर काँलेज सुरु झाले होते आणि आमचे सर्व जुने मित्र सोडून वरच्या वर्गात गेल्याने आमच्या नशिबी ज्युनिअर सोबत बसण्याची वेळ आली होती अशी वेळ पहिल्यांदा आलेली होती.
नित्यनेमाने आम्ही आमचा शेवटचा बेंच ग्रहण केला. आख्ख्या वर्गावरून एक कटाक्ष टाकला आणि तो कटाक्ष एका पाठमोऱ्या आक्रुतीवर घुटळला पण जास्त वेळ नाही. पण ती आक्रुती नक्कीच इतरांपेक्षा जराशी वेगळी भासली.रानावनात ही कस्तुरीच्या गंधाने मन प्रसन्न व्हावे असा भास तिला पाहून झाला. मुली काय पहिल्यांदा पाहत नव्हतो पण मी तिला पहिल्यांदा पाहत होतो. अंधार्या कोठडीत एखाद्या प्रकाश किरणाने प्रवेश करून वातावरणात चैतन्य निर्माण करावे असेच काहीतरी तिच्यात होते.
क्षणा क्षणाला आख्या वर्गाला डोळ्याखाली घालणाऱ्यांच्या गर्दीतही ब्लँक बोर्डाला १८० डिग्री मध्ये घुरणाऱ्या त्या आक्रुती ने मात्र ह्रदयाचे पार पाणी पाणी केले होते.
मनाला वेड तर तेव्हा लागले जेव्हा ती बुधवारी चेक्स चा पोशाख परिधान करून आली.सर्वसामान्य पोशाखात पण ती एक असामान्य अशी भासत होती. तिची वाईट गोष्ट एवढीच की ती कधीच १८० डिग्री सोडून नजर फिरवत नसे .
कधी कधी अस वाटायचं की नवजात बाळ पाळण्यात टाकलेले आहे आणि ते निवांत पाळण्याच्या वर फिरणाऱ्या पंख्याकडे पाहत आहे. बाराही महिने तोंडावर एकच भाव निरागस. वागण्यात पण एवढी निरागसता की सोबत चालणाऱ्या मैत्रिणी चाच हात धरून चालणार. बोलतानाही तोंडाला हात लाऊन दुसरीच्या कानात बोलणार किती भाग्यवान ते कान ज्यांनी ते शब्द प्राशन केले आणि आम्ही तिचे शब्द ऐकायला आमचे कान सुपाएवढे केले तरी फक्त दोन तीन शब्दाच आमच्या कानावर आले.
माणसाच्या गर्दीत वावणारी ती एक खरोखरच स्पेशल व्यक्ती होती.सगळ कस अगदी निरागस आणि नाजूक होत . असा दिवस कधीच आठवत नाही कि तिच्या चेहऱ्यावर चे निरागस भाव बदलेले आहेत. तिचे ते सौम्य शब्द ऐकायला पण कान नेहमीच आतुरलेले राहायचे. कधी कधी हातांच्या बांधलेल्या मुठी पण तिच्या निरागसपणाची मुकि साक्ष द्यायच्या. हो तिच्या हातांच्या मुठीवरून आठवल तिच्या मनगटावर असणारा काळा धागा पाहून मी पण मनगटावर काळा धागा बांधलेला आहे तोच कधी कधी मला खूप बैचेन करुन सोडतो. तो चेहरा नक्कीच एक गुढ होता. तरी पण त्या  चेहर्याच्या असण्याने एक नविन उमेद मनाला लाभायची.कंटाळवाणा तास पण कधी बोर व्हायचा नाही. चेहऱ्यावर चे भाव पहायला मिळावे म्हणूनच बेंच मिळवण्याची धरपड व्हायची. ती वर्गात उशिरा किंवा आलीच नाही तर जीवाची घालमेल व्हायची. काही असो पण तो निरागस चेहरा  हा खूप प्रेरणादायी होता.
तिच्या त्या नाजूक हालचाली पण एवढ्या परिपूर्ण असत ना फक्त perfect अन् perfect.
कोणत्याही गोष्टी चा दिखावा नाही कोणत्याही गोष्टीचा खेद नाही I'm a Barbie girl in my Barbie world असच तिच सुत्र असाव कदाचित. डोळ्यांची ती नकळतपणे होणारी उघडझाप, निरागसपणे ओठावर तरळणारे शब्द, ती एकटक बोर्डाकडे रोखलेली नजर, काहीहि अति नाही पण चोपून चापुन बांधलेले केस आणि कानात असणाऱ्या त्या सोनेरी लहान लहान रिंग खरोखरच तिच्या सौंदर्यात भर घालत असत.
वर्षामागुन वर्षे लोटली पण आजही तो निरागस चेहरा तेवढ्याच निरागसपणे डोळ्यासमोर येतो आणि मनाला चटका लावून जातो. सध्याच्या काळात बेगडी निरागस चेहऱ्यावर पण तो चेहरा खूप भारी आहे. शेवटी originalतेच original असत. अपेक्षा आहे की नशिबाच्या दयेने जर तो चेहरा पुन्हा एकदा समोर आला तर तोच निरागस आणि लोभस असावा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रा. रोहन बाळकृष्ण वर्तक,लोणावळा, मावळ, पुणे

ती तशी खूपच जवळची पण आणि हक्काची देखील, तिच्यामुळे संपूर्ण व्यक्तित्व घडल आणि एक सदृढ मानव म्हणून मी ह्या समाजात खंबीर उभा राहत गेलो. मला आठवतंय माझं शिक्षण व्हावं म्हणून तिने केलेला संघर्ष, विनाखंड केलेले अथक परिश्रम, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र हे तिनेच केलं होतं केवळ माझ्या आणि माझ्या भविष्यासाठी आणि माझ्या सर्वांगीण प्रगती साठी. तिने माझ्या साठी गमावलेले त्याच्या आयुष्यातील मोलाचे क्षण, वेळेला दाखविलेली खंबीरता, आणि बंडखोरीही आणि बरच काही... होय आज पर्यंत तिने माझ्या साठी खूप केलंय पण कदाचित मी तीच प्रेम समजू शकलो नाही. आणि माझं तिच्या वर मनापासून प्रेम आहे हे देखील कधीच सांगू शकलो नाही.......

मी एकत्र कुटुंबात वाढलेलो, आजीच्या अधिपत्या खाली माझे वडील मिळून एकूण सात मुलांचा संसार थाटात बहरताना मी बघत होतो आणि घडत होतो. आर्थिक प्रश्न तसे मोठे होतेच पण त्याची झळ कधीही आम्हाला लागू दिली नाही. घरातील बावीस जणांचा स्वयंपाक, कपडे धुणे, भांडी घासणे या रोजच्या कामाला अत्यंत शीघ्रगतीने आटोपशीर पणे मार्गस्थ करताना मी रोज तुला पाहायचो, एखादं काम माझं नाही किंवा इतर कोणाचं तरी आहे हा विचार तुझ्या मनात कधीच आला नाही, समोर येईल ते सर्व काम पूर्ण करण्याची तुझी नेहमीच लगबग असायची. हे सर्व आवरून घरातील वाढत जाणाऱ्या गरजांना पूर्ण करण्यासाठी फावल्या वेळेत ब्लाउज, परकर, शिवण्या पासून साडीला बीडिंग आणि फॉल करण्यात तू स्वतःला गुंतवून घेतलं होतंस. अण्णांना(वडिलांना) रसाच्या गुऱ्हाळात ऊस तोडण्यास मदत करण्या साठी देखील तू कधी मागे पुढे पाहिलं नाहीस. ह्याच चोवीस तासात इतर सर्व आराम करत असताना माझा आणि ताईचा नियमित अभ्यास देखील घ्यायचीस.

आजपर्यत तू तुझें माहेर असो किंवा सासर सर्वांसाठी अथक परिश्रम घेतलेस,  आणि माणसं बांधलीस. तू नेहमी अन्यायाविरुद्ध आणि  आळशी प्रवृत्ती विरुद्ध प्रखर पणे बोललिस आणि खंबीरपणे उभी राहिलीस. आण्णा गेल्यावर स्वतःचे दुःख बाजूला सारत  ताईच्या संसाराची गाडी खंबीरपणे मार्गावर आणलीस.

तू कधीही आमची उगाचच प्रशंसा केली नाही. घरात सर्व असतानाही वीज, अन्न आणि पाण्याची बचत कशी करावी याची शिकवण स्वतःच्या वागणुकीतून नेहमीच देतेस. ह्याबाबतीत तुझे तीक्ष्ण शब्द कदाचित अनेकांना नकोशे वाटतात परंतु एखाद्या शिकलेल्या सुशिक्षित माणसाला लाज वाटेल अशीच तुझी समज आहे आणि तुझी विचार धारा आहे. 

तू आमच्या गरजा पुरविल्या पण इतर अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमच्यात(ताई आणि मी) स्वयंस्फूर्ती आणि मेहनत करण्याची मानसिकता निर्माण केलीस. तुला समजून घेण्यासाठी मला माझ्या आयुष्याची 35 वर्षे द्यावी लागली आणि खरच आज जाणिव झाली मी मनापासून तुझ्यावर प्रेम करतोय......आई.

आज पर्यंत तुला मी नाही समजून घेतलं पण ह्यापुढे तुझा सन्मान राखण हे माझं आद्य कर्तव्य आहे. तू माझ्यावर केलेली अतोनात कृपारूपी प्रेम माझ्या हृदयात कायम तेवत राहील.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अपेक्षा मानाजी,मुंबई.
      जानेवारी महिना होता, सकाळी बोचऱ्या थंडीत कुडकुडतच आम्ही धामणवाडीच्या डोंगरावर उभे होतो.ताडवाडी आणि धामणवाडीचे डोंगर सख्खा मित्रांप्रमाणे एकमेकांच्या शेजारी स्थित होते,त्यांना जोडणारा निमुळता घटवळणाचा रस्ता जणू ते एकमेकांचा हात धरून उभे आहेत असे भासवत होता.सर्वजण डोळे बारीक करून 'त्या' दोघांची वाट पहात ताडवाडीच्या डोंगराकडे पहात होते.तितक्यात समोरच्या डोंगरावरून 'ते' दोघे येताना दिसले.आदल्यादिवशीच मैत्रीणीने त्यांच्याबद्दल तोंडभरून सांगितलं होत,त्यांची तिथल्या आदिवासी लोकांसाठीच काम, त्या लोकांप्रती समर्पण... बरंच काही. 'त्या' दोघांना येताना पाहून मैत्रीण कानात कुजबुजली "हेच ते दोन दादा". दोघांनी येताच  आमच्याशी संवाद साधला सर्व्हे कसा करायचा ह्याबद्दल माहिती दिली.त्या दोघांमधला ' तो' दिसायला साधारण,गव्हाळ,डोळे छोटे आत गेलेले,पण पाणीदार व बोलके, जाड भुवया,किंचित वाढलेली दाढी, सरळ तीक्ष्ण नाक,कमी उंचीचा व किरकोळ शरीरयष्टीचा.चेहरा जेवढा नाजूक आवाज तितकाच कणखर व स्पष्ट,चेहरा व आवाजात केवढा विरोधाभास! समोरच्याच लक्ष आपल्यावर खिळवत ठेवण्याची विलक्षण ताकद त्याच्यात होती.माझ्या मेंदूला पटतं नसलं तरी पहिल्या भेटीतच माझ्या मनाच्या कोपर्‍यात त्याने अलगद प्रवेश केला.
त्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व्हे साठी आम्ही वेगवेगळया घरांत पांगलो,काम सुरू झालं 'तो' मात्र दिसेना.माझ्या बुद्धीचे आणि मनाशी चाललेलं द्वंद्व काही थांबेना.त्याला पाहण्याची अनामिक हुरहूर मनात होती आणि 'तो' दिसला.शंका विचारायच्या निमित्ताने मी धावतच त्याच्याकडे गेले,सोबत मैत्रीणही होती( विनाकारण). ती त्याला दादा म्हणायची म्हणून मलाही म्हणावं लागलं नाईलाजानं.दिवसाअंती आम्ही कॅम्प मध्ये परतलो, ते दोघे तिथंच राहायचे त्या लोकांसोबत.
नंतरच्या दिवसात त्याने वेगवेगळया विषयांवर आमच्याशी संवाद साधला,पाड्यांमध्ये काम व श्रमदान झाल.रोज दिवसाच्या सुरुवातीला त्याला पहायची ओढ असायची त्याहीपेक्षा महत्त्वाचं त्याला ऐकायची,तो एक उत्तम वक्ता होता. माझं मन स्वतःच्या नकळत त्याच्याभोवती घुटमळायला लागलं होतं. कॅम्पच्या दिवसात त्याच्या दुसऱ्या मित्राशी खूप वेळा वेगवेगळया विषयांवर बोलणं झालं, परंतु त्याच्याशी बोलायची संधी मिळतच नव्हती. तसं त्याला मी कोणत्या मुलीसोबत फारसं बोलताना पाहिलं नाही त्यामुळे तसं धाडस झालं नाही.त्या दोघांसारख्या मुंबईतल्या,शहरातील सुखसोयींसह वाढलेल्या मुलांनी त्या सर्व झगमगाटापासून दूर, अनभिज्ञ अशा पाड्यात येऊन काम करणं,तिथल्या लोकांनी त्या दोघांना आपलं समजून जीव लावणं हे सगळंच 'त्या'च्या बद्दल माझ्या मनात प्रेमभावना निर्माण होण्यास कारणीभुत ठरतं होतं.कोवळ्या मनात पहिल्यांदाच प्रेम ह्या भावनेने माझ्या मनाला शिवल होतं.दिवस सरले परतायची वेळ आली ,मी परतले ते खूप साऱ्या व अव्यक्त प्रेम घेऊन,त्याला पुन्हा भेटायच्या निर्धाराने.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्राची सोनवणे,अहमदनगर.

खरं तर तो माझं पहिलं प्रेम वगैरे नाहीये.. ते फिल्मी दुनियेत असतं तसलं पहली 'नजर वाला प्यार' पण नाहीये.. आणि आमचं खूप सूत जुळतं असंही काही नाहीये.. तो खूप शांत आणि मी प्रचंड बडबडी.. तो कधीच चिडत नाही अन माझ्या तर नाकावर राग बसलेला.. तो अपमानचं उत्तरही शांत राहून देतो तर मी जशास तशी वागणारी.. वेळ पडल्यास कोणाचीही वाट लावणारी.. पण काहीही झालं तरी त्यालाच येऊन सांगणारी.. अगदी रागात काहीबाही बोलले तरी राग गेल्यावर रडून माफी मागणारी.. आणि कसं कुणास ठाऊक पण सगळं माहीत असूनही तो मला समजून घेत होता.. माझा हट्टीपणा, माझा राग सहन करत होता.. तो माझ्या आयुष्यात आल्यापासूनच मला प्रेम आणि रिलेशनशिप यातला फरक समजायला लागला होता.. आम्ही सोबत असताना फक्त मी बोलणार आणि तो ऐकून घेणार हे ठरलेलंच.. कधी कधी न बोलता खूप काही बोलून जाणारा तो.. माझं मन कधी त्याच्यात गुंतलं मला समजलंच नाही.. आणि हे जाणवल्यावर त्याला टाळायचाच प्रयत्न करत होते मी.. स्वतः ला त्याच्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न करत होते.. वाईट वाटत होतं, रडायला पण येत होतं.. फक्त त्याच्यासमोर मी कित्ती स्ट्रॉंग आहे हे दाखवत होते.. तो मात्र काहीच लपवू शकत नव्हता.. खूपदा त्याने मला विचारण्याचा, माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.. आणि मी मात्र त्याने माझ्याशी बोलू नये म्हणून भांडणच केलेलं..
मला कधीच त्याच्यावर असलेलं माझं प्रेम समजू द्यायचं नव्हतं.. पण मी त्याच्यासमोर हरले होते.. तो वेडा.. त्याला तर कळतंच नव्हतं की त्याला नेमकं काय झालंय..
म्हणजे ना.. त्याच्याशिवाय मी जगू शकणार नाही किंवा मरून जाईल असलं काही नव्हतं.. पण असा मित्र मला परत कधी मिळाला नसता आणि मला प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची वाटत होती.. दुसरा कोणीही मुलगा माझा जीवनसाथी झाला असता पण मी स्वतः ला हरवून बसले असते.. कारण स्वतः चा शोध मला त्याच्यामुळे लागला होता आणि जगण्याचं कारण समजलं होतं..
पण अजूनही माझं त्याच्यावर किती प्रेम आहे हे मी त्याला सांगू शकले नाहीये.. आणि कदाचित सांगूही शकणार नाही.. भविष्यात आम्ही सोबत असू किंवा नसू.. पण त्याच्यानंतर कधी कुठं मन गुंतणार नाहीये हे ही तितकंच खरं आहे..

ना जाहीर हुई हम से, ना बयां हुई उन से..
बस सुलझी हुई आंखों में उलझी रही मोहब्बत..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अंजली मालुसरे,नवी मुंबई.

तो होताच तसा.. कोणालाही आवडण्यासारखा...त्याची माझी ओळख शाळेतुन एकमेकांना धक्का  लागण्यापासुन झालेली.. तशी त्याची त्यावेळी GF होती, पण मी उगच त्या दोघांना एकञ बघुन विनाकारण अस्वस्थ व्हायची.. तस बघायला गेलो तर आम्ही दोघे मिञही नव्हतो आणि एकमेकांना अनोळखीही नव्हतो म्हणुन मग मीच ठरवलं की आपण आतातरी फक्त अभ्यासातच लक्ष द्यायचं. त्यामुळेे जेव्हा जेव्हा तो समोर यायचा तेव्हा तेव्हा माझा रस्ता आपोआप वेगळा व्हायचा. ह्यातच आमची दहावी झाली आणि आमचे रस्तेही कायमचे बदलले.
माझं आयुष्य त्यानंतर नवीन काॅलेजमधील अभ्यास, स्पर्धांमध्ये सहभाग घेणं, पथनाट्य करणं यामध्ये व्यस्त होत परंतु ह्याच आयुष्य माञ वेगळ्याच ठिकाणी भरकटत होत आणि याची मला पुसटशीही कल्पना नव्हती..
जवळजवळ तीन वर्षानंतर एकदिवस तो मला दिसला. खरतर त्यादिवशी मी माझ्या मैञिणींबरोबर चौपाटीवर गेली होती आणि हा एकटाच तिथे सिगरेट ओढत बसला होता.. जर त्याचे केस कूरळे नसते न तर मी त्याला ओळखलच नसतं की हा तोच आहे.. शाळेत असताना फिटनेसवर लक्ष देणारा मुलगा खरच हा आहे का असा प्रश्न तेव्हा पडला होता इतका बदललेला.. त्यावेळी मग मी त्याच्याशी बोलायच ठरवलं आणि त्याला आवाज दिला.. माझा आवाज ऐकुन त्याने माझ्याकडे बघितलं आणि कुठेतरी त्याच्या डोळ्यात मला ओळखीची छटा दिसली.. त्या दिवशी बोलता-बोलता मी त्याच्याकडून त्याचा फोन नंबर घेतला आणि निघुन गेली.. दोन दिवसांनी त्याला फोन केला, परंतु पहिल्यांदा फोनवर बोलत होतो म्हणुन काय बोलायच तेदेखील समजत नव्हतं.. तरी त्यादिवशी बोलता बोलता एवढंच समजल की दहावीनंतर त्याची जी Gf होती ती त्याला सोडुन गेली मग ह्याने तिला विसरण्यासाठी सिगरेटला जवळ केल होत. नंतर मग हळुहळु आम्ही फोनवर, मेसेजवर बोलायला लागलो. एकमेकांच्या समस्या आणि त्यावरचे उपायही सांगायला लागलो. पण हे सर्व करताना मला हे जाणवल की मी आधीची वाटणारी अस्वस्थता जी लपवली होती ती परत जाणवतेय आणि मी पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडतेय.. त्याचा माञ आधीच्या अनुभवामुळे प्रेमावरचा पुर्ण विश्वास उडाला होता आणि मला माझा हा मिञ नि आमची मैञी दोन्हीही गमवायचं नव्हत.. म्हणुन पुन्हांदा मला वाटणार्या त्या भावना मनाच्या कोपर्यात कायमच्या बंद करून ठेवल्या..
आज आमच्या मैञीला चार वर्ष झाली.. अजुनही आम्ही मेसेजवर, फोनवर बोलुन एकमेकांचे प्रोब्लेम्स सोडवतो.. त्याने सिगरेट अजुनही पूर्ण सोडली नाही परंतु त्याच प्रमाण खुप कमी झालय. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्यापेक्षा जास्त आता त्याची आणि माझ्या नवर्याची मैञी आहे.. हो.. माझं लग्न झालं आणी माझं पहिलं प्रेम कायमचच अव्यक्त राहिलं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 किरण पवार,औरंगाबाद.
     
         जवळपास नववी-दहावीत असताना पहिलं प्रेम झालेलं. क्रिकेटनंतर माझी दुसरी आवड होती ती, कविता लिहणं. त्या लिखाणातून माहित नाही का पण एका अशा मुलीला मी व्यक्त करायचो जी, साधारणत: साऊथ इंडियन भागात रहाते आहे. तिची परिस्थिती अत्यंत हलाखिची आहे. आणि माझ्याकडे ज्याप्रमाणे मी तिला स्वप्नात पत्र लिहतो, त्याचप्रमाणे मलाही ती लिहायची. माझ्या स्वप्नात अशा मुलीची कल्पना करायचो जीचं नाव गाव ठराविक मला ठाऊक नाही किंवा तीदेखील मला नीटशी पूर्ण ओळखत नाही. पण तरी आम्ही रोज रात्री स्वप्नात भेटायचो. तिचं मला पत्र दर चार दिवसाला आलेलं असायचं. त्यावर मी तिला तिच्या संकटांच निवारण करायचो. आणि पुन्हा ती तिच्या आयुष्यात योग्य दिशेने प्रवास करायची.
           कदाचित तुम्हाला हे फार काल्पनिक वाटेलं पण मला आतून वाटतं कुठेतरी ती या जगतात आहे. आणि तीचं माझ्या आयुष्यातं येणं; हेदेखील सत्य होईल. आजवर एवढी पत्र एकमेकांना लिहणारे आम्ही दोघे. ना कधी ती मला प्रेम करतेयं असं म्हणाली; ना मी कधी तिला तसं म्हणालो. विचार आहे प्रत्यक्षात भेटेल तेव्हा सर्व बोलायचं, जे आजवर पत्राद्वारे जमू शकलं नाही त्याची उकलं करायची. पण खरचं अव्यक्त तर आहेच त्यासोबत अंधुकसं आणि अदृश्य प्रेम आहे माझं. कुठेतरी आमची मन एक आहेत. पण अजून आमच्यातल्या एकमेकांना प्रत्यक्षातले आम्ही भेटलोच नाही आहोत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************