लैंगिकतेपलीकडले मित्रत्व

🌱वि४🌱व्हॉट्सअप ग्रुप.

लैंगिकतेपलीकडले मित्रत्व


शिरीष उमरे,नवी मुंबई
मी पृथ्वीतलावर अवतरलो तेंव्हाची माझी पहीली मैत्रिण  आई व त्यानंतर दुसरी माझी मावशी आणि तिसरी माझी बहीण !!!

हे मी मानतो की ही रक्ताची नाती व आपली संस्कृती ह्यामुळे ही मैत्री वरील विषयाला धरुन नाहीत. शिशुवयात व नंतर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या दरम्यान विरुधलिंगी मैत्रीला काहीही समस्या नसतात.

सगळ्यात जास्त समस्या येतात उच्च माध्यमिक ते पदवी शिक्षणा दरम्यान ... कुमार वयातुन युवा... शरीरात होणारे नैसर्गिक बदल व मानसिक आणि भावनिक चढउतार थोडक्यात केमिकल लोचा  ... ह्या वयातली मुलामुलींची मैत्री !!

हवीहवीशी वाटणारी ही मैत्री घरच्या बंधनातुन व समाजाच्या विचित्र नियमामुळे व आजही योग्य लैंगिक शिक्षण नसल्याने निखळ व निर्मळ राहत नाही.

उलट ह्यावर बंधने आणल्याने दबावातुन अजुन तिव्रता वाढते व नंतर  मुव्ही इंपॅक्ट म्हणा कींवा टीव्हीशो म्हणा कींवा मोबाईल म्हणा.... ही मैत्री वेगळ्याच मार्गाने पुढे जाते. ह्यात पालक, समाज व ह्या वयातला युवावर्ग ह्यांचे समापुदेशन गरजेचे आहे.

नंतरही ही मैत्री उच्च शिक्षण व करीअर दरम्यान आणि लग्नानंतरही विशुध्द मानल्या जात नाही. अश्या मैत्रीबद्दल गॉसिप, कुजबुज व संशय घेणे सुरुच असते. कधी उघडपणे तर कधी पाठीमागे घाणेरडे बोलणे ही विकृत मनोवृत्ती अजुनही जीवंत आहे.

गमंत अशी की मुलबाळ मोठी झालीत कींवा चाळीसी पन्नासी ओलांडली की परत ह्या मैत्री ला कोणी काही बोलणार नाही हा...

म्हणजे १२-४२ ह्या तिन दशकातल्या वयातली मैत्री ही लैंगिकतेपलीकडली असु शकते ह्या संकल्पनेला आपल्या देशात  कायदेशीर मान्यता असली तरी अजुनही नैतिक व सामाजिक मान्यता नाही.... हे बदलायला हवे... नाही का ?

अनिल गोडबोले,सोलापूर.
लैंगिकता आणि मैत्री हे वेगवेगळे विषय आहेत. त्याच्या पलीकडे जायचे म्हणजे काय करायचे? त्या पलीकडे किंवा अलीकडे मैत्री असते का? माझ्या लैंगिकतेचा आणि माझ्या मैत्री चा काय संबंध?...

मी एक सोशल वर्कर म्हणून काम करत होतो त्या संस्थे मध्ये सर्व एच. आय. व्ही. ची लागण झालेल्या व्यक्ती होत्या.  आम्ही संस्था निर्माण केली व त्यांना संचालक केलेलं होत.. पण मदत म्हणून किंवा एक प्रकल्प होता त्या साठी मी जात होतो. त्या मध्ये एक बाई (मुलगी आणि बाई मधला फरक कळत नाही मला) होत्या. नवरा एड्स ने गेलेला आणि आम्ही त्यांना समुपदेशन करून मार्गदर्शन करताना आमच्याच संस्थेत नोकरी दिलेली.. सर्वांसोबत काम करत असल्यामुळे सहाजिकच मैत्री झालेली. रोज संध्याकाळी मी त्यांना गाडीवरून त्यांच्या स्टॅन्ड पर्यँत सोडत असे..... या गोष्टीचा एवढा मुद्धा झाला की काही जणांनी परस्पर त्यांना सांगितलं की.. " तू एका चांगल्या माणसाला जाळ्यात ओढून चुकीच करत आहे." आणि त्यांनी मानसिक ताण घेतला...
 मला तसं कोणी समोर बोललं नाही पण ऑफिस ला त्या दिसल्या नाहीत म्हणून चौकशी करताना मला कळलं की तब्येत बरी नाही म्हणून..

मग काही दिवसांनी त्या ऑफिसला आल्या.. माझ्याशी बोलनात. जेवढं काम तेवढं बोलणं.. मी पण लक्ष दिलं नाही..

एके दिवशी त्यांना जायला उशीर झाला आणि गाडी चुकली व त्यांना गावात जायला दुसरी बस नव्हती.. फोन करून मदत मागवायची लाज वाटत असल्यामुळे त्यांची खूप द्विधा मनस्थिती झाली.. खूप स्ट्रेस मुळे चक्कर येऊन पडल्या.. एका रिक्षा वल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलं त्यांना.

मला दोन दिवसांनी कळलं तेव्हा मी भेटायला गेलो तेव्हा ही सर्व हकीकत ऐकून मला शॉक बसला.... तेव्हा मला देखील काही करावे कळत नव्हतं...

काही दिवसांनी संस्थे मध्ये एक व्याख्यान आयोजित केल होत.."स्वतःच स्वतःला दिलेला दोष"(सेल्फ स्टिंगमा) या वेळी मात्र मी गप्प न बसता एक सेशन माझं आयोजित केलं आणि त्याच नाव होतं "मैत्री आणि लोकांचा दृष्टिकोन"..

माझे मुद्धे सर्वाना पटले एवढंच नाही तर जेवढे इतर स्त्री पुरुष होते त्यांची देखील मत बदलली.

त्या कार्यक्रमा नंतर त्या मॅडम बोलत्या झाल्या ... मग प्रश्न असा उरला की , "नेमकं अडकलं होत काय?" तेव्हा एकच उत्तर दिलं मी की फक्त ज्याने तुम्हाला हा सल्ला दिला त्याला "मैत्री" हा शब्द कळलेला नाही.

वैयक्तिक जीवनात असे अनुभव येतात.. भिन्न लिंगाच्या व्यक्ती कडे लैंगिक आकर्षण नाही.. असं होत नाही. पण मैत्री ही भावना असेल तर दिसणं, जात, धर्म, पैसे, लिंग या गोष्टी आपोआप मागे पडतात.

काही समलिंगी लोक, ट्रान्स जेंडर लोक चांगले मित्र असू शकतात.. यावर कोणच विश्वास ठेवत नाही.. उलट मैत्री दाखवणारे केसाने गळा कापताना दिसतात..

आपण एखाद्या गोष्टी कडे कोणत्या भावनेने बघतो त्या प्रमाणे जग दिसत.. आणि ज्याला स्त्री पुरुष, पुरुष पुरुष, किंवा स्त्री- स्त्री अशी मैत्री दिसते त्याला खरच मैत्री कळलेली नाही..

अशा सर्व व्यक्तींना एकत्र करून एक कार्यशाळा घेऊन सांगावं लागत की.. तुझ्या मताने आमच्यात काही फरक पडणार नाही.. पण मानव होण्यातली एक पायरी समजलेली दिसत नाही.. तेवढं समजून घे.

जगताप रामकिशन शारदा,बीड.

अंधाऱ्या खोलीतही जो आपले अस्तित्व टिकवून जीवनाला जगण्याची एक नवीन उमेद देतो तो प्रकाशाचा किरण आणि मित्र सारखाच असतो की मैत्रिणी सारखा असतो. छे बाबा मित्र की मैत्रीण........ मित्र की मैत्रीण..........अरे काय हे . जाऊ देत त्याच्याशी आपली मैत्री असते. झाल समाधान. कशाला उगीचच मैत्रिला तो आणि तीच्या भानगडीत टाकताय. फक्त मैत्री बोला न सभ्य नागरिकांनों
हो ह्या भानगडी शब्दावरून आठवल तो आणि ती एकत्र दिसले की लोकांना भानगड आठवते आणि समाज तर इतका पुढे गेला आहे की तो आणि तो एकत्र दिसले तरी भानगड वाटते. अशा लोकांच्या सदविवेक बुद्धी ची मला कीव येते.
मित्र व मैत्रीण यापुढे जाऊन मैत्री ही संकल्पना समाज का स्वीकारत नाही? मग नेमका समाज कोण? तुम्ही मी आणि आपण . एक मुलगा आणि मुलगी मित्र म्हणटल्यावर आपण त्यांच्याकडे का उगीचच उत्सुकतेपोटी पाहतो.माणूस हा समाजशील प्राणी आहे तर मग मध्ये लिंगभेद का आणतो?  मुलाची पहिली मैत्रीण आई तर मुलीचा पहिला मित्र वडील मानत असू तर मग समाजात रक्ताच नात नसणाऱ्या दोन उभयलिंगी व्यक्तीमध्ये मैत्री का असू शकत नाही?
अशा या बुरसटलेल्या मानसिकतेमुळेच बरेच सुसंवाद घडायचे ते बिघडत आहेत. आणी कुतुहलापोटी अनेक चूकीच्या गोष्टी घडताना दिसत आहेत. याला आपल्या पाल्यांना दोष देण्यापेक्षा आपल्या मानसिकतेला दोष.देणे गरजेचे आहे. आपण त्यांना स्वतंत्र देऊन ते त्याचा वापर करतात की स्वैराचार हे पाहणे म्हणजे आपल्या मूल्यांची अग्नीपरिक्षा.
दोन उभयलिंगी व्यक्ती फक्त शारीरिक आकर्षणामुळेच मित्र बनतात हा गैरसमज नाही तर संसर्गजन्य रोग आहे बूरसटलेल्या मानसिकतेचा. कारण कारणीमीमांसा करताना जर सुसंवाद झाला नाही तर न्यूनगंड बळावतो म्हणून सुसंवाद महत्त्वाचा मग तो मैत्रीच्या नात्यात किंवा रक्ताच्या. आणि क्या कहेंगे लोग हा विचार सध्या तरी स्मशानात गाढण्याची वेळ आली आहे.
मैत्री च नात मैत्री पुरत मर्यादित ठेवून त्यातून उदभवलेल्या आशा आकांक्षा आणि ईच्छा यांना जोडून उगीचच निखळ मैत्रीला बदनाम करण चूकीचे आहे.

महेश कामडी,नागपूर.
खूपच सुंदर असत हे मित्रत्व
गप्पा मारणे, फिरायला जाणे हॉटेल किंवा छोट्यामोठ्या टपरीवर चहा व बरेच काही.....या मैत्री मध्ये माणूस बिनधास्त पणे वागतो, सर्वांसी मिळून राहतो. जवळपास आपल्या सोबत घडणाऱ्या गोष्टी ही एकमेकांबरोबर शेअर करतो.
आणि मित्र म्हतलं की पुन्हा त्याचे पण मित्र असतात ज्यामुळे नवीन मित्रही मिळतात. कधी न भेटलेले, कधी न बोलले काही क्षणातच आपले से वाटतात.
पण आपल्या समाजात मुलगा - मुलगी एकत्र दिसले की का लोक वेगळा नजरेने पाहतात?
2 -3 मुल 2-3 मुली असल्या तर फारस कोणी लक्ष देत नाही पण दोघे सोबत असले की...आता तर सिटी मध्ये फारस कोणी लक्ष देत नाही, पण खेड्या गावात आजही असे पाहायला मिळते.
असो ...मी पण रिलेशशिपमध्ये रहलो आहे पण जी मजा जे प्रेम मित्र - मैत्रिणी बरोबर अनुभवतोय ते त्या संबंधात दूर पर्यंत सुधा दिसत नाही.लैंगिक संबंध ठेवण्यासाठी प्रेम करणे खूप ठिकाणी बघितलेच असेल पण असला काही विचार न ठेवता मित्र म्हणून जी मज्या असते ते कशातच नाही.थट्टा, मस्करी, भांडण, यात पण प्रेमच असतं.
आपल्याच मैत्रिणीची तिच्या मैत्रिणीसोबत मिळून टांग खीचने, चिडवणे.मला तर फार आवडत, आणि हेच खरे मित्रत्व जगात सर्वात सुंदर वाटत.संगीता देशमुख,वसमत
      मैत्री हे नाते सोडले तर सर्व नाती रक्तबंधनातून येतात. आणि ती कर्तव्यबुध्दीने निभावल्या जातात. पण मैत्री हे नाते मनाच्या बंधाने बांधलेली असतात. मग ही मैत्री कोणाशी,कधी आणि कशी होईल हे आपण सांगू शकत नाही. प्रेम वेगळे आणि मैत्री वेगळी! प्रेम हे एकाच व्यक्तीशी होऊ शकते पण मैत्री अनेकांसोबत असू शकते. आज आपण पुढारलेपणाच्या कितीही फुशारक्या मारत असलो तरी आजही आपल्याकडे स्त्री-पुरुष मैत्री म्हटले की,भुवया उंचावतातच! याचाच अर्थ अजूनही भारतीय मानसिकतेने हे नाते निखळ स्वीकारले नाही. पुरुष व स्त्री यांची मैत्री म्हटलं की,त्याला मैत्रीसारख्या पवित्र शब्दाने त्याचा उल्लेख न होता,लफडं,अफेअर असा उल्लेख केला जातो. कदाचित अशा नात्यात असा दृष्टिकोन नसतोही पण बऱ्याचदा तो मनात आणून दिल्या जातो आणि मग हे नाते जेवढे मोकळेपणाने रहात होते तो मोकळेपणा निघून जातो. आणि पुरुषाला कोणी चूक ठरवत नाही,स्त्रीलाच चूक ठरवत असल्याने ती स्वत:ला दोष देत रहाते.
          खरेतर अशा नि:स्वार्थ आणि निखळ मैत्रीचे नाते अनेकठिकाणी पाहिले. यात प्रमाण अतिशय नगण्य आहे पण मी पाहिलेले, अनुभवलेले आहे. कोणीतरी मन मोकळे करण्यासाठी एक मित्र किंवा मैत्रीण हा भेद विसरणे गरजेचे  आहे. आज सर्वच क्षेत्रात स्त्री पुरूष खांद्याला खांदा लावून काम करत आहे अशावेळी तिला मैत्रीसाठी एखादा पुरुष योग्य वाटत असेल तर त्यात वावगे ते का? लोक बोलतच रहातात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन आपण आपल्या नात्यात अंतर न येवू द्यायला हवे. मैत्री निखळ असेल तर हे लैगिंकतेच्या पलीकडचे मित्रत्व श्रेष्ठ ठरू शकते.

अर्जुन (नाना) गोडगे ,उस्मानाबाद
ही गोष्ट माझ्या जीवनातील....माझी एक मैत्रीण होती. आजही आहे..आमची फक्त मैत्री होती. आम्ही एकमेकांना सर्व गोष्टी सांगायचो.....आमची जवळीकता वाढत चालली होती पण आमच्यामध्ये मैत्री पलीकडे काहीच नव्हते....पण आमचे हितशत्रू काही कमी नव्हते....बगता बगता आमचे लफडं असल्याचे अफवा पसरली. कशाचं काय आणि कशाचं काय ??  मन बधिर झालं होतं तिला मी सर्वात जवळची मैत्रीण मानत होत आजही मनतोय...पण या समाजातील षंड लोकांनी आमचे नाते गंड बनवले. कोणत्याही क्षणी माझ्या मदतीला धावणारी एक जीवलग मैत्रीण दुरावली.

            समाज खरंच खूप डोळस आहे. नाही तिथं लक्ष देतो अन कोणत्याही नात्याला लैगिंकतेचा मुलामा देतो...माझासारखा लोकांना दुनियादारी पासून दूर न ठेवता त्याचा अविभाज्य भाग बनवतो....खरंच आपण लोकांना काहीच मनु शकत नाही. आजकाल काय करावं हे सुद्दा ठरवण्याचा अधिकार मला नाही.....मला खरं तर या समाजातील लोकांना राग येत नाही नाही तर माझीचं कीव येते. "च्या मारी" जी मैत्रीण होती ती म्हणजे माझे मन मोकळं करण्याचा एक कप्पा होती......समाजाच्या चाकोरीने तिला ही हिरावून बसलो.

            खरं तर आज लैंगिकशिक्षण ची गरज आहे प्राथमिक वर्गात....अर्ध आयुष्य मातीत गेलं तरी तरी माझी मैत्री एका लेडीज असणं म्हणजे लोक लफडं समजतात. खरं तर या सर्व गोष्टीना आपण जास्त महत्त्व देतो जे करायचं ते करत नाही त्यामुळे झ्याठात दुनिया असं म्हणून जगायचं ठरवलं आहे...बघू काय काय होतंय ते.....

अपेक्षा पाचुपते मुंबई.

संध्याकाळची वेळ होती, प्रचंड थकाव्यामुळे ट्रेन मध्ये बसल्या बसल्या डोळा लागला.गाढ झोपेत असताना खांद्याला राकट उबदार स्पर्श झाला मी दचकून वर पाहिले तर शेहेनाज उभी, तिने स्मित हास्य करत माझ्याकडे पाहिले.किती वेगळी दिसत होती ती आज , कमनीय बांध्यावर गडद निळ्या रंगाची साडी अधिकच खुलून दिसत होती.सावली परंतु तितकीच रेखीव, तिच्या खोल डोळ्यात वेगळीच चमक होती.सुंदर चंद्रावर जसे डाग राहावेत तशी तिच्या चेहऱ्यावरची बारीक खुरटी दाढी तिच्या सौंदर्यात बाधा आणत होती.तिने आनंदाने माझा हात हातात घेतला व चॉकलेट माझ्या हातावर ठेवत म्हणाली "तेरेको देख के ही चढी मे".हल्ली तिची नी माझी वारंवार भेट व्हायची कधी ट्रेन मध्ये तर कधी रेल्वे स्थानकावर.तीही माझ्याच स्थानकाजवळ राहत असल्याने बऱ्याच गप्पा व्हायच्या,परंतु इतर बायकांचे आम्हा दोघींवर लागलेले खोचक डोळे माझ्या नजरेतून सुटायचे नाहीत आम्हा दोघींमध्ये मैत्री केव्हा झाली कळलंच नाही.माझ्याकडे पैसे मागायला आलेल्या किन्नरशी माझी अशी मैत्री होईल अस कधी वाटलं नव्हतं.आजही मला आमची पहिली भेट आठवून  हसू फुटतं,जेव्हा तिची पैशांची मागणी मी नाकारलेली आणि ती नाक मुरडून निघून गेलेली.नंतर मला ती बऱ्याचदा दिसू लागली पैसे द्यायच्या निमित्ताने संवाद होऊ लागला संवादाचे रूपांतर गप्पांत आणि गप्पांचे मैत्रीत कधी झाले कळलंच नाही.ती पैसे मागत असली तरी स्वाभिमानी होती म्हणून कामासाठी प्रयत्न करण्याबद्दल सुचवलं होतं आणि ते तिने मिळवलं.एका भल्या माणसाने तिला स्वतःच्या वाखरीत टीकल्यांची पाकीट बनविण्याच काम दिलं परंतु त्या कामावर उदरनिर्वाह होत नसल्याने उरलेल्या वेळेत ती पैसे मागते. हातावरचं चॉकलेट पाहताना आठवणींनी
डोळ्यासमोर फेर धरला.चॉकलेट देऊन ती लगेचच पुढच्या स्थानकावर उतरली, तिने माझ्यासाठी ट्रेन मध्ये चढावं एवढी आमची मैत्री घट्ट झाली होती ह्याची जाणीव त्या घटनेनं करून दिली.
मैत्रीच्या पात्रतेत वयाची, लिंगाची, वर्णाची, जातीची जीविताची कसलीच अट नसते, मैत्री लहानग्या रोपट्या पासून निर्जीव बाकाशी होऊ शकते.परंतु माणसाने मैत्रीला नेहमीच विशिष्ट चाकोरीत बांधून ठेवले.समाजातील जुनाट विचारांच्या लोकांच्या मनात लैंगिकतेबद्दल  जळमटं घर करून आहेत ती वेळीच काढून टाकायला हवी तरच प्रत्येक जीविताला लैंगिकतेपलीकडे माणूस म्हणून जागायचा हक्का मिळेल.


महेश देशपांडे.ढोकी,धाराशिव
हा विषय खुप महत्वाचा आहे, याची अनेक कारणं देता येतील.
पण पहिल्यांदा आपल्या समाजात अजून लैंगिकता किंवा त्याविषयीची माहिती लोकांना नाहीच..

मुलगा आणि मुलगी याशिवाय अजून एक प्रकारची व्यक्ती असते हे समजायला आत्ताच्या काळात जरी उशीर होत नसेल तरी, आधीच्या म्हणजे साधारण १० ते १५ वर्षांपूर्वी खुप उशीर व्हायचा आणि मग त्यातून त्याचा निव्वळ *विनोद* केला जायचा...
आता परिस्थिती निश्चित बदलली आहे, अगदी सरकारी पातळीवर देखील याची दखल घेतली जातेय. पण याहून महत्वाचं म्हणजे आपण समाजात असणारी माणसं हा बदल कितपत स्वीकारणार आहोत? हे आहे... जर बदल स्वीकारायचा असेल तर आपल्याला संबंध ठेवायला हवा.. आणि हा संबंध *मैत्री* च्या नात्याने अधिक दृढ होईल, समृद्ध होईल..
अनेकांना माहीतही नसेल की
*तृतीयपंथी लोकांच्या समस्या* यावर अगदी पीएच डी मिळवली आहे..पण त्या P. Hd पेक्षा मित्रत्वाच्या नात्याने त्या घटकाला आपलंसं केलं आणि त्यांना स्वीकारलं तर ते त्यांच्या -आपल्या सर्वांच्या हिताचं होईल. नाहीतर समजतील ही दरी अशीच राहील...

या विषयामध्ये, अगदी जवळचा विचार करायचा झालं तर फक्त मुलगा आणि मुलगी एकत्र दिसले तर काय फरक पडतो, हे फक्त अनुभवातूनच समजण्यासारखे आहे ते शब्दात व्यक्त होता येत नाही... खरच हे भयानक वास्तव आहे... मला ते शब्दबद्ध करता येत नाही... मुलगा आणि मुलगी यांच्या मैत्रीच्या नात्याविषयी एवढंच सांगू इच्छितो की मैत्री जरूर करावी... फक्त आपला विश्वास तुटू देऊ नये...

आपण खुप भाग्यवान असतो ज्यावेळेला आपल्याला *निखळ* मैत्री अनुभवायला मिळते...

‪शरद देशमुख‬:

   खरेतर या गोष्टींना मान्यता मिळायला अजून खूप वर्षे लागतील .आता कूठे याची सुरुवात झाली आहे .

याची कारणेही तशीच आहेत .भारतीय राज्य घटनेच्या आधी ज्या कायद्याप्रमाणे आपल्या देशात स्त्रियांना जी वागणूक दिली जात होती ती फार भयानक होती .स्त्री म्हणजे तिला कोणत्याही प्रकारचे अस्तीत्व नाही , ती उपभोगायची वस्तु असे पहिले जात होते .तिला कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र नव्हते .आणी हीच रुढी परम्परा पुढे चालत आणलेली आहे आपण पुढे .

मात्र राज्य भारतीय घटनेने स्त्रियांना सर्व हक्क बहाल केलेत.

खरेतर हा विषय _
समानतेची जाणीव करून देणारा अभ्यास क्रम , लैंगिकता विषयी अभ्यासक्रम मुलांना अभ्यासात  द्यायला हवेत तेव्हा कुठेतरी मनामध्ये समानतेची भावना निर्माण होईल .

समाजामध्ये विरुद्ध लिंगी मैत्रीला अजूनही स्थान नाही .यामधे आपणच घरामध्ये आपल्या मुलांना या विषयी मार्गदर्शन केले पाहिजे .किशोरवयीण  मुलांमध्ये या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे .

राहिला प्रश्न 30 च्या पुढे या वयात सहसा जास्त शंकेच्या नजरेने  नाही पहिले जात परंतु समाज मान्यता कोठे आहे .ती विश्वासहार्यता सम्पादन करणे गरजेचे आहे आणी ते आपल्या हातात असते .

शुद्ध मन सदवासना असेल तर तर निखळ मैत्री टिकते .मैत्री म्हणजे मैत्रीच असावी त्यापलीकडे जावून काहीच नसावे तेव्हा समाजामध्ये हे नाते खरोखरच मान्य केले जाते आणी जाईल असे मला वाटते .
त्यासाठीच आई वडिलांचे मित्र मैत्रिणी आणी त्यांचे संबंध हे मुलांनी पाहिले पाहिजेत .आणी आपल्याही मित्र मैत्रिणींची ओळख करून देणे गरजेचे आहे .मुळात म्हणजे आपले मित्र मैत्रिणी कोण आहेत हे आपल्या आई बाबांना माहीत असणे गरजेचे आहे .
आज मुले मुली शिक्षणासाठी घरापासून लाम्ब राहतात त्यांच्यासाठी ह्या गोष्टींची गरज आहे आणी जबाबदारीचे वर्तन असेल तर मैत्रीला हा समाज नक्की मान्य करेल .

राहिला प्रश्न किन्नर चा .तर हे लोक खूप चांगले असतात .कोणालाही इजा पोहोवत नाहीत .आणी त्यांना नाही का मन , तेही माणूसच नव्हे तर माणसापेक्षा स्वभावाने चांगले असतात .त्यांच्याबद्दल आपण आपल्या मुलांमध्ये समानतेची भावना निर्माण केली पाहिजे .
मी परवाच पहिले एस टी स्टँडवर एक किन्नर  उभा असताना कॉलेजचे सर्व विध्यार्थी त्याची टिंगल उडवत होते .प्रश्न पडला मला खरेच मुलांना हा विषय सुद्धा अभ्यास हवा समानतेचा .

माझ्या बद्दल मैत्रीच्या नात्यामधे मागच्या पंधरा वर्षा पूर्वी सुद्धा , कॉलेज लाईफ मधे कधीही वाईट अनुभव आला नाही किंवा आई वडिलांकडून भावा कडून मुलगा मुलगी अशी वागणूक मिळाली नाही कारण तेवढा विश्वास सम्पादन केलाय .

आणी असेही आपल्याला रोज नवे मित्र मैत्रिणी भेटतातच की , जे आपल्याला मदत करतात ते पण आपले चांगले मित्रच असतात की ! फक्त आपण त्यांना मैत्री  हे नाव नाही देवू शकत तर चांगले परिचयाचे आहेत असे म्हटले तर समाज मान्यता देतो , कारण मैत्री हा शब्द अजून समाजामध्ये रूढ झालेला नाही .
असे  माझे मात आहे .

हरिश पोटे
भेट तशी योगायोगाचीच घडून आली कॉलेज मधे,तीला भेटला तो आणि त्याला भेटली ती.

सुरवातीला ओळख ही दोघांची आभ्यासा पुरतीच झाली होती हळूहळू त्यांची मैत्री मात्र वाढत होती. बाजूच्या डोळ्यांना का कुनास ठाऊक खुपत होती.

समरसता येवढी की, तीने बोलल की त्याने शीर डोलवायचं आणि त्याने बोलल की तीने ते उचलायच. दोघांची चर्चा म्हणजे वेळेची ही मंदी होती आणि कधी वाद होत नाही अशी कोल्ह्यांची खंत होती.

ती आणि तो जेव्हा हिंडत बरोबरी, जनता मात्र हळूहळू कुजबूजत होती सारी.जी भानगड दिसते ती असेल कारे खरी कारण जोडी दिसायलाही अगदिच होती न्यारी.

समाज्याच्या मानसिकतेला ते दोघे कायमच  धुडकाऊन मारत होते, त्या मधील मिश्किली काढून साऱ्या गप्पा त्यांच्या भरत होते.
ना कधी कॉफी ना कधी आईस्क्रिम, ना कधी आवर्जून भेटायचीच आस होती, तर ना कधी पडत्यात सावलीसाठी भुनभून होती.

तिने प्रसस्तावना दिली की त्याची मांडनी भक्कम होती, शास्त्र सगळे पालथे घालायचे मग जीवशास्त्र कसा वगळता. एवढं मंथन होऊनही नात्याला ना कधी वासनेचा वात होता.

जरी दूरदेशी गेली असली ती तरी मन मात्र मोकळ त्याच्याकडेच होत. त्याच्याही गणितांची तीच्याकडेच आहेत सुत्र. त्याच्या रोजनिशीत मैत्रीच्या पानावर तीच नाव वरच होत.

आता सगळे जन म्हतायत, एवढ चांगल सूत असताना मंगल करायला काय झाल होत, पण त्यांना कोण सांगे मैत्रीच नात बरोबर राहण्यापेक्षा सोबतीमधे ज्यास्त असत..

किरण पवार,औरंगाबाद.
तुम्ही-आम्ही म्हणजे सहसा सत्तरी, नव्वदी वा आपली एकविसाव्या शतकातली पिढी बऱ्यापैकी लैंगिकतेपलीकडच्या मित्रत्वाला स्विकारते. आदराने जपते. पण काही वेळा असं झालेलं अजूनही खेड्या-पाड्यात पहायला मिळत नाही. अहो इथे लोक मुलगा-मुलगी एकत्र येऊच नयेत, आणि आले तर त्यांच प्रेमप्रकरण चालूयं की काय? अशा विचार ठेवतात; त्या ठिकाणी कसं काय समलैंगिकतेला स्विकारलं जाईल? याचाही विचार व्हायला हवा. कारण लैंगिकतेपलीकडे जाऊन जर आपण एखाद नातं टिकवू शकत असू. आणि ते योग्य दिशेने असेल तर बऱ्याच वेळा अडचणींना सामोर जावं लागतं ते केवळ लोकांच्या मानसिकतेमुळे. आणि मुळात ही मानसिकताच आपल्याला त्यांच्यात हळूहळू रूजवावी लागणारं आहे. एकेक पाऊल त्यासाठीच तर टाकायचं आहे.
       लैंगिकतेपलीकडचे मित्रत्व जपणूक करतं काही अमूल्य क्षणांची. त्याचे मर्मबंध ज्याचे-त्याच्याचपाशी. हलकंफुलकं, रमवणारं, सावरणारंही असतचं की ते नातं.

अनिकेत कांबळे,कोल्हापूर.

 खरं तर विषय मांडणी करणं हेच एक अवघड काम आहे कारण लैगिकता हा आजकाल चा गंभीर विषय मांनला जातो, आणि मैत्री हा निखळ विषय आहे...एकमेकांची मैत्री ही लैगिकतेपलीकडच नात होऊ शकत, कारण संपूर्ण जग एका बाजूला प्रत्येक व्यक्तीकडे माणूस म्हणून पाहत तर काही देशामध्ये मुलगा आणि मुलगी यामध्ये तफावत केली जाते,
खरं तर ज्यावेळी गावाकडचा विषय येतो तेंव्हा मैत्री दिसत नाही तर त्यामध्ये प्रेमापर्यत विषय जातात,आणि तीच मुलं मुली शहरात मोठ्या कॉलेजात जातात तेंव्हा एखादी मुलगी किंवा मुलगा त्याच्या जवळ जरी बसला तरी त्याला अस वाटत की यार ही आपल्यावर प्रेम करते किंवा like करते, खरं तर शहरी विभाग इतका मॉडर्न झालाय की कोण मित्र आणि कोण प्रियकर हेच समजत नाही..पुस्तक वाचून काढल्यासारखी धडाधड आपसूक मित्र आणि प्रियकर बदलले जातात..आणि हे वास्तव आहे..
मग लैगितकडेपलीकडचं प्रेम आपण जपतो का??कारण माझ्या वयक्तिक मतानुसार आजकाल ही नाती मनापासून नाही तर शरीरापासून जोडली जातात..कारण मनाची नाती दीर्घकाळ टिकतात..आणि शरीराची गरज असे पर्यंत...!!!आणि माणसं मनाला नाही शरीराला प्राधान्य देतात


अर्चना खंदारे,हिंगोली.
21 व्या शतकाच्या  पहिल्या दशकामध्ये लैंगिकतेपलीकडचे  मैत्रत्व या विषयावर जर विचार करायचा  झाला तर थोडं विचित्र वाटेल पण आताच्या  या दुसऱ्या दशकामध्ये लैगिकता किंवा लैगिकतेपलीकडचे मैत्रत्व असो  काही जास्त फरक पडत नाही कारण आज ची तरुण पिढी हि फार हुशार झाली आहे, का तर ठिकठिकाणी  या विषयांबाबत समुपदेशन होताना दिसत आहेत .
             पण आपला समाज आज हि आपला ( समाजाचा )  दृष्टीकोन बदलायला तयार नाहीय. कारण दोन  व्यक्ती सोबत दिसल्या कि आपला समाज त्यान्च्या विषयी गैरसमज  निर्माण करतो.
              
             दोन व्यक्त एकमेकांशी भावनेने  जवळ येतात .काही ठिकाणी असं हि पाहायला  मिळते की,एका ठिकणि काम करणारे दोन व्यक्ती हे खुप जवळ असतात ,म्हणजेच  त्यान्ना एकमेकांची सवय झालेली असते व या सवयीतूनच त्यांच्या मध्ये गाढ  मैत्री तयार होते.मग सोबत चालणे ,बोलणे ,हसणे,सुख - दुःखामध्ये एकमेकांना साथ  देणे इत्यादी सर्व गोष्टी या मैत्री मध्ये होतात.मग हि मैत्री मुलां- मुलीं तसेच  लग्न झालेल्या स्त्री- पुरुषा मध्ये हि होवू शकते.
          
            पण आज हि काही मुले-  मुली या नात्याला प्रेमाचं नाव  देतात आणि थोडा गैरसमज झाला कि मग एकमेकांविषयी  द्वेष करतात .त्याने / तिने आपल्या बरोबर वाईट केलं आहे म्हणून  या नात्याचा शेवट करतात.आज हि अस्या या नात्यामध्ये मैत्री मध्ये दृढतेची वा विस्वासाची  गरज आहे..
                 नाही तर हा समाज तयार आहेच....अस्या निर्माण केलेल्या  नात्यांवर आपली मते मांडायला ....
मग त्या समाजामध्ये आपण हि येतोच .....


डॉ. विजयसिंह पाटील.कराड.

'लैंगिकते पलीकडचे मित्रत्व ' हा विषय माझ्या मंदबुद्धीच्या डोक्यात घोंगावत होता. त्या विचारात गुंग असल्याने शेजारी कावळे सर ,घारे, घोलप साहेब ,शिपु नाना  इत्यादी सर्व जण बसल्याचे लक्षातही आले नाही .(यावरून आपणास माझ्या एकाग्रतेबद्दलचं कौशल्य लक्षात आले असेलच.)
" एव्हड्या कसल्या विचारात पडलाय " असं घोलप साहेबांनी विचारताचं मी भानावर आलो.

गंभीर चेहऱ्याने मी "लैंगिकतेपलीकडचे मित्रत्व याबाबत आपलं मत काय "असा प्रश्न विचारून मी माझी या अवघड प्रश्नातून मान अलगद सोडवून घेतली.
"कश्याच्या पलीकडलं मैतर म्हनाला?" असा ढगाच्या गडगडाटी आवाजातआणि काठी जमिनीवर आपटून शिपुनानाचा प्रश्न डायरेक्ट मलाचं. ( शिपुनाना अस्सल ग्रामीण/गावठी व्यक्तिमत्व.) नानांना कसे समजावावं ह्या घोर चिंतेत मी पडत असतानाच घारे नानांच्या कानी लागले.

"शेक्ष व्हयं , हंग असं मराठीत बोला की राव , या सांबाला समजल असं बोला की ऑ "..(शिपु नाना स्वतः ला कधी सांबा म्हणतात तर कधी गब्बर, तसं ते स्वतः ला बरंच काही म्हणतात .) पुढं ' शेक्षला मैतरी कशाला लागती ' असा अत्यंत भाबड्या चेहऱ्याने प्रश्न उपस्थित केला. घारे परत नानांच्या कानाला लागले. हातातील काठी हनुवटीला लावून नाना मोठ्या आश्चर्याने माझ्याकडे बघत बसले.(त्यांना बहुतेक विषयचं कळला नसावा .)
" नॉनसेन्स, हा काय विषय झाला की प्रश्न ? काहीही. आय म सॉरी , बट इट इजअ व्हेरी स्टुपीड क्वशन , एनीवे ,जाऊदे " असं म्हणताचं मी निष्पापपणे  " बरोबर आहे सर तुमचं " असं म्हणून सपशेल माघार घेतली.

"ओ गुर्जी, आमाला कळल असं बोला की , ऑ, न्हायतर मी जातू घराकडं " असं मोठयाने काठी आपटून नाना गडगडले. घारेनी त्यांना बळेबळे बसवून घेतले.
" हा प्रश्न योग्य का नाही याचं कारण दिलं तर बरं होईल  ' घोलप साहेब म्हणाले. " अक्षी बराबर बोलला सायेब, म्या बी हेच म्हणतुया " इति शिपुनाना..
कपाळावर आठ्या घालून कावळे सर " त्याच असं आहे, लैंगिकता आणि मित्रत्व ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्या दोन्हींचा संबंधच काय ?, पुरुषाची आणि स्त्रीची फक्त मैत्री असूच शकत नाही, आपला समाजात हे शक्य आहे असं वाटतं तुम्हाला ? "
आत्ता कुठं शिपुनानाच्या डोक्यात प्रकाश पडला. " बिन लफडयाची मैतरी म्हणता व्हय ? छ्या छ्या , असं व्हईल तरी का कुठं ? ह्याच्यावरनं  आठवलं " नाना काय बोलणार याचा अंदाज आल्याने घारेनी नानाला थांबवलं .. .कावळे सरांच्या तोंडावर कडवट कुजकं हास्य पसरलं .(नाना कधी न्हवे ते आपल्या बाजूने आहे या विचाराने ते खुशीत आले आणि चक्क चहाची ऑर्डर दिली.)

गोडबोले आपल्या मृदू स्वरात म्हणाले '
तुकाराम महाराज म्हणत ' बीज भाजुनी केली लाही ! आम्हा जन्ममरण नाही !!
तुकोबांनी भक्तीच्या तव्यावर वासनांच्या लाह्या केल्या. लाह्या पेरून काही उगवत नाही.
मैत्री चा जन्म भावनेतून होतो. मैत्रीत मानसिक जवळीक अधिक असते.
व. पु. म्हणतात 'निखळ मैत्री तील विलक्षण ताकद म्हणजे त्यातील सहजता .सायी खालच्या दुधाला सायीच दडपण वाटत नाही. साय दुधातूनच तयार होते. आणि दुधावर छत धरते.  मैत्री तशी असावी.

शेवटी आबा म्हणाले ' ते समदं बरोबर हाय असं मानलं तरी, समजा एक बाई आनी एक बाप्या यांची तुमी म्हनता तसी दोस्ती हाय, पन माजी शंका अशी की, गड्याला वाटणार की ही आपल्यावर फिदा हाय, भले तिच्या मनात तसा इचार नसला तरीही,, आनी दुसरी बाजू मंजे, गड्याच्या मनात काय न्हाय, पन बाय इचार करती , माज्यातच काय तरी दोष हाय.. कशी राहणार वो यांची दोस्ती  ?

घोलप साहेब  " स्त्रियांची ही जागतिक समस्या आहे, स्त्रियांना आपल्या सर्व स्वाभाविक क्षमतांसह जीवन निर्वेध पणे जगता यावे यासाठी पुरुषांनी आपली मानसिकता थोडी बदलावी. जग बदलाच्या वाटेवर उभे आहे पण पुरेसा वेग नाही. तो यावा ही सर्वांची भावना असावी.

(यातील संबधित छायाचित्रे इंटरनेटवरवरून घेतलेली आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************