वाचनाचे फायदे

अनिल गोडबोले,सोलापूर.
            तसं पाहायला गेलं तर वाचनाचे भरपूर फायदे आहेत.. हा विषय फार गहन नाही.

सर्वात प्रथम तर जो काही विचार करतो त्या मध्ये वाचन आणि त्यानुसार केलेला विचार असा प्रवास असतो. विचार केला की तशा भावना येतात आणि भावना आल्या की कृती होते.
म्हणजे माणसाचे वर्तन कसे असावे हे ठरवण्याचे काम वाचन करत असते.

वाचनामुळे ज्ञान येत. ज्ञानी माणूस ते वापरल्या शिवाय राहत नाही.

नवीन निर्मिती किंवा घडवण्यासाठी वाचन महत्त्वाचं आहे, म्हणून तर शालेय शिक्षण सगळं वाचनावर अवलंबून आहे.

ज्याचं वाचन चांगलं त्याच आकलनशक्ती वाढते.

वाचन मुळे जीवनातील कठीण प्रश्नावर उत्तर मिळतात.

वाचनावर आपले भाव अवलंबून असतात.

वाचन केल्याने जीवन समृद्ध होते.

वाचन केले की नवीन साहित्याला शब्द कमी पडत नाहीत. लिखित ज्ञान कितीही वर्ष दुसऱ्या पिढीला प्रकाश देत राहते..

शेवटचा मुद्धा.. एका वाचकाने देशाची दिशा ठरवली. संविधान निर्मिती करताना आणि त्या आधी डॉ. आंबेडकर यांनी कितीतरी वाचन केले होते.

प्रख्यात लेखक एकदा लिहून ठवतो.. आणि वाचकांच्या मनात अजरामर होतो
तेव्हा..
"वाचाल तर वाचाल"..!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 निखिल खोडे, ठाणे.
           "वाचाल तर वाचाल" हि म्हण आम्हाला आमच्या शिक्षकांनी अगदी पहिल्या वर्गा पासुन सांगायला सुरुवात केली. "वाचाल तर वाचाल" या म्हणीचा अर्थ असा की तुम्ही वाचणे शिकलेच नाही तर तुमचे भवितव्य धोक्यात येईल. तुम्ही जगाशी स्पर्धा करू शकणार नाही.

               ज्या व्यक्तीला वाचता येत नाही त्याला कुठे जायचे असले किव्हा आणखी कुठले कागदोपत्री काम असले तर तो कधीच करू शकणार नाही त्याला पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. अशाच लोकांची कित्येक वेळा ऐतखाऊ लोक फसवणूक करतात. अनेक ठिकाणी याचे उदाहरण पाहायला मिळते. बँकेमध्ये खासकरून. गावी जायचे असेल तर बस कोणती हे सुध्दा दुसऱ्याला विचारावे लागते. अशा लोकांनी केरळ मधल्या वयाच्या ९८ व्या वर्षी परीक्षा देणाऱ्या व्यक्तीकडून प्रेरणा घेतली पाहिजे.

                अलीकडे मोबाईल, इंटरनेट, टेलिव्हिजन, अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम बघणे यामुळे वाचनाचे वेड थोडे तरुणांमध्ये कमी झालेले आहे. अशा अनेक गोष्टीमुळे वाचनासाठी वेळ नाही अशी कारणे मिळतात.

              वाचनामुळे बुद्धीचा विकास होतो. चांगली पुस्तके वाचल्यामुळे आपल्या विचारांमध्ये भर पडते. वृत्तपत्र वाचून आपण बाहेरच्या जगाची माहिती मिळवू शकतो. वाचनामुळे ज्ञानात भर पडते. एखाद्या विषयावर चर्चा सुरू झाली तर आपल्याला योग्य रित्या आपले विषय मांडता येते. अवांतर वाचन केल्याने आपले सामान्य ज्ञान वाढते. वाचन केल्याने आपण आपले मत योग्यरीत्या मांडू शकतो.वाचनाने आपल्या भविष्याची जडणघडण योग्यरीत्या होते. माणसाचे जीवन यशस्वी करण्यात वाचनाचा महत्वाचा वाटा असतो

           आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर त्या क्षेत्रातील नवीन माहिती, अनेक कौशल्य आत्मसात करावी लागतात त्यासाठी वाचन शिवाय दुसरा पर्याय नाही. माणसाच्या जीवनात एक चांगले पुस्तक महत्वाची भूमिका बजावतात. भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डा. ए. पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात –
“पुस्तकाच्या सहवासात मला ज्ञान बरोबर नेहमीच आनंद मिळालाय. माझ्या घरात सुमारे ५० हजार पुस्तकांचा संग्रह आहे. अध्यात्म, विज्ञान, प्रशासन, इतिहास, भूगोल, व्यवस्थापन आणि वाड्मय अश्या विविध विषयांचा त्यात समावेश आहे. माझ ग्रंथ संग्रहालय हि माझी सर्वात मोठी मौल्यवान ठेव आहे.आणि तेथे व्यतीत केलेला प्रत्येक क्षण सर्वात मौजेचा व समाधानाचा आहे”.
           वाचनामुळे मेंदुला चालना मिळते चांगल्या शब्दामुळे त्यात आणखी भर पडते. आवडणाऱ्या विषयापासून वाचायला सुरुवात करुया.. वाचनाचा छंद लावून घेऊया..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संदिप बोऱ्हाडे,
वडगाव मावळ , पुणे.

   आजच्या जीवनात पुस्तक वाचन ही आवड कमी होताना दिसते. पुस्तक म्हणजे आयुष्य मार्गदर्शक, विचार प्रगल्भतेत वाढ करणारे ज्ञानाचे भांडार"

    वाचनाचे फायदे आयुष्य जडणघडणीत, विचार सामर्थ्यात विशेष भर घालणारे, उज्वल भवितव्य घडविणारे असते.

मी इथे एक उदाहरण देऊ इच्छितो..

एकदा डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे एक माणूस आपल्या मुलाला घेऊन आला..आणि बाबासाहेबांना म्हणाला.. बाबासाहेब माझ्या मुलाला तुमच्यासारखे बनायचे आहे..बाबासाहेब शांत ऐकत होते...बाबासाहेब त्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना आपल्या अभ्यासिकेत घेऊन गेले..आणि बाबासाहेबांनी आपले शर्ट काढले, त्यांनतर बनियल काढले व आपल्या पाठीवरचे व्रण त्यांना दाखविले...आणि बाबासाहेब म्हणाले, या एकाच खुर्चीवर 21- 21 तास सतत अभ्यास वाचन करून हे व्रण तयार झाले आहेत.
बाबासाहेब यांचे वाचनच इतके होते म्हणून त्यांना  symbol of knowledge म्हणतात.

म्हणूनच शेवटी वाचाल तर वाचाल..

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

डॉ. विजयसिंह पाटील,कराड.
          एके दिवशी हॉटेलमध्ये कावळे सर  आले ते हातात एक मोठंच मोठं पुस्तक घेऊन . पुस्तक धाडदिशी टेबलावर आपटून स्थानापन्नं झाले. धाड आवाज आल्याने कसल्या तरी तंद्रीत असलेले शिपुनाना दचकले. त्यांचं लक्ष त्या मोठया पुस्तकाकडं गेलं.मोठ्या आश्चर्याने त्यांनी विचारले ' ह्ये आनी काय ! कसलं बाड घेऊन फिरायला लागलाय तुमी ऑऑ?', का वकील बिकिल व्हताय़?..( असली जाडजूड पुस्तके नानांनं फक्त वकिलाच्या ऑफिसमध्ये लावलेली बघितलेली असतात. आणि ती पुस्तकं वाचण्यासाठी नसून 'शो' ला असतात असं  नानाचं म्हणणं.)
कावळे सर म्हणाले, 'किती दिवस हुडकत होतो हे पुस्तक, आज मिळालं, आत्ता खरी मेजवानी आहे'. मनातला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
अर्थातच हे सगळं नानाच्या डोक्यावरनं, म्हणजे फार वरून गेलं. 'ह्याची मेजवानी ती कशी काय व्हनारं?:.नानांचा अचिमबीत होऊन प्रश्न. (ह्याचं काय तुकडे करून रस्सा करायचा की काय.) हसून कावळे म्हणाले
'अवो नाना, खाण्याची मेजवानी नाही तर  वाचनाची मेजवानी'.
'आनी त्ये काय असतं?'..
 ही येडी माणसं काहीही बडबडतातं असा भाव त्यांच्या तोंडावर स्पष्ट दिसत होता.
गोडबोले म्हणाले 'वाचन करून मनाला फार आनंद मिळतो असं म्हणायचं आहे त्यांना.'
एव्हडं सांगूनही त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेना.
'म्या रोजचं दोन पेपर वाचतु, रोज कुठं काय चाललंय त्ये कळतं,भानगडी कळत्यात, पन ह्यानं मनाला आनंद कसा मिळतो ह्ये काय समजना झालंय, पन म्या म्हणतु, ह्ये एव्हडं वाचायची गरजचं काय ?'..
कावळे सर 'अवो नाना वाचनाने मनोरंजन होतं'.
मनोरंजन हा शब्द ऐकताच नाना ' कसलं काय, कायबी सांगू नगासा, म्या काठी घिवून नातवांचा अब्यासं घेतु, नुसती रडारड,कसली मजा आनी कसलं काय.'
इथे घारे ' अहो नाना, तुमचं मन कसं तमाशातं रमतं, तसं यांचं वाचनात'.
क्षणभर नाना तमाशाच्या बारीत रमले, तोंडावर वेगळंच तेज दिसू लागलं.
'छ्या छ्या, कुठं तमाशा आनी कुठं हे हे', पुस्तकाकडे बोट दाखवत म्हणाले. 'त्याची रंगतच न्यारी, काय ती मंगली नाचती,,,' इथं आबा आणि घोलप साहेब येत असल्याचे दिसल्यानं त्यांनी आपलं मंगलीपुराण जाग्यावर समाप्त केलं.
घोलपसाहेब पुस्तक बघून 'व्वो, फंटास्टिक, जस्ट ग्रेट,सर यू र जिनिअस, कुठं मिळालं हे पुस्तक, काय भारी आहे हे पुस्तक, वंडरफुल, गुड गुड बेस्ट,,' झाडून सगळी विशेषणं संपेतो पर्यंत वाक्य चालू होतं..
पण कावळे सर नानांना म्हणाले'अवो नाना वाचनाने ज्ञान मिळते,'.
'मजी तुमाला म्हणायचं हाय की आमी बिनढोक हाय? ऑऑ' ' नाना संतापाने लाल झाले. असं का म्हनून म्हणला त्ये सांगा पाहिलं.'
आबा चिडून ' गप की शिप्या, तू लेका तिसरीत चार वर्स काडलीसं, ही शिकली सवरलेली माणसं काय म्हणत्यात त्ये ऐकायला काय पैसे पडत्यात व्हयं तुला?, सारकं तुझंच तुणतुणं, चिपळ्या हायचं चालू, अर्धी हाडं सरणावर गेलतीयतं कदी रं सुदरायचा तू ?'
नाना चांगलाच नरमला, मनातली धुसपुस नानांनं हातात चोळत असलेल्या तंबाकूला फटके मारत काढली. असो.

गोडबोले म्हणाले'तसं पहायला गेलं तर वाचनामुळे आपल्याला फायदेच फायदे होतात.
वाचनामुळे ज्ञान येत.
वाचनामुळे जीवनात येणाऱ्या प्रत्येक कठीण प्रश्नाचं उत्तर मिळतं'
'मंजि, माजी साठं वरसं फुकाटं गेली म्हनता?'

आबा 'अर, तसं न्हायं, गीतेपासून ज्ञानेश्वरी, तुकोबांचा गाथा ही सगळी आपल्याला जीवन कसं जगायचं ते शिकवत्यात'.
तेव्हड्यात काळे सर(निवृत्त प्राध्यापक, अष्टपैलू व्यासंगी व्यक्तिमत्त्व)आले. विषय वाचनासंबंधीत आहे असं कळताच ते म्हणाले 'वाचनामुळे जीवन घडू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा गांधी.परदेशात त्यांना एका मित्राने रस्किन या लेखकाचे'अंटु धिस लास्ट' हे पुस्तक वाचायला दिले. त्या पुस्तकाने गांधीजींना प्रचंड प्रभावित केले.त्यांनी त्याचं अनुवाद केला, ते पुस्तक म्हणजे'सर्वोदय'. ग्रंथ अर्थपूर्ण असला आणि वाचक योग्यतेचा असला तर काय घडू शकते याचा हा उत्तम दाखला,ज्ञानामुळे वृत्तीत विनम्रता येते.'
घोलप ' सर बरोबर बोलला, जी मुक्त करते ती विद्या'.
सर पुढंम्हणाले  'अजून एक उदाहरण देतो. रामायणाचं, हजारो वर्षांपूर्वी घडलेलं. जगातील लिहिलं गेलेलं पाहिलं महाकाव्य. आणि पाहिलं नीतिशास्त्रच.तर महाभारत म्हणजे समाजशास्त्र'. सगळ्यांनी माना डोलवल्या.
आबा 'अक्षी बराबर, राम ज्याला पुरुषोत्तम म्हणत्यात त्यो सगळी सुखं असून आयुष्यात कदी हसला न्हायं,आनी ज्याचा जनमच तुरुंगात झाला त्यो कृष्ण कदी रडला न्हायं '.
सर पुढे
'आचार्य विनोबा म्हणतात राम सीता हनुमान, धर्म कर्ण द्रौपदी अशा रामायण आणि महाभारतातील चरित्रांनी सर्व भारतीय जीवन हजारो वर्षे भारून टाकले आहे.गावोगावी आपल्याला राम सीता हनुमान कृष्ण यांची मंदिरे दिसतात'..
हे शिपुनानाला परफेक्ट पटलेलं दिसलं..
सर पुढं 'पण वाईट एका गोष्टीचं वाटतं, हल्ली वाचनाचं प्रमाण फार नगण्य झालंय, बदलेल हीही परिस्थिती बदलेल, पाहूया..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************