प्रश्न आत्मपरीक्षण करणारा आहे.'मी 'च्या ठिकाणी 'तू' लिहिले की दुसऱ्यांना विचारण्यासाठी हाच प्रश्न हक्काचा व सोपा होतो.याचे उत्तर मिळवण्यासाठी डोकं खूप खाजवावं लागत नाही आपलं. हां...पण हा ज्याचा त्याचा प्रश्न.आपले केस आपोआप वयाचा विचार न करता अकाली पांढरे होऊ लागतात.तसे लोक आपल्याला आरशापेक्षा अनपेक्षित जास्त पाहू लागतात.पण जेव्हा कोणत्याही गोष्टीची सुरुवात दुसऱ्याला आपल्या जागी ठेवून करायची असते.तेव्हा अनेक सोपे प्रश्न कठीण होऊन जातात.
तसा हा पण.. एक प्रश्न....मी देशासाठी काय करतो?
'मी 'तुमच्या माझ्यात आहे.त्याला कायम खाद्य लागते,मुंगीच्या दहापट वजनासारखे.जाऊद्या मुद्यावर येतो....मी स्वतःशी प्रामाणिक राहतो.हे आहे एका वाक्यातले माझे उत्तर.येथूनच माझे देशकार्य सुरू होते.अन संपते सुद्धा याच जागी.मग कदाचित पुन्हा प्रश्न निर्माण होईल.काहीजण मनातल्या मनात विचार करत असतील. स्वतःशीच प्रामाणिक असण्याने देशाला काय लाभ?
मी स्वतःशी प्रामाणिक राहतो तेव्हा...देशाला विघातक असणाऱ्या भ्रष्ट आचरण, फसवणूक, अस्वच्छता, अविवेक,आभासी राष्ट्रवाद,अत्याचार ,हिंसा इत्यादी घटकांना मनात जागा राहत नाही.मी त्यांच्याकडे आकर्षित होत नाही. यातूनच मी एक सुजाण नागरिक बनत राहण्याची प्रक्रिया अखंड घडत राहते.जी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी - कार्य करण्यासाठी शाश्वत व गरजेची आहे.
_________________________
माझ्या देशासाठी शेकडो हजारो देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुति देऊन देशाला परकीय जाचातुन मुक्त केले परंतु आजच्या ह्या खा,प्या,आणी मजा करा ह्या विचाराच्या असणार्या ह्या तरुणांना काय समजणार?मला काही वेळेस खुप दुःख वाटते कारण जेव्हा राष्ट्रीय सण येतो आपण आपल्या मुलांच्या हातात तिरंगा झेंडा देतो,पण कुणीही विचार करत नाही की,मिरवणूक झाल्यावर मुलाने झेंडा परत आणलाय की नाही.आपणच जर असे बेजबाबदार वागलो तर काय अधिकार आहे आपल्याला दुसऱ्याला नावे ठेवायचा.
देशासाठी फक्त सिमेवरच लढायला गेलो तरच आपली देशभक्ति सिद्ध होईल असे काही नाही.आपण जे काम करतो आहोत ते काम जर आपण प्रामाणिकपणे केले तिही देशभक्ति होऊ शकते.ऊदाहरण म्हणजे एखादा शिक्षक आहे त्यांनी मुलांना योग्य शिक्षण देऊन जर एक सुजाण नागरिक किंवा एक सुजाण अधिकारी तयार केला तर तिही देशाची सेवाच होऊ शकते.
एखाद्या शेतकर्याने आपल्या शेतीत घाम गाळून अन्नधान्य पिकवले तर इतर लोकांची भुक मिटते हि पण देशाची सेवाच झाली,मजूर राब राबून इमारती ऊभ्या करतो इतर ठिकाणीही काय पण सगळ्यात मोठा वाटा हा देशनिर्मिति साठी मजुराचा असतो म्हणून तो देशासाठी फार मोठं काम करतोय असं मला वाटतय.
आपण फक्त असलेली आचारसंहीता जर पाळली,नैतिक जबाबदाऱ्या स्वीकारल्या तर आपल्याला मी देशासाठी काय करतोय हे विचारायची वेळच येणार नाही.
प्रथमतः आपण जर प्रामाणिक असलो तर आपण इतरांकडून प्रामाणिक रहाण्याची अपेक्षा करु शकतो.
देशासाठी आपण बरेच काही करु शकतो.मि भ्रष्ट नेत्यांना लोकसभा,विधानसभेत जाण्यापासून रोखू शकतो,धर्माच्या नावाने स्तोम माजवणारे,धर्माच्या नावाने भोंदुगीरी करणारे,लोकांची अमाप लुट करणाऱ्याच्या मुसक्या आवळता येतील.देशासाठी बरेच काही करता येईल फक्त ते करायची माझी माणसिकता असायला हवंय.
_________________________
राज इनामदार,पंढरपूर.
1) एकादी गोष्ट आजूबाजूला वाईट दिसली तर मी ती गोष्ट स्वत दूर करण्याचा प्रयत्न करतो .
2) माझ्यानें तें दूर करने नाही जमले तर ..तर इतरांची मदत घेतो ..
3) या दोन्ही वेळेस ती गोष्ट नाही दूर झाली तर कमीतकमी त्या गोष्टीला मनातून वाईट जाणतो ..
4) सगळ्यात जास्त म्हणजे गरजू विद्यार्थी बघून त्यांना शिक्षणासाठी माझ्यानें जेवढे शक्य आहे तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतो ...शेवटी हीच मुल देशाचं भविष्य आहेत .
5) माझ्यामुळे देशाला जरी फायदा नाही झाला तर ..नुकसान तर होणार नाही याची विशेष काळजी घेतो
_________________________
दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम.
देशाला आपल्याकडून काय अपेक्षित असेल? सांगता येईल का याबाबत बरं? आता हे प्रश्न पडले असेल तर मनामध्ये गोंधळ निर्माण होणे साहजिकच आहे. तसाच हाही प्रश्न आहे मी देशासाठी काय करतो?
येथे मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे मी देशासाठी काय करतो यातील " मी " म्हणले की जरा विचार करून बोलणे योग्य कारण आपण लक्ष देतो तो पुढारी काय करतात, पोलीस, सैनिक, शिक्षक, सर्वजण काय करतात याकडे पण मी काय करतो यकडेच्ट आपले विशेष लक्ष असायला हवे पण आपले लक्ष तिकडेच नसते.
मी देशासाठी शक्य होईल तोवर प्रामाणिक राहून मला मिळालेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करतो, याचे कारण १००% प्रामाणिक राहून जगणे अशक्य माझ्या या मताशी खचितच आपणही सहमत असाल?
काय सांगू माझ्याविषयी काय करतो मी तर सध्या मी नोकरी करतो खाजगी बँकेत माझी जबाबदारी आहे पर्सनल लोन देणे सुरवातीला प्रामाणिक राहून काम करताना आठवड्यातून 3 दिवस सिनियर च्या शिव्या आणि ग्राहकांच्या ही खायचो, पण आता थोडा इतरांप्रमाणे ६०-४० करून आठवड्यातून एखडवेलेस शिवी तर कधी प्रशंसा मिळते. शेवटी समाधान आहे की माझ्याच देशातील लोकांसाठी माझ्याकडून कार्य होत आहे. यापुढेही ते यापेक्षा वेगळ्या संदर्भाने होईल याची काळजी बाळगतो.
माझी आर्थिक कुवत खूप चांगली नसल्याने मी समाजामध्ये शारिरीक श्रम करून देशाच्या प्रगतीत, सामाजिक भान ठेऊन समाजकार्यात कसूर करणार नाही. बस्स एवढंच सांगेल.
" मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा."
-------------------------------------------------------
-------------------------------------------------------
संगीता देशमुख,वसमत
"भारत माझा देश आहे" अशी प्रतिज्ञा तयार करणाऱ्यानेच "आपला" ऐवजी "माझा" शब्द का वापरला? याचे सुंदर स्पष्टीकरण यदुनाथ थत्ते यांनी "प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील" या पुस्तकात दिली आहे. जोवर कोणत्याही बाबीची सुरुवात स्वतःपासून होणार नाही तोवर देशात विकास होणार नाही. म्हणूनच सर्वप्रथम स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे "मी देशासाठी काय करतो?" आणि याची मला चांगली जाणीव आहे. म्हणूनच समाजात पर्यायाने देशात जे काही चांगले व्हावं वाटते,अशा अनेक बाबींची सुरुवात स्वतःपासून केली. मला माहीत आहे,माझ्या एकटीमुळे देशातील वाईट संपणार नाही परंतु देशात अधिक काही तरी चांगले नक्कीच निर्माण होईल. म्हणूनच मी माझ्या कुटुंबापुरती वॉटर हार्वेस्टिंग केली. कॅरिबॅगचा वापर पूर्णत: बंद आहे. घराभोवती भरपूर झाडे लावलीत. धर्म जात लिंग यात कुठलाही भेद होणार नाही,अशीच लेकरांसमोर चर्चा असते. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी जिथे कुठे या संदर्भात बोलता येईल तिथे बोलते. माझ्या अध्यापनातून वारंवार पर्यावरणपूरक उपक्रम देऊन वीज,पाणी,हवा,ध्वनी यासंदर्भात त्यांची जडणघडणच तशी करते.
मला जाणीव आहे की,सध्या देश ज्या परिस्थितीतून जात आहे,त्यात माझी भूमिका ही फक्त खारीचा वाटा आहे. या भूमिकेची व्याप्ती वाढणे आवश्यक आहे. त्यानुसारच माझे यापुढेही प्रयत्न रहातील.
_________________________
अनिल गोडबोले,सोलापूर.
मी देशासाठी बरच काही करतो.. मी माझ्या परीने देश सांभाळण्याचा प्रयत्न करतो.
मी मतदान करतो. नेता आवडला नाही तर "नोटा" दाबतो. घेत नाही.
मी रस्त्यावर उतरून माझे सण, उत्सव नाही साजरा केला. मी माझे महापुरुष फार ग्रेट आहेत आणि बाकी सगळे कमी आहेत असा वाद कधी घातला नाही.
मी ज्यावर विश्वास ठेवतो त्या सर्व गोष्टी समोरच्याला सांगितल्या पण त्याने देखील असच करावं.. असा आग्रह धरला नाही. मी माझा धर्म पाळतो, पण दुसऱ्याला नाव ठेवत नाही.
मी नेहमी अन्यायाला विरोध केला. शक्यतो कोणाचं तरी नुकसान होईल असं वागलो नाही.
मला शॉर्टकट्स मार्गाने बरच काही मिळवावस वाटत पण मी ते मार्ग अवलंबत नाही. मला जेवढं मिळेल त्यात समाधानी मानतो. ओरबाडले नाही.
आयुष्यात बंडखोरी खूप केली पण कायदा शक्यतो मोडला नाही. मी एन्जॉय करतो. पण दुसऱ्याला त्रास होतोय असं जाणवलं तरी थांबतो.
मी मला जमेल तेवढ दुसऱ्याला शिक्षित करण्याचा प्रयत्न करतो. मी स्वतः फिट राहण्याचा प्रयत्न करतो आणि बाकीच्यांना सांगतो.
बऱ्याच गोष्टी करू शकत नाही या बद्दल जरा दुःखी होतो. पण सूडबुद्धीने वागत नाही.
आता खूपच खूजली म्हणून सोशल वर्कर म्हणून काम करतो. कोचिंग क्लास चालवतो. आणि हे देशासाठी व माझ्यासाठी करतो.
आता विचार ग्रुपला अडमिंन म्हणून उगाचच नेता गिरी करतो. आता थांबतो, नाहीतर देशासाठी मी एकटाच करतो असे वाटेल तुम्हाला..
पण मी चुकल की बोलतो, बुद्धी ने आणि विवेकाने देशासाठी जे होईल तेवढं काहीतरी करतो.. हे मात्र नक्की
_________________________
मि देशासाठी संरक्षण विभागात काम करतो. सद्रक्षणाय खलनिग्रणाय.
समाजात जो युनीफाँम पाहून गुन्हेगारी प्रव्रुतीला आळा बसतो तो युनीफाँम मी परिधान करतो.
आँन ड्युटी चोवीस तास.
________________________
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
महेश देशपांडे, ढोकी, जिल्हा धाराशिव
हा खरतर प्रश्न असण्याचे कारण नाही, कारण ते आपले कर्तव्य आहे असे समजून जर आपण वागलो तर आधी देश आणि नंतर आपण सर्वजण एक चांगल आयुष्य जगू शकतो.
मी जो काही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास किंवा विज्ञान, तंत्रज्ञान या सर्वांच वाचन केले त्यातून अतिशय महत्वाचा संदेश मिळाला की आज आपण ज्या *भारत* देशामध्ये राहतो आहे तो त्याच्या इतिहासातील सर्वोच्च काळ आहे. ३५० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त करणारे सर्वांचे दैवत *छत्रपती श्री शिवाजी महाराज* यांचा वारसा आपल्या सर्वांना लाभला आहे. त्यानंतर च्या काळात अनेक समाजसुधारक, क्रांतिकारक यांनी आपल्या देशाला इंग्रजी सत्तेतून मुक्त केले, तरीही आज आपण अनेक गोष्टींमध्ये गुलामगिरीतून मुक्त नाहीए. तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण खूप प्रगती केली आहे आज अंतराळ संशोधन संस्थेने खूप मोलाची कामगिरी बजावली आहे. अनेक सुविधा उपलब्ध आहेत. सांस्कृतिक वारसा तर अमूल्य आहे. भारतीय परंपरा दर संपूर्ण जगाला संदेश देणारी आहे.
या सर्वांचा विचार करत असताना मला वाटत, मी जे काही काम करत असेन मग ते कोणतेही असो.
शासकीय सेवेत वर्ग एक अधिकारी किंवा अगदी शिपाई, खाजगी संस्थेत कोणत्याही पदावर, माझा स्वतःचा व्यवसाय (खूप मोठा किंवा अगदी छोटा),
आपलं काम प्रामाणिक पणे करणे हे सर्वांचं कर्तव्य समजून करायला हवे.
हे सर्वांनी, आपल्याला प्रश्न विचारला तर निश्चित वरील प्रश्नाचे उत्तर मिळेल...
_________________________
मनोज वडे ,पंढरपूर.
मी देशा साठी सकाळी व्यायाम करतो. कारण मी फीट तर इंडिया फिट ! नंतर मी काही तरी नवीन शिकण्याचा प्रयन्त करतो कारण मी तज्ञ तर इंडिया तज्ञ ! नंतर मी माझ्या कामासाठी मी सायकलीवर जातो कारण मी पेट्रोल वाचवलं तर इंडिया पेट्रोल वाचवेल!
नंतर मी एक DeFend समूह चालवतो कारण आज लग्नाच्या नावा खाली खूप लोकांची पिळवणूक होती आहे ती पिळवणूक न होण्यासाठी मी लग्नाचा फॉर्म काढला जेणे करून कमी पैशात लोकांची लग्न जमवतो. मी सर्वधर्मीय लग्न जमवतो म्हणजेच मी सर्वधर्म समभाव मानतो म्हणजे च इंडिया ही सर्वधर्म मानतो ! नंतर मी लोकांच्या जीवळ्या चा प्रश्न जो की मला घर पाहिजे ,मला घर विकायचं तर त्यांना दोघानाही योग्य दर मिळवायचं प्रयत्न करतो ,म्हणजेच मी पारदर्शक तर इंडिया पारदर्शक !
मला देशासाठी खूप सेवा आणायच्या आहेत ,बऱ्याच प्रश्नाना वाचा फोडायची आहे तरी पण थोडया काही सेवा आहे ते आता करतो आहे . म्हणजेच मी काही तरी नवीन करतो आहे म्हणजेच देश ही नवीन काही तरी करतो आहे!
_________________________
संदिप बोऱ्हाडे ( वडगाव मावळ, पुणे)
"" यहा हिंदू है, मुस्लिम है, शिख है, ईसाई है. लेकिन भारतीय कोई नही है,
देशभक्ती सिर्फ India v/s Pakistan Match मे ही दिखती है ""
आणि आणि उरलीसुरली देशभक्ती 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी साठी राखीव ठेवण्यात येते. आपण सारेच सोईसाठी कधी कधी भारतीय असतो.
माझी जात, धर्म, पंथ, पक्ष.
अगदी आमची गल्ली, गाव , तालुका , जिल्हा , राज्य , यातून मी आता बाहेर आलो आहे आणि भारतीय बनलो आहे...त्यामुळे माझे सगळे विचार आणि कामे ही फक्त भारतीयच असतात. आणि कायम राहणार..
_________________________
मी देशासाठी काय करतो किंवा काय करू शकतो तर मी देशासाठी लाच घेत नाही, आणि लाच घेऊ देत नाही.
गावामध्ये जर लाईट बिल वसुलीला गेल्यानंतर गावकर्यांना शेतीविषयी, शासनाच्या विविध योजनेची माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
मी साईटवर/बाहेर जाताना कोठे हॉटेलमध्ये, विटभट्टीवर, धाब्यावर बालकामगार आढळून आल्यास संबधित मालकाला किंवा त्या बालकामगाराच्या पालकांना भेटून प्रेमाने आणि वेळ पडलीच तर कायद्याने समजावून सांगतो. आतापर्यंत 3 बालकामगारांना शाळेत पाठवण्यामध्ये मला व माझ्या सहकार्यांना यश आलं आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी माझ्या देशासाठी असाच प्रयत्न करत राहीन.
_________________________
सैनपाल पाटील, आजरा, कोल्हापुर.
(मी एकटा काहीच नाही... एक नागरिकाला जर इतर नागरिकांची जो पर्यंत साथ मिळत नाही तोपर्यंत "मी"काहीच नाही. इथे "मी" हा कुणी वैयक्तिक नागरिक नसून एक प्रातिनिधिक आहे; त्यामुळे मी एकटा अनेकांच्या जागी स्वतःला मानून हा उपरोध व्यक्त केला आहे.)
मी माझ्या देशाला केवळ देश न मानता मातृभूमी मानतो. त्यामुळे लोैकिक अर्थाने एका मातेचा गोैरव वाढवण्यासाठी तिच्या लेकरांनी जे करावयाचे असते, तेच एक नागरिक म्हणून मातृभूमीची अपेक्षा काय असणार याचा विचार आपण करतो का ? या संदर्भात नागरिक म्हणून माझ्या गतिविधी काय असणार बरं?
मी देशासाठी अनेक गोष्टी करतो. पण देशाला जगांमध्ये एक अद्वितीय स्थान मिळवून देण्यासाठी भारतीय नागरिक म्हणून ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या गोष्टी मी करतो का? माझा देश संविधानावर चालतो तेव्हा एका गणराज्यामध्ये त्याच्या नागरिकांनी साधक बाधक विचार करून देशहिता संदर्भात जागरूक राहून जो विचार करायला हवा; तो मी करतो का? मी माझ्या देशाला एक उज्वल भविष्य देतो का?किंवा त्या संदर्भात विचार करतो का ? मी माझ्या देशाचा गौरव वाढतो का? मज देशाकडे इतरांनी कसे पहावे यासंदर्भात माझी नक्की भूमिका काय आहे? जागतिक राजकीय व्यासपीठावर माझा देश कुठे उभा आहे? थोडक्यात माझ्या मातृरुपी देशाची इज्जत वाढवणे, त्याला स्वावलंबी व परिपूर्ण बनवण्यासाठी आपल्यातल्या अभावांचे दैन्य दूर करण्यासाठि म्हणून मी माझी भूमिका प्रामाणिकपणे निभावतो का?
खरेतर आपल्यावर आपल्या देशाचे एवढे अनंत उपकार व संस्कार आहेत आणि त्याच्या विशाल छताखाली आपण आपले वैयक्तिक आयुष्य अत्यंत सुखाने जगतो आहोत. जगाच्या पाठीवर असे काही समूह आहेत ज्यांना स्वतःचा देश नाही ते आश्रितांची विस्थापितांचे जिणे जगत आहे, त्यांच्या नजरेतून जर या कल्पनेकडे पाहिले तर आपण किती भाग्यवान आहोत याची जाणीव होईल.
आपला देशग्रंथ असलेल्या संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती, भाषण, संचार आणि मानवी हक्कांचे अधिकार आपण किती सहजतेने अनुभवतो, पण ज्या नाही मिळत नाही त्यांची वेदना समजून घेतली तरच आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो त्याचं खरं मूल्यं कळेल.
मी एक नागरिक म्हणून मला बाध्य असलेले सर्व कर भरतो आणि हे करुन मी देशावर उपकार करतोय हे सांगण्याचा अट्टहास का करतो? या गोष्टी खरं तर तुम्ही स्वतःसाठी व तुमच्या सोयीसाठी देत आहे. इथली जमीन, हवा, पाणी यांच्या जीवावर आपण पोसलो. पण त्याचे मोल मी पैशात करतो.
मातृभूमीचे ऋण हे कधीही न फिटणारे, पण तिचे मोल पैशात करून आम्ही वाटेल ते करायला मोकळे आहोत असे आपण मानायचे का?
देश काही मूर्त व्यक्ती नाही, ती संकल्पना आहे. तुमच्या माझ्या हृदयात वसलेली. कोणताही देश जागतिक पटलावर तेव्हाच कणखर होईल जेव्हा तिचे लोक देशहित सर्वात प्रथम ठेवतील. काही वैयक्तिक आणि सामूहिक आघाड्यावर अनन्यसाधारण कामे करून आपण मातृभूमीला अभिमानी व गाैरवान्वित करू शकू.
आज देशाच्या हर सीमेवर आक्रांतांच्या व आक्रमकांच्या बंदुका रोखून आहेत. तेव्हा अंतर्गत यादवी मध्ये देशाच्या राजसत्तांचे लक्ष जर मी विचलित करू पाहत असेल तर खरोखरच मी देशाशी हरामखोरी करत आहे. देशाची जबाबदारी सीमेवर लढणाऱ्या फक्त सैनिकांचीच नाही तर देश बाह्यशक्तींशी लढण्यास सामर्थ्यवान ठेवण्यासाठी अंतर्गत शांतता राखण्याची जबाबदारी ही माझी आहे. पण ती जबाबदारी मी पार पडतो का? याचं जर प्रामाणिक उत्तर द्यायचं म्हटलं तर अर्थातच नाही असेच द्यावे लागेल. धर्माना पंथांना एकत्र एका सूत्रात बांधण्यासाठी माझ्यापेक्षा देश मोठा हा विचार माझ्या मनात भिनला पाहिजेत नव्हे तसे ते कृतीतून ही दिसायला हवे.
पण आजकल माझी बोली आणि कृती याच्यामध्ये ताळतंत्र नाही. त्यामुळे मी कसाही वागतो. माझ्यासाठी देशहिता पेक्षा स्वहित महत्वाचे झाले आहे. त्यामुळेच मी देशाने माझ्यासाठी काय केले असा सवाल प्रत्येक वेळी विचारतो? मी कुणासमोरही देशाचे वाभाडे काढतो. कुणी काही देशाविरुद्ध बोलले तर माझ्या मुठी संतापाने आवळत नाहीत. मी परकीय गोष्टींच्या अभावात स्वतःलाही दीन म्हणू लागलो. माझा गोमटा संस्कार हिण मानू लागलो.
मी फास्टफूडच्या जमान्याला देशहिताचा विचार बोलुन स्वहित साधु लागलो. कधी परोपकारात स्वार्थ साधू लागलो. कधी मी मोठ मोठे हॉस्पिटल काढून रुग्णांना लुटू लागलाो. कधी शिक्षण संस्था काढून डोनेशनच्या नावाखाली गरजुन ठगु लागलो. कधी राजनेता होवुन माझी बिदागी मीच ठरवून सरकारी तिजोरीवर डल्ला मारू लागलो. मी लाच घेऊ लागलो लाच देऊ लागलो. मी मनाने कोडगा आणि विचाराने मानमोडा झालो आहे. मी माझ्या सुसंस्कृतपणाचा व्याख्या बदलल्या आणि भ्रष्टाचार अंगात भिनवून त्याला शिष्टाचार म्हणण्याचा दंभ मिरवू लागलो.
अनेक रंगात आणि ढंगात वावरू लागलो . देखाव्याला भुलू लागलो. त्यामुळे माझे आदर्शाचे निकष बदलले आहेत मी कोणत्याही फालतू नट-नट्यांना माझे आदर्श समजून त्यांचा अनुनय करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी अनेक भूमिकेचे चोले पांगरुन परिस्थितीनुसार संदर्भ बदलून प्राप्त परिस्थितीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहे. मी राजकीय वारसा लावल्यावर स्वतःलाच देश समजू लागलो. आज कल मी स्वार्थापायी अखंड देशाचे तुकडे करण्यासाठी कटकारस्थाने रचतो आहे आणि यात मला कुठेही लाज वाटत नाही.
माझा खिसा पैशाने भरलेला असताना हॉटेलात विनाकारण गरजेपेक्षा जास्त डिशेस् घेऊन उर्वरित अन्नपदार्थ वाया घालवतो अर्थात यात मी देशाची साधन सामग्री वाया घालवतो. जीवनावश्यक वस्तूंचा सुकाळ असताना त्या वस्तू मी चोरून साठवतो आणि दुष्काळाच्या वेळी दुप्पट-तिप्पट भावाने विकून आपल्याच देशबांधवांचा खिसा कापतो आणि पैशाचा मस्तवालपणा अंगात भिनला असल्यामुळे हे सर्व करण्याचा मला अधिकार आहे या थाटात मी वागतो.
देश वीज टंचाई आणि पाणी टंचाई सारख्या संकटांना तोंड देत असताना, मी वीज चाेरतो आणि पाणीही वाया घालवतो. कधी मी मग्रुर कारखानदार होऊन कारखान्याचे गलिच्छ पाणी नदी नाल्यात सोडून लोकांच्या जिवाशी खेळतो.
कधी मी अडल्यानडल्याला खिंडीत गाठून त्यांची पिळवणूक करतो आणि प्रसंगी लुबाडतोहि.
मी श्रीमंतीच्या नादात इतरांना कवडीमोलाचे समजतो. मला विरोध करणाऱ्यांचा पद्धतशीरपणे बंदोबस्तहि करतो. मी कधी नोकरशहा होऊन कामचुकारपणा करतो आणि फुकटचा पगारी खातो. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी मला मागास म्हणून घेण्यात अजिबात लाज वाटत नाही. तसेच परिस्थिती चांगली असतानाही दारिद्र रेषेखालील स्वतःचे नाव नोंदवून राशन लुटतो. वर कोडगेपणा करून कसे फसवले सर्वांना असे मनात म्हणून मनातच हसत राहतो.
कधी मी स्वार्थी मतदार होऊन फक्त दारू आणि एक जेवण याला भुलून आपले अमुल्य मत त्याची ताकद न जाणता विकतो. पर्यायाने मी माझ्याच प्रगतीचा मार्ग खुंटवायला कारणीभूत होतो. मग ज्याला मी निवडून दिले, त्याने मारले लुटले म्हणून पुन्हा गळे काढतो. तरी पुन्हा त्यालाच निवडून देतो. मी देशाचा विचार न करता कुणाही दूरदृष्टीविहिन व भविष्यातील चाड नसलेल्या लोकांच्या हाती देशाचे नेतृत्व सोपवतो. आणि त्याने फेकलेल्या फुकटचा खैराती वर मी खुश होऊन त्यांना डोक्यावर घेऊन नाचतो. प्रसंगी त्याने भ्रष्टाचार करून देशाची तिजोरी लुटली तरी त्याचाच उदोउदो करतो.
मी राजकारणाच्या रणधुमाळीत काही उपटसुंभ नेत्यांच्या थाळी उचलून स्वत:ला झिजवून त्यांना मोठे करतो. स्वतःच्या दोन वेळच्या जेवणाची सोय ही न करता फक्त त्याने फेकलेल्या तुकड्यांवर ढेकर देऊन घराणेशाहीच्या इमानी कुत्र्याचे जीवन जगतो.
मी रोज नित्यनेमाने पंढरीची वारी, शिर्डी यात्रा कावड यात्रा करतो. आरक्षणासाठी मीच निवडलेल्या आपल्याच व्यवस्थेशी भांडतो. मी टुकार कामात स्वतःला जास्त गुंतून ठेवल्यामुळे स्वतःच्या प्रगतीकडे मला जास्त लक्ष देता आले नाही. त्यामुळे आरक्षणासारख्या कुबड्याने मी स्वतःचा उद्धार करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. मी स्वतःला सिद्ध न करता वशिलेबाजी वर विश्वास ठेवतो. काम धंदा न करता सरकारच्या मोफत राशन, मोफत पेन्शन इत्यादी योजनांचा नित्यनेमाने लाभ घेतो.वर सांगितल्याप्रमाणे मी या गोष्टींची आता लाज वाटून घेत नाही. मी घोडा जास्त पळतो म्हणून त्याच्या गळ्यात लोडणा बांधून गाढवाबरोबर शर्य़त करवतो. मी फालतू गोष्टीवर विश्वास ठेवून कुणाचेही ऐकून जाळपोळ दंगे प्रसंगी मनुष्य हत्याही करतो व त्याच्या बढाया मारतो. मी आता अन्याय सहन करतो त्याविरुद्ध बंड ही करत नाही. कारण एखादी गोष्ट जोपर्यंत स्वतःच्या बाबतीत घडत नाही तोपर्यंत मला राग येत नाही. शिवाय मी राज्य शासनाला अगोदरच कर(टॅक्स) देत असल्यामुळे हे सर्व करण्याचा माझा अधिकारच आहे यावर माझा ठाम विश्वास आहे असे समजतो.
हल्ली मी माझा देह फक्त पांढरपेशी कपड्याने झाकला आहे, पण माझी मानसिकता दिवसेंदिवस आदिम होत चालली आहे. त्यामुळे आजही मी कबिल्याचे (जातीपातीचे) हितसंबंध जपतो आणि त्यासाठी देशहित दुय्यम मानून आपली पोळी भाजतो.
आता मी जे काही करतो ते माझ्या मातृभूमीने गोड मानून घ्यावे आणि स्वतःच्या उद्धारासाठी तिने वर्षानुवर्षे वाट बघावी याचीहि सोय मी अगोदरच करून ठेवले आहे. आता मी देशासाठी एवढ्या गोष्टी केल्या आहेत म्हटल्यावर देश नावाची मातृभूमी काय बोलेल असे मला वाटत नाही!!
_____________________
अपेक्षा मानाजी,मुंबई.
ह्या प्रश्नाचं पहिला उत्तर म्हणजे माझ्या देशावर प्रेम करते.प्रेम जे फक्त वर्षातले दोन दिवस उफाळून येत नाही,प्रेम जे रक्ताच्या कणाकणात वास करते.त्या प्रेमापोटी मी देशातल्या चालू घटनांबाबत जागरूक राहते.देशाच्या संविधानाचा आदर करते.त्या संविधानातील धर्मनिरपेक्षतेचा आदर करते.माझ्या देशातील बांधवांमध्ये जातीय व धार्मिक दंगली पसरवणाऱ्या पोस्ट करणे किंवा त्या पुढे पाठवणे जाणीवपूर्वक टाळते.माझ्या देशातील संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करते.गरजेपुरते पाणी वापरते.गरज नसताना विजेचा वापर टाळते.देशाची सार्वजनिक मालमत्ता स्वतःची असल्याप्रमाणे वापरते,तिची काळजी घेणे व तिच आपल्याकडून नुकसान होणार नाही असे वागणे माझे परम कर्तव्य समजते.देशाच्या विकासात आपलाही वाटा असावा म्हणून एनजीओ मध्ये काम करते.'शिकेल भारत तर पुढे जाईल भारत' हा उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन शिक्षणाबद्दल ची जागरूकता तळागाळात पसरवण्यासाठी प्रयत्नशील राहते.माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक मुलामध्ये देशप्रेमाची बीज रोवण्यासाठी प्रयत्नशील राहते.देशाबद्दल ची गौरवात्मक माहिती,देशाचा इतिहास,देशाची समृद्ध वारसा मुलांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते.माझ्या भारत भूमीवर प्रत्येक जिवमात्राचा तितकाच हक्क आहे त्याची
जाणीव ठेवून पर्यावरणाचा ऱ्हास माझ्याकडून व इतरांकडून होणार नाही यासाठी दक्ष असते,शक्य होईल तिथे आवाज उठवते.'भारत माझा देश आहे' ह्या प्रातिज्ञेला स्मरून देशातील प्रत्येक जाती धर्माच्या भवांडांबद्दल मनात आदर व प्रेम ठेवते.माझा भारतही एक दिवस महासत्ता असावा ह्या महत्वाकांक्षेसाठी जगते...मी माझ्या देशावर मे खूप प्रेम करते...
_________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा