झोपडपट्टीत दडलेली वेदना....

झोपडपट्टीत दडलेली वेदना....

सौदागर काळे,
पंढरपूर.
झोपडीने काय काय नाही पाहिलं सांगा..
जे जे पाहिलं ते पानावरच्या दवबिंदू सारखं
सहजगत्या  मातीत मिसळत राहिलं.
त्याचा काही इतिहास नाही ना ठावठिकाणा..
फक्त वेदना आहेत ......वंशपरंपरागत.

इथे दुःखाचं रतीब आहे...
एक दिवसाचंही खाड न करणारं.
येथून खूप वेळा किंकाळ्या बाहेर पडतात..
दमलेल्या,थकलेल्या,पीडितांच्या....इत्यादी.
आणि खूप वेळा त्यांचाच बलात्कार होत राहतो..
विधानभवनात,संसदेत...अन जनतेत.


शेजारची गगनचुंबी इमारत...
रोजच तिचं शोषण करत राहते.
त्या इतक्या उंच झाल्या आहेत की आता..
त्या सूर्याचीपण .....
झोपडीकडे फिरकणारी किरणं अडवत राहतात.


या अंधाऱ्या जगात...
झोपडी वेदनेने विव्हळत विव्हळत..
शांत पडली आहे..फक्त अश्रु ढाळत.
समुद्राला जाऊन भिडणाऱ्या गटाऱ्याही ..
कधीच झोपडीेच्या ...
वेदनेने ओघळणारे अश्रुचे थेंब घेऊन गेल्या नाहीत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

श्रीनाथ श्रीशैल कासे,
सोलापूर.

सांगा, कसा होऊ सुशिक्षित तुमच्यासारखे,
शिक्षण आमच्या वस्तीत कधी आलेच नाही.

म्हणे, आहे शिक्षण हक्क कायदा, तरीसुद्धा,
शिक्षण शेवटच्या घटकापर्यंत झिरपलेच नाही.

श्रीमंतांची मुले शिकत आहेत इंटरनॅशनल शाळेमधून,
मला मात्र वही-पुस्तकासाठी पैसे कधी जमलेच नाही.

दारिद्र्य, झोपडपट्टी, असुरक्षितता तरीसुद्धा,
भाषणात " शिक्षण सर्वांसाठी " हे मात्र पटलेच नाही.

सांगा, कसा होऊ सुसंस्कृत, तुमच्यासारखे,
"संस्कृती" कधी आमच्या वस्तीत आलेच नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

वाल्मीक फड,
नाशिक.

खर्या अर्थाने वेदना देणारी जर गोष्ट असेल तर ती आहे झोपडपट्टीत रहाणार्या लोकांची.बघा मि काय शहरात राहणारा माणुस नाही आहे परंतु काही कामास्तव जावे लागते अधुनमधुन.असाच एकदा मी शहरात गेलो असताना नेमके आम्हाला ज्याच्याकडे जायचे होते तेच मुळी एका झोपडपट्टीत रहात होते.आम्ही तिथं गेलो पण गेल्या पासुन तिथे इतकी दुर्गधी येत होती पण बोलायची पंचायत !काय करणार तसाच दम धरुन आम्ही किमान आरधा तास काढला पण नंतर काही केल्या थांबूनयेसे झाले.मि न रहाऊन त्यांना विचारले तर त्यांनी मला त्यांच्या वेदना सांगायला सुरुवात केली.
भाऊ इस वर्स झालीय इडं रहातोय काय झडापनिचं झालंय माला.पहिल्यांदा इडं आलो ना तवा नव्हतं एवढं वास पर जशी जशी गर्दी वाडाया लागली तसा ह्यो वास वाडाया लागला.आरं बाबा दिवसभर गाडं लोटायचं आणी रातच्याला पडायचं इडं येऊन कोण बसंतं वास बिस पहात.
भाऊ पावसाळ्यात तर लई हाल व्हत्याय आम्ही काही टायमाला रात रात जागं असतोय.काय व्हतय पाऊस जर चाललं ना आमाला भाकर सुदिक खाता येत नाही रातच्याला ऊपासी रावं लागंतं.काही वक्ताला तर मोठाले कुदळ हातात सूरे घेऊन येते आणी आम्हासनी म्हणत्याय हे झोपडं सोडून दे नाहीतर तुला मारुन टाकू.पर म्या काय कमी नही म्या म्हणतोय मार बाबा एगदाचं.जात्याय निघुन आपाक.धरायची लाऊन कशीतरी म्हणत्याय सरकार झोपड्यावाल्यायला बिल्डींगामधी खोल्या देणारय वाटत मग तंवर रायचं भाऊ इडं.भेटत नही तंवर इडं वास येऊ नही तर कायबी व्हवदे पर म्या इडून आजाबात हालणार नाही.
बघा किती भयंकर वेदना दडलेली होती बाबाच्या अंतकरणात.आम्ही तिथून निघुन आलो पण बाबाच्या वेदना सारख्या डोळ्यासमोर येत होत्या.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संगीता देशमुख,
वसमत.

       आपला देश हा अनेक बाजूनी विरोधाभासाचे उदाहरण ठरू शकते. त्यातील ठळक विरोधाभास म्हणजे,ज्या मुंबईत गगनचुंबी इमारती आहेत त्याच मुंबईत असंख्य अशा झोपड्याही आहेत. तसे पाहता,भारतात कोणत्याही शहरात झोपडपट्ट्याचे प्रमाण हे प्रचंड आहेत. अक्राळविक्राळ शहरे ही सगळ्यांना सामावून घेतात. जिथे अशी प्रचंड लोकसंख्या वाढते,तिथे सर्वच व्यवस्थेची दाणादाण उडते. पण याचा फटका बसतो तो मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीतच! झोपडपट्ट्या म्हणजे,शहरातील अतिशय वंगाळ अशी वस्ती. पांढरपेशा लोकांच्या तर हे कल्पनेच्याही पलीकडे आहे. तिथे नांदणारे अठराविश्व दारिद्र्य हे सर्वसामान्यांच्या अंगावर शहारे आणणारेच आहे. आजूबाजूला गटारी,घाणीची दुर्गंधी यामुळे सूक्ष्म जीवजंतूंची निर्मिती,त्यातून प्रचंड प्रमाणात उदभवणारे जीवघेणे आजार,त्या आजारावर उपचारासाठी असलेली आर्थिक असमर्थतता आणि यातूनच गरोदर स्त्रियांच्या समस्या,बालमृत्यूचे मोठे प्रमाण,असाध्य आजार,स्त्रियांची असुरक्षितता,शिक्षणाचा अभाव,अस्वच्छ पाणी,वस्ती,अशा अनेक वेदना घेऊन जगतात झोपडपट्टीतले माणसे. "वेदना जाणावयाला जागवू संवेदना..." खरेतर ती वेदना जाणून घ्यायला आपल्याजवळ तेवढी संवेदना असावी लागते. ही संवेदना काही सामाजिक कार्यकर्त्याजवळ असल्याने ते त्यांचे जीवन थोडेसे का होईना सुकर करण्याचा प्रयत्न करतात. परंतु निर्ढावलेले,अत्यंत असंवेदनशील असे राजकारणी मात्र या वस्तीतील लोकांचा उपयोग फक्त  निवडणूकीपूर्वी आश्वासन देण्यासाठी आणि निवडणूकीत मतदान मिळवण्यासाठी करतात. त्यानंतर झोपडवासियांना वाऱ्यावर सोडल्या जाते. झोपुसारख्या अनेक योजना येतात परंतु यातही राजकारणी आधी आपलेच उखळ पांढरे करून घेतात. इथेही हे वंचितच असतात. त्यामुळे मला तरी वाटते,आपल्या देशातील झोपडपट्टीतील लोकांच्या वेदना ह्या न संपणाऱ्या आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सिताराम पवार,
पंढरपूर.

झोपडी म्हटले की मला आमचं छप्पराच घर आठवत. हिवाळ्यात गरम आणि उन्हाळ्यात गार अशी नैसर्गिक व्यवस्था असलेली. पण पावसाळा आला म्हणजे मात्र आमची फजिती व्हायची. प्रत्येक वर्षी नवीन पानु आणून नवीन छप्पर शिवण शक्य नव्हतं. मग् जसा पाऊस सुरू झाला तर छप्पर गळायला चालू व्हायचं, सगळी घरातील भंगुणी त्या जाग्याला ठेवायचं. आता चांगलं घर आहे ,पण गेल्या 10 वर्षांपासून आमच्या गावातील राज्यकर्ते घरकुल देतात! हे झालं ग्रामीण भागात, आता शहरी भागात तर खूपच अवघड आहे.घरी जायला लहान बोळीवजा वाट. गटारी तशाच, त्यावर फरशी आणि त्यावर चूल असा हा संसार. रेल्वे स्टेशन परिसरातील झोपडपट्टी खूपच वाईट अवस्था आहे. ना पिण्याच्या पाण्याची सोय, ना शौचालय याची सोय, काही झोपडपट्टी यांचा अनधिकृत /अधिकृत वाद चालूच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य, शैक्षणिक सुविधा यांचा कुठेच लवलेशही दिसत नाही.खरं तर हातावर पोट भरण्यासाठी आलेली ही लोक यांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~

संदेश पाटील,
धुळे.
शहरीकरण हे औद्योगिककरणाचे कुरूप आपत्य आहे आणि नागरी समाजाच्या वस्ती परिवाराचे अवलोकन केले तर असे दिसून येते की , वरिष्ठ स्तरीय वस्तीत जेवढ्या सुविधा असतात त्याच्या कितीतरी पटीने कमी , मध्यम आणि कनिष्ठ लोक ज्या वस्तीत राहतात त्याला "झोपडपट्टी" असे म्हटले जाते आणि सत्य देखील तसेच म्हणावे लागेल कारण औद्योगिकिकरण जसेजसे होत जाते तस तस ग्रामीण भागातील लोक हे रोजगाराच्या शोधत शहरात कामा निमित्ताने शहरात येतात आणि निवारा मिळावा म्हणून मग झोपडपट्टी निर्माण होते आणि ह्याचे च उदाहरण बघायचे झाले तर आपण धारावीर झोपडपट्टी घे आपण घेऊ शकतो. परंतु ज्या प्रकारे आपण त्या लोकांना निवारा मिळतो असं म्हणतो परंतु त्याना इतर सोई सुविधा जसे की , आरोग्य विषयक सुविधा ह्या प्राप्त होत नसतात.आणि त्यात अजून काही अधिकृत झोपडपट्टी असतात तर काही झोपडपट्टी ह्या अनधिकृत असल्याचे आपल्याला प्रकर्षाने दिसून येते आणि त्यात तर अजून बऱ्याचदा विकासाच्या नावाने झोपडपट्टी वर jcb मशीन हे बिनदिक्कत पणे चालवले जात असतात. आता मध्यतरी च्या काळात ह्याच झोपडपट्टी बद्दल ची व्यथा ही रजनीकांत ह्यांच्या "काला" ह्या चित्रपटातुन मांडण्यात आले.
    झोपडपट्टी बद्दल च्या वेदना मांडायच्या झाल्या तर त्यात व्यसनाधीनता , बेरोजगारी ,
जाती स्तर अशा विविध प्रकारच्या समस्या झोपडपट्टी च्या वेदना स्वरूपात आपल्या दिसून येतात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
(यातील सर्व संबंधीत छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************