मा. मोदीशिवाय पर्यायी नेता कोण?

मा. मोदीशिवाय पर्यायी नेता कोण?


संदिप बोऱ्हाडे,वडगाव मावळ,पुणे.
जसजशी २०१९ ची लोकसभा निवडणूक जवळ येत आहे, तसतसा एक प्रश्न नेहमी येत आहे, मोदींना पर्याय कोण आहे.?? मला हा प्रश्न पडतो की मुळात हा प्रश्नच आपल्या लोकशाही पद्धतीत चुकीचा आहे..??

 अमेरिकेत अध्यक्षीय लोकशाही पद्धत आहे, आपल्याकडे सांसदीय. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार आधी  घोषित करावा लागतो, आपली पद्धत तशी नाही. आपली प्रातिनिधीक लोकशाही अशी आहे की आपण आपले 543 प्रतिनिधी (खासदार) निवडायचे आहेत. ते 543 पुढे बहुमतानं पंतप्रधान ठरवतात. देवेगौडासुद्धा पंतप्रधान होऊ शकतात ही या पद्धतीची खासियत आहे आणि तेच लोकशाहीचं सौंदर्य आहे.

  जनता समंजस असते आणि राजनारायण सारख्या विदूषक म्हणवल्या गेलेल्या नेत्याला राजा करून प्रत्यक्ष इंदिरा गांधींना एका रात्रीत रंक करू शकते. भारतीय लोकशाहीत नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी, वाजपेयी, नरसिंहराव, मनमोहन अशा सर्वांना पर्याय सापडले आहेतच. लोकशाहीत प्रत्येकाला पर्याय असतो आणि हे मतदारांना माहित असते.

   सचिनला पर्याय नाही म्हणणार्‍यांना कोहलीने पर्याय दिला.....आणि आता कोहलीला पर्याय नाही म्हणणार्‍यांना पृथ्वी शॉ सारखे पर्याय समोर येत आहेत. ममता बॅनर्जी, नितीश कुमार, नविन पटनायक, अरविंद केजरीवाल, शरद पवार, राहुल गांधी, सुषमा स्वराज, नितीन गडकरी, रघुराम राजन आणि इतर असे कितीतरी पर्याय असू शकतात.

  पर्याय काय..पर्याय काय ?
असा प्रश्न विचारणाऱ्या लोकांनी मागचा इतिहास पाहायला हवा..
लोकसभेची उमेदवारी नाकारले गेलेले नरसिंह राव, किंवा मनमोहन सिंग हे १५ वर्षे देशाचे यशस्वी नेतृत्व करू शकतील, अशी कुणी स्वप्नात तरी कल्पना केली होती का ? हा सव्वाशे कोटींचा देश आहे..! सव्वाशे  कोटी लोकसंख्या असलेल्या देशात कुणीतरी सक्षम पर्याय असेलच की.. मोदींआधीही देश होता आणि उद्या मोदी नसले तरी देश असणारच आहे.. लोकशाहीत पर्याय असतोच
भारतीय मतदार अनेकदा  मतदान करताना कोणाला निवडून द्यायचे यापेक्षा कोणाला घरी बसवायचे आहे हे ठरवून मतदान करतात. त्यामुळे पर्याय हा विषय त्यावेळी गौण ठरतो.
योग्यवेळी योग्य पर्याय समोर आल्याशिवाय राहत नाही.
कल किसीके लिये रुकता नहीं और कोई अंतिम नहीं होता.


राज इनामदार,पंढरपूर.
ज्या माणसाने अल्पावधीतच हाती जास्त यंत्रणा नसताना सुधा साधी राहणी व उच्च विचारसरणी अवलंबून ...भारताला जर महासत्ता बनवायच असेल तर आधी लोक शिकली पाहिजेत म्हणुन भूतो ना भविष्य अशी शिक्षण शेत्रात आमूलाग्र बदल करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल हा उत्तम पर्याय आहे ..आणी देशाला सध्या जात,  धर्म , देवळे , मस्जिद याच्या पलीकडे जावुन ..सामान्य तें सामान्य जनतेच्या गरजा काय आहेत व त्यां पूर्ण करण्यास काय उपाययोजना केल्या पाहिजेत , यासाठी जे अभ्यासु आणी भ्रष्टाचारविरहीत नेत्रुत्व हवय तें गुण मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यात आहेत अस मला तरी वाटतं
  आज़ दिल्लीत आपण पाहिलं तर जातिवाद पेक्षा सुधारणा , दवाखानें  व शिक्षण , वीज पाणी अशा मूलभूत गरजाकडे मुखमंत्री केजरिवाल लक्ष देवून अमलात आणून पूर्ण केल्या आहेत ...नुसत्या घोषणाबाजी व कागदावर योजना अस नकरता ...त्या प्रत्येक्शात कशा पूर्ण होतील हे पाहणारा माणुस म्हणजे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालजी  होय.
देशाला अशा नेत्यांची गरज आहे अस माझ मत आहे ..


जगताप रामकिशन शारदा,बीड.
मोदींना पर्याय कोण? लोकशाही म्हणजे तव्यावर टाकलेली भाकरी असते ती जर आलटून पालटून नाही घेतली तर ती करपते. ती आलटून पालटून घ्यायची असते. आणले आहे जनता ते काम प्रामाणिकपणे करत राहील अशीच अपेक्षा आहे. लोककल्याणकारी शासन व्यवस्था निवडून देणारा समाज जर सुज्ञ गणला मानला जात असेल आणि अकल्याणकारी धोरण किंवा जनतेचा आक्रोश न समजणारे, विशिष्ट वर्गाला फायदा करून देणारी शासन व्यवस्था बहुमताने निवडून देणाऱ्या समाजाला काय म्हणावे ते सांगा.?
मोदींना पर्याय हा राजकीय पक्षांमधून कोण भेटेल हे नक्की नाही पण जनता स्वतः एक पर्याय निर्माण करेल. कारण 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सामान्य जनतेने आपल्या मतदार संघातील उमेदवार किती योग्य आहे यापेक्षा मोदींच्या आशवाशक आश्वासने यांना भुलून मतदान केले होते पण आज सामान्य जनता भ्रमनिरास अवस्थेत आहे. कोणत्याही सरकारचा उत्तरार्ध हा कसोटीचा असतो. आणि मोदींना पर्याय कोण हा जनतेला पडलेला प्रश्न नाहीये तर 2019 साठी जनतेला संभ्रमात टाकण्याची खेळी आहे. दूध पोळाळे की माणूस ताकही फुंकून पितो. म्हणून जगाच्या पाठीवर सर्वाधिक युवा लोकसंख्या असणाऱ्या देशात तरूणांना जे वास्तवाचे दाहक लक्षात आणून देऊन त्यातून मार्ग दाखवेल तो व्यक्ती मोदींना पर्याय आहे .

अनिल गोडबोले,सोलापूर.
हा विषय सर्वांनी मा. नरेंद्र मोदी यांची राजकीय पटलावरील प्रतिमा आणि त्यांचा तुलनेने इतर नेत्यांची प्रतिमा.. या बाजूने विषय मांडायला पाहिजे.मोदी यांच्या शिवाय दुसरा पर्यायच नाही किंवा त्यांच्या शिवाय दुसरा नेता आहे, असा विषयाचा सूर नसून.. त्यांना प्रतिस्पर्धी कोण? असा तर अजिबात नाही.
            आपण लोकशाही मध्ये आहोत त्यामुळे एकाधिकार शाही अजिबात असू शकत नाही.नेता मतपेटीतून तयार होतो.. बाकी कशातून होत नाही अशी वाक्य फेकणारे.. एकाची बाजू घेतात किंवा घेत नाहीत या मुळे काही फरक पडत नाही.पण मतपेटीला मत घालणारे हात आणि त्यामागील मन या वर मात्र त्यांनी चांगलंच गारुड केलेलं आहे. त्याला बदलण्याची कुवत एकाही राष्ट्रीय नेत्यांमध्ये नाही, हे वास्तव आहे.
         सोशल मीडिया,भाषण, बातम्या,  सर्व प्रसारमाध्यमे यांच्या मध्ये प्रतिमा निर्माण करण्याचे काम अतिशय छान केलेलं आहे. मोदी म्हणजेच सर्वस्व असे चित्र नसले तरी .. दुसरा कोणी तारण हार म्हणून येऊ शकतो असा नेता ना काँग्रेस कडे आणि खुद्द भाजप कडे ही नाही.त्यामुळे चर्चा होताना अशाच होतात की.. मोदींनी चुकीचे निर्णय घेतले असतील पण.. त्यांच्या शिवाय 2019 मध्ये पर्याय नाही.
           आता ही चर्चा घडवून जरी आणली तरी अर्धी लढाई ते जिंकले आहेत. तर हा विषय माणसाच्या कर्तृत्वावर नसून.. प्रतिमा निर्मिती वर आहे, असे माझे मत आहे.दुसरा नेता उभा राहील, प्रतिस्पर्धी येईल किंवा चित्र बदलेल, हीच तर खासियत आहे लोकशाहीची.पण मोदींना मानणारे आणि त्याचा तिरस्कार करणारे या दोन्ही गटांनी मोदी यांची प्रतिमा 'लार्जर दॅन लाईफ' केली आहे.
             मला प्रत्यक्षात मात्र असं वाटत की कोणीही येवो.. त्यांनी जनतेच काम केलं पाहिजे. त्याची इमेज महत्त्वाची नसून..नेता म्हणून चांगली असली पाहिजे, कोणतेही निर्णय घेताना जनतेच्या हिताचा आधी विचार करणारा माणूस असला पाहिजे.
मी देखील आशावादी आहे. सर्वाना पर्याय उपलब्ध होतील.


प्रवीण ,मुंबई.
व्यक्तिपूजक देशात असे प्रश्न येणं स्वाभाविक आहे. लोकशाही ही प्रातिनिधिक स्वरूपाची आहे आणि लोकांनी त्यांचा प्रतिनिधी निवडून देणं अपेक्षित असते.  पण सध्या एखाद्या ला "पोस्टर बॉय" करून त्यांवर ट्रॉल आणि जाहिरातीच्या माध्यमातून मेंदू ला प्रोग्राम केलं जातं. हेच रोबोटिक माणस (?) कळपामागे पळत निघतात.
लोकशाही नेहमीच पर्याय देत आलेय त्यामूळे मोदींना पर्याय देण्याची गरज इथे नाही. लोकांनी प्रमाणिकणपणे योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे आणि देशाच्या भल्यासाठी पाहिल मतदारसंघाच भल करणार नेता शोधला पाहिजे. कोणत्याही भावनिक आवाहनांना बळी न जाता नेता निवडायला हवा.  कारण राजकारण जरी भावनेवर चालत असल तरी देश संविधानावर चालतो.
स्वतःच घर सुधारा देश आपोआप विकसित होईल, नाहीतर देश सुधारण्याच्या भानगडीत घर बरबाद होईल. हें एवढं जरी कळलं तर व्यक्तिपूजा थांबेल आणि लोकशाही स्वतः च आपलं काम करेल.


पी.प्रशांतकुमार,अहमदनगर.
.. मोदींना पर्याय कोण? सध्या आसपास पहा कुणीही नाही.. मोदींइतका प्रचंड जनाधार असणारा  कुणीच दिसत नाही. मोदींची पक्षावरही घट्ट पकड आहे. स्व-पक्षातून कुणी दुसरा दावेदारी दाखल करू शकेल ही शक्यता तर अजिबातच दिसत नाही. अडवाणींची गेली चार वर्ष अवस्था तर पाहवतच नाही.ते शक्तिशाली नेते होते आणि एकेकाळी उपपंतप्रधान यांच्यावरच आज विश्वास बसत नाही.
....बरं जेटली वगैरेंना अजिबातच जनाधार नाही ते तर मोदी लाटेतही निवडून येऊ शकले नाही.. पर्रीकर यांच्या तब्बेतीबाबत उलट सुलट ऐकू येतय.. सुषमा स्वराज ह्या सर्व बाबतीत सिनिअर पण त्यांनीच निवृत्ती चे संकेत दिलेत..
त्यामुळे मोदींना कुणीही पर्याय समोर दिसत नाही.ते एकमेव श्रेष्ठ नेतृत्व आहे आणि तेच पुढचे पंतप्रधान असणार हे सर्व कार्यकर्ते आणि भक्त बोलताहेत..
....
पण भारतीय राजकारणाचा इतिहास जर अभ्यासला तर आपल्या लक्षात येईल.. अनेक अघटित गोष्टी इथे घडल्यात..अगदी जवळच पहायच तर काश्मीर मधे PDP+BJP सरकार होईल हे स्वप्नातही कुणाला वाटलं नसेल.
...मोदींना पर्याय कोण हे निवडणुकी नंतर काय परिस्थिती येते त्यावर अवलंबून आहे. भाजप मधून मला तर योगी आदित्यनाथ प्रबळ वाटतात. 2002 ला तरी कुणाला वाटलं असेल की मोदी PM होतील?.. आदित्यनाथांची जमेची बाजू म्हणजे RSS ची साथ आणि कडवे हिंदुत्ववादी ह्या image मुळे सामान्य पक्ष कार्यकर्त्यांची सहमती...
समजा पूर्ण बहुमत नाही मिळालं तर निवृत्तीतून बाहेर येऊन स्वराज ही होऊ शकतात..
..IK गुजराल,देवेगौडा ह्यांना स्वतःला देखील वाटलं नसेल आपण PM होऊ .. पक्षाचे चार खासदार मागे नसूनही चंद्रशेखर देखील PM झालेले पाहिलेतच ना आपण?
....पर्यायी नेता कोण हे काळच ठरवणार फक्त आपण प्रत्येक गोष्टीला पर्याय हा असतोच हे लक्षात ठेवावं. निवडणुकी पश्चात काय घडामोडी घडतात त्यावर अवलंबून आहे..
भारतीय राजकारणात आपण नेतृत्व नाही तर पक्ष निवडतो..
गांगुलीनंतर कोण? धोनीला पर्याय ? कोहलीनंतर कोण असणार? ... पर्याय असतोच कधी सापडायला उशीर लागतो पण पर्याय मिळत जातो..
..एका कवितेच्या ओळी आठवल्या..
राम-कृष्णही आले; गेले !
त्याविण जग का ओसचि पडलें ?
जन पळभर म्हणतील 'हाय हाय...'

विशाल कांबळे ,सांगली .
खरतर मोदीशिवाय पर्याय कोण? हा प्रश्नच मनात प्रश्न निर्माण करतो. यापेक्षा 2019 च्या निवडणुकीत पंतप्रधान पदास योग्य उमेदवार कोण ? हे योग्य असावं अस मला वाटत. मोदीशिवाय म्हणजे मोदींना अतिमहत्व दिलं जात आहे. मोदीशिवाय दुसरे कोणी नाहीच अस वाटतं. मोदींशिवाय असे खुप  पंतप्रधान होऊन गेले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला आहे .
                    ज्या वेळी इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यावेळी देशातील जनतेला अस वाटत होत की आता देशाला वाली कोण ? आता देशाच काय होईल ? देशाच नेतृत्व कोण करणार ? पण नंतर परिस्थिती सावरली. पुन्हा निवडणूका आल्या व त्यानंतर देशाला एक नवीन चेहरा मिळाला. अशाप्रकारे कोणाच्या असण्याने किंवा नसण्याने तसेच सत्ता असण्याने किंवा नसण्याने काही फरक पडत नाही. खरतर येणारी सत्ता काय उद्दिष्टे डोळयासमोर ठेऊन येते तसेच देत असलेल्या आश्वासनांची पुर्ती करू करेल का येचा विचार करायला हवा. आणि आपल्या देशातील जनता अशी आहे जी कोणाला आपले बहुमूल्य मत द्यायचे यापेक्षा  कोणाला द्यायचे नाही यावर जास्त ठाम असते.
                   2014 ला जी भाजपची सत्ता आली यामध्ये भाजपचा विजय होताच परंतू हा प्रसारमाध्यमांचा ही विजय होता. कारण 2014 च्या निवडणुकीत प्रसारमाध्यमांचा खूप मोठा वाटा आहे. हे सत्य ही स्विकारायला हवं. मोदींना पर्याय कोण यापेक्षा येणारी सत्ता देशाच्या प्रगतीत काय भर टाकेल  याचा विचार करायला हवं.
                  आपल्या देशात 'चाय पे चर्चा' म्हणून राजकारण हा सर्वात आवडीचा विषय असतो. यामध्ये गल्लीपासून ते दिल्ली पर्यंत चर्चा होते. आपले कामधंदे सोडून  उगाच तासनतास त्यावर चर्चा करत असतात. ना नफा ना तोटा पण चर्चा चालू.
                  मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते तसेच ते अर्थतज्ज्ञ देखील आहेत. परंतु त्यांना स्वतःच्या विचाराने कधिच चालता आले नाही. तसेच राहुल गांधी यांनी आईच्या  शब्दाबाहेर नाहीत. स्वतःची विचाराने काहिच नाही. मोदी एवढ्या बाबतीत तरी बरे आहेत. पण त्यांनीही चहाच विकले याचे भांडवल केले. देशाची जनता खरतर संभ्रमात आहे  कोणाला वर आणायचं कोणाला नाही दोन्हीही सारखेच. पण तरीही सव्वाशे कोटींच्या देशात कोणीतरी पर्याय असेलच ना. जो देशाचे सक्षमी नेतृत्व करेल. . शेवटी येणारी वेळच ठरवेल कोणाला सत्तेत आणायचे आणि कोणाला घरी बसवायचे. की  नविनच कोणाला तरी संधी द्यायची....


सैनपाल पाटील, आजरा,कोल्हापुर.
लोकशाही प्रधान देशात ज्या निवडणुका लढवल्या जातात त्यातील निवडणुकीनंतरचे देशाचे नेतृत्व सर्वमान्य असते कि लादलेले असते?

लोकशाहीत प्रजा सध्या लहरी व गरजू असल्यासारखी वागते. ती आपली अल्पकालीन गरज ओळखते व आपले तत्कालीन हित लक्षात घेऊन मतदान करते. आपला प्रतिनिधी म्हणून आपल्या जातीच्या धर्माच्या किंवा नात्यागोत्यातल्या लोकांच्या पाठीशी उभे राहते. हे पुरते ओळखणारे मुरब्बी मातब्बर लोकप्रतिनिधी याचा गैरफायदा घेतात. लोकांना अर्थिक लोभ दाखवतात, शपथा आणाभाका घेतात, अशिक्षित व देवभोळ्या लोकांकडून बेल भंडारा ही उचलवतात. प्रसंगी धमकावतातहि. मग वर्षानुवर्षे याच मार्गाने निवडणूक जिंकणार्‍या यांनी स्वत:च्या विकासाकडेच जास्त लक्ष दिले नाहि तरच नवल.  मग लोकांचा, देशाचा विकास कसा होणार?

आज देशाला आपला वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून केवळ देशाचा विचार करणाऱ्या नेत्याची गरज आहे. जो जातीपातीचे धर्मपंथांचे राजकारण करणार नाही. सर्वसमावेशक असा विचार करून भविष्यातील भारत मजबूत आणि सामर्थ्यशील करण्यासाठी ठोस निर्णय घेउ शकेल. अन् अशा नेतृत्वाला खरी गरज असते ती जनतेच्या पाठिंब्याची.

मोदीला पर्याय नेता कोण? खर तर या प्रश्नाला तसे फार महत्व ही नाही. कारण लोकशाहीत नेत्याला पर्याय असो किंवा नसो , तो पसंत असो किंवा नसो, ऐनवेळी राजकीय गणित जुळवून येईल तो पर्याय स्वीकारावाच लागतो. आता पर्यायाबाबत प्रश्न विचारणारे मोदींचे पक्षकार किंवा विरोधक असो दोघेही त्यांचे नेतृत्व आणि कर्तृत्व मानतात. कारण एखाद्याला आपला नेता म्हणून निवडीचे लोकांचे निकष त्यांनी बदलले आहेत. आपली नेत्याची गुणात्माक पारख करण्याची दृष्टी त्यांनी बदलली आहे. आणि त्याच चष्म्यातून वर्तमान राजकारणात सक्रिय असलेल्या नेत्यांमध्ये त्यांच्या तोडीचा कोण आहे का याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष शोध सुरू झाला. त्यातूनच मग मोदींच्या नेतृत्वाला पर्याय कोण असे प्रश्न उपस्थित राहिले.

मोदी हे तळागाळातून आलेले नेतृत्व आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेले काम हे प्रशंसनीय आहे आणि मोदी सारखा प्रभावशाली नेता पूर्ण बहुमतांनी सरकार बनवतो तेव्हा धाडसी आणि भविष्याच्या दृष्टीने धोरणात्मक असे निर्णय घेताना कुणाचाही मुलाहिजा बाळगत नाही.आणि भविष्यामध्ये देशहिताचे असे धोरणात्मक निर्णय घेताना जर जनता पाठीशी उभी राहत नसेल तर असे निर्णय घेण्याचे धाडस पुन्हा कोणी नेता करणार नाही. त्याच्या य़ा प्रकारच्य़ा कार्यक्षमतेमुळे वर्षानुवर्षे बारगळले अनेक प्रश्न बीजेपीच्या काळामध्ये मार्गी लागलेले दिसतात.

त्यांच्या अनेक धाडसी निर्णयामुळे काही लोकांना नाराज केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध खूप आरडाओरडा केला जातो. पण हा आरडाओरडा चालू असतानाही त्यांची लोकमान्यता वादातीत आहे.

आता मोदींच्या नेतृत्वात तोडीस तोड असा नेता देशातील सगळ्यात मोठी पार्टी असलेल्या काँग्रेस कडे नाही. त्यामुळे ते इतर छोट्या मोठ्या पक्षांची मोट बांधून एक तिसरी आघाडी उभा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण ती यशस्वी होईल असे तरी सध्याच्या राजकीय घडामोडी वरून वाटत नाही. यातील बऱ्याचशा नेत्यांच्या जमेच्या बाजू त्यांच्या नकारात्मक बाजूने पार झोकाळून जात आहेत. तिसरी आघाडी बनत जरी असेल तरी त्याचे नेतृत्व कोणी करावे यावरून त्या तिसर्‍या आघाडीमध्ये बराच वादंग माजण्याची शक्यता आहे. सध्या भाजपमध्येही त्यांना विरोध होईल असे वातावरण नाही.

आता जागतिक राजकीय पटलावर भारताला जे वलयांकित स्थान जे मोदींनी प्राप्त करून दिले आहे; ते समर्थपणे पुढे नेणारा, तसेच संरक्षण, आरोग्य, शेती, व्यापार, वीज, दळणवळण इत्यादी आघाड्यांवर समर्थपणे काम करणारा योग्य दुसरा नेता लवकरच भेटेल अशी आशा धरूया!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************