“मी नेमका कोण आहे- स्वजाणीव”, - भाग 1


विषय क्र 3: “मी नेमका कोण आहे- स्वजाणीव”,

भाग 1


Image result for who m I ?

रामदास हांडे ,पुणे


लहानपणी सर्वच मला बाळा बाळा म्हणायचे
हेच माझं नाव आहे
माझं मलाच वाटायचं।

पण तेच नाव ऐकायला
आज कानांनाही जड जात
कदाचित मोठा झाल्याची
जाणीव
तेच मला करून देतं।

18 वर्षानंतर पहिल्यांदा मी मतदान केलं
भारताचा नागरिक हे नाव
माझ्या गुरुजींनीच मला दिल
सर्वच असतात नागरिक हेही सांगितले समजून

मग प्रश्न मला पुन्हा पडला,मी नेमका कोण ?

मग तुमच्या आमच्या परिचयाची जात मला कळली पण,
जातवार विभागणी तेथेही माझी झाली

एस.सी वाले जयभीम तर एस.टी वाले मला आदिवासी म्हणू लागले
भटक्या विमुक्तांसाठी नावापुढे ओ. बी. सी लागले
मराठ्यांचा पोर आहे म्हणतात मला ओपन

मग प्रश्न मला पुन्हा पडला ,मी नेमका कोण ?

अजूनही त्याच प्रश्नाने मी अनुत्तरीत आहे
जातीपातीच्या गर्दीत मी माणूस शोधत आहे

तरीही विचारलं मला कोणी
तू आहेस तरी कोण ?
मी नम्रपणे सांगेल
माणूस आहे सध्या,अजून प्रयन्त करेल चांगला माणूस होण्याचा

मी क्षेत्रच असं निवडलंय
कि जिथे हरण्याची श्यक्यता कमी आहे
कारण या क्षेत्रात स्पर्धाच मुळीच कमी आहे
*****************************************************************************

Image result for self realization



अंजली आमकर, रत्नागिरी


मी कोण
बऱ्याच वेळा हा प्रश्न पडतो,
नव्हे,  नुसता पडतोच नाही
तो मला पाडतोही,
अगदी लोळवुन टाकतो !
प्रश्न पडतो, "मी कोण ?", "मी कोण ?", "मी कोण ?"

जणू काही स्मृतिभंश झाला आहे !
नाही नाही, अगदी तसेही नाही म्हणता येणार
माझी रोजची दिनचर्या तर सुरुच आहे
न चुकता रोज ऑफिसमध्ये पोहचतो...
माझ्याच हो,
आणि घरीही रोजच परत येतो...
माझ्याच हो,
तरीही कुठेतरी काही तरी चुकतंय...
नक्कीच चुकतंय!
आणि माझे मन मला विचारतय...
"मी कोण ?", "मी कोण ?", "मी कोण ?"

आयुष्यातील, 'रोल' बदलत आहेत,
आयुष्यातले 'गोल' बदलत आहेत,
आयुष्याचे 'मोल' ही बदलत आहे,
पण प्रश्न अजून अनुत्तरित आहे,
"मी कोण ?", "मी कोण ?", "मी कोण ?"


होय, मी हरवलोय, खरंच हरवोलय,
जगण्याच्या शर्यतीत धावतोय,
पुढे पुढे पळतोय,
शर्यत कुठे सुरू झाली,
आणि कुठे संपणार काहीच माहिती नाही,
कारण तर, आपल्या शाळेतच बिंबवलय ना...
'थांबला तो संपला, थांबला तो संपला'



आता बहुदा मी संपणार तेव्हाच थांबणार,
मीच नाही ही, तुम्ही सुदधा,
आपल्यातला प्रत्येक जण,
तो पर्यंत स्वतःचे अस्तित्व शोधतच राहणार,
"मी कोण ?", "मी कोण ?", "मी कोण ?"

शोधता शोधता,
शेवटी प्रत्येक माणूस संपणार,
मागे राहणार ती नाती
नवरा, बायको, मुले
कधी कधी तर आई आणि वडीलही
आणि उरणार फक्त कागदावर
आपल्या देशातल्या डेटाबेसमधला
एक 'आधार नंबर', 'पॅन नंबर'
आणि ही, एक 'व्होटर आयडी नंबर!'


📌 ही कविता मी लिहिलेली नाही.... माझ्या दादांनी लिहिली आहे.... यातील प्रत्येक मुद्देमात्र आमच्या चर्चेतील आहेत...
ही स्व जाणीव खूप अबोध व खोल असते....त्याचा तळ सापडणे मुश्किल असतो....
वपुचं एक वाक्य आठवले " स्वतःला आरशात पाहणे हे सर्वात जास्त अवघड असते"
मी कोण? शोधता शोधता एकतर आपण आपला स्वतःला  हरवून जातो किंवा स्वतःला नवीन सापडतोही...


थोडक्यात सांगायचं तर,
मी कोण? स्व जाणीव म्हणजे
" स्वतः ला हरवणे व शोधणे"
***************************************************************************** 

सागर मडावी
यवतमाळ
Image result for self realizationजिल्हा परिषद शाळेला (जेथे ६वी पर्यंत इंग्रजीसाठी शिक्षकच नव्हते)शिकत असताना मला हा  प्रश्न कधी पडलाच नाही की मी कोण ? कारण ह्या प्रश्नापेक्षा गंभीर प्रश्न असताना हा प्रश्न कसा पडावा.कधी नावाने तर कधी आईवडिलांच्या नावाने लोक हाक मारत.पुढे कळाल की मी आदिवासीपण आहे.असाच लोकांनी दिलेल्या ओळखीला घेऊन आणि त्यातच समाधान मानत मी जगत होतो.  कसाबसा zp पासून पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आलो.तेथे दिवसातील प्रत्येक क्षणाला प्रत्येक क्रियेतून हा प्रश्न प्रकर्षाने पडायला लागला.सुरुवातीला मी या प्रश्नाचं उत्तर शोधताना स्वतःची दुसऱ्याशी तुलना करायचो. पण मला खर उत्तर मिळत नव्हत. स्वतःची स्वतःशी तुलना जेव्हा करू लागलो तेव्हा स्वजाणीव होऊ लागली आणि मी कोण आणि मला कोण व्हायचं ह्या प्रश्नाच उत्तर भेटत गेलं.स्व ची जाणीव होत असताना नागरिक म्हणून आपले कर्तव्य ,हक्क,समाजाप्रती असलेली जबाबदारी,आर्थिक परिस्थितीची जाणीव,आईवडिलांचे कष्ट,आणि त्यांच्याप्रती आपले कर्तव्य अश्या गोष्टीची जाणीव होत गेली.यातून विचारांमध्ये बदल होत गेला.
       या उत्तरामुळे मी स्वतःला ओळखू शकलो .त्यातील सर्वात महत्वाची गोस्ट म्हणजे  माझ्यातील क्षमतेची मला जाणीव झाली.आणि मी माझं ध्येय निश्चित करून त्याच्या प्राप्तीचा मार्ग पाहू लागलो. थोडक्यात,मी ध्येयवेडा,कर्तव्यदक्ष,जबाबदारीची जाणीव असणारा अश्या एक चांगला नागरिक बनण्याच्या प्रवासाला सुरुवात केली.आणि यातूनच ,मी  कोण? या प्रश्नाचं उत्तर सापडण्याचं मनाला समाधान मिळालं.

परंतू काही महिन्यांपासून ह्या प्रवासाची वाट कुठेतरी चुकल्याची जाणीव होत आहे.हो, मी हरवलोय या प्रेमरूपी जीवनाच्या युगात.यात मी सारखा  स्वतःला शोधत असतो. पण या गोष्टीलाच मी माझ्या धेयच्याप्राप्तीचे अनेक कारणांपैकी एक कारण बनवले आहे.आणि त्या कारणांना सोबत घेऊन त्यांना धेयप्राप्तीचे साधन बनूवून पुढे जायचे आहे.

म्हणूनच ,मी कोण आहे ? ह्या          प्रश्नाच उत्तर देताना मी एवढंच म्हणेल की मी
सध्या तरी एक वाट विसरलेला  वाटसुरू आहे

पण पुन्हा  मला ध्येयवेडा वाटसरू  बनायचं आहे आणि स्वतःच्या  कष्टाच्या आणि आई बाबांच्या आशीर्वादाच्या जोराने मला ते यशाचे उंच शिखर गाठायचे आहे व एक चांगला नागरिक,एक चांगला मुलगा ,एक चांगला माणूस बनण्याचा हा प्रवास निरंतर चालू ठेवायचा आहे.
*****************************************************************************

Image result for self realization
सौदागर काळे,पंढरपूर.
.....मला आज किती वर्षे झाली.माहीत नाही.पण एक भीती वाटते आहे.या पृथ्वीतलावरची मानव जात नष्ट झाली की मला सुध्दा मरण येईल.नाहीतर तोपर्यंत मी अमर आहे. मी त्याच्यात आहे,तिच्यात आहे.पण तिच्यातला मी अन ह्याच्यातला मी वेगवेगळे असतो.कदाचित एक असतील तर तो मी पणाचा निव्वळ योगायोग .....

काल हा एका नीरव शांततेच्या ठिकाणी बसला होता. (जसा नीरव मोदी जाऊन बसला तसा)जणू काही जगाचा विनाश जवळ आला आहे,अन याला यावर कोणीतरी आपलं मत काय असा प्रश्न केला आहे.अशा चिंतेत.तेव्हा कोणीच ह्याच्याजवळ नव्हतं.नाहीतर काय मला भेटायला वेळ असतोच कुठं याला.आता हीच संधी होती त्याला मी नेमका कोण आहे विचारायची.

मी त्याला म्हटलं ...अरं तू जगाचा, समाजाचा, कुटुंबाचा,मित्र-मैत्रिणीचा विचार करतो.त्यांची कधी दात काढत तर कधी डोळ्यातून पाणी आणत विचारपूस करतो अन मी कोण आहे असं म्हणताच दुसऱ्या विषयाकडे वळतो.असं वागणं बरोबर नाही.

बघ आज तुझ्याजवळ कोणीच नाही,फक्त शांतता आहे.तुझं ते जीव की प्राण असलेले डबडं निपचित झोपलं आहे चार्जिंग अभावी.

अशा वेळी मीच असतो तुझ्यासोबत. कधीतरी मला खोलात जाऊन शोध.
गुगलवर नसलेली उत्तरे सुद्धा माझ्याकडे आहेत.

लोक म्हणतात तू खरं बोलतो अन ते तू मिरवत असतो.अन मी कोण आहे असं विचारलं की धांदात माझ्यासाक्षीने वेगळी विशेषणे,पदव्या लावून खोटं बोलत असतो.

हे तुला माहीत आहे का!खूप वर्षांपूर्वी मी संत कबीर यांच्यात वास्तव्य करायचो तेव्हा ते म्हणाले होते, "बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय, जो मन खोजा आपना, मुझसे बुरा न कोय।"

मी शांततेत वास्तव्य करतो.म्हणूनच तर आजही गौतम बुद्ध,महात्मा गांधी व अजून महापुरुष शाश्वत आहेत.तू शांत ध्यानस्थ बसला की खूप अडचणी, प्रश्न निर्माण होतील पण यातून जे मिळतं ते चक्रवाढच्या गतीने दामदुप्पट असतं.

सध्या तुझं आपलं वेगळंच चालू आहे..माझ्या मी नावाखाली भेटेल त्याला सांगतो....मी हिंदू,मी मुस्लिम,मी पुरुष,मी स्त्री, मी पुरोगामी, मी सनातनी, अजून सुचेल तसं सोयीने मला वापरतो.

"हे विश्वची माझे घर" असं ज्ञानदेवाला म्हणायला लावणारा मी आहे.जिथं घर असतं तिथं भांडण असतं,मर्डर नसतो.प्रेम असतं, द्वेष नसतो.तिथं मानवता असते.अशा सुंदर जगात मी लवकर सापडतो.ते माझं घर आहे.म्हणून पत्ता तुझ्या मेंदूत आहे.तुझ्या शोधण्यात आहे.तुझ्या स्वजाणीव मध्ये आहे.

हा रस्ता खडकाळ आहे...पण तुझ्या गावचा आहे....शोध मला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************