लिव्ह इन रिलेशन... काळाची गरज की पाश्चात्य संस्कृतीच आक्रमण.

🌱 वि४🌿 व्हॉट्सअप ग्रुप
लिव्ह इन रिलेशन... काळाची गरज की पाश्चात्य संस्कृतीच आक्रमण.

(यातील सर्व प्रातिनिधिक छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत)

गीताश्री मगर,पुणे
लिव्ह इन रिलेशनशिप काळाची गरज...
वाढते डायव्होर्स चे प्रमाण बघून वाटते की लिव्ह इन रिलेशनशिप काळाची गरज आहे. बऱ्याच वेळा लव्ह मॅरेज होऊनही डायव्होर्स होतात कारण दोन माणसे प्रत्यक्ष एकत्र राहू लागल्यासच ते एकमेकांना खऱ्या अर्थाने समजू शकतात. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिप हे बेटर वाटते. जर का पुढे चालून पटले नाही तर ताबडतोब वेगळे होता येते. पण लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज वेगळे होण्याची प्रक्रिया खूप किचकट आणि वेळखाऊ असते. त्यासाठी कोर्टवर डिपेंड राहावे लागते. मग काहीवेळा नाते आहे तसेे फक्त ऍडजस्ट करत पुढे ढकलले जाते. जोडपे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहते त्याअर्थी मला वाटते तिथे व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्री पुरुष समानता ह्या मूल्यांवर त्या नात्याची उभारणी होते. (काही अपवाद वगळून ) त्यामुळे सोबत राहताना जास्त तणाव वाटत नाही. पण एक असते छोटी मोठी भांडणे झाली की आपला पार्टनर सोडून जाईल की काय आता अशी भीती कायम दोघांमध्ये राहते. पण प्रेम दृढ असल्यास, बॉंडिंग चांगली असल्यास तशी भीतीही वाटत नाही. पण कधी कधी ह्या भीतीनेही माणूस नाते चांगले पध्दतीने जपण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिप मला तरी बेटर वाटते. पण एखाद्या केस मध्ये पार्टनर सोडून जरी गेला तरी त्यानंतर तुम्हाला एकटे राहता आले पाहिजे. असंही राहण्याची तुमची तयारी असायला हवी. त्यासाठी तुम्ही आर्थिक रित्या स्वावलंबी असायला हवे. आणि मनाने स्ट्रॉंग असले पाहिजे.
लिव्ह इन रिलेशनशिप चे सगळ्यात चांगले उदाहरण द्यायचे म्हणले तर अमृता आणि इमरोज ! बस्स असं जगता आलं पाहिजे ! तसं जगता आलं तर लाईफ खूप सोपी आहे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये !

रामेश्वर रोकडे,उस्मानाबाद
विवाह म्हणजे दोन भिन्न लिंगी व्यक्ती एकत्र येऊन प्रजोत्पादन व कौटुंबिक जबाबदारी पाळण होय.मानवाने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने खूप प्रगती केली.सुखवस्तू,भौतिक वस्तू,तंत्रज्ञान ,विज्ञान यांमध्ये प्रगती केली परंतु मानवी हव्यासापोटी शाश्वत विकासाला मात्र विसरला.प्रगती करत असताना जिवनाची मूल्य व शारीरिक,भावनिक,सामाजिक बांधिलकी मागे पडत चालली आहे. आजची जिवनशैली व आहार, व्यसनाधिनता यामुळे मानवी आरोग्यावर खूप मोठा परिणाम झाला आहे.त्याचाच परिणाम शारीरिक,मिनसिक,भावनिक आरोग्य खालावत जाऊन मानवी जिवन एकलकोंडे बनत चालले आहे.मानवाच्या शारीरिक काम (sex) हे फक्त उपभोगापुरताच विचार करत आहे.काम हे वाईट नाही पण त्याला नितीमत्तेची जोड हवी.मनाचा चिडचिडेपणा,कामाचा ताण,व्यसन,अपुरी कामेच्छा,समजुन घेण्याची स्थिती यांमुळे कौटुंबिक जिवनातील वाढता संशय त्यामुळे घटस्फोट प्रमाण वाढत आहे.तसेच स्वतंत्र कुटुंब पद्धती यामुळे सहजिवनाचा अभाव.यामुळे तात्पुरते संबध म्हणजे लीव्ह इन रिलेश असे प्रकार वाढतात.त्यातुनच समलींगी विवाहांना परवानगी.सरोगेसी मदर असे प्रकार वाढतात.सरोगेसी मदर हा तर भारतात मोठ्या प्रमाणात चालतो.यामध्ये स्त्रीत्वाचा अपमान आहे ऐक पैश्यासाठी केलेली पिळवणूक आहे.भारत ही भूमी समशितोष्ण पट्ट्यात येते इथे वातावरण हे आरोग्यदाई आहे.वैवाहिक जिवनाला कामोत्तेजना देणारे आहे.तसेच वैज्ञानिक दृष्टीने मानवाला कायमस्वरूपी सहजीवन साथीदाराची गरज असते.याचबरोबर भारतीय संस्कृती मध्ये सोळा संस्कारापैकी एक महत्त्वाचा संस्कार विवाहाला मानलेला आहे.तसेच मानवाने प्रगती केली,सुखवस्तू जिवनामध्ये वाढल्या म्हणजे मानवाने यंत्राप्रमाणे वागू नये.मानवाच यशस्वी जिवन हे कुटुंब, परिवार, समाज याला अनुसरूनच पुर्ण होते.तेंव्हा या सर्वांना फाटा देऊन वैचारिक,शारीरिक ,आर्थिक दृष्टीने एकत्र येऊन लिव्ह इन रिलेशन अस राहण हे किती योग्य?म्हणून भारतात वैज्ञानिक,सामाजिक ,सांकृतीक,भौगोलिक दृष्टीने लिव्ह इन रिलेशन हे फक्त पाश्चात्त्य संकृतीच अंधानुकरणच आहे. ती काळाची गरजही नाही.
श्रीनाथ कासे,पुणे 
'लिव इन रीलेशनशीप' ही नेमकी भानगड काय आहे ? त्यामागचे उद्देश काय आहेत ? नंतर अभ्यासानुसार कळाले कि, 'स्त्री -पुरुष लग्न न करिता काही काळासाठी किंवा कायम शारीरिक आणि मानसिकरित्या एकत्र राहणे होय.' हा पण एक पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरणाचा भाग आहे. जसा 'valentine's day' हा एक प्रकार आहे, तसाच हा एक प्रकार. भारत देश मुळात अनुकरणीय आहे आणि अनुकरण करताना चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी अनुकरण होत असतात. 'valentine's day' हा जसा प्रेम व्यक्त करावयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. तसा तोच प्रेम अनुभवता यावा यांसाठी 'लिव इन रीलेशनशीप' हि भानगड आली असावी. मुळात माझ्या ओळखीचा किंवा बघण्यात असा एकही व्यक्ती ' लिव इन ' मध्ये राहत नाही. हा प्रकार ग्रामीण भारतात कधीच दिसला नाही. हा फक्त काही शहरापुरते, आणि आर्थिकद्रुष्टीने स्वयंपूर्ण असलेल्या स्त्री पुरुषांपुरतेच प्रचलित आहे असे मला वाटते.
काहीजणांना 'लिव इन' हा धर्म बुडवणारा किंवा विवाहसंस्था बुडवण्याचा कट वाटत असला तरि जसा जीन्स पँट, टी शर्ट, मोबाईल इ. हळूहळू आपल्या जीवनाच्या अविभाज्य घटक होत गेल्या तसाच हा प्रकार सुध्दा हळूहळू समुदायाचा अविभाज्य घटक होत जाईल पण त्याला अजून तरी बराच वेळ आहे.
मा. सुप्रीम कोर्टाने 23 जुलै 2015 ला याबद्दल निर्णय दिले. "18 वर्षांवरील मुलगी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. मुलगा आणि मुलगी एकत्र राहणे हा 'जगण्याचा अधिकार' आहे. ' Domestic Violence Act 2005 ' यामध्ये या गोष्टी समाविष्ट केले गेले आहे.
भारतात पूर्वीपासून बहुपत्नी प्रथा आणि बहुपती प्रथा (हिमाचल प्रदेश आणि द.भारत) चालत आली आहे. आणि अजूनही बघावयास मिळते. बहुपत्नी प्रथेचे आणि 'लिव इन' चे उत्तम उदाहरण म्हणजे गुजरात राज्यातील 'मैत्री- करार' , या करारात विवाहित पुरुष स्टँप पेपर वर 'मैत्री करार' करून महिलेला घरी आणतो. यानंतर दोघे पती पत्नी प्रमाणे 'लिव इन' मध्ये राहतात. या प्रथेपेक्षा तरी 'लिव इन' बराच आहे असे म्हणावे लागेल.
शेवटी इतकेच सांगू शकतो, जोपर्यंत गावातील  'दगडू आणि धोंडू' यांसारख्या सामान्य लोकांपर्यंत 'लिव इन रीलेशनशीप' पोहचत नाही तोपर्यंत हा प्रकार सपशेल अयशस्वीच आहे असे मला वाटते.

किरण पवार,औरंगाबाद.
मला तरी लिव्ह इन रिलेशनशिप ही काळाची गरज वाटत नाही. बदलत्या काळानुसार गोष्टी बदलतात. त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत, हे मी मान्य करतो. पण सध्या माझ्या मते लिव्ह इन रिलेशनशिप मुळे *नातं उलगडण्याची जी मजा असायची ती आता उरली नाही.* या पाश्र्चात्य प्रढथेमुळे दुसरा तोटा असा की, *एकमेकांना जाणून घेण्याच जे कुतूहल होतं, ते नष्ट झाल. त्यामुळे एकमेकांचे गुणदोष सर्व माहिती असल्याने काही वेगळी बाब उरत नाही.* परिणाम आनंद, समाधान सगळच संपत.

प्रा. रोहन वर्तक,लोणावळा
जागतिकीकरण 1991 पासून भारतात सुरू झाले, जागतिकीकरण म्हणजे काय? तर भारताच्या व्यापाराच्या सीमा वृद्धिंगत करण्या हेतूने जगातील बहुतांशी देशाशी आपण सर्वांगाने आणि सर्वार्थाने संबंध ठेवण्यास सुरवात केलेली आहे.
ह्या जागतिकरांच्या प्रवासात व्यापराबरोबर अनेक विचारप्रवाह, भाषा, तंत्रज्ञान, शब्द इ. भारतात आले आणि भारतातून बाहेरही गेले... त्यापैकी एक शब्द प्रयोग जो भारतात रुजू पाहतोय तो म्हणजे  live in relation..........?

live in relation म्हणजे नक्की काय? तर शाररिक आणि मानसिक सुखा साठी दोन व्यक्तींनी समोपचाराने एकत्र राहणे होय...

गेली कित्येक वर्षे माणूस बदलतोय. तो स्वतःला अपेक्षित आणि सोयीस्कर बदलाना स्वीकारत सो कॉल्ड... प्रगती करत आहे.
वाढलेली लोकसंख्या, वाढलेली बेरोजगारी, अत्यल्प उत्पन्न, उंच अपेक्षा, आणि भयानक वास्तव.... यातून मला हवं असलेलं प्रेम मला मिळत नाही किंवा माझ्या अपुऱ्या कामाईमुळे अनेकांचं लग्न करण्यातही अनेक अडचणी येतात. यात वय वाढत जात आहे आणि सेक्स विषयी भावना निर्माण  होऊन दिवसेंदिवस तीव्र होत आहेत, तेव्हा समविचारी सहचारी अपेक्षित असतो पण तेथे भावनांचा बांधिलकी नको असते, मग यातून शाररिक सुख आणि मानसिक आधार निर्माण होण्याकरिता आज प्रामुख्याने लिव्ह इन रिलेशन हे इन्स्टंट सोल्युशन आहे, आणि हे अनेकांना पटत देखील आहे. हेच एक प्रमुख कारण आहे आज ह्या गोष्टी स्पष्ट पणे मांडल्या जात आहेत.

लिव्ह इन रिलेशन ही प्रथा म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचे आपल्या संस्कृतीवर आक्रमण आहे असे म्हणणे चुकीचे होईल. मुळात भारताचा इतिहास बघितला तर लग्न बाह्य संबंध, लग्नाच्या पूर्वीचे संबंध हा लिव्ह इन रिलेशनचा एक अध्याय म्हणावा लागेल. जे आज तागायत भारतातील बहुतांशी समाजाला अमान्य आहे. परंतु जागतिकरणामुळे त्याला पाश्चिमात्य देशांनी दिलेले गोंडस नाव आपला समाज स्वीकारत आहे आणि अत्यावश्यक गरजेच्या पुर्तते साठी समाजमान्य मार्ग लिव्ह इन रिलेशन च्या हेडलाईन खाली स्वीकारत आहे. थोडक्यात काय तर काहीतरी नवीन म्हणून बोबलत आत्मसात करण्यास सुरुवात केली आहे.

ग्रामीण भारतात देखील लिव्ह इन रिलेशन होते आणि आहेत फक्त समाज त्या नात्याला अनैतिक संबंध म्हणवून हिणावत असतो. तर शहरी भारतात सध्या हे नातं मुकुटासारखा मिरवत जात आहे.

आपला बहुतांशी समाज अध्यात्मिक आहे. हाच आध्यत्मिक समाज ह्या नात्याला समजून घेऊ शकत नाही म्हणून एकंदरीत ह्या संबंधांकडे बघण्याचा दृष्टिकोन बहिष्कृत असल्याचे चित्र जास्त ठळक पणे दिसते. तर आधुनिक विचारवंत आणि खऱ्या अर्थाने शिक्षित समाज स्वतःच्या तर्क  शुद्ध बुद्धीचा वापर करून हे नातं आणि आपली माणस जपत आहेत हेही तेवढच खरं.

मॅस्लो च्या सिद्धांतानुसार मानवाच्या 5 प्राथमिक गरजा असतात त्या म्हणजे अन्न,वस्त्र,निवारा, झोप आणि सेक्स.
सेक्स ही प्राथमिक गरज भागविण्याकरिता आणि मानसिक आधाराकरिता लिव्ह इन रिलेशन आजच्या युगात अत्यावश्यक आहे असे माझे मत आहे. आणि अशा नात्याला समाजाची मान्यता नसेल तर हीच भूख भागविण्याकरिता जागो जागी आसाराम, राम रहीम तयार होयला वेळ लागणार नाहीत.
धन्यवाद

अनिल गोडबोले,सोलापूर
भारतामध्ये जर आपण सध्या काही गोष्टीच निरीक्षण केले तर असे आढळून येत आहे की एका बाजूला सगळीकडे संस्कृती आणि बऱ्याच आदर्शवादाच्या कल्पना दिसत आहेत तसेच दुसरीकडे ' आपण एखादी गोष्ट का करतो किंवा का करत नाही' याचं काही ठोस कारण माहीत नसताना आपण पिढ्यानपिढ्या तसेच वागत आहोत.

लग्न संस्था मोडकळीला आलेली आहे व कुटुंब संस्था खूप मोठ्या परिवर्तन घडवून आणण्याच्या मार्गावर आहे. वाढते घटस्फोटाचे प्रमाण, पारंपरिक लग्न पद्धती, मुलींचे कमी होत चाललेले प्रमाण, लिबरल संस्कृती व विचार यांच्या गुंत्यामध्ये अडकलेली युवा पिढी लग्न या गोष्टीतील मूळ गाभा *सहजीवन*... हेच हरवून बसले आहेत.

कामाच्या निमित्ताने किंवा पैसे मिळवण्यासाठी वीकेंड मॅरेज सांभाळत बसलेल्या जोड्या दिसत आहेत. म्हणजे लग्न एका व्यक्तीसोबत आणि दिवसातले 18 तास दुसऱ्या व्यक्तीसोबत अस काहीसं चाललेलं आहे.

प्रजनन आणि सेक्स या गरजा पूर्ण करणे ही देखील फार प्राथमिकता उरलेली नाही. लग्न जुळवताना अवास्तव कल्पना केल्या जातात आणि त्या पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर पळत राहणे एवढंच जीवन झाले आहे.

लग्न संस्थेतून आलेली बंधन ज्याला पाळता येतात त्याला ठीक आहे पण जो ही बंधन पाळू शकत नाही तसेच दुसऱ्याला पाळण्याची सक्ती करू शकत नाही त्यामुळे मानसिक तणाव वाढत आहे व आपलेपणा कमी होत जातो आणि शेवटी फकत दोन शरीर एकत्र राहतात..

(सर्व व्यक्तीच्या बाबतीत अस होत नाही परंतु वारंवारता वाढत चाललेली आहे)

या सर्व प्रसंगाचा अभ्यास करताना असे जाणवले की लिव्ह इन रिलेशन हा एक मार्ग यावर का असू नये?.

ज्या मध्ये स्वातंत्र्य आहे, प्रेम आहे, गरजा पूर्ण करणे आहे, व्यवहारी बाजू आहे, जबाबदारी आहे आणि दुसऱ्या बाजूला गृहीत धरलं जाण्याची भीती नाही.

म्हणजे एकाने तडजोड करायची आणि दुसऱ्या व्यक्तीने गृहीत धरायचे ही व्यवस्था राहत नाही.
व्यक्ती सोबत राहिल्या की भावना एकत्र येतात त्यामुळे भावनिक नात निर्माण झालं तर लग्न झालं काय किंवा कॉन्ट्रॅक्ट झालं क्या किंवा लिव्ह इन... असलं काय! शेवटी प्रेम असेल तर चांगलंच आहे की..

संशयी वृत्ती असली की दोन्ही गोष्टी टिकू शकत नाही पण इकडे जर संशय आला तर संवाद साधण्याचा किंवा समजून घेण्याचा पर्याय आहे व जास्त झालं तर सोडून देण्याचा पर्याय आहे.

प्रेम नसलेली जोडपी एकत्र राहिली काय आणि नाही राहिली काय? काही फरक पडत नाही.

लग्नामध्ये एकनिष्ठता जशी मान्य आहे तशीच इथे ही एकनिष्ठता असणे गरजेचे आहे. खूप व्यक्ती सोबत शरीर संबंध ठेवायचे असतील तर व्यवस्थित आरोग्याची काळजी आणि पार्टनरची परमिशन असली तर काही फरक पडत नाही.

एकनिष्ठता आपली संस्कृती आहे व त्याग करण्याची वृत्ती आपण आधीच खोटी ठरवली आहे... घटस्फोटाचे खटले चालू करून आणि एड्सचा विळखा वाढवून..

आपण म्हणजे 136 करोड भारतीयांनी हा मुखवटा तोडला तट बाकी काय उरत नाही..

माझ्या मते लग्न काय किंवा लिव्ह इन रिलेशन काय.. आनंदी राहणे गरजेचे आहे.. एकमेकांसाठी राहणे गरजेचे आहे..

संस्कृतीचे परिवर्तन होत आहे.. जीन पॅन्ट पासून .. अगदी मांड्या झाकण्या पर्यंतची चड्डी घालून फिरण्या एवढी।मोकलीकता येत आहे.

बलात्कार, विनयभंग आणि छेडछाड या सर्व वर्तन आणि विचार समस्या आहेत ... त्यासाठी संवाद साधून प्रत्येकाला ज्याची त्याची मोकळीक देणे गरजेचे आहे...

तर शेवटी काही गोष्टीचे भान राखले तर मोडकळीस आलेल्या लग्न संस्थेला हा पर्याय विचार करायला काही हरकत नाही.

२ टिप्पण्या:

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************