नविन धर्म की धर्मनिरपेक्षता.... भारताला कशाची गरज आहे?

*नविन धर्म की धर्मनिरपेक्षता.... भारताला कशाची गरज आहे?*
श्रीनाथ कासे 
सोलापूर 


     मुळात धर्म म्हणजे काय ? जे आपल्या शाळेच्या दाखल्यावर लिहिलेले असते ते, का ?  की अजून काही व्यापक स्वरूप आहे. धर्म किंवा जात मिळवण्यासाठी माणूस काही मोठे काम करतो काय ? नवीन धर्म अस्तित्वात का येतो ? नवीन धर्म पाहिजे की धर्मनिरपेक्षता हवी ? असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील.
     मुळात माणूस पृथ्वीवर कसा निर्माण झाला ? पृथ्वीतलावर तो महाबलाढ्य कसा झाला ? हा प्रवास रोमांचित करणारा आहे. हजारो वर्षांपूर्वी माणूस योग्य काम आणि विचार करायला शिकला. त्याला अग्नी, लोखंड, निसर्ग आणि जगाचे ज्ञान मिळाले. असा माकड ते माणूस प्रवास एकंदरीत मोठा आहे. जंगलातुन बाहेर पडून कापडाची निर्मिती - खाण आणि धातू  या सगळ्यांचा वापर करून तो पुढे चालू लागला. या प्रवासात 'धर्म' नावाचा टप्पा नंतर समूहात आल्यावर आला. तोपर्यंत माणसांना धर्म नव्हता आणि जातही...
     आपल्या धर्मावर आणि जातीवर आपल्याला प्रचंड अभिमान असतो. ते असायला हवे का -नाही, हे निर्मितच जाणे. पण जेव्हा यामध्ये कट्टरपणा येतो तेंव्हा देश आणि विश्व धोक्यात येते. आपलाच धर्म श्रेष्ट बाकी सगळे बकवास असे म्हणणारे माझे काही सुशिक्षित मित्र आहेतच."धर्म किंवा जात मिळवण्यासाठी तुझा काहीच हात नव्हता ते तुला आपोआप मिळाले आहे" असे मी त्यांना गंमतीने म्हणत असतो.
      काही दिवसांपासून नवीन किंवा वेगळ्या धर्माची मागणी होत आहे. त्यांना मान्यता द्यायला काहींचा विरोध आहे तर काहींचा पाठींबा. दोघांचे म्हणणे आपापल्या पद्धतीनं कसे अभ्यासू आणि चांगले आहे, ते सांगत असतात. माझ्यामते लोकांना जिथे जास्तीत जास्त स्वातंत्र्य आणि आनंद मिळते त्या धर्मात त्यांनी रहायला काही हरकत नसावी.
    नवीन धर्म उदयास आल्या आणि पुढे अजून उदयास येतीलही...सर्जनशीलता आणि नाविन्याशिवाय मानवाचा विकास होत नसतो. जुन्या धर्मातील रुढी, परंपरा, संस्कृती यातील ज्या चुका आहेत त्या सुधारून तो धर्म बनत असतो पण माणूस हा चुकीचा पुतळा आहे त्यामुळे धर्मातही अनेक चुका असू शकतात. कुठलाही धर्म परिपूर्ण नसतो. धर्म ही अफूची गोळी असते त्यामुळेच बहुदा या विषयावर लिहिण्याचा सर्वजण टाळतात. 
      26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमीत करण्यात आला. संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष (Secular) हा शब्द 42 व्या संविधान संशोधनाद्वारे 1976 साली जोडण्यात आला. हा शब्द जोडण्याच्या अगोदर पुरातन काळापासूनच भारतात " सर्व धर्म समभाव " चालत आला आहे. या देशाला कुठलाही अधिकृत धर्म नाही. पण राज्यघटनेत आपला धर्म पाळण्याचा अधिकार व धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकाना अनुच्छेद 29 आणि 30 नुसार विशेष अधिकार देण्यात आले आहेत. 
शेवटी इतकेच सांगायचे आहे, 'नवीन धर्म हवे किंवा जुने धर्म हवे, की धर्मनिरपेक्षता ज्याचे त्याने ठरवायचे आहे. तुम्ही आता स्वतंत्र आहात आणि भारतीय राज्यघटना तुमच्या पाठीशी आहे.'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************