पर्यटन विकास... रोजगाराची नवीन संधी


पर्यटन विकास... रोजगाराची नवीन संधी

शिरीष सरिता चंद्रशेखर उमरे
सीबीडी बेलापुर, नवी मुंबई

       पर्यटन शब्दासोबत आठवतात गोवा, राजस्थान, केरळ ही राज्ये !! परदेशी पर्यटक भारतात आले की ह्याच राज्यांमध्ये जास्त जातात. ह्यात इतिहासासोबत ह्या राज्यांनी पर्यटन विकास करण्यात मेहनतीचा सिंहाचा वाटा उचललेला आहे.
      गोवा त्याच्या खाद्य संस्कृती व सुंदर समुद्रकीनारा साठी प्रसिध्द तर केरळ निसर्ग व आयुर्वेदीक उपचारासाठी !! राजस्थान आपल्या वाळवंट व हस्तकला साठी जगाला मोहीत करतो.
       पर्यटनातुन होणारे उत्पन्न लक्षात आल्यावर जवळपास सगळ्याच राज्यांनी यावर काम करणे सुरु केले असले तरी त्यात बर्याच त्रुटी आहेत. मुलनिवासी लोकांना ह्याचे महत्व पटवुन देण्यात, त्यांना सुविधा व प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मिती करण्यात जवळपास सगळे च राज्ये अपयशी ठरली आहेत. पण खाजगी क्षेत्राने ह्या सुवर्णसंधीचा छान फायदा घेतला.  आज कृषीपर्यटन, वनपर्यटन व  आरोग्य पर्यटन हे आघाडी वर आहेत. मुलांमध्ये ट्रेकींग ची आवड निर्माण होत आहे. साहसी खेळ हे एक नविन पर्यटनाचे दालन निर्माण झाले आहे. भारतात नदी, झरे समुद्र, धबधबे, खाडी, कील्ले, राजवाडे, मंदीरे, वाळवंट, बर्फाळ भाग, जंगले, अभयारण्य, पर्वत, दर्या, डोंगरे अशी निसर्गाची देण आहे. खाद्य संस्कृती, रिती रिवाज, परंपरा, सण, पेहराव संस्कृती, भाषा संस्कृती, कला संस्कृती इतकी विवीधता आहे की युवा पीढीला प्रचंड संधी आहेत ह्या क्षेत्रात... आताच्या इंटरनेट व सामाजिक प्रसार माध्यामांमुळे ह्या व्यवसायाला छान गती आली आहे. होमस्टे व बॅकपॅकर ह्या परदेशी संकल्पना आता इथे रुळल्या आहेत. महाराष्ट्र तर कृषी/वन पर्यटनात आघाडीवर आहे. *निवास व न्याहारी* ह्या सरकारी उपक्रमाने पण छान बाळसे धरले आहे खास करुन कोकणात... नोकरीपेक्षा ह्यात व्यवसायाला जास्त वाव आहे... जितक्या सेवा नाविन्यपुर्ण व उत्कृष्ट तेवढे उत्पन्न जास्त !!
–------------------------------------------------------------------
संदिप थोरात,
अहमदनगर.
         निसर्गाच्या सहवासात आनंदाचे क्षण घालविण्याची आणि नवनवीन कला, संस्कृतीविषयी जाणून घेण्याची माणसाची मुलभूत प्रवृत्ती पर्यटनाचा मूळ आधार आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला तेवढेच महत्व आहे. आज वेगवान दळणवळणाच्या साधनाने जग जवळ आले असताना देशाबरोबरच बाहेरचे जग जाणून घेण्याच्या माणसाच्या ओढीने हे क्षेत्र सातत्याने विस्तारते आहे. दरवर्षी पर्यटन दिनाच्या ‍निमित्ताने या क्षेत्राशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा घडवून आणली जाते. वर्षभरासाठी एक संकल्पना निश्चित करून त्यानुसार कार्यक्रमांचे आयोजन जगभरात करण्यात येते. यापूर्वी सांस्कृतिक बंध, पर्यटन आणि जैवविविधता, महिलांसाठी संधी, पर्यावरण बदलास प्रतिसाद, क्रीडा आणि पर्यटन, खाजगी क्षेत्राचा सहभाग अशा विविध विषयांवर विचार करण्यात आला आहे.
यावर्षी ‘पर्यटन आणि विकास’ हा संबंध अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
        पर्यटन हा जगातील रसायने आणि इंधनानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा व्यवसाय आहे. जगभरातील अनेक नागरिकांसाठी उत्कर्षाचे साधन आणि जीवनाची आशा म्हणून या क्षेत्राचे मोठे योगदान आहे. पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांवर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. वाहतूक, हॉटेल्स, मनोरंजन आदी व्यवसायही पर्यटनाशी जोडले गेले आहेत.
पर्यटन व्यवसायामुळे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण विषयक विकास होण्याबरोबरच पर्यटनस्थळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनमानातही बदल घडून येतो. पर्यटकाला आवश्यक असणारी निवास, भोजन, वाहतूक, माहिती, मनोरंजन आदी व्यवस्थेसोबतच त्या भागातील उत्पादनांदेखील मागणी निर्माण होते. सांस्कृतिक आदानप्रदानाच्या माध्यमातून नागरिकांना एकमेकाशी जोडण्याचे कामदेखील पर्यटनाच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे पर्यटन विकासात नागरिकांचा जेवढा सहभाग वाढेल, तेवढेच त्या भागातील अर्थकारणालादेखील गती मिळते.
पर्यटनाबाबत विकासाच्या कल्पना मांडतांना त्या भागातील खास खाद्यसंस्कृती, पारंपरिक कला, साहित्य, लोकजीवन, निसर्ग याचा फारसा विचार केला जात नाही. पर्यटकांसाठी चांगल्या सुविधांएवढेच त्यांना नव्या जगाचे दर्शन होणे आणि रोजच्या जीवनापेक्षा नवा अनुभव मिळणे महत्वाचे असते. पाश्चात्य राष्ट्रांनी आपल्या परंपरेच्या खुणा याचसाठी खासकरून जपल्या आहेत आणि त्याचेच मार्केटींग उत्तमरित्या केले जाते.
–------------------------------------------------------------------

सौदागर काळे, पंढरपूर._
       पर्यटन हे खूप जणांचा जिव्हाळ्याचा विषय. आनंदाचा,मन हलकं करण्याचा, जगात नवीन काय चाललंय हे डोकावून पाहण्याचा विषय. प्रत्येकजण पर्यटनसाठी आपल्या राशीतील काही रक्कम राखीव ठेवत असतात. लहानपणी सहल हेच माध्यम पर्यटन म्हणून वाटायचं.पण आज बदलत्या काळाबरोबर पर्यटनाच्या शाखा सुद्धा वाढल्या.आजही ग्रामीण भागात *'जीवाची मुंबई'* करून आलो.असे खुपजण जुनी माणसं पारावर बसून खुमासदार वर्णन करत दुसऱ्यांना सांगत असतात.थोडक्यात तुमच्याकडे दृष्टी असेल तर सृष्टी नाहीतर कायमची निराशेची वृष्टी.
गावात जन्मला अन गावातच मेला अशी आपल्या नावापुढे पाटी लागू नये म्हणून प्रत्येकांनी विदेशात-देशात राहिलं, कमीतकमी आपल्या राज्यात तरी पर्यटन करायला हवं.
आपण बदलत चाललो,आपली जीवनशैली बदलत चालली अन आनंदाचे , विश्रांतीचे,अभ्यासाचे , अजून बरेच घटकांसाठी पर्यटनाच्या शाखा निर्माण होऊ लागल्या. नाहीतर अगोदर फक्त निसर्ग सौंदर्य,धार्मिक हेच पर्यटन आपलं असायचे.आज ऐतिहासिक,संशोधन, शेतीफेरफटका असे पर्यटन वाढू लागले अन रोजगारनिर्मिती आपसूक होऊ लागली.
         जिथे समुद्र तिथे वाळवंट,सर्वाधिक पाऊसाचे ठिकाण तिथे अवर्षण,जिथे पठार तिथे हिमालयसारखे पर्वत असे बरेच विरूद्धभास आपल्या देशात आढळतात.पण त्यांचे पर्यटन म्हणून उपयोग करायचे असेल तर विकास हवा.देशात धार्मिक स्थळे सोडून बाकीच्या क्षेत्रांना तुलनात्म विकासासाठी कमी निधी दिला जातो.
       प्रत्येक सरकारला पर्यटन विकास करताना या क्षेत्रात गुंतवणूक करताना एक भीती नक्की वाटत असेल की यातून इनपुट किती भेटेल!त्यामुळे संघटित युवकांनी सरकारच्या भरवश्यावर न बसता हे क्षेत्र नवनवीन कल्पनांनानी रोजगरनिर्मितचे आगार करायला हवे.
       उदाहरणार्थ म्हणून सांगायचे झाले तर साहित्य क्षेत्राच्या संबंधित निर्मिती केलेले *"पुस्तकांचे गाव- भिलार"* हे नवीन पर्यटन व रोजगरनिर्मितीचे स्टार्टअप आहे.
_पर्यटन विकासात माझ्या मते रोजगरनिर्मिच्या वाटा:-_
1.पुस्तकांचे गावच्या धर्तीवर शांत ,रमणीय ठिकाणी *स्पर्धा परीक्षेचे गाव* असे गाव सुद्धा निर्माण होऊ शकते.
2.पर्यटन ठिकाणी उदा.महाबळेश्वर सारख्या थंड ठिकाणी गरम असलेले मक्याचे कणसे (गोड)जास्त विकले जातात. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मागणीनुसार अशा प्रकारच्या पिकांची शेती करावी.
3.आज सगळ्यांकडे स्मार्ट फोन आहेत.पण   भेट देण्याच्या वेळेस खूप जणांची बॅटरी संपलेली असते.तेव्हा चार्जिंग करून देणे हा सुद्धा पार्टटायम रोजगार होऊ शकतो.(कोकण,मेळघाट सारख्या दुर्गम भागात हे संधीचे सोने करते)
4.कोकणसारख्या भागात किंवा पुणे-मुंबई यासारख्या मुख्य शहरातील विविध प्रसिद्ध स्थळे मनसोक्त पाहण्यासाठी आज खुपजण दूरवरून टू-व्हीलरवर सफर करतात.मुख्य ठिकाणी जागोजागी अशा टू-व्हीलर भाड्याने देण्याचा व्यवसाय होऊ शकतो.(हे पाऊल रिस्कचे असले तरी अटीच्या अधीन होऊ शकते)
5.संबंधित पर्यटनक्षेत्रातील हस्तउद्योग कलांचे, प्रसिद्ध वस्तूंचे डिजिटल मार्केटिंग करून एका वेबसाईटवर आणून विक्री करू शकतो.
6.जागोजागी संबंधित पर्यटनस्थळी त्या त्या भागातील आधुनिक पद्धतीने निर्मित आकर्षक खाद्यसंस्कृतीचे भोजन कक्ष निर्माण करू शकतो.
–------------------------------------------------------------------

प्रदिप इरकर
वसई,जि-पालघर
       पर्यटन हा सर्वांच्या आवडीचा विषय आहे व प्रत्येकालाच ते करायला आवडतो.परंतु पर्यटन हा अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख घटक आहे फरक इतकाच की काही ठिकाणी पर्यटनाचा विकास झाला आहे तर काही ठिकाणी विकास झाला नाही.
        जर राज्यकर्त्यांनी मनावर घेतले तर कोणत्याही ठिकाणाला पर्यटनस्थळ बनवता येऊ शकते फक्त व्यवस्थित नियोजन तेथील नैसर्गिक रचना आजूबाजूचा परिसर व इतर तत्सम घटक ह्यांचा योग्य अभ्यास करता आला पाहिजे व योग्य असे धोरण असले पाहिजे.
   संपूर्णपणे पर्यटनावर आधारित अनेक ठिकाणांची नवे देत येतील.महाराष्ट्र हे नैसर्गिक देणगी लाभलेले,ऐतिहासिक वारसा असलेले,थोर महापुरुषांची भूमी असलेले राज्य आहे व पर्यटनाचा विकास करण्यासाठी हे घटक पुरेसे आहेत.
महाराष्ट्राला एकूण 720 km लांब समुद्रकिनारा लाभला आहे व ह्यावर जवळपास 48 नैसर्गिक बंदरे आहेत.अनेक मोठमोठ्या खाद्य आहेत.ह्यातून रो-रो सारख्या सेवा सुरू केल्या तर नक्कीच पर्यटनाबरोबरच होणाऱ्या वाहतूककोंडीला देखील उत्तम पर्याय ठरू शकतो.
         देशातील तसेच जगातील सर्वाधिक जैवविविधता लाभलेल्या प्रदेशांपैकी महाराष्ट्रातील सह्याद्री घाट हा एक प्रदेश आहे.पर्यटकांवर काही प्रमाणात बंधने टाकून हा प्रदेश व्यवस्थित रित्या जागतिक पर्यटन स्थळ बनवता येऊ शकते.
महाराष्ट्राला लाभलेले उंच उंच सरळ कडे असलेले डोंगराळ भागात ट्रेकिंगला जाणाऱ्यांची संख्या ही खूप आहे परंतु जर ह्याच ठिकाणी योग्य सोयी सुविधा व प्रशिक्षण देऊन ह्या ठिकाणांचा विकास केला तर जगभरातून पर्यटक ट्रेकिंग साठी महाराष्ट्रात येतील.
        ह्याच डोंगराळ भागात असलेली अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत.त्यातही उत्तम सोयी सुविधा उपलब्ध केल्यास ह्यांचा विकास होण्यास बराच वाव आहे.
ऐतिहासिक वारसा असलेले महाराष्ट्र हे राज्य आहे.अनेक गड- किल्ले,लेणी ,स्तूप,मंदिरे,चर्च,गावे महाराष्ट्रात  आहेत.
ह्यांचा विकास करून ऐतिहासिक महत्व प्रसिद्ध केले तर नक्कीच पर्यटकांना आकर्षित करू शकतो.
ज्याप्रमाणे परराष्ट्र धोरण वगैरे धोरणे आखली जातात त्याचप्रमाणे पर्यटन धोरण दरवर्षी जाहीर केले पाहिजे व पुरेसा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे.कोणत्याही पर्यटनस्थळाची माहिती पर्यटकापर्यंत पोहोचवण्यासाठी तेथील गाईड खूप महत्त्वाची भूमिका निभावतात आपल्या भारतातील बहुतांश गाईड हे परंपरंगात आहे.त्यांना पद्धतशीरपणे प्रशिक्षण देणाऱ्या तसेच या क्षेत्रात उतरू इच्छिणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून  देणाऱ्या  संस्था स्थापन करण्यात आल्या तर  नक्कीच या क्षेत्रात विलक्षण बदल घडून येतील.
–------------------------------------------------------------------


डॉ. दिलीप कदम,
अहमदनगर.

1) संधी पुर्वी पासुनच आहे पण मध्यमवर्गीय लोकांकडे नव्याने आलेल्या पैशामुळे वाढ झाली.
2) पर्यटन हा हंगामी आणि चढ उतार होणारा व्यवसाय आहे.
सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नका.
रोजीरोटीच्या नेहमीच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करू नका.
3) सरकारच्या नुसत्या योजना आहेत.पुरेसे बजेटरी सेंगशन नसते.
त्याचा लाभ मिळवा पण अवलंबून राहु नका.
छोटी सुरुवात करा, खाचाखोचा समजून घेत वाढ करा.
4) आपला आणि आपल्या परिसराचा युनिक सेलिंग पॉइंट शोधा आणि तोच  घट्ट पकडून ठेवा.
दारू ,मटण, भाडयाच्या खोल्या एवढेच पर्यटन नसते.
बाहेरुन येणाऱ्या लोकांच्या अटी वर नव्हे तर तर तुमच्या नियमानुसार व्यवसाय वाढवा.
परिसराचे पर्यावरण आणि संस्कृति प्रदूषित होणार नाही याकडे कटेकोर लक्ष ठेवा.
​5) मला सुचलेल्या दोन संधी​
​i) नोकरदार शहरी भगिनींसाठी माहेर केंद्र​
​ii)जेष्ठनागरिकांसाठी तात्पुरते निवास केंद्र.​
चर्चा करायची असेल तर फोन करा
9423066330
–------------------------------------------------------------------

यशवंती होनामाने.
मोहोळ.  
     हा एक खुप छान पर्याय आहे.ज्याना खुप फिरण्याची आवड आहे,ज्यांना आपल्या आवडीचा उपयोग व्यवसाय म्हणून करायचा आहे ना त्यांना हा उत्तम पर्याय आहे.हल्ली लोकांना फिरायचे असते त्यांना ठिकाण ची  माहिती असते पण ती फक्त ऐकिव किंवा गूगल वर वाचलेली असते.अशावेळी त्यांना गरज असते ती गाइड ची.असा गाइड की जो त्यांना सगळी ठिकाणे नीट फिरवेल.त्यांना त्या पर्यटना चा आनंद घेता येईल.आपली आवड पण  जोपासली जाईल आणि रोजगार पण होईल.

–------------------------------------------------------------------

समीर सरागे,
नेर, जि. यवतमाळ
         भारत देश हा पर्यटना च्या बाबतीत ऊत्तम स्थान आहे.  पर्यटन म्हणजे जिथे निसर्ग रम्य वातावरण ,त्या राज्याची किंवा देशाची विविधता , कला, साहित्य , इत्यादि  होय. पर्यटन हा जगभर अत्यंत महत्वपूर्ण होत असलेला असा उद्योग आहे  भारतात ही या उद्योगाने अलीकडे चांगलीच जम पकडली आहे ,
       आज बऱ्याच देशात पर्यटन हाच मुख्य व्यवसाय आहे उदाहरण द्यायचे झाल्यास सिंगापुर ,मलेशिया, संयुक्त अरब अमीरात ,हांगकांग ,
स्वित्ज़रलैंड वैगरे देता येतील  या देशातील जीडीपी ग्रोथ वाढण्याचे हे  मुख्य कारण आहेत.
      मछिमारांचा देश म्हणून ओळख असलेल्या सिंगापुर हा देश एकदमच जगात आर्थिक महासत्ता म्हणून उदयास आला नाही तर त्याला देखील विकासभिमुख दृष्टिकोण अंगिकारवा  लागला .
      सिंगापुर असा देश आहे जेथिल भौगोलिक क्षेत्र अतिशय कमी आहे. जिथे  पानी सुद्धा विकत घ्यावे लागते आणि शेती साठी क्षेत्र देखील नाही , आपल्या देशा सारखी संसाधने आणि नैसर्गिक संपत्ति नाही तरी त्या देशाची अर्थव्यवस्था आज अतिशय मजबूत आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे  या देशाने पर्यटन व्यवसायाला दिलेले महत्व आणि त्यातून साधलेली आपली आर्थिक प्रगती. परंतु भारतात विकसाचीच एलर्जी असणाऱ्याना पर्यटनाचे महत्वच नेमके पटलेले नाही. पर्यटना सरख्या उद्योगला प्रत्येकच वेळी दुर्लक्षिल्या जाते हे दुर्दैवच म्हणावे लागेल,
      पर्यटन हा देशात जास्त परकीय चलन मिळवून देणारा तिसरा उद्योग आहे.
*पर्यटन क्षेत्रात भारतातील रोजगार
– ३.९५ कोटी
*जगातील एकूण उत्पन्नाच्या ९ टक्के आर्थिक उत्पन्न पर्यटन उद्योगातून निर्माण होते.
*जगातील११ पैकी १ रोजगार हा पर्यटनातून निर्माण होतो.
पर्यटना मुळे त्या गांव किंवा शहराला जागतिक दर्जा प्राप्त होतो.
पर्यटना हा असा उद्योग आहे ज्याला काही त्रुतु नसतो बाराही महीने चालणारा हा उद्योग आहे.
या माध्यमातून बऱ्याच लोकना आज देशात रोजगार उपलब्ध झाला आहे.
अगदी चहा कैंटीन पासून तर विमान प्रवासा पर्यंत हा उद्योग तेजीत आहे.
काही जण हौशी असतात ते दरवर्षी ठरवून सहकुटुंब पर्यटन करतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते.
आकडय़ांची भाषा
संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार जगात दरवर्षी २० कोटी लोक पर्यटनाच्या निमित्ताने घराबाहेर असतात. गेल्या दशकभरात ही संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. अर्थव्यवस्थांमधील चढउतारांच्या वातावरणातही लोकांचा पर्यटनाचा उत्साह कमी झालेला नाही. भारतातील परिस्थिती पाहिली तर पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांना परदेशी पर्यटक कसे वाढतील ही एकच चिंता असते, कारण आपल्याकडे परदेशी पर्यटक २ टक्के तर देशी पर्यटक  ९८ टक्के अशी स्थिती आहे, अर्थातच परकीय चलन मिळावे हा त्यामागचा हेतू आहे, पण देशी पर्यटकांकडेही पैसा नाही असे नाही. त्यांच्यामुळे पर्यटनस्थळाच्या ठिकाणी स्थानिक लोकांच्या विकासास चालना मिळू शकते.
*पर्यटकांनी कुठेही गेल्यानंतर त्या गावात कचरा व्यवस्थित कचरा पेटीतच टाकावा.
*पर्यटनस्थळाच्या पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही असेच वर्तन असावे.
*ऐतिहासिक पर्यटनस्थळी गेल्यानंतर आपण तेथे आपली नावे कुणी पराक्रमी पुरुष किंवा स्त्री असल्याप्रमाणे कोरण्याचा मोह टाळावा.
*पर्यावरणस्नेही वाहतूक साधनांचा वापर करावा, जसे आग्रा येथे विजेवर चालणाऱ्या रिक्षा आहेत.
*तीर्थक्षेत्रांचे पर्यटन हा फार गांभीर्याने घेण्याचा विषय नाही असे समजले जाते, पण तिथेही लोकांनी अस्वच्छता टाळावी. वाराणसीमध्ये गंगेची दूरवस्था या पर्यटनाने झाली आहे. ’पंढरपूरमध्ये वारीच्या वेळी व इतर वेळीही काय स्थिती असते हे सर्वाना माहीत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी शासनाने स्वच्छतागृहे व इतर सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
*पर्यटकांनी देशात किंवा परदेशात पर्यटनाला जाताना आवश्यक ती ओळखपत्रे व इतर कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे.
       त्यात दुसरा मुद्दा असा की, तेथील स्थानिक लोकांनीही पर्यटकाला अवाच्या सव्वा किमती सांगून लूट करू नये. कारण आपली संस्कृती अतिथी देवो भव असेच सांगते. शहरी भागातील लोकांना त्यांच्या कामातून विसावा मिळावा म्हणून ते पर्यटनाला जातात.
         पर्यटन उद्योग हा मनोरंजन  आणि रोज़गारा बरोबरच देशाच्या विकासात देखील मोलाची भूमिका बजावितो
म्हणून पर्यटन उद्योग  जास्तीत विकसित करावा व शासनाने व जनतेने देखील याचे महत्व जाणून पुढील वाटचाल करणे  व युवकां करिता रोजगारच्य  नव्या संधी शोधने गरजेचे आहे.


 ( यातील प्रातिनिधिक सर्व छायाचित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************