इच्छा मरण कायदा : प्रगत मानवाची गरज की अधोगती



🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

इच्छामरण कायदा : प्रगत मानवाची गरज की अधोगती


Source:-INTERNET
-ओंकार क्षीरसागर,
श्रीरामपूर

    खरतर हा कायदा खरच आपण पारीत करावा याची आजच्या धावत्या युगात जरा जास्तीच गरज भासू लागलीये असच हॉस्पिटल कडे बघून वाटू लागलंय.
कारण आजकालची वाढती आर्थिक लाचारी वाढते आजार आणि त्यातून बाहेर येणाऱ्या कमी वाटा आणि त्यात आर्थिक संकट हे आता डोळ्यांनासुद्धा न सोसणारे होत चाललंय.

मागच्या वर्षात tv वर एक बातमी बघितली सरकारी अधिकारी होते कोणीतरी त्यांना काय आजार झाला होता माहीत नाही पण दिवसांगणिक त्याच्या त्रिव्रता आणि आर्थिक चणचण वाढतच गेली आणि शेवटी त्यानं घरी हलवण्यात आलं कारण त्या कुटूंबियाकडे तेवढंच उरलं होत हक्काचं अस काही. त्यामुळे त्यांना घरी हलवण्यात आलं त्यांची न जगण्याची ईच्छा बघून हे साफ जाणवत होतं की त्यांना कुटुंबियांची फरफड दिसत होती त्यामुळे त्यांनी बऱ्याच शिफारशी वगैरे वगैरे पण केल्या की मला *स्वईच्छा मरण* वगैरे वगैरे त्याचं पुढे काय झालं कुठेच खबर नाही त्यांचा पुण्यात शोध घेतला सापडले नाही. असो जर एका सरकारी अधिकारी असलेल्या मनुष्यावर असली वेळ येत असेल आम्ही तुम्ही कुठे आहोत याचा विचार करणे आज गरजेचे झाले आहे असे नाही का वाटतं तुम्हाला?


मुळात काय तर चांगलं भाजीपाला फळे मिळत नाहीच त्यामुळे आजार आणि परिस्थिती नसणे खूप वाईट होऊन बसते मग त्यामुळे मला अस वाटतं तीळतीळ मारण्यापेक्षा एकदाचं काय ते *ईच्छा मरण* येऊन जावे आणि त्या  देहातील काही अवयव दान करावे असं केलं तर काही वावडं ठरणार नाही असं मला वाटतं.
पण मग याचा पण गैरफायदा उठवला जाऊ शकतो बाकी गोष्टींसारखा मग त्या साठी प्रतिबंधात्मक उपययोजना असाव्यात जसे की एखादी समिती करावी. त्या जो कोणी व्यक्ती असेल त्या कडून नोटरी करून घ्यावी त्यावर साक्षीदार घरचे असावेत म्हणजे भविष्यात जर त्याचे घरचे काही objection घेत असतील तर सबळ पुरावे असायला हवे ना.

मूळ म्हणजे मला वाटतं आपण या गोष्टीचा मुळाशी जाणं गरजेच आहे चांगलं खाणं (अर्थत ते भेटलंच तर भाग्यच म्हणावं) योग्य व्यायाम चालणे फिरणं राहणं शारीरिक स्वच्छता नानाविविध गोष्टींचा अभ्यास करून आपण स्वतःवर विजय किंवा अस म्हणता येईल प्रकृतीवर विजय मिळवण्यास यशस्वी ठरू.

शेवटी एवढंच सांगेन की *ईच्छा मरण* कायदा असावाच अस मला तरी मनापासून वाटतयं कारण परिस्थिती असहाय्य आणि दिवसांगणिक हतबल होत चालली आहे.

Source :- INTERNET
-जयंत जाधव,
लातूर

    जगातील अंतिम सत्य कोणते?त्याचे उत्तर मरण होय जीवनाचे अंतिम सत्य आहे.मरण कोणालाही नको असते.पण जो जीव जन्माला आला तो एक दिवस नष्ट होणारच आहे.
   "कळावे त्यालाही कसे असते जगणे क्षणाक्षणाला तिळतिळ मरणे  मुक्ती जीवनातून मिळेल की नाही मरणाला माझ्या न्याय मिळेल की नाही "
इच्छा मरण म्हणजे जेव्हा एखाद्या असाध्य आजारातून आणि त्याच्या त्रासातून मुक्ती मिळवण्याचा मृत्यू हाच एक उपाय उरतो तेव्हा रुग्णास त्याच्या इच्छे प्रमाणे मृत्यू देणे. असं करणारे आपल्या इच्छेने आपलं जीवन संपवतात. 'इच्छा मरण' ह्याला इंग्रजी मध्ये 'युथनेशिया' euthanasia  असे  म्हणतात.भारतात इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता नाही .सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच इच्छा मरणावर केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना नोटीसा पाठवून मत मागितले आहे.  जगात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढयाच देशात स्वित्झर्लंड, जपान, जर्मनी, अमेरिका या देशांमध्ये इच्छामरणाला कायदेशीर मान्यता मिळालेली आहे.
विषय हा आहे इच्छा मरण कायदा: प्रगत मानवाची गरज की अधोगती. माझ्या मते इच्छामरण ही प्रगत मानवाची गरज ठरलेली आहे.मी स्पष्ट पणे इच्छामरणाचा अधिकार असावा ह्या मताचा आहे.विज्ञानाच्या मदतीने मानव मरणाला लांबवू शकतो पण त्याच्या वर विजय मिळवू शकलेला नाही.ते शक्य पण नाही.निसर्गाच्या कार्यात मानवाने लुडबूड करु नये व शेवटीच जरी मानव मरणाला जिंकू शकला तो दिवस ह्या जगाचा शेवट ठरेल.
मी स्पष्ट पणे इच्छामरणाचा अधिकार असावा ह्या मताचा आहे.त्यासाठी पुढील उदाहरण महत्त्वाचे ठरते.मुंबईच्या रुग्णालयातील अरुणा शानबाग परिचारिकेवर बलात्कार करण्यात आला आणि 37 वर्षांपासून ती कोमात होती. तसेच रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकाच तिची सेवा करत होत्या.अशा  प्रकरणांमध्ये इच्छा मरण वैध मानले पाहिजे.यावर न्यायालयात व बाहेरच्या जगात  बराच वादविवाद झाला पण ठोस निर्णय झालाच नाही.शेवटी ईश्वरानेच दया करुन त्यांना नैसर्गिक मरण दिले.
दुसऱ्या एका प्रकरणात  (संदर्भ-प्रविण तांबे) एक जेष्ठ वृद्ध आजोबा  वय वर्षे ९० हे गेली दोन वर्षांहून जास्त काळ अंथरुणावर पडून आहेत.त्यांनी आयुष्य अगदी समाधानकारक जगले आहे व यापुढे त्यांना जगण्याची इच्छा नाही.आत्महत्या  त्यांना मान्य नाही.त्यांना मरण हवे आहे  पण कायदेशीर.जीवनात त्यांनी कायद्याला खूप महत्त्वाचे स्थान दिले.अशा वेळी इच्छामरणाचा अधिकार असावाच.
इच्छामरण देण्याचा कायदा अवश्य करा परंतु कुटुंबातील व्यक्तींच्या परवानगीसह अनेक कायदेशीर बाजू लक्षात घ्याव्यात.भारतामध्ये अनेक वृद्ध त्यांची शारीरिक क्षमता गमावून बसले आहेत.कुटुंबाने त्यांचेकडे लक्ष्य देऊनही त्यांना आत्मसन्मानाने जगता येत नाही.तर काही वृद्ध लोकांना कोणाचा आधारही नसतो.त्यातूनही दोघांपैकी एखादी व्यक्ती दगावल्यास एकटेपणा येउन चिडचिडे बनतात त्यातच आजारपण वैगेरे अनेक गोष्टींचा त्रास त्यांना होतो.अश्या लोकांसाठी हा कायदा अवश्य असावा.पण त्याचा गैरफायदा कुटुंबातील इतरांनी घेऊ नये यासाठी कायदेशीर बाजू तपासाल्या पाहिजे.
इच्छामरणाचा अधिकार असावा पण त्याची अंमलबजावणी किती योग्य  प्रमाणात होईल यात शंका आहेच.जर हा अधिकार दिला तो एक प्रकार खून करण्याचा परवाना तर ठरेल का? हा पुढील प्रश्न नक्कीच निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही.हे काळ ठरवेल पण एक नक्की आहे जिवंत सजीव माणसाला तडफडून मरण्यापेक्षा त्याच्या स्वेच्छेने मरण मिळालेले केव्हाही चांगले ठरेल. "What life is not supposed to be, but it should be good, or if it is a problem for ourselves and others to suffer, then such a world does not have meaning. Every person should have the right to accept dignity along with dignity."


Source :- INTERNET
-किरण पवार,
औरंगाबाद
         
     खरं तर इच्छा मरण कायदा असाही कायदा असतो किंवा असावा याची जाणीव मला आत्ताच झाली. मला तरी वाटत की, असा कायदा अमलात आणणे किंवा त्याबद्दल विचार करावा लागणे हीच मुळात खेदाची बाब आहे. *प्रगत माणूस नेमका इतका प्रगत कसा आणि केव्हा झाला की, जेणेकरुन निसर्गाच्या इतक्या महत्वपूर्ण भूमिकेतही तो हस्तक्षेप करू लागला. प्रांजळपणे मी एक गोष्ट मानतो की, इच्छा मरण कायदा ही बाब प्रगत माणसाची झालेली फार मोठी अधोगती आहे.*
                अडचणी, संघर्ष आणि तडजोडीच जगणं एवढं निरर्थक का वाटत? आपणच म्हणतो की, अडचणी जेवढ्या बलाढ्य तेवढंच जास्त उद्या आपल सामर्थ्य. आणि दुसरीकडे आम्ही विचार करतो कशाचा? तर इच्छा मरणाचा. मी तरी आजवर माणूस प्राणी सोडून इतर कुठल्याही प्राणीमात्राने किंवा पक्षाने इच्छा मरण स्विकारल्याच ऐकल नाही. तुम्ही म्हणाल माणूस हा वैचारिक दृष्ट्या सक्षम आहे. पण मी म्हणतो जिथे आपल्याला निसर्गाने ठरवलेल आयुर्मान दिल आहे ते कमी का करू पाहतो आहोत आपण. *समजा कायदा लागू झाला म्हणून उद्या मी इच्छा मरण स्वीकारल तर माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईच काय? किंवा मुल, पत्नी यांच काय?* त्यांचा यात काहीही दोष नव्हता.
             केवळ देशात आत्महत्येच प्रमाण वाढतंय आणि म्हणून आम्ही या कायद्याकडे आस लावून जगणार असू तर हा शुद्धपणे पोरकटपणा झाला. *सध्या सुशिक्षित समाजाच असं झालंय की, त्यांना नक्की जीवन काय आहे हेच माहित नाही.* चाकोरीबद्ध आयुष्य जगण आणि दुसर म्हणजे ताण आल्यावर हसणं एवढ आपल तोंडपाठ असत. आज प्रत्येकाला जवळपास 90% लोकांना जगण्यातली सहजता लक्षातच येत नाही. आणि म्हणूनच आम्हाला इच्छा मरण कायदा म्हणजे एक सुखाची वाट दिसतो.
                आजचा समाज वाचणं कमी करतो पण निर्णय मात्र एका सेकंदात घेऊन मोकळा होतो. *आणि ही त्याच्यातली उणीव आपण ही आजकालची पिढी किती फास्ट आहे, असं बोलून खपवतो.* फार काही तरी मोठ करायचंय म्हणजे खूप व्याप आणि अडचणीत गुंतत चाललोय हा समज आपल्याला छळतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी ह्रदयाला दिलासा द्यावा लागतो की, या गोष्टी फार शुल्लक आहेत. मी हे मान्य करतो की, वयस्कर व्यक्ती स्वत:ला असा दिलासा नाहीत देऊ शकत. पण अशा क्षणी इतर कुणीतरी ते नक्कीच करू शकतं. *काही वेळा काही गोष्टी घडण्यासाठी आयुष्य नाही तर एक क्षण पुरेसा असतो.*
                 माझ एवढंच म्हणणं आहे की, इच्छा मरण हा कायदा दुसऱ्या देशात कोणत्या तत्वांवर लागू करण्यात आला याच्याशी आपल काहीच देणंघेणं नाही. पण आपल्या देशात मात्र तो नको. कारण हा कायदा सरळपणे पळवाट आहे जे की, जीवणाच्या अंतिम सत्याला अनुसरून नाही. *कारण अंतिम सत्य मृत्यू होणे होय. तो स्वत:हुण करणे नाही.*
                 शेवटी एवढंच म्हणेन की, जर *निसर्गाने जन्म दिलाय ना तर त्याच्या मान ठेवून शेवटच्या श्वासापर्यंत बिनधास्त जगेण. मृत्यू येईल तेव्हा येवो. मी माझ कार्य तोवर करत राहो.*

Source:- INTERNET
-संजय साळुंके,
जळगाव

  'ज्याचं जळत , त्यालाच कळतं'.  जेव्हा सर्वांशी साधे सरळ , मनात काही न ठेवता , प्रामाणिकपणे वागूनही , चारही बाजूंनी संकट समोर येतात तेव्हा इच्छा मरणाचा कायदा असो किंवा नसो , काही फरक पडत नाही. सध्या वाढलेले आत्महत्याचे प्रमाण यावरून हेच दिसून येते. वंचितच नाही तर सक्षम व्यक्ती देखील आत्महत्या करण्यासाठी का प्रवृत्त होतात ? हल्लीच्या जगात मुखवटे घातलेले लोकच जास्त दिसत असल्याने संवेदनशील माणसाचं जगणं खूपच अवघड आहे. आपल्याशी तोंडावर अतिशय गोड बोलणारे , आपल्यावर  पाठीमागुन वार करण्यासाठी किती उत्सुक असतात हे लक्षात आलेवर साधेपणाने जगणं खूपच अवघड होते. एखादी मुलगी/ मुलगा पैशासाठी प्रेमाच नाटक करून लुबाडून घेतो व नंतर अधिक श्रीमंत  व्यक्तीवर प्रेम करताना दिसणं, भिकारी केविलवाणे तोंड करून जेवणासाठी भिक्षा मागतो व नंतर त्या पैशाची दारू पिताना दिसणं , कायद्याचा रक्षक कायदेशीर कामासाठी लाच मागताना दिसणं , आईवडील यांचेकडून आपल्याच  मुलांमध्ये भेदभावाची वागणूक मिळणं, पत्नी/ पति वर खुप प्रेम करुनही अचानक दुसऱ्या व्यक्ती सोबत नको त्या स्थितीत दिसून येणं इ . अनेक कारणं अशी आहे की संवेदनशील व्यक्तीला त्या क्षणी जगणं निरर्थक वाटतं. मग ईच्छा मरणाचा कायदा असो / नसो .आत्महत्या हा एकमेव पर्याय समोर दिसतो. नव्हे त्याक्षणी तोच योग्य पर्याय वाटतो . जगात सर्वत्र टिळा लावून गळा कापणारेच जास्त दिसून येतात. तत्वज्ञान दुसऱ्याला सांगणं खुप सोपं असतं, जेव्हा स्वतः वर वेळ येते तेव्हा तेच तत्वज्ञान निरर्थक वाटू लागते. त्यामुळे इच्छामरण कायदा प्रगत मानवाची गरज की अधोगती याचं उत्तर म्हणजे, अधोगती.

Source:- INTERNET
-पी.प्रशांतकुमार,
अहमदनगर

...कायदा हा शब्द वाचला की लगेच *कायद्यातील पळवाटा* हा शब्द डोळ्यांपुढे येतो पण हे आपलं दुर्दैव आहे..
...कुठलाही कायदा योग्य प्रकारे पाळला जाईल, त्याचा गैरफायदा, चुकीचा उपयोग होणार नाही हे यंत्रणेने पाहणं गरजेचं आहे .. आणि आपला समाज आणि कायदा राबवणाऱ्या यंत्रणा पहाता गैर उपयोग होणारच नाही या कायद्याचा अस म्हणणं चुकीचं ठरेल..
.....इच्छा मरण का हवं?कुणाला हवं ?..
हा काही आत्महत्या करण्याची परवानगी देणारा कायदा नाही.. जेव्हा रोगांनी/वेदनांनी शरीर जर्जर होत.. असह्य आणि कधीच बऱ्या न होऊ शकणाऱ्या रुग्णांना जेव्हा यातून सुटका हवी असते मृत्यू हा त्यांना आणि  आता या त्रासातून सुटका व्हावी मृत्यू हा मुक्ती वाटू लागतो तेव्हा नक्कीच इच्छामरण या संकल्पनेचा विचार व्हावा..
....अन्न पाणी यांचा त्याग करून जीवन संपवन या संकल्पना भारतात नवीन नाहीत. *समाधी मरण*, *प्रायोपवेशन* किंवा *संथारा* आदीचा वापर अनादी कालापासून होतोय..विनोबा भावे,सावरकर यांनीही जीवनासक्ती संपल्यावर खंगून अत्यावस्त अवस्थेत रुग्णशैय्येवर जगण्यापेक्षा मरणाचा स्वीकार केला.
....दुरुपयोग टाळल्यास आणि चांगला मसुदा आणल्यास हा कायदा योग्यच..खूप मरणशय्येवरचे रुग्ण हेच म्हणत असतात...
मौत तू एक कविता है
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको

डूबती नब्ज़ों में जब दर्द को नींद आने लगे
ज़र्द सा चेहरा लिये जब चांद उफक तक पहुँचे
        दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब
        ना अंधेरा ना उजाला हो, ना अभी रात ना दिन

जिस्म जब ख़त्म हो और रूह को जब साँस आऐ
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको
(गुलझार)

Source:- INTERNET
-आर. सागर,
सांगली

    आज विविध क्षेत्रांमध्ये मानवाने प्रगतीची शिखरे पादाक्रांत केली आहेत. पण तरीही मृत्यू कुणाला चुकला नाही. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू अटळ आहे आणि हेच अंतिम सत्य आहे. इच्छामरण म्हणजे तरी काय? तर आपल्या मृत्यूची वाट न बघता स्वइच्छेने मृत्यू स्वीकारणे. प्रश्न असा उरतो की 21व्या शतकात विज्ञानाने इतकी प्रगती केली असताना इच्छामरण कायदा खरंच गरजेचा आहे का?
.
खरंतर या प्रश्नावर प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं. पण मला असं वाटतं की अपवादात्मक (शासकीय भाषेत बोलायचं तर दुर्मिळातील दुर्मिळ) प्रकरणांमध्ये इच्छामरण स्वीकारायची तरतूद कायद्यात असावी. काही देशांमध्ये असा कायदा आहे पण आपल्याकडे अजून असा कुठलाही कायदा केला गेला नाही. पण तरीही काही घटना याबाबत विचार करायला भाग पाडतात.
.
अशीच एक घटना घडलेली अरुणा शानभाग यांच्याबाबत. 1973 पासून 2015 साली मृत्यू येईपर्यंत साधारणपणे 42 वर्षे त्या कोमात होत्या. श्वासोच्छवासापलीकडे स्वतः काहीही करणं अशक्य असताना आणि रक्ताच्या नातेवाईकांनी पाठ फिरवलेली असताना केईएम हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी 42 वर्षे त्यांचा सांभाळ केला ही खरं तर कौतुकाचीच गोष्ट. पण तरीही 42 वर्षे त्यांनी ज्या मरणयातना सहन केल्या त्याचं काय? अशा स्थितीत जेव्हा रुग्णाच्या परिस्थितीत काहीच सकारात्मक बदल होत नसेल किंवा भविष्यात काही सुधारणा व्हायची शक्यताच दिसत नसेल तर अशा व्यक्तीला इतकी वर्षे त्याच स्थितीत ठेवणं किती योग्य आहे? अशा स्थितीत इच्छामरणाची तरतूद का असू नये?


Source:- INTERNET
-संगीता देशमुख,
 वसमत,
 जि.हिंगोली

    आजचे जग विज्ञान आणि तंत्रज्ञानयुग आहे. आज कोणत्याही माणसाला कोणत्या क्षणी कुठला आजार उदभवेल, हे सांगता येत नाही. आजची जीवन जगण्याची पध्दत पाहिली तर माणूस आपल्या पोटात येनकेन प्रकारे वेगवेगळी रसायने आणि अनेक प्रकारची विष सोडत आहे. त्यामुळे पूर्वी दीर्घायुषी असलेला माणूस हा निरोगीच असायचा. किंबहुना तो निरोगी असल्यानेच दीर्घायुषी ठरायचा . परंतु आजची परिस्थिती अतिशय विपरीत आहे. आज गरोदरपणात आईच्या चुकीच्या आहार-व्यसनामुळे जन्माला आलेले मूलही कुठलातरी आजार घेऊन जन्माला येतो आहे. आजची जीवनमानपध्दती,व्यसनाधीनता यामुळे अगदी उमेदीच्या काळात,तारुण्यात अनेक तरुण गंभीर आजाराला सामोरे जात आहेत. आज तंत्रज्ञानाच्या आधारे व औषधोपचारामुळे हे तरुण दीर्घायुषी ठरत आहेत,पण त्यासोबतच एक कटू सत्य हे आहे की, ते निरोगी नाहीत. अशी अनेक श्रीमंत,सधन कुटुंबातील व्यक्ती दुर्धर आजाराने वर्षानुवर्षे पिडीत आहेत. या औषधोपचाराने माणसाचे आयुष्य वाढत आहे,पण तो आजार सुसह्यच असेल,याची मात्र शाश्वती नाही. म्हणून आज अशी अंथरुणाला खिळून असलेले आणि मरणाची वाट पहाणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक फारमोठ्या प्रमाणात आपल्याला पहायला मिळतात. यातून पुढचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे इच्छामरण आणि दयामरण याचा!
                   इच्छामरण आणि दयामरण यात फरक आहे. इच्छामरण हे स्वतःहून स्वतःसाठी मागितलेले मरण आहे तर दयामरण हे दुसऱ्याने दिलेले मरण आहे. अरुणा शानभाग ह्या  जवळपास चाळीस वर्षे कोमातच अंथरुणाला खिळून होत्या. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी अरुणा शानभागच्या दयामरणासाठी अर्ज केला होता. तिथे इच्छामरण नव्हते. आणि नारायण लवाटे यांनी वयाच्या ८८व्या वर्षी तर  इरावती लवाटे यांनी वयाच्या ७८व्या वर्षी  या दांपत्याने इच्छामरणासाठी अर्ज केला होता. इच्छामरण की दयामरण हाही विचार केला तर इच्छामरण म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर आत्महत्या आणि दयामरण म्हणजे खून!  त्यामुळे इच्छामरणाचा कायदा झाला तर या कायद्याचा गैरवापरच जास्त प्रमाणात होईल. आज समाजातील संवेदनशीलता हरवल्याचे दाखले पावलोपावली मिळतात. जन्मदात्या आईवडिलांनाच वृध्दाश्रमामध्ये ठेवण्याचे प्रमाण अतिशय जास्त आहे. बऱ्याचदा अशा प्रकारामुळे  त्या मुलाची समाजात निंदाही होते,तरीसुद्धा तो हा प्रकार करतो. आणि विचार करा,जर असा कायदा संमत झाला तर याच कायद्याच्या आधाराने दयामरणाच्या नावाने  अशीच मंडळी आईवडिलांचे जीवन संपवणार नाही कशावरून? कारण आपल्या देशाची शोकांतिका ही आहे की,आपल्या देशात कायद्याचा उपयोग होण्याऐवजी दुरुपयोगच जास्त होतो,हा इतिहास आहे.
          मानवी जीवन खूप सुंदर आहे. पूर्वी औषधोपचाराच्या अभावामुळे लोकांना मृत्यू लवकरच यायचा. परंतु आज विज्ञान आणि तंत्रज्ञान एवढे प्रगत आहे की,प्रत्येक आजारावर निश्चित असा इलाज आहे. असे असतांना मरणाची इच्छा करणे,थोडे गैर वाटत नाही का? आपण त्या रुग्णाच्या वेदनांचा विचार करून इच्छामरणाचा विचार करत असू तर एकदा याही बाबीचा विचार व्हायला हवा की,आज जगात इतके दारिद्र्य आहे की,लोकं भीक मागून रस्त्याच्या काठावर,पुलाखाली राहून जीवन जगतात.एवढेच नाही तर काहीजणांना इतके अपंगत्व आहे की,जन्मापासून अशा व्यक्ती परावलंबी असतात. अशा अपंग व्यक्ती दारिद्र्यातही रस्त्याने फरकटत फरकटत भीक मागून आयुष्य जगणारी लोकं पाहिली की  असं वाटतं,मानवामध्ये जगण्याची किती उमेद आहे! त्याच्या जीवनात काहीच सुंदर नसेल पण त्याला जगातील सुंदरता पहायची असेल!  वंचिताचे,अभावाचे जीवन जगताना अशी अनेक लोकं दिसतात. त्यावेळी मनात विचार येतो,प्रत्येक माणसाला जीवन जगण्याचा खरचं अधिकार आहे. आणि असाही मानवाला निसर्गाच्या विरोधात जाण्याचा काय अधिकार आहे? जन्म कुठे घ्यावा,हे जसे आपल्या हातात नाही,तसेच मृत्यू कसा यावा,हेही आपल्या हातात नाही. मग निसर्गनियमानुसार जीवन जगण्यास काय हरकत आहे?एका परिचयाच्या दांपत्याला  मतिमंद एकुलती एक  मुलगी आहे. आज ती बारा वर्षाची आहे. तिची तब्येत वारंवार बिघडते.ती कितीही  आजारी असो आजही तिचे आईवडील तिला ताबडतोब इलाज करतात. त्यांना असं वाटतं कीअपंग का असेना तिने आम्हाला मातृत्व,पितृत्व दिले. तिच्यामुळे आमच्यावरचा वांझपणाचा ठपका पुसल्या गेला. ती मुलगी स्वतंत्र जीवन जगूच शकत नाही,हे माहीत असतानाही   असे पालक दयामरणाच्या कायद्याचा वापर करतील का?  अरुणा शानभागच्या नातेवाईकांनी तिच्या दयामरणासाठी अर्ज केला असला तरी तिच्याच सहकाऱ्यांनी मात्र तसा त्यांना अधिकार देण्यात येऊ नये म्हणून विनंतीअर्ज केला होता. अरुणा शानभाग शुध्दीवर येणारच नव्हती,हे माहीत असताना देखील त्यांची प्रिय व्यक्ती त्यांच्या डोळ्यासमोर रहाणार,याचेच समाधान त्यांना होते. खरेतर अरुणा शानभागच्या आयुष्याकडे पाहिले की,सुरेश भटांच्या ओळी आठवतात,
"सरणावर जाताना मला इतकेच कळले होते,
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते."
     असे असले तरी,हे जग खूप सुंदर आहे आणि ते जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि आजूबाजूचा नात्यात वाढत चाललेला दुरावा,स्वार्थ पाहिला की,असे वाटते,या कायद्याचा दुरुपयोगच जास्त होईल.म्हणून इच्छामरण कायदा हा नैतिकदृष्ट्या अधोगतीकडेच नेणारा ठरेल .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************