येणारी पिढी विद्यार्थी किती परीक्षार्थी किती?

🌱वि४ 🌿या व्हॉटसअप ग्रुप वरून
Source: INTERNET

येणारी पिढी विद्यार्थी किती परीक्षार्थी किती?

दत्तात्रय डोईफोडे , वाशिम:

विषय खूप महत्वाचा आहे, कारण प्रत्येक माणूस हा विद्यार्थी दशेतून जाणारा असतोच म्हणूनच या विषयाचे गांभीर्य वाढतेच...

    सर्वांना माहिती आहे वेळेनुसार बदलले नाही तर वेळ बदलण्याची दुसरी संधी मिळत नाही, कारण वेळ कधीच कुणासाठी कुणीतरी थांबत नाही. तसाच बदल आजच्या शिक्षणातही पाहायला मिळतो, साहजिकच आहे परीक्षा पद्धतीतही...

आज गुण, टक्केवारी, ग्रेड यांना तर फार म्हणजे खूपच महत्त्व आले आहे, याचे कारण समाजाची बदललेली मानसिकता...

आज याच सामाजिक मानसिकतेमुळे मुलांना विद्यार्थी आणि मुल म्हणून डबल किंमत मोजावी लागत आहे ती कशी, उदा. प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता वेगवेगळी असते पण प्रत्येक शिक्षकाला आपला विद्यार्थी आणि प्रत्येक पालकाला आपले मुलाने आइन्स्टाईन असले पाहिजे असेच वाटते...

स्पर्धा चालली आहे आज, पण या स्पर्धेत काही मुल विनाकारण लोटली जातात आणि त्यांचं पुढं काय होत हे आपल्याला माहिती आहेच कारण आपण तेवढे जाणते आहात..!

शेवटी माझ्या मते आजची पिढी परीक्षार्थी ज्यास्त आणि विद्यार्थी कमी असलेली आहे...
Source: INTERNET
पी.  प्रशांतकुमार , अहमदनगर:

...सर समजा H2SO4 मधे HCL मिसळलं तर काय होईल... गप बस काहीही विचारू नको असले प्रश्न परीक्षेत येत नाही..
.. मला वाटत सध्या येणाऱ्या मार्कांच्या पुरात आपण मुलांना परीक्षार्थीच बनवतोय.. अगदी महत्वाची 12ची शेवटची परीक्षा/CA वा MBBS तत्सम परीक्षेत वेळ,मार्क आदींचा विचार करून एखादं टॉपिक option ला टाकला तर एकवेळ समजू शकतो पण आता तर दुसरी/चौथी पासूनच अस होताना दिसतंय..
... त्या विषयाच्या अभ्यासावर वेळ नका घालवू ? हे तिसरीच्या मुलांना? .. आपण सगळेच रॅट रेसचे भागीदार .. आणि मग हुशार पण काही कारणाने लेखी परीक्षेत कमी मार्क पडणाऱयांवर *माठा* हा शिक्का उमठवण्यास उत्सुक.. इतके की खरोखरच तो मागे पडावा..
.....
......आवांतर वाचन आणि अभ्यास जो कदाचित परीक्षेत येईल अथवा नाही पण त्यामुळेच मुलांची प्रगती होते.. 
...स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा /होमी भाभा विज्ञान /NEET आदींच्या निकालात आपल्याला दिसत की ज्यांना आपण खूप हुशार समजतो ते बऱ्याचदा मागे पडतात आणि अनपेक्षित चमकतात..
....आपण दहावी पर्यंत मार्कांसाठी मुलांना भरपूर छळतो आणि नन्तर समजत ..तसा दहावीच्या मार्कंना तर काहीच अर्थ नाही.. त्याऐवजी तुझ्या सर्व concept clear असू देत..विषय पूर्ण समजून घे मग भले चार-दोन मार्क इकडे तिकडे होऊ देत अस म्हटलं तर..पण आपण विषयाचा आनंदच घेऊ देत नाही लगेच तुलना..त्याला बघ इतके पडले ह्याला बघ तीतके पडले...
.....काही असतात पहिलीपासून एक नंबर ते शेवटपर्यंत..
..उलट माझे एक दोन मित्र.. 
..पहिला आज biotec/नॅनोटेक मधे PhD..पण शाळेत सामान्य 60% वाला.. मजेत म्हणतो..परीक्षांचे मार्क्स,कमी पडल्याने मिळणारे बोलणे/टोमणे त्यांनी कधी विषयाची आवडच लागू दिली नाही..पर्याय नाही म्हणून Bsc करत असताना त्या सरांनी सखोल शिकवताना परीक्षेच्या syllabus बाहेरच knowlege दिलं आणि आयुष्यच बदलून गेलं..
तर दुसरा गणितात आणि सायन्समधे हुशार पण भाषा विषय आवडायचेच नाहीत 50-60%त्यामुळे शाळेत.. सो-सो हा शिक्का .. आज IIT मधे पहिला आलाय..आज वैज्ञानिक आहे DRDOत
... त्याला भाषा विषयांच शास्त्र कधीच कळलं नाही पण शास्त्राची भाषा नेमकी समजायची.. आणि हे त्याच्या घरच्यांनीही ओळखलं व त्याला विद्यार्थीच राहू दिलं.. त्याला syllabus बाहेरचे प्रश्न पडायचे आणि घरचे त्याची उत्तर शोधायला वेळ घालवू द्यायचे

...मला वाटत आपण मुलांचा नियमित आढावा घ्यायला पाहिजे मुलांच्या प्रगतीचा त्यांच्या आवडींचा काय किती समजतंय.. काय काय आणि का समजत नाही याचा
...पालक म्हणून वावरताना आपण सगळेच मुलं विद्यार्थीच असावेत अशाच मतांचे असतो पण गर्दीत/शर्यतीत आपण कधी त्यांना परीक्षार्थी बनवत जातो हे त्यांनाही समजत नाही आणि आपल्यालाही..

   Source: INTERNET
वैशाली पंडित , हिंगोली :

प्रथमतः विद्यार्थी आणि परीक्षार्थी यांच्यातील साम्य आणि भेद काय याचा विचार केला पाहिजे. परीक्षा आणि विद्यार्थी यांचा अतिशय निकटचा संबंध आहे. कारण विद्यार्थी म्हणजे शाळेत शिकणारा आणि शाळा म्हटलं की परीक्षा आलीच, परंतु नाण्याची दुसरी बाजू अशी की, विद्यार्थी म्हणजे केवळ परीक्षा देणारा नव्हे,, मनुष्य हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो असे म्हटले जाते. माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि तो चुका करत जातो आणि स्वतःच्या चुकांमधून शिकत असतो.
        सद्यस्थितीला मात्र परिस्थितीत फारच परिवर्तन घडून आलेले दिसते." विद्यार्थी म्हणजे केवळ परीक्षार्थी नव्हे "मात्र आजची पिढी ही गोष्ट समजायलाच तयार नाही .आज विद्यार्थी म्हंट्लं की परीक्षा आणि स्पर्धा असं समीकरण तयार झालं आहे.
           आजच्या पिढीच्या मुलांना विद्यार्थी बनवण्यापेक्षा परीक्षार्थी बनविण्यावर पालकांचा जास्त भर असतो. आजकाल कोणीही स्वतःच्या मुलाला विद्यार्थी बनू इच्छित नाही ते केवळ परीक्षार्थी  घडवू इच्छितात. त्यांच्या मध्ये असलेला विद्यार्थी हा बालवाडीत असतानाच मारून टाकला जातो आणि मग बालवाडी पासूनच चालू होते ते त्यांच्या "मिशन परीक्षार्थी" प्रशिक्षणाची सुरुवात .हा प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रचंड खडतर असतो. कारण त्यामध्ये त्यांच्या मध्ये असलेल्या सुप्त गुणांना ,छंदाला ,आणि आवडीनिवडींना वाव मिळत नाही. आणि नावडत्या क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे त्यांची गुणवत्ता ढासळू लागते.
        या देशात केवळ  परीक्षार्थीच नाही ,तर विद्यार्थ्यांची गरज आहे त्यामुळे पालकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांनी स्वतःच्या मुलाला विद्यार्थी घडवलं पाहिजे एक चांगला विद्यार्थी केवळ परीक्षार्थी च बनत नाही तर परीक्षा पासही  करू शकतो .
       आजच्या घडीला विद्यार्थी कमी आणि परीक्षार्थीच जास्त आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याला फक्त परीक्षार्थीच न बनवता विद्यार्थी बनविले पाहिजे.
     
Source: INTERNET
राज इनामदार , पंढरपूर:
गुरूकुलातील तीन शिष्य आपल शिक्षण पूर्ण करून जंगलामधून चालले होते .आतपर्यंत जे काही शिकले अनुभवलें या सर्व विषयानवरती त्यांची चर्चा , विचारविनिमय चालू होता . गोड आठवनीना उजाळा देत निघाले .सूर्यही आता हळुहळु मावळतीकडे चालला होता .
 वाटेत नदी,  दऱ्या -खोऱ्या लागत होत्या ..यातूनच अशा घनदाट जंगलातुन चालत असताना , एका झाडाखाली त्यांना एक हाडाचा सापळा दिसला .ते तिघेही त्या हाडाच्या सापळयाजवळ गेले .त्या तिघांनपैकी एक जण म्हणाला मी माझ्या विधेच्या जोरावर हे सांगू शकतो की हा सापळा सिंहाचा आहे .  ....आता दुसरा शिष्य म्हणाला मी माझ्या विधेच्या जोरावर हा मेलेला सिंह जिवंत करतो व तो मंत्र वगैरे पुटपुटु लागला . .....तिसरा शिष्य जो होता तो पटकन धावत जावून झाडावर चडुन बसला .
   आता इकडे सिंह जिवंत झाला व त्याने त्या दोघांजणांना फाडून टाकले .
  आता मला सांगा मित्रांनो अशीच अवस्था आजकालच्या विद्यार्थीनची आहे .कारण ते खूप शिकतील पण नेमकं शिक्षण वापरायच कुठं हेच त्यांना समजत नाहीये .
 याला कारण म्हणजे जे शिक्षण शिकून आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण करायला हवा होता नेमका तोच करायला विसरलो .आणी आयुष्यभर फक्त गुणांचा (मार्क्सच्या  ) माघे धावत सुटलो .
        त्यामुळे आमचे  मार्क्स वाढले .आमचे कॉलिफिकेशन ही वाढल मात्र आमचे ज्ञान निघुन गेल.  आम्ही अध्ययन करतांना परीक्षाला विचारनर्या गोष्टीकडे लक्ष्य देवू लागलो.   समजून न घेता फक्त घोकमपट्टी करू लागलो .त्यामुळे आमचे घर .पुल , मोठ्या इमारती उद्घाटन होण्याआधीच पडू लागले .
आज जर शहरातून मुलगा शिकून घरी आल्यावर बापाला मुलाला तांब्या भरून दयावा लागत असेल तर इथेच आम्हीं फक्त आणी फक्त परीक्षार्थी आहोत हे म्हणावं लागेल .


Source: INTERNET
कृष्णकांत राईलकर , डहाणू ,पालघर :

खरोखरच आजची स्पर्धा बघून गुंग होते मती।

फक्त गुणांच्याच मागे विद्यार्थी मित्र फरफटती।

गुणात्मक दर्जाच्या नावाने आहे का हो प्रगती?

डॉ./ईंजिनियरचे बालपणापासून स्वप्ने बघती।

नव्हे नव्हे !पालक बालकांच्या माथीच मारती।

मात्रुभाषा सोडून आंग्ल भाषेतच शिक्षण घेती।

कळेल का हो कधी  त्यांना भारताची संस्कृती?

जरी पाठांतर,घोकंपट्टीने तर खुप गुण मिळती।

पण तेच प्रश्न उलट करता मात्र होतेय फजिती।

पोपटपंची करून परिक्षेत मेरिटलिस्टमधे येती।

पण जिवनाच्या परिक्षेच्यावेळी मात्र डगमगती।

त्यातही इंटरनेटच्या जाळ्यात किती सापडती।

विज्ञान युगाच्या नावाने जणू पावतीच फाडती।

शिक्षणसम्राट ही आपली दुकाने थाटून बसती।

व सरकारी शाळांकडे पालकच पाठ फिरविती।

अश्याने शिक्षणक्षेत्रात भले होईल खुप प्रगती।

"तो"विद्यार्थी न राहाता फक्त बनतोय परिक्षार्थी।

जयंत जाधव , लातूर :
भारताचे भविष्य खरेच उज्जवल बनवायचे असेल तर येणारी पिढी ही ख-या अर्थाने विद्यार्थी असली पाहिजे. विद्यार्थी सतत अभ्यास करुन ज्ञान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतो व ज्ञानार्थी बनतो.प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासूवृत्तीने पाहणे हे खरे तर विद्यार्थी असतात,पण आपली शिक्षणपध्दती त्यांना परिक्षार्थी बनविण्याकडे जास्तीत जास्त कल दिसून येतो.

‎आई-वडिलांचे मुलांवरील अपेक्षा खूप वाढल्या आहेत.ह्या अपेक्षांच्या ओझ्याखाली ज्ञान कुठेतरी हरवले आहे.आज आयुष्यात जवळपास सर्वच ठिकाणी परीक्षेला तोंड द्यावे लागत असल्यामुळे ज्ञानाचा मुळ हेतू पासून लांब गेल्याचे दिसून येते. सध्याची  पिढी अशाने फक्त पुस्तकी किडा बनली आहे.म्हणूनच ह्या पिढीला व्यवहार ज्ञान म्हणून त्यांच्यासाठी किस चिडियाँ का नाम हैं? अलीकडील उदाहरण पाहा ना,बँकेत गेल्यानंतर पदवीधर पास झालेल्या युवकांना खात्यात पैसे जमा करणे किंवा काढणे इत्यादी सोपे कामे देखील जमत नाही.
व्यवहार ज्ञान नसल्यामुळे येणारी पिढी स्पर्धा युगात कसा काय टिकाव धरतील.जसे झाडांची मुळे माती वाहून गेली की उमळून पडतात अगदी तसेच.
आजच्या घडीला शिक्षणाच्या झालेल्या  बाजारीकरणात विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देणे आवश्यक झाले आहे. पाण्यात पडले की जीव वाचवायची धडपड व्यक्तीला पोहणे शिकवते अगदी तसेच गरजेतून ज्ञान मिळते.त्यासाठी  मुलांच्या कला-गुणांना वाव दिला पाहिजे.
थोडक्यात माझ्या मते,It is important to be aware that not only to teach your child to get a degree, but to realize the fluctuations in life and struggle to face conflict. When the student realizes this, he will become a knowledgeable student only if he becomes aware of it.

   Source: INTERNET
समीर सरागे , नेर , यवतमाळ:
विद्यार्थी हा राष्ट्राचा आधार  स्तंभ असतो ,देशाचा मान ,सन्मान ,गौरव यांच्यावरच आधारित असते , कोणत्याही राष्ट्राची नीति ,अवनीति या विद्यर्थां वरच अवलंबून असते.कारण हेच विद्यार्थी देशाचे भविष्य घडवितात तसेच पुढच्या पीढ़ी करिता एक आदर्श आणि प्रेरणा देखील असतात.


विद्यार्थी जीवनात आपल्यावर अनेक प्रभाव पडलेले दिसुन येतात, 
कारण याच वयात चांगल्या वाईट गोष्टी आत्मसात होत असतात. ते म्हणजे  स्वत: प्रति, कुटुंबा प्रति, समाजा प्रति  पर्यायाने देशा प्रति, धड़पडण्याची जिद्द आणि समाजात स्वतःचे एक आदर्श व्यक्तिमत्व प्रस्थापित करणे किंवा समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम हे विद्यर्थांचे असते कारण की कोणताही थोर महापुरुष जेंव्हा घड़तो तेव्हा त्यांच्या विद्यार्थी दशेतच त्यांना एक असीम प्रेरणा मिळाली असते आणि  या काळात त्यांच्यावर झालेले   संस्कार ,सोपस्कार देखील महत्वाची भूमिका बजवतात त्या करिता आपल्याला  बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज ,लालबहादुर शास्त्री, सुभाष चंद्र बोस वीर सावरकर इत्यादि उदाहरण देता येईल. 

परंतु अलीकडे विद्यर्थी कसा घडवा , कसा असावा , जेने करून तो या देशाच्या येणाऱ्या पिढीला रष्ट्रवाद , देशसेवा , सामाजिक बंधीलकि, दायित्व इत्यादि बाबी शिकवेल परंतु असल्या गोष्टी पाठ्यपुस्तका मध्ये समाविष्ट केल्या जात नाही कारण की , आजचे शिक्षण हे स्पर्धे वर आधारित आहे  (रेस का घोड़ा आपन ज्याला म्हणतो ) म्हणजे मुलाने इंजीनिअर , डॉक्टर, MBA व्हावे , एखाद्या  आईटी कंपनी मध्ये गले लट्ठ पगाराचा जॉब करावा आणि आपली लाइफ सेटल करून घ्यावी ईथ पर्यंत आजच्या पालकांची मानसिकता होऊन बसली आहे.केवळ एकच ध्येय,जिद्द, धडपड अलीकडे पालकां मध्येमोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे. अगदी मुलगा बालवायात असल्या पासुनच त्याचे मागे विविध बाबीचा ससेमीरा पालकां मार्फ़त लावल्या जातो बालवायतच विविध विषयाच्या शिकविन्या ,टेस्ट, वैगरे आणि तुला मोठ झाले की या शाळे मध्ये दाखला घ्यवयाचा आहे अमुक अमुक क्षेत्रात करीयर करावयाचे आहे म्हणजे त्याला इतके गुतवून टाकतात, तो  एकवेळ संभ्रमात पडतो की त्याला स्वता क़ाय करायचे म्हणजे इतके अपेक्षाचे ओझे त्याच्या डोक्यावर असते आणि हेच ओझे घेऊन तो सतत जगत असतो परिणामी पालकांच्या अपेक्षस न उतरल्यास भिती पोटी मुले आत्महत्याचा मार्ग स्वीकारतात एकवेळ अशी येते की त्याला आपली जीवन यात्रा संपववि लागते परंतु सर्वच  मुले काही अशे नसतात कोणी उत्तुंग शिखरे गाठुन यश पदक्रांत करतात  विपरीत परिस्थितिवर मात करून यशस्वी होतात .आणि  यातिलच काही आपल्याच पालका पासून परिवारा पासून कायमची दूर जातात अशे बरेचसे उदा.आपल्याला देता येईल. 

अलीकडे स्पर्धेचे युग आहे.स्पर्धा असली पाहिजे ती आजची काळाची गरज आहे, स्पर्धेमुळे  दर्जा सुधारतो, गुणवत्ता सुधारते  त्यामध्ये दुमत नाही. या उलट स्पर्धेच्या या युगात विद्यार्थ्या एवजी केवळ परीक्षार्थी उरलेले आहेत.   विपरीत परिणाम त्याच पालकाना व त्या समाजाला देखील भोगावा लागतो आहे. ज्यांची मुले कायम स्वरूपी परदेशी स्थाईक झाली आणि वृद्ध आई -वडिलांना एकटे सोडून गेलीत किंवा थोडीफ़ार समृद्ध होऊन परिवारा पासून विभक्त झालेत. मग क़ाय कामाचे आपले शिक्षण ?  म्हणून या बरोबर आपले सामाजिक दायित्व आणि सामाजिक मूल्य जपने देखील गरजेचे आहे म्हणून याविद्यर्थी म्हणजे विद्या ग्रहण करणे त्याच बरोबर चांगल्या सुसंस्कारिक बाबी आत्मसात करणे होय या करिता बालपनीच तसेच विद्यर्थी दशेतच मुलांवर चांगले सुसंस्कार झाले पाहिजेत
नाही तर भारत तेरे टुकड़े होंगे म्हणनारे देखील विद्यर्थिच आहेत जे या देशालाच संपविन्याचे स्वप्न बघतात ,परंतु फरक आहे तो सोपस्कार संस्कार आणि संगतिचा .
Source: INTERNET
R.सागर , आमणापूर , सांगली :

शिक्षण आणि परीक्षा या आपल्या शिक्षणव्यवस्थेतल्या एकाच नाण्याच्या दोन बाजू.. शिकायचं म्हणजे परीक्षा द्यायला लागणार अन् एखाद्या विषयाची परीक्षा द्यायची म्हटल्यावर आधी त्या विषयाबद्दल शिकायला लागणार. त्या विषयाचा अभ्यास करायला लागणार. साधारणपणे आपण सगळे याच परिस्थितीतून गेलोय. पण तरीही आपल्या काळाशी तुलना करत असताना एक प्रश्न नक्कीच सतावतो.. आजची पिढी किंवा येणारी पिढी खरंच विद्यार्थी आहे का? की फक्त परिक्षार्थीच आहे?

आपला पाल्य हुशार असावा, तो नेहमी प्रथम क्रमांकाने पास व्हावा ही प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी-सुविधा पुरवण्यासाठी पालकांची धडपड सुरू असते. त्यांचीही अपेक्षा व्यर्थ आहे असं नाही म्हणता येणार. कारण आपल्याला आवश्यक त्या सोयी-सुविधा मिळाल्या नाहीत त्यामुळे आपण शिकू शकलो नाही या गोष्टीची खंत बऱ्याच जणांना असते. आपल्या राहिलेल्या इच्छा आपल्या मुलांनी पूर्ण कराव्यात ह्यासाठी ते धडपडत असतात. आपल्याला जो संघर्ष करावा लागला तो आपल्या मुलांना करावा लागू नये, त्यांनी चांगलं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहावं ही तळमळदेखील त्यापाठीमागे असते. त्यातूनच सुरू होते स्पर्धा.. आणि इथूनच विद्यार्थ्याचा परीक्षार्थी बनण्याची/बनवण्याचीदेखील सुरुवात होते.

एखादा विद्यार्थी शिकत असतो, प्रत्येक परीक्षेत यशस्वी होत असतो पण जे काही शिक्षण घेतलं असेल त्याचा व्यवहारात वापरच करता येत नसेल तर त्या शिक्षणाचा उपयोग शून्यच. म्हणूनच तर काही वेळा 90 टक्के मिळवणारा मागे राहतो आणि 70 टक्केवाला त्याच्या पुढे जातो.
बँकेत काम करत असताना गेल्या दीड-दोन वर्षात ही गोष्ट प्रकर्षानं जाणवतेय. आमच्याकडे येणारे बरेच ग्राहक अगदी 10वी, 12वी किंवा फारतर पदवीपर्यंत शिकलेले असतात. तेवढ्या शिक्षणावर ते एखादी कंपनी चालवत असतात. आणि 80-90 टक्के गुण मिळवून इंजिनीअर वगैरे झालेली मुलं त्यांच्या ऑफिसमध्ये नोकरी करत असतात. याचं कारण एकच. ज्यावेळी ही मुलं परीक्षार्थी बनून गुण मिळवण्याच्या स्पर्धेत धावत असतात त्यावेळी आताचे त्यांचे बॉस खरेखुरे विद्यार्थी बनून बाहेरच्या जगातले व्यवहार शिकत असतात..
.
येणाऱ्या पिढीबद्दल तर काय बोलणार? अगदी लहान वयातच त्यांचं बालपण हिरावून घेत त्यांच्याकडून अपेक्षा ठेवल्या जातात. जिथं मूल अजून आपल्या मातृभाषेशी एकरूप झालेलं नसतं तिथं त्याला शालेय प्रवेशासाठी परिक्षा द्यावी लागते. आणि अगदी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून सुरू होणारी परीक्षा शिक्षण पूर्ण होऊन नोकरी मिळेपर्यंत सुरूच असते.. प्रत्येक वेळी परिक्षेचीच चिंता आणि प्रत्येक क्षण परिक्षेचाच.. मुलांना यातून बाहेर काढून ते विद्यार्थी कसे बनतील हे बघायला पाहिजे.. पण हे विद्यार्थी घडवण्यापूर्वी त्यासाठी आवश्यक असणारे शिक्षक घडायला हवेत. नाहीतर उद्या आपणच पालकांच्या भूमिकेत असू आणि आपल्या घरी अजून एक पिढी असेल परिक्षार्थींची.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************