गांधीजींच्या चष्म्यातून सत्तरी मधला भारत


गांधीजींच्या चष्म्यातून सत्तरी मधला भारत

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

गांधीजींच्या चष्म्यातून सत्तरी मधला भारत


Source:INTERNET

-पी प्रशांतकुमार
 अहमदनगर

 वय 70 वर्ष .. अस म्हणतात गीता ऐकली तेव्हा अर्जुन 70-75वर्षांचा होता.. माहीत नाही पण तसा विचार करता 70 वर्षांचा देश तरुणच म्हणावा लागेल..
....गांधीजींच्या चष्म्यातून पाहायचं ठरवलं तर किती बदल झाले काय बदल झाले सगळं दिसेल..
... स्मार्ट सिटीच्या घोषणात खेडी तेव्हा होती तशीच आजही मागास दिसतील..वीज, पाणी आणि इतर काही सुविधा पोहचल्याही असतील पण गांधींच्या विचारातली स्वयंपूर्ण खेडी..आर्थिक दृष्टया विकसित खेडी फारशी दिसत नाही. स्वयंपूर्ण खेडी यादी करायची ठरवली तर आमच्या नगरच्या हिवरे बाजार आणि राळेगण सिद्धी आणि यादी संपली..
....होय शिक्षण/आरोग्य या बाबतीत प्रगती आहे पण शहरांकडे वाहणारा ओघ कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसतो.. आणि 70 वर्षांनंतर ही तो थांबत नाही ही वस्तुस्थिती कष्टदायक आहे..आताच सरकार काही ब्रिटिशांसारखं शत्रूच नाही तरीही महानगर-नगर आणि खेडी यात दरी वाढताना का दिसते?
...स्वच्छता हा गांधीजींचा आवडता विषय..चला स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने गांधींचा चष्मा आणि स्वच्छतेची निकड या गोष्टी तरी प्रकाशात आल्या ...
...आणखी महत्वाच ते म्हणजे ऐक्य ..
*ईश्वर अल्ला तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान*
गांधीजींचं आवडत भजन ..आणि आजही त्याची तेव्हडीच गरज आहे ..नौखालीत जातीय दंगली थांबवण्यासाठी जे कष्ट घेतले..आज कुणी तरी घ्यावेत..दरी मोठी होताना दिसते..
...हिंदू-मुस्लिम, सवर्ण-दलित , असले धर्मातले, जातीतले समाजातले तेढ दिसले तर त्या चष्म्यामागचे डोळे नक्कीच भरून येतील.. ते हेच म्हणतील,
*हम लाए हैं तूफ़ान से कश्ती निकाल के*
*इस देश को रखना मेरे बच्चों सम्भाल के*
*तुम ही भविष्य हो मेरे भारत विशाल के*
*इस देश को रखना मेरे बच्चों सम्भाल के*



Source: INTERNET

-अक्षय पतंगे
 हिंगोली

संशोधक आईनस्टाइन म.गांधीजींबद्दल म्हणतो, "हा हाडामांसाचा माणूस या भूतलावर होऊन गेला यावर येणाऱ्या पिढयांचा विश्वास बसणार नाही." खरंच ते काल जेवढे कालसुसंगत होते त्यापेक्षा जास्त आज कालसुसंगत आहेत. हा माणूस कोणत्याही साच्यात बंदीस्त करता येणार नाही. सर्वधर्म प्रार्थनेला त्यांनी प्राधान्यक्रम दिला. मानवसेवा हीचं ईश्वराची उपासना आहे हे सांगितले. पद-प्रतिष्ठेपेक्षा आयुष्यभर 'कॉमन मॅन' राहीले.. पण बुद्ध, महावीरांच्या सत्य अन् अहिंसेच्या तत्वज्ञानावर संघटन उभं करणारा हा माणूस uncommon man होता. ते म्हणतात, 'तुम्हाला निरपेक्ष सेवा करायची तर तुमच्या आयुष्यात तुम्ही पाहिलेला सर्वांत दुःखी माणसाचा चेहरा डोळ्यासमोर आठवून काम करा' ना कुणाला लाभार्थी बनवलं ना कधी स्वतः लाभाचं पद घेतलं. शिक्षणात त्यांनी नई तालीमची म्हणजे hand, head, heart या जीवनमुल्यांची मांडणी केली. आर्थिक समानतेचा पुरस्कार करत सर्वोदय संकल्पनेची पायाभरणी करणाऱ्या गांधीजींच्या देशाचा सध्या जागतिक आर्थिक विषमतेच्या क्रमवारीत ६२ वा नंबर लागतो. सामान्य लोकांच्या वेदनेला न्याय देत असतांना शोषणमुक्त समाजाची निर्मिती हे गांधीजींचे स्वप्न सत्तरीनंतरही पुर्ण झाले नाही.  ते पट्टीचे वक्तेही नव्हते, पण लोक कार्यक्रमांस गर्दी करत कारण फरक एवढाच की, तो माणुस जो बोलत होता ते जगतं होता, ते जगणं पुढे तत्वज्ञान झालं, पण हे शाळेत जरी शिकवलं असतं तरी या विषयावर लिहायची गरज पडली नसती.


            

Source: INTERNET

-किरण पवार,
 औरंगाबाद

गांधीजींना भारत हवा होता तो माणसातल माणूसपण शोधणारा पण भारतात ही सध्या परिस्थिती कितपत पहायला मिळते?आज याऊलट कितीतरी भयानक परिस्थिती आपण पाहतो. *डॉ. दाभोळकर, गौरी लंकेश वा गोविंद पानसरे यांच्या हत्या यावरून आपण कुठे जातोय? याच भान आम्हाला जराही राहीलेल नाही.* जिथे गांधीजींना अहिंसा हवी होती तिथे आम्हीच हिंसा करून वाईट कृत्ये केली. गावाकडे चला या नाऱ्याचा तितका प्रभाव आजही तरूणांवर नाही. *कारण आजच्या तरूणांना  चैनी जिवनाशिवाय जमत नाही. गावात संधी भरपूर आहेत पण आपण त्या शोधायचा कंटाळा करतो एवढं नक्की.*
            गांधीजींना वाटत होतं की, माणसाच्या हाताने चूक झाल्यास त्याने समोरच्याची प्रामाणिकपणे क्षमा मागावी. *पण आपण तरूण क्षमा मागण म्हणजे लाजिरवाणी किंवा अपमानास्पद गोष्ट समजतो.* या सर्व गोष्टी बदलायला हव्या आहेत. कारण छोट्या छोट्या चांगल्या गोष्टीच माणसाला मोठ बनवतात. जो पर्यंत भारतातल्या प्रत्येक गरीबाला आणि भिकाऱ्यांना अंगावर घालायला चांगले कपडे मिळणार नाहीत तोपर्यंत मी अंगावर चांगले वस्त्र परिधान करनार नाही. असा गांधीजींसारखा विचार किमान आजच्या एका तरी तरूणात येतो का? ही शोकांतिका आमच्याच गांधीजींच्या सत्तरीतल्या भारताची आहे.




Source: INTERNET

-सौदागर काळे
 पंढरपूर

या विषयावर मोजकेच लिहिताना एक प्रसंग अगोदर सांगावासा वाटतो.
      ते साल 1910 होते . महात्मा गांधींजीची मुलाखत घेताना परदेशी पत्रकाराने
विचारलं होतं," *केवळ ब्रिटिश हेच भारताच्या* *दारिद्र्याला व अनर्थाला कारणीभूत आहेत काय?"*

त्यावर भारताच्या जनमाणसाच्या नाडीचं अचूक निदान असणाऱ्या महात्मा
गांधीजीचं उत्तर होतं," *श्रम आणि बुद्धी यांच्यात घटस्फोट झाल्यामुळे ग्रामीण* *भारत व शेती विकलांग झाली आहे.* "

हे विधान करून आज 100 वर्षे ओलांडून गेली.तरीपण या सत्तर वर्षात हे आहे तसे अबाधित ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या त्या वेळेच्या सरकारांनी केला.

पण एक मात्र वास्तव आहे,आजही आम्हांला गांधी हवेत.तुम्हा-आम्हाला घडवण्यासाठी.
मार्ग दाखवण्यासाठी.

गांधी मला बाराखडी कळण्याचाही अगोदर " *व्होट द्या नोट घ्या "* याद्वारे कळू लागला.
तिथेच माझ्या लोकशाहीला खिंडार लागले.अन पुस्तकांत मात्र नकली गांधी शोधत राहिलो. आता  रस्त्यावर गांधी कसा दिसतो हे सत्तरीनंतरही चित्रात पाहू लागलो.

पण एक नक्की. 70 वर्षांपूर्वी गांधी स्वातंत्र्यसाठी रस्त्यावर दिसत होते. अन 70 वर्षानंतरही  या व्यवस्थेने ते तसंच राहू दिलं दुसरा गांधी शोधण्यासाठी.

आता व्यक्तिगत तरी ठरवलं आहे, आपल्या डोळ्यावरचा बनावट चष्मा काढून गांधींनी पाहिलेला "स्वप्नातला भारत" हा चष्मा परिधान करण्यासाठी बाहेर पडावं.

तेव्हाच त्यांच्या आजच्या स्मृतीदिनी त्यांना आपण "बापू"म्हणायच्या लायकीचे असु.



Source: INTERNET

-ज्ञानेश्वर तात्या टिंगरे
उस्मानाबाद

गांधी आणि भारत या दोन नावाचा खूपच जवळचा संबंध आहे..
भारत स्वतंत्र होण्यासाठी ज्या लोकांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली व प्रसंगी बलिदान दिले त्या मध्ये महात्मा गांधी यांचे देखील नाव तेवढ्याच आदराने घ्यावे लागते.
त्यांनी केलेला संघर्ष हा जेवढा महत्वाचा आहे त्याचबरोबर त्यांनी समाजाला सांगितलेलं तत्वज्ञान सुद्धा. कारण त्यांच्या संघर्षाला जे यश येत गेले त्याच्या मुळाशी होते ते त्यांनी स्वीकारलेलं तत्व सत्य, अहिंसा.
आज स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली, हो सत्तर वर्ष झाली पण गांधींना अपेक्षित होतं ते राज्य ( देश ) निर्माण झाले का नाही, जर उत्तर नाही असेल तर का नाही याच्या शोधात आपल्याला जावं लागेल.
" समाजात एक अनुभव येतो कि काही लोकांचं नुसतं वय वाढतं पण सर्वांगीण विकास होताना दिसत नाही अगदी अशीच काहीशी अवस्था आपल्या देशाची झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. याला जबाबदार आपण सगळेच आहोत उगाच दुसऱ्यांवर दोषारोप करून आपण सुटका करून घेऊ शकत नाही.
आज महात्मा गांधींच्या तत्वाचा सर्वाना विसर पडला आहे, राजकीय लोक, समाजातील प्रतिष्ठित म्हणवून घेणारे , साहित्यिक, प्रशासनातील काही ठराविक प्रवृत्ती इ. हे गांधीजींचा वापर फक्त फोटो पूजन, भाषण, व लेखन प्रसिद्धी साठी करतांना दिसतात.
सरकार गांधीजींच्या नावे योजना राबवत असते, त्यांच्या प्रतीकांचा खुबीने वापर करते मात्र प्रत्यक्षात त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून न जाता सरळ सरळ तत्वाला तिलांजली दिली जाते व ठराविक वेळी त्यांच्या समाधी स्थळी जाऊन नुसता बनाव केला जातो ( क्षमस्व ).
त्यांच्या चष्म्यातून पाहायचं झालं तर आजचा सत्तरीतला भारत हा नुसता वय वाढलेल्या मुलासारखा आहे, ना अजून तो शहाणा झालाय ना त्याला अजून देश समजला आहे, ना त्याला स्वातंत्र्य समजलं आहे ना त्यासाठी दिलेल्या बलिदानाची किंमत,
अजून खूप वेळ लागणार आहे त्याला त्याला अहिंसा समजायला अन सत्य समजायला.
त्याला आता कुठं स्वतःच अस्तित्व जाणवू लागलंय पण त्याला ते समजण्यासाठी ज्याने स्वतः बंदुकीच्या गोळ्या झेलल्या तो माणूस अजूनही माहिती नाही, हो खरंच माहिती नाही, असेल माहिती तर तो फक्त जोक करण्यासाठी, खिल्ली उडवण्यासाठी, देशाचं अपयश त्याच्या डोक्यावर टाकण्यापूरता.. होय ना.
" एक रुपया चांदीचा, भारत देश गांधींचा " अशा घोषणा दिल्या लहानपणी शाळेत असताना पण आज तो देश गांधींचा तर वाटत नाहीच उलट आपला पण वाटत नाही कारण आपला वाटत असता तर आज देशात एवढया योजना राबविण्यात येत असताना त्यात परिणामकारकता दिसली असती ना, का म्हणून अपयश येतं ? का म्हणून आज एखादा वृद्ध सरकार दरबारी आत्महत्या करतो..
याचा अर्थ आपण गांधीना बोलण्यात घेतलं, त्यांचं राम भजन लोकांना गुंगवून ठेवण्यासाठी घेतलं, त्यांचा चरखा फोटोपुरता घेतला अन महत्वाचे म्हणजे त्यांचे सत्याचे प्रयोग स्वतःचे असत्य व मानवी हिंसा लपवण्यासाठी घेतले..




Source: INTERNET

-महेश देशपांडे
जि. उस्मानाबाद

थोड़ा आर्थिक पैलु मंडण्याचा प्रयत्न करतोय.

_खेडयाकडे चला_ अस गांधीजीनी संगीतलेल होत. हे आजही, तितकच महत्वाच आहे. शहरी भाग आणि ग्रामीण भाग याचा विचार केला तर खुप कंगोरे निघतात. पण आर्थिक बाजु लक्षात घेणं का गरजेचे आहे तर आपाण त्याला खेड़ का म्हणतो तर तिथे सामान्य सुविधा नाहीत म्हणून, का तिथे राहणारी मानस कमी शिकलेली किंवा अशीशिक्षित, का तिथे अजुन बऱ्याच गोष्टी (अर्थकारनाशी निगडित) नाहीत म्हणून. सर्वसाधारण  बघायच झाल तर, बाजारपेठ आणि शिक्षण या शहराच्या मुख्य जमेच्या बाजू आहेत, त्यामुळेच शहराकडे लोक आकर्षित झाले. अकडेवरी संगायची तर आज देशातील सुमारे ४५-४६ % लोक शहरात  राहतात मला वाटत त्याहीपेक्षा जास्त असतील. हे प्रमाण आधिच्या काळी (म्हणजे आर्थिक सुधारना ह्या शहराना डोक्यात ठेऊन झाल्या त्या आधी) ख़ुप कमी होत. तुम्हला खोट वाटेल, पण इंग्रज भारतात त्यांच्या मर्जिचा कारभार करण्याच्या आधी जीडीपी २२-२५ % होता. हे सर्वांच्या लक्षात आले नाही. अशी काय परिस्थिति होती त्यावेळी ? तर त्यावेळी गावातील बाजारपेठ ही खुप समृद्ध होती. शिक्षण सुधा योग्य पद्धतीने दिले जात होते आणि मुलांना मोठ्यांचे मार्गदर्शन ख़ुप होते.
आता या गोष्टी भौगोलिक परिस्थिति नुसार थोड्याफार प्रमाणात बदलत असतील, पण एकूणच _खेड़ी समृद्ध होती_.
स्वातंत्रोत्तर काळात या मध्ये चांगले बदल होण्याच्या ऐवजी, परिस्थिति आणखी बिकट होत गेली. याची राजकीय कारण, सामाजिक कारण, आर्थिक कारण भरपूर आहेत.

यात बदल नक्कीच झाला पाहिजे. आजची परिस्थिति बघितली तर, शहरात राहायला मिळत असेल तर भरपूर जन तयार होतात, जे पहिल्यापसुन गावात राहतात.
आता त्यांनीच विचार करून जर या गोष्टी कमी केल्यातर गांधीजीनी जे सांगितले होत _खेडयाकडे चला_. ते नेमक कशासाठी ? याचे उत्तर मिळेल.

_खेड समृद्ध करण्यासाठी खेडयाकडे चला_ अस मला म्हणावस वाटत.

एक युवक म्हणून आपण खुप काही करू शकतो. उदाहरन ख़ुप आहेत की ज्यानी, गावात राहून, स्वतःचा, पर्यायाने कुटुंबाचा आणि समाजाचा विकास केला आहे. शोधा म्हणजे सापडेल.

एक विनंती सर्वाना की, स्मार्ट सिटीचा बोलबाला असताना, स्मार्ट खेड़ी कशी असली पाहिजेत याचा विचार करा बर...

खरच अवघड आहे का हा बदल ? होय खुप अवघड आहे कारण खुप काम कराव लागणार आहे, पण *अशक्य नक्कीच नाही*. मी तर ठरवल आहे, काहीही झाल तरी, गावातील घर सोडायच नाही. नोकरी बाहेर, शहराच्या ठिकाणी करावी लागली तरी चालेल.
मग तुम्हीपण ठरवा काहीतरी की ज्यामुळे गाव सुधारण्यात हातभार लागेल.


गांधीजीनच्या चष्म्याला अनेक दृष्टिकोन होते, त्यातील हा दृष्टिकोन आहे आणि त्याबद्दल हे माझे विचार.




Source: INTERNET

-जयंत जाधव
लातूर
  भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली आहे.गांधीजींनी ज्या भारताची अपेक्षा केली होती तो प्रत्यक्षात आज निर्माण झाला की नाही हा संशोधनाचा भाग ठरेल आणी ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधण्यासाठी गांधीजींच्या दृष्टीने पाहावे लागेल.
१.गरीबांच्या स्वराज्याची अजूनही  स्वप्नामधेच:- गांधीच्या स्वप्नातील स्वराज्य हे गरिबांचे स्वराज्य असेल ही अपेक्षा फोल ठरली आहे .जीवनाच्या ज्या गरजांचा उपभोग  श्रीमंत लोक ज्या सुलभतेने  घेतात, त्या गरिबांसाठी मिळणे खूप कष्टदायक ठरले आहे.कितीतरी लहान मुलांना एक वेळचे जेवण मिळत नाही व उपाशी पोटी मरण पावतात.जोपर्यंत याची परिपूर्ण सोय होत नाही, तोपर्यंत त्याला खऱ्या अर्थाने स्वराज्य निर्माण होणार  नाही'
२.सामाजिक व आर्थिक विषमता वाढली:- स्वातंत्र्य मिळालेल्यावर आज ७० वर्षांनी देखील सामाजिक व आर्थिक विषमता दूर होईल अशी अपेक्षा होती. वास्तविक असे घडले नाही. उदाहरणार्थ नुकतेच एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की जगाप्रमाणे भारतात देखील ७३% संपत्ती १% लोकांच्या हाती एकवटलेली आहे.११ हजार कोटींच्या  अँटेलिया बंगल्यात राहणारे  अंबानी ह्याच देशात आणि फुटपाथवर गाडी मागे घेताना झोपेतच चेंगरले मेलेले ह्याच देशात आहे. ज्या देशात अंदाजपत्रकात शेतीला नगण्य महत्त्व दिले जाते .अशा परिस्थितीत सामाजिक व आर्थिक समानताची काय अपेक्षा ठेवाल? ह्या प्रश्नांची उकल कोण करणार,आहे कोणी?
३. गांधीजींनी 'खेड्यांकडे चला'अशी हाक दिली होती.प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्याला त्याच्या कष्टाचे योग्य  मोबदला मिळाला पाहिजे,कोणाची ही आर्थिक पिळवणूक होऊ नये,गाव हे स्वावलंबी व स्वंयपूर्ण असावे असे  त्यांचे मत होते. पण आज सरकारी धोरणे खेड्यांसाठी मारक ठरली आहे.लाखो शेतकर्यांनी आत्महत्त्या केल्या . तरुण रोज उदासीनतेतून आत्महत्त्या करतात ..शहरे बकाल अवाढव्य वाढत आहे व खेडी ओस पडले आहेत.
सारांश,माझ्या मते आज गांधीच्या चष्म्यातून सत्तरी मधला भारताकडे पाहिले तर एक म्हणावे लागेल,आपल्या  संधिसाधू राजकारण्यांनी गांधीजींच्या विचारांना  फक्त  नोट व व्होटवर बंदिस्त करुन आम्हीच गांधीचे खरे  वारसदार आहोत, असा दावा करणाऱ्यांना गांधीजींचे विचार अमलात आणणे कधीच  जमले नाही.त्या विचारापासून ते परावृत्त होऊन  खूप दूर गेले.म्हणूनच  सामाजिक-आर्थिक विषमता भयानक  वाढली आहे.




Source: INTERNET

 -जगदीश लोंढे
   मुंबई

             "सत्तरीचा माझा देश आपल खरं  आयुष्य जगू लागलाय"असेही आज आपल्याला म्हणता येतं नाही.विकास , सर्वसमावेशक विकास , आर्थिक महासत्ता च्या नावाखाली आपण स्मार्ट सीटी,  स्मार्ट टेक्नॉलॉजी वापरतोय.पण समाजातील आजही 65% समाज या स्मार्ट शब्दांत बसंतचं नाही ही खरी शोकांतिका आहे.....
             ‎'खेड्याकडे चला' गांधींना स्वप्नवत भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जावा अशी त्यांची महत्वाकांक्षा असावी.गांधीनी आणि आंबेडकरांनी दोन मुद्यावर  वारंवार आपली भूमिका मांडली खेड्या कड़े चला..ग्रामीण भागात चला.आपण स्मार्ट शहर , स्मार्ट शहर च्या नावाखाली नुसतं शहरांचाच विकास करत सुटलोय.शहरांचा कसला आला विकास तो तरी आपण नीट करतोय का हा खरा यक्षप्रश्न आहे.मुळात एलफिन्स्टन दुर्घटना , कमला मिल मधील दुर्घटना किंवा जोगेश्वरीतील फर्साण शॉप वरील दुर्घटना यावरून तरी असंच लक्षात येतं की आपली स्मार्ट शहराविषयीची संकल्पना ही किती पुसट आहे.
        गांधीच्या स्वप्नांतील भारत आणि आंबेडकराच्या स्वप्नांतील भारत आपल्या विचारांच्या कितीतरी पुढे असेल.ज्यांची आपण कल्पनाच करू शकत नाही.गांधीच्या स्वप्नांतील भारतात भीमा कोरेगांव व खैरलंजि सारख्या हत्या, गौहत्या , शेतकरी आत्महत्या , सनातनी विचारसरणी   ची प्रवुत्ति नक्कीच होत नसणार.त्यांना समतापूर्ण भारत , सर्वसमावेशक भारत अपेक्षित होता. फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी व समतावादी भूमिकेला अनेक सवर्ण नेत्यांनी पाठबळ दिल्याचा इतिहास आहे. आंबेडकर व गांधी यांचे काही मुद्यांवर मतभेद होते, पण धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, संसदीय लोकशाही, मानवतावाद, समता, बंधुता, सामाजिक न्याय, तसंच सुसंवाद, अहिंसक मार्ग इत्यादी अनेक मुद्यांवर एकमत होतं. पण त्यांचे 'मनभेद' कधीच नव्हते. त्यांचं कार्य एकमेकांना पूरक होतं.
                                   मला अस वाटतं की आपण गांधीच्या स्वप्नांतील भारत साकार करण्यासाठी तरुणांनी धर्मनिरपेक्षता , स्वातंत्र्य , समता , बंधुता या मूल्यांचा आणि तत्त्वांचा वापर केला पहिजे.गांधी , फुले , शाहू , आंबेडकरी विचारसरणी हीच आपली अंतिम विचारसरणी असली पहिजे.यापुढे कोणताही पक्ष नाही..‎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************