प्रेम म्हणजे खरोखर प्रेम असते का ?(भाग:-१)


🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

प्रेम म्हणजे खरोखर प्रेम असते का ?


Source: Internet

-संजय साळुंके,
 जळगाव

प्रेम कुणावरही असो , प्रेम निस्वार्थीपणे असेल तरच ते खरोखर प्रेम असते. सध्याच्या व्यवहारी जगात खरं प्रेम फक्त महात्मा गांधीजी (नोटांवर) यांचेवरच असल्याचे दिसून येते. पूर्वीच्या काळी बाबा आमटे यांचे कुष्ठरोग्यांवरील प्रेम , संत गाडगेबाबा यांचे गरीब, दीन, दुबळ्यांवरील प्रेम, साने गुरुजींचे विद्यार्थ्यांनवरील प्रेम, असे प्रेम दृष्टीस पडत नाही. हल्ली गरजेपुरतेच प्रेम असते . गरज सरो वैद्य मरो । अशी परिस्थिती आहे . राजकारणी , नेतेमंडळी सुध्दा गरज असेल तेव्हाच, निवडणूक पुरते कार्यकर्ते, तरुणांना वापरून घेतात . मुलं सुध्दा प्रॉपर्टी असेल तरच म्हाताऱ्या आईवडीलांकडे लक्ष देतात. आईवडील देखील बेरोजगार मुलांपेक्षा कमवणार्या मुलांची जास्त काळजी घेतात. सगळेच असे नसतात , पण असे नसतातच असे आपण खात्रीपूर्वक म्हणू शकतो का?  निस्वार्थी प्रेम म्हणजे परीस . परिस कुणी बघितलाय का?  कृपया सांगा मला.


Source: Internet

-संदीप बोऱ्हाडे,
 पुणे

          लैला-मजनू, सलीम-अनारकली, हीर-रांझा, शहाजहान-मुमताज... या प्रेमवीरांच्या जोड्या एकेकाळी युवावर्गामध्ये फार लोकप्रिय होत्या अन् आजही आहेत. शहाजहानने मुमताजसाठी बांधलेला ताजमहाल म्हणजे तर जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे! अनारकलीचे ‘जब प्यार किया तो डरना क्या’ हे गाणे आजही अजरामर आहे. जुन्या चित्रपटांमध्ये प्रेमकथा होत्या. रोमँटिक गाणी होती. सीन असायचे. पण, कुठेही अश्लीलतेचे, बीभत्सतेचे प्रदर्शन नव्हते. सारे कुटुंब एकत्र बसून चित्रपट बघू शकायचे. कारण, बर्याचशा चित्रपटात प्रेम म्हणजे फक्त शारीरिक वासना नसून, मने जुळणे ही भावना होती. या जन्मात मिलन झाले नाही तरी पुढच्या जन्मी आपण नक्कीच भेटू, हा प्रबळ आशावाद होता. दुर्दैवाने जर लग्न झाले नाही, तर अपयश गिळण्याची, पचवण्याची ताकद होती. मुले स्वत:च्या जिवाचे एकवेळ काही करून घेतील, पण आपल्या प्रेयसीला काही अपाय करण्याची त्यांची प्रवृत्ती नव्हती. कारण, एकाच्या पायात काटा रुतला तर दुसर्याच्या डोळ्यांत पाणी यायचे! एवढे जिवापाड प्रेम असायचे. तिला सुखी ठेवण्यासाठी, सुखी बघण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी होती, हेच ते उदात्त प्रेम! सूड, बदला हे शब्द तर प्रेमाच्या परिभाषेत नसतातच, म्हणूनच वरील जोड्या अजरामर ठरल्या. अन् आज आपण काय बघतो? ‘अंजाम’ आणि ‘डर’सारख्या चित्रपटांची नक्कल करू पाहतोय्. जी मुलगी आवडते तिने होकारच द्यावा, हा अट्टहास! प्रेम असे जबरदस्तीने करवून घेता येते? तिचे स्टेटस्, तिचे रूप, शिक्षण आणि आपण यांची जराशीही तुलना न करता, केवळ तुम्हाला आवडते म्हणून तिच्या इतके मागे लागायचे, की तिला जीवन जगणे, शिकणे, खाणे-पिणे मुश्कील करून टाकायचे. तिच्या आई-वडिलांनी मध्ये बोलल्यास त्यांच्यावर खुनी हल्ले करायचे आणि मुलीवर चाकूने वार करायचे, पेट्रोल टाकून जाळायचे, ऍसिड फेकायचे, उकळते तेल टाकायचे किंवा मित्रांसह तिच्यावर बलात्कार करून तिचे तुकडे तुकडे करायचे... अरे, तुम्ही प्रेमवीर आहे की दहशतवादी?

  आज प्रेमाची परिभाषा पूर्णपणे बदलून गेलेली आहे. आज प्रेम हे फक्त शरीरसुख घेण्यासाठीच अनेकजण करत असतात...प्रेम हे निस्वार्थ असायला पाहिजे पण जगात अनेक प्रकारचे लोक आहेत अपंग , भिकारी , अनाथ , वेश्या , तृतीयपंथी यांच्याकडे कधी आपण प्रेमाने पाहतो का?? पशु , पक्षी यांच्यावर सुद्धा आपण कधी प्रेमाचा दृष्टीकोण ठेवतो का?? प्रेम म्हणजे काय फक्त मूलगा आणि मुली बरोबर असते त्यालाच म्हणतात असा लोकांनी दृष्टिकोन तयार करून ठेवला आहे.

अस म्हणतात जग जिंकता येते प्रेमाणे..पहा आपण स्वतःहा या ठिकाणी कुठे बसतोय का ??



Source: Internet

-महेश देशपांडे,
 उस्मानाबाद

                हा अतिशय महत्वचा विषय निवडला आहे. महत्वाचा यादृष्टीने की, आपल्या मनातील भावनांचा जर विचार केला तर, त्यात सरळ सरळ दोन भाग पडतात. एक म्हणजे प्रेम असलेली आणि दूसरी म्हणजे प्रेम नसनारी... आता हा तसा ख़ुप गर्भितार्थ विषय आहे कारण, प्रेम म्हणजे सगळ्या उदाहरणात आपल्याला कुठल्या ना कुठल्याही, अगदी कुठल्याही, प्रकारच *आकर्षण* वाटत. पण, प्रेम हे फक्त आकर्षण नाही... तर, ती एक निरंतर प्रक्रिया आहे. जे, नेहमी वृधींगत होते ते प्रेम... आत्म्या च परमातम्या सोबत जे वाढत जात ते प्रेम याला आकर्षण नाही म्हणत... खरच, कितीही, अगदी कितीही आदरणीय व्यक्ति असेल किंवा मनाच्या जवळ असलेली असेल किंवा कोणीही असेल... त्याच्या वाग्न्याने आपल्याला कधीतरी नकारात्मक भावना (राग, लोभ, अपेक्षा ) तयार होतातच... खोलवर विचार केला तर आपल्याला समजेल...
मग प्रेम नक्की कशाला म्हणायच ?

माझ्या अनुभवातुन अस वाटत की, जे सतत वाढत जात ते प्रेम, म्हणजे तुम्ही म्हणाल आपाण एखाद्याचा द्वेष करत असु तर तो पन वाढत जातो की... होय, पण त्या गोष्टीच्या (व्यक्ति किंवा इतर) संपन्याने तोहि नष्ट होतो, कारण ती गोष्टीच नसेल तर द्वेष कशाचा करायचा... पण, प्रेमाबद्दल खुप वेगळा विचार असतो, आपण आपल्या अस्तितवाशिवायही प्रेम देउ शकतो... ही खुप मोठी गोष्ट आहे...

*प्रेम* जगातील सगळ्यात प्रचंड ताकदवान गोष्ट, कुठलीही परिस्थिती बदलण्याची ताकद प्रेमामध्ये आहे. खरच आपण फक्त व्यक्तीवरच प्रेम करू शकतो का? आपण विश्वातील  कुठल्याही ज्ञात गोष्टीवर प्रेम करू शकतो. आपलं सर्वस्व त्यावर कुर्बान करून टाकू शकतो. अगदी भौतिक तसेच अभौतिक गोष्टींवर सुद्धा जीवापाड प्रेम करू शकतो. फक्त इच्छाशक्ती हवी. यावरून इच्छाशक्ती किती महत्वाची असते हे लक्षात येते. माणसातील (स्त्री -पुरुष) संबंधानां आपण इतके चिकटलेले आहोत की देशावर प्रेम करता येत (सर्व देशप्रेमी), प्राण्यावर जीवापाड प्रेम करता येते (डॉ. प्रकाश बाबा आमटे) , धर्मावर प्रेम करता येते ( गुरुगोविंद ) हे सर्व विसरून गेल्यासारखं वागतो आहोत.
प्रेमाची गरज ही प्रत्येकाला असते, जगातल्या सगळ्या जिविताना ती असतेच असते. फक्त ती पूर्ण नाही झाली की माणूस त्यामागे आधाशासारख लागतो आणि आपण काय गमावतोय आणि काय कमावतोय हे लक्षातच येत नाही त्याच्या...
खूप सुंदर आदर्श उदाहरण म्हणजे आईच मुलांवरच प्रेम. आई नेहमी स्वतःपेक्षा तुमच्यावर प्रेम करणारी तुमचा विचार करणारी... प्रेयसी ही प्रसंगानुरूप येते आणि वागते... आई खोट जरी बोलली तरी ते तुमच्या भल्यासाठी असते हे लक्षात ठेवलं पाहिजे...
आपण जेवढा प्रेमाचा विचार करतो त्याच्या अनंत प्रमाणात प्रेम आहे जगामध्ये. आपली किती मिळवण्याची ताकद आहे, त्यावरून आपली उंची ठरते, पैशावरून नाही.
प्रेमाच्या बाबतीत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, जेवढं प्रेम आपण इतरांना देऊ त्या प्रमाणात आपल्याला मिळत. नेहमी इतरांना प्रेम दिले पाहिजे. आता इतरांना प्रेम देणं म्हणजे नेमकं काय हे ज्याचे त्याने शोधावे, कारण अगदी काही क्षण इतरांना आनंदी ठेवण हे सुद्धा प्रेमाचं प्रतीक म्हणता येईल नाहीतर दुसरा व्यक्ती तुमच्या साठी मनापासून हसतमुख राहतो हे सुद्धा खूप महत्वाचे आहे.


प्रेम ही संकल्पना, आपण अनुभवावी...

१४, फेब्रुवरी valentine day निमित्ताने हा विषय निवडलेला असला तरी... आयुष्याच्या कुठल्याही क्षणी आपण ते अनुभवु शकतो...




Source: Internet

-किरण पवार,
औरंगाबाद

                *प्रेम हा अर्थ आहे एक प्रकारचा जो मानसाच माणूसपण मैत्रीच्या नात्याने टिकवून ठेवतो.* प्रेम नसतं तर साहजिक आहे की, एखाद्या विषयावर इथे मत व्यक्त करायला आपण एकत्र आलो नसतो. त्याच प्रेमाला आपण वेगवेगळी नावे देतो. *कुणी आपुलकी म्हणेल, कुणी मैत्री, कुणी म्हणेल केवळ विचार जुळण्यातला योग असं बरच काही.* पण जेव्हा आपण प्रेम शब्द उच्चारतो तेव्हा आपण एकच संदर्भ लावायला मोकळे असतो. तो म्हणजे, तिच आणि त्याच चालू आहे किंवा तिला तो आवडत नाही पण त्याला ती जीवापाड आवडते वगैरे वगैरे.....
            आपल्या मुळ प्रश्नाकडे येतो. प्रेम खरोखर प्रेम असतं का? माझ मत या गोष्टीच उत्तर ते प्रेम निभावणाऱ्यावर अवलंबून आहे. निभावऱ्याणे किती शेवटपर्यंत प्रेम टिकवल आहे हे पाहिलय मी. पण न निभावणाऱ्यांनी जी काही एखाद्याची वाताहत लावली ती न उच्चारलेलीच बरी. असो. *प्रेम म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टींचाही पैलू जाणून घेणं असतं. कोणत्याही नात्यात  संशय नावाचा शत्रू मनात तरी समजून जायच की आपण केलं ते खर प्रेम नसून फक्त त्या नावाने केलेला एक पोरकटपणा होता.*
                  हा मुद्दा प्रेमाविषयीचाच आहे म्हणून ‌सांगतो की, *आपल्या भारतीय समाजाच्या लोकांची प्रेमाकडे पाहण्याची दृष्टी बदलायला हवी.* उदाहरण द्यायचं झालं तर मी हा लेख लिहिला आहे म्हणजे मी अमूक अमूक मुलीच्या प्रेमात आहे हा तर्क वाचणारा 50% समाज तरी लावायला मोकळाच. *प्रेमामुळेच एखाद्याशी सलोखा निर्माण होते आणि मैत्री होते ही वस्तुस्थिती आमच्या मुळी लक्षातच येत नाही.* आणि मग पुढे अडचणी चालू होतात. त्या सविस्तर सांगू शकत नाही. *जे आहे ते स्वीकारा. एखाद्यासाठी स्वत:ला न बदलने आणि समोरच्यानेही अगदी सहज आपल्याला समजून घेणे हे आहे खरं प्रेम.*

कविता:-
प्रेम आहे मैत्रीसाठी
तुला मीच ते समजावण्यासाठी
चुकीच दूर जाव
तुला मी चांगल देण्यासाठी,

प्रेम खर की खोटं
तुला सत्य मी देण्यासाठी
प्रेम अगणित की तात्पुरतं
तुला मी नेहमी वाहण्यासाठी,

चुकल्यावर मात्र मी
तुही एकदा बोल सुनावण्यासाठी
प्रेम आहे खरं
तुला मी योग्यच सर्व देण्यासाठी.



Source: Internet

-क्षितिज गिरी,
 सातारा
           तुम्ही कशाला प्रेम म्हणता त्याच्यावर आवलंबून आहे ते प्रेम आहे का नाही ते मुळात प्रेम कोणावरही करता येते न्यात अज्ञात सजीव निर्जीव वस्तू अस्तिवात असलेल्या किंवा नसलेल्या सर्व गोष्टीवर प्रेम करता येते ।
           सर्वात जास्त चिघळला जाणार विषय म्हणजे मुला- मुलींचे किंवा नवरा बायकोचे प्रेम आपण त्यावर आगोदर बोलू .मुळात मला पहिल्या नजरेच्या प्रेमावर आजिबात विश्वास नाही आणि ती संकल्पना पूर्णतःहा चुकीची आहे.फिल्म मध्ये तर सरळ सरळ दाखवले जाते पहिल्यादा बघितले मग प्रेम झाले मग तो तिच्यासाठी किंवा ती त्याच्यासाठी काहीही करायला तयार होते किंवा होतो. नुसते बघायला मस्त वाटते .पण कुठेतरी हे प्रेम नसून शाररिक आकर्षण आहे . एखादी सुंदर मुलगी किंवा मुलगा दिसला किंवा दिसली कि आपण उगाचच म्हणतो प्रेम झाले अन प्रेम झाले .आणि आपण जेव्हढा जास्त विचार करतो तेवढा जास्त अडकत जातो.आणि मनाचा खुप मोठा चुकिचा समाज करून ठेवतो.आपल्याला ती एक सुंदर वस्तू म्हणून आवडलेली असते.त्याची मने कधीच जुळलेली नसतात .आणि ती जुळतील का हे पण सांगू शकत नाही आपण.मुळात प्रेम हि हळूहळू वाढत जाणारी प्रक्रिया आहे.
प्रेम आंधळे आसते असे म्हणतात.पण मी तर म्हणेन आंधळे पणाने आजिबात प्रेम करू नये ते प्रेम बीम काही नसते नुसताच भास असतो तो .मुळात डोळे झाकून कधीच प्रेम करु नये.(शब्दशःहा अर्थ घेऊ नये तुम्ही ☺)
              वाळवंटात ज्यावेला हरणाला तहान लागलेली असते त्यावेळेस ते पाणी शोधण्यासाठी खुप लांब नजर टाकते त्याला दूरवर पाणी दिसते.ते पळत पळत तेथे जाते त्याला पाणी तिथे भेटत नाही.परत त्याला लांब पाणी दिसते ते परत तेथे जाते पण पाणी नसते .मुळात ते पाणी नसते नसतात पाणी असल्याचा भास होतो म्हणजेच मुगजल असते. आंधळे पणाने प्रेम केल्यावर अशीच गत होते.
       प्रेम करताना कोणत्याही माणसाला आपले सर्वस्व कधीच देऊ नये.आपले वेगळे अस्तित्व कायम आभादित ठेवावे.जर तसे केले नाही तर आपल्याला प्रेमा मध्ये घुरपटत ठेऊन आपला खुप फायदा घेतला जातो.कधी कधी आपले शोषणही केले जाते.आपण तर त्याचे उघड उघड समर्थन हि करतो .प्रेमात असतो ना आपण काय करणार .तुम्हीच सांगा मग असले आंधळे प्रेम काय कामाचे .

        कोणत्याही माणसाला आपले सर्वस्व देयचे तो जे म्हणेल ती पूर्व दीक्षा म्हणायची व त्याचे समर्थन करायचे व आपली बुद्धी गहान ठेवायची.याला आजिबात प्रेम म्हणत नाहीत.याला तर शुद्ध बावळट पणा म्हणतात .
         प्रेमामध्ये रुसवे फुगवे हे चालतात.छोट्या मोठ्या कारणावरून कायमचा सहवास तोडणे चुकीचे आहे.ते म्हणतात ना तुझे माझे जमेना तुझ्या वाचून  करमेना मुळात व्यति तेवढ्या प्रवृत्ती.कोणाचेही विचार पूर्णतःहा जुळत नाहीत .म्हणून कोणत्याही नात्यामध्ये थोडी अधिक प्रमाणात कटुता हि असतेच.म्हणून त्याचा अर्थ प्रेम नाही आसा आजिबात होत नाही.मुळात प्रेम दुष्मणवरही करता येते.महात्मा गांधी एका ठिकाणी म्हणाले आहेत समोरच्याने डोळे वाटरले म्हणून आपणही वाटरले तर हे जगच आंधळे होहिल म्हणून.मुळात प्रमाणे जागाही जिकता येते म्हणून प्रेम द्या भरभरून द्या प्रत्येक गरजवंताला आपल्या परीने प्रेम द्या .कोणतीही अपेक्षा न ठेवता. निस्वारती भावनेने प्रेम द्या. सर्वांवर प्रेम करा आई वडील निसर्ग मित्रीन मित्र सगे सोयरे पशु पक्षी प्राणी तुमच्या अंतकरना मध्ये प्रेमाचा झरा वाहू दे .हो पण त्याचा कोणी दुरुपयोग तर करत नाही ना याचा जरूर विचार करा .आणि तो आमलातहि आणा.

       मला माहित आहे खुप सुंदर विषय आहे पण मी तो खुप किचकट सोरूपात मांडला आहे.पण तुमच्यांवरील प्रेमामुळे तुम्ही कुठे प्रेम मध्ये फसू नये एवढीच ती निस्वरती भावना.
            प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी इच्छा असावी।
ती पूर्ण झाली नाही तरी
श्राद्ध ती ना सोडावी ।

प्रेम संगीतावर करावे कि त्या स्वरा वर
काहीच समजत नाही
वेड्या माझ्या मनाला आता शांती कोठेच भेटत नाही

आशेचा तो पहिला किरण पण किरची ती दुसरी आशा



Source: Internet

-संगीता देशमुख,
 हिंगोली

  "प्रेम म्हणजे खरोखर प्रेम असते का? या प्रश्नाचे उत्तर निर्विवादपणे होकारार्थीच असायला हवे. कारण हे जग चालतेय ते प्रेमाच्या आधारानेच. या जगात कितीही भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या,जग कितीही तंत्रज्ञानाचे जग म्हणून ओळखल्या जात असेल परंतु जगातली सगळी सुखे त्याच्या दारात  उभी असताना तो माणूस मात्र प्रेमाच्या अभावी  स्वतः आत्महत्येच्या दारात उभा राहील. आणि जीवनात कितीही नैराश्य आलेला माणूस जेव्हा आत्महत्येच्या दारात उभा असेल तेव्हा त्याला जर त्याच्यावर प्रेम करणारी माणसे आठवली अथवा एखाद्या प्रेमाच्या व्यक्तीचा हात त्याच्या पाठीवर असला किंवा एवढेच नाही एखादा प्रेमळ स्पर्श जरी त्याला आठवला तरी तो आत्महत्येच्या दारातून नक्कीच वापस येईल. एवढी ताकद प्रेमात असते. मग हे प्रेम आईचे असू शकते,वडिलाचे असू शकते,बहिणीचे असू शकते, अथवा एखाद्या अनाथाला ज्याने आधार दिला अशा आधार देणाऱ्याचे असू शकते,आजी,आजोबाचे असू शकते,एखाद्या जीवलग मैत्रीणीचे,शाळेतील शिकवणाऱ्या सरांचे किंवा बाईंचेही असू शकते एवढेच हे प्रेम देशप्रेमही  असू शकते.  पण आपण आज या प्रेमाची व्याख्या अगदीच संकुचित करून ठेवली आहे. प्रेमाचे अनेक पैलू आहेत,अनेक रंग आहेत परंतु आजच्या तरुण पिढीला या प्रेमाचा एकच रंग दिसतो म्हणजे तारुण्यातील प्रणयाचा! म्हणूनच  "व्हॅलेन्टाइन डे" सारख्या दिवसाला तरुणांच्या दृष्टीने नको तितके महत्व प्राप्त होते आणि दुसऱ्या दिवशी ओंगळवाण्या प्रकाराच्या बातम्यांनी  वर्तमानपत्राचे पाने गजबजून जातात. अशा "विशिष्ट" दिवशी जे दाखवल्या जाते ते प्रेम नसून उन्माद आहे,हेच या तरुणांच्या ध्यानात येत नाही. म्हणूनच मग अशावेळी हिताचा सल्ला देणारे  आईवडील हे शत्रू वाटायला लागतात. याची दुसरी बाजू हीही आहे की,बरेचसे 'डे' हे पाश्चिमात्यांचे अनुकरणातून होत असताना फक्त 'व्हॅलेन्टाइन डे'लाच विरोध करून काय साध्य होणार आहे? एक दिवस तरुण-तरुणींनी एकमेकांना फूल दिल्याने संस्कृतीचा खरेच ऱ्हास होईल का? यामुळे तथाकथित संस्कृतीरक्षणाचे  ठेकेदार जेवढे क्रूरपणे वागतात तेवढा विरोध करणे इष्ट ठरेल का?
          प्रेमात खूप ताकद आहे,हे आपण थोरामोठ्यांच्या तोंडून अनेकदा ऐकले आहे.खरच  वाल्याचा वाल्मिकी करण्याची ताकद आहे ती प्रेमात! वाल्याला मिळालेले ज्ञान,उपदेश हा प्रेमाने भेटला म्हणूनच त्याच्यामध्ये सुधारणा होऊन वाल्मिकी झाला. सुधारगृहात प्रेमळ अधिकारी भेटल्याने सुधारगृहातील अनेक कैद्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली आहे. त्यांच्यात सकारात्मक बदल झाल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. दोन अनभिज्ञ व्यक्ती लग्न करून येतात आणि प्रेमाच्या आधारानेच संपूर्ण आयुष्य एकत्र व्यतित करतात. पण यांच्यात  जेव्हा प्रेमाची भावना उरत नाही तेव्हा हीच जोडपे घटस्फोटापर्यंत पोहोचतात. ॲरेंज मॅरेजमध्ये हे जोडपे  अनभिज्ञ आहे म्हणूनच असे घडते,असे नाहीतर ज्यांचे प्रेमविवाह करतात त्यांच्यातही काळानुसार म्हणा किंवा आण कोणत्या कारणाने जेव्हा प्रेम संपते तेव्हा अशाही  जोडप्यांमध्ये बेबनाव येऊन ते घटस्फोटापर्यंत जातात. म्हणून फक्त "व्हॅलेन्टाइन डे"ला प्रेम व्यक्त  करून चालत नाहीतर आयुष्यभर संसार हा फक्त प्रेमाच्या आधारानेच टिकत असतो.

साने गुरुजी म्हणतात,'खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे'. जगात अनाथ,लुळीपांगळी,असाध्य रोगाने ज्यांना बहिष्कृत केले असे अनेक जीव प्रेमाच्या प्रतिक्षेत आहेत. अशा लोकांना प्रेमाची नितांत गरज आहे. आज लोक कितीही म्हणोत की,जगात प्रेम,दया उरली नाही,पण जेव्हा असे अनाथ,अपंग,बहिष्कृत लोक जीवन जगताना दिसतात, ते कोणाच्यातरी प्रेमाच्या आधारानेच! ही प्रेमाची बाग फुलवणारे असतात,बाबा आमटेसारखे  थोर महात्मे!मग जगाला तेव्हा प्रेमाचीच प्रचीती येत असते. याच प्रेमाची अपेक्षा संतमहात्म्यानी केली आहे.  जगातील प्रत्येक धर्म 'प्रेमाने रहा' असाच संदेश देतो. प्रत्येक धर्माचा सार हा "प्रेम" आहे. आणि अशा प्रेमाला 'व्हॅलेन्टाइन डे' सारख्या वेगळ्या दिवसाची गरजच काय?? "व्हॅलेन्टाइन डे"सारखे दिवस साजरे होऊनही आजूबाजूला मारामाऱ्या आहेत,अत्याचार आहेत,बलात्कार आहेत. तथाकथित एकतर्फी प्रेमातून खूनासारख्या  निर्दयी घटना घडताना दिसतात. प्रत्येकवेळी भोगातच  नाही तर त्यागातही प्रेम आहे,हे तरुणाईला कळायला हवे.    ज्याला प्रेमाची गरज आहे,गरजूला  प्रेम देण्यासाठी वेगळा दिवस क्षणिक  साजरा करण्याची गरज काय? आणि या प्रेमाला विशिष्ट संकुचित,मर्यादित वलयातच ठेवणे हे संयुक्तिक   ठरेल का? प्रेम हा प्रत्येक धर्माचा पाया असेल,सार असेल आणि त्यानुसार प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन केले तर जगात शांतता नांदेल आणि 'प्रेमा'ला आकाशाची लांबीरुंदी व उंची निश्चितच लाभेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************