युवक आणि विवेक


@vichar4
श्रद्धा काट्रे,सातारा.
भारत देश जगामध्ये युवकांचा देश म्हणून ओळखला जातो.त्या युवकांची आज काय अवस्था आहे , हे आपण जाणतोच. आजच्या युगात तरुणांचे दोन प्रकार दिसून येतात.एका बाजूला राष्ट्रप्रेम ,वाचक,विज्ञानवादी ,आपण समाजाचे काय तरी देणं लागतो हा विचार असणारे तर दुसऱ्या बाजूला व्यसन ,वासना, गुंडागिरी, मुलींची छेड काढणे यामध्ये भुरकटलेले दिसतात.यामध्ये दुसऱ्या बाजूच्या तरुणाईचे प्रमाण खूप वाढतच चाललेलं आहे.यावर मात करण्यासाठी आजच्या तरुणांनी विवेकशील राहिले पाहिजे. त्यांच्यातील विवेक जागा झाला पाहिजे.
          युवक हा देशाचा कणा असतो. जर कणाच बरबाद झाला तर देशाचा भविष्यकाळ खूप बिकट आहे.आपण जर इतिहास पहिला तर जगामध्ये ज्या काही क्रांत्या झाल्या ,जी काही परिवर्तने घडून आली ,तर ती फक्त तरुणांच्या संघटीतपणामुळेच. मग आजच्या युवकाने आपण कुठे चाललो आहे,याची त्या तरुणाला जाणीव झाली पाहिजे. प्रत्येक युवकाने आपल्यातील विवेक जागा केला पाहिजे. या 21व्या शतकात बदलत्या जगाचे साक्षीदार होत असताना आपण जातपात आणि द्वेषभाव विसर्जन करून देशकार्य केलं पाहिजे.

डॉ.कौस्तुभ कल्पना विलास,पुणे.
           खरे पहायचे झाल्यास विवेक हा बर्याच गोष्टींवर अवलंबून असतो. विवेक हा माणसाने घेतलेल्या निर्णयातून प्रतिबिंबीत होतो. अगदी लहानपणाच्या संस्कारांपासून ते उपजत ज्या नैसर्गिक प्रेरणा आणि प्रसंग समोर असतो त्यानुसार, तसेच माणूसाची ध्येय्य धोरणे आदी माणसाचे निर्णय (म्हणजेच विवेक) नियंत्रित करत असतात. माणसाला विवेकी तेव्हाच म्हणता येते जेव्हा त्याचे निर्णय हे कर्तव्य, सामाजिक भान, अपेक्षित क्रिया आदींवर योग्य ठरत जातात. एका क्रियेने माणूस विवेकी ठरत नाही. तो त्याच्या व्यक्तीमत्त्वाचा भाग असतो. विवेक हा जोपासावा लागतो. बुद्धीप्रामाण्यवाद अंगी हळूहळू बाणवावा लागतो. स्वतःला विवेकी समजणारे बहुतेकवेळा अविवेकी कृत्ये करून जातात. ज्याचे निर्णय दूरगामी व अल्पगामी दोन्हीकडे निदान दुरगामी तरी स्वतःचा व समाजाचा फायदा करतात किंवा नुकसान करत नाहीत त्याच्या त्या निर्णयांना व त्याला विवेकी म्हणता येईल. माणसाचे मन चंचल असते व चंचल मनामागे धावणारे विवेकी निर्णय घेऊ शकत नाहीत. पण चंचल मन आणि सहृदयता यांत खूप फरक आहे हे मी सहेतूक नमूद करू इच्छितो. चंचल मन हे विषय व गरजा बदलत राहते व विचारांना पर्यायाने माणसाला त्यामागे पळवते. तर सहृदयता हा माणसाचा एक गुण असतो. ज्या कशानेही मन अशांत होते, उद्विग्न वा उत्तेजित होते (व्यसन, राग, कामवासना, दया, प्रेम, भीती, वा काहिही) ते पहिल्यांदा विवेकीपणावर आघात करते. तसेच जे जे तुमच्या तार्किकतेवर आघात करते मग ते काहिही धर्मांधता, आळस वा काहिही ते ते तुम्हाला विवेकीपणापासून दूर नेते. विवेकी असणे हि तारेवरची कसरत आहे. त्यात तारूण्य म्हणजे ऊर्जेचा अखंड प्रवाह, एक प्रकारचा उद्रेक असतो, हार्मोन्स आपल्या अत्युच्च पातळीवर असतात. म्हणूनच आयुष्यातली हिच वेळ जास्त धोकादायक असते अविवेकीपणे काहितरी हातून घडून आपले व इतरांचे आयुष्य उध्वस्त होण्याची शक्यता जास्त असते. अगदी खून, बलात्कार वैगेरे खूप लांबची गोष्ट फक्त मजा म्हणून गाडीचा वेग अनियंत्रित वाढवून अपघातात जीव घालवणारे व घेणारे अविवेकी तरूण आपण पाहतोच. तारूण्य म्हणजे मस्तवाल अश्व धरला तर विवेक म्हणजे लगाम असते, जीचा आदर प्रत्येकाने केलाच पाहिजे. शेवटी जेवढी विवेकशीलता समाजात वाढेल तितका तो समाज परिपुर्ण विकासाकडे मार्गक्रमण करेल यात शंका नाही.

किरण बंडू पवार,औरंगाबाद.
        युवक आणि विवेक हा अत्यंत समर्पक विषयच म्हणावा लागेल. कारण युवक हा विवेक बुद्धी ठेवून चालणारा असावा सोबतच जोड अशी की, त्याची आदर्शसरणी कार्याबाबत ही स्वामी विवेकानंद यांच्यासारखी असावी. स्वामी विवेकानंदांनी जी युवकांची ताकद समाजासमोर उघड केली तिला खरच नवाजावचं लागेल. पण सध्याच्या घडीला महत्त्वाचं आहे ते, युवकांनी विवेकबुद्धी ठेवून आपापल्या ध्येयमार्गांवर चालत राहणं. पण सध्या देशात आपल्या युवकांची एवढी मुबलक क्षमता झाली आहे आणि नेमक्या ऐनवेळी देश विकसनशील वरून विकसीतमधे प्रवेशाच्या मार्गावर जाण्याऐवजी विकसनशीलच्याच यादीतून वगळण्यात आला. डॉ ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या मिशन 2020 ची तर तरूणांना भूल ते जाताच पडली, ह्यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं? आमच्या तरूणाईला रोजगार हवाय म्हटलं तर सोशल मिडीयावर भारत-पाकीस्तान अशा मुद्द्यांवरून भरकटवलं जातं आणि आमची तरूणाई ही आज प्रलोभनांना बळी पडलेली आहे. त्यामुळे आजच्या युवकाला विवेकाची फार गरज आहे. सध्या एवढ्यावरच थांबतो.

चैतन्यकुमार देवकर,माळशिरस (सोलापूर)
           योग्य आणि अयोग्य काय हे माहिती असणं आणि आपला फायदा असो किवा नुकसान समाज देश आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवता या गोष्टींना केंद्रस्थानी ठेवून एखादी निवड करणं म्हणजे विवेक .यौवन हा आयुष्याच्या प्रवासातील राजमार्ग असतो विवेकशील असण्याची या काळात खूप गरज असते.एकीकडे मोबाईल व इतर व्यसनांच्या नादी लागून युवकामधील विवेकाचा अंत होताना दिसत आहे .हाताला आणि बुध्दीला  काम नसल्यामुळे झटपट पैसा कमविणे अन् आभासी जगतात वावरणे यातून अस्वस्थता शिवाय घरच्या लोकांनी जाणीव करून दिल्यावर मग विवेक सोडून वाम मार्गाने पैसा कमविणे ,असंगाशी संग धरल्यामुळे खून ,चोऱ्या, बलात्कार असे प्रकार घडत आहेत. मोबाईल हे एक शस्त्र आहे त्याचा वापर आपण कोणत युद्ध लढण्यासाठी करतो हे महत्त्वाचं आहे.तर दुसरीकडे चला विवेकाचा आवाज बुलंद करू म्हणून धडपडणारे युवक देखील आहेत. वाट चुकलेल्या आपल्या मित्र मैत्रिणींना आपण योग्य वाट दाखविली पाहिजे.मी माझ्या २ मित्रांना pubg पासून परावृत्त करू शकलो.अशाच छोट्या गोष्टींनी आपण इप्सिताकडे वाटचाल करून विवेकशील युवकामार्फत देश घडवू शकतो.आपण आता २०२०मध्ये जगत आहोत डॉ अब्दुल कलामांनी पाहिलेल्या स्वप्नांना कुठपर्यंत पूर्ण करू शकलो?? किंवा आपण स्वतः पाहिलेल्या स्वप्नांना कुठपर्यंत पूर्ण करू शकलो याचा विचार व्हायला हवा. आणि युवकांनी विवेकाची कास धरून मार्गक्रमण करायला हवे.

….वि४ व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी चित्रावर क्लिक करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************