मी का लिहीते/लिहीतो? भाग दोन



शिरीष उमरे, मुंबई

कधी कधी मन रेंगाळते निसर्ग सानिध्यात...
 भावनांना फुटतात शब्दांचे अंकुर .. वाक्यांचा  वाहु लागतो झरा लेखणी द्वारे कागदांच्या खडकांवर ...

कधीकधी मन होते उदास...
शब्द गळतात पाणगळीतल्या पोचाळ्यासारखे आणि वाक्यांच्या वावटळीची धुळ करते डोळ्यांच्या पापण्या ओल्या....

कधीकधी मन होते उदिग्न...
शब्दाच्या बेड्या वाक्यागणिक जड होत जातात आणि हशातता रुतते गळ्यात प्रत्येक श्वासासोबत..

कधीकधी मन असते चिडचडे..
शब्दांच्या चाबकांचा मार लोंबवतात वाक्यांची कातडी... डोक्यातले  विचारांचे तांडव शब्दांच्या ज्वालामुखीतुन आक्रांदत होतात वाक्यांचा लाव्हा व सगळे नष्ट करत सुटतात ...

कधीकधी मन असते हलके..
तरीही शब्द उमटतात व वाक्यांच्या झुळकीसोबत आसमंत  धुंद करतात आठवणींच्या झोपाळ्यावर झुलत...

कधीकधी मन असते प्रसन्न...
शब्दफुलांच्या ओंजळी रिते करते सगळीकडे... आनंद वाटत फीरतात वाक्यांच्या सरी चौफेर... सगळे  कसे स्वप्नवत....

कधीकधी मन होते अधिर...
शब्दांच्या घोड्यावर भरधाव निघते वाक्यांची धुळ उडवत...

कधीकधी मन होते वेडे...
प्रेमानी ओथंबलेल्या शब्दांची संततधार वाक्यांना ओलचिंब करुन तृप्त करते आसुसलेल्या धरणीला.....

कधी... कधी...
____________________________________

      किरण पवार, औरंगाबाद

               मी व्यक्त करण्यासाठी लिहतो. माझ्या मनात आलेलं सर्वकाही मला शब्दात उतरवण्याची ओढ लागलेली असते. मी कुतुहलाने लिहू लागलो होतो. मला साहित्य नावाचा प्रकार असतो; हे माहित नव्हतं. मी फक्त कविता आणि कथा लिहायला लागलो होतो. मला लेखकांची ओळखही नव्हती तरी मी माझ्या शब्दातून व्यक्त व्हायचो. बऱ्याचवेळा असं झालं की, माझे शब्द वाचणाऱ्यांना वेगळाच भाव देऊन जायचे. कदाचित त्यावेळच्या वाचणामुळे असेल. वाचण करण्याची सवय आधीपासूनच होती. लहानपणी अल्लदीन, हातीम, एकदा पाहिलेला हॅरी पॉटर आणि सतत शनिवारी मामासोबत पाहिलेले चित्रपट माझ्या मनात नकळत सुप्त अवस्थेत घर करून राहिले असावेत म्हणून कथा लिहायच्या सुचतात. लिखाण केवळ ठरावीक बंधनात ठेवायला मला जमतं नाही. किंवा लिखाणाला नियमांची बंधन असावीत, असं मी मानत नाही. रविंद्रनाथ टागोरांना नोबल मिळण्यापाठीच महत्त्वाचं कारण मला वाटतं ते म्हणजे, त्यांच्या लिखाणातून उमटलेला आत्म्याचा गाभा. जो त्यांच लिखाण वाचताना मलाही थोडाफार अनुभवता आला. भारतातलं प्रत्येक साहित्यिकाचं साहित्य फार अचंबित करणारं आहे; पण अनुभवांपेक्षाही अनुभवांना आत्म्याच जोड दिलेलं साहित्य म्हणजे टागोरांच साहित्य. गीतांजली वाचल्यावर प्रत्यक्ष प्रत्यय येतोच. असो. पण मला माझ्या लेखणात सातत्याची कमी जाणवते. गेल्या वर्षी दोन महत्वाच्या कथा लिहायला घेतल्या होत्या, एक तर डायरीच हरवून बसलो. पण आज पुन्हा वाटतयं सर्व सुरू करावं. मला विश्वास आहे, मी कादंबरी अथवा छानसं पुस्तक लिहू शकतो. पण सध्या मी का थांबलोय? हेच पुर्णपणे मला ठाऊक नाही. बाकी लिखाण हा माझा प्राण आहे आणि मी माझ्या कथा नक्कीच पुढच्या दोन महिन्यात पूर्णत्वास नेईन. धन्यवाद!
___________________________________

वाल्मीक फड निफाड नाशिक.

पावसाच्या सरी जेव्हा आदळतात भुमीवरी,मनामध्ये असतात आनंदाच्या लहरी मग मन म्हणते लिही म्हणून मी लिहीतो.
राञी आकाशाकडे दुष्टी असताना,चांदण्यांची लुकलुक बघताना मन हळूच म्हणते लिही म्हणून मी लिहीतो.
शेतामध्ये फिरताना,बारीक कोंब डोके वर काढताना मन आवाज देते लिही म्हणून मी लिहीतो.
पहाटेच्या मंद गारव्यात असताना,पाखरांची ती प्रेमळ साद ऐकताना आंतरात्म्यातून आवाज येतो म्हणून मी लिहीतो.
संध्याकाळी सुर्य अस्त होताना,तो सोनेरी लोट पहाताना आतून स्वर येतो म्हणून मी लिहीतो.
सुगरण घरटे बांधताना,तिचे ते अप्रतिम विणकाम बघताना मन हळूच चुचकारते म्हणून मी लिहीतो.
वार्याची सळसळ चालू असताना,झाडांची पाने सळसळताना मनी भासते म्हणून मी लिहीतो.
अभंग गात देवपुजा करताना,आत्मानंदी होऊन इश्वराची भक्ती करताना प्रसन्न मन सांगते म्हणून मी लिहीतो.
___________________________________

 संगीता देशमुख,वसमत

आजवर मला 'मी लिहिते' एवढेच माहीत होते. पण या विषयाच्या निमित्ताने मनाला आज प्रश्न विचारला,'मी का लिहिते?' तेव्हा मिळालेले उत्तर असे आहे-
मी माणूस आहे. आणि त्यातही संवेदनशील माणूस आहे. माझ्या आजूबाजूला काय घडतं यावर माझं मन विचार करतं. मला कोणाबद्दल काय वाटतं,माझ्याबद्दल कोणाला काय वाटतं? पण हे सगळं आजवर कधी  जाणवलच नाही. मला जे काही वाटतं,ते मी लिहीत जाते. मला माहीत आहे,या जगात मी शून्य आहे,तरी मी व्यक्त होते. मी लिहिलेले सगळ्यानाच पटेल,असेही नाही,सगळे माझी वाहवा करतील असेही नाही,किंवा सगळे माझ्या लिहिण्यावर हसतील असेही नाही. मी लिहिलेले बरोबरच आहे असेही नाही. माझ्या लिहिण्याने या जगात फारसा बदल होईल असेही नाही. माझं लिहिणं कोणी मनावर घेईल असेही नाही... तरीही मी लिहिते... का??माझ्या आजूबाजूला एक प्रवाह आहे,समाज रीतीचा,त्याच्या रुढीपरंपरेचा! त्या प्रवाहात  वहात जाणं मला सोप्पं आहे. पण मला असं सोप्पं आयुष्य नकोय. माझे विचार बोलून दाखवले तर माझी चेष्टा होईल,कोणी विद्रोही बहिष्कार टाकतील! पण ही मनातली खदखद मी अशीच ठेवली तर ती भूगर्भातल्या उकळत्या लाव्हारसासारखी कधीतरी उचंबळून बाहेर येईल. तेव्हा ती आबादी-बरबादी पहाणार नाही. पण मला हे होऊ द्यायचं नाही.मला माझ्या या विचाराना मुक्त करायचय. जगाची पर्वा न करता या जगात त्यांना विहरू द्यायचं. कोण स्वीकारेल,कोण नाकारेल,याची पर्वा न करता,टिकेला भीक न घालता लिहायचं. मला जे वाटते,त्याचं दमन होऊ द्यायचे नाही,म्हणून लिहिते. त्याची उंची किती? त्याची खोली किती? त्याची पातळी काय?हे निकष न लावता,मला वाटतं,मी लिहावं म्हणून लिहिते....
____________________________________
   

पवन खरात,अंबाजोगाई.

मी माझ्या दुःखाना लिहतो,
तर कधी माझ्या सुखांना लिहतो,
कधी लिहतो दुसऱ्याच्या भावना,
तर कधी मी स्वतःला लिहतो ।

शब्दांना मनात कोंडन कधी जमलच नाही ।
मन होत कधी बेचैन , तर कधी होत अल्लड,
समोर दिसेल तो क्षण मला अधीर करतो,
माहीत नाही का पण तो कागदावरती
मांडल्याशिवाय स्वतःला राहवत नाही।

कधी कधी एकाच शब्दावरती
माझा पूर्ण दिवस जातो ।
व्यक्त होतो जेव्हा कवितेत,
तेव्हा तिथे स्वतःलाच पाहतो ।

विचारांचं थैमान मनात शांतच होत नाही,
नजरे आड केलं तरी मनातून जात नाही ।
मन हलकं होतच नाही तो पर्यंत
जो पर्यंत पेनातील शाही कागदाच्या किनाऱ्यावरती येत नाही ।

लिहतो मी माझा प्रत्येक श्वास,
लिहतो मी माझा प्रत्येक ध्यास,
लिहतो मी माझी प्रत्येक आस,
लिहतो मी तो पर्यंत
जो पर्यंत माझ्या श्वासातील हवा
पूर्णपणे ऑक्सिजन झाली अस मला वाटतं नाही ।
___________________________________

 प्रविण दळवी नाशिक

पोहायचे असले तर पाण्यात शिरायलाच लागते, तसे लिहायचे असेल तर लिहायला सुरुवात करावीच लागते. कोणत्याही चौकटीत न अडकता आणि आपल्या शैलीने लिखाण करा. इथे तुम्हाला मिळणार्‍या प्रतिसादांतून मिळणार्‍या, पटणार्‍या आणि शक्य असणार्‍या सल्ल्यांचा विचार करा... पण स्वतःच्या शैलीवर उगाचच स्वतःला न पटणारी बंधने टाकू नका आणि कोणाची कॉपी तर अजिबातच करू नका. हळू हळू लिखाण करणे तुमचे तुम्हालाच आनंदाचे वाटेल, जे सर्वात महत्वाचे आहे... इतर सगळ्यांना ते सगळे लिखाण आवडेलच असे नाही, मुख्य म्हणजे त्याची गरज नाही आणि तसे नामवंत लेखकांच्या बाबतीतही होत नाही.

तर, उगाच विचार करण्यात वेळ न घालवता लिहायला सुरुवात करा. हजार किलोमीटरांचा प्रवास पहिले पाऊल टाकल्याशिवाय सुरू होत नाही

____________________________________

टीप: वरील सर्व छायाचित्रे गुगल इमेजवरुन घेतलेली आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************