साधता संवाद.. संपतील वाद..


प्रतिक्षा बुध्दे, गडचिरोली 

संवाद? कुठेए संवाद? कुणाचा संवाद... आणि हल्ली साधतंय कोण संवाद?
प्रत्येक व्यक्ति फक्त बोलतेय... अखंड बोलतेय, विनाचिंतन बोलतेय त्यामूळे ऐकायला कुणी नाही... कुणी चुकून बसेलच गप्प ऐकत तर समजून घेत नाही किंवा कदाचित त्यांना समजुन घ्यायचंच नाही. इंग्रजीत एक सुंदर वाक्य आहे
"दी प्राब्लम विथ टुडेस् कम्यूनिकेशन ईस, पिपल लिसन टु रिप्लाय नॉट टु अंडरस्टैंड"
पण खरंतर माणव प्राणी म्हणून इतर सर्वांपेक्षा आपली संवाद प्रणाली खुप विकसीत आहे. आपण आपले विचार, भावना भाषेच्या आधारे अगदी सहजपणे मांडु शकतो तसेच दुसर्यांचे ऐकुन व समजूनही घेऊ शकतो.
'व्यक्ति तितक्या प्रकृति' त्यामूळे अनेकांचे विचार वेगळे, मतं वेगळी विचार करण्याच्या पद्धतीही भिन्न परंतु एखाद्या विषयावर चर्चा करताना समोरच्याचे विचार मनापासून ऐकलं तर काय हरकत आहे?
पटत नसलं तरी ऐकुन घेणं आणि त्या व्यक्ति च्या विचार प्रणाली चा अभ्यास करणं हे आपल्या सारख्या बुद्धिजीवीं कडुन अपेक्षीत असतं. त्यात नुकसान काहीच नसतं, उलट अश्या चर्चांतुन अनेक मार्ग सापडतात, प्रश्न सुटतात आणि याच बरोबर संवाद साध्य होतात. ह्याच संवादातुन संवेदना जाग्या राहतात व विनाकारणचे वाद टाळले जातात.
तर एकंदर स्वतः बोलुन आणि पुढच्याच्याचं शांतपणे ऐकुन, समजून घेतलं तर आपल्या विचारांना ही चलना मिळते व विचार अविरत चालु असल्यामुळे संयम सुटत नाही आणि त्यामुळे वादाचा तर प्रश्न च येत नाही. दुध जसं विरुद्ध बाजुंनी घुसळल्या शिवाय त्याचं ताक बनत नाही तसचं एखाद्या विषयाची प्रत्येक बाजु लक्षात घेतल्या शिवाय त्यावर उपाय निघत नाही उलट गुंता वाढत जातो आणि जर हा गुंता सोडवायचा असेल, वाद मिटवायचा असेल तर प्रत्येकच बाजुवर चर्चा गरजेची असते आणि त्या साठी संवादच साधावा लागतो.
साधता संवाद... संपतील वाद...
____________________________________

निखिल खोडे, पनवेल.

प्रत्येक नात्यांमध्ये संवाद हा प्राणवायू आहे. संवादांची सुरुवात होते ती व्यक्तीच्या मनातल्या विचारांनी. समोरच्याचे मन दुखावणार नाही असं बोलता अाले कि तो संवाद होतो. संवाद ही कला असली तरी त्यासाठी फार मोठ्या कौशल्याची आवश्यकता नाही. एखाद्या विषयावर प्रत्येक व्यक्तीचे विचार सारखेच राहतील असे जरुरी नाही.

एकमेकांवरचा विश्वास आणि संवादा वरच नात्याची भिस्त आहे. संवादामुळे नात्यांमधील दुरावा नाहीसा होतो आणि नाते बहरत जाते. ज्याप्रमाणे फेविकॉल दोन गोष्टी एकमेकांना जोडून ठेवण्याचे काम करतो त्याचप्रमाणे दोन माणसे, नातेसंबंध, व्यवहार जोडून ठेवण्याचे काम संवाद करतो. नात्यांमधील वादविवाद दूर करून नात्यांना सुरळीत चालु ठेवण्याचं काम संवाद करतो.

अनेक लोकांच्या संवादाचे रूपांतर वादविवादामध्ये होते तो फक्त त्यांच्या मधील असणाऱ्या इगो आणि समजून न घेण्याच्या वृत्तीमुळे ... वादविवादामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. परिणामी माणसे तुटायला सुरुवात होतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात काम, कॉलेज, नोकरी यामुळे आधीच वेळ मिळत नाही त्यातच तंत्रज्ञानाच्या अती वापरामुळे नात्यातील संवाद कमी होतोय.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण एकमेकांशी बोललं पाहिजे. आपण संवाद करत नाही म्हणून आपल्यामधील वाद कधीच संपत नाही, हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळेच साधता संवाद.. संपतील वाद !!
______________________________________

अनिल गोडबोले,
सोलापूर

प्राणी आणि मनुष्यप्राणी या मध्ये फरक करायचा झाला तर... माणूस इतर प्राण्यांपेक्षा संवाद साधण्यात अतिशय प्रगत आहे कारण उतकांती मध्ये विचार आणि भावना जशा वाढत गेल्या तशा प्रकारे ते सांगण्याचे, व्यक्त होण्याचे प्रमाण देखील वाढत गेले.. त्यामुळे आपण जर माणूस असू तर आपल्याला उत्तम संवाद साधता आला पाहिजे किंवा... तसा प्रयत्न झाला पाहिजे.

82% पडलेल्या विद्यार्थाने आत्महत्या केली आणि घरातल्या सर्व व्यक्तींना दुःख झालं.. ते सर्वजण अस म्हणत होते की...'ठीक आहे.. आम्ही बोललो असेल त्याला.. अजून मार्क पडायला पाहिजेत म्हणून पण आत्महत्या करण्या एवढं त्या मध्ये काय आहे?'... वर वर हा विषय नैराश्य आणि आजार या बद्दल असल्या सारखा वाटतो.. परंतु हा विषय संवाद कौशल्याचा आहे..

माझ्या मनातील भावना मोकळ्या होतच नाहीत... मग मी काय करू?... समाजात बरीच लेबल लावली जातात... मला दुःख होत आहे, मला वाईट वाटत आहे, मला आनंद होत आहे, अस सांगायची सोय खरतर फॅमिली मध्ये पाहिजे... पण तशी सोय नसेल तर त्या फॅमिली मध्ये तणाव येतात..

कॉलेज मध्ये होणारी प्रेम प्रकरण हा तर सरळ सरळ आकर्षण आणि हॉर्मोन चा घोळ आहे... मग 'मला सेक्स पाहिजे' हे सांगता येत नाही म्हणून मग 'प्रेम' अस नाव दिल जात... त्या मध्ये शारीरिक संबंध आले की प्रेम समाप्त होत... मग ब्रेक अप... आणि व्यसनाधीनता, फसवले जाण्याची भावना... वगैरे.वगैरे...

भावना हाताळाव्यात कशा?... या प्रश्नाचं उत्तर आहे 'योग्य संवाद साधून..' वैरत्व, भांडण, कुरघोडी या पेक्षा वाईट आहे गप्प बसणं..

लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या बाबतीत अस लक्षात आलं की... जवळचा व्यक्ती च या मध्ये आहे... एक तर त्या व्यक्तीला स्वतःच्या भावना हाताळता येत नाहीत... आणि लहान मुलांना सांगता येत नाहीत.. त्यातून जन्माला येते ती विकृती..

चर्चा आणि संवाद यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न सोडवले जातात मग आपल्या वैयक्तिक जीवनात पण सोडवता आले पाहिजेत..

वृद्ध लोकांची सगळ्यात मोठी समस्या ही आहे की त्यांना बोलायला कोणच नाही..
व्यसनाधीनता, tv सिरीयल चे व्यसन, पॉर्न साईट पाहणे, चुकीची आणि अवैध कृत्य करणे, या मध्ये भावनांचा निचरा करणे हाच तर हेतू असतो..

मग संवाद साधा... खोटा इगो.. आणि लहान मोठे पणा सोडा.. बोला.. व्यक्त व्हा.. समोरच्याला कळेल

'हृदयाचा हृदयाशी संवाद करून बघा... त्या सारखी नशा नाही.'
_____________________________________


वाल्मीक फड नाशिक.

आजतरी मुळात संवाद हा कमी झालेला आहे.मुलांचा आईवडीलांचा बर्याच कुटूंबात आज संवाद जवळजवळ नाहीच.आणी याचमुळे बरीचशी मुले डिप्रेशनमध्ये जातात आणि वेगळ्याच घटना आपल्याला घडताना दिसतात.
अनेक वेळेस आईवडीलांचा व मुलांचा एकमेकांशी संवाद नसल्यामुळे एकमेकांत जमत नाही.एकमेकांबद्दल मनात द्वेषभावना मनामध्ये तयार झालेल्या असतात म्हणूनच त्यांनी जवळ बसून एकमेकांचे मन एकदुसर्याकडे मोकळे केले तर माझ्या मते कोणत्याही प्रकारचा वाद त्यांच्यात रहाणार नाहीत.
कोणतेही जे वाद असतील ते संवाद झाल्याशिवाय कधीच मिटणार नाही.म्हणून बरेच लोक म्हणत असतात की,मेलो तरी त्याचे किंवा तिचे तोंड पहाणार नाही पण हा त्याचा किंवा त्याचा मोठा अहंकार आहे असे मला वाटते.हि अहंकारी भावना सोडली तरच दोन व्यक्तीमधील वाद संपतील.
एका व्यक्तीबद्दल मला कमालीची नाराजी होती मी कायम तिचा द्वेष करायचो पण एक दिवस विचित्र प्रकार घडला प्रवासात असताना माझे पाॕकीट गहाळ झाले तोपर्यंत मी तिकीटही काढलेले नव्हते.जेव्हा तिकीट मागण्यासाठी वाहक माझ्याकडे आल्यावर मि खिशात हात घातला,बघतो तर काय पाॕकीट गायब.मला पोटात धसकाच बसला.मि ऊठून मागिल बाजूवर जोरजोरात हात आपटत होतो हा प्रकार ज्या व्यक्तीचा मी सदैव द्वेष करायचो त्या व्यक्तीच्या लक्षात आल्यावर त्याने लगेच खिशातून पैसे काढून माझे तिकिट काढले.मला खुप पश्छाताप झाला वाटले काय वेळ आली ही?पण जेव्हा गाडीतील गर्दी कमी झाल्यावर मिच त्या व्यक्तीजवळ जाऊन बसलो,आमचा संवाद सुरु झाला एकमेकांचे बोलणे मोठ्या प्रमाणात झाले थोडे बोलण्यावरुन माझ्या लक्षात आले की,आपण जशी समजत होतो तशी ही व्यक्ती नाही आहे.
म्हणूनच मला असे सांगावे वाटते की,बहीण असो भाऊ असो,आईवडील असो कींवा मिञमैञिण असो काही वाद असेल तर बिनधास्त जाऊन बोलावे त्यांच्याशी संवाद साधावा म्हणजे एकमेकांचे काय म्हणणे आहे ते एकमेकांना कळेल आणी वाद मिटण्यासाठी मदत होईल अगदी माझ्यासारखी......
_____________________________________

 आफरीन मणेरी, सांगोला.

         संवाद म्हटलं की आपल्या माणसाची आठवण येते आणि कधीकधी आपण आपल्या अहंकारापोटी त्यांच्याशी दुरावतो, असंच काही अनुभवलं मी माझ्या आयुष्यात माझ्या आत्याच्या आणि आजोबांच्या जीवनात. माझी आत्या आणि आजोबा मध्ये काही कारणाने वाद झाला, नंतर माझी आत्या आजोबांची खूप वर्षे बोलली नाही, कधी भेटायला येत नव्हती ,की कधी फोन करत नव्हती खूप वेळा आजोबा तिची आठवण काढून रडायचे ,पण ती कधीच आली नाही .आजोबांना मेंदूचा त्रास होता .आणि एक दिवस त्यांना काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ते कोमामध्ये गेले.  आत्या तेव्हा आली काहीही न बोलता किंवा ऐकता येणाऱ्या आजोबांकडे आठ दिवस त्यांच्या जवळ राहिली पण आजोबा न बोलताच देवाघरी गेले. आत्या खूप रडली पण आजोबा परत येणार नव्हते, तिच्याशी बोलायला किंवा तिच्याशी संवाद साधायला. या गोष्टीवरून मला कळालं कितीही भांडण झालं किंवा काहीही झालं तरी आपल्या माणसांशी कधीही दूर जाऊ नये किंवा संवाद संपवू नये .माझी आत्या त्यावेळेस बोलली असती तर कदाचित तिला पश्चाताप झाला नसता. किंवा आजोबांनाही त्रास झाला नसता. या सगळ्या गोष्टीवरून मला एक धडा नक्कीच मिळाला. संवादांमध्ये एवढी ताकत आहे कितीही  वाद झाले तरी आपण संवाद साधत राहिलो तर ते वाद नक्कीच  संपतील.
____________________________________

प्रविण दळवी 
नाशिक 

दैनंदिन जीवनातील आपल्या समस्यापैकी काही समस्या गैरसमजामुळे निर्माण झालेल्या असतात. गैरसमज समोरच्या माणसाशी जर नीट संवाद साधता आला नाही, आपल्याला काय सांगावयाचे आहे ते नीट सांगता आले नाही तर वाद होत असतो. काही वेळेला समोरच्या माणसाचे बोलणे पूर्ण होण्याआधीच आपण प्रतिक्रीया व्यक्त करीत असतो. आपले विचार आपण सुसंगतपणे अचूक शब्दात सांगत नाही त्यामुळे आपल्याला नेमके काय सांगावयाचे आहे याबद्दल ऐकणाऱ्याच्या मनात गैरसमज निर्माण होत असतो. हे गैरसमज, जीवनातले घोटाळे आणि विविध प्रकारच्या समस्या टाळावयाच्या असतील व जीवनात यशस्वी व्हावयाचे असेल तर आपल्याला संवाद कौशल्य प्राप्त केलेच पाहिजे.

आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक स्वास्थासाठी आपल्याकडे संवाद कौशल्य असायलाच हवे. आपली विविध कामे वेळेत व शांतपणे पार पाडण्यासाठी, सहकाऱ्याबरोबरचे संभाव्य गैरसमज टाळण्यासाठी, मित्राबरोबरची भांडणे टाळण्यासाठी, घरी व नातेवाईकांबरोबर सलोख्याचे संबंध राखण्यासाठी आपल्याला प्रभावीपणे बोलण्याचे आणि लक्ष देऊन ऐकण्याचे तंत्र व मंत्र समजून घेणे आवश्यक आहे.

संवाद कौशल्याच्या बळावर दैनंदिन आयुष्यातले किरकोळ प्रश्नच नाही तर अत्यंत बिकट समस्या व मुश्कील प्रसंग आपण सहजगत्या पार पाडू शकतो. यशस्वी संवाद हा चांगला संवाद असतो. म्हणून उत्तम दर्जाचे संवाद कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी संवाद म्हणजे काय, त्याचे कार्य, प्रक्रिया, प्रकार आणि त्यातील अडसर समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आपण दुसऱ्याशी संवाद का साधतो ?

1. दुसऱ्याला काही माहिती देण्यासाठी

2. दुसऱ्याकडून काम करवून घेण्यासाठी

3. सांगितलेले काम नीट झाले आहे किंवा नाही हे पहाण्यासाठी (फीड बॅक)

4. दुसऱ्याकडून काही मागण्यासाठी

वरील 4 प्रकारचा संवाद साधण्यासाठी खालील प्रक्रिया (प्रोसेस) वापरण्यात येते.

1. काय सांगावयाचे आहे ते शब्दबद्ध करणे (एनकोडिंग)

2. योग्य माध्यमाद्वारे संवाद वहन करणे (मिडियम)

3. ज्याला संवाद पाठवला आहे तो संवाद ग्रहण करतो (रिसिव्हिंग)

4. मिळालेल्या संवादाचा अर्थ लावणे (डीकोडिंग)

5. ज्याने संवाद पाठविला आहे त्याला आपण लावलेला अर्थ कथन करणे अथवा अडचण असल्यास ती सांगणे (रिस्पॉन्सिंग)
____________________________________

सिमाली भाटकर 

          नमस्कार मंडळी विचार च्या व्यासपीठावर खूपच दिवसांनी पुन्हा एकदा मनातलं काही मांडण्यासाठी आलेय. आजचा विषय हा खूपच छान आहे आणि म्हणूनच की काय अचानक संवाद साधून मन मोकळं करावं असं वाटू लागलं.
          आजच्या काळात आपण बोलतो ते फक्त कृतीतून कारण कृती शून्य बडबड म्हणजे अगदी वायफळ चर्चा म्हटली जाते. रोजच जीवन जगत असताना अनेक प्रसंग घडतात, कधी कधी तर काही मुद्दाम घडवून आणले जातात पण याच न पटणाऱ्या आणि न परवडणाऱ्या गोष्टींवरती आपण मौन व्रत धारण करायचं का ? मनाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधायची की चर्चा करून सोडवायची खूपच मोठं गूढ आहे हे नाही का.
            आपला आजचा विषय असाच काहीसा आहे.  अगदी जन्माला आल्या पासून एक गोष्ट निश्चित ती म्हणजे संवाद म्हणजे भूक लागली की बाळ रडत त्याच्या त्या अबोल पणात आई आणि बाळाचं एक सुंदर नात आणि त्यातला संवाद स्पष्टपणे दिसून येतो. आपण जस जसे मोठे होतो माणसांच्या गर्दीत एकटे होऊन जातो. मन मोकळं बोलायला हवा असतो तो संवाद साधून आपलंसं करणार एक मित्र परिवार
           आपल्यावर अन्याय घडत असतो आणि आपण शांतपणे सहन करत असतो, कधी अभ्यास कळतच नाही पण तरी आपण ओरडण्याच्या भीतीने ती गोष्ट कुणाला विचारतच नाही. परिणाम आपण अज्ञानी राहून घाबरत बनतो. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर रोग दूरच पण डॉक्टर आणि त्यांची फी या भीतीने आपण त्यांच्यासोबत बोलायला विसरतो खरतर बोलायच टाळतो अस म्हणायला हरकत नसावी.  माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला बोलायला शिकलच पाहिजे बोलून प्रश्न सुटतात.
         इतिहास जरी पाहिला तर हेच दिसते की अन्याया विरुद्ध बंड करण्यासाठी लोकांनी घोषणा दिल्या आंदोलने केली आणि स्वतंत्र मिळवले. आज 21 शतकात कुठे स्वतंत्र मिळवण्यासाठी जायचं नाही पण वाढत्या मोबाईल आणि इंटरनेट युगात संभाषण हरवून बसलाय आजचा माणूस, एकमेकांना समजून घेण्यासाठी संवाद अपुरा पडू लागला त्यातूनच मग कौटुंबिक हिंसाचार वाढत आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे.
        जेणेकरून नात जपलं जाईल आणि आयुष्य वेगवेगळ्या रंगानी रंगवून जाईल. प्रेमात भांडण असत राग ही असतो पण तो क्षणिक असावा आणि गोडवा मात्र आजन्म असावा. माझ्या नवीन आयुष्यात अशीच गोड नाती मला भेटली ज्यांनी माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांनी फक्त मैत्री नाही केली बरं जोडलं ते थेट हृदयस्पर्शी हृदयाशी नात.
           दोन गोड मैत्रिणींनी साधलेल्या संवादाने माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एक नवीन नात निर्माण केलंय ज्याची वीण ही फक्त संवादाने विणली आणि आता संवादाने टिकणार आहे. 
गोंडस संवादातून निर्माण झालेलं अबोल नात हीच माझ्या नवीन आयुष्याची अनमोल भेट जी मला मिळाली जय च्या रूपात शतशः ऋणी आहे मी त्या गोंडस मैत्रिणींची
     आणि विचार ग्रुप ची ज्यांनी हा विषय देऊन मला मन मोकळं करायची संधी दिली.
धन्यवाद।
_____________________________________
टीप-(सर्व छायाचित्रे गुगल इंटरनेट वरून घेतलेली आहे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************