गाणी आणि मूड

Related image
जयंत शिगवण (मृद्गंध) ,मुंबई.

अजूनही चांदरात आहे
        संध्याकाळ सरली. न जाणो कित्येक तास उलटले असतिल तो आजूबाजूला आजिबात न पाहता आयमॅक मध्ये डोके खुपसून बसला होता फक्त, समोरचा चहाचा गारढोण झालेला पण तरीही काठोकाठ भरलेला मग त्याच्याकडं एव्हाना तिरसट कटाक्षानं पाहत असावा बहुतेक. 

एरवी शोधूनही चहा न मिळणार्‍या जागी थट्टेनं हा होईना ' चहा घेणार का कोणी?' असं विचारलं तर आवर्जून 'एक कटिंग इकडं पण' म्हणणारा हा, आज सकाळपासून जरासा शांतंच होता. आवरत आलेल्या भयपटाच्या टीझरमध्ये एडिटिंग सिक्वेन्सला पोस्ट क्रेडिट मागं काहीतरी धुन लावायला हवी या विचारात त्यानं गूगल ला हात घातला आणि योग्य त्या साऊंड ट्रॅक साइट वर जाऊन टेस्ट ट्रॅक वर क्लिक करणार इतक्यात अचानक कानांवर लावलेल्या हेडफोन्स मधुन ती तान झंकारली. गूगल अॅडवर्ड ची सुरेल जाहिरात असावी ती, त्यातले शब्द अचानक मधूनच सुरू झाले आणि काळजाचा ठोका चुकला मात्र त्याच्या. *' पुन्हा पुन्हा भास होत आहे, तुझे हसू आरश्यात आहे. '* 

बस्स...... त्यावेळेस डोळे घट्ट मिटून घेतले यानं पण मिटल्या पापण्यांच्या पटलामागं याच्या गतआयुष्याची गीत मैफिल सजायला तितकासा वेळ लागला नाही. एकेक प्रसंग डोळ्यासमोर रुंजी धरू लागला, त्या शब्दांची खोली पुन्हा जाणवू लागली. एकेका ओळीअखेर श्वास गडद आणखी गडद होऊ लागला त्याचा भावना अश्याच असतात वेड्या, त्यांना सावरणं म्हणजे काय माहित नसावं पण निव्वळ उसळता मात्र येतं बहुतेक. 

विचाराविचारांच्या नादात तिचा चेहरा नकळत डोळ्यांसमोर आला आज पुन्हा त्या ओळी ऐकुन. नाजूक भुवया, मधोमध खुलून दिसेल अशी लहानशी चंद्रकोर, तिच्याच खाली कपाळावर टिकलीवजा गोंदण, त्या चंद्रकलेच्या पूर्णत्वाला मोठेपणी न्याय द्यावा म्हणून लहानपणीच गोंदून घेतलेलं असावं बहुतेक. ओठांवर तेच हास्य, तोच भाव, तीच लाघवी मुद्रा! 

डोळ्यात राग आहे तिच्या पण तरीही याच्याकडं पाहून फक्त यालाच ऐकु येईल अश्या आवाजात का कोण जाणे नाजूकपणे ती त्याला अजूनही जणू सांगतेय, *' सख्या तुला भेटतील माझे, तुझ्या घरी सूर ओळखीचे.'*

होय! त्याला आज पुन्हा त्या स्वरांनी तिची ओळख करून दिली होती. संपूर्ण कोलमडली होती ती, तेव्हा तिच्या आयुष्यात आला हा, त्यानंतर कसा, किती आणि केवढा वेळ गेला काहीच कल्पना नाहिये. सगळं व्यवस्थित सुरू होतं पण अचानक एक दिवस आयुष्यभर साथ द्यायचं वचन देणारा हा एका अमोघ वळणावर तिला तिच्या नशिबावर सोडून खूप पुढं निघून आला होता आता. यानं निर्वाणीचा निर्णय काय म्हणून विचारल्यावर ' माझ्यात गुंतू नका ' एवढेच काय ती म्हणाली त्याला त्यादिवशी आणि यानं आजिबात विलंब न करता लगेच गुंता सोडवला सुद्धा नात्यांचा! तिच्या स्वरांचा पारिजात जरी त्याच्या अंगणी डौलानं उभा असला तरी त्यातलं प्रत्येक फूल आज याच्याकडं अपराधी म्हणून कसं पाहत असतं हे त्यालाही चांगलंच माहित झालंय आता सरावानं. 

चूक कोणाची हा सवाल इथं ग्राह्य न्हवता, त्याला ठाऊक होती तिची तळमळ, तिलाही दिसत होता त्याचा संघर्ष त्याची अगतिकता पण करणार काय दोघंही! नुसत्या फोन वर सुरळीत चाललेल्या नात्याला एका ठराविक चौकटीमध्ये नाव देऊन बांधायला हा एका पायावर तयार होता पण तिच्या मनाची तयारी शेवटपर्यंत झालीच नाही कधी! वाट पाहिली यानं तिच्या सोबतीची पण नाही झाली सफल त्याची तेवढी एक आकांक्षा. त्याला मान्य नसताना त्यानं का तिचा एवढा विचार करून स्वतःच्या मनाला आवर घातला ते कोडं त्याचं त्यालाही अजून सुटलेलं नाहिये. तिनं रस्ते बदलायचा शब्द टाकला असला तरी पाऊल मात्र यानंच उचलेलं पहिलं म्हणून हा अजूनही या सगळ्या प्रकाराचं ओझं त्याच्या पाठीवर मानानं वागवतोय एकटाच.

काही धुन, शब्द आणि गाणी आधी कानांवर आणि मग मनांवर असा काही परिणाम घडवून आणतात की माणसानं त्याचं स्वत्व विसरावं आणि एका अश्या दुनियेत प्रवेश करावा जिथं त्याला ओळखणारे सगळे असतिल पण त्याच्या हाकेला साथ देणारं कोणी नसावं. गाणी माणसाला जगायला भाग पाडतात ऐकलं होत त्यानं पण ती फक्त निव्वळ जगण्याचं बळ कधीचं देत नसतात. किंबहुना ती आरसा म्हणून एक भूमिका पार पाडत असतात आणि आपण त्या आरशात डोकावलो तरंच किती पाण्यात आणि किती जमिनीवर आहोत याचा अंदाज लावता येतो. माणसाचा मूड तयार करण्यात गाण्याचा जेवढा हात आहे अगदी तेवढाच हात रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून अचानक मूड उडवून डोळ्यांत नकळत पाणी दाटून आणण्यात पण आहे. 

गुंतू नका म्हणून अलगद बाजूला सरणारी ती आजही त्याला अशी अनामिक भेट देऊन जाते ती या शब्दांनीच. तिच्या मनाला जपण्यासाठी स्वतःच्या भावी आयुष्यातल्या स्वप्नाची राखरांगोळी करणार्‍या याला हे शब्द शांत बसू देत नाहीत. उगीच  स्वप्नांत चांदण्यांची आर्जवं करणार्‍या याला आज त्यांची अॅनिव्हर्सरी की काय म्हणतात अगदी त्याच दिवशी या गाण्याच्या बोलांसोबत मन हेच विचारत होतं, *' खरंच दिलंस का प्रेम तू कधी कुणाला जे तुझ्याच अंतरात आहे? '* त्यावेळी त्याला शेवट नक्कीच वेगळा करता आला असता पण वेळ त्याच्या सोबत न्हवती म्हणूनंच की काय त्या वेळेपुरता कोसळलेल्या पण राखेतून फिनिक्स सारखी भरारी मारून पुन्हा उभ्या राहिलेल्या याला स्वतःच्याच धुंदीत चालताना, भोवतालच्या पाखरांचा कलकलाट थांबल्यावर सुरेश भटांच्या साक्षीनं  मनातला आवाज आजही हेच सांगत असतो, जर ती स्वतःहून पुन्हा श्रावण सर बनून बरसली तर तू सुद्धा मृद्गंध होऊन तिला कवेत घे..., *अजूनही चांदरात आहे...!*

____________________________

Image result for music and mood
किरण पवार,औरंगाबाद,

              इ. 11-12वीत असतानापासून गाणी ऐकायची खास सवय जडली. म्हणजे माझा भाऊ आणि मी आम्ही एकरावीत असतानापासून रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित यांसारख्या विषयांचा अभ्यासच गाणे ऐकत केला आहे. पेपर लिहताना गाण्यावरून आम्हाला बऱ्याचदा उत्तर आठवायचं. याची तशी मदत फार झाली दोघांनाही. पण हे सोडता नंतर काही गाणी ह्रदयात खोलवर रूजत गेली. मला रात्र नेहमी एका वेगळ्याच प्रकारे अस्वस्थ करते. आणि त्यात मी रात्री गाणी ऐकतो ती एकदम शांत प्रकारची खास करून ए. आर. रेहमान, हरिहरन, साऊथ इंडियन काही खास ज्यांचा अर्थ अजूनही कळत नाही. मला मुळात तीच माझी ठरलेली गाणी ऐन रात्रीच ऐकाविशी वाटतात. कारण रात्रीत मी स्वत:शी एकरूप असतो. मला माझ्यातला अंतरंग त्यावेळी साद घालत असतो.
              मी बऱ्याचवेळा पूर्णपणे भावनाशून्य होऊण जगतो. म्हणजे माझ्यासोबत असं बऱ्याचदा होतं की, मी गाण्यांनादेखील रिएक्ट होतं नाही मग आजूबाजूच्या स्थितीचं तर बाजूलाच राहिलं. माझ्यात कधीकधी पूर्णत: भावनाशून्य राहण्याची खास कला कदाचीत मी एकरावी-बारावीत ऐकत असलेल्या रेडीओवरील जुन्या गाण्यांच्या खास लिरिक्स व म्युझिकमुळे आली असावी. बाकी गाण्यांमुळे पावसाळ्यात मूड फ्रेश राहतो. आणि परिक्षेच्या काळात गाणी फार महत्वाची ठरतात; हा आजवरचा वैयक्तिक अनुभव आहे. धन्यवाद!

____________________________

Image result for music and mood
मयूर, अमरावती.

लिहण्याचा प्रयत्न करतो आणि आज पुन्हा एकदा लिहितोय.
आणि आज प्रयत्न करतो अस्सल वऱ्हाडी भाषेचा.
म्या तर आजपर्यंत कोणासाठी गाणं ऐकलं नाही रे बा.
पण आज मी गाणं ऐकतो कारण आपलं कोणीच नाही राहिला रे बा.
गाणे ऐकण्यासाठी किंवा ऐकवण्यासाठी कोणीच नाही रे बा.
ज्याच्या नावाचे आणि ज्याचा साठी गाणे ऐकतो रे बा.
तो तर आज हेडफोन लावून गाणे ऐकतो रे बा.(दुसऱ्याच्या नावाचे)
अन तुम्हाला सांगायचं म्हटलं म्हणजे मी जे काही गाणे ऐकतो ते कोणाच्या गम मध्ये नाही रे बा.
फक्त यासाठी ऐकतो की जिंदगी कटाव. आणि आपण आपलं खुश रहावे आणि तिने तिची खुश रहावे यासाठीच गाणे ऐकतो. आणि तुम्हाला एक सांगतो जर मूळ असला ना तर लोकांच्या वरातीत पण नाचलो आहे. आणि मूळ जर माझा नसला ना तर गाणे वाजणारा मोबाईल पण फेकून दिलेला आहे.
आणि तुम्हाला एक सांगू का गाणे कोणासाठीच नसतात अन गाणे कुणासाठीच ऐकायचे नसतात.
अन गाणे ऐकायचं असले तर स्वतःचे मूळ फ्रेश करण्यासाठी ऐकायचे असतात पण तुम्हाला सांगू काय मी तर तेच करतो रे बा.
मागच्या वेळेस मी काहीतरी लिहिले असताना कोणतरी म्हटलं होतं दिलजले आहे पण मी दिलजले नाही आम्ही करपलेले आहो.
म्या तर आज पर्यंत गाणे ऐकायला मजा जर घेतला असेल तो हाय फक्त गाडीवरून लांबचा प्रवास करत असताना हेडफोन घालून तर ते कशासाठी तो प्रवास लांबचा होऊ नये म्हणून फक्त.
आणि कधी कधी तर मौसम जर चांगला असला ना तरच गाणे ऐकले आहे आणि कधी कधी तर थंडी हवा कानाच्या माध्यमातून डोक्यात जाऊ नये म्हणूनही हेडफोन घातलेले आहेत .
अन् आता तुमच्या  सगळे ले एक शेवटचं सांगतो
गाणे ऐकायचे असली तर मूळ बनव लागते .
अन मूळ बनला तर गाणे ऐकावे लागते .
तर म्हणतात मेंटली डिस्टर्ब असेल तर गाणे ऐकावे म्हणतात (पण आमच्याकडे त्याच्यापेक्षाही रामबाण उपाय आहेत)
म्हणून त्या विषयाला सोडून आपन काही बोलू शकत नाही. पण एक सांगू का हेडफोन घालून गाडीवर प्रवास करणे यात अर्धी जिंदगी गेली आता मला असं वाटते  अर्धी जिंदगी राहिलेली बायको लेकरा सोबत तरी घालवाव(लग्न व्हायचं आहे बरं अजून)
आन गाणे आणि मूळ , आणि मूड आणि गाणे हे दोघे आहेत ना समदुखी माणस आहेत.
आणि समदुःखी माणस आहेत ना ते लय डेंजर असतात बरं.
अंजर मूळ असला ना तर मूळ नुसार गाण्याचा वापर करायचा
अन जर गाणं असलं ना तो मूळ नुसार त्याचा वापर करायचा.
आन म्या जे आज लिहिलं ते गाणं ऐकून नाही तर मया आजच्या मुड नुसार लिहील.
आवडलं असेल तर सांगा नाही तर आहेच आपले हेडफोन.

____________________________
Image result for music and mood
प्राची सुलक्षणा अनिल, मुंबई. 

सगळ्यात आधी ऍडमिनने हा विषय निवडल्याबाबत त्यांचे मनापासून धन्यवाद.. कारण गाणी आणि मूड यांचा अगदीच घनिष्ठ संबंध आहे आणि या विषयावर बोलण्यासारखं खूप काही आहे.. कुठल्याही गोष्टीवर व्यक्त होताना बऱ्याचदा माझ्यासारखी रोमँटिक मुलगी गाण्याचा आधार घेते.. का न घ्यावा.. ज्या भावना आपल्याला शब्दात मांडता येत नाहीत त्या किमान गाण्यातून तर व्यक्त व्हायलाच हव्यात ना.. माझ्या लहानपणी दूरदर्शनवर रंगोली कार्यक्रमात शाहरुख खानचं एक गाणं लागायचं, 'चांद तारे तोड लाऊ, सारी दुनिया पर मैं छाऊ, बस इतना सा ख्वाब हैं..' हे गाणं ऐकताना कसलीशी भारी फिलिंग यायची कि मलापण शाहरुख सारखी सगळी दुनिया जिंकायचीये.. त्याच्या त्या 'तू हैं मेरी किरन' गाणं ऐकताना तर आपणही कुणावरतरी एवढं प्रेम करावं असं वाटायचं आणि त्या फँटसीमध्ये मी रमून जायची.. शाळेत असताना पण ६ वी मध्ये एक कविता होती वि दा सावरकरांची आणि ती आम्ही चाल लावून म्हणायचो.. रक्तात भिनलं होतं ते गाणं माझ्या आणि त्याच गाण्यामुळे नंतर मी सावरकरांचं 'काळे पाणी' आणि 'माझी जन्मठेप' हि पुस्तकं वाचली होती आणि मी सावरकरांची फॅन झाले.. मग ८वीत असताना लता दीदींचं 'ऐ मेरे वतन के लोगों' हे गाणं समजलं (समजलं यासाठी कि याआधीही खूपदा ते ऐकलं होतं पण खऱ्या अर्थाने ते यावेळी समजलं) आणि हादरून गेले होते.. मग त्या गाण्यापासून इन्स्पायर होऊन बॉर्डर मुव्ही बघितली.. दोन दिवस त्याच जगात वावरत होते मी.. मला समजतच नव्हतं कि कुठून येतात ही एवढी शूर माणसं.. त्याचवेळी मी आर्मीच्या आणि आर्मीवाल्यांच्या प्रेमात पडले होते.. त्यातल्या त्यात, 'कर चले हम फिदा जानो तन साथीयों, अब तुम्हारे हवाले वतन साथीयों' हे गाणं ऐकतानाच मला रडायला यायचं.. 

शाळेत १० वीला असताना स्लम डॉग मिलेनियर मुव्ही आली होती.. त्यातल्या जय हो गाण्यानं मला वेड लावलं होतं.. म्हणजे ना त्या गाण्यात जुनून होता.. काहीतरी मिळवायची धडपड होती.. तसलंच काहीतरी माझ्या डोक्यात चाललेलं असायचं आणि म्हणून ते गाणं मला आवडत होतं.. १० वी तर चांगल्या मार्कांनी पास झाले पण त्यानंतरच्या एका वर्षात मला जबरदस्त फेल्युअर आलं.. मग तेव्हा कैलाश खैरचं 'टुटा टुटा एक परिंदा ऐसे टुटा, के फिर उड ना पाया.. लुटा लुटा किस ने उस को ऐसे लुटा, के फिर जुड ना पाया..' हेच एकमेव गाणं माझ्या डोक्यात होतं.. भयंकर डिप्रेशनमध्ये मी होते आणि माझ्यासोबत माझं ते गाणं एवढंच काय ते होतं.. 

त्यानंतर कॉलेजला असताना इंग्लिश लिटरेचरमध्ये रोमँटिसिझम शिकत असताना तर आणखीनच गाण्यांच्या प्रेमात पडले. या कॉलेजच्या काळात खूप अभ्यास केला कारण इथं स्वतः ला सिद्ध करायचं होतं आणि त्यावेळी 'वो सिकंदर ही दोस्तों कहलाता हैं, हारी बाजी को जितना जिसे आता हैं' हे गाणं आवडत होतं.. कॉलेजमध्येही चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर नगरमधल्या सामाजिक संस्था स्नेहालयात नोकरीला लागले आणि तिथं तर माझं आयुष्यच बदललं.. लोकांना भेटून त्यांची मदत करताना देशभक्ती काय असते ते समजायला लागलं.. याच काळात पोलिसांसोबतही काम करायला मिळाल्याने पोलीस खात्याविषयीही आदर वाढला.. या सगळ्या धावपळीत मात्र रोमँटिसिझम मनातच होता.. तेव्हाही हिंदी जुनी गाणी मनात घर करून होती कारण माझ्या घरी बाबांना ही हिंदी जुनी गाणी ऐकायची सवय होती.. ही गाणी मला कधी आवडायला लागली समजलंही नाय.. 

आणि आत्ताही मी ते 'अफसाना लिख रही हूँ दिल-ऐ-बेकरार का, आँखो में रंग भर के तेरे इंतजार का' या गाण्याची फॅन आहे.. त्याचप्रमाणे 'मेरे दिल में आज क्या हैं, तू कहे तो मैं बता दु', चलते  चलते, मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना', तू, तू हैं वही, दिल ने जिसे अपना कहां, तू हैं जहां, मैं हूं वहां' या गाण्यांची जबराट फॅन आहे.. या गाण्यांनी माझा कितीही खराब असलेला मूड क्षणात बदलतो.. कधी कधी तर मी विचार करते कि जर ही गाणी नसती तर मी डिप्रेशनमध्ये केव्हाच आत्महत्या केली असती.. पण असो, देवाक कालजी म्हणून माका ही गाण्याची आवड लागली असा.. अन मी जगले वाचले.. 

अगदी आता मुंबईला आल्यानंतर मला एका निवांत क्षणी गिरगाव चौपाटीला जायला मिळालं.. खरं तर समुद्र हा माझ्या आवडीचा विषय आणि मुंबईला काम करायचं माझं लहानपणापासून स्वप्न होतं.. तेव्हा गिरगावला गेल्यानंतर त्या समुद्रकिनारी समुद्राचं संगीत ऐकताना मी स्वतः ला विसरले होते.. आणि मुंबईत तर दिवस दिवसभर पाऊस पडतो.. कामातून वेळ मिळाल्यावर संध्याकाळी हे पावसाचं संगीत ऐकायलाही मजा येते.. अशी ही मी गाण्यांची शौकीन प्राchi  आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत संगीतमय आणि रोमँटिक राहो एवढंच काय ते स्वप्न.. बाकी जग तर आपण जिंकणारचेय.. 

----------------------------------------------
Image result for music and radio listen
अनिल गोडबोले,सोलापूर.


मला आठवत की मी रेडिओ ऐकत मोठा झालो.  जवळपास 12 वि पर्यंत कोकणातल्या घरात टेलिव्हिजन नव्हता पण सर्व गोष्टी घरबसल्या पोहोचवण्याचे साधन म्हणून रेडिओ होता..

खर..खर... करत लागणारे विविधभारती हे अतिशय आवडत स्टेशन होत.. सांगली आणि मुंबई 'ब' (आताची अस्मिता वाहिनी).. या मुळे उत्तम प्रतीच्या साहित्याची व संगीताची ओढ लागली.

त्यामुळे मला संगीत अतिशय प्रिय आहे. (बायको पण संगीता नावाची मिळाली.. असो) 
सकाळी सकाळी वंदे मातरम ऐकू यायच.. आणि ते रेडिओ वर ऐकायचो..
भक्ती गीत असायची "नांदतो देव हा आपुल्या अंतरी" किंवा समूह गीत "जात कोणती पुसू नका .....उद्यानातील फुलास त्याचा रंग कोणता पुसू नका"... या ने सकाळ व्हायची..

त्या नंतर नवीन व जुनी हिंदी गाणी लागायची.. सकाळी शाळेला जाई पर्यंत गाणे ऐकायचो..

दुपारी नाट्य संगीत असायचं"वद जाऊ कुणाला शरण ग.."  किंवा "घाई नको... बाई अशी मी.. आले रे बकुळ फुला." अशी नाट्य गीत सगळी ऐकायचो.. बातम्या मला विशेष आवडायच्या नाहीत 

संध्याकाळी जवान लोकांसाठी पत्राद्वारे आणि नंतर फोन द्वारे गाणे ऐकवले जायचे...

कीर्तन, भारुड, पोवाडे, समूह गित आणि फटका .. भीमसेन जोशी यांचे अभंग रोज ऐकत असे..

तसच रात्री भुले बिसरे गीत ऐकायचो "तेरा मेरा प्यार अमर फिर क्यू मुझको लगता है डर.." हे वाक्य तुम्ही सरळ म्हणूच शकत नाही.. लयीतच येत.. 
"दुनिया बनाने वाले क्या तेरे मन मे समाई.." कळत नव्हतं पण हृदयात मात्र जात असे..

कॉलेज ला असताना टेप होता .. मोहबते, धडकन, काहो ना प्यार है.. याच्या कॅसेट असायच्या(एकदा तर मी कॅसेट चोरली देखील)..

गावात लग्न किंवा काही कार्यक्रम असला की "आधी वंदू तुझं मोरया" अस कर्णयावर वर ऐकलं की" आये हो मेरी जिंदगी मे तुम बहार बनके.."यायचच (शाळेतली एखादी क्रश आठवायची ना..) "तुझे देखा तो ये जना सनम" तिकडे भात शेतीत आपण शाहरुख खान समजायचं स्वताला... 

अजून ही गाणं ऐकतो (गाण्याचा क्लास लावलेला ... पहिली परीक्षा दिली..पण.. नको ... नंतर बोलू त्यावर) आता मोबाईल आला आणि वाट्टेल ते गाणं ऐकत जातो..

मराठी आणि हिंदी सोबत इंग्लिश पण आवडत आहेत. कधी कधी मल्याळम, तेलगू, कन्नड, तमिळ पण ऐकतो... सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे... जयंम मधील "चिंन दो" गाण्याने वेड लावले।होते..

कोकणी माझी भाषा.. त्यामुळे पणजी केंद्र आणि कोकणी गाणी ऐकायचो... आता इकडे ते काही नाही..

असो... खूप लिहिलं.. कधी संगीत आवडत, कधी शब्द, कधी चाल आवडते तर कधी ठेका...
मला वाटत संगीत आहे म्हणून माणूसपण आहे.. 

रिमिक्स येऊ द्या किंवा काही होऊ द्या.. संगीत अजरामर राहीलच..

आवरतो आता..!!

----------------------------------------------
Image result for music and mood
करिश्मा डोंगरे, पंढरपूर

          आपण आपल्या मूडनूसार गाणी ऐकतो नेहमी.गाणी पन तशीच असतात.गाणी ऐकली की मूड एकदम छान होतो.एकदम फ्रेश मूड होतो,उत्साह निर्मान होतो.शांत वातावरनात गाणी ऐकायला खरे तर छान वाटते.जर वार्याची एकही झूळूक नसेल पूर्ण वारे बंद झाले असेल तर एकच काम करायचे एखादे शांत असे गाणे लावून बघा लगेच झाडांची पाने हालायला लागतात, मंद अशी हवा चालू होते.गाण्यात एवढी गोडी असते,संगीतमय वातावरन तयार होते.कोनतेही गाणे असो,अभंग,भारूड,ओवी,पोवाडा त्या त्या वातावरनात ऐकायला खूप छान वाटते.एखादे खूप राग आला की, शक्यतो येतोच हं तर त्यावेळी कोनावरही न रागवता काहीच कोनतीच गोष्ट करायची नाहीये.फक्त तीथून निघून जाउन गाणी ऐकली की राग निघून जातो.संगीतातले राग ऐकून आपल्या मनातला राग पळून जातो.मग शांत मनाने घरी जायचे.
       खरे सांगायचे झाले तर,आता पहील्यासारखी गाणी नाहीत.ऐकावी अशी वाटतच नाहीत.पहीली गाणी अर्थपूर्न होती.प्रत्येक कडव्याचा शब्द न शब्द समजत होता.आता तसे नाहीये त्या गायकाला आपल्याला काय समजवून देयचे आहे हेच समजत नाही.गान्याचे बोल काय आहेत तेच समजत नाही,नुसते ते धडाधडा फक्त सांउडचा आवाज.आताचा पीढीला तेच आवडतेय काय कसले कलियूग आहे.काय म्हनतात बर? हा ते डीजे लावा म्हन.कसला तो डीजे आणि काय पूर्ण त्या  गाण्याचे वाटोळे करून टाकतो.कधी कधी याच्यामूळे तर हार्ट फेल होतात.असल्या डीजे मूळे मूड येत नाही उलट जातो.मन स्थिर राहत नाही.काहीच फायदा नाहीये याचा तरी मानसांना तेच आवडते.जे चूकीच आहे ते लगेच घेतात आणि जे बरोबर आहे ते त्याच्याकडे बघनार पन नाहीत.खूप मोठ्या प्रमानात डीजेमूळे ध्वनीप्रदूषण होतेय.शांत गाण असले की त्याला मीक्स करून त्याच वाटोळ करून टाकतात.
           जूनी गाणी ऐकताना त्या गाण्यातच मग्न होवून जायचे,हारवून जायचे त्यातच,पण आता गाणे ऐकले की मन हारवत नाही उलट विचलीत होते.हे डीजे थांबले पाहीजते खरे तर.संगीताच्या मैफीलीत हरवून जायला पहीलीच गाणी पाहीजेत.
----------------------------------------------------------------------------------

____________________________
Related image
यशवंती होनमाने .मोहोळ .

     गाण्याचा आणि मूडचा खुप जवळचा संबंध आहे .म्हणजे बघा ना आपण जसा आपला मूड असेल तस गाणं ऐकतो .आपण जर आनंदी असू तर सगळे हेपी मूड वाले गाणी ऐकतो आणि जर sad असू तर सगळी sad वाली गाणी ऐकतो .बऱ्याच वेळा आपण आपण आपल्या फीलिंग्सची तुलना  गाण्यासोबत करत असतो .जस की 'आके तेरी बाहो में हर शाम लगे सिन्दुरि ' हे गाणं ऐकताना असं वाटत की आपणच त्या बीच वर आहोत .
    ' रिमझिम गिरे सावन ' हे गाणं ऐकताना पावसात नसताना सुध्दा पावसात भिजल्याचा फील येतो आणि ' दमलेल्या बाबाची कहाणी ' ऐकताना पण डोळे ओले होतात .' सुन्या सुन्या मेहफिलीत माझ्या ' ऐकताना सगळा भूतकाळ आठवतो आणि ' जिंदगी हर कदम इक नयी जंग हैं ' हे ऐकलं की जगण्याची उमेद मिळते .....
     खरंच गाणी आणि मूड एकाच  नाण्याच्या दोन बाजू आहेत .....एखादी लावणी ऐकताना नटखट भाव मनात येतात .' झाल्या तिन्ही सांजा ' ही लावणी ऐकली की सजणा ची हुरहुर मनात दाटते ......असा हा गाण्याचा आणि आपल्या मूड चा प्रवास , , , , , , कधीही न समाप्त होणारा , , , अखंड ....! ! ! ! 
____________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************