निसर्गाच्या सानिध्यातील सफर...

निसर्गाच्या सानिध्यातील सफर...

करिष्मा डोंगरे,पंढरपूर.
     खूप छान पाऊस पडत होता. सुंदर असे वातावरण झाले होते.लगेच मन आकर्षित होइल असे.मी बसले होते बसच्या खिडकी-शेजारीच मस्त पावसाचा आनंद घेत.हात खिडकीतून बाहेर काढून त्या टिपटीप पडणार्या थेंबाना झेलत ,आणि त्या थेंबाना हातातून निसटून जाताना खूप आनंद वाटे.लगेच तुमच्या डोळ्यासमोर चिञ उभे राहीले ना?
        पण तसे काहीच नाहीये माझा सफर जरा वेगळाच आहे,संघर्षमय आहे.आमचे सात जणांचे कुटूंब होते.आई-वडील आणि आम्ही पाच बहीनी.आमचे सगळे शेती आणि दुध व्यवसायावर चालत असे.तरीही आम्हाला सर्वांना खूप शिकवले.
        आमच्याकडे त्यावेळी दुध वाढायला जाण्यासाठी काहीच साधन नव्हते,साधी सायकलही नव्हती.त्यामुळे रोज एकाने दुध वाढायला गावात जायचे.कदाचीत मी पाचवीला असेन तेव्हा,दुध वाडायचा माझा नंबर होता त्यादिवशी आभाळ गच्च भरले होते.अगोदरच मनाशी ठरवले होते पटकन दुध वाडून माघारी यायचे,तेवढ्यात पावसाने मधेच गाठले. अंधार तर खूप पडला होता.  एकदम विजा चमकायला लागल्या हातात पाच लिटरची कीटली त्या कीटलीबरोबर मी पन आवाजाने लटपटायचे.पण दुधाचा एकही थेंब सांडू दीला नाही.खुप मनात यायचे चला माघारी जाउ पण लगेच आठवायचे त्यामागचे आई-वडीलांचे कष्ट.समोरून एकदम वारे यायचे आणि मी पन त्याच्याबरोबर मागे जायचे, मी पन तेवढ्याच जोराने पुढची वाट चालायचे.रस्ता तर असला होता की एक पाय काढला की दुसरा पाय घुसायचा यामुळे सगळा फ्रॉक भरला होता चिखलाने.चप्पलचा तर काय प्रश्नच नव्हता.आईने सांगितले होते काही संकट आले की देवाचे नाव घेयचे असे करत मी गावात पोहचले, सगळेजन डोळे मोठे करून माझ्याकडे बघत होते.आणि एकच चर्च्या चालू झाली हानमातात्याच्या पोरी लय घट आणि हुशार.वडीलांचे नाव हनमंत होते.एका मानसाने मला चॉकलेट दीले मग मी त्याच आनंदात घरी पळत सुटले,कारन हातात मोकळी कीटली दुध तर वाडले होते.तरीही तेवढाच पाऊस अजुन चालू होता.
      मी पळत घरी चालले तेवढ्यात आई समोरच.आईने जवळ घेतले आणि रडायला लागली आणि मी हसत होते कारन मला दुध वाडले त्याचे समाधान होते.मग आम्ही दोघी घरी गेलो आणि आम्ही बहीनींनी मिळून चॉकलेट खाल्ले त्यावेळी तेवढेसुध्दा मिळाले की खुप आनंद होयचा.असा होता माझा निसर्गाच्या सानिध्यातील संघर्षमय सफर.
-------------------------------------------------

दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे,वाशिम
    अशा अनेक सफरीवर मी गेलो आहे किल्ले सफर, लेणी सफर, थंड हवेच्या ठिकाणी सफर ई सर्वच सफरी  निसर्गाच्या सानिध्यातीलच होत्या पण त्यातही सगळ्यात अविस्मरणीय म्हणजे आमच्या गावाकडील जंगलातील सफर.

    उल्लेख करायचा झाला तर जंगलाचे नाव कापडसिंगी चे जंगल,भयाण शांतता असलेलं हे जंगल ( फार पूर्वीचं ) लहानपणीपासून तर आजपर्यंत आठवण राहणाऱ्या खऱ्या खुऱ्या सफरी इथल्याच, दर वर्षी गावाकडच्या देवीची एकदिवसीय यात्रा भरते आणि या यात्रेला जाणारी वाट याच जंगलातून जाते.

    लहानपणीची याच जंगलाची सफर अजून कालचीच वाटते, ती एकेरी अरुंद वाट तिचे ते नागमोडी वळणं, माळावरून उतरतं असताना मऊ मातीवरची घसरगुंडी, थोडं जंगलात आत शिरले की पुढे चालताना विविध पशु-पक्षी यांचे आवाज, सागाच्या जमिनीवर पडलेल्या वाळलेल्या पानाच्या खालून येनाऱ्या सारपटण्याच्या आवाजाने दचकून पावलांची अचानक गती वाढू लागते. ( अंगावर शहारे डोक्यात सगळा गोंधळ उडालेला ) पुढे चालत चौघांचा ग्रुप असूनही जंगलातून जाताना मनातील ती हुरहूर ( हुश्श ) पुढे चालत जाऊन पाचर्णे काकांचे शेत आले की तोंडाला पाणीच सुटते ( अवळीचे झाड बघून ) तेथील आवळे खाण्याची मजाच वेगळी. पुढे काय मग संपले जंगल की मजाच संपली.
--------------------------------------

निवृत्ती खारोडे,अकोला
              निसर्गाशी मैत्री म्हणजे...सफर... भटकंती...जमिनी वरील स्वर्ग पाहण्याची आस. प्रवेश करतांना जणू हवेत तरंगायला होते. आपण एका नव्या विश्वात प्रवेश केल्यासारखे वाटते या श्रावणी निसर्गात. ते पाण्याचे झरे, झुळझुळ त्यांचा आवाज, सोबतीला कोकिळेचा स्वर, मन अगदी भरून जाते. पानांची हिरवाई जणू मोहून टाकते शरीराला, जणू आलिंगनच घालावे त्याला. पहाटेच्या धुक्याने पडलेला तो सडा सूर्याच्या किरणांनी मोहरली कडा हृदयात घर करून जाते. ते दवबिंदू चे थेंब मोत्यासारखे भासू लागतात. खर्या मोत्या पेक्षा तेच वेड लावतात. असतात ते काही क्षणापुरते पण डोळ्यांना अगदी भरून जातात. त्यावर पडणारी किरण सप्तरंगात न्हाऊन इंद्रधनू तयार करतात. नजरेत मावेनासा होतांना तो इंद्रधनू अंगावर काटा उभा करून जातो. निसर्गाची एक अनोखी कला मृगजळासम भासवून जाते. थोडा वेळ का होईना पण रोमांचित करून सोडते. या निसर्गाची किमया सांगावी तेवढी कमी. इथल्या पाना फुलांचा गंध अत्तराचा गाभाच असावा. श्वासात असा बसला की मातीलाही मोहून गेला, म्हणुन म्हणतात पावसाचे थेंब मातीत पडले आणि आत्तराचे भाव कोसळले. ही किमया निसर्गातील मातीची. निसर्गातील कण आणि कण प्रेरित करणारा, यशाची नवी उमंग देणारा. डोंगर दर्‍या तर हिमतीची खाण जणू. पाहताक्षणी एक सामर्थ्य संचारी अन त्याची नवलाई म्हणजे गरुडाची भरारीच देऊन जाते. या निसर्गातील पक्षांचा थवा तर एकीचे बळ काय असते हेच सांगतो. आणि निसर्गात अजून रमवतो. त्यांची ती किलबिल असणारी गोड आवाजे अगदी न थांबता ऐकावीशी वाटतात. त्यात मन गुंतून गेले की राग ऐकल्यावर येणारी शांत निद्रा ही त्यांच्या मंजुळ स्वरानेही यावी असा त्यांचा साज आहे. प्राण्यांची तर गम्मत न्यारी, प्रत्येक आपापल्या सोईनुसार आपल जिवन घालवतो. मस्त मजेने आपला सहवास त्या निसर्गात कायम ठेवतो. ते तर त्यांचे राजे असतात पण स्वतःवर ते अवलंबून असतात. ही खरी गम्मत त्यांची. प्रेरणा मिळते तिथून, पायावर उभं राहण्यासाठी. अजून कितीही लिहिल तरी कमीच आहे, या निसर्गाची किमया खूप मोठी.
---------------------------------------

अक्षय टेमके
वेळ सकाळी 5.30 ते 8. पावसाळा आणि हिवाळा अशा 2 ऋतूंचे 8 महिने......
कौलारू घर आणि घराच्या चोहोबाजूने हिरवीगार शेती ......
या कालावधीमध्ये गावाला घालवलेला वेळ म्हणजे जिवंतपणी अनुभवलेला स्वर्ग ! पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अंघोळ न करता अंगणामध्ये येऊन फक्त उभं राहायचं .
दूर क्षितिजावर आसमंतात ढग फाडून जमिनीवर कोसळायचा प्रयत्न करणारी सूर्याची किरणं , पक्ष्यांच्या किलबिलाटाला साद देणारा गोठ्यातील गाईचा हंबरडा ,
चारही बाजूने दिसणारी शेतातली पिकं , कोणी बिट लावलंय ,कोणी टोमॅटो तर कोणी कोथिंबीर......त्या पिकांवर पडलेलं दव, घरातून बाहेर पडणारा चुलीचा धूर आणि कस्तुरी अगरबत्तीचा सुवास ? अरे अगरबत्ती कोणी लावली ? बाजूला बघितलं तर तुळशी समोर दिवा आणि अगरबत्ती लावणारे भाऊ दिसतात ....भाऊ म्हणजे माझे चुलते...ते आता विळा घेऊन गायांसाठी हिरवं कोवळं गवत आणायला वावरात जाणार , आधीचं साचवलेलं सुकं गवत संध्याकाळी द्यायचं. म्हणजे कोवळ्या गवतानं गाई तंदुरुस्त राहतात तर सुकलेल्या गवतानं त्यांच्या  दुधातील घट्टपणा वाढतो.....
एक....एक मिनिट...... हे सगळं आत्ता लोकलमधल्या घामाटलेल्या गर्दीत चौथ्या सीटवर अर्ध्या पार्श्वभागावर बसल्यावर का आठवावं ?
तुम्हाला गावच्या मातीबद्दल आत्मीयता असेल ना तर  नाक , कान, डोळे हे शरीराचे अवयव अख्खा गाव रक्तात शोषून घेऊ शकतात . तिथला गंध, रंग, स्पर्श , तेव्हा घेतलेला श्वास हा नाक, डोळे , कानांतून असेच  मधेमधे बाहेर पडत असतात.....
--------------------------------------

निखिल खोडे,पनवेल
निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा मोह आपण कधीही आवरू शकणार नाही. रोजच्या धावपळीच्या वेळापत्रकापासून सगळं विसरून निसर्ग सौदर्याचा आस्वाद घ्यायला जाणे यापेक्षा मोठं सुख काय असू शकत ह्या जगात ...

छान चारपाच दिवस पाऊस येऊन गेला व लगेच आम्ही ४ मित्रांनी ट्रेक ला जाण्याचा प्लॅन केला.  घरापासून अगदी जवळ... १२ किलोमीटर वर असलेल्या प्रबळगड ला जाण्याचे ठरविले. पनवेल बस स्टॉप वरून सकाळी ६:४५ च्या ठाकुरवाडी बस नी प्रबळगड पायथ्या साठी निघालो. प्लॅनिंग नुसार आम्ही प्रबळ माची ला नाश्ता करून पुढे माथा गाठायचा असे ठरविले होते.

गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे १५-२० मिनिटात प्रबळ माची पोहोचू असा अंदाज होता परंतु आम्हाला दीड तास चढायला लागला. इथेच आमची गफल्लत झाली. भुकेने व्याकुळ झालेलो आम्ही सुखा मेवा, चिप्स, बिस्किट्स खाऊन पोटाला थोडा आधार दिला.

प्रबळमाची ला गावातल्या एका घरी हेवी ब्रेकफास्ट करून पुढील ट्रेक ला सुरुवात केली. सुरुवातीला झाडांच्या सावली मधून  चालायला मज्जा आली. त्यानंतर मात्र उन्हाचा तडाखा डोक्यावर आणि ४५-५० अंशामध्ये असलेली दगडधोंड्यामधून चढण्याची वाट.. धापा टाकत चढायला सुरुवात केली. प्रत्येक १० मिनिटांनी थांबून आणखी चढायचो. एक दोन वेळेस वाटल की इथुनच परत जावं परंतु माझ्यापेक्षा वयाने सीनिअर लोकांना चढताना बघितल्यावर लाजेखातिर कसेबसे वरती गडाच्या शिखरावर पोहोचलो.

प्रबळगडाच्या वरच्या टोकाला गेल्यावरचे दृष्य बघितल्यावर एकदम सगळा थकवा जणू नाहीसा झाला. पावसाने त्यात अर्धा तास हजेरी लावून आनंद द्विगुणित केला. प्रबळगड वरून दिसणारा कलावंती बुरुजाचा व्यू पॉइंट, आजूबाजूच आल्हादायक दृश्य, गर्द हीरवळ, स्वच्छ थंड हवेचा झोत, पक्षांचा कीलबिलाट हे सर्व एकदम अविस्मणीय!

थोड्या विश्रांती नंतर परतीच्या प्रवासाला निघालो. उतरत्या वेळेस तितकं काही थकवा जाणवला नाही. सहजच एन्जॉय करत प्रबळ माची गाठली.
नंतर शुध्द शाकाहारी गावराण जेवण... पिठल, तांदळ्याच्या भाकरी, बरबटी उसळ, जवसाची चटणी आणि भातासोबत तडका दिलेले वरण.. कांदा निंबु लोणचे... असा राजभोग घेऊन पक्षांच्या कीलबिलाटात एक तासभर वामकुक्षी .... अहाहा..

नंतर फक्कड चहा घेवुन पटपट पायथ्याला पोहचलो व घराची परतीची वाट पकडली... खरच निघतांना पाय निघत नव्हता...

अर्थात दुसऱ्या दिवशी ट्रेक च्या गोड आठवणींची परत-परत आठवण  दुखणाऱ्या पोटऱ्या करुन देत राहील्या पण आयुष्यभरासाठी अविस्मरणीय क्षणांचा खजिना कमावला ते महत्वाचे !!
---------------------------------------

पी.प्रशांतकुमार,अहमदनगर
....पाऊस..हिरवळ.. धबधबा.. वाहतं पाणी वगैरे गोष्टींच अप्रूप आम्हा नगरकरांना(त्यातही नगर दक्षिण) आणि मराठवाडाकरां जितकं आहेना तितकं दुसरं कुणाला नसेल.. मागे सांगली जवळ वाहणारी कृष्णा पहिली आणि हाताला चिमटा काढला ..नदीला पाणी असत आणि ते वाहतही यावरचा विश्वास केव्हाच उडालाय..
   तशी मला इतिहासाची बऱ्यापैकी आवड आहे. दोन वर्षांपूर्वी पाचवी-सहावीत मुलगी होती तिलाही अभ्यासक्रमात गड किल्ले,लढायांचा इतिहास होता.. म्हटलं चला ट्रेकला कारण..
तसा मी एक बे-जबाबदार पालक आहे ...
...पोरीला चार दिवस शाळा बुडवायला लावून 'पन्हाळा ते पावनखिंड' सारख्या मोठ्या ट्रेकला घेऊन गेलो  ..शाळेच्या अभ्यासात आई मदत करेल ही गॅरंटी देऊन..
...12-13 जुलै ला दरवर्षी कोल्हापुरातले हौशी लोक त्या दिवशीचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी हा ट्रेक करतात..
...12-13 जुलै ..महाराज सिद्दी जोहरचा पन्हाळ्याचा वेढा चकवून नव्याच वेगळ्या मार्गाने भर पावसात विशाळगडाकडे जातात..काही ठिकाणी जुना फरसबंदी मार्ग तर बहुतांश ठिकाणी दगड धोंडे - गुढग्यापर्यंत पाय फसेल असा चिवट लाल चिखल ..
... भयानक त्रासदायक मार्ग होता..त्यात भरपूर पाऊस .. श्रिया थकली .. पाय जाम दुखायला लागले आणि पहिल्याच दिवशी रडायला लागली ..मी जाम टेन्शन मधे म्हणालो,"अगं उशीर झाला मागे पडलो तरी मी आहे ना सोबत .. काय होतंय.. अजून थोडं बसायचं का?..पण तू रडू नको.." ती म्हणाली,"पपा मी रडत नाहीये..पण थकल्यामुळे आपोआप पाणी येतंय डोळ्यात" .. अधेमधे पाऊस होताच सोबत
पहिला मुक्काम कर्पेवाडीला.. अस म्हणतात 'राजांनीही आपल्या प्रवासात इथे काही काळ विश्रांती घेतलेली..'

दूसरा दिवस मात्र भरपूर पावसात .. भाताच्या खासरांची सोबत.. काही ठिकाणी तर इतका चिखल कि सहज फूट दीडफूट पाय आत जायचा ..माझ्या शूजचे सोल अर्धवट निघालेले..फटक फटक आवाज आणि चालताही येईना...अनवाणी ट्रेक करणं मलातरी शक्य नव्हतं.. Bear Grylls चे man vs wild सारखे शो पाहिल्याचा फायदा झाला.. पायातले सॉक्स काढले शूज घातले आणि वरून सॉक्स..त्याचा फायदा म्हणजे सोल आहे त्या स्थितीत घट्ट राहिले आणि बुटांचा चिखल पकडत नाही सहज चालता येतं..
पण एक मस्त अनुभव..
...अर्थात फक्त अनुभव .. सगळं डोळ्यांनी साठवलं .. 3-4 फोटो आहेत मोजून.. खास आवडही नाही मला फोटोची आणि थोडा वेळ सोडला तर सतत पाऊस होता..
नंतर 2-4 दिवस हातपाय ठणकत होते ..
मुलीला म्हटलं....बाळा इतिहास फक्त वाचूनच नाही समजत..
..काय भयानक असेल ती लढाई ..600 तले 300 मावळे खिंडीत गनिमाला रोखतात ..गनीम हजारोंनी ..जवळ जवळ 3000 सिद्दी जौहरची फौज कापली .. 300 मावळे..सर्व कामी आले बहुदा ... बाजीप्रभू त्यांचे बंधू फुलाजीप्रभू आणि बांदल आणि कैक अज्ञात..

अस म्हणतात जगातल्या सर्वोत्तम 50 लढायातली ही एक लढाई होती

हॉलीवूडच्या गाजलेल्या '300' पिच्चरच काय कौतुक .. माझ्या राजावर कुणी काढेल तसा ...  राजा बीनशर्थ उद्या शरण येणार सांगून पन्हाळ्याचा सिद्दीचा वेढा बेसावध ठेवून काढलेला पळ .. बाजीप्रभुने अवघ्या 300 मावळ्यानसोबत 12..15 तास हजारोंची ची अडवलेली फ़ौज ... खरच ती पावनखिंड ...
...अफज़ल खान, शाहिस्ते खान,पन्हाळा हे एक एक प्रसंग एक एक सिनेमाचे विषय ..  अगदी बारकाइन कुणी यावर फ़िल्म करावी एवुदे जगासमोर .., काय तो राजा काय ते साथीदार ..  लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगावा यासाठी किती ते समर्पण ...

राजपूतांची वीरगाथा तुमच्या परी मजला रुजते
परी हृदयाच्या हृदयात बाजी बाजीची सुचते...
.... चलो पावनखिंड..
---------------------------------------

मनोज वडे,पंढरपूर
           हा विषयास सुरुवात करताना सध्या राहिला कुठे आहे निसर्ग. जो की आपला स्वार्थ साधतो आहे . अहो स्वार्थ साधू द्या पण जर ह्या मानवाला आपला निसर्ग आहे. ह्याची जाणीव करून दिली. तर हा मानव आपल्या घरात कसा वागतो, तशी जर शिकवण त्याला मिळाली. तर तो नक्की निसर्गाला आपला भाऊ,बहीन,माता,पिता,मानल्या शिवाय राहणार नाही. केव्हा तरि त्याला आपले पण वाटेल अशी शिकवण दिली तरच तो काही तरी देण्याचं प्रयत्न करत असतो.पण ह्यांना प्रोसहित करण्याच काम हे ह्या अधिकारी,पुढर्‍याच,असत पण सध्या उलट आहे हेच निसर्गाला कधी भुईसपाट करतो ह्याच्या माघे लागले आहेत.त्यामुळे ही विषमता पसरत आहे.ह्यावर आपल्या सारख्या विचारणी एकत्र येण्याची काळाची गरज बनत आहे. ती आपण कश्या पध्दतीने कराचे ह्याचे विचार सतत असले पाहिजे.तरच ही निसर्गाची सफर विस्मर्णीय होईल नाही तर ही एक सफर एक सफर राहील हे नक्की.ह्या मध्ये जर काही तरी द्यायाचे कार्य हे सत्तेत असलेल्या सर्व लोकाचे असते. त्यात अधिकारी,पुढारी ,हे सर्व आलेच आणि अश्या प्रकारची कल्पना अवलंब केली. तर नक्कीच निसर्ग आपल्यावर खुश होईल आणि सफर तर लाजवाभ होईल ना मंडळी.
        हा राहिला हा विषय ? जो की सफर कराचा प्रश्न येतो कुठे ? तरी ही आज ही हा माणूस म्हणून लागलीलेली कीड भयानक बेकार लागली आहे. कारण ही कीड अशी आहे की, निसर्गाला लागली महाकाय कीड आहे.कारण मी मध्यंतरी मी पुण्याला गेलतो. त्यावेळेस तेथील चाललेली खोदाई, डोंगराची भुईसपाट होत चालली सध्या अजून बंद नाही. तरी सरकारच पूर्ण पणे चाललेल दुर्लक्ष हे समाधान करणार नाही. ह्यावर फक्त चर्चा नको. कृती ची गरज आहे.विषयाकडे दुर्लक्ष झाल तरी चालेल परंतु ह्यावर उपाय झाले पाहिजेत. मग निसर्गाचे सान्निध्यतील विषयायस बोलण्यास मज्जा येईल.अस मला वाटत.
          निसर्गाकडून खूप काही शिकता येत. कारण निसर्गप्रथम आपली कोणाची जात पाहत नाही. पण आपण प्रथम भेटलो बोलोतर आपण विचारतो तू कोणत्या जातीचा तू, कोणत्या धर्माचा अरे, अस विचारात भांडत बसलो तर आपण कधी यशस्वी होणार नाही. त्यासाठि आपली आता धोरण बदली पाहिजे. हो आता आपण निसर्गाची सानिध्यात एकदा सफर करून ठरवल पाहिजे की, आता बास राजकारण ,आता बास माझ तुझ, आता बास केल पाहिजे . कारण पहा आपल्या धोरण बदली पाहिजे कारण वेळ आली आहे. आज 29-6-2019 आहे. पाउसाळा सुरू होऊन पाऊस नाही.
---------------------------------------

(यातील सर्व संबंधित छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************