भाकरीच्या शोधात फिरणारे आयुष्य...



शिरीष उमरे, मुंबई

१३५ कोटी लोकांचा देश आपला... आर्थिक अभ्यासकार सांगतात की देशाची ५०% पेक्षा जास्त संपत्ती फक्त १% लोकांकडे आहेे.  देशाच्या एकुण मालमत्तेपैकी ७७% मालमत्ता फक्त १०% लोकांच्या ताब्यात आहे. बाकीचे ९०% लोकांचे काय अस्तित्व ?

कोण असतील हे १% लोक ? आणि कोण आहेत हे १०% लोक ? १% लोक आपल्यासमोर कधीच येणार नाहीत... एक करोड ची ही आबादी माझ्या मते व्हाइट कॉलर कार्पोरेट गुंतवणुकदार असतील... ह्यातले काही चांगले सुध्दा असु शकतात.

 पण बहुतांश वाइट धन्याडांना सपोर्ट करणारी ही १०% वाली बारा करोड ची विषारी पिलावळ माणुसकी साठी धोकादायक असते... उरलेल्या ९०% लोकांना कायम गुलामगिरीत ठेवण्यासाठी ह्यांचा सक्रीय सहभाग असतो...
ह्यात भ्रष्टाचारी राजकारणी, धार्मिक नेते, सरकारी नोकरशाही,  कंत्राटदार, दलाल, मिडीया, शिक्षणसम्राट, डॉक्टर, सीए, सीएस, वकील, जज, कारखाणदार, बिल्डर्स, माइन ऑपरेटर, गुन्हेगारी क्षेत्रातले दादा व मोठा व्यापारी वर्ग हे सगळे सामील असतात...

सगळे स्वार्थापायी कायम एकमेकांच्या जिवावर उठलेले असतात तरीही संघटीत असतात...यांचा वरती पण रिमोट कंट्रोल असतो...

ह्यात पिसले जातात गरीब, असंघटीत, अशिक्षीत, अंधश्रध्दाळु व कमकुवत ९०% लोक...

ह्यातील बऱ्याच जणांचे अख्खे आयुष्य दोन वेळच्या जेवणाची सोय करता करता मोलमजुरीत निघुन जाते...
काहीजण काळ्या मातीतुन धान्य पिकवण्याच्या फीकरीत स्वत:चा जीव पणाला लावतात...
काहीजणांचे जीवन दुसऱ्यांसाठी नोकऱ्या करता करता मुलांच्या शिक्षणासाठी व घराच्या कर्जाचे हप्ते फेडण्यात संपुन जाते..

जे प्रतिकार करतात ते एकतरी नक्षलवादी, आतंकवादी बनतात व संपवल्या जातात कींवा कालांतराने सामदामदंडभेद च्या  माराखाली झुकुन वरच्या भ्रष्टाचारी लोकांच्या हातातले बाहुले बनुन आपल्याच लोकांवर अन्याय करतात...

भाकरीसाठी वणवण फीरणाऱ्या लोकांना अस्तित्व च नसते... ह्याला कारणीभुत भुकेची जाणीव नसणारा, निष्क्रीय, षंढ, कणा नसलेला, लाचार ८० करोड लोकांचा मध्यम वर्गीय समाज....
___________________________________________


सीमाली भाटकर ( गंधेरे )  रत्नागिरी

नमस्कार मंडळी विचार च्या व्यासपीठावर आज प्रथमच विषय आलाय भाकरीच्या शोधात फिरणारे आयुष्य. काय वाटत तुम्हाला या विषयी असा प्रश्न विचारला तर वाईट वाटू नये. कारण फक्त गरीबी भाकरीच्या शोधात आहे असं नाही आहे. सुशिक्षित तरुण देखील स्वतःच पोट भरण्यासाठी नोकरीच्या मागे धावत आहे. कुणी व्यवसायासाठी झगडत आहे तर कुणी तो टिकवण्यासाठी.
          अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या प्रमुख गरजा आहेत हे आपण पहिली पासून शिकलो पण त्याचा अर्थ कळला तो पदवीधर झाल्यानंतर, ही झाली सुशिक्षित माणसांची गाथा. आज मला सांगायचे आहे ते जगातल्या सर्व स्तरातील माणसाविषयी भारत शेतीप्रधान देश आहे पण इथला शेतकरी अजूनही भुकेलाच आहे. आपण ऑफिस मध्ये, देवळात जातो आपल्याला खुप सारे भिकारी दिसतात. खूप लहान मुले देखील असतात. ज्या वयात त्यांनी पुस्तक हाती घ्यायची त्या वयात ती मंदिरा बाहेर किंवा सिग्नल समोर उभी दिसतात. फक्त एक वेळच्या जेवणासाठी. त्यात फायदा कुणा तिसऱ्याचाच असतो. भीक मागणे हा काही लोकांच्यासाठी व्यवसाय बनतो आहे, पण आवाज मात्र कुणीही उठवू शकत नाही. कारण डोळ्यांना आणि मनाला वाटत अरेरे ही किती गरिबीतून आलीत. प्रत्यक्ष दर्शी परिस्थिती तीच असते पण त्या पलीकडकाहीतरी वेेगळ घडत असते ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. आणि मग आपण चार चाकी गाडीतून फिरणारे मात्र त्यांना चिल्लर काढून देऊन बाजूला होतो. पण कधी आपण त्यांच्या शिक्षणाचा विचार केलाय.... नाही?
           फटाक्यांच्या कंपनी मध्ये काम करणारी झोपडपट्टीतील मुलं अचानक एका स्फोटात भस्मसात होतात कशासाठी दोन वेळच्या जेवणासाठी. पण कमी पैशात कामगार नाहीत, आणि एखाद्याच्या गरजेचा फायदा कसा करून घ्यायचा हे आमच्या व्यापारी वर्गाला जमलेलं उत्तम गणित आहे. कारण ती लहान मुले त्यांचे आई बाप भांडायला कधीच येणार नसतात किंवा त्यांचा विमा मागणारे कुणी नसतात आणि असले तरी ते व्यापारीच खातात ही आहे लोकशाही प्रधान भारतातील भाकरीच्या शोधात फिरणाऱ्यांची अवस्था.
            आज प्रत्येक शहरात एकतरी अनाथ आश्रम आहे वृद्धाश्रम आहेत. ह्यांचा खर्च कसा चालतो कुणी पाहिलंय का कधी? सरकारी अनुदान कमी पडतंय पण आजची पिढी मात्र नको असलेले उद्योग करून अनाथ आश्रम भरायचे बंद करणार नाहीत. मला एक प्रश्न करावासा वाटतो त्या माणसांना ज्यांनी अनैतिक संबंधातून निर्माण झालेल मुलं अनाथ आश्रमात नेऊन टाकलंय, रस्त्यावर फेकलय कधीतरी तुमच्या मनात हा विचार येतो का तो कोवळा जीव काय खात असेल? तुम्ही हॉटेलात घरात पार्टी करून सण समारंभ साजरे करतात छान छान खाता तंदुरुस्त राहता. पण ज्या नरकात आपण आपलं छोटस अस्तित्व टाकून दिलंय ते काय करत असेल काय खात असेल? ते भले कुठेही असो पण एक माणूस म्हणून कधी वाटत का तुम्हाला जाऊन तिथल्या मुलांसोबत खेळावं त्यांना खाऊ पिऊ द्यावं. तुम्ही गुन्हेगार आहात त्या बाळाचे असा जराही लवलेश नसतो बरं या माणसांमध्ये.
             या देशातील प्रत्येक माणसाने माणूस म्हणून त्यांना थोडी जरी मदत केली ना तर दसरा दिवाळी ईद ख्रिसमस सारखे सण प्रत्येक अनाथ मुलं आनंदाने साजरे करेल. आणि हो फक्त अन्न नाही त्यांचे शिक्षण ही झाले पाहिजे ज्यातून ते स्वावलंबी बनतील. आयुष्यात अस एकदा नक्की करून पाहा कारण यातून मिळणार समाधान आणि आनंद तुम्हाला एक नवीन दिशा देईल जे तुम्हाला जगायला शिकवेल.
           आपण माणसं प्रचंड डिगऱ्या घेतो पण आजची परिस्थिती पाहता नोकरी मिळवणे देखील खूपच कठीण होऊन बसलय. स्टार प्रवाह ने एक सुंदर मालिका दिली मोलकरीण बाई खरंच खूप अभिमान वाटतो त्या कष्टाळू माऊलीचा ज्यांना पोटासाठी स्वतःच्या घरात आणि इतरत्र राबावं लागत तरी त्या थकत नाही. पोटासाठी कष्ट करावे पण बेईमानी नको असा सल्ला यांच्या कडूनच मिळतो कारण पैशाच्या हव्यासापोटी वाम मार्गाला जाणारी पिढी घडतेय यांना एकच सांगावस वाटत आहे तुम्हाला जगायच आणि जगवायचं असेल तर भाकरीच्या शोधात फिरणाऱ्या त्या कामवाली पहा ती तुम्हाला बळ देईल.
           तुम्ही प्रचंड शिकता नोकरी नाही म्हणून निराश होता. आजच युग स्पर्धेचं युग आहे. पण म्हणून खचून जाऊन आत्महत्या करणे हा त्यावरचा पर्याय नक्कीच नाही. भाकरीच्या शोधात आयुष्य सावरू शकत पण निराशेने संपवलं तर शोधाची प्रक्रियाच संपुष्टात येते आणि जिथे शोध आणि संशोधन संपत तिथे नवीन काहीच उमलत नाही. गरज ही शोधाची जननी आहे हे नेहमी लक्षात असू द्या.
           वाईट वाटून घेऊ नका पण मतिमंद असणाऱ्या त्या बाळाकडे पहा परमेश्वराने त्यात काहीतरी दिलेलं असत. त्यांच्या कलाकृती इतक्या अप्रतिम असतात. की त्यांना ते जगवतात. तुम्ही म्हणाल आम्हाला कोणतीच कला अवगत नाही पण प्रत्येकाने स्वतःमध्ये काहीतरी शोधा जे पोटापूरत का होईना तुम्हाला जगवेल. महागाई वाढली झोपडपट्टी तिथल्या लोकांचे अन्नवाचून होणारे हाल पाहिले. उपासमारीत राहणारा शेतकरी पाहिला की कीव येते आणि चीड येते या लोकशाही प्रधान भारताची हाच आहे का 2020 मधील अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातला भारत, कदाचित नाही?
             भाकरीच्या शोधात फिरणारे आयुष्य खूप कठीण आहे पण आपण ठरवलं तर ते सोपं नक्की होईल. सिग्नल च्या कडेला पावसात भिजणाऱ्या मुलाला छत्री सोबत एक पुस्तक आणि चपाती भाजी देऊन पहा. 50 मधले 5 विद्यार्थी नक्की असतील. उभं राहून पैसे मिळत नाहीत तर ते कसे कष्टाने मिळतात याच ज्ञान त्यांना दिल पाहिजे. मंदिरांना श्रीमंत करून महाप्रसाद वाटण्यापेक्षा एका अनाथ आश्रमाला ते अन्नदान करा जास्तीच पुण्य पदरात पडेल.
         आज भाकरीच्या शोधात सगळेच फिरतात फरक इतकाच आहे. जे चार वेळा खातात ते लोकांना लुबाडून सुद्धा खातात आणि एकवेळ ची भ्रांत असणारा चार वेळा कष्ट करून इमानदारीने एकवेळ खातात..... यालाच म्हणतात आयुष्य...... गरिबीत देखील इमानदारीने जगणार.
        धन्यवाद।
___________________________________________


पवन खरात,अंबाजोगाई.

पोटाची खळगी भरण्यासाठी,
आयुष्याशी संघर्ष करत होतो ।
जगण्याची काय उमेद बाकी,
जिथं मी रोजच मरत होतो ।

स्वप्नांची ही हिम्मत नाही,
भाकरी पलीकडे जाण्याची ।
पैशा पुढे किंमत नाही,
माणुसकी सुद्धा पाहण्याची ।

भाकरीच्या शोधत हे सार,
आयुष्य ही करपून गेलं ।
माणसाच्या काळजातल ते,
माणूसपण ही हरपून गेलं ।
____________________________________________


   निखिल खोडे, पनवेल.

जीवन हे संघर्षाचे दुसरे नाव आहे असे आपण नेहमीच म्हणतो आणि ते अगदी बरोबर पण आहे. मानवी जीवन अनेक प्रश्नांनी गुंतलेले असते. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या विचारात गुंतलेला असतो. श्रीमंत माणूस त्याच्या संपत्तीत आणखी कशी वाढ होईल हा विचार करत असतो तर हातावर पोट असणारे लोकं रात्रीची भूक कशी भागेल या विचारात असतात.

भूक प्रत्येकाला असते त्यासाठी सर्वांची धडपड चालू असते. भुकेने व्याकूळ झालेले लहान मुले ट्रॅफीक सिग्नलवर, बस स्टॉप वर व रेल्वे स्टेशन वर बघायला मिळतात. हे सुकलेले, कासावीस झालेले चेहरे अनवाणी पायांनी इकडे तिकडे भुकेच्या शोधात फिरत असतात तेंव्हा असे वाटते की गरीब असणे हा जणू गुन्हाच आहे..

अनेक लहान मुलांच्या आयुष्यातील शिक्षणाचे दिवस भाकरीच्या शोधात निघून जात आहे. आपल्या मुलभूत गरजे मध्ये मोडणारा अन्न हा महत्वाचा घटक आणि त्यासाठी दररोज लाखो लोक उपाशी  कींवा अर्धपोटी उद्याच्या भाकरीच्या शोधात रात्री झोपी जातात.

ह्यासाठी शहीदांनी आपले आयुष्य उधळुन टाकले होते का स्वातंत्र्य लढ्यात ? का लाजा वाटत नाही सऱ्हास आपल्याला अन्न उष्ट टाकायला ? का आपल्या संवेदना मेलेल्या आहेत आपल्याच देशातील गरीब नागरिकांसाठी? का परत परत भ्रष्ट राजकारण्यांना निवडुन देतो आपण ? का भ्रष्टाचारी नोकरशाही सहन करतो आपण ?
कधी उत्तरे मिळतील ह्याची की की असेच मुडद्याचे जीवन जगणार आपण ....
_____________________________________________


दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम.

जन्माला आलो तेव्हा लहान होतो बाळ,
किती लवकर आयुष्यातून निघून गेला तो काळ।

त्यानंतर पुढचं आयुष्य विद्यार्थी दशेत गेलं,
तेव्हाही आई-बाबांनी खुप सांभाळून नेलं।

मोठा झालो होतो आली मग स्वतःवर जबाबदारी,
काम शोधायला सुरुवात केली तेव्हा कळली बेकारी।

आयुष्य संपायला लागल जेव्हा माझं उतारवयात,
तेव्हा कळलं भाकरीच्या शोधात निघून गेली सगळी हयात।
_____________________________________________


यशवंती होनमाने .
मोहोळ.

  विषय वाचला आणि मन भूतकाळात गेल .माझी आज्जी नेहमी म्हणायची लोक पोटाची खळगी भरायला पर मुलखाला जातात अनं आपण इथंच .त्यावेळी समजत न्हवत, पण आत्ता कळतय .वडील नेव्ही मध्ये असल्याने बरीच वर्ष मुम्बई मध्ये राहीलो आणि वडील रिटायर झाले की गावाकडे आलो .माझ शिक्षण सगळ गावाकडे झाल .मी msw केल आणि नोकरीला लागले .....
        आत्ता खरी फिरती सुरू झाली होती माझी .इतभर पोट भरण्यासाठी ची वणवण .आत्ता कळत होत की भाकरीसाठी किती फिराव लागत ते .म्हणतात ना विंचवाचे बिरहाड त्याच्या पाठीवर अशी अवस्था .
        पण एक आहे या भाकरी न माणुसकी शिकवली , माणस जोडली , हक्काची घर झाली , मन मोकळ करता यावं अशी माणस मिळाली .या भाकरीच्या फिरती ने आयुष्य जगायला शिकवल .
___________________________________________

प्रशांत देवळे,बीड.

दिवसाची सुरवात, आणि शेवट भाकरीच दारावरची टकटक भाकरीसाठीच
काँलेजात मित्राची नजर डब्यावर भाकरीसाठीच ,त्याचा बदला तसाच भाकरीसाठीच
मित्राचा वाढदिवस , मोठ्या ढाब्यावर
ऑर्डर घरगुती पध्दतीची भाकरीच
प्रवासाची सोबत , सहप्रवाशास आग्रह भाकरीचाच
सणाच जेवण ,जन्माच स्वागत ,मृत्यु नंतर ही सर्वांना द्यावी भाकरीच
बाँसची चिडचीड ,सहकार्यांचा रागराग आपलीच कामासाठीची धडपड सगळं शेवटी भाकरीच
माया,प्रेम,माणुसकी,समाजसेवा सर्वांचा शेवट इतभर पोट त्यात मावणारी भाकरीच
मुलाला मार अभ्यासासाठी, कोकरानं मोठ व्हाव साहेब व्हाव, पुढच्या सुखाच्या जीवनासाठी
मुडद्या दहा वाजले घरी ये ,मायेची तळमळ
माझ्या साठी पोटात जावी भाकरी..
आता वाट आहे दहा वाजण्याची ....
__________________________________________


संगीता देश,वसमत

           " सगळं चालतं कशासाठी?" या प्रश्नाचं उत्तर येतं-"पोटासाठी"... माणसाची पहिली गरज आहे पोटाची! त्यानंतर सुरु होतात त्याच्या इतर गरजा. ह्या गरजा अवलंबून आहेत आपल्याला आर्थिक स्टेटसवर. पण हीच पोटाची गरज माणसाचं संपूर्ण आयुष्य भाकरीच्या शोधातच फिरवते.
                माणसाला ही भाकर काय करायला भाग पाडत नाही? चोरीपासून तर कितीही निम्नदर्जाचे काम याच भाकरीसाठी करावे लागते. ही भाकर कधी सन्मार्गाने मिळते तर ह्याच भाकरीसाठी वाममार्गाचाही अवलंब करावा लागतो. अनेकांच्या जीवनात खूप बदल होत जातो,त्यांच्या घरात आधीच्या  लोकांनी जरी ही भाकर फार कष्टाने मिळवली असली तरी पुढच्या पिढीला तेवढे कष्ट करावे लागत नाही. परंतु काही समाजघटक असे आहेत की,पिढ्यानपिढ्या त्यांचे संपूर्ण आयुष्य भाकरीच्या शोधापलीकडे जातच नाही. आयुष्यात पहिली आणि शेवटची गरज तीच ठरते. देशात हरितक्रांती झाली तरी काहीजणांचा अजूनही मुख्य भाकरीचाही प्रश्न मिटलेला नाही. म्हणूनच कितीही विज्ञान आणि तंत्रज्ञान आले तरी मॅनहोलमध्ये यंत्राऐवजी  अजूनही आपल्या देशात भाकरीसाठी लाचार असलेल्या माणसांनाच उतरावे लागते.  ही किती खेदाची बाब आहे!
___________________________________________


नरेश शिवलिंग बदनाळे, लातूर.

असं म्हणतात की,ह्या पृथ्वीतलावर ८४ लाख जीव आहेत.त्यापैकी कोणीही उपाशी राहत नाही आणि आणि माणसाचं पोट कधी भरतच नाही. भाकरी खूप काही दडलं आहे ह्या भाकरी मध्ये माणसाच्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र आणि निवारा त्यात पहिल्या स्थानी अन्न म्हणजे भाकरी आता नव्याने काही गरजा त्यामध्ये आल्या आहेत जसे की मोबाईल. पण भाकरीची जागा कोणीच घेऊ शकत नाही  तिच्या शोधात तर राव ही आहे आणि रंक ही किती कमाल आहे ना वित भर पोट आणि त्या साठी आयुष्यभर त्या भाकरीच्या मागे फिरावं लागतं बहिणाबाई म्हणतात
अरे संसार, संसार
जसा तवा चुल्हयावर
आधी हाताला चटके
मग मिळते भाकर
ह्या भाकरी साठी काय काय नाही करावं लागत कोणी साता समुद्रापलीकडे गेलंय तिला मिळवायला तर कोणी ह्या राज्यातून त्या राज्यात, कोणी राना वनात तर कोणी मोठ्या मोठ्या शहरात.मुंबई आर्थिक राजधानी,अर्थ नगरी ,माया नगरी जिथे रोज लाखों लोक ह्या भाकरीच्या शोधात एक नवीन स्वप्न घेऊन येतात, कोणी शोधातच होरपळून जातात आणि कोणी मिळवत राहतात, पण भाकरीच्या शोधात फिरणारे तर सर्वत्र सर्वचजण आहेत तुम्ही आम्ही पण या पैकी दर दहा सेकंदाला कोणीतरी या जगात शेवटचा श्वास घेतो सरासरी दहा लक्ष लोक दरवर्षी या भाकरीच्या अभावाने मरतात आणि आपण असणारे त्या भाकरीची कदर करत नाहीत ,पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तिच्या शोधात फिरतोच बहिणाबाईंनी म्हणल्याप्रमाणे हाताला चटके मिळाल्यानंतरच भाकरी मिळते म्हणजे त्यासाठी काहीतरी करावं लागतच पण ती मिळाली तरी आत्मा तृप्त होत नाही ना शरीर शेवटच्या श्वासा पर्यंत शोध चालूच असतो वित भर पोट, त्याला भरण्यासाठी मिळवावे लागतात नोट. मोबाईल आपल्या मूलभूत गरजांमध्ये आला,आणि कोणी आपल्याला त्यातलं काही मागितलं तर आपण लगेच शेअर इट सारख्या तंत्राने देतो तसेच आपल्या कडे असलेली भाकरी पण त्याच खुशीने द्यायला शिकलो तर खूप छान होईल शेअर इट सारखं तंत्र भूक भागवण्यासाठी पण असत तर कदाचित हा शोध संपला असता... आयुष्याचा शेवट आणि शेवटचा श्वास कधी ह्या शोधातून बाहेर निघेल का हो..?
___________________________________________


किरण पवार
औरंगाबाद,

भाकरीसाठी वणवन भटकत आलेले आयुष्य
नेमका शेवट काय करावा
याचे नसलेले उत्तर भाकरीच्या शोधातले आयुष्य

कधी जहाल वागावयास भाग पाडणारे
कधी देहाला विक्री करायला लावणारे,
कधी या न कधी त्या
पण बऱ्याचदा खूणही करवणारे,

भाकरी हा प्रश्न जेव्हा आस्तित्वावर घाव करतो
तेव्हा तरूणाईला स्वप्न तोडून कमवायला लावणारे,
न जाणो कोण भिकारी कोण संपूर्ण वेडे असलेले
पण आतड्याला चिकटलेले पोट घेऊन
रस्त्यांवर धुळीत लोळायला लावणारे,

गावासारखा स्वर्ग सोडून
नालीच्या किनाऱ्याला शहरात
घर वसवायला लावणारे,
पोरांपासून बापाला अन माईला
लहानपणी बऱ्याचदा वेगळं रहायला लावणारे,

काय आहे सर्व शेवटी समजतं नाही
अन् भाकरीच्या प्रश्नापोटी माणूस कधीच फिरणं थांबवत नाही.
________________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************