लग्न पहावे करून.


अनिल गोडबोले
सोलापूर

लग्न ही गोष्ट एकाच वेळी गंभीर आणि गमतीदार झालेली आहे.  हल्ली टी. व्ही. वर देखील वेगवेगळे चॅनल वाले लग्न लावून देण्यात पुढाकार घेताना दिसतात.

पूर्वी लग्न ठरवताना पत्रीला, वंश, जात, गोत्र, कुंडली आणि गुण जुळवायचे. हे सर्व पाहत असताना घराणे, खानदान, हुंडा, मानपान हे सर्व मुलीच्या वडिलांकडून करून घेणाऱ्याला प्राधान्य दिले जायचे.

आता नवीन जमान्यात कदाचित चित्र बदलले असेल. मुलगा आणि मुलगी आपला जोडीदार शोधत असतील अस जर वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. आता फक्त पद्धत बदलली आहे. आता टेक्नॉलॉजी चा वापर होत आहे. पण पत्रिका... पासून कुंडली जुळवण्यासाठी संगणकाचा वापर केला जातो एवढंच..

वधू- वर सूचक मंडळ हा अतिशय विनोदी कार्यक्रम आहे. मी एकदा एका मंडळाचे पुस्तक वाचले...मला फार हसू आले. "मुलीला गाता आलं पाहिजे, मुलाला तबला वाजवता आला पाहिजे." हे एकवेळ मान्य असेल पण "मुलगी फेसबुक वापरते... मुलीला माणसांची आवड आहे (मग बाकीच्यांना जनावरांची असते का?...  असो)" अशी विधान वाचली आणि हसावं की रडावं ते कळेना.

पुण्यात नोकरीला मुलगा पाहिजे, शक्यतो सरकारी नोकरी पाहिजे, स्वतःच घर पाहिजे, आई वडील सोबत येणार का?,.... असे प्रश्न मुली कडून येत असतात. मुलांकडून तर विचारू नका. "गोरी (हल्ली उजळ रंगाची अस म्हणतात) व अनुरूप वधू पाहिजे." अनुरूप... म्हणजे कशी? याची व्याख्या कोणाकडे असेल तत सांगावी.

मॅट्रिमोनियल साईट वर आता लग्न ठरवतात. या साईटवर देखील आपल्या गोत्राचा, जातीचा, अनुरूप जोडीदार शोधता येतो. काही ठिकाणी तर ओळखपत्र पण दाखवले जातात.. असा सगळा लग्न जुळवण्याचा फंडा आहे.

मूळ मुद्धा असा आहे की, लग्न कशासाठी करायचे? या बद्दलची उद्दिष्टे लग्न करणार्या जोडीदारांना आणि घरच्यांना कळली आहेत का... असा प्रश्न पडला आहे. "चांगल्या घराण्यातील मुलगा-मुलगी" हे देखील मला तरी कोड उलगडलं नाही. मग वाईट घराण्यातील मुलं- मुली कसे असतात?.. त्यांचं लग्न कस होत असेल..?

अपेक्षा आणि त्या प्रमाणे जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. पण कधी कधी अपेक्षा अवास्तव होत आहेत का? या बद्दल विचार करायला पाहिजे.

पैसा, पद, प्रतिष्ठा बघून व्यवहार केला जातो परंतु लग्न करण्यासाठी दोघांना मनाने आणि विचाराने एकत्र येणे गरजेचे आहे, त्याचे गुण मिलन नक्की कसे होत असेल?.. पत्रिका आणि कुंडली सारख्या छदम विज्ञानाच्या मागे न  लागता वैद्यकीय सल्ला व चाचण्या करून घेण्याचे प्रमाण किती आहे?... हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे..

एकीकडे लग्नाची वय वाढत आहेत, अपेक्षा वाढत आहेत... आणि मग योग्य वय निघून गेल्यावर मिळेल त्या जोडीदार बरोबर आयुष्य काढावे लागते किंवा मग लग्नच होत नाहीत तेव्हा मग प्रचंड तणाव येतो.

लग्न व्यवस्था कोलमडते आहे आणि त्याचा तोटा कुटुंब व्यवस्थेवर होता आहे.. त्यामुळे यावर विचार करणे फार गरजेचे आहे. 'मागणी आणि पुरवठा' या तत्वावर लग्न केली जात आहेत.. खर तर काही ठिकाणी लग्न न करता "लिव्ह इन रिलेशन" राहण्याचा निर्णय घेतला जातो.. तो देखील चांगला आहे, पण त्याला समजूतदार पणा आणि जबाबदारीची जाणीव असणे गरजेचे आहे...

शेवटी, मग प्रेम विवाह, आंतरजातीय विवाह, स्वतःचा जोडीदार स्वतः निवडणे, विचारांनी योग्य निर्णय घेणे व ते कुटुंबातील मोठया व्यक्तींना मान्य असेल का?..असे बरेच प्रश्न उभे राहत आहेत.

लग्न पहावे करून... व घर पाहावे बांधून अशी एक म्हण आहे... कारण दोन्ही ठिकाणी आपण काय निर्णय घेतो हे महत्त्वाचे आहे..
______________________________________________

शिरीष उमरे, मुंबई

हींदीत एक म्हण आहे की " शादी का लड्डु खाये तो पछताये और ना खाये तो भी पछताये " ह्यातल्या खतरनाक विनोदामुळे तरुणाई अजुनच संशयी व भयभीत असते लग्न म्हटले की...

त्यामुळे जगातील सगळ्यात जास्त तरुण असलेल्या देशात म्हणजे आपल्या देशात युवांनी एक मध्यममार्ग शोधुन काढलाय... सहजिवनाचा !! लीव इन रिलेशनशिप !!

ह्यात सध्यातरी जरुरी तेवढे शिक्षण संपवुन कुठेतरी काम करुन पैसे कमावणारे तरुण जास्त आहेत. आपल्या वरिष्ठांकडुन लग्नाबद्दल चांगले वाइट अनुभव व विचार ऐकुन पहीलेच धास्तावुन गेलेले असतात. त्यातच घरच्यांचा लग्नासाठी रेटा सुरु झालेला असतो तर काही ठीकाणी घरचे हात धुवुन मागे लागलेले असतात... खास करुन मुलींच्या घरचे !!

अश्या वेळेला विष कींवा अमृत पिण्यापेक्षा त्याची चव घेउन त्यातल्या त्यात कमी विषारी व उत्तमातले उत्तम अमृत निवडता येइल असा सोइस्कर  व व्यावसायिक विचार करुन सहजिवनाचा मध्यममार्ग तरुणांना पसंद पडतोय.

एकंदरीत गाजराची पुंगी वाजली तर वाजली कींवा मोडुन खाल्ली...  आयुष्यभराचा तुरुंग नको... नंतर काडीमोडाचा भुकंप नको... असा विचार ह्यामागे असावा.

पुर्वी आईवडीलांच्या पसंतीने व नातेवाइकांनी सुचवलेले स्थळ व त्यातुन लग्नबंधनाचा सोहळा शक्यतो विकोपास जात नसे.

 आता व्यक्तीस्वातंत्र, प्रेम, आर्थिक स्वातंत्र, करिअर ओरियंटेड जीवनशैली, साथिदाराकडुन वाढलेल्या अपेक्षा वैगेरे वैगेरे मुळे तीशीपर्यंत लग्नाच्या बेडीत अडकण्याची कोणाचीच तयारी नाही... कारण लग्न म्हणजे जबाबदारी !! लग्नानंतरच्या सुमधुर तीन वर्षानंतर येणाऱ्या संभाव्य पालकत्वाची जाणीव ह्याची पुर्वकल्पना असल्याने सध्या तरुणाई " जी लो अपनी जिंदगी" ह्या ब्रीदवाक्याला अनुसरुन  जगतेय...

तसे योग्य च आहे कारण लग्न केल्यानंतर एकदुसऱ्यासाठी करावा लागणारा त्याग व त्यानंतर  आयुष्याच्या बागेत रोपटे लावुन त्याला जगवणे व वाढवणे ह्याची अनुभती व असे स्वर्गीय जगण्यासाठी मानसिकरित्या टफ व अथक शारिरीक मेहनतीला तयार होण्याशिवाय पर्याय नाही..

  आपली कुटुंबव्यवस्था ही आपल्या संस्कृतीची जगाला दिलेली खुप मोठी गिफ्ट आहे...
म्हणुन उशिरा का होइना... " लग्न नक्कीच पहावे करुन!! "
____________________________________________

दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम.

आयुष्यात आपल्या कोणीतरी असावं,
जेव्हा आली आठवण नजरेसमोर दिसावं,
मनात आले असता हळूच पाहावे दुरून,
म्हणून तर म्हणतात लग्न पाहावे करून।

कोण असते कोणासोबत आयुष्यभरासाठी,
त्यासाठी तर जुळवून आणल्या जातात सोनेरी रेशीमगाठी,
अशा क्षणी तर येतात सर्व नाती गोती मिळून,
म्हणून तर म्हणतात लग्न पाहावे करून।

जेव्हा येतो मनामध्ये लग्नाचा पहिला विचार,
सुरू होतो तेव्हा पत्रिका जुळवण्याचा प्रचार,
बरीच जुळतात नाती, दुरच्याही अंतरावरून,
म्हणून तर म्हणतात लग्न पाहावे करून।

मानामनामध्ये उमटू लागतात आनंदाचे भाव,
कोणी कोणी म्हणतो देवा एकदा तरी पाव,
सहवास हवाहवासा वाटतो जेव्हा कळवळून,
तेव्हाच तर वाटते लग्न पाहावे करून।
___________________________________________

पवन खरात,अंबाजोगाई.

बापानं पै पै जमवून जणू
लेकी साठीच सार कमवलं होत ।
लग्नात लेकीच्या,काळजा सोबत,
बापानं सार सुखं ही गमवलं होत ।
_____________________________________________
टीप (सर्व छायाचित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहेत)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************