वारी आणि शिकवण

विषय क्र. 2:- 

अनिल गोडबोले
सोलापूर

साधारण पणे 10 ते 15 लाख वारकरी वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूर पर्यंत पायी चालत येतात.

दिंडी चालण्याचा अनुभव वेगळाच असतो. वेगवेगळ्या मुक्कामी राहून वारकरी पंढरपूर ला कळस दर्शन झाले तरी स्वतःला धन्य समजतात.. माऊली म्हणून एकमेकांच्या पाया पडतात...

खर तर भागवत संप्रदाय समानतेच्या शिकवणीचा पुरस्कर्ता आहे असं म्हणतात.. त्यामुळे महाराष्ट्र आपल्या भोळ्या भाबड्या विठुरायाच्या चरणी लिन होऊन जाण्याची शिकवण वारी देते..

परंतु ही शिकवण देव आणि दैवावर विसंबून ठेवणारी तर नाहीं   ना अस देखील कधी कधी वाटत..

वारीत येणाऱ्या दिंड्या, त्यांचे मान अपमान, मोठे पणा पाहता खरोखर समानता आहे का? असा प्रश्न पडला आहे.

वैयक्तिक जीवनात जातीयता पाळणे आणि कर्मठपणा पाळणे हेच जर दिंडी शिकवत।असेल तर याचा विचार केला पाहिजे

अंधश्रद्धा आणि चुकीच्या विचारांना संतांनी विरोध केला आहे पण आता ते चित्र दिसत नाही.

जातीयता गडद होताना रोटीबेटी व्यवहार, पैसे, संपत्ती या बाबत काहीच कृती होत नाही.

ऐन पावसाच्या वेळी पेरण्या करणे, शेती करणे या गोष्टी सोडून काही तरुण दिंडी मद्ये जातात त्या बद्दल देखील विचार झाला पाहिजे. ज्यांनी आपल्या कामामध्ये पांडुरंग बघितला यांनी तर कामामध्ये स्वतः च्या मुलाला तुडवला..  अस म्हणतात त्या गोऱ्या कुंभऱ्याच्या महाराष्ट्रात कर्तव्य निष्ठा खरोखर दिसेल का?..

दिंडी मध्ये होणारे 'मॅनेजमेंट'.. पोलीस यंत्रणा, प्रशासन, आरोग्य यंत्रणा इतर सर्व मार्केटिंग पाहता "कॉर्पोरेट" दिंडी होते आहे की काय असे वाटते..

अवैध मानणारे सर्व धंदे दिंडी मध्ये दिसून येतात. याचा अर्थ सर्व तसेच नाहीत पण यांचे प्रमाण देखील कमी नाही.. दारू, जुगार, वेश्या व्यवसाय सर्व काही चालू आहे.

कचरा, प्रदूषण याच्या समस्या बद्दल बोलू नये... पंधरपूरकर पुढील कमीत कमी एक महिना त्याचे परिणाम भोगत असतात..

जेवढ्या गोष्टी चांगल्या आहेत तेवढया वाईट देखील घडतात..त्यामुळे वारी नेमकी काय शिकवण देते या पेक्षा आपण काय घेतो यावर सर्व अवलंबून असते..

सर्वाना माऊली चा दर्जा मिळो आणि या दिंडी ने महाराष्ट्राचा कायापालट होवो ही पांडुरंग चरणी प्रार्थना.

____________________________

मनोज वडे ,पंढरपूर.

  वारी म्हटलं की सर्वाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न .जसा  'मे' संपतो तस सर्वाना वारी आणि पाऊसाची औढ लागती . जगाला काही तरी संदेश देणारी ही वारी खरी विसमर्णीय असते .कारण प्रत्येक भागातून येणारी वारी काही तरी वेगळं संदेश देऊन जाते.कारण बघाना एवढी मोठी लोक जवळ जवळ एक महिना सगळ्या सोबत कसे मिळून मिसळून राहतात.एकमेकांची काळजी घेतात.सर्व काही शिस्त ने चालते .एवढ्या मोठ्या संख्येने येतात मिळून मिसळून राहतात. जगाला एक हुरूप येईल अशी वागनुक ,संदेश, कोणत्या प्रकारचा शब्द वापरा असा हेवा वाटणारा हा सोहळा मनी कोणताही स्वार्थ नसलेला. हा सोहळा खूप काही शिकवून जातो.कारण आज आपण पाहतो. घराघरातील दशा .तरी ह्या सर्व गोष्टी ला वारी खूप काही शिकवून जाते.जस की गजानन महाराजांची पालखी ही जगाला फार मोठा संदेश देऊन जाते.ही पालकी साधारणपणे 1 महिन्याच्या आधी निघते .जवळजवळ '463'km येते ती पण त्याचा अंगावर असलेली कपडेच आपल्याला बरेच सांगून जातात ,तसेच त्याची शिस्त,एकोपा त्याची भजने ,आवाज त्याची वाहनांची दशा, लय,त्याच्या चालण्याची शिस्त बरेच काही सांगून जातात.जे की अस वाटत की , हे कसे सगळे नियोजन करत असतील .जे की आपणाला आपल्या घरी एक माणूस संभाळता संभाळता नाकी नवं येत .पण ही वारी खूप काही शिकवते .कस वागावं ,कस जगावे, कारण हेच एक महिना लोकांना वर्ष भराची स्फुर्ती देतात .वारकरी त्याच स्फूर्तीने आपलं पुढील 11 महिने नव्या जोशाने आपलं आयुष्य घालवतात .कोणताही स्वार्थ,मी श्रीमंत, तू गरीब,असा कोणताही भेदाभेद न बाळगता हा सोहळा पार पाडतो .खरच खूप काही शिकण्यासारखे असत बघा.
  ‎                         काही पालख्या आळंदी, देहू ,सासवड निघतात .टाळ ,अभंन,मृदंग,मनाला अस भाऊन जाते.की आयुष्य परिपूर्ण होत .ह्या पालख्या जवळजवळ 25 ते 30 किलोमीटर चा रोज पल्ला गाठतात .पण त्यातील वारकऱ्यांना विचारले की, 'बाबा' पाय दुखतात का ? तर किती पण वयाचे वारकरी म्हणतात .काही होत नाही .बाबा!फक्त मन प्रसन्न होत हाच एक संदेश प्रत्येक वारकरी देतात.विट्टल, विट्टल,हा गजर नवी ऊर्जा निर्माण करतो.अस त्यांचं म्हणणं येत .बगांना किती एकरूप होतात आणि एक संदेश देऊन जातात.जर मनुष्यप्राणी एकत्र आला तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. हा खूप मोठा संदेश देऊन जातात.जशी जशी वारी पुढे सरकते तस तस प्रत्येक गावात नवा जोश,नवी ऊर्जा संचारलेली दिसते.कोणीही ह्या काळात स्वार्थ साधत नाही.अशी वारी सोहळा प्रत्येक टप्यात काही तरी नवीन सांगून जातो.म्हणून जन्मून एकदा नक्की करावी वारी.अनुभवा हा सुखद सोहळा.हा सोहळा प्रत्येक क्षेत्राला टच करून जातो .पंढरपूर आहे माझे माहेर घर कारण ह्या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाला नवा संदेश, नवी ऊर्जा,नवा एकोपा,नव जोश,नवी शिकवून देतो,म्हणून जन्म झाला तुका म्हणे करावी एकदा पंढरीची वारी.
  ‎                           काही तर म्हणतात खूप उशीर झाला मला वारी करण्यासाठी कारण त्याचा तोंडातून अस निघत की ,मी ह्याच्या 5 वर्षी आधी वारी केली असती तर खूप माझी प्रगती झाली असती. असे म्हणणारे वारकरी पण भेटतात. एवढा मोठा सोहळा पण त्याच नियोजनन मात्र आपआपली माणस उत्तम पध्द्तीने पाळतात .वागतात  हेच खरं आयुष्यतील  महत्त्वाचे असत.ते शिकण्यासाठी खरच एकदा करावी वारी .पंढरपूर तर भक्तांचे माहेर घर.कारण येते येणार प्रत्येक वारकरी .2 ते 3 दिवस राहतोच .कारण पंढरपुरात सर्व बाजूने त्या वारकऱ्यांचे हक्काचे मठ पंढरपूरात आहेत.हे मठ तर खूप काही शिकवून,आठवणी जाग्या करून जातात.प्रत्येक मठ आपलं वेगळं पण सांगतो आणि मग काय त्या वारकरी सर्व मठाचे दर्शन पालख्याचे दर्शन घेतो आणि त्याला परिपूर्ण झाल्याचे समाधान होते .तो प्रत्येक वारकरी खूप काही शिकुन निरोप घेतो.एका नव्या जोमाने कामाला लागतो.पंढरपुरात आता तर वारकऱ्यांना जवळजवळजवळ 7ते8 दोन मजली संडासाच्या बिल्डींग बांधल्या आहेत.जेणेकरून लोकांना चांगल्या पद्धतीची सेवा प्राप्त व्हावी आणि त्याची सवय ही लागावी.प्रत्येक पालख्याचे रथ बरेच काही सांगून जातात.मन भारावून जात हे सर्व पाहून ....

 ‎हीच व्हावी माझी आस। जन्मोजन्मी तुझा दास।।

पंढरीचा वारकरी। वारी चुको ने दी हरि।।

‘विठ्ठल आमुचे जीवन। आगम निगमाचे स्थान
____________________________

*संगीता देशमुख,वसमत*

    "टाळी वाजवावी,गुढी उभारावी,
     वाट ती चालावी,पंढरीची" 
असं महाराष्ट्रासह अनेक राज्यातील लोकांना वेड लावणारी,जीवनात एकदातरी वारीचा अनुभव घ्यावाच,अशी भावना जिच्याबद्दल  प्रत्येकालाच निर्माण होते,अशी ही पंढरपूरची वारी! "विठ्ठल,विठ्ठल,जय हरी विठ्ठल....!"असे म्हणत संपूर्ण महाराष्ट्र या दिवसात अगदी भक्तीमय झालेला असतो. अध्यात्माच्या अधिष्ठानावर आधारित ही वारी दिवसेंदिवस अधिकच तेजस्वी होत आहे. संत लोकानी या वारीला एक अद्भूत चैतन्य  आणि प्रभावी वैचारिक बैठक प्राप्त करून दिली आहे.आषाढ महिना एकीकडे  लागताच महाराष्ट्रातील भक्तांच्या पावलांना  पंढरीच्या वाटेचे वेध लागतात.मनात भक्तीचा मळा फुलू लागतो.  तर दुसरीकडे हे दिवस म्हणजे शेतकऱ्यांच्या लागवडी-पेरणीचे दिवस! शेतकऱ्यांच्या मनात एकाच वेळी भक्ती आणि शेती या दोन्हीचेही वेध लागलेले असतात. एकदाची लागवड,पेरणी करून शेतकऱ्यांच्याही पावलांना ओढ लागते ती,पंढरपूरची आणि पंढरपूरचा राजा पांडुरंगाची!
 मग मन गुणगुणते,
"माझे जीवीची आवडी|
पंढरपूरा नेईन गुढी||"
        सर्वसामान्यांचे आवडते,लाडके दैवत म्हणजे पंढरीचा सावळा विठ्ठल! या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांचे अनेक जथ्थे म्हणजे वारी होय.हिलाच "दिंडी" असेही म्हणतात. ही वारी म्हणजे महाराष्ट्रातील एकोप्याचा अनुपम असा नमुनाच म्हणावा लागेल. जिथे उच्चनीच,गरीब-श्रीमंत,शिक्षित-अशिक्षित,आपपर असा कुठल्याही भेदभावाचा लवलेशही आढळून येत नाही. मानवतेचा खराखुरा आविष्कार येथे प्रत्ययास येतो.जेथे "मी"पणा गळून पडतो, संसारातील मोह,काम,क्रोधादि षडरिपूंचा पराभव होऊन माणूस निर्विकार बनून त्या वारीत सामील झालेला असतो. सामान्य माणसाच्या जीवनात सुखापेक्षा दुखाचाच जास्त प्रभाव असतो. उदरनिर्वाहासाठी स्वीकारलेल्या मार्गाचाही कुठेतरी उबग आलेला असतो. आपली  कर्तव्यपूर्ती करत असताना व्यवहार,संसारातील तोचतोचपणा,सुख-दु:खाचा लपंडाव,आजारपण,नातेवाईकाकडून होत असलेला अपेक्षाभंग,या सर्व बाबीना सामान्य माणूस कंटाळलेला असतो. मग तो कुठेतरी आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि हा आनंद त्याला मिळतो तो याच वारीत!
"गांजुनिया भारी ,दु:ख दारिद्र्याने,
पडता रिकामे भाकरीचे ताट,
पाऊले चालती पंढरीची वाट!"
सर्वश्रेष्ठ संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांच्या पादुका श्रध्देने घेऊन हे वारकरी पंढरपूरकडे रवाना होतात. पंधरा-वीस दिवस चालणारा वारीचा हा सोहळा म्हणजे भक्तिरसाचा महापूर असतो. खरंतर यात कुठलेही पूर्वनियोजन नसताना आनंदाची टाळी वाजवत,हाती भक्तीच्या पताका,ध्वज घेऊन,टाळ-मृदंगाच्या निनादात,मी पणाचा त्याग करुन  एकेकजण सामील होतो. आणि मग ही सर्व पाऊले चालतात ती पंढरीची वाट! या वारीत,विठ्ठलाच्या नामघोषात पावले इतकी एकरूप होतात की,सर्व दु:ख,वेदना विसरून,पार केलेल्या अंतराचा किंवा उरलेल्या अंतराचा त्याला पत्ताही नसतो. भक्तिरसात तल्लीन झालेले मन केव्हाच पंढरपूरात विठ्ठलाच्या चरणी लीन झालेले असते.रस्त्याने कोणत्या गैरसोयी होतील,कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावे लागेल,अशा विचाराचा कुठे मागमूसही नसतो. याउलट रस्त्याने होणारी गैरसोय  ही गैरसोय वाटत  नाही तर ती लाडक्या विठ्ठलाने केलेली व्यवस्था वाटते. वारीत जाणाऱ्या भक्तांवर विठ्ठलप्रेमाचा एवढा पगडा असतो की,त्याक्षणी त्याना असणाऱ्या दुर्धर व्याधींचाही विसर पडलेला असतो. ही जादू,हे भाग्य लाभले ते या महाराष्ट्रातील फक्त विठ्ठल याच देवाला! भरपावसात देवाच्या पादुका डोइवर घेऊन,डोंगरदऱ्याचा,आडवळणाचा रस्ता तुडवत भक्तांची अनंत पावले पंढरीची वाट चालत असतात.या वारीचे वैशिष्ट्य हे की,आज जिथे सर्वत्र प्रत्येक जातिधर्माने आपापले देव वाटून घेतले त्याच मातीत  सर्व जातिधर्माचे लोक या वारीत श्रध्देने वर्षानुवर्षापासून  सहभागी झालेले असतात. आज आजूबाजूला दिवसेंदिवस जातिवाद,धर्मवाद कट्टर होताना दिसतो तर याउलट पंढरपूरच्या वारीत जातिधर्मांच्या शृंखला कुठे मागेच गळून पडलेल्या दिसतात. संसार,व्यवहार,नातीगोती  मागे टाकून वारीतील प्रत्येक भक्त एकाच उद्देशाने निघालेले असल्याने एकमेकांना "माऊली" असे  प्रेमळ संबोधन देऊन एकजीवाने पुढे पुढे जातात.श्रध्दा-अंधश्रद्धा यावर मंथन न करता,या विवेकवादात न पडता,  नास्तिक- आस्तिक या सीमा पार करुन बुध्दिप्रामाण्यवादीही या प्रवाहात सामील झालेले दिसतात. याही पलीकडे जाऊन अनेक विद्यार्थी,तत्ववेत्ते या वारीवर  संशोधनात्मक  अभ्यास करतानाही दिसू  येतात. यापेक्षा या वारीचा महिमा कोणत्या शब्दात वर्णावा? आजच्या या  ताणतणावाच्या युगात ही वारी म्हणजे,एकप्रकारची विशिष्ट "थेरपी" ठरू पहाते आहे.म्हणून ही पंढरीची पारंपारिक वाट चालणारी आधुनिक पावले आजही श्रेष्ठ वाटतात.

____________________________

दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे.

     *पाऊले चालती पंढरीची वाट*

     वरील पंक्ती मधील आशय मांडायचं झाल्यास अनेक पुस्तकं लिहावी लागतील, कारण या सर्वांची मूळ दडली आहेत त्या वारीत ( पांडुरंगाच्या आणि ईतर ). भारतामध्ये वारी करणारे ते वारकरी आणि या वारकऱ्यांचा समुदाय म्हणजे वारकरी संप्रदाय.
     
      मुख्यतः हा वारकरी संप्रदाय भारताच्या विविध भागातून वारीसाठी एकत्र येतो म्हणजे इथे आपल्याला जी शिकवण मिळते ती ऐक्याची, तसेच हा वारकरी संप्रदाय कधीच जातपात, पंत, रंग ई चा कधीही बागुलबुवा नाही करत येथे शिकायला मिळते ती समानता. वारीमध्ये चालताना एकमेकांच्या सुखदुःख समजून मदतीला तत्पर राहतात ते वारकरी इथं शिकवण मिळते ती प्रेम, आपुलकी, इतरांप्रती सद्भावना. या पेक्षा ही मोठी शिकवण म्हणजे माणसाला माणुसकी शिकवण्याच काम केलं ते याच वारकरी संप्रदाय मधील तुकोबा राय, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, नामदेव ई.

*अवघे गरजे पंढरपूर...*

     वारी मधील वारकरी पांडुरंगाचे नाम स्मरण करत त्यांची सर्व श्रद्धा पांडुरंगाचे सतत होणारे जप तप तल्लीन असलेले वारकरी पाहिले की एकरूपता याची प्रचिती पण येते. पाऊस नाही पडला तर देवाला मागणे मागून मुक्या जनावरांना पुरवेल एवढा तरी पाऊस पडावा ही विनवणी खूप काही शिकवून जाते.

____________________________

प्रविण दळवी
नाशिक

वारी करून येणे म्हणजे पाप-पुण्य आणि सुखदु:खाचा विसर पडून त्याचा त्याग करून विद्यार्थी देहाचा माणूस म्हणून पंढरपुरातून परत येणे. ‘वारी’ म्हणजे येरझार. चालत पांडुरंगाच्या भेटीला जाणे. भगवंताला भेटून आनंद घेणे आणि पुन्हा माघारी येणे. वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात. तहानलेल्याला पाणी द्यायचे, भुकेलेल्याला अन्न द्यायचे ही साधुसंतांची शिकवण मनात ठेवून समाजात वावरायचे. परस्त्रीला मातेसमान मानायचे, कुणाचा मत्सर करू नये. अशी वचने स्वीकारून हा पांडुरंगाचा भक्त माघारी येतो. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक या वारीमध्ये सहभागी होतात. पायी प्रवास करताना कुठलाही आजार, कुठलाही आघात होत नाही. परमेश्वराचे नामस्मरण करता करता खूप बळ येते. भगवंताच्या दर्शनासाठी अधीर झालेला हा भक्तसमुदाय आनंदाने हा सोहळा साजरा करत असतो. अनेक वारकरी पिढय़ान्पिढय़ा पायी वारी करत आहेत.

संतांची शिकवण काय आहे. मनातला स्वार्थी हेतू जाळून टाकला पाहिजे. मत्सर, हेवा आणि दुस-याबद्दल कुलषित भावना यांचा नाश केला पाहिजे. परमार्थ काय आहे याची शिकवण मुलांना दिली पाहिजे. स्वत: आचरणही तसे करावे लागते. संत कुणाला म्हणावे, ज्याच्या ध्यानी-मनी परमेश्वर आणि त्याचे स्वरूप पाहतो. दुस-याच्या सुखात आपले सुख मानणारा तो खरा साधुसंत. माणसाची नीती आणि आचरण शुद्ध असावे असे म्हटले तरी ते पूर्णत: जाणवत नाही. भक्तीमार्ग हा अत्यंत सोपा पण तितकाच कठीण मार्ग आहे. मार्गात खूप अडथळे आहेत, प्रापंचिक अडचणी, आर्थिक अडचणी आहेत, पण त्यात भगवंतांची निस्सीम भक्ती करणारा जो भक्त आहे, त्याला सहज असा एखादा सुखद अनुभव येतो. ज्यात भगवंताच्या भक्तीचा वास असतो. आहे त्यात समाधान मानणारा हा भाविक असतो. कलियुगात स्वार्थीपणा प्रचंड वाढला तरी असा भक्तिसमुदाय आहे जो गाठीला पुरेसे पैसे नसतानाही पांडुरंगाच्या भेटीसाठी निघतो. ‘तोची माय बाप’ अशी धारणा ठेवूनच त्याचा पायी प्रवास असतो. इथे गरीब/श्रीमंत भेदभाव नसतो, जात-पात, धर्म-भेद नसतो. इथे वायफळ दिखावा नसतो, तर इथे प्रत्येकजण भगवंताचा भक्त असतो, ज्याचे नेत्र आसुसलेले असतात त्याच्या दर्शनासाठी. केव्हा जाऊन नतमस्तक होतो आणि भक्तीमध्ये वाहून घेतो. अशी आत्यंतिक ओढ असलेला हा पांडुरंगाचा भक्त असतो. ‘युगे अठ्ठावीस, विटेवरी उभा’ असलेला हा परमेश्वर चराचरात त्याची नजर आहे. गरिबांच्या हाकेला धावणारा हा विठुराया.

‘‘ज्ञानदेवे रचिया पाया.. तुका झालासी कळस’’ समस्त मानव जातीला परमार्थाची शिकवण देणारे संत. १३ व्या शतकातील हे संत भगवत गीतेचे महात्म्य त्यांनी सांगितले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या भावंडांनी समाजाच्या प्रखर विरोधाला तोंड द्यावे लागले. अत्यंत हीन वागणूक दिली, पण त्यांच्यातले देवत्व समाजाला जाणवले तेव्हा त्यांना याच संतांनी शिकवण समाजासाठी तारणहार ठरली. "देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर" असा उल्लेख आहे कारण संतांनी या मानवी देहाचे वर्णन करताना मंदिर आणि आत्मा असे समीकरण जोडले आहे. मन आणि चारित्र्य शुद्ध असणा-याला इहलोकातल्या दु:खाचे निराकरण करण्याची नि:स्वार्थी भावना सतत जागृत असते. बरे-वाईट काय आहे हे आपल्या विचारांवर अवलंबून आहे. आपण ज्या नजरेने जे पाहू तसे ते दिसेल. म्हणून साधुसंतांनी सांगितले आहे की, दिवसभर देवाजवळ बसून भक्ती करू नका. तुमच्या आचरणात आणि विचारात चांगले विचार ठेवा आणि मेहनत करा, मग त्याचे फळ मिळेल. परिश्रमाशिवाय काहीही साध्य नाही.

असा कुठलाही देव म्हणत नाही फक्त माझी भक्ती करत राहा. मेहनत हाच परमेश्वर आहे. तुम्हाला जो वेळ मिळेल तो आपल्या शुद्ध आचरणासाठी देवाच्या नामस्मरणात घालवावा. तुम्ही कुठेही असाल, नि:स्सीम भक्ती असेल तर परमेश्वर नक्कीच कायम तुमच्या पाठीशी आहे. सुख तर ह्यातच आहे. प्रचंड संपत्तीने झोप येत नाही आणि गरिबीनेही निद्रानाश होतो, त्यासाठी ‘‘पोटापुरते असावे"असे संतांनी सांगितले आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे विष बनते असे सूचक ज्ञान संतांनी दिले.

पंढरपूर वारीच्या निमित्ताने संतांची शिकवण यावर विचार मांडताना तुकारामांच्या अभंगातून स्पष्ट विचार जे मांडले ते सकल जनांना सार्थ ठरले.
‘हेचि दान देगा देवा.. तुझा विसर न व्हावा।। १।।
गुण गाईन आवडी। हेची माझी सर्व जोडी।। २।।
न लगे मुक्ती आणि संपदा। संतसंग देई 
सदा ।। ३।।
तुका म्हणे गर्भवासी। सुखे घालावी 
आम्हासी।। ४।।
अशा भगवंतासी नतमस्तक होऊन वारीतल्या वारक-यांना साष्टांग दंडवत !
____________________________

सिताराम पवार, पंढरपूर

संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, वाराणसी गया पाहिली द्वारका। परि नये तुका पंढरीच्या। पंढरीसी  नाही कोणा अभिमान। पाया पडे जन एकमेका।  आपल्या देशात कुठेही जा वयाने मोठा व्यक्ती लहान वयाच्या व्यक्तीच्या अगदी लहान मुलांच्या पाय पडताना दिसत नाही पण वारीत ते दिसते हाच वारीचा समतेचा पाया आहे. कोणत्याही प्रकारचा भेद वारीत दिसत नाही फक्त "माऊली आणि ज्ञानोबा तुकाराम" नामस्मरनाणे वाट वातावरण आनंदमय झालेले असते.   सर्वप्रकारचे दुःख, चिंता, सांसारिक त्रागा विसरून लोक या सार्वजनिकआनंदात तल्लीन होतात.
आता वारकरी शिकवण- संतांनी अगदी सोप्या भाषेत अभंग लिहिले आहेत संत तुकाराम महाराज अभंगात म्हणतात" हरी हरा नाहीं भेद। एका वेलांटीच्या आड।" तसेच विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ। म्हणजे शैव, वैष्णव, शंकराची भक्ती, नाथ पंथ यात भेदभाव नसून ते फक्त भक्तिमार्ग आहेत यावरून कोणीही वाद करू नये ज्याला योग्य वाटेल तो त्या मार्गाने जाईल पण त्यावरून माझा मार्ग चांगला, दुसऱ्याचा वाईट असं करू नका म्हणतात. असे अनेक अभंग, भारुड, गण गौळणी आहेत त्याद्वारे समाजप्रबोधन सुद्धा वारीत होते. संत ज्ञानेश्वर, नामदेव, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांच्या समाजप्रबोधन पर अभंगही गायले जातात.  आणखीही वारकरी माणूस थोडाजरी चुकला तरी अभंगाचा दाखला कोणीही देतो त्यामुळे पंढरीचा वारकरी हा  "धारकरी" नसून काम, क्रोध, मध, मत्सर अशा विकारांवर तसेच वाईट विचारांवर "वार" करणारा वार'करी आहे.
____________________________

विषय क्रं.२-वारी आणि शिकवण
   करिश्मा डोंगरे
      देवाचीये द्वारी उभा श्कनभरी
       तेने मुक्तीचारी साधीयेल्या!
           हे आपलं बरोबरेय हं!जरी तुम्ही देवाचे दर्शन नाही घेतले, श्कनभर जरी उभारलात तरी चारी याञा तुम्ही मीळवल्या असे तुकाराम महाराज म्हनतात.या सगळ्या संतांच्या अभंगातून काही ना काही शिकायला मीळतेच.तुकाराम महाराजांनी सांगितले प्राणिमांञावर दया करा.त्यांनी कुञाला भाकरी टाकली आणि कुञे ते घेउन गेले तरी हे त्याच्या मागे तुपाची वाटी घेउन पळायचे.आपन करतो का आता एवढे?नाही ना!संत माउली नी सोळाव्या वर्षी न्यानेश्वरी लिहली.काय कळत असेल तेव्हा,अाता काय करतात ओ सोळाव्या वर्षात?कुठे चाल्लाय आपला संताचा महाराष्र्ट बघा जरा.काय शिकवन घेतोय.जनाबाईंच्या तर गौर्यातून विठ्ठल!विठ्ठल असा आवाज यायचा.कुठे हरवलेय का ही भक्ती प्रश्न पडतो मला?तेव्हाची जनाबाई आता नाही दिसत कुठे?या सगळ्या संताच्या शिकवणी नाहीत दिसत आता.माहीतेय खूप गर्दी होते पण तेवढी भक्ती आहे का?माझा लेकुरवाळा विठू त्या गर्दीत कुठेतरी हारवलाय.भक्तीचा भुकेला आहे.
             पंढरपूरची वारी म्हटलं की कामाची लगबग चालू होते,कारन बर्याच जनांची पोट त्यावरच असतात. हे इथले वास्तव आहे.अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत चीकाटीने कामे करतात.मोठ्या प्रमानात व्यवसाय चालतात या दिवसात.आणखी एक वास्तव लाजीरवाने आहे,की वारी करन्यासाठी सगळे येतात पण, ईथेच घरातले म्हातारी मानसे सोडून जातात.खूप -खूप लाजीरवानी गोष्ट आहे.वारी झाली की बघायचे बरीच अशी म्हातारी मानसे आपल्याला दीसतील.एकदा तर कॉलेज मध्ये असताना NSNS मधील मूलांनी अश्याच एका आजी ला आञमात नेउन सोडले होते.खूप बेकार अवस्था झाली होती तीची.ते बघून डोळे भरून आले.कुठे हरवलेय संताची वाणी.काय शिकवते ही वारी आपल्याला सांगा ना?माणूसकी राहीलीच नाहीये.विठू लेकुरवाळा आहे म्हणून असे करतात का ही लोक? मला तर असेच वाटतेय!म्हणून तर असे करतेत.तरी या पंढरीत अजुन माणुसकी आहे,त्या सोडलेल्या मानसांना सांभाळून घेतात.विठोबाराया बघ बाबा आता तूच!!जय हरी 

____________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************