टीव्ही न्युज चॅनलवर लगाम गरजेचा?


वाल्मिक फड, महाजनपूर नाशिक .

खरोखर लगाम हा फार गरजेचा झाला आहे.कारण जेव्हा कधी बातम्या ऐकाव्या म्हणलं की,यांच्या चॕनलवर कायम वाद निर्माण होतील अशाच बातम्या चालू असतात.आणी हे पहा सामान्य माणसाला काय करायचे हो हे ऐकून की ह्या हिरोईनला मुलगा झाला मुलगी झाली,हि पळून गेली,ती परत आली सांगा काय करायचय सामान्य माणसाला आहे का काही गरज ह्या बातम्यांची?
अहो मला तर असं ऐकायला मिळालं की,हे चॕनेलवाले ज्याच्याकडून पैसा मिळाला त्याच्या बाजूने परत परत बातम्या देऊन सामान्य लोकांना टिवी नकोसा करतात.आत्तापर्यंत ज्या ज्या शेतकर्याच्या मुलाखती घेतल्या त्यांच्याकडून हे पैसे घेतल्याशिवाय मुलाखती घेत नाही.सरपंच असताना अशा एका चॕनेलवाल्याला फोन केला म्हटलो पंचवीस वर्षापूर्वीची गावकर्यांची व्यथा मांडावी सरकारसमोर परंतु गावात येण्याच्या बदल्यात आम्हाला विस हजार खर्च लागणार असल्याने आम्ही त्या गोष्टिकडे पाठ फिरविली.शेवटी पेपरला दिले आम्ही पण त्याचा एवढा काही परिणाम झाला नाही.
सांगायचे तात्पर्य इतकेच कि,हे न्युज देतात ना प्रामाणिकपणे द्या ज्यांच्यावर अन्याय होतोय ते सत्य जनतेला कळू द्या.नुसती कर्जमाफीची बातमी तुम्ही दाखवता पण प्रत्यक्षात गावांत येऊन गरीब शेतकर्याँना विचारा की झालीय का तुम्हाला कर्जमाफी.नुसता एखाद्या मंञ्याने शब्द काढला कर्जमाफीचा की तुम्ही दिवसभर जनतेला वेड्यात काढता आणी शहरातील जनतेला ते खरं वाटतं,सरकारला खरोखर कर्जमाफी करायची होती तर जे २०१७ जून मध्ये थकबाकीदार झाले त्यांना करायला हवी होती कारण हे सगळे शेतकरी नियमीत कर्जफेड करत होते.ह्या बाबतीत कधी न्युज चॕनेलवाले कधी मंञ्यांना प्रश्न विचारता का?नाही विचारत कारण गरीब शेतकरी त्यांना काही देऊ शकत नाही.सरळ असलेली बातमी ऊलटसुलट सांगून जातीय तेढ मोठ्या प्रमाणात हे न्युज चॕनेल करतात आणी म्हणूनच अशा गोष्टि थांबविण्याकरीता सर्वच टिवी न्युज चॕनलवर लगाम गरजेचा आहे असं मला वाटतं.जय हिंद.
______________________________________________

शिरीष उमरे, मुंबई

प्रेस स्वातंत्र ह्या घटकावर १८० देशाच्या जागतिक यादीत आपला देश १४० व्या क्रमांकावर !!
१००+ भारतीय न्युज चॅनल पैकी बहुतांश बड्या कार्पोरेट हाऊसच्या मालकीचे !!
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम च्या रिर्पोर्टनुसार भारतिय मिडीया जगात सगळ्यात जास्त भ्रष्ट !!

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ, संविधानाचा रक्षक, लोकांचा आवाज वैगेरे आता अंधश्रध्दा झाल्या आहेत.

हा एक धंदा झालाय... भ्रष्टाचाराला बढावा देणारा, भ्रष्टाचाऱ्यांना लपवणारा, भ्रष्टाचाऱ्यांना वाचवणारा आणि भ्रष्टाचाऱ्यांना प्रसिध्दी देऊन त्यांचा उदो उदो करणारा !

हा संघटीत गुन्हेगारी चा अड्डा झालाय ज्यात ब्लॅकमेलींग, खंडणी वसुली, पेड न्युज, मनी लाँड्रींग, आर्थिक घोटाळे, टीआरपी साठी फेक न्युज, नोकरवर्गांचे लैंगिक शोषण सारखे गंभीर गुन्हे सर्रास होत आहेत.

 ह्याला पाठींबा आहे राजकारण्यांचा, धार्मिक संघटनांचा, सरकारचा व मालक कार्पोरेटचा....

जे खरेखुरे पत्रकार होते त्यांचा आर्थिक व मानसिक छळ आणि हत्या करुन एका पध्दतीचे दहशतीचे वातावरण निर्माण केले गेले आहे.
बाकी उरलेले कणाहीन, चरित्रहीन, लाळघोटे, पाय चाटणारे कुत्रे व लचका तोडण्यास टपलेले गिधाडे आहेत.

अश्या वेळी आपण नागरिक म्हणुन काय करु शकतो ?
आंदोलनातुन अश्या न्युज चॅनलसाठी कठोर नियम तयार करण्यास व अंमलबजावणी करण्यास सरकारला भाग पाडु शकतो. बकवास टीवी चॅनल पाहणे बंद करु शकतो. खोट्या बातम्या फॉरवर्ड करणे बंद करु शकतो.
 माहितीच्या हक्कावर व सत्य बातमी साठी काम करणाऱ्या विसल ब्लोअर पत्रकारांच्या मागे ठामपणे उभे राहु शकतो. ह्या गंडागर्दीला आता विरोध नाही केला तर अनर्थ होऊ शकतो... जागे व्हा...सध्या संसदेत माहीतीच्या अधिकाराच्या कायद्यात जो बदल केल्या जातोय त्याला विरोध करा... ह्यावेळेसही शांत राहाल तर पुढची पीढी माफ करणार नाही तुम्हाला...
_____________________________________________

शिवकुमार म.पत्रे
कर्वे नगर,पुणे
                    प्रसार माध्यमाचे वेगवेगळ्या गटामध्ये वर्गीकरण केले जाते त्यातील एक महत्वाचा गट म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया होय,आणि आपल्या चर्चेच्या विषयातील न्यूज चॅनेल हा एक त्यातील छोटासा परंतु अत्यंत महत्वपूर्ण घटक होय म्हणून या विषयावर चिंतन मंथन करणे काळाची तसेच या देशाची तथा त्या अर्थाने सामाजिक गरज बनली आहे .

 २०१ सदस्य असलेल्या या अत्यंत छोट्यास्यां ग्रुप वर या प्रदीर्घ विषयावर विचार होतोय यापेक्षा अजून श्रेष्ठ गोष्ट कुठली नसेल,आणि या समुहाचा मी एक घटक आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो.खर तर या विषयावर प्रेतेकाने सामाजिक माध्यमांवर वेक्त होणे गरजेचे आहे त्याचा प्रभाव मोठ्याप्रमाणावर पडेल व टीव्ही न्यूज चॅनेलवर बंधने येतील ज्या मुळे आपला खरा मोटो ,अंजेडा उद्देश पूर्ण होईल. आता खऱ्या अर्थाने याची गरज का आहे यावर चर्चा करूया ,सध्या सामाजिक माध्यमांवर चर्चेचा विषय ठरलेली भारतीय खेळाडू हिमा दास जिने स्वर्ण पदक जिंकून भारताचे नाव मोठे केले आणि झाले काय आपल्या न्यूज चॅनेलवर तिचा जसा उल्लेख असावा तसा उल्लेख कुठल्याच न्यूज चॅनेलवर दिसत नव्हता पण सामाजिक माधामनवर जेव्हा तीच्या नावाने हॅच टॅग मारून बऱ्याच जणांनी न्यूज चॅनेलेवल्याना धारेवर धरले तेव्हा कुठे तिची ब्रेकिंग न्यूज बनली आणि तिचा संघर्षमय प्रवास यशोगाथा संबंध जगाच्या पुढे आली.

 जर २६/११  चा हल्ला आपल्या सगळ्यांच्या स्मृतीत असेल तर आपल्याल्याला एक गोष्ट नक्की आठवत असेल ,
ज्यावेळी पॅरा कामांडोज त्या हॉटेलच्या बिल्डिंगवर उतरत होते तेव्हा आपल्या सो कॉलड न्यूज चॅनेलवर त्यांचा लाईव्ह रिपोर्ट दाखवला जात होता त्यामुळे ते सावध झाले .ज्यामुळे भारतीय जवान व अनेक नागरिक मारल्या गेले.
अमेरिकेसारख्या मोठ्या देशामध्ये न्यूज चॅनेलवर  वेगवेगळी बंधने लादली आहेत , अमेरिकेत न्यूज चॅनेलवर  कुठली बातमी दाखवायची जी बातमी दाखवली जातीय तिचा कन्टेन्ट कसा असला पाहिजे ,
असे बरेच सुंदर व अत्यंत महत्वाचे नियम आहेत.एखादी बातमी जर सामाजिक तेढ निर्माण करणारी असेल तर ती दाखवली पाहिजे का जर दाखवली जातीय तर ती कश्यापद्धतीने दाखवावी असे बरेच विषय या मध्ये आहेत.

 प्रसार माध्यमे ही समाज मनाचा आरसा असतात आणि जर याच अरश्यामध्ये दाखवला जाणारा चेहरा हा खोटारडा असेल तर पाहणाऱ्या प्रेतेकलाच ते समजेल असे नाही.
निमूट पने डोळे झाकुन न्यूज चॅनेलवर जे काही दाखवलं जातंय ते त्रिकाल बाधित सत्य आहे अश्या मानसिकतेत असलेल्या सामाजिक भारत देशा मध्ये खऱ्या अर्थाने न्यूज चॅनेलवर बंधने असणे अत्यंत आवश्यक आहे.
मागच्या काही  वर्षांमध्ये प्रत्येक बातमीला एखाद्या विशिष्ठ जात,धर्म किंवा सांप्रदाय तथा विशिष्ट समुदयाशी जोडणे आणि आपल्या न्यूज चॅनेलचा टी आर पी वाढवणे एवढ्यापुरतेच न्यूज चॅनेल मर्यादित झाले आहेत हे प्रकर्षाने जाणवतंय. सर्रास पणे प्रत्येक विषयाला धार्मिक ,सांप्रदायिक रूप देऊन नुसत्या वायफळ गप्पा भरवणे
 इतक्या पुरतेच न्यूज चॅनेल मर्यादित नाहीयेत .

समाज मनातील वेगवेगळ्या समस्या,अडचणी व प्रश्न आपल्या न्यूज चॅनेल च्या माध्यमातून समोर आणून त्यावर कार्य करण्यासाठी प्रशासनास व सरकारला भाग पाडणे ,वंचित पीडित व शोषित समुदायाचा आवाज बनून त्यांना न्याय मिळवून देणे हा आपला खरा धर्म,कर्तव्य दायित्व तथा जबाबदारी आहे हे न्यूज चॅनेल चे तथाकथित भामटे मालक व सुटबुटात वावरणारे खोटरड्या अफवा व बातम्या सांगणारे खऱ्या अर्थाने गुन्हेगारीस पाठीशी घालून भ्रष्टाचारास बढावा  देणारे सुशिक्षित भ्रष्ट कर्मचारी विसरून गेले आहेत म्हणून त्यांना याची वेळोवेळी जाणीव करून देण्यासाठी कायद्याच्या
बेड्या घालून लगाम घालणे गरजेचे नव्हे तर महत्वाचे आहे.
____________________________________________

सौदागर काळे,पंढरपूर.

आपल्याला जशाच्या तश्या गोष्टी स्वीकारण्यास मजा नसते.काहीही करून तेल-मीठ लावलेल्या गोष्टी बघायला,ऐकायला आवडतात.मग त्यात भर टाकून पुढे पाठवल्याशिवाय आपला आत्मा तृप्त होत नाही. प्रसंग,वेळ कोणतीही असो.तशी आपल्याला सवय झाली किंवा करवून घेतली आहे.याला जुना साथीचा रोग म्हटलं तर चुकीचे वाटणार नाही.

खाजगी चॅनेल सुरू होण्यापूर्वीचा काळ आणि सुरू झाल्यानंतरचा काळ आपण जरा एकांतात बसून आठवून पहा.मग कळेल नेमकं लगाम कुणाला लावणं गरजेचे आहे?

मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्राचा नियम. आपल्याला खाणं चवीचं लागतं तिथं न्यूज कशा अपवाद राहतील!तशा न्यूज पुरवण्याचे काम खाजगी चॅनेल करत असतात.आपल्याला अशा न्यूज बघायला आवडतात.ते दाखवत राहतात.आता हा पण थोडासा भूतकाळ झाला.आताच्या अवस्थेत न्यूज आपल्यावर लादल्या जात आहेत.आपल्या चवीचा ,मागणीचा विचार न करता."जनता मालक असते" फक्त मतदानादिवशी.आता त्या मतदान प्रक्रियेवरही संशय आहे.म्हणजे मालकाला गंडवले जात आहे.पध्दतशीरपणे.हा वेगळा मुद्दा असला तरी सध्या जनता मालक ना नोकर.भिकारी झाली आहे!जे झोळीत पडेल ते लाचार बनून स्वीकारायचे.अन अशावेळी आपण एकमेकांना विचारत आहोत....लगाम उगरायचा का? त्यासाठी अगोदर मालक बनायला हवं ना...मालक होणं  जमत नसेल तर...आपल्या सरकारच्या न्यूज वाहिन्या बघत चला...तिथेही मनासारख्या न्यूज नाही आल्या तर टीव्ही बंद करून टाका.जास्त डोकं आउट झालं तर विकून-फोडून टाका.पण लगाम आपल्या हातात राहिला नाही.हे सत्य स्वीकारा.

दुसरं म्हणजे पत्रकारांनाही पोट आहे.ते आपल्याने भरणं होत नाही.मग उपाशी राहण्यापेक्षा त्यांनी चाकरी केली तर काय वाईट !
______________________________________________

संगीता देशमुख,वसमत.

         फारपूर्वीचा काळ नाही परंतु आपल्याच पिढीने पाहिलेला तो काळ! आपण किशोरवयीन होतो. तेव्हा फक्त दिल्ली दूरदर्शन आणि सह्याद्री दूरदर्शन अशा दोनच वाहिन्या होत्या. त्यातही आपल्याला चॉइस नव्हता. त्यामुळे दोन्ही वाहिन्यांवरच्या बातम्या पहायला मिळायच्या. आजच्या न्यूजचॅनलच्या बातम्या पहाताना मला त्या दिवसाची आवर्जून आणि सातत्याने आठवण होते. किती संयतपणे,धीराने बातम्यांचे निवेदन होते! निवेदक कोणत्याही बातमीचा "इव्हेंट" न करता त्याचा फक्त वृतांत  आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम ते करायचे. ती बातमी राजकीय वादळाची असो अथवा नैसर्गिक वादळाची,त्याचे फक्त वृतांतकथन व्हायचे. तज्ञांच्या चर्चा मसलती शांतपणे व्हायच्या. मग आपण प्रेक्षक त्यावर आपली भूमिका बनवायचे.  आज मात्र बातम्यांच्या वाहिन्यांचा सुळसुळाट झाला. स्पर्धा वाढली. आपला टीआरपी वाढून घेण्यासाठी बातम्यांचे निवेदक(?) मात्र अत्यंत कर्कशपणाने,अतिअविर्भावात साभिनय व्यक्त होताना दिसतात.  बातम्या निवेदन करताहेत की ते आपल्यावर लादताहेत,हेच क्षणभर आपण विसरतो. प्रेक्षकांनी भूमिका बनविण्यापूर्वीच ते स्वतःला जे योग्य वाटेल तसेच  ठासून मांडतात. पर्यायाने यातून प्रेक्षकांची दिशाभूलच होते. वादविवादमध्ये तर हे निवेदक इतके मध्ये मध्ये हस्तक्षेप करतात की,वक्त्याचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याऐवजी त्यांचाच आवाज जास्त होतो. त्याचप्रमाणे यातही त्यांचीच मनमानी चालते. ज्या बाबींवर फोकस व्हायला हव्या त्या बातम्या दूरच रहातात. अनेकदा ज्या बाबींची गुप्तता पाळायला हवी असते,ती गुप्तता राखली जात नाही. त्यामुळे खरच या वृत्तवाहिन्यांवर कोणाचा लगाम असायलाच हवा. नाहीतर हे लोक  यांच्या आततायीपणामुळे येणाऱ्या पिढ्यांची दिशाभूल करू शकतात. किंवा शत्रूराष्ट्राला आयते कुरण मिळवून देऊ शकतात.
______________________________________________
टीप-( सर्व छायचित्रे गुगल इंटरनेट वरून घेतलेली आहेत)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************