गणपती उत्सव..आनंदाचा उत्सव..

 गणपती उत्सव..आनंदाचा उत्सव..


अनिल गोडबोले, सोलापूर

सगळेच उत्सव आपल्याला प्रिय असतात परंतु गणेशोत्सव मात्र अत्यंत मनापासून वेगळा उत्सव वाट
तो कारण, हा उत्सव नसून मराठी माणसाची जगण्याची रीत आहे असे मला वाटते

मला आठवतो तो कोकणातला गणेशोत्सव, घरातील गणपती, दीड दिवस ते 11 दिवस वातावरण निर्माण व्हायचं ना... ते पुढच्या वर्षी पर्यंत जगण्याला बळ द्यायचं.

लहान पणी जेवढा आनंद होत असे तेवढा आनंद आता देखील होत असतो. तुम्ही कोणीही असा पण वातावरण मात्र तुम्हाला मरगळ झटकायला मदत करते.

आता गावी गणपतीला जाणे होते. खर तर सर्वाना भेटायला मिळणार या आनंदाने जावे लागते.
सगळे मुंबईकर गावाकडे येतात.. भजन आरती चालू असतात.

गावाकडे गणपती आणल्या पासून विसर्जन करेपर्यंत जे वातावरण असते ते काही निराळेच असते.

गावाकडे एखादी म्हातारी विचारते, " झीला, बरो आसय मा. नोकरी काम बरा चालला ना. चांगला होयत रे बाबा तुझा. आवशी बापाशी चा नाव काढशीत  , सगळा चांगला होतला." हे ऐकून मनाला उमेद येते.

भजन आणि आरती करण्यासाठी घरोघरी रात्री उत्साहाने फिरतात मुलं.

नवी उर्मी येते आणि मंत्र मुग्ध करून जाते. तुम्ही कोणीही असा, आस्तिक, नास्तिक, विचित्र, चमत्कारिक, प्राकृतिक... तुम्हाला गणेशोत्सव अवडणारच... कारण बालपण तिथे फिरत असते ना.

आज जरा बदलत आहे सगळं.
वातावरण, प्रदूषण, नको असलेल्या चाली रीती या मात्र बदलत नाहीत.
थोडं कालानुरूप बदललो तर अजून मजा येईल...

तर सर्वाना जगण्याचे बळ देणारा गणेशोत्सव सर्वांच्या घरात साजरा होवो, ही सदिच्छा
*---------------------------------------------*

संगीता देशमुख,वसमत

         हिंदूंच्या अनेक सण उत्सवापैकी गणेशोत्सव हा एक महत्वाचा आणि चैतन्यदायी सण असतो.यात  विशेष बाब म्हणजे सेलेब्रिटी  हा उत्सव सर्वधर्मसमभावाने साजरा करतात.  महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणूनही गणेशाचा उल्लेख होतो. श्रध्दा आणि अंधश्रद्धा यापलीकडे जाऊन निर्गुण निर्विकार अशा एका प्रतिकाचे हे पूजन वाटते.  यात गणेशाची निर्मिती,त्यामागची मिथके हे सर्व जर पाहिले तर हे पूजन निरर्थक वाटते. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात एका विशिष्ट हेतूने भारतीयांना एकत्र आणण्याचा जो उद्देश होता तो महत्वाचा आहे. आज भारताला स्वातंत्र्य असले तरी काळानुसार आजही ते स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी भारतीयांना एकत्र येणे आणि संविधानात्मक कार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण आज अशा सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपयोग करू शकतो. परंतु आजची तरुण पिढी ही मात्र दिशाहिन आहे. या उत्सवाला आलेला भडकपणा,सवंगपणा जास्त प्रभावी झालेला आहे. त्यातून शांतता व सुरक्षिता व्यवस्थापन यावर पडणारा ताण,कर्णकर्कश आवाजातून होणारे प्रदूषण व आबालवृध्दांवर होणारे दुष्परिणाम,जनतेकडून होणारी  वर्गणीतून लूट,प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांतून होणारे जलप्रदूषण,हे सर्व पहाता आजचा गणेशोत्सव हा आनंददायी वाटत नसून तो तापदायक वाटायला लागला आहे. आजच्या तरुणांनी थोडे औचित्यपूर्ण व विवेकाने साजरा करायचे ठरवले तर हा उत्सव नक्कीच आनंददायी वाटेल.
*---------------------------------------------*

दत्तात्रय तळवडेकर,सिंधुदुर्ग

 आमच्या कोकणात गणपती उत्सव जोरात साजरा केला जातो.  पण हा उत्सव  आला की मला भीती ही तेवढीच वाटते कारण हा उत्सव खरा सुरू झाला तो लोकांना एकत्र आणायला पण यावेळी मात्र भजनी मंडळातील ग्रुप बाजी जोरदार दिसते आणि वाडीतील हेवेदावे सुद्धा  यातही सात्विक भावना न राहता यात सुरू होत ते राजकारण.
        आपण या उत्सवासाठी खूप पैसे खर्च करतो पण मला वाटत एक गाव एक गणपती ही चांगली संकल्पना आहे ती जर अमलात आली तर या उत्सवा साठी होणार खर्च सुद्धा गावातील गरीब  व होतकरू याना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी केला तर दरवर्षी जरी 1 कुटुंब उभं राहिलं तरी या उत्सवात आणखी आनंदाची भर पडेल . काही  चुकलं असेल किंवा कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करा .
*---------------------------------------------*


पी.प्रशांतकुमार सावेडी,अहमदनगर

.. मला वाटत ..वरच्या विषयाच्या पुढे एक प्रश्न चिन्ह हवं होतं..
...आजही घरगुती गणेशोत्सव म्हणजे प्रचंड आनंद आहे.. आता आमच्याकडचच पहा ना.. देव देव न करणारा मी पण मुलीला हौसेनं शाडू माती आणून देणार.. तिच्या चित्रकलेचा,शिल्पकलेचा श्री गणेशाच तीने गणेश मूर्ती बनवून केलाय.. ह्यावर्षी असा गणपती बनवायचा हे ठरवणार (फक्त ठरवायचा पण शेवटी तो वेगळाच होतो) ... त्याचे रंग त्यासाठी सजावट ती धावपळ.. सगळी मजा
... त्यात आपण देशावरचे त्यामुळे चुकत माकत मोदक करायचे..
सगळी मजा... मजाच मजा
पण हा झाला एक भाग आता त्याचा दुसरा पैलू म्हणजे सार्वजनिक उत्सव..
दुर्दैवाने आपल्याकडे सर्व धर्मियांचे सार्वजनिक उत्सव हे सार्वजनिक उच्छाद झाले आहेत..
DJ डॉल्बी आणि ढोल-ताशांचा दणदणाट..
त्यातही पूर्वी कातडी ढोल होते ते जाऊन कर्कश वाजणारे प्लास्टिक सदृश्य मटेरियल चे ढोल असतात.. त्या गोंगाटाने डोकं उठणाऱ्या आवाजात ज्याला सौंदर्य दिसत तो काय त्याला पिंडात ब्रह्मांड दिसेल..
'मद्य' आणि 'वाद्य' ह्या दोन 'द्य' चा उन्मात नसेल तर सर्वच कार्यक्रम सहज सुन्दर लोकांना त्रास न देणारे होवून वेळेवर संपतात ..... पण सद्य परिस्थितीत असे बोलणे हे निंद्य मानले जाते.
एकेकाळी समाजप्रबोधन आणि मनोरंजनपर कार्यक्रमांची रेलचेल असे गणपतीत पण आता निव्वळ भावी राजकारणासाठी एक मंच बस एव्हडच आहे..
... मला मित्र म्हणाला..असा विचार कसा करतो चांगलं काम करणारी पण सार्वजनिक मंडळ आहेतच ना..
हो असतील ना पण एक तर ते आमच्या जवळ नाही आणि त्यांची संख्या इतकी इतकी तुटपुंजी आहे की उपयोगही नाही..
आमचा एक मित्र पोलीस आहे तो म्हणतो गणेशचतुर्थी जवळ आली की पोटातच गोळा येतो..कधी विसर्जन होतं असं होत .. 10-12 दिवस कुठेही झोपा,काहीही खा अंघोळ प्रतिर्विधी ते विचारूच नका :(
... आजूबाजूला अस चित्र दिसत ना तेव्हा आनंदाचा उत्सव अस म्हणताना जीभ चाचरते..
... एका tv वाहिनीवर ऐकलं भारतीय समाज हा उत्सवप्रिय समाज आहे.. मला वाटत आपण अतिरेक प्रिय समाज आहेत आपल्याला कुठल्याही गोष्टींचा अतिरेक करायला प्रचंड आवडत आणि मग अराजकतेकडे वाटचाल होते... जस की 15 ऑगस्ट ला तरुणांचे जथ्थे ट्रिपल सीट बसून त्यातले काही अतिउत्साही चालू गाडीवर उभे राहत कर्कश हॉर्न वाजवत सिग्नल वगैरे मोडत वेगाने जाताना दिसतात .. सिग्नलवर गाडी थांबलेली आणि पोरगी विचारते 'पप्पा ते कोण', म्हणावंसं वाटत ते दिखाऊ आणि आपण खरे देशप्रेमी. पण अस न म्हणता तिला म्हणतो अरे लहान आहेत त्यांना समजत नाही अजून
.
तेव्हा हे बुद्धीच्या देवा गणराया आम्हा सर्वांना समज दे.. चांगलं नागरिक होण्याची बुद्धी दे ...
*----------------------------------------------*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************