विसरलेला काळ.



 निखील खोडे, पनवेल.

"मामाच पत्र हरवलं तेच आम्हाला सापडलं"... येरे येरे पावसा, तुला देतो पैसा... असावा सुंदर चॉकलेट चा बंगला...  आता ही गाणे फार कमी किंवा ऐकायलाच मिळत नाही. जग हे आता इतकं वेगवान झालंय की मागचा काळ आठवायला आता कोणाला वेळ पण उरला नाही आहे. प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्यात इतके व्यस्त झाला आहे की जुन्या आठवणीत काय उरलय आता असा विचार करायला लागलेत.

 आजचा बदलता काळ व प्रचंड मोठ्या प्रमाणावर होत चाललेले शहरीकरण यामुळे गावाकडील तरुण पिढी रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घेत आहे. परिणामी गावे संपुर्ण ओसाड पडत आहेत.

 गावाकडील पारावरच्या गप्पा आता क्वचित बघायला मिळतात. शरीरासाठी उपयुक्त असणारी ताजी हवा आता औद्योगिकरणामुळे दूषित झाली आहे.

बैलपोळ्याला बैलाला धुवून पुसून सजवणे, पोळ्या मध्ये जाऊन जत्रेचा सगळा आनंद लुटणे, त्यानंतर सगळ्यांसोबत मिळून पुरणपोळ्या खाणे एकदम अविस्मरणीय!!

दिवाळीला पहाटे उठून उटणे लावुन कड्याक्याच्या थंडीत आंघोळ करणे, नवीन कपडे घालुन मिरवणे सर्व काही न विसरण्याजोगे!!

बदलत्या जगाबरोबर स्वतः बदलायला पाहिजे हे खरे पण संस्कृती जपणे गरजेचे आहे. सरतेशेवटी "गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी"....
___________________________________________

सौदागर काळे,पंढरपूर.

भूतकाळ,वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे ठीक होतं.पण हा विसरलेला काळ  कुठून आला.हा भूतकाळाचाच प्रकार म्हणावा का!पण भूतकाळ तर आपल्याला आठवत राहतो.होय पण म्हणता येईल ,नाही पण म्हणता येईल...नुसता वेड्यात काढण्यासारखा विषय .विसरभोळा गोकुळशी याचा काही संबंध जोडता येईल का?नाही जोडता येणार.कारण आपण वस्तू विसरत असतो थोडाच काळ विसरतो.खूप दिवसांनी ,महिन्यांनी,वर्षांनी मित्र-मैत्रिणींचा,पाहुण्या-रावळयाचा फोन उचलताच पलीकडून आवाज येतो, 'विसरला की काय रे मला...' असे संभाषण येईल का!विसरलेला काळ मध्ये.नाही येणार हे पण.कारण कुणालातरी  आठवण झाली आपली.म्हणजे भूतकाळ आणि वर्तमानकाळ हातात हात घालून भविष्याच्या गोष्टी करत आहेत.संवाद करत आहेत.इथे विसरलेल्या काळाचा स्पर्शही नाही.विसरलेल्या काळामध्ये नेमकं काय असेल....आपल्याला रोज मधुर-भयंकर स्वप्ने पडतात.पण सकाळी उठताच स्पष्ट आठवत नाहीत.म्हणजे आपण हा काळ विसरलेला असतो.असंच काहीतरी विसरलेल्या काळामध्ये येत असेल ना!आपल्याला काहीही आठवण्यासाठी वस्तू,प्रसंग,व्यक्तीचा आधार घ्यावा लागतो.हा आधार नसेल तेव्हा तो आपल्यासाठी कायम विसरलेला काळ असतो.असंही म्हणता येईल.अजूनही विसरलेला काळ म्हणजे काय!याचे स्पष्ट रूप सांगता नाही आले.तुम्हांला माहीत असेल तर सांगा.
___________________________________________

प्रविण दळवी, नाशिक.

विसरलेला काळ म्हणजे बालपणीचा काळ किंवा सुखाचा काळ असे म्हणतात … पण आपण लहान असताना ते पटत नाही आणि नंतर कळून फायदाच नसतो…
पण तरी खूप काही मिळतं आपल्याला आपण लहान असताना …

अर्थात मला माझ्या लहान पणी सगळ्यात जास्त मिळालेली कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे मार आणि बोलणी … पण त्यात माझा काही दोष नव्हता …
लहानपणी काय करायचं नाही हे जवळ जवळ प्रत्येक जण सांगायचा … पण आम्ही उद्योग करून रिकामे झाल्यावर …(आधी सांगितलं तर बहुधा आपल्याला भोगायची शिक्षा सावध करणाऱ्याला भोगायला लागत असावी … )

असो… तर त्या रम्य बालपणीचा काल (शिक्षांसाहित) आठवून आज खूप काही बोलावस वाटलं …. म्हणून शेवटी हा लेख लिहायला घेतला …

माझ्या लहानपणी आम्ही चाळीत रहात होतो… एकच खोलि… हल्लीच्या FLAT मधलं स्वयंपाक घर असत ना, तेवढीच …
उभ राहील आणि हात वर केला कि हात (खोलीच्या) आभाळाला टेकायचे (माझे नाही, मोठ्यांचे)…
पण ते घर अजून स्वप्नात येतं … तिथेच पहिले सवंगडी जमले…एक तीन चाकी सायकल आणि एक जुना डालडयाचा डब्बा आणि एखादी झिपरी बाहुली एवढ्या साहित्यावर सगळ्या चाळीतली तमाम प्रजा खुशीत खेळत असे… भांडण आणि मैत्री शब्द सुद्धा माहित नव्हते तेव्हा … भूक लागली कि घरी येउन खायचं, पाणी प्यायचं आणि परत खेळायला पळायचं …. तेव्हाचे किती तरी सवंगडी आता आठवत पण नहित … काहीतरी हरवल्याची जाणीव मात्र होत असते…

नंतर मग आम्ही एका २ रूम च्या स्वताच्या ROW HOUSE मध्ये गेलो… इथे तर खूप सारे समवयस्क मिळाले होते …आई-वडिलांची मुलांच्या कटकटीतून सुटका करण्यासाठी गच्ची होतिच… दिवस दिवस भर उन्हातान्हात गच्चीवर, मैदानात खेळताना कधी सावळा होण्याची भीती नव्हती आणि कधी गोरा होण्याची इच्छा पण नव्हति… दिवसभर गच्चीत खेळायचं , वाटेल तेव्हा घरी येउन पाणी प्यायचं … संध्याकाळी शेजारच्या मैदानात मोठ्या दादा लोकांमध्ये क्रिकेट खेळायच… batting चा चान्स मिळावा म्हणून २-२ तास कीपिंग करायची … घरी आल कि राजेशाही थाटात हादडायला बसण … ते पोह्याचे बकाणे भरणं … ऐटीत चालू होत सगळं….

मग अचानक एक दिवस शाळा नावाच्या एका गोष्टीशी ओळख झाली … सगळीच लहान लहान मुल… आणि एकसारखेच कपडे घातलेली…. मी पहिल्याच दिवशी रडून इतका गोंधळ घातला कि बाईंना आईला तिथेच बसवून ठेवावं लागला (यालाच बाळाचे पाय पाळण्यात दिसणे म्हणतात का ??) … नंतर मात्र शाळेची मज्जा वाटायची … रंगांची नावे, मातीचे आकार, भाज्यांची नावे, अंक, बाराखडी आणि पाढे (मला अजूनही १३ च्या पुढचे पाढे येत नहित… ) हे सगळ खूप खूप आठवतंय आता …

त्याच शाळेतली एक गम्मत आठवते … अ आ इ ई शिकताना "फ" पाशी आमची गाडी अडली… कारण घरी काही आगाऊ पणा केला कि आई ओरडायची … "फ - फ फटक्यातला देऊ का …??"काकांचं सुद्धा तेच वाक्य ….
आणि बाई शाळेत शिकवताना "फ रे फणसाचा " शिकवायच्या … मी मात्र जोरात "फटका च " म्हणायचो … बाईंनी ओरडून, मार देऊन सुद्धा मी मात्र "फ" रे फटक्याचा म्हणायच सोडलं नाही आणि उलट शेजारच्या मुलांना आपलंच म्हणणं पटवून द्यायला लागलो ….
शेवटी माझ्या बरोबरची सगळी मुलं "फ - फ फटक्यातला" म्हणायला शिकली आणि माझ्या पालकांना शालेय जीवनातील पहिले पान-सुपारीचे आमंत्रण गेले…(एकुणात जर आमंत्रणांचा हिशेब काढला तर माझ्या इतकीच हजेरी माझ्या आई-बाबांनी लावली असावी माझ्या शाळेमध्ये … )

तेव्हा आईच घरी अभ्यास घ्यायची … शिकवणी हा प्रकार मला तरी ६ वी पर्यंत माहितच नव्हता …
आणि अभ्यास सुद्धा १ तासात संपत असे… संध्याकाळी मात्र सभ्य मुलासारखं शुभंकरोती, पर्वचा आणि पाढे (१७, २३, २७ आणि २९ चा अडखळतच) म्हणावे लागायचे …

तसे माझे बाबा काही मारकुटे किंवा तापट नहियेत… पण तरी त्यांची घरी यायची वेळ झाली कि पावले आपोआप घराकडे वळायची ….

मला आठवतंय तस माझ्या बाबांनी (मी अजूनही बाबाच म्हणतो - आणि कधी कधी आदरानी "पिताश्री" किंवा "कुटुंब प्रमुख" ) मला एकदाच मारलं आहे…
(आईचा रतीब मात्र न चुकता चालूच होता )…
झाल असं होतं कि, मला सायकल शिकवायची ठरलं … आमच्या धाकट्या बहिणाबाईंनी धडपडत स्वतःच सायकल शिकून घेतली, आणि आमचा उत्साह मात्र कुठेच दिसेना…
मग मात्र पिताश्रींची "सायकल प्रशिक्षण" मोहिमेवर नेमणूक झाली आणि रोज संध्याकाळी आम्ही हर्क्युलीस चे २४ इंची धूड अंगावर घेऊन धडपडू लागलो… सिटला पकडून पळताना बाबांचं पोट हलकं झालं आणि सोफ़्रामायसिन च्या ट्युब आणून खिसा हलका व्हायला लागला …पुढे पुढे लडखडत आमची सायकल चालायला लागली ...
एक दिवस मात्र मी त्यांच्या पायाच्या अंगठ्यावरच सायकल आणून उभी केली, आणि तिरमिरीत त्यांनी दिली एक थोतरीत ठेउन (कुठे तो एकलव्य ज्याने आपला अंगठा कापून दिला आणि कुठे आम्ही; सायकल शिकवणाऱ्याच्याच अंगठ्याचा अचूक वेध घेतला)… पुढचे २ दिवस गालगुंड झालाय असं खोटंच सांगत शाळेत जाव लागलं…
एकदाची सायकल जमायला लागली आणि आम्ही घरातून थाटात माटात सायकल वर शाळेत जाऊ लागलो …

सायकल वरचाच एक किस्सा आठवला … लहानपणी पाप आणि पुण्याचे हिशोब खूप जपले जातात … गाई च्या पोटात ३३ कोटी देव असतात असे मला सांगितलेले होते … त्यामुळे जिथे गाय दिसेल तेथे तिच्या पोटाला हात लावून नमस्कार करणे हा एक नित्याचाच भाग झाला होता … एकदा अस्मादिक शाळेला निघालेले असताना रस्त्यातल्या एका कचराकुंडीपाशी एक गो-माता क्षुधा शांती करत असताना दिसली … सायकल चालवायचा आता बऱ्यापैकी (खरं तर अति ) आत्मविश्वास आलेला असल्याने खाली न उतरता गाई च्या जवळून सायकल नेउन तिच्या पोटाला हात लावून (जाता जाता) पुण्य कमावण्याच्या प्रयत्नात मी होतो … मी जवळ आल्या बरोबर तिने आपल्या शेपटीचा गोंडा (ज्याला शेण लागून ते वाळलेले होते) माझ्या गालावरून अंमळ प्रेमाने फिरविला …. इतका अकस्मात कृपा प्रसाद मिळाल्याने पुढच्या सेकंदाला मी गो-मातेचे आशीर्वाद घेत तिच्या पायाशी (तिच्याच शेणाच्या पो मध्ये) लोळण घेतली आणि माझी सायकल कचराकुंडी मध्ये अंतर्धान पावली …. पुढचे किती तरी दिवस लग्न, मुंज, वाढदिवस, घरी आलेले पाहुणे ई. प्रसंगी चार टाळकी एकत्र जमली कि माझा हा किस्सा नक्कीच सांगितला जाई ….

असो …

आमच्या शाळेबद्दल थोडंसं …
माझ शिक्षण मराठी मधून ७ व्या इयत्ते पर्यंत (न गचकता ) आणि नंतर semi इंग्लीश मध्ये(तिथेहि न गचकता) …. माझी शाळा चिंचवड मधली तशी खूप प्रसिद्ध शाळा … पण त्याला मैदान नव्हत … त्याची कसर आम्ही शाळे समोरच्या बागेत खेळून भरून काढायचो … सगळ्यात जास्त मजा यायची ती क्रिकेट मैच असेल तेव्हा … आमच्या शाळेच्या शेजारी एक चाळ होती … त्याच्या एका घराची खिडकी बरोब्बर आमच्या वर्गाच्या खिडकी समोर यायची … आणि तिथल्या काकू मैच असेल तेव्हा खिडकीत पाटीवर स्कोअर लिहून ठेवायच्या …. त्या काकुंच नाव सुद्धा माहित नव्हत … पण मुलांचा दंगा ऐकू आला कि त्या स्कोअरबोर्ड अपडेट करून ठेवायच्या … तो स्कोअरबोर्ड आजही माझ्या डोळ्यांसमोर तसाच आहे….

शाळेच्या सहलीला जायचं म्हणजे तर जत्रे इतकीच धमाल मज्जा … पहिली सहल मला आठवतीये ती म्हणजे सारसबाग आणि पेशवे पार्क … पण खरी धमाल यायची गड किल्ल्यांच्या सहलीला …पहाटे ५ ला शाळेपाशी जमायचं… स्वेटर घातलेले सगळे मित्र-मैत्रिणी … बस मध्ये खिडकीची जागा पकडण्यासाठीची भांडणं … प्रत्येक स्टॉप नंतर होणारी हजेरी …. सिंहगडावर आमच्याच सरांनी दही वाल्याच्या सुरात सूर मिसळून मारलेली "दहीsssय्य" अशी आरोळी …. आईने दिलेले २० रुपये, त्यात घरी काहीतरी आठवण म्हणून घेऊन जाणं … आणि शाळेकडून काढल्या जाणारया ग्रुप फोटो मध्ये आपण दिसू का याची उत्सुकता …. खरच किती मिस करतोय हे सगळ …

शाळेत असताना सुट्टी म्हणजे तर पर्वणीच वाटायची … उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामा, काकांकडे जाणं … तिथे शेतात भटकायचं … बैलगाडी मधून लिफ्ट घ्यायची … कारखान्याला जाणार्या गाडीतली उसाची कांडकी काढून सोलून खायची … झाडावरच्या कैऱ्या पाडून खायच्या … दर वर्षी १ महिन्या पुरते भेटणारे नवे सोबती … आणि परत येतानाचा तो ६-७ तासांचा कंटाळवाणा प्रवास …
दिवाळीच्या सुट्टी मध्ये छान पैकी उटन लावून अंघोळ… नवीन कपडे, फराळ आणि फटाके … सकाळी पहिला बॉम्ब कोण फोडणार आणि कोणी किती पिशव्या भरून फटाके आणले याचीच स्पर्धा…. भाऊबिजेला बहिणीला ओवाळणी देताना बाबांनी दिलेले १० रु सुद्धा तिला किती मोलाचे वाटायचे …

असो … तर आज सगळ आठवून खूप छान वाटलं … काहीतरी पुन्हा नवीन सापडलंय आणि बरच काही कायमचं हरवलंय ….
पण एक मात्र खर … बालपणीचा काळ सुखाचा हेच खर … सुख म्हणजे अजून काय असत ?

धन्यवाद.
_________________________________________

शिरीष उमरे, मुंबई

जर भुतकाळात डोकावुन बघितले तर लक्षात येइल की बालपणाच्या, शाळेतल्या, मित्रांच्या, नातेवाईकांच्या, कॉलेज जीवनातल्या, तरुणपणातल्या त्याच गोष्टी आठवतील ज्या भावनांशी जुळलेल्या असतील.

मग तो आनंद असो, दु:ख  असो, आश्चर्य असो, निराशा असो, सत्कार असो, अपमान असो, राग असो, करुणा असो कींवा भय असो !!

अश्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या काही केल्या आठवत नाहीत. जागृत मन ह्या आठवणींना निद्रीस्त मनात ढकलुन देते... एक प्रकारे जुन्या आठवणींचा कचऱ्याचा डबा... पण निद्रीस्त मन हे कधीच झोपलेले नसते. त्याचा उद्रेक तेंव्हाच होतो जेंव्हा भावना साठवण्याचा अतिरेक होतो. ह्यातुन नैराश्य, चिंता, चिडचिड हावी व्हायला लागतात.

ह्यावर उपाय का ? आपला कचऱ्याचा डबा नेहमी साफ करणे व त्याचे रुपांतर खजिन्यात करणे !! आता हे कसे करावे ?

विपासना द्वारे हे सहज शक्य आहे. ह्या तंत्राचा वापर करुन आपण हानीकारक अश्या सगळ्या आठवणींना नष्ट करु शकतो व चांगल्या आठवणींना उजाळा देऊ शकतो. एका प्रकारे आपण आपल्या निद्रीस्त मनावर काबु ठेवु शकतो. ह्यामुळे आपण  शांत, प्रसन्न व जागृत राहु शकतो.

विसरलेला काळ हा कधीच  विसरलेला काळ नसतो. एकादी चिंगारी भेटली तर ती आठवण लगेच आग पकडु शकते.. जसे एखाद्या गाण्याची ओळ, एखादा विशीष्ट सुगंध, एखादा स्पर्श, एखादे चित्र, एखादे वाक्य !! लगेच अथांग आठवणीच्या समुद्रात भावनांची त्सुनामी आलीच म्हणुन समजा !

पटतय का ?
_________________________________________

यशवंती होनमाने, मोहोळ.

    हा विषय वाचला आणि मन कुठेतरी भूतकाळात गेल विचार करायला की नेमका कोणता काळ आपण विसरलो ......तर आपण विसरलो प्रेमाचा , माणुसकीचा, मायेचा , आधाराचा , मैफीलीचा , हितगुज करण्याचा , इत्यादी बराच काळ आपण विसरलोय ....
नेहमी मी जुनी गाणी ऐकते दोस्त कम्पनी म्हणते madam तो काळ गेला आत्ता , कोणाकडे जायच तर मम्मी म्हणते फोन करून जा घरात आहेत की नाही काय माहीत , कधी कधी मी खुप emotional होते तर मला म्हणतात जरा प्रेक्टिकल जगायला शीक भावनिक विचार करायचा काळ गेला .......
खरंच आपण हा सगळा काळ विसरलो का? ? ? ? कोणी आठवणीने फोन केला तर लगेच विचारतात काही काम होत का ? ? ? बापरे म्हणजे सहज फोनवर बोलण पण नको नकोस झालय .
पूर्वी कधी डिप्रेशन आल नाही कारण सगळा काळ आपला होता , कोणतही काळ  विसरलेला न्हवता...आत्ताही तसच वागू .मस्त दोस्तीच्या मैफिली जमवू , कोणतेही कारण काढून नातेवाईक गोळा करू , धमाल करू , मस्ती मज्जाच करू ....आणि ....कोणतही काळ नको विसरायला .....
चला मस्त पाऊस पडतोय आणि मी आल्याचा चहा केलाय चहा घेऊन  खिडकी जवळ उभी आहे आणि fm वर गाणं लागलंय .....रीम झीम गिरे सावन ...
___________________________________________
टिप-(सर्व इमेजेस गुगल इंटरनेट वरून घेतलेली आहेत)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************