विद्यापीठे आणि रोजगाराभिमुख उच्चशिक्षण.

विद्यापीठे आणि रोजगाराभिमुख उच्चशिक्षण.
शिरीष उमरे,नवी मुंबई.
दहावीनंतर विज्ञान व गणित विषयात जास्त मार्क मिळाले म्हणुन डॉक्टर इंजिनियर च्या आशेने इतरांप्रमाणे माझ्या पालकांनी मला विज्ञान शाखेत धाडले. त्यातल्या त्यात इतर मित्रांच्या अंधानुकरणात मी ही सामिल झालो आणि इलेक्ट्रॉनिक्स हा विषय निवडला.ह्या चुका नंतर भविष्यात चांगल्याच जाणवतात. कदाचित पॉलिटेकनिक, आर्ट, कॉमर्स ह्या वाटांकडे दुर्लक्ष व्हावे अशीच शिक्षणव्यवस्था बनवल्या गेली होती. अकरावी बारावी ची वर्षे अभ्यासाच्या भाराखाली कशी सरलीत ते कळालेच नाही. जे काय शिकवल्या गेले ते आजगायत आयुष्यात कधीच कामी पडले नाही. मार्ग चुकला की सीस्टीम च तशी बनवल्या गेली होती आणि त्या चक्रव्युव्हात मी कसा अटकलो हे अजुन न उलगडलेले कोडे आहे.

पंच्यांशी टक्के गुणवत्ता तेंव्हा सुध्दा कमीच होती. इतके कमी गुण मिळाल्याने शासकीय महाविद्यालयाचा प्रवेश बंद व प्रायव्हेट इंजिनियरींग कॉलेज परवडणार नाही अशी पालकांची भुमिका ! ह्या नैराश्य व मानसिक खच्चीकरणातुन मला व पालकांना बाहेर निघण्यासाठी योग्य मार्गदर्शकांची कमतरता तेंव्हाही होती.

नाइलाजास्तव घरची आर्थिक परिस्थितीला साजेशी व लोकमान्य असणारी इलेक्ट्रॉनिक्स ची पदवी परिक्षासाठी आयुष्याची पुढची तीन वर्षे फुकट वाया घालवली. यशस्वी (?) फर्स्ट क्लासची पदवी धारण करुन गोंधळलेल्या बेरोजगारांच्या घोळक्यात सामिल झालो. स्वत:च्या पायावर उभे राहण्याची वेळ...

पण ही तीन वर्षे सॉफ्ट स्कील विकासासाठी खुपच उपयोगी पडली. एनसीसी, सोशल गॅदरिंग, वेगवेगळ्या स्पर्धा, खेळ, वाचन, पर्यटन, नविन भाषा शिकणे हे भरपुर एन्जॉय केले.

ह्यातुन च पुढचा मार्ग गवसत गेला. घरच्यांनी मला एमबीए करायला परवानगी न दिल्याने (विद्यापीठात निवड होऊनही!) त्यांच्या मनानुसार सर्वमान्य मार्ग निवडला. आई च्या इच्छेनुसार आयएस परिक्षा तयारी आणि वडीलांच्या आज्ञेनुसार कॉम्प्युटर डीप्लोमा करायला मुंबई गाठली. सोबतच धुर्तपणाने अन्नामलाई मुक्त विद्यापीठात मानसशास्त्र पदव्युतर साठी प्रवेश पक्का केला.
आयुष्यात दहावी नंतर खरे काही शिकलो असेल तर ह्या दोन वर्षात !! जे मुंबई ने मला शिकवले  ती शिदोरी पुढील पंचवीस वर्षे पुरली. माझ्यातील मार्केटींग व मॅनेजमेंट गुणांची पारख केली ह्या शहराने. मला माझीच नव्याने ओळख करुन दीली मुंबईने !!

आज मागे वळुन बघतांना जाणवते की दहावीनंतरचा अभ्यासक्रम हा कालबाह्य होऊन चार दशके होवुन गेलीत. खाजगीकरणाच्या धोरणातुन भ्रष्टाचाराची कुरणे उभी राहीली. विद्यापीठाच्या मढ्यावरच्या टाळुवरचे लोणी खाण्यात राजकारणी व नोकरशाही मग्न राहीली व पुढच्या दोन तीन पीढ्या बरबाद करुन टाकल्या. त्याच्या दुष्परिणामांचे चटके आता जाणवुन राहीले आहेत. एवढा प्रचंड करवसुलीचा पैसा असतांना शिक्षणावर सरकार खर्च का करत नाही ? हा एक समजुन उमजुन केलेला कटकारस्थानाचा भाग तर नाही अशी भिती वाटते. अशिक्षीत जनतेवर राज्य करणे सोपे जाते ना !!

ह्याला प्रत्युत्तर इंटरनेट व मोबाइल क्रांतीतुन मिळु शकते. केरळमधील एक पदवीधारक हमाल रेल्वे स्टेशन च्या फ्री इंटरनेट वापरातुन आयएएस होतो. मोबाइल अॅपच्या व सोशल मिडीया च्या मदतीने एका दुर्गम आदिवासी पाड्यातुन बारावी फेल एकवीस वर्षाचा तरुण कडकनाथ कोंबडीच्या व्यवसायात करोडो रुपयांची उलाढाल करतो व हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करुन देतो.

स्वयंप्रेरणा हे दुसरे माध्यम !
आयआयटी मधुन इंजिनियर झालेला तरुण फॉरेनला गलेलठ्ठ पगाराची नोकरी न करता ग्रामीण भागात ऑरगॅनिक शेती करुन स्वत:चे व हजारो शेतकऱ्यांचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या यशस्वी करतो. आयएमएम झालेला विद्यार्थी मल्टीनॅशनल कंपनी जॉइन न करता आईच्या इडली वडा च्या छोट्या व्यवसायाला जागतिक पातळीवर नेतो. ह्यातुन हे तर सिध्द होते की आजची शिक्षण यंत्रणा पुर्ण कुजली असली तरीही ह्या नविन फुटलेल्या पालवीतुन नविन वटवृक्ष उभे राहतील व ही परिस्थिती बदलवतील अशी आशा अजुनही कायम आहे....


अक्षय डेरे,यवतमाळ.
माझा हा पहीला लेख आहे. काही चूका झाल्यास समजुन घ्या. माझे सातवीपर्यंत चे शिक्षण माझ्या गावातील जिल्हा परिषद शाळेत व त्यानंतरचे दहावीपर्यंतचे शिक्षण सेमी-इंग्रजी माध्यमातुन तालूक्याच्या ठीकाणी झाले व त्यानंतर बारावीसाठी महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला.

बारावीनंतर काय करायचे याचा सर्व विचार करून पदवी शिक्षणासाठी वाणिज्य शाखेत प्रवेश तर घेतला पण घरची आर्थीक परीस्थीती ठीक नसल्यामुळे नोकरीसाठी मला मुंबई गाठावी लागली. कसेबसे तारेवरची कसरत करीत मी यावर्षी वाणिज्य पदवीधर झालो.

पण आता पुढे काय करायचे याची काळजी लागलेली आहे. मला व्यवसाय व्यवस्थापनामधे आवड असल्याने पुढे शिकायचे आहे पण घरची परीस्थती बेताची असल्यामुळे मी लाखो रुपयाची फी जमा करू शकणार नाही.

स्पर्धा परीक्षेची तयारी करावी तर सहा लाख मुले फक्त पुणे मधे एमपीएससी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत आहेत. संपुर्ण महाराष्ट्रात पन्नास लाखाच्या जवळजवळ तरुण स्पर्धा परिक्षेची तयारी करीत असतील. स्पर्धा खुप वाढलेली आहे. सरकारी नोकऱ्या कमी होत आहेत.

गावाकडील शिक्षण आहे म्हणुन आम्हा गावठी मुलांना प्रायवेट कंपनीमधे आॅफीस बॉय किंवा साफसफाई साठी ठेवल्या जाते. गेली २-३ वर्ष मुंबई मधे होतो. इथे आल्यावर अनेक लोंकाशी गाठीभेटी झाल्यात. चुकांतून शिकत राहीलो. हाँटेल इंडस्ट्री चा जॉब असल्यामुळे रोज नविन लोंकाशी संवाद होतो व त्या संवादातून थोड फार शिकायला मिळते. नविन जेवणाच्या रेसिपी माहीत होतात आणि खास म्हणजे मुंबईत वेगवेगळ्या प्रांतातून काम करण्यासाठी आलेल्या लोकांशी संवाद व त्यांच्याकडील संस्कृती व वेगवेगळे रीतीरीवाज माहीत झाले.

मुंबईत आल्यावर कसे जगावे व संघर्ष काय असतो हे माहीत झाले. महाविद्यालयातच  शिक्षण दील्या जाते असे नाही. महाविद्यालयाच्या बाहेर सूद्धा खुप काही शिकायला मिळते. मी आज तीच दुनियादारी शिकत आहो. मला मुंबई ने खुप काही शिकवल. मला आणखी भरपुर काही शिकायच आहे आणि ठरवलेल ध्येय्य पुर्ण करायच आहे....


अनिल गोडबोले,सोलापूर.
उच्च शिक्षण आणि रोजगार या दोन्ही गोष्टी लक्षात घेताना आपल्याला शिक्षण व्यवस्थे कडे पण लक्ष दिलं पाहिजे.१० वि ,१२ वी झाली की सायन्स, आर्टस् आणि कॉमर्स नावाच्या विद्या शाखा... त्यातून विद्यापीठ ठरवेल किंवा महाविद्यालय ठरवेल ते विषय घ्यायचे..... डिग्री घ्यायची... लगेच नोकरी...

इंजिनिअरिंग, मेडिकल, कायदेविषयक पदवी, शिक्षक, कृषी... असे सर्व मान्य विषय त्यातून डिग्री त्यातून मास्टर डिग्री घेताना बिझनेस अडमिनिस्ट्रेशन .... खाजगी कंपनी किंवा सरकारी नोकरी...असा सरधोपट मार्ग आहे आपल्या कडे.. हे बदलायला पाहिजे..

महाविद्यालयात शिकुन किती जणांना कौशल्य मिळतात?... शिक्षक मुलांना कौशल्य शिकवतात का?.. परीक्षा पद्धत ही एकच पद्धत आहे का... ज्या मध्ये ज्ञान तपासता येईल?...माझ्या मते उच्च शिक्षण संपूर्ण पणे बदलले पाहिजे...

विषयाची निवड विद्यार्थाने करायला पाहिजे... म्हणजे फिजिक्स सोबत मी इतिहास पण शिकला पाहिजे... म्हणजे इतिहासातील संशोधन आणि विज्ञानातील तंत्र एकत्र येतील..

परीक्षा ही ज्ञान तपासणारी असली पाहिजे...लेखी पद्धतीवर असलेला भर कमी करून... संशोधन व अहवाल लेखन, किंवा इतर काही मार्ग अनुसरून मूल्य मापन करता यायला पाहिजे.  पुस्तक... नोट्स.. आणि क्लास मधून बाहेर येऊन प्रत्यक्ष अनुभव घेणं गरजेचं आहे..(आता प्रोजेक्ट पद्धत आहे त्या मध्ये चोरून प्रिंट काढून लावतात..)

सेमिनार, सिमपॉझियम, आणि संशोधन प्रसिध्द करुनच डिग्री मिळाली पाहिजे...ज्ञान अद्ययावत असले पाहिजे... पास झाल्यावर पुन्हा कंपनीला प्रशिक्षण देण्यात वेळ आणि पैसे वाया घालवायांची वेळ येऊ नये..

शिक्षक हा मार्गदर्शक झाला पाहिजे... तेच तेच घासून गुळगुळीत शिकवू नये...
उच्च शिक्षणासाठी पैसे आणि त्या ताकदीची विद्यापीठ, महाविद्यालय आणि प्राध्यापक पुढे यायला पाहिजेत...

शिक्षण आनंदी झालं पाहिजे... सर्वाना मिळण्या जोग झालं पाहिजे


प्रविण दळवी,नाशिक.
उच्च शिक्षणाने शहाणपण येते हे सत्य लक्षात घेऊन अनेक समाजसुधारकांनी विद्यापीठांची स्थापना केली. मानवी जीवनातील अन्न, वस्त्र, निवारा इतर मूलभूत गरजांप्रमाणेच विद्यापीठे व उच्च शिक्षणालाही अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहेत पण आज या शिक्षणाची पुर्ण वाट लागली आहे त्यामुळे शैक्षणिक तत्वांचा आणि धोरणांचा पुर्नविचार करुन पुन्हा एकदा नव्याने उच्च शिक्षणाचा आभ्यासक्रम बदलवण्याची वेळ आली आहे. आज विद्यापीठांचे जणू विद्यापीठच विद्यापीठ उगवले आहे. विद्यापीठांच्या अशा कबाडखान्यांमधुन बाहेर पडलेल्या पदवीधर बेरोजगारांना काम देण्यात सरकार जसे अपयशी ठरले आहे तसेच तांत्रिक व वैद्यकीय शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या इंजिनिअर व डॉक्टरांचीही दयनिय अवस्था झाली आहे. काही विचारवंत  म्हणतात की, शिक्षणक्षेत्रातील तज्ञ असणार्‍या व्यक्तींनी महाराष्ट्राचे शैक्षणिक धोरण ठरवले आहे. हे धोरण रोजगाराभिमुख आहे. जर असे असेल तर मग आपल्या शैक्षणिक धोरणांची अशी दुर्दशा का झाली ? आजची शिक्षणप्रणाली तरुणाईला योग्य वळण देण्याऐवजी उच्च शिक्षणाच्या माध्यमातून तरुणांचे फार मोठे आर्थिक शोषण करीत आहे. उच्च शिक्षणसाठी विविध जातींना आरक्षण असले तरी शिक्षणक्षेत्र खाजगी माणसांच्या हाती गेल्याने शिक्षणाचा खर्च व इतर देणग्या सामान्य माणसांच्या आवाक्या बाहेर गेल्या आहेत. लाखो तरुण शिक्षण सोडून घरी बसले आहेत किंवा कुठे तरी खाजगी ठिकाणी नोकर्‍या करीत आहेत.

हजारोच्या सख्येने रोजगार निर्माण होईल, असे दिवास्वप्न दाखवून विद्यापीठे गेल्या सात वर्षात इजिनीअरिंग, मॅनेजमेंट आणि फार्मसीसारख्या व्यावसायीक कोर्सेसच्या कॉलेजेसला मोठ्या संख्येने परवानगी दिली. परिणामी त्या कोर्सेसमधील किमान ३० ते ४० टक्के जागा रिक्त राहत असल्याचे दिसून येतेय. तर कॅम्पस मुलाखतीमार्फत अत्यल्प संख्येने विद्यार्थ्यांना नोकरी मिळतेय.त्यास्थितीत विद्यापीठे आणि उच्च शिक्षणाचा झालेला अफाट विस्तारातून बेरोजगार विद्यार्थ्यांची फौज तयार करणारा ठरतो आहे. हीच स्थिती राज्यातील इतरही प्रदेशात दिसून येते.तेव्हा हे बिघडलेले तंत्र कुणी दुरूस्त करेल काय, विद्यापीठे आणि उच्च शिक्षणाला ताळ्यावर कुणी आणेल काय ? असा सवाल आता उपस्थित होतो आहे.

प्रवीण,मुंबई.
गेले महिनाभर मी माझ्या संस्थेच्या राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यातील कामासाठी वाणिज्य शाखेच्या आणि कृषी पदवीधर असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेत होतो.  त्यामुलाखती घेताना 'शिक्षणाच्या आयचा घो' असाच म्हणावं वस वाटलं. इंदौर मधील एका प्रतिष्टीत महाविद्यालयाच्या 180 उमेदवारांमधून फक्त 4 उमेदवार परीक्षा पास होतात.  जितके वाणिज्य शाखेचे उमेदवार होते एका ही उमेदवाराला ताळेबंद जोडता आला नाही.
याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की शिक्षणाची पातळी ही प्रचंड घसरली आहे कारण रोजगारासाठी गरजेच्या गोष्टी विद्यापीठे नाहीं देत आहेत. बाजाराची मागणी आणि शिक्षणाचा पुरवठा यात प्रचंड तफावत आहे.

(यातील संबंधित छायाचित्रे इंटरनेटवरून घेतलेली आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************