दहावीपर्यंतचे शिक्षण व जडणघडण

दहावीपर्यंतचे शिक्षण व जडणघडण

शिरीष उमरे,मुंबई.
साधारणपणे चौथी पाचवी नंतरचा काळ हा... जवळपास सहा वर्षे !! मी ग्रामीण भागातुन शहरी भागात स्थलांतरीत झालो होतो. कडक शिस्तीच्या व अर्ध इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नाव टाकल्या गेले होते. सुरुवातीला मी थोडा बुजलो होतो. माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षक मला इथेच लाभले. माझ्या वेळी शिक्षक हे जीवन  घडवणारे कुंभार होते. जगाची नव्याने ओळख करुन देणारे जादुगर होते. ज्ञानाचा सागर होते. कठोर परिश्रम करुन घेणारे निष्ठुर मास्तर होते. त्यांच्या मधात पडायची आईबाबांना पण परवानगी नव्हती. तावाखुन सुलाखुन पारखणाऱ्या जौहरीचे महत्व हे आता कळते जेंव्हा जीवनाचे चढउतार अनुभवावे लागतात. जर तेंव्हा आमचे मडके व्यवस्थीत भाजल्या गेले नसते तर आजच्या युगात टीकलो नसतो.
जिव्हाळ्याने, हृदयाच्या तळमळीने, निस्वार्थीपणाने आणि बेदम मार देणारे शिक्षक आज तीस वर्षानंतरही विसरु शकत नाहीय. मैदानी खेळांची आवड लावणे असो, कींवा अभ्यास सहल असो, गणित व विज्ञानाची गोडी लावणे असो कींवा भाषेची संस्कृती समृध्द करणे असो वा वेगवेगळ्या कलांची ओळख असो.. इतिहासाच्या रम्य कथा असो कीॅवा भुगोलातुन विश्वदर्शन असो जे काही शिकलो ते याच काळात...
एक माणुस म्हणुन, एक जागरुक नागरिक म्हणुन जे घडलो ते ह्याच काळात... माझ्या विद्यार्थीदशेतला हा सुवर्णकाळ !!
ह्या दशेत आपली ओळख आपल्याला होते. बाल अवस्थेतुन कुमार अवस्था व त्यानंतर येऊ घातलेल्या तरुणाईची साद अश्या संक्रमणातुन जातांना आयुष्यभराचे मित्र मिळतात ते ह्याच काळात...फुलपाखरासारखे उडत उडत कधी दहावी पास होतो हे कळत सुध्दा नाही... ह्याबाबतीत मागील दोन दशकातील सरकारी निरुत्साह व खाजगी शाळांची लुट बघुन मन विषण्ण होते. आख्ख्या एक पीढीचे नुकसान जेंव्हा होते तेंव्हा मानवतेची व राष्ट्राची खुप हानी होते. ह्यावर तातडीच्या सुधारणा गरजेच्या आहेत. शेती, स्वयंपाक, स्वावलंबन, निसर्ग संवर्धन, नागरिकशास्त्र, संविधान, आर्थिक, व्यावसायिक व राजकीय प्रगल्भेतेची मुळे ह्याच कालावधीत रुजवल्या जावी व प्रत्येक विद्यार्थ्याला रक्षा कींवा सेवा विभागात एक वर्ष कामाची सक्ती असावी. असे मला वाटते.


वाल्मीक फड,नाशिक.
आमचे दहावीपर्यंत शिक्षण म्हणजे एक प्रकारचा संघर्षच होता असे म्हणायला काहीच हरकत नाही कारण त्यावेळी घरातील माणसे सर्वच अशिक्षित होती आणि शिक्षणाचा लवलेशही नव्हता.फक्त पाठवतात इतर लोक मुलांना शाळेत म्हणून पाठवायचे मनापासून नाही.खरं तर त्यांना वाटायचे यांनी गुरे चारायला रानात घेऊन जावी गुरांना सांभाळावं असंच त्यांना वाटायचं.ते पण काय करणार म्हणा कारण त्यावेळी आधुनिक शेती पद्धत नव्हती आणी निसर्गाचा लहरीपणा कधी खुप धनधान्य व्हायचे तर काही वेळेस खाण्याची पंचायत!पहिलीत एका याञेला परीक्षेच्या दिवशी गेल्यामुळे नापास झालो.पण शिकायची आस माञ होती आणि आईला पण वाटायचं की आपल्या मुलाने शिकावे.सुट्टीच्या दिवसात गुरे सांभाळून मजुरीला जाऊन कारण मोठं कुटुंब असल्यामुळे कामापासून कुणालाही सुटका नव्हती त्यात आमचे वडील आमच्या लहानपणीच गेलेले त्यामुळे मला जास्त काम.इतर काकांचे रागवणे माझ्यावर जास्त असायचे.असे सर्व सहन करत पहीली ,दुसरी,ते सातवीपर्यंतचा पहीला टप्पा पुर्ण झाला आणी वेळ आली परगावी शाळेत जाण्याची.सायकलीसाठी पैसे नाही म्हणून मला एका काकांकडे आठवीसाठी रवाना करण्यात आले.तिथे  साधारण आठवीचा वर्ग नंतर नववीची सहामाई परीक्षा झाल्यावर काकांचे आणी माझे न जमल्यामुळे तेथून मी पलायन केले.शिकायची आस कमी झालेली नव्हती एक ते दिड वर्षे शेळ्या जनावरे संभाळली आणी योगायोग म्हणजे गावाला खेटून असणार्या गावात आठविचा वर्ग चालू झाला तो वर्ग नववीत येईपर्यंत थांबलो आणी शाळेत दाखल झालो.नंतर मजुरी करतच शिक्षण दहावीची परीक्षा दिली आणी गणित विषय नापास झालो.दोनदा पेपर देऊनही काही साध्य झाले नाही आणी शेती करण्यासाठी तयारीला लागलो.बरेच दिवस शेती चालू होती मजुरीही चालू होती त्यामुळे शिक्षणापासून खुप दुर गेलो काय करणार?
आणि जेव्हा मला कळाले की,मुक्त विध्यापिठातून ग्रॕजुएट होता येते तेव्हा माझे वय ४० होते आणी तेही सांगितले एका प्राथमिक शिक्षकाने आणी कधी कळाले तर त्यावेळेस माझी मुलगी पाचवीला शाळेत होती तेव्हा. आता जडणघडण घडण म्हणजे मी माझ्या सर्वच मुलांना जेवढे देता येईल तेवढे शिक्षण देतो आहे. आणी मी माझा लिहीण्याचा छंद आपल्या समुहाच्या माध्यमातून पुर्ण करतोय.खुप समाधान वाटत असते लिहीताना.


अमोल धावडे,अहमदनगर.
साधारपणे माझे पहीले ते सातवी शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. पाहिले ते सातवी पर्यंत एकच वर्गशिक्षक आणि सगळे विषय जवळपास तोच शिकवायचा पण ती मज्जा वेगळी होती आम्हला सातवीपर्यंत वर्गशिक्षिका होती मस्त स्वभाव एकदम हुशार सकाळी शाळेमध्ये आल्यावर प्रार्थनेने आमच्या दिवसाची सुरुवात व्हायची.
             सातवीनंतर माध्यमिक शाळेत ऍडमिशन झाले तेथे प्रत्येक विषयाला वेगळे सर प्रत्येक सरांचा वेगळा अभ्यास. मी गणित आणि भूमिती विषयामध्ये हुशार असल्याने सर मला वर्गाचा मॉनिटर करायचे मग काय वर्गामध्ये नुसती छाप करायचो. खेळाचा तास आला की बेल वाजयच्या आधी सर्व मुलं मैदानात असायची त्यावेळेस शिक्षक हे गुरू होते शिक्षक बडबड बडवायचे तरी घरच्यांची कोणत्याही प्रकरची तक्रार नसायची त्यामुळे सर्व गोष्टी वेळेवर व्हयच्या. त्यावेळेस मुलं हे धडदांडकट असायच्या त्यांच्या अंगावर सर काठ्या मोडायचे आणि त्यातूनच सर्वाना वळण लागायचे. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी शहराकडे स्थलांतर झाले परंतु दहावीपर्यंतचे शिक्षण अजूनही मिस करत आहे.
            सध्यच्या परिस्थिती मध्ये शिक्षण व्यवस्थेचा नुसता कचरा झाला आहे आताच्या मुलांना शिक्षक ओरडले तरी पालक शिक्षकांना भाडण्यासाठी जातात आणि आमच्या पालकांनी फुल परमिशन दिलेली की फुल बदडा गरीब परिस्थिती मध्ये दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व पुढील शिक्षणासाठी शहरात आलो दहावी पर्यंतचे शिक्षण व्यवस्थित मिळाले म्हणून आज पुढे चांगले शिक्षण घेऊ शकलो त्या सर्व गुरूंना माझें नमन.


जगताप रामकिशन शारदा,बीड.
पहिले ते चौथी गावातील जिल्हापरिषद शाळेत गेलो. खेडेगाव आणि घरात शिक्षणासाठी असणार वातावरण त्यामुळे पाया अगदी भक्कम झाला. आजही घरात कधी शाळेचा विषय निघाला की आज्जी बोलते मला मोठा प्रश्न पडायचा हा शाळेत कसा जाईल. कारण आज्जी चा लाडका . शाळेत जायचा विषय निघाला की आज्जी पण येणार तरच मी जाणार असा सुर असायचा. पण एके दिवशी लहान भाऊ शाळेत गेला आणि ते तास दोन तास गावात भिरभिर फिरलो आणि दुपारच्या वेळेला शाळेत पोहचलो ते आजतागायत कधीही शाळेत जा अस घरातून कधीच सांगितले नाही. घरात असणारा काकांचा दरारा आणि शिस्त त्या वयाच बाळकडू. ते ही माध्यमिक शिक्षक त्यामुळे शाळेतील प्रत्येक शिक्षकाविषयी आदराची भावना असायची. मोजकी पटसंख्या म्हणून आडनाव ने नाही तर नावानेच शिक्षक ओळखत.गाव सोडून पाचवी ते आठवी तालुक्याच्या ठिकाणी शाळेत काढली. स्पर्धा तर होतीच पण जे बाळकडू मिळाले होते ते उपयोगी पडले. अभ्यासाची गोडी यामुळेच शिक्षकांच्या शिक्षेपासून जरा अंतर राखून असायचो पण कधी कधी ते अंतर एका छडी एवढ कमी व्हायच. शाळेत कधी आगाऊपणा केला आणि त्यामुळे वडिलांनी खडसावले अस आठवत नाही पण अनेक वेळा खडसावल्याचे आठवते ते मुलांच्या पाठीत मारल म्हणून कारण परिक्षेची पूर्वतयारी म्हणून घेतलेल्या पाठांतरावर पकड असल्याने शिक्षक जो उत्तर देईल त्याला उत्तर न देणाऱ्या मुलांच्या पाठीवर मारण्याची मुभा देत असत त्यामुळे स्पर्धात्मक वाता्रणाची निर्मिती होत असे पण वडील मात्र याला विरोध करत. अशा पध्दतीने आठवी पूर्ण झाली आणि लातूर पँटर्नच्या भुरळ पडल्याने अहमदपूर ला जावे लागले. वर्गात असणारी शंभर सव्वाशे विद्यार्थी संख्या मन अस्वस्थ करणारी होती पण पुन्हा शिस्तबद्ध पध्दतीने अभ्यास करून शिक्षकांच्या नजरेत आलो आणि ही शाळा नको म्हणून रडणारो मी शाळेच्या पहिल्या दिवसापासून उपस्थित राहण्यासाठी आग्रही असायचो.याकाळात घरापासून दूर राहण्याची सवय लागली ती आजपर्यंत चालू आहे. दहावीच्या वर्गाची एक आठवण म्हणजे निकालाचा दिवस. अपेक्षित गुण मिळाले होते कसलाही भंकसपणा करत अवाजवी आकडेवारी घरच्यांच्या समोर मांडली नव्हती म्हणून वडील आई परिवारातील सदस्य आनंदी होते आणि आवर्जुन सांगावेसे वाटते की वडील काकांनी परिक्षा संपल्यानंतर सांगितले होते की वर्षभर तयारी केली होती आता जो निकाल असेल तो असेल पण तु काहीही कमी दिल नाही म्हणून कमी गुण मिळाले तरी दुखी व्हायचे नाही. गुण पण चांगले मिळाले जे चेहरे आनंदाने ओसंडून वाहत राहिले ते शब्दांत मांडण कठीण. दहावीपर्यंतच्या जडणघडणीनं जो ढाचा घडवला तो आजतागायत आलेल्या संकटांनी कधीही हलला नाही.


निखिल खोडे,पनवेल.
पाचवी ते सातवी पर्यंतचे माझे शिक्षण गावातील जिल्हा परिषेदेच्या शाळेमध्ये झाले. ती शाळा सातवी पर्यंत असल्याने पुढच्या शिक्षणासाठी मी तालुक्याच्या ठिकाणी शिकायला गेलो. घरची परिस्थिती बेताची होती तरीसुध्दा माझ्या शिक्षणाच्या बाबतीत घरच्यांनी कधी तडजोड कधीच केली नाही.आठवी ते दहावी साठी सेमी इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतला. गावावरून रोजचा प्रवास करणे शक्य नव्हतं त्यामुळे तालुक्याला  समाजकल्याण च्या वसतिगृहात प्रवेश घेतला. माझे गणित आणि इंग्रजी आधीच कच्चे असताना देखील मी दहावीला ७३.४०% घेऊन पास झालो.यादरम्यान वकृत्व स्पर्धेमध्ये, खेळामध्ये भाग घ्यायला लागलो. आमच्या वर्गशिक्षिकेमुळे मला वाचनाची आवड लागली. गणिताच्या शिक्षकाकडून पडणाऱ्या मारामुळे माझे गणित बऱ्यापैकी सुधारले होते. वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्यावेळेस शिक्षकांनी माझ्यामध्ये भरलेला आत्मविश्वास आता जीवनात मला नक्कीच उपयोगी पडत आहे.
मानवी जीवनाला उपयोगी पडेल असे शिक्षण असायला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये विचारांना चालना मिळेल व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होइल असे शिक्षण गरजेचे आहे. त्यापुढील उच्च माध्यमिक शिक्षण हे व्यवसायिक गुणांना विकसित करणारे असावे. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकास  व समाजातील समस्यांबद्दल स्वतःची विचार निर्मिती तसेच शिक्षणाद्वारे संशोधन व नवनिर्मिती याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित व्हायला हवे.अभ्यासक्रम हा कालबाह्य नसावा व कठीण गोष्ट सोपी करुन सांगणारा असावा. घोकंपट्टी पेक्षा विषयाची खोल समज देणारा असावा. ह्यात राजकीय व शासकीय हस्तक्षेप नसावा. शिक्षकांचे पण वेळोवेळी प्रशिक्षण व्हायला हवे...  तरच ते उद्याचे जागरुक नागरिक घडवु शकतील.


प्रविण दळवी,नाशिक.
मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांची घटती संख्या हे शिक्षण व्यवस्थेत काम करणाऱ्या प्रत्येकाचा चिंतेचा विषय झाला आहे. गेल्या काही वर्षांत शहरी भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढ झपाट्याने होत आहे. या शाळानी मराठी माध्यमाच्या शाळांपुढे मोठेच आव्हान उभे केले आहे. टाय बूट असणारा गणवेश, जायला यायला स्कूल बस सारख्या सोयी, शाळेत साजरे केले जाणारे विविध दिवस अशा अनेक क्लुप्त्या वापरून या शाळा विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे आकर्षित करायचा प्रयत्न करताना दिसतात.पालकही सरकारी शाळांत मिळणारे मोफत शिक्षण टाळून या खाजगी शाळांकडे मोठ्या प्रमाणावर वळलेले दिसतात.

मूले जसा विचार करतात तसेच त्यांचे मन घडत जाते माझं म्हणणं तुम्हाला पटते का ते पहा आपण जर आपल्या मनाला सांगितले की मला काहीच होत नाही मी खूप आनंदी आहे खूप आनंदी आहे तर आपण आनंदित होत जातो परंतु जर आपण आपल्या मनाला सांगितले की मला खूपच बोर होते बोर होते तर बोर होणारच आणि राहिली गोष्ट अभ्यासावर परिणाम होण्याची तर तीही आपल्या मनाचाच भाग आहे फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप या सोशल मीडिया मूळे मूले खरंच वेडे बनत जात आहे त्याच्यातून बाहेर निघणे म्हणजे आजकालच्या मुलांना खूप त्रासदायक आहे मोबाईलचे व्यसन हे काय दारूच्या व्यसना पेक्षा कमी नाहीये मोबाईलचे व्यसन तर तुम्ही सोडा, फेसबुक व्हाट्सअप वगैरे टाळा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या आणि कंटिन्यू पॉझिटिव्ह चला माझे हे वाक्य लक्षात ठेवा आपण जसा विचार करतो तसेच आपले मन घडत जाते त्यामुळे आपल्याला काय विचार करायचा आहे आणि काय नाही आणि आपल्याला आपलं मन कसं घडवायचयं हेच संपूर्ण आपल्या हातामध्ये असते त्यामुळे सर्व काही काळजीपुर्वक वागायचे असे लहान पणा पासूनच शिकवले गेले तसा मी घडत गेलो.
धन्यवाद...

ऋषिकेश खिलारे ,मेळघाट.
शिक्षण म्हणजे काय ?आपण का शिकावे, कसे शिक्षण घ्यावे या बद्दल भारतीय समाज्यामध्ये फार मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
     शिक्षणाचा केंद्रबिंदू विद्यार्थी आहे.पण तो सोडून त्याच्या बाबतीत सगळे निर्णय दुसरेच घेतात.खूप फिस घेणारी शाळा,क्लास लावले म्हणजे आम्ही आमच्या मुलाला चांगले शिक्षण देतो असे नाही.खरं तर देशातील जन्माला येणारे मुलं कसे असेल ते त्या देशाचा मागील 50 वर्षाचा इतिहास ठरवते.जडण घडण तिथून सुरू होते.मला काय त्याचे, ही नीती देशहिताची कधीच नसणार आहे.असो. आपण जन्माला आल्यापासून विकासाच्या विविध अवस्थेतुन आपण प्रवास करतो त्या अवस्थेत तेच रोल केले पाहिजेत .आत्ता आपण अगदी 10 वर्षाच्या मुलाकडून 20 वर्षाच्या मुलाच्या अपेक्षा करणे हे नक्कीच चुकीचे आहे. यामुळे त्या अपेक्षेच्या ओझ्याने त्या मुलाचे मूळ व्यक्तिमत्त्व विकसित होत नाही.ज्याचा उद्रेक आपणाला 16 वर्षानंतर पाहायला मिळतो याचा दोष आपण त्याचे मित्र मैत्रिणी यांना देत राहतो.
      10 वी पर्यंतचे शिक्षणात विद्यार्थी,शिक्षक,पालक, गाव/शहर व समाज या सगळ्यांचा समान व महत्त्वाची भूमिका आहे.कारण विद्यार्थी घडताना हे सर्व घटक जबाबदार आहेत.आजच्या शिक्षणाचा बट्याबोळ हा शिक्षक,पालक,गाव,समाज व शासन नीती या सगळ्यांनी केलेल्या चुका व राबवलेले चुकीचे धोरण आहे.
      चांगले मार्क म्हणजे हुशार ही चुकीची समजूत आपली आहे.आपल्याकडची परिक्षपद्धती सदोष आहे ती फक्त विद्यार्थ्यांचे पाठांतरण पाहते पठण नाही,अक्षर पाहते आकलन नाही.माहिती पाहते ज्ञान नाही.मार्क पाहते मॅनर्स  नाही.नियम पाहते नैतिकता नाही .थोडक्यात आम्ही अत्यंत चुकीच्या व विरुद्ध दिशेला प्रवास करत आहोत.म्हणून कधी कधी वाटते की पालकांनी मुलांना शाळेत नाही घातले तर ते चांगले माणूस,चांगले शेतकरी,चांगले उद्योजक होऊ शकतात.तुम्हाला आश्चर्य वाटेल जगातल्या मोठ्या व्यावसायिकांकडे डिग्रीचे ही शिक्षण नाही.थोडक्यात काय तर भित्रे,अनितीेने चालणारे अहंम असलेले विद्यार्थी आम्ही घडवत आहोत.
     याच्या बदलावर्ती आम्ही सृजन हे संशोधन प्रकल्प सुरू केला आहे.ज्यामध्ये शाळा हे विकासाचा केंद्रबिंदू बनला आहे .एक शाळा 25 गावचा विकास कसा करते हे मेळघाटमध्ये आल्यावरती पाहायला मिळेल.2020 नंतर त्याविषयी आम्ही जगात उघड बोलू.सध्या संशोधन सुरू आहे.होत असलेले बदल आशादायी आहेत.

यातील सर्व संबंधित छायाचित्रे इंटरनेटवरून घेतलेली आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************