पत्र..पोस्ट ऑफिस ते डिजिटल पोस्ट

पत्र.. पोस्ट ऑफिस ते डिजिटल पोस्ट

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

पत्र..पोस्ट ऑफिस ते डिजिटल पोस्ट


Source: INTERNET               
-स्वप्नील चव्हाण,
 जि बुलडाणा

प्रिय पत्र,
        आज खूप दिवसानी आठवण आली रे तुझी....आणि चक्क भरून आल्यागत झालं मला...ते लहापणिचे दिवस असे समोर उभे झालेत एकदम...आज तुला फक्त सरकारी कामासाठी सोडून इतरत्र वापरत नाहीत हे मी जाणतो....पण तरीही तू आमच्या बालपणिच्या खूप आठवणी साठवून ठेवल्यात....कधी मामा पाठवायचे ,कधी मावशी ,कोणीही पाठवू देत तू मात्र तुझं काम चोखपणे करायचा ......अगदी न थकता...... आणि तरीही लोक आज विसरलेत रे तुला.....दुःख होत खूप....
         अगदी लोक तुझी वाट बघायचे रे....कधी येणार पत्र ...?? आणि आज  तू लोकांच्या स्मरणात नाहीयेस....असू दे ...कोणाला असो वा नसो ...आम्हाला तू आजही तेवढाच प्रिय आहेस.....               
.............."कारण आमच्यासाठी तू फक्त एक कागदाचा तुकडा नव्हतास....तू आमच्या बहिणीची राखी होतास......तू आमच्या आई-वडिलांची काळजी होतास....तू वडीलधाऱ्यांचा आशिर्वाद होतास....कधी खर्चासाठी पाठवलेले पैसे होतास....तर कधी निकाल खराब आल्यामुळे घरच्यांचा राग होता.....युवकांसाठी त्यांच्या प्रेयसीचं प्रेम होता........"

   खरंच खूप काही होता तू आमच्यासाठी........तेव्हा कदाचित आम्हाला मायने ,आराखडा माहीत नव्हता....कारण आम्हाला आमच्या भावना पोहोचवणं जास्त महत्वाचं वाटायचं....आज पत्र कसं लिहावं....हे शिकवावं लागतंय वर्गात......पण ते पत्र लिहीनं फक्त वर्गात आणि परीक्षेतच विसरून येतो आपण......आणि संदेश पाठवायला फेसबुक,व्हाट्सएप,हाइक,वगैरे आहेत ना....पत्र आम्ही फक्त परीक्षेत गुण मिळवायला शिकतो........
आजही "कबुतर जा " गाणं लागलं की ते प्रियकर आणि प्रियसी नजरेसमोर उभे राहतात...एकमेकांच्या पत्रासाठी आतुर........
अरे चित्रपटांमध्ये पण तू कित्येक महत्वाच्या भूमिका बजवल्यास....कधी प्रेम,कधी कुणाचं गुपित,कधी पुरावा ,तर अगदी "तुम मुझे भूल जाओ" इथपर्यंत.....कमाल आहे रे तुझी..!!

    आज तुझं स्वरूप बदललंय..... वेगवान झालास तू....पण आधी ज्या भावना पोहोचवत होतास कदाचित त्या पोहोचवत नाहीयेस आता....."पेपरलेस" सोबत "फिलिंगलेस" पण झालास की काय असं वाटायला लागलंय.......
  व्हाट्सएप वर रोज बोलण्यात ती मजा उरली नाही रे जी फक्त...दसरा-दिवाळी, भाऊबीज, रक्षाबंधन , वाढदिवसाला येणाऱ्या पत्रांमध्ये होती.......तू यायला थोडा वेळ लावायचा पण ...सोबत खूप भावना घेऊन यायचा रे....आता डोळ्यांची पापणे लावण्याच्या आत तू पोहोचतो ....पण त्या भावना का जाणवत नाहीयेत देव जाणे....??
कदाचित फक्त निरोप पाठवणे हाच हेतू उरला असावा...आज फास्ट होण्याच्या मागे आम्ही भावना विसरत चाललोय .....माणूस असूनही माणुसकी विसरत चाललोय.....कारण अपघात झालेल्या व्यक्तीला मदत केल्यापेक्षा, फोटो काढून व्हाट्सएप वर टाकणे आम्हाला जास्त गरजेचं वाटतं.... तुला वाटत असेल फक्त तुच बदलला ... नाही रे...आम्ही पण बदललोय... आता दिसायला आम्ही माणूस दिसतो....जी गोष्ट..अर्थात ह्या भावना आम्हाला इतर प्राण्यांतून वेगळं करतात त्या आता लोप पावत आहेत....माणूस फक्त पैसा नावाच्या कागदाच्या तुकड्यामागे धावतोय......आणि आम्ही पण प्राणीचं आहोत हे सिद्ध करण्याचा मागे लागलाय.......
       असो....पण जेव्हाही तुझा विषय निघेल...हे मन भावनांनी आणि डोळे नक्कीच पाण्याने भरून येतील...तू ज्या गोड आठवणी दिल्यास त्याबद्दल ....खूप खूप आभारी....!!
    प्रेमप्रकरण सुरुच तू करायचा ना ....आता पहिल्याच दिवशी मोबाइल नं. मागितला जातो.......कित्येक जणांसाठी तू नोकरी ची बातमी घेऊन यायचा....आता ते पण नाही....बघा इंटरनेट वर.....सैनिकांच्या कॅम्प मध्ये पोस्टमन आल्यावर जी उत्सुकता राहायची ती आता उरलीच नाही.....कारण पोस्टमन ला जावंच लागत नाही.....आठवत असेल ना तुला ते तुझ्यासाठी लिहिलेलं गाणं..."संदेसे आते है....."
  आणि खरंच "पोस्टमन काका" हा घटक तुझ्यासोबत दिसेनासा झालाय रे....काल तू दिसला रे मला त्या "चला हवा येऊ द्या" च्या सेट वर....पोस्टमन काका पण होते....छान वाटलं बघून थोडं.....पण राहशील रे तू स्मरणात कारण आज पण "मामाचं पत्र हरपलं" खेळ आठवला की हसू फुलत चेहऱ्यावर......असंच तुझ्या आठवणीत हसत राहावं सगळ्यांनी ,कारण आठवणीच तेवढ्या गोड होत्या ना......
               तुझ्या प्रतीक्षेत,
                   "माणूस"



Source: INTERNET  
-मयुरी देवकर,
 ता.माळशिरस

              अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या की माणसाला दळणवळण व संदेशवहनाच्या गोष्टींची उणीव भासू लागली आणि यातूनच नवनवीन संदेशवहनाच्या गोष्टींची निर्मिती झाली.त्यासाठी प्रथमतः नवनवीन रस्ते निर्माण झाल्यानंतर आपला निरोप दुसऱ्या गावी पोचवायचा असेल तर दूत पाठवावे लागत.नंतर अशाचप्रकारे पत्र, टेलिफोन,मोबाईल, अशा अनेक माध्यमांचा शोध लागला.'पत्राचा 'शोध लागला आणि आपल्या मनातील भावना,सुख,दुःख व्यक्त करणे खूप सोयीस्कर झाले आणि मग सुरु झाले ते पत्र घेऊन येणाऱ्या पोस्टमनकाकांची वाट पाहणे......त्यावेळी खूप लोक अशिक्षित होते त्यामुळे अगदी ते पत्रही वाचता येत नसायचे ...मग काय कधी कधी तर ते आलेले पत्र नंतर दहा-पंधरा दिवसांनी ज्यांना वाचता येते त्यांच्याकडून वाचून घ्यावे लागायचं.... त्यामुळे जर एखादी दुःखद घटना घडली तरी खूप उशीरा माहिती व्हायची.पण तेवढी तरी माहिती व्हायची हे महत्त्वाचं... पत्र पाठवणाऱ्या आणि मिळणाऱ्या दोन्ही व्यक्तींना खूप आतुरता वाटायची...आणि त्यात पत्राला उत्तर म्हणून परत पत्र आले तर आनंद द्विगुणित व्हायचा...गावातील खूप लोकांचा चेहरा पोस्टमनला पहिले कि खुलून जायचा...
          दिवसेंदिवस पुन्हा नवनवीन शोध लागू लागले आणि कमी वेळात संदेश पोहोचण्याची व्यवस्था झाली आणि आज तर पोस्ट ऑफिसची जागा डिजिटल पोस्टने घेतलीय...आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत व गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळेच डिजिटल झाले आहेत....आज या डिजिटल पोस्टच्या युगात माणसं एका सेकंदाच्या अंतरावर आली पण प्रेम ,माया,आपुलकी,ती आतुरता खरंच कुठं गेली ???
या डिजिटल पोस्टाच्या काळात माणसं जवळ आली पण मनं मात्र दुरावली ...काय उपयोग आहे मग ?आज सर्वांना वाचता येत असताना आज आम्हाला समोरचा माणूसच वाचता येत नाही तर खरंच आम्ही प्रगती कुठे केली हा प्रश्न पडतो...आज पत्राच्या खूपच लवकर एखादा संदेश पोहोचतो पण तो संदेश मिळाला तरी तो आनंद आज कुठेतरी हरवला आहे...आणि हा हरवलेला आनंद डिजिटल पोस्टात नव्हे तर माणसातच मिळेल........



Source: INTERNET  
-संगीता देशमुख,
वसमत

पत्र हा शब्द आठवला की, अजूनही आठवते ते पिवळसर रंगाचे पोस्ट कार्ड,फिकट निळसर आंतरदेशीय पत्र आणि फिकट पिवळसर रंगाच्या  लिफाफ्यातील दोन्ही बाजूने लिहिलेली मोठमोठी पत्रे! आणि दारावर येऊन "पोस्टमनsss" अशी मोठ्याने हाक मारणारा खादी वर्दीतला पोस्टमन! गावात सर्वजण पोस्टमनला "मामा" म्हणायचे. असंही आपल्याकडे जवळच्या  वाटणाऱ्या माणसाला "काका" म्हणण्यापेक्षा "मामा" म्हणण्याची आंतरिक उर्मी जास्तच! तर हे पोस्टमन मामा फक्त पत्र घेऊन येत नसत तर त्या पत्रातून मामा,मावशी,आजी,आजोबा,बाहेरगावी असणारे भाऊबहीण,सासरी गेलेल्या मुलीच्या भावना,माहेराहून आईवडिलांच्या भावना अशा अनेक हृदयस्थ भावना घेऊन यायचे. त्यामुळे हे पोस्टमन अनेकजणांच्या मनाला जोडणारा दुवा होता. तसेच नोकरीची मुलाखत असो की नोकरीचे  नेमणूक पत्र असो,हे पोस्टमनच आपल्यापर्यंत पोहोचवायचे. पोस्टमन हे जवळचे वाटणे,हे साहजिकच होते.यात सर्वाना भावनिकदृष्ट्या जोडून ठेवण्याचा महत्वाचा दुवा होता तो म्हणजे पोस्टमनकडून येणारे पत्र!
      आज या पत्राचा प्रवास इमेल पर्यंत येऊन पोहोचला आहे. पण पत्रामध्ये जी भावनिकता असायची ती इमेलमध्ये कुठून आणि कशी येईल? कारण आज इमेलचा उद्देशच हा मुख्यत्वेकरून कार्यालयीन आहे. आजचे धावते युग आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक कामे सुलभ आणि ताबडतोब होतात. तसे पाहता लोकांना खूप वेळ मिळायला हवा होता. परंतु या वेळेचेही समायोजन आजच्या तरूण पिढीने सोशल मिडियाकडे केले.  त्यामुळे कोणाकडे मोकळा वेळ नसल्याने अनौपचारिक पत्र पाठविण्यात येत नाहीत. त्यामुळे आजच्या झटपट युगात पत्राची सर इमेलला येणार नाही. आज इमेल काही सेकंदात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचते. पत्र मात्र आज लिहून पत्रपेटीत टाकले तर जिल्ह्याच्या बाहेर पोहोचायलाच तीन-चार दिवस लागायचे,तर राज्याबाहेर हे पत्र पोहोचायला कधी कधी तर दहा ते पंधरा दिवस लागत. यात जी प्रतीक्षा होती,त्या प्रतीक्षेत एक अनामिक ओढ असायची. साहजिकच एवढी वाट पाहून आणि दुरून  आलेल्या पत्रात काय असेल,ही उत्सुकता त्यात असायची. पत्र हे दूरच्या व्यक्तीसाठी संवादाचे एकमेव साधन होते. आज पत्र नामशेष होण्यामागचे कारण आज मोबाईलद्वारे जगाच्या कोपऱ्यात काही क्षणात कुठेही संवाद साधता येतो. परंतु पत्रातून मनातल्या भावना मोकळ्यामनाने लिहिल्या जायच्या,ज्या की आज मोबाईलवर तेवढ्या उमाळ्याने त्या बोलू शकत नाहीत. पत्रातून अख्ख्या गाण्यांच्या ओळी,शेर-शायरी,गझल यांनी ते पत्र अधिकच बहारदार व्हायचे. म्हणूनच ते तेवढेच जपूनही ठेवल्या जायचे.
          माहेराहून आलेले पत्र सासुरवाशीणीला मायेची ऊब  देऊन जायचे,तर सासरहून आलेल्या लेकीच्या पत्रातून आईला मुलीचे सुखदुःखे कळायची. सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला घरून आलेल्या पत्राने शत्रूसोबत लढण्यासाठी अंगात दहा हत्तीचं बळ यायचं, तर सीमेवरून सैनिकाच्या  आलेल्या पत्राने घरच्यांचा जीवात जीव यायचा. माझे पती सैन्यात होते. तेव्हा लॅंडलाइन फोन हे श्रीमंताकडेच असायचे. घरापासून दूर असणाऱ्या सैनिकांना हे पत्र म्हणजे जीव की प्राण असायचे. अशी पत्र लिहिता लिहिता मी त्यांच्या मित्रांनाही पत्र लिहीत होते. त्यांना दरवर्षी न चुकता राखीपोर्णिमेला मी राखी पाठवायची. त्यामुळे ते सर्व माझे  सैनिक बंधू माझ्या पत्राची आतुरतेने वाट पहात असत. याच पत्रातून मी एकदाही न पाहिलेल्या त्या मित्रांसोबत आमचे बहीणभावाचे असे दृढ नाते निर्माण झाले हे आज एवढ्या वर्षानंतरही टिकून आहे. अशी अनेक अतूट नाती या पत्राने बनविली होती. त्यानंतर काही वर्षातच डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे समाजातील अंधश्रद्धा विरोधी काम करण्यासाठी पत्र मला आले होते. त्या पत्राने माझ्या जीवनाला खरी कलाटणी मिळाली.  माझी इतकी कर्मठ घरात जडणघडण झालेली असतांना मी त्या पत्रापासून पूर्णपणे बदलले.हा पत्राचा आजपर्यंतचा प्रवास अत्यंत रोमांचकारी आणि विस्मयकारक आहे.


Source: INTERNET  
-यशवंती होनमाने,
मोहोळ

"डाकिया डाक लाया,देखो डाकिया डाक लाया "किती छान वाटतंय ना ऐकायला.पत्र एक अस व्यासपीठ की त्या व्यासपीठावर मनातील सगळ्या भावना ,विचार ,स्वप्न अगदी सहज व्यक्त करता येतात.पूर्वी गावाकडे पोस्ट्मन काका आले की सगळे कान टवकारून असायचे.शहरांत काय घडले याचा सगळा इतिहास असायचा.गावातला कोणी तरी शहरात कामासाठी गेलेला असायचा,कोणी बॉर्डर वर देशाचं रक्षण करत असायचे तर कोणाच्या लेकीबाळा दूर सासरी असायच्या,या सगळ्याना एकमेकांना भेटण्यासाठी एकच साधन होत ते म्हणजे पत्र.              
        "हमने सनम को खत लिखा ,खत में लिखा "हे सॉंग ऐकलं की त्यात त्या प्रेयसीच्या व्यक्त होणाऱ्या भावना समजतात ,तर,"के चिट्ठी आती है ,के पूछे जाती है ,लिखो कब आओगे "हे बॉर्डर फिल्म मधील सॉंग काळजाचा ठोका चुकवून जाते.म्हणजे बघा या पत्राचा किती आधार होता.पण आता.....😔😔 या email च्या जमान्यात पत्राची ओढ रहिली नाही.डिजिटल च्या जमान्यात नाती पण डिजिटल झाली.कोणतीच ओढ ,माया ,प्रेम राहील नाही.उरलाय फक्त मेसेज.असा मेसेज की त्यातली कोणतीच भावना मनाला स्पर्श करत नाही.
        पण एकमात्र नक्की आहे की जग कितीही पुढे गेले तरी पत्राची जागा कोणत्याही email ,मेसेज ने घेतलेली नाही.जी हुरहूर पत्र वाचताना होते ती मेसेज किंवा email वाचताना होत नाही.जी मजा पत्र चोरून वाचण्यात आहे ती कशात नाही.
     "पता है हमें के हम नही आ सकते तुम तक तो क्या हुआ ये खत है जो मेरी रूह से निकले हर लफ्ज तुम्हारे  दिल के आईने पर नज़र आयेंगे!"
        असो जग कितीही डिजिटल झाल तरी पत्र लिहिण्याचा आनंद च वेगळा.लिखे जो खत तुझे ,वो तेरी याद में !!!!!
     चला तर मग पत्र लिहायला सुरवात करायची ना ?????
प्रिय ........पत्र लिहिण्यास कारण की ..........



Source: INTERNET  
-किरण पवार,
औरंगाबाद

                मला प्रत्यक्षात पत्र लिहण्याचा योग केवळ दोन वेळेसच आला पण मला वैयक्तिकरित्या पत्रांची खूपच आवड होती. नेहमी वाटायचं की, खुशाली विचारणारं किंवा पावसाची तब्येत विचारणारं पत्र कधी आपणही कुणाला लिहावं. आणि बदल्यात समोरच्याने आपल्याला त्या पत्रात त्यांच्याकडील सभोवतालच्या परिसराची माहिती रितसर लिहूण पाठवावी. जेणेकरून मला वर्णन जर आवडलंच तर त्या ठिकाणी मुसाफिर बनून जाता येईल. कधीकधी वाटायचं आईलाच पत्र लिहावं. पण त्यावेळी लहान होतो; आणि माहित नाही का पण मनात असं वाटून जायचं की, पत्र पोहोचलच नाही तर.....
         मला आणखी एक गोष्ट चांगलीच माहित आहे ती म्हणजे, पत्र म्हणजे वाट पहाणं. मग ते वाट पहाणं किती क्षणांच किती मैलांच असेल हे कल्पिलेलच बरं. तो काळ जुना होताच तसा की, पत्र पोहोचायला वेळ लागायचा. मी सहावीत शिकत असताना मराठीत एक धडा होता बहुतेक... ज्यामधे आंधळी आजी तिच्या परदेशी गेलेल्या मुलाची वाट पहात असते आणि तो तिला साधं एक पत्रही लिहीत नसतो. पण पोस्टमनकाका त्या आज्जींना खोट पत्र वाचवून दाखून समाधानाच हास्य त्यांच्या चेहऱ्यावर उमटवतं असतो. त्या गोष्टीपासून मला पत्राबद्दल खूप आस्था दाटून येते...
         पण सध्याच्या डिजीटल पोस्टमधे त्या भावनांच येणं कधीच होणार नाही. डीजीटलच्या जमान्याला रागलोभाचा चेहरा थरथरणाऱ्या सुरकुत्यांच्या रुपात दिसणारच नाही जे की, पत्रातल्या शब्दांवरून स्थितीच भान लावता यायचं....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************