माझी विनोदी कथा....

माझी विनोदी कथा....


Image Source Internet 

मयुर डुमणे,उस्मानाबाद

 ब्रेक अप संघटनेचे अध्यक्ष ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष : एक प्रेरणादायी प्रवास

तुम्हाला आज मी डोनाल्ड तात्यांचा संघर्षमय जीवन प्रवास सांगणार आहे. न्यूयॉर्क जिल्ह्यातील ट्रम्पवाड़ीत 14 जून 1946 ला कालोख्या रात्री पहाटे 3 वाजता क्रांतीसूर्य तात्यांचा जन्म झाला. तात्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. लवकरच तात्यांनी ट्रम्पवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला. शाळेत जायला तात्यांकडे चप्पल नव्हती म्हणून तात्या बुट घालून जायचे  माध्यान्ह भोजन आहार योजनेतील भात खाऊन तात्यांनी पोटाची भूक भागवली. अशी परिस्थिती असताना देखील पहिल्याच वर्गात वार्षिक परीक्षेत प्रथम येऊन तात्यांनी त्यांच्या कुशाग्र बुद्धिची झलक दाखवून दिली पण तात्यांचा खरा आतला आवाज अजून बाहेर आला नव्हता वर्षा मागून वर्ष जात राहली. तात्या 10 वित असताना तात्यांची सलग 4 ब्रेक अप झाली आणि तात्यांचा खरा आतला आवाज बाहेर आला. तात्यांना वाड़ीत कोणीच ओळखत नव्हते परंतु एका मागून एक होत गेलेल्या ब्रेक अप मुळे तात्या खुपच प्रसिद्ध झाले . याचा परिणाम म्हणजे तात्यांनी ब्रेक अप संघटनेची स्थापना केली. तात्यांच नेतृत्व कौशल्य याच संघटनेमुळे समोर आले प्रेमभंगी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे हे या संघटनेचे मुख्य काम . अल्पावधितच प्रेमभंगी लोकांचे समुपदेशन करणारी, राष्ट्रीय काम करणारी संघटना म्हणून ही संघटना नावारुपास आली. पुढे चालून या संघटनेला त्यांच्या महान कामाबद्दल शांततेचा नोबेल देऊन गौरविण्यात आले तात्यांच माध्यमिक शिक्षण संपल महाविद्यालयीन शिक्षणासाठी तात्या न्यूयॉर्क ला गेले तिथे केम्ब्रिज महाविद्यालयात कला शाखेला प्रवेश घेतला. येथील NSS मध्ये तात्यांची खरी जडण घडण झाली  NSS मध्ये असताना तात्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाला भालुन अनेक मूली तात्यांच्या प्रेमात पडल्या पण तात्यांनी अधिक उत्साह न दाखवता स्वतःवर नियंत्रण ठेवल. महाविद्यालयात तात्या छेडछाड़ प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष होते पर्यावरण हा तात्यांचा आवडता विषय जागतिक तापमानवाढ, ग्रीन हाऊस गॅसेस वातावरणीय बदल अशा अनेक विषयांचा अभ्यास तात्यांनी महाविद्यालयात केला पुढे चालून तात्या समाजसुधारणेच्या क्षेत्रात उतरले. "पौगंडावस्था आणि हार्मोन्सवरील नियंत्रण" "पर्यावरणाचे महत्व" "स्त्रियांचे समाजातील स्थान" "दहशतवाद कारणे आणि उपाय" अशा विविध विषयांवर त्यांनी व्याख्याने दिली
हा झाला तात्यांचा शैक्षणिक प्रवास आता आपण राजकीय प्रवास पाहू या . तात्यांचा राजकीय प्रवासाची सुरवात ट्रम्पवाडीतूनच झाली. पहिल्यांदाच तात्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभा राहिले आणि प्रचंड बहुमतांनी निवडून आले पुढे चालून त्यांना ट्रम्पवाडीच सरपंच व्हायची संधी मिळाली.  पर्यावरण, महिला सबलीकरण, युवक या विषयातील कामामुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले आणि ऐकामागुन एक निवडणुका जिंकत गेले सहकारी साखर कारखाना, दूध डेअरी पतसंस्था, न्यूयॉर्क मध्यवर्ती बैंक अशा विविध संस्थावर तात्या निवडून गेले. अखेर तो दिवस उजाडला रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून निवड झाली. प्रसारमाध्यमांनी प्रचंड बदनामी केली पण तात्या खचले नाहीत शेवटी हिलरी बाईंना कात्रजचा घाट दाखवून तात्या अनपेक्षित रित्या प्रचंड बहुमतांनी निवडून आले. सारे जग अवाक झाल  ब्रेक अप संघटनेचा अध्यक्ष, ट्रम्पवाडीचा सरपंच ते अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष तात्यांचा हा राजकीय प्रवास थक्क करून टाकणारा आहे. शालेय अभ्यासक्रमात तात्यांचा हा जो राजकीय प्रवास आहे याचा समावेश करावा अशी विनंती  पाठ्यपुस्तक मंडळाला महाराष्ट्र शासनाला मी  करणार आहे जाता जाता अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो मित्रहो आपल्याला जस कुलदैवत आहे तस तात्यांना पण कुलदैवत आहे यांवर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खर आहे तात्यांच कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा White house जरी तुम्हाला बाहेरून पांढर दिसत असेल तरी आतून सर्व पिवळ आहे तात्या खंडोबाच दर्शन घेतल्याशिवाय कामाला सुरवात करत नाहीत
मी जो हा प्रवास माहीती सांगितली हे सर्व जर तुम्हाला खोट वाटत असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता वरील सर्व माहितीचे पुरावे माझ्याजवळ आहेत white house शी माझा जो नियमित पत्र व्यवहार चालू आहे त्यातुनच ही सर्व माहीती उजेडात आली माहितीचा अधिकार वापरून ही माहीती मी मिळवली आहे त्यामुळे कृपया ही माहीती खोटी आहे चुकीची आहे असा समज करून घेऊ नये मला खात्री आहे की वरील सर्व लेख तुम्ही गांभीर्याने वाचला असेल आणि त्यातून तुम्हाला बरच काही शिकायला मिळाल असणार पर्यावरणविरोधी असभ्य असंवेदनशील अशी  माध्यमांनी तात्यांची चुकीची प्रतिमा बनवली आहे त्यामुळे तात्यांची खरी प्रतिमा दाखवन्यासाठी हा सगळा अट्टहास आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक नेते होऊन गेले पण तात्यांसारखा प्रभावी नेता मी पाहीला नाही

राज इनामदार,पंढरपूर 

जगण्यात मौज आहे ..

घरी आलो मस्तपैकी  चहा आमच्या सौभाग्यवतीने  दिला , उद्या रविवार असल्याने काय काय करायचे याचे भरमसाठ प्लानिंग डोक्यात घुटमळत होते .....
..... पण तेवढ्यात नको असल्याला शब्द कानीं पडला "अहो दळण संपलय दळून आणा " .........मला आतापर्यंत गोड लागणारा चहा कडू कडू वाटू लागला ....हे दळण नेमकं शनिवारीच का संपले असेल बर या विषयी दळनाला  मनोसोक्त मनातल्या मनात तोंडसुख (शिव्या देत )घेत होतो ..........कारण मोठ्याने बोलण्याची आपली घरात काय ताकत नव्हती .......
  एकाद्याची वाट बघणं आणी दळण आणणे माझ्या आयुष्यातील सर्वात ना आवडती कामं ......मला वाटाय लागल आमच्या सासर्यानी मला आधी गिरणी आणी नंतर मुलगी दिली असती तर खूप बर झाल असत. नाहीतर आयुष्यभर पुरेल एवढ पिठ तर .....
  कसा बसा चहा पिऊन टाकला .....बोकडाला कापन्याआधी पाणी पाजतात ....मला चहा पाजला गेला असो ...मी म्हणल आपल्या ह्यांना विचारून बघू उद्या दळून आणल तर चालेल का ? ...मी विचारल भी धाडसान ......अबब गिरणीचा पट्टा घरीच चालु झाला .
      मनोसोक्ट कानाच्या पाकळ्या चेचुण घेतल्या ...कधी दळण उचलून गाडीवर बसलो मलाही कळल नाही ......गिरणी तीन km अंतरावर आहे ......मी गेलो की गर्दी फुल असणार् हे नेहमीचच सूत्र .असा विचार करत पोहचलो गिरणीजवळ .
          गिरणीजवळ गेलो तर ....तिथं चार पाँच लहान मूल बसलेली .त्यातला एक जण माझ्याकड बघून ... "किती शायनिंग करत आलंयर  ही " मी  त्याच्याकडे नुसतं बघितलं ......ये त्याला आत जावुदी आपण त्याची गाडी पंपचर करू ŠŠŠखी खी खी करत सगळे हसले .....मला तर दरदरा घामच फुटला .हे देवा हे दळण आणी वरून गाडी पम्पचर .मी पटदीशी दळण गिरणीत ठेवून लगेच विद्युतवेगाने बाहेर आलो .....परत पोर खी खी खी करत हसली .लका पांड्या लय घाबरवल बघ हेला .....खी की खी कि $, $ $ ........माझ्या ध्यानात परत  आल लका आपला पोपट केला ह्या चावाट बेन्यानी ......दुसरा ऐक जण येवून गाडीची चकर दी कि लंका ....."देतो पण माझी अट हाय" ह्या लहान भूतांनकड मी बघत "जो कोणी मला 16 चा पाडा म्हणून दावेल त्याला चक्कर देणार ..मी माझ्या वाळल्या काका फुघवत म्हणालो " .......मी मनातून जाम खुश म्हणलं माझी अट एकूण गाबडी पळून जातील ........पण ....ये ऊम्या मी आधी ...नाहिर हर्श्या मी मी .....ये गुँटया मी आधी म्हणनार ...तेवड्यात ओम्याने हाय तेवड्या ताकतीने शेबुड फरदीशी ओड्ला ये ये आय घाल्यानो ..व्हा बाजूला म्हणाला. दोघांना ढकलून माझ्यासमोर येवून परत एकदा फरदीशी सगळा माल वर वढून ओम्याने ऐका दमात 16 पाडा म्हणाला   अरे बापरे मी अवाक् ......इतभर ****पण पाडा 16 चा ...मी मनोमन त्याला दंडवत घातला राव ...परत सगळ्यानी पाडे म्हणाले ...आयला म्हणलं मघाशी इतक्या गोँद्ल घालून ऐकामेकाला शिव्या देणारी पोर इतकी हुशार ......मी म्हणलं "पाड कोण भी म्हणतय ......जो इंग्लीश वाचून दावेन तो हुशार त्याला चक्कर" .....आनर कागद दावू ह्याला वाचून ...कागद आणून पोरानी वाचुन फडशा पाडला .
      लका लका ही पोर लय पोहचलेंली आहेत रे बावा .माझ्या लक्ष्यात आल ... . मी शरणागत पतकरून सगळ्याना जवळ घेतलं       .....
   मूल मला म्हणाली ..तुम्ही काय करता  .."मी ...मुलांना शिकवीतो "" .....मी छातीचा पिंजरा फुगवून म्हणालो  .....त्यातल ऐक मला म्हणतंय मग तुमी शिक्षक म्हणल्यावर...... तुम्हांला वाचता येत का ? परत पोर बिनहया हसु लागली ....मी सुधा मग आता पोट धरून हसलो ..."अरे कुणाला गाने म्हणता येत का ...पोर होय ..चालू झाल  शांताबाई शांताबाई नाचून नाचून दाखवू लागली ...कोण तोंड वाकड करून नाचतेय ...तर कोण प्रभुदेवा सुधा लाजेल असे नाचतय आता मात्र गिरणी मालक व आजुबाजुची पण गोळा होवून हसु लागली ...
मधूनच नकरा चकरा दुसर् गाण म्हणुन नाचू लागली .
   दुसर् मला म्हणतंय "तुम्हांला मैतरिंन हाय का न्हाय एकादी "सर ....मी ..न्हाय लका मला ....आता तर गपचीप बसाव की त्यानं....ते गुंट्या म्हणतंय  पट्याला दोन आहेत सर .....नाद करायचा न्हाय ....आता मात्र खूप हसलो राव ...तेवड्यात ऐक जणांची आजी हाका मारीत आली ये ऊम्या मूडदया चल घरी ...इथं बसलाय मूडदा ..चल चल ....ये आजे शिव्या देवु नको .माझा मैतर भेटाय लय दिवसातून आलाय ...माझ्या शर्टला शेबुड पुसत ऊम्या आजीला म्हणतंय ...तुला घातल मातीत दाढ़ी मीश्याच मैतर हायत तुझ मूडदया ....सर तुम्ही बसा ह्या आजीला घरी सोडून येतो लय बडबडतीय ...ऊम्या गेला ..
तेवड्यात गिरणीच्या मालकाचा आवाज आला "सर दळण झाल दळून तुमचं .....दोन तास गेलेल कळलें नाहीत .....गाडीवरुन जाताना ऐकच विचार येत होता ...ह्यावेळी दळण लवकर सम्पल तर खुप बर होईल ...मला परत ह्या चिमुकल्यानशी पुन्हा भेटता येईल ....
काय आहे शेवटी जगण्यात मौज आहे .....

किरण पवार,औरंगाबाद

                मी मित्राकडे कोकणात काही दिवसांपूर्वी गेलो होतो त्यावेळी मला फार मजेदार गोष्टी अनुभवायला मिळाल्या. झाल असं की, मित्राच्या मामाचा साखरपुडा होता त्यानिमित्त कार्यक्रमाला जायचं होतं. मित्र पुर्ण सजून-धजून तयार. एवढचं काय तर मित्राचा भाऊदेखील अगदी टीप-टॉप. नंतर त्या घरातल्या इतर बऱ्याच मंडळींचा संवाद मित्राच्या भावासोबत सुरू झाला.
मित्राचा भाऊ:- ए पोरी पटवायला मदत कर बरं बाय मला...
छोटी मुलगी:- हा मी पोरगी पटवून देयाची तर मग तुझ्या झाकपाक चा काय उपयोग..?
मित्राचा भाऊ:- डीओ मारलान मी एवढा. एक तरी पटवतोच बघं तू....
आज्जी:- हा मेल्या कधीच म्हणतोय पोरगीस पटवान म्हणून... पटली आजवर एकाद? नाय नव्ह... माझ्या शेसूक( आज्जीचा नातू ) बघं त्यान कॉलेज्यान तीन-तीन पटवल्यान....
शेसू:- ए म्हातारे काहीही बोलते काय...? तू बरी आली होती कॉलेज्यान माझ्या पोरी पहायला...
मित्राचा भाऊ:- शेसू म्हातारीला तिसरा डोळा हायं ना... दिसत तिला....
छोटी मुलगी:- मी चालले पुढे.
(मी तर संवाद ऐकून पुरता चाटच पडलो. ती मुलगी कार्यक्रमाच्या ठिकाणी निघून जाते)
मित्राचा भाऊ:- ए शेसू कपडे ठीकयं ना माझे..?
शेसू:- हा. चल आता निघुया...
(सगळी मंडळी कार्यक्रमाच्या ठिकाणी चालल्या जाते. कार्यक्रामासाठी गावातल्या भरपुर मुलीही जमलेल्या असतात. साधारणत: संध्याकाळचे पावणे आठ वाजत आलेले असतात. बॅन्जोवाल्या मंडळीत एक मुलगा मुलीकडे सारखा पहात असतो; त्याच नाव असतं शैलेश. कार्यक्रमासाठी भरपूर मुलं जमलेली असतात. खास करून आठवी-नववी या वयातली आणि त्यांच्यातला संवाद नंतर सुरू होतो.)
एक मुलगा:- ए शैल्या क बघं लाईन मारून राह्यला आयटम वर....( बाकी मुल हसतात )
दुसरा मुलगा:- हां मग. बॅन्जोत यासाठीच आला ना तो...
तिसरा मुलगा:- ए ती खिडकीतून पाहून राहिली गण्या तुझ्याकडं
गण्या:-(लाजत) काहीही काय?
पहिला मुलगा:- अरे खरचं रे. तीच नाव प्राजक्ता ना....
तिसरा मुलगा:- हा तिच ती प्राजक्ता.... गण्यावर लाईन मारून राहिली ती...
गण्या:- अरे सोडा रे तो विषय...
पहिला मुलगा:- हा आता विषय सोड.... शाळेत तुला नाय तिला प्रपोज करायं लावला तर बोल.
(मी माझ्या सुन्न कानांनी बधिर झाल्याप्रमाणे त्या आठवी-नववीच्या मुलांचे हे असे संवाद ऐकत होतो; अधुन-मधून मला हसू आवरणं कठीण व्हायचं. नंतर थोड्या वेळाने मला खिडकीत उभ्या असलेल्या मुलींच संभाषण ऐकायला मिळालं.)
पहिली मुलगी:- प्राजू गण्यानं पाहिलास कायं...? केवरा नटून आलाय बघं.
प्राजक्ता:- हा. मगाचपासून त्याच्याकडंच पाहतेयं... पण लय लाजतोय बिचारा....
दुसरी मुलगी:- बायं मांजे ब... ही आत्तापासून त्याला बिच्चारा म्हणू राहिली...
पहिली मुलगी:- मला तर वाटते हीचा अन् गण्याचा साखरपुडाच करून टाकाव आता.
प्राजक्ता:- ए एवढ्या लवकर कशालान...? जरा रोमँन्स त करु दे मना.
दुसरी मुलगी:- (हसत हसत) रोमँन्सच कर हं....
प्राजक्ता:- हो ना करते... तुझं बघं आधी. त्या बाबूकडं लक्ष दे जरा. तुला सोडुण त्या नवीन आलेल्या शाळेतल्या पोरीवर लाईन मारतोय आजकाल.
दुसरी मुलगी:- थांब उद्या खबरच घेते त्याची.
(मला वाटतं होतं एकतर मी भानावर नाहीये किंवा सातवी-आठवीतल्या मुलामुलींकडून हे ऐकतोय ती सातवी-आठवीतली मुलं तरी नसावीत. बाकी मी पहिल्यांदाच एखाद्या साखरपुड्यात एवढा हसलो होतो. त्या मुलांचे ते विशिष्ट लयीतले उच्चर खरोखरचं अपरंपार होते.)

डॉ. विजयसिंह पाटील

अडाणी पेशंट...

हे लोक सहसा डोंगरी,दुर्गम भागातील असतात. ह्यांच बोलणं वागणं एकदम रोखठोक असतं. इंजेक्शन दिल्यावर घरी जाईतो पर्यंत बरं वाटायला हवं असतं, नव्हे ते तसा, प्रेमळ शब्दात डॉक्टर ना दम पण देतात. महिन्यातून एकदाच, तालुक्याच्या ठिकाणी हा वर्ग येतो. महिना किराणाबाजार, काचेरीची कामे, ह्या बरोबर दवाखाना पण करतात(भले आजारी नसले तरी शक्तीचे इंजेक्शन घेऊन जाणारच). सकाळी आल्या आल्या, पहिल्यांदा दवाखान्यात नंबर लावायचा व बाजार करायला जायचे हा नित्य नेम. बाजार होईपर्यंत, यांचा नंबर आलेला असतो. केस पेपर, सिस्टरकडून घेऊन, आपल्या चपला सिस्टरच्या टेबल खाली घुसडतात व हातातल्या बाजाराच्या पिशव्या , पाण्यानं निथळत असलेली छत्री घेऊनच, ही मंडळी आत घुसतात.(एका वयस्कर पेशंट ने पिशवीतून जिवंत पाय बांधलेली कोंबडी आत आणली होती. कोंबडीच्या कलकलाटा तच मला पेशंट ला तपासावे लागलं होतं )कोपऱ्यात सगळं सामान लावून, हे आपल्या कडे वळतात. व मोठया आस्थेने आमची विचारपूस सुरू करतात,'म्हातारा म्हातारी(आईवडील),ल्योक, बिऱ्हाड (पत्नी)कसे आहेत इत्यादी..रीतसर तपासून झाल्यावर हे फर्माईश सोडतात,' डाक्टर दोन सुया टोचा, शेतीची कामे आलीत लवकर परत येता येणार न्हाय' . सीजन प्रमाणे, हे आपल्या शेतातील, शेंगा, फणस, केळी, तांदूळ, काकड्या आठवणीनं आणतात. पैसे कमी पडले तर सरळ लिवून ठेवा असं सांगतात, पण व्यवहारात फार करेक्ट...ह्यांचा इंजेक्शन वर जेव्हढा विश्वास, तेव्हढाच गोळ्या औषधबदल दुस्कार... चुकूनही ह्यांची चप्पल वा छत्री दुसऱ्या कुणी नेली, तर भर दिवसा दवाखान्यात शिमगा...बऱ्याच ग्रामीण शिव्या, अशा प्रसंगातूनच मला माहित झाल्या.
गमतीदार प्रसंग ही बरेच होतात.
माझ्या एका डॉ मित्राकडे एक, नायटा असलेला पेशंट आला, डॉ नी त्याला मालमाची चिठी लिहून दिली व त्याला हे कमरेच्या नायट्या ला लावायला सांगितली. आठवड्याने तो परत ,व डाक्टर कायबी गुण आला नाय. डॉ नी त्याला मलम लावला का हे विचारल्यावर त्यानेच, तुम्ही कुठं मलम दिलं होतं, फक्त एक कागुद दिला होता, ह्यो काय तो, असे म्हणून त्याने आपली कंबर दाखवली. ह्यांन औषधाचा कागदाच् कमरेला लावला होता, डॉ ची हसून हसून पुरेवाट झाली.

मवाळ पेशंट....

ही जमात फारच आज्ञाधारक, नम्र असते. अगदी थोडक्यात आपल्या तक्रारी सांगतात, देईल ती औषधे घेतात, सांगितल्या दिवशी परत तपासणीस येतात. गुण जरी आला नाही, तरी तो आपला स्वतः चा दोष आहे असं ही मंडळी मानतात. विनंती करून जादा ची औषधे मागून घेतात.

 ह्यांना राग तो कधीच येत नाही. उलट डॉक्टरांना आपला राग येऊ नये अशी त्यांना कायम काळजी लागलेली असते. ते चुकूनसुद्धा डॉक्टरांवर टीका करत नाहीत, तिरकस बोलत नाहीत.
पथ्ये सांगायची विसरली, तरी हटकून विचारून घेतात. ह्यांना पेशंट मधील देवमाणूस म्हणता येईल.

टर्येबाज/ कडक पेशंट

हे रागीट चेहऱ्याचे, मोठ्या आवाजाचे, पेशंट. शक्यतो हे आजारी पडत नसावेत, कारण ते मुलाला, मुलीला आईवडिलांना ,वा बायकोला दवाखान्यात घेऊन येतात. मी दवाखान्यात आल्यावर ह्यांचा पहिला डायलॉग' लै उशीर झाला डाक्टर, सकाळपासून बसलूया' (वास्तविक मी वेळेच्या थोडा अगोदरच आलेला असतो). पण हा डायलॉग दरवेळी. आत आल्यावर, जो पेशंट आला असेल त्याला उद्देशून,'सगळं सांग, घडा घडा बोल'. तपासून झाल्यावर ह्यांच्या पेशंटबाबत तक्रारी सांगायला सुरुवात होते. गोळ्या खात नाही, डोस पुरा करत नाही, घरात ह्याच्या , खंडीभर गोळ्या पडल्यात, पेपश्या चिंचा खायला सांगा त्याला, ई'. पेशंट बायको असेल तर मग ह्यांचा आवाज फटाके फुटल्यासारखे होतात' हिच्या अंगी कधी लागायचं, मिश्री बंद करा म्हणावं ( हे ह्यांनी अर्धा तास तंबाखू गालात धरल्यावर , जसा आवाज निघतो त्या आवाजात), ती माऊली दवाखान्यात आल्यापासून बाहेर पडत स्तो पर्यंत मौनात असती.
औषधं घेताना पेशंट ला दम , खाणार हाइस का, घिवू का, इत्यादि...
शेवटी जाताना आम्हाला दम, गुण आला पायजे डाक्टर..
ही मंडळी बोलतात जास्त, पण कधी शंका उपस्थित करत नाहीत, उधारी ठेवत नाहीत, आपला आजार अंगावर काढतील, पण इतरांच्या बाबतीत आतून फार हळवे...

एक उदाहरण,,,, अशा एका श्रीमंत जमीनदारची एक गोष्ट,,,
फरक एव्हडा च की दोघेही(नवराबायको) ह्या प्रकारातले,,, (हा दुर्मिळताला दुर्मिळ योग)...
लग्न झालेली मुलं , नोकरीसाठी बायकामुलासह बाहेरगावी, मुली ,परदेशी दिलेल्या,,
(एव्हडी बागायती शेती, ती सांभाळण्यासाठी ह्यांनी, एक कांनाडी जोडपं ठेवलेले. .)
ही जोडी दवाखान्यात आल्यावर खरी मजा. शक्यतो आज्जी पेशंट.
आजोबा, कडक सदरा, घडीच धोतर, फेटा, कोल्हापुरी चपला, ह्या वेशात तर आजी, नाकात तीन चार इंचाची नथ, कासोट्याची इस्त्रीचे लुगड , डोक्यावर कोनात पदर, कमरपट्टा, रुपयाच्या नाण्याएव्हड ठसठशीत कुंकू, गळ्यात किमान अर्धा किलो सोन, ह्या वेशात.
तपासताना मी काय होतंय असं विचारलं की, फटाका फुटल्यासारखा आवाज खुर्चीतून(आजोबांचा) " पन्नास वेळा मिश्री घासा म्हणावं", की लगेच दुसरा फटाका टेबलवरून (आज्जीचा), "माझी मिश्री दिसती, ह्यांची पान तंबाकू कोण बघणार, दिवसाला मापटभर तंबाकू व धा रुपये ची पानं पुरतात का हे इचारा" खालून परत"धा धा कप च्या ढोसा म्हणावं", वरून " त्यो च्या तुमाला व तुमच्या जोडीदाराना लागतो" म्या अर्धा कप पेला तर लगेच डोळ्यावर येतंय". मी नंदीबैलासारखा इकडून तिकडे बघत स्तब्ध. फटाके फुटायच काही थांबत नाही. खालून 'जरा जेवायला सांगा डाक्टर', क्षणात वरून 'डाक्टर ह्यासनी रोज वशा ट (मांसाहार)लागतं, मला काय ते रोज आवडत नाही, मग ग चटणी भाकरी खातो ( खाते),सांगा की त्यासनी ह्या वयात जास्त वशाट न ग म्हणून' लगेच खालून विषय बदलायचा आवाज ' पहाटपासून हिची खुडबुड चालू असते, आपुन भी शांत झोपायचं न्हाई व दुसऱ्या ला पन', वरून ' आणा की मग तुमच्या त्या सटवीला कामाला' तसं खालचं आपटबार बंद पडतात. (हिथे माझी भूमिका सुरु होते)पडेल आवाजात' बरबर डाक्टर दोन इंजेक्शन हाना, गोळ्या , टॉनिक द्या'..आजोबांची पार हवा गेली असते, पण आज्जीचे तोंडातल्या तोंडात लवंगी तोटे फुटतच असतात...
मी मात्र शांत योग्या प्रमाणे स्थिर उभा असतो (तोंडावर हात ठेवून आलेलं हसू दाबायचा प्रयत्न करत)...
                                    क्रमशः

नवनाथ कुसुम राजाभाऊ जाधव,परभणी

          पिंट्या संध्याकाळच्या पाचच्या बसमधून  उतरला अन् लगबगीने घराच्या दिशेने चालायला लागला. तेवढ्यात "काय पिंट्या, कवा आलास?" पारावर बसलेल्या रामकाकांनी हाक दिली.
     "हे काय, आत्ताच पाचच्या बसने..."
     "अब्यास बिब्यास बरा हाय ना?"
     "हो, काका"
     " हं, करित जा बाबा, तुझ्या बापाची लय तळमळ हाय रं, पोरगं शिकाव मनून!"
     "हो, काका, येतो मग..." पिंट्या निरोप घेऊन चालता झाला.
      रामूकाका म्हणजे सगळ्यांची विचारपूस करणारा, कुणाच्याही सुखदु:खात निरपेक्षपणे सामील होणार माणूस!
       "आई$$$" म्हणत पाठीवरची बॅग काढून ठेवत पिंट्यानं आईला मिठ्ठीच मारली. "आला गं माय मजा वाग" आईनंही तेचा मुका घेतला.
    "हातपाय धुऊन घे, मी चहा करते, दमला असशील"
    "मला भूक लागल्याय, जेवायच वाढ की!"
    "बरं, गरम गरम पिठलं भाकरी करते तवर चहा तर पी"
पिंट्या हातपाय धुऊन येतो, आईच्या हातच्या चहाचे फुरके ओढत... "दुपारचं काही असलं तर वाढ की!"
    "दुपारी वड्याची भाजी केलती, शिल्लक हाय, पण मज्या वागाला गरम करुन वाढते की, शिळं नको माय!"
     "अगं, वड्याची भाजी तर मला लयी आवडत्याय, किती दिवस झाले खाऊन? तू भाकरी टाक गरम भाकरीसंग लई भारी लागत्याय!"
       पिंट्या आईच्या हातचं जेवण भरपेट जेवतो.
    " अगं, बाबा कुठं गेलेत?"
    "सकलापूरला.."
   "कसं काय?"
    "तैचा डोळा दुकालाय की ..."
    "अगं, डोळ्यासाठी तर जालन्याला ट्रिटमेंट सुरु आहे की! मागच्याच आठवड्यात तर जाऊन आलेत! बरं, सकलापूरला काय जालन्यापेक्षा भारी डॅाक्टर थोडीच असणार आहेत!"
  "आरं, डॅाक्टर नाहीं रं, महाराज हाईत "
  "का$य$$ डोळ्याचा अन् महाराजाचा काय संबंध?"
   "आरं, तिथं गेलं की काईबी कमी व्हतयं मनं, आपल्या गावातून टेम्पू भरुनच गेलाय, दर महिन्याला चालेत लोकं"
    "बरं, ते महाराज कसा इलाज करतेत?"
    "भाजलेला रवा अन् साखर देतेत खाला, तैच्या पोथीचं पारायण कराय सांगतेत"
    " म्हणजे सगळ्या रोगाला एकच उपाय मन की, आई तुला तुकाराम महाराजांचे *'ऐसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधु'*  *'भगवे तरी श्वान सहज वेष त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ'* हे अभंग माहित आहेत ना? रोज गाथा वाचतेस की, मग असल्यांच्या मागं का लागायचं?"
    "मला पटत नाहीं रं, तसलं, पण तैचा विस्वास बसलाय तर जाऊ दे"
    " बरं, कधी येणार आहेत?"
    "परवा गेलेत, उद्या येतो मनलेत"
   "एवढे दिवस?"
    " सवच पंढरपुर, शिंगणापुर करुन यालेत"
    "उगच बिनकामी पैसे खर्चीत बसायची गरज हाय का?"
    "कसं बोलतूस पिंट्या? देवाला जाणं उगंच असतय व्हय? तू किल्ले बिल्ले बगायला जातूस तवा आम्मी तुला असंच मनताव का?"
    "अगं, किल्ले आपली आस्मिता आहे, त्या किल्ल्यांवर इतिहास घडलेला आहे, ते पाहिल्यावर कसं रोमांच उठतात"
   "मंग पांडुरंग बी आमचा मायबाप हाय, मायबापाला भेटलावर किती आनंद व्हतय, कसं सांगाव?"
    "अगं, मग एकदा मायबापाला भेटल्यावर असल्या लफंग्यांकडं जायची काय गरज? तुकाराम महाराज म्हणलेत की *'विठ्ठल आमुचा प्रचंड, आणिक देवांचे न पाहू तोंड'* मग मला सांग असल्या भामट्यांकडं जायची काय गरज आहे?"
    " तुला पटत नसलं तर नको जाऊ, पण तसं येडंवाकडं बोलू नाहीं, आपल्याला काय करायचय?"
     "बरं जाऊ दे झोप आता लय उशीर झालाय!"
दोघेही झोपतात. दुसय्रा दिवशी पिंट्याचे बाबा येतात, आंघोळ जेवण करुन प्रसाद आणलेला देतात.
    "बाबा, मला फक्त पंढरपुरचा द्या, त्या महाराजाबाराजाचा नका देऊ"
    "का हो$?"
    "मला तसल्या महाराजायचा विश्वास नाहीं"
     " आरं, ते तसे नाहीत, पिंट्या! सगळ्या लोकायला गुण यालाय तैचा!"
    "अहो बाबा, सगळे लोकं आधी दवाखान्यात जातेत, मग असल्या महाराजायकड जातेत तवर त्या गोळ्या औषधांचा गुण येतंय, अन् मग लोकं म्हणतेत तेनेच गुण आला, आता तुमचंच घ्या की, तुमची जालन्याची ट्रिटमेंट सुरु आहे, अन् तुम्ही तिकडं पण चाललात, उद्या बरं वाटलं की जालन्यामूळं नाहीं तर सकलापूरमूळं बरं वाटालय म्हणताव"
       "आरं पिंट्या, ते तसे दुसय्रासरके नाहीत!"
      "तवा आसाहारामच्या वेळी पण असंच म्हटला व्हताव, ते तसे नाहीत..."
     " आरं हैयचा खरंच गुण यालाय, त्या वरलाकडल्या भरत्याला लेकरु व्हयना झालतं तेनं त्या महाराजाचा प्रसाद खाला तर तेची बायकू पोटूशी हाय"
    "प्रसाद त्याने खाल्ला अन् गरोदर त्याची बायको राहिली? तुमच्या महाराजां गणितच वेगळं आहे, बुवा!"
      "रताळ्या, मंग काय तेच पोटुशी ह्राईन का?"
       "मग प्रसाद त्याच्या बायकोला द्यायचा ना? त्याला कशाला दिला?"
       " कशाला म्हंजी? तेचाबी दोस असनच की!"
      "बरं, बाबा तुकाराम महाराज चारशे वर्षांपूर्वी म्हटले होते, 'नवसे कन्या पुत्र होती, मग का करणे लागे पती?' हे का ध्यानात घेत नाहीं तुम्ही?"
        "तुला तेवढा एकच अभंग येतंय"
       "बाबा, काहीही म्हणा आपल्याला असल्या भामट्यांचा विश्वासच नाहीं"
        "पिंट्या, तू जे बोलालास ही सगळी तुजी *अंधश्रध्दा* हाय बघ!"

सौ. प्राची कर्वे, देहूरोड (पुणे)

‌    मी रोजच 6 .30 वा. लोकल ने घरी जाते. लोकल म्हटले की गमती जमती होतातच. 6.30 चुकली  की 7.30 पर्यंत बसा स्टेशनवर गमती जमती पाहत कधी दू: खद घटनाही घडतात असो. एकदा अशीच चुकली ना 6.30. माझ्यासारखीच एका काकूंची ही चुकली. एका बाकावर बसलो दोघी ओळख ना पाळख पण काकू नी केले सुरू जिण्यातच होते तर गेली ना गाडी पाळले नाही बाई , पडले बिडले तर नसती फजिती व्हायची त्यापेक्षा गेलेली चालेल गाडी....
‌              नंतर एक भेळ विकणारी मावशीबाई आली. तीने तिची टोपली छान सजवली होती. चुरमुरे, दोन प्रकारचे फरसाण, बारीक शेव , चिरलेला कांदा , कोथांबिर. कैरी फोडी, चिंच गुळाचे पाणी, मिरचीचा ठेचा असे सगळे छान ठेवले होते. एक छोटे पातेले आणि चमचा कोणी भेळ मागितली की सर्व पदार्थ पटपट एकत्र करून बरोब्बर त्याच प्रमाणात टाकून देत होती. थोड्या वेळानी ती भेळ विकणारी गेली टोपली अामच्यपाशी ठेऊन हात पाय धुवायला गेली. लोकल मध्ये वस्तू विकणारे असेच असतात रोजच्या लोकांच्या भरवशावर टोपली ठेऊन जातात, मग त्यांच्या वस्तूंची जबाबदारी आपली . त्याकडे लक्ष द्यायचे हा अलिखित नियम.
          लगेचच दोन मुले आली आणि भेळ बनवली आम्ही त्या भेळ विकणाऱ्या मावशींना शोधू लागलो, दिसेनात तशा अस्वस्थ झालो, कारण असा प्रसंग कधीच नव्हता आला कोणी काही ठेऊन गेले की आम्ही वस्तू बघणाऱ्या सांगत असू की येतील पण असे न सांगता न विचारता कोणी घेत नसे. आम्ही शोधे पर्यंत मुले भेळ खाऊ लागली. इतक्यात भेळ विकणाऱ्या मावशी आल्या आमचा जीव भांड्यात पडला . आम्ही ती मुले दाखवली आणि भेळ चोरी सांगितली. सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दाखवली. त्या मावशींनी बोलायला सुरावात केली,  "आयते खायला पाहिजे काय काम नको करायला परत भेळ खायला आला तर हात मोडीन" आम्ही म्हणालो  मावशी अशी बडबड नका करू त्या मुलांना पैसे मागा. आम्ही ही बोलतो त्यांना त्यावर त्या बाईने जे उत्तर दिले ते खूप अनपेक्षित होते ती म्हणाली, "अहो! माझीच मुले आहेत, घरी पैसे देत नाहीत म्हणून  मला काम करावे लागते, कमवत नाहीत आयते खायला पाहिजे........".हे आठवलं तरी ती बाई डोळ्यासमोर येते आणि हसू आवरत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************