अफवा...एक भयानक सामाजिक रोग

अफवा...एक भयानक सामाजिक रोग

शिरीष उमरे,नवी मुंबई

काही वर्षापुर्वी धार्मिक अफवा चा बोलाबाला असायचा. त्या अफवांना कधीकधी राजाश्रय पण असायचा. अफवामधुन धार्मिक दंगलीचा पण तसा फार जुना इतिहास आहे.
बाकी एखाद्या व्यक्तीबद्दल कुजबुज ही हळुहळु आग पकडत वणव्यासारखी फैलत लोकमत होतांना पण लोकांनी बघितले आहे.

जसेजसे दळणवळणाचे साधन वाढत गेले... प्रींट मिडीया अस्तित्वात आली... ह्या अफवांचा विस्तार होत गेला. तरीही जास्तीत जास्त निरुपदवी ह्या प्रकारात च मोडनार्या अफवा असायच्या ...तलावावरील तरंगासारखे... तात्पुरते !

त्यानंतर आलेला माहीतीचा महामार्ग टीव्ही, कॉम्प्युटर, फोन, मोबाईल, इंटरनेट, वायफाय द्वारे घराघरात पोहचला. हा महापुर प्रत्येकाला आपल्यासोबत वहावत घेऊन गेला. सोबत समाजातील नितीमत्ता पण घेऊन गेला.

ह्यानंतर सुरु झाला सैतानाचा खेळ... अाता अफवा बनवल्या जातात, वेगाने फैलवल्या जातात आणि स्वार्थ साधुन अफवेचे अस्तीत्व पण साळसुद पणे मिटवल्या जाते.
ह्यात लेखक विकल्या गेलेत. ध चा मा करणार्या शब्दांच्या जादुगारांची बाजारात कीमंत वाढली. तंत्रज्ञानाच्या वापरातुन दृकश्राव्य बदल करुन खोट्याला खरेपणाचा बेफालुम मुलामा देणार्या इंजिनियरांचा सुळसुळाट झाला. मानसशास्त्रज्ञान्यांंनी त्यांच्या ज्ञानाचा गैरवापर करण्यात गैर मानणे सोडले.

मग सुरु झाला राजकारण्यांचा डाव !! सत्ताप्राप्तीसाठी अफवांचे पीक आले.
त्यात निष्पाप बालिकांवर सामुहीक बलात्कार, धार्मिक स्थळांवर आक्रमणे, चिथावणारे वक्ते, गरीबांवर व दुर्बळांवर अत्याचार, मारहाण, खुन... संभ्रमीत करणारे ऑडीओ, विडीओ, लेख ह्या गोंधळाचा बाजारात अफवा पेरुन स्वत:चा गैरफायदा करुन घेणारे हे नराधम देेशाला अधोगतीला नेत आहेत.

आता वेळ आली आहे की डोळ्यांनी वाचलेली व बघितलेली, कानाने ऐकलेली व हृदयाने साद दिलेल्या प्रत्येक बातमी वा माहीती कडे ती अफवा असेल अश्या संशयीत नजरेने बघण्याची !! बातमी वा पोष्टवर ताबडतोब रिअॅक्ट न होता दोन मिनीटे ... हो फक्त दोन मिनीटे घड्याळीकडे बघुन शांत रहा. मग विचार करा दुसर्या तिसर्या बाजुंचा. सत्यता पडताळुन बघा. खोटी असेल तर फारवर्ड करण्याचा मोह आवरा. कोणाचा जीव वाचु शकतो ! कोणाचे कुटुंब उध्वस्त होण्यापासुन वाचु शकते. खुद्द तुम्ही कुठल्या गुन्ह्यात सामिल होण्यापासुन वाचु शकता.
प्रतिष्ठीत पत्रकारांच्या ? प्रश्नार्थक चिन्हांवर व सुत्राकडुन कळालेल्या माहीतीवर पण विश्वास ठेऊ नका. जागृत व जबाबादार नागरिक बना

अनिल गोडबोले,सोलापूर

एक बातमी जी लोकांमध्ये दहशत निर्माण करत असते आणि शक्यतो ती खोटी असते... त्याला अफवा म्हणतात.

अफवा पसरवून काय मिळत?
लोकांना माझ्याकडे खूप माहिती आहे हे सांगता येत.
सगळ्यात आधी मला माहित होतं.. ही फुशारकी मारता येते.
लोकांकडून शाबासकी किंवा अभिमान मिळतो.
आणि पूर्वीच्या काळी मौखिक स्वरूपात अफवा असायच्या आणि मग त्या मीडिया मध्ये यायच्या.. सणसणीत खबर होऊन..उदा. "गणपती दूध पितो.."

आता उलट होत पहिल्यांदा सोशल मीडियावर व्हायरल होते अफवा आणि मग लोक विश्वास ठेवत पुढे पुढे फॉरवर्ड करत राहतात..
मंगळवरून येणारी किरणे, हरवलेले डोकमेन्ट, हरवलेली मुलं. टेम्भुर्णी हायवेवर झालेला अपघात, मुलं चोरणारी टोळी, चीन ने केलेली घुसखोरी, आर्मीचे पराक्रम, हे सम्पूर्णपणे खोटे मेसेज..
काहीवेळा अर्धसत्य किंवा सत्य तोडून मोडून सत्य सांगितलं जातं.. जसे.. अपघाताचे फोटो, एखाद्याला आलेला अनुभव, घडलेल्या घटनेला खूप इमोशनल पद्धतीने सांगणे, कुठेतरी रेकॉर्ड केलेला फोन कॉल, धार्मिक गोष्टी इतर गोष्टी मध्ये घुसवून केलेली पोस्ट..

*परिणाम*
अतिशय भयानक परिणाम.. लोकांना मानसिक रित्या घाबरवणे, देवाचा कोप होईल म्हणून अवैज्ञानिक गोष्टी सांगून भीती पसरवली जाते..
देशद्रोही किंवा देशभक्त चुकीच्या पद्धतीने सांगितलं जातं
सगळ्यात वाईट घटना.. म्हणजे अफवेमुळे परवा धुळ्यात 5 लोकांना मारून टाकले, एक नगरसेवक ला मारहाण झाली..

*काय करता येईल?*
मीडिया कसा वापरावा हे शिक्षण देणे गरजेचे आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे
मानवता वादी विचार करायला भाग पडणे
शहानिशा करणे आवश्यक असते
आणि अगदीच वाटलं तर पोलिसांची मदत घ्यावी या बद्दल शिक्षित करणे..

अफवा पसरवून कोणीही मोठा होत नाही... तेव्हा भान ठेवून कृती करा
आता तुमच्यावर कोणीतरी लक्ष ठेऊन आहे..

संगीता देशमुख,वसमत जि. हिंगोली

मागील आठवड्यात धुळ्याजवळील राईनपाडा गावात पाच भटक्या लोकांची मारून हत्या करण्यात आली. ही घटना कुठल्याही द्वेषापोटी,आकसापोटी,रागापोटी नव्हती तर फक्त एका अफवेतून घडलेली अतिशय अमानुष घटना होती. मागील महिन्यापासून संपूर्ण देशातच मुले धरून नेणारी टोळी सर्वत्र फिरत आहे,अशी अफवा समाजमाध्यमातून पसरविण्यात आली. तसा आपला देश हा दगडांचा,फुलांचा,शूरांचा...,वगैरे वगैरे जसा आहे तसा तो अफवांचाही आहे. आज समाजमाध्यमातून अफवा पसरविल्या जातात,त्या पूर्वी पत्राद्वारे, मौखिक पध्दतीनेही पसरविल्या जायच्या. एखाद्या देवतेच्या नावाने पोस्टकार्ड पाठवून अकरा,एकवीस जणाना वाटल्यास अमूक फायदा होईल तर दुर्लक्ष केल्यास जन्मभराचे नुकसान होईल. आणि यात असे फायदे झाल्याचे आणि नुकसान झाल्याचे उदाहरणेही नमूद केलेली असायची. कुठेही एखाद्या ठिकाणी मोठ्या पूलांचे,मोठा बंधारा,धरण असे बांधकाम सुरू असले की मुले पकडून नेणारी टोळी फिरतेय असा अफवा असायच्या. आता आतापर्यंत किडन्या विकण्यासाठी मुले पकडून नेतात असाही अफवा असत. त्याकाळच्या अफवात आणि आताच्या अफवात एक महत्वाचा फरक आहे तो म्हणजे अशा कितीही अफवा उठल्या तरी काळजी म्हणून आईवडील आपल्या लेकरावर लक्ष द्यायचे,एकटेपणाने बाहेर पडू द्यायचे नाही. किंबहुना आपली जबाबदारी म्हणून ते जपायचे. पण आज लोकांची संवेदनशीलता,माणुसकी हरवत चालली आहे,याचे उदाहरण म्हणजे ही राईनपाड्याची घटना होय. राईनपाड्याला त्या पाच लोकांचा मृत्यू झाला म्हणून त्या घटनेची नोंद सर्वच स्तरावर घेतल्या गेली. परंतु मागील महिन्यापासून अशा संशयित परंतु निरपराध लोकांना बेदम मारहाण करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडलेले आहेत. शाळेच्या प्रवेशासाठी दारावर आलेल्या शिक्षकांनाही काही ठिकाणी उलटतपासणी झाली तर काही ठिकाणी मारहाण झाली. दारावर आलेल्या कंपनीचे सेल्समन आणि असे भटके लोक यांनाही बेदम मारहाणीचे प्रकार अनेक ठिकाणी झालेले आहेत.
       "झुंडीला विचार नसतात" असं म्हटल्या जाते आणि तेच वारंवार सिध्द होते. एकाने एखादी बाब केली की,ती त्याने का केली असेल किंवा आपण ऐकलेल्या बाबीत काय तथ्य असू शकते,एवढी विचारशक्ती कोणाकडेच नाही. आजकाल सोशल मिडियावर येणाऱ्या अफवाना एवढे पेव फुटले आहे की,विश्वास तरी कशावर ठेवावा हा मोठा प्रश्न उभा आहे. कोणाची कागदपत्रे हरवली,कोणाचे बाळ हरवले,कोणी आजारी आहे,त्याला रक्ताची,पैशाची गरज आहे,व्हाट्सॅपवर निळा डॉट आला तर बॅटरी फूल चार्ज,बॅलंस टाकून मिळेल,अशा अनेक निरर्थक अफवा आजकाल कुत्र्याच्या छत्रीसारख्या कुठेही उगवत आहेत. पूर्वीच्या काळी पोस्टाने येणाऱ्या अफवा आज सोशल मिडियावरही तथाकथित स्वतःला सुशिक्षित म्हणवणाऱ्याकडून अशाच अविचाराने देवाच्या नावाचा मेसेज एवढ्या जणाना पाठवल्यास फायदा तर न पाठवल्यास नुकसान अशा आशयाच्या अफवा फिरवल्या जातात. मला तर वाटते,असे अविचाराने मेसेजेस पाठवणाऱ्या व्यक्ती मानसिक आजारीच असतील,मनाने दुबळे असतील. आणि खरच तसं होईल या भीतीपोटीच पुढे पाठवत असतील. कोणीतरी एखाद्याने सहज म्हणून केलेली कृती अनेकांच्या अविचाराने मात्र कितीजणांच्या जीवास घातक होऊ शकते,हे पाहता एखादा संसर्गजन्य आजार तरी एवढ्या झपाट्याने पसरणार नाही,तेवढ्या अधिक झपाट्याने ह्या अफवा पसरत आहेत आणि त्याहीपेक्षा त्या घातक ठरत आहेत. हा तंत्रज्ञानाचा दुरूपयोगच म्हणावा लागेल. आपली एखादी छोटीशी चूक अनेकांचे जीव घेण्यास कारणीभूत ठरेल,एवढा विवेक हा लोकांकडे उरलेला नाही. दोनच दिवासापूर्वी अशीच एक अफवा पसरली की, व्हाट्सॅपवर आता निगराणी ठेवण्यासाठी पोलीस येणार! विशेष म्हणजे भारतासारख्या प्रगतशील राष्ट्रात अशा अफवांचं पीक येते,याचे कोणाला नवलही वाटत नाही,किंवा खंतही वाटत नाही. मेंढरासारखं झुंडीत फक्त चालत रहाणं,एवढंच आजच्या तथाकथित सुशिक्षित लोकांनी ठरवलेले दिसते.
               कोणतीही बातमी मी सर्वात आधी समोर पाठवली म्हणजे मी फारमोठे समाजकार्य केल्याची भावना या लोकांमध्ये येत असावी. म्हणूनच रामदेवबाबाला ह्रदयविकाराचा झटका आला,अटलबिहारी वाजपेयी,अमिताभ बच्चन यांचे निधन, अशा बातम्यांच्या अफवा सुशिक्षितांकडून झपाट्याने सोशल मिडियावर पसरतात. आज व्हाट्सॅप वापरणारे लोकं साक्षर आहेत. त्यामुळे आपण काय पाठवत आहोत आणि हे खोटं असल्यास समाजावर काय परिणाम होऊ शकतो,याचा विचार नक्कीच करायला हवा. टीव्ही 9 वर "व्हायरल वास्तव" मराठीतून तर एबीपी न्यूजवर "व्हायरल सच" हिंदीतून अशा व्हायरल झालेल्या अफवांच्या मागचे वास्तव काय आहे,हे दाखवत असतात. तिथे या बाबींचा शहानिशा करून घ्यायला हवा. तंत्रज्ञानाचा उपयोग अफवातून मानवाचे बळी न घेता मानवाच्या हितासाठी व्हावा. या अफवांच्या सामाजिक रोगाचे निर्मूलन आपल्यासारख्या सूज्ञ लोकांकडूनच होईल.

पवन खरात, अंबाजोगाई

          भारत एक लोकशाही प्रधान देश आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती चे स्वातंत्र्य दिले आहे. अधिकाराचा व स्वातंत्र्याचा आपण खरचं योग्य वापर करतो आहेत का ?
        ऑफिसच्या कामानिमित्त आज बीड मध्ये गेलो होतो, सरकारी दवाखाण्यासमोर खूप मोठा बॅनर लावलेला होता,
"अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरू नका."

         व्हाट्सएप वर आपण येणारे मॅसेज सर्वांच्या अगोदर फॉरवड करतो जसे काही आपण रेस कोर्स मैदान उभे आहेत . नेहमी हे सिद्ध करण्याचा पर्यन्त करतो की मी किती अपडेट राहतो. समाजात तेढ निर्माण करणारे, जातीय दंगली घडवून आणणारे , निरपराध लोकांचे बळी घेणारे संदेश आणि अफवा नका पसरू.
            जर आपल्या चुकीमुळे कोणाला जीव गमवावा लागत असेल तर आपली काही जबादारी बनते का नाही ?
बालिश बुद्धिप्रमाणे जर आपण वागत असाल तर आपण फक्त शरीराने वाढलो आहेत बुद्धीने नाही हे लक्षात घ्या. वेळ आणखी गेली नाही योग्य तो निर्णय घ्या आणि आपल्या मुळे कोणाचे तरी आयुष्य, एक कुटुंब, एक घर ,एक गाव एवढेच नाही तर एखादे राष्ट्र सुध्दा उध्वस्त होऊ शकते, त्यामुळे अफवा वर विश्वास ठेवू नका आणि स्वतः अफवा पसरू नका. आपण ही आपल्या देशाचे काही देने लागतो त्यामुळे आपली काही जबाबदारी बनते, याचे भान ठेवा.

अफवांचे हे वादळ कुठे तरी थांबायला पाहिजे, सरकारने सुद्धा यावर काही प्रमाणात निर्बंध घातले पाहिजेत.ज्या प्रमाणे आज ही दुबई सरकारने सुरक्षिततेसाठी व्हाट्सएप व्हिडीओ कॉलवर आजही बंदी घातलेली आहे.
त्याच प्रमाणे आपल्या देशातसुद्धा काही कायदे असावेत.
       या अफवामुळे चोर सोडून संन्याशाला फाशी होत आहे.त्यामुळे कृपया अफवा पसरू नका व अफवांवर विश्वास ठेवू नका. तरच अफवा... एक भयानक सामाजिक रोग मुळासोबत नष्ट होण्यास मदत होईल.
*====================*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************