पहिला पाऊस आणि माझ्या आठवणी (भाग-२)

पहिला पाऊस आणि माझ्या आठवणी (भाग-२)                   
जयंत जाधव,लातूर.                                           जून महिना लागला कि मला पावसाचे चांगलेच वेध लागतात.प्रत्येकाच्या पावसाच्या काही आठवणी असतात तशाच माझ्याही आहेत.मी दरवर्षी न चुकता पहिल्या पावसात मनसोक्त ओला-चिंब होईपर्यंत भिजतो.या क्षणाला मी कधीही सोडत नाही.आणखी एक विशेष मला पावसात भिजत असताना आईस्क्रिम खायला खूपच आवडते.अशावेळी मला किती काम असू द्या.मी बाजूला ठेवतो.कारण आयुष्यात असले क्षण एकदा गेले कि परत कधी येतील सांगता येत नाही.     
माझ्या आयुष्यातील पावसाळ्यातील बरेचसे क्षण हे औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळ,खुलताबाद,म्हैसमाळ,दौलताबाद,अंजिठाच्या सान्निध्यात मी घालवलेला आहे.आमचा कॉलेज गृप नेहमी पावसाळ्यात सायकलवर औरंगाबाद पासून 30 किमी पर्यत वेरुळ,अंजिठा 85-100 किमी पर्यत सायकल वर पावसात भिजत निसर्गाचा आस्वाद घेत  पिकनिकला जात होतो.अशीच एक पावसाळ्यातील क्षण मला आठवतो. आम्ही सायकलींवर वेरुळकडे निघालो होतो तेव्हा एका जिपचा आमच्या समोर अपघात झाला.ट्रकने जोरात धडक दिली.ड्रायव्हर व त्याचा सोबती पळून गेले.त्यावेळी आमच्या गृपने तात्काळ दुसऱ्या खाजगी गाडीने जखमी 4-5 लोकांना घाटीमध्ये अॕडमिट केले.त्यातील एकाला रक्ताची गरज भासली. जो रक्तगट हवा होता तो माझा होता. मी लगेचच त्याला रक्तदान केले. तसेही हे काम मी माझ्या आयुष्याचे पॕशन-ध्येय बनविलेले आहे.हा माझ्या पावसाच्या आठवणींतील सुखद क्षण आहे.धन्यवाद.

अनिल गोडबोले,सोलापूर .
    पहिला पाऊस.... हा विषयच आठवणीत घेऊन जाणारा आहे. पहिला पाऊस .... कधीचा पहिला?..
         शाळेत जाताना आलेला पहिला पाऊस, पहिला रेनकोट .... डबक्यात दबकन उडी मारून चिखल अंगावर उडवताना आलेला पाऊस..
       हायस्कुल ला जाताना सायकल आणि रेनकोट... सांभाळून तोंडावर पाण्याचा शिडकावा करणारा पाऊस.. दहावी ला शाळा सुरू होताना... उशिरा पोहोचण्याचे कारण बनलेला पाऊस..
      11 वी(कॉलेज ला.. मग काय अजूनही लहानच समजता होय!) ला गावावरून एस टी ने जाताना खिडकीतून अंगावर येणारा पाऊस...
फिजिक्स च्या बार पेंडुलम च्या दुर्बिणीतून बघितलेला पाऊस..
    आई सोबत मार्केट मध्ये भाजी घेऊन बसताना गोणपाट भिजवणारा पाऊस..
    वेंगुर्ला बंदरावर येणारा झोत आणि भरपूर वारा असलेला पाऊस.... मित्रांसोबत चोरून सिगरेट ओढताना आलेला पाऊस..
    बारावी चा निकाल लागला आणि सोलापूरला यायला निघालो आणि  पाऊस सुरू होता..मनात, आईच्या डोळ्यात आणि बाबांच्या शब्दात.. एस टी मध्ये बसेपर्यंत कसा बसा थांबवलेला आणि नंतर वेंगुर्ला वरून कणकवली येईपर्यंत न थांबता डोळ्यातून वाहणारा पाऊस..
     दयानंद कॉलेज च्या bsc ला ऍडमिशन घेतल्यावर पहिल्या दिवशी पाऊसच होता.. 
       तिसऱ्या वर्षाचा रिझल्ट आणायला गेलो तेव्हा मनात हुरहूर लावणारा पाऊस..
    पहिल्यांदा कामगार वसाहती मध्ये मुलांना लसीकरण साठी घेऊन जाताना भिजवणारा पाऊस... 
    एड्स साठी माहिती देताना... पथनाट्य करताना आलेला पाऊस..
    Msw चा पहिल्या वर्षाची मेरिट लागली आणि पैसे भरताना मनात आणि बाहेर पाऊस होता..
   बालकामगार शाळेत शिकवताना आलेला पाऊस आणि लाईट नसताना मुलांसोबत दंगा करत एन्जॉय केलेला पाऊस
    ती मात्र पावसात भेटली नाही.. सोलापूर च्या उन्हाळ्यात भेटली तेव्हा पाऊस नव्हता ... जेव्हा पाऊस आला तेव्हा ती नव्हती ..
   पाऊस असून ती नाही म्हणून आलेला पाऊस.
   कॉलेज मधून ऑर्डर न मिळाल्याने पुणे सोलापूर चक्कर करताना पाऊस खूप होता.. मनात डोळ्यात आणि स्वप्नात सुद्धा!
     लग्न झाल्यावर तुळजापूर ला असताना आलेला पाऊस.. कोकणात बायको सोबत जाताना आलेला पाऊस..
    गाडीवर जाताना विचारांचा पाऊस.. कसं होणार आपलं आता... भविष्यात कस होईल असा विचार आणि पाऊस... बाहेर व आतमध्ये..
    यातला नेमका पहिला कधीचा ते ठरवावं लागेल..
आणि हो... आता टाईप करताना सुद्धा पाऊस आहे ...
मला पाऊस आवडतो कारण तो येतो तेव्हा भारी वाटत(हॉर्मोन्स चा खेळ सगळा... अस विज्ञान सांगत)
     तर नक्कीच आपल्याला आवडणारा पहिला पाऊस..नक्कीच एन्जॉय करा.

पल्लवी  वाघ ,बुलढाणा .
     पुण्यामधला पहिला दिवस अन् प्रत्येक वर्षीचा पहिला पाउस खुप आठवतो कारण त्याच अन् माझ जरा वेगळच नात आहे.. 
     उन्हाळी सुट्टी संपताच पुणेचा रस्ता अन् पहिल्याच दिवशी पावसाचे आगमन.. यातच तर खर रहस्य आहे.. 
कधी पप्पा असायचे तर कधी आठवणी 
पण एकटी माञ कधीच नव्हते 
    त्या पावसात भिजायला कोणीतरी सोबतच होते.. पण गेल्या 5 वर्षापासुन 1जुनची हजेरी यानी काही चुकवली नाही अन् पुण्यामध्ये 1जुनला मीही नाही असे कधी झालेच नाही. 
    भिजणे तर मी अजुनही सोडलेच नाही पण यावर्षी माञ एकटीच होती स्माईली तिला कोणी बास झाले आजारी पडशील असे कोणी म्हटले नाही याचा अर्थ असा नाही की तिला अजुन कोणीच भेटले नाही पण ती आहेच जरा अशी एकटी एकटी राहणारी वाळकं पान सुद्धा गळतांना तन्मय देउन पाहणारी 
पहिल्या पावसाच्या सर्वांना पावसाळी शुभेच्छा !!


पूजा पाटील,लातूर.
        उन्हाने तापलेले दिवस,जात असताना अचानक एका दिवशी मूसळधार पाऊस य़ेताे, आणी त्या भिजलेल्या ओल्या मातीचा सुगंध हळुवार पणे गच्चीवर घेऊन जाताे, आणी ताे पाऊस आपल्याला नाचावण्यासाठी भाग पाडताे.
           खरच म्हणतात ना पाऊस हे पहिल्या पे्मासारखं असतं,पे्माच्या सरीत चिबं भिजवणारा पाऊस,हवा हवा सा वाटणारा आपल्या चेह्रयावर हास्य फुलवणारा.
           ‎ पाऊस म्हणलं कि आठवणी असणारच काय भारी होते ते दिवस मिञ मैञीणी सोबत पाऊसात भिजणे, school bunk करुन चिखलामध्ये नाचणे आणी, त्यानंतर सरांच्या ओरडा खाणे.खरचं खुप छान होते ते दिवस!!
           ‎             मनसोक्तबरसणारा!
चिबं भिजवणारा,
पॆ्म व्यक्त करणारा!
तो पहिला पाऊस....
कवीचं शब्द फुलवणारा!
चहाचा घोट नवा वाटणारा,
धरतीस आसुसलेली!
‎तो पहिला पाऊस....



कोमल पवार,सांगोला.सोलापूर.
      दुष्काळी भाग म्हणून प्रसिध्द असलेल्या आमच्या भागात पाऊस पडण म्हणजे गंमतच ..तरी पण अनुभवलेला पाऊस चक्क गारांचा हाेता.
         मी ६ वी चे पेपर दिले होते अजून सुट्टी  संपली नव्हती १० -१५ दिवसांनी शाळा सुरू होणार म्हणून सगळे निवांत. दुपारची वेळ होती अंदाजे ३-३.३० वाजले असतील तरीपण सगळीकडे अंधार होता.अचानक वारा आला अन् ढग कडाडले कळत नकळत पावसाची चाहूल लागली.आईची पळापळ सुरू झाली.."अगं हे घरात घ्या ..ते भिजेल  पावसात"...मग आमची पण नुसती पळापळ
    नंतर कौलारू घरात बसून पावसाला न्याहळन्याची मज्जा अलगच नाही का..
   जोरदार पाऊस सुरू होता...अचानक घराच्या  पाठीमागून शुर्भ रंगाच्या गारा समोर आल्या
पहिल्यांदाच बघत असल्यानं कळालच नाही.
आईन सांगितल्याबरोबर मी अन् छोटी शामी त्या गारा वेचण्यासाठी धावलो.
           आज्जीनं सांगितलेल आठवत होत गारांच पाणी गुणकारी असत..मग एक बाटली आणून त्यात गारा टाकण्याचा निरागसपणा केला...पण गंमत अशी व्हायची गारा बाटलीपर्यत पोहचणयाआधी हातातच विरघळून जायच्या.. बाटली तिथेच ठेवून गारांचा मनसोक्त आनंद लुटला...आनंदाच्या भरात गारा वरून लागतायेत हे जाणवलच नाही..घरातून आवाज आला "बस् करा गं पोरीनों या घरात"..आईन गरामगरम पापड,भजी तळली होती.. तोपर्यत गारा बंद झाल्या पण पाऊस सुरू होता ..चिंब भिजलेल्या मनात गारांचा सुंदर देखावा रेखाटत मी पावसाकडे बघत होते ....
 नंतर कधी गारा पडल्याच नाहीत..पण  आजही गारांचा पाऊस म्हटल की तो देखावा जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो.. 
  असा हा मी पाहिलेला अन् कायम माझ्या आठवनींच्या शब्दांत असणारा..."पहिला पाऊस अन् त्याच्या गोड आठवनी..."
....धन्यवाद....

पी.प्रशांतकुमार,अहमदनगर.
    नगर दक्षिण आणि दुष्काळ.. नगर दक्षिण आणि पावसाची वाट यात नवीन काहीच नाही..
सगळ्यात शेवटी पाऊस आमच्याकडे येतो..शिल्लक काही ढगात असेल तर बरसतो..
...पहिला पाऊस आणि वाट पहाणे हे नेहमीच..त्यात पुण्यात आगमन..कोकणात जोरदार..विदर्भावर सुरुवात असले पेपरचे मथळे जास्त त्रास देतात..
    नव्वदच्या दशकांचा उत्तरार्ध.. जायकवाडी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाइनच जोरात काम सुरु पण अद्याप पूर्ण झालेलं नव्हतं.. घरातल्या नळाला मार्चमधे पाणी आणि एप्रिलच्या पूर्वार्धात चहा यायचा (गढूळ) तोही एप्रिल मध्यात बंद..
...त्यावर्षी जेव्हडी पहिल्या पावसाची प्रतीक्षा केली तेव्हडी आजपर्यंत नाही.. पूर्ण मे महिना सायकलला पुढे मागे 2-2 असे चार डबे आणि मागच्या कॅरेजवर हंडा..आम्ही शाळकरी मुलं पाणी आणायचे लांब लांबून.. दिवस 3-4 तास नंबर लागायचा नाही म्हणूम रात्री 3-4 वाजता तेही म्हसणवाट्यातल्या (स्मशानभूमी) बोअर वरून .. परिसरात फक्त त्यालाच पाणी..

       जून सुरु झाला पण पावसाचा पत्ताच नाही...
महादेव कोंडून झाला... बायका रात्री घरोघर देवाचं गाणं म्हणत फिरायच्या..थोडस आठवत.. 

पाणी नाही खावू नाही
बरस रे मेघराजा
जित्राबांना दाना नाही
बरस रे मेघराजा
ढग  दाटून यायचे पण कोसळायचे नाही
...पण एक दिवस फार गाजावाजा न करता जो जोरदार दुपारचाच पडायला लागला..
...अजून आठवत .. गल्लीत होळीसारखा माहौल झालेला...लहान थोर सगळेच पावसात भिजत होते..
...खराटा घेहून आईने गच्ची धुवायला पाठवलं..
आणि पन्हाळा खालचं ते स्वच्छ पाणी हांडे /टीप भरभरून साठवलं.. इतकं स्वच्छ पाणी नळाला कधी पाहिलं शेवटचं तेही आठवत नव्हतं..
....मजेत आईला वडील म्हणाले,'अगं,चमचे आणि वाट्या सोडल्या तर सगळं भरलय पाण्याने'..किती साठवू आणि किती नको असं झालेलं..
*कुंभ अत्तरांचे हे कुणी खुले केले*

*पहिल्या पावसाचे थेंब मातीने हे पिले*
..पहिला पाऊस अजूनही आवडतो
पण रोमँटिक पेक्षा याच आठवणी मनात येतात




नवनाथ जाधव,तांदुळवाडी,परभणी.
         मी शेतकय्राचा मुलगा असल्याने माझे शेतीशी घनिष्ठ नाते तयार झालेले! मला उन्हाळा असह्य वाटायचा तो गुरांना हिरवा चारा न मिळत नसल्याने! कधी एकदाचा पाऊस पडेल आणि हिरवा चारा सुरु होईल, याची उत्सुकता लागलेली असायची. 
         पहिला पाऊस सुरु झाला की मातीचा जो सुगंध यायचा तो अत्तरालाही फिके पाडायचा.  पाऊस सुरु झाला की बाहेर पडणे बंद व्हायचे, मग मागच्या वर्षीच्या जुन्या वह्या काढायच्या, त्यांची शिल्लक पाने फाडायची ती एकत्र करुन शिवायचे आणि जाडजुड रफ कामासाठी वापरायला वही तयार व्हायची, तसेच नविन वर्षासाठी पढच्या वर्गातील मुलांची वापरलेली जुनी पुस्तके अर्ध्या किंमतीत विकत घ्यायची, आपली जुनी पुस्तके मागच्या वर्गातल्यांना अर्ध्या किंमतीत विकायची. विकत घेतलेल्या पुस्तकांना कव्हर घालणे बाहेर पाऊस चालत असताना चालू असायचे, जुनी पत्र्याची पेटी (संदुक) सर्व साहित्य ठेवण्यासाठी असायची. अशाप्रकारे पहिल्या पावसाच्या सानिध्यात सर्व शाळापूर्वतयारी पूर्ण करताना मजा यायची.
         पहिला पाऊस सुरु झाला की पेरणीपूर्वतयारीची लगभग सुरु व्हायची, कापूस लावण्यासाठी दोरीला सिंदाडाच्या पानाच्या खुणा करणे त्याला चिमण्या असे म्हणत कारण त्या खुणेचा आकार चिमणीसारखा दिसायचा, तसे सुताराकडून तिफण भरुन घेण्याची सर्वांना घाई असायची, सकाळीच उठून सुताराच्या घरी जाऊन बसावं लागायचं, तिथं अनेकजण आलेले असायचे, मग गप्पा सुरु व्हायच्या काय पेरायचं, कोणतं पिक येऊ शकतं, आंतरपिके कोणती घ्यायची इ.  या काळात सुताराचं खुपच महत्व वाटायचं.
         'मढे झाकोनिया करिती पेरणी..... ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे.....' हा संत तुकारामांचा विचार जिवनात पूर्णपणे मुरलेला असल्याने पेरणी लवकर व्हावी यासाठी जीव तिळतिळ तुटायचा... पहिला पाऊस सुरु व्हायचा, घरात खते-बियाणे आणलेली नसायची, मग सुरु सावकारांची उंबरठे झिजवणं सुरु व्हायचे, सावकारांचे व्याजाचे दर ५₹ शेकडा प्रतिमाह म्हणजे वार्षिक ६०% एवढा प्रचंड असायचा पण इलाज नसायचा, असं असूनही त्यात एकप्रकारचा मिंधेपणा असायचा. सावकाराकडे मेळ नाहीं बसला तर मग डायरेक्ट गावातल्या खते व बियाणे विक्रेत्याकडे जाऊन उधारीसाठी मागणी करावी लागे, त्याचाही व्याजाचा दर वरिलप्रमाणेच असायचा, शिवाय तो दर चढवून लावायचा आणि बराच मालही मागच्या वर्षीचा असायचा, हे सगळं कळत असूनही गपगुमान बसावं लागे, कारण तो उधारी द्यायचा हीच मोठी मेहरबानी असायची.
         हे सगळं होईपर्यंत चार पाच दिवस जायचे, या दिवसांत सुरु व्हायच्या आकाडपाळ्या! म्हणजे पहिला पाऊस पडल्यानंतर तण उगवायचं ते घालवण्यासाठी पाळी मारली जायची. याचं हे जरी महत्व असलं तरीही दुधाचं ताकावर घालावावं लागायचं याची रुखरुख असायचीच, तिफण चालवण्याऐवजी पाळीवर भागवावं लागायचं!
         सगळी जाडाजोड झाल्यावर सकाळी सकाळी गाड़ी भरायची आठवाजेपर्यंत शेतात घेऊन जायचं आणि एकदाची तिफण सुरु व्हायची आणि कोण आनंद व्हायचा! 
 आनंदाचे डोही। आनंदतरंग.


श्रीनाथ कासे ,सोलापूर 
    वर्षातला पहिला पाऊस आणि मी या विषयावर किती लिहावं तेवढे कमीच आहे कारण पावसाच्या आठवणींचा ओलावा माझ्या कडे भरपूर आहे. 
    लहानपणी मी शेतातून शाळेकडे यायचो तेही पायी चालत, रस्ता अगदी कच्चा होता, जेव्हा पाऊस यायचा तेव्हा गुडघाभर चिखल असायचा तशातून ये जा करताना मला पावसाचा फार राग यायचा. मात्र पुढे जेव्हा मी पाचवीपासून 5 km सायकलीवर दुसऱ्या गावाला ये - जा करायचो तेव्हा या पावसामुळेच परगावी जाणारे विद्यार्थी या शीर्षकाखाली मला घरी जाण्याचा मौका मिळायचा. पावसामुळे आठवड्यात 2 दिवस संध्याकाळी असणारे P. T चे तास पण विज्ञान किंवा गणित शिकावे लागत असे पण यातूनहि परगावी जाणाऱ्यांना सुट्टी असायची तेंव्हा उठून बाहेर येताना जणू तुरुंगातून सुटका झाली या फीलिंगने बाहेर निघायचे. 
     पाचवी ते दहावी मी अगदी एखाद्या ' रायडर ' असल्यासारखा सायकलिवर घरी यायचो. या पावसात सायकलीवर भिजत घरी जायची मजाच वेगळी असायची. नदीला पूर येणे किंवा ओढ्यात पाणी वर यायचे तेव्हा आम्ही सायकली गळ्यात अडकवून ओढी पार केलेले पण आठवते. पायाखालची माती सरकायचे , पाण्याचा प्रवाह अगदी तीव्र असायचा.
   पावसाच्या अनेक आठवणी कॉलेजच्या आणि हॉस्टेलवरच्या आहेत. पहिल्या पावसात हॉस्टेलवर जी धम्माल अनुभवायला मिळाले ते जगात कुठेच अनुभवयास मिळत नाही. अनेक आठवणी पावसाशी आणि हॉस्टेलशी जुळलेल्या आहेत.....आणि त्या जन्मभर आठवतीलही ...
परत तसा पाऊस येणार नाही आणि ते दिवसही…



अश्विनी खलिपे,कडेगाव(सांगली)

         पावसाळा आला, सर आली किंवा नुसतं वातावरण जरी तसं झालं तरी मन वेदनांनी अगदी गच्च भरून जातं, कारणही तसंच काहीसं आहे...
तो पाऊस त्यावेळी अगदी रोमँटिक वाटणारा, पण आज मात्र जीवघेणा वाटतो कारण त्यातलं प्रेम आज कुठंतरी हरवलंय...
         लहानपणी खूप अनुभवले पाहिले पाऊस पण तारुण्यातला तो पाऊस काही निराळाच ठरला. अगदी मनात ठसे उमटवून गेला. पावसाळा सुरू होण्याच्या अधिकचा आणि उन्हाळा संपत आलेला तेंव्हाचा होता तो पहिला पाऊस... काळेकुट्ट ढग, अधून-मधून नुसती चमकणारी वीज, सोसाट्याच्या वारा व मी आणि सोबत प्रियसी(संजना), तिची मैत्रीण(प्रिया) व माझी जवळची एक मैत्रीण(कादंबरी)(जिचं माझ्यावर प्रेम होतं आणि हे प्रियसीला माहीत होतं). चातकाने वाट पाहावी अगदी तशीच वाट पाहत आम्ही गच्चीवर बसलेलो. माझा माझ्या प्रियसीसोबत अधून-मधून थोडासा सीन चालू होता व त्यावर कादंबरीचं बारकाईने लक्ष होतं आणि हे संजनासुद्धा ओळखून होती. पण पावसात भिजण्याचा मूड खराब नव्हता करायचा त्यामुळे कुणीच काही बोलत नव्हतं, पण डोळे मात्र खूप काही बोलत होते. यासगळ्यात पावसाची सर आली आणि सर्वांना चिंब चिंब केलं. पावसासोबत प्रियसी आणि मग त्यात रोमान्स नाही हे शक्यच नाही.
         अंगावर पडणाऱ्या थेंबाने ती शहारून जात होती आणि मी तिच्या स्पर्शाने. हा पहिलाच पण इतका विलक्षणीय अनुभव... आहाहा आजही शहारून जातं सारं अंग...पण या साऱ्यात वेदनांचा अनुभव घेतला तो कादंबरीने. आमच्यासाठी तो पाऊस खूप प्रेम बरसून गेला, पण कादंबरीवर मात्र वेदनांचा कहर बरसला. असा पाऊस पुन्हा आयुष्यात कधी अनुभवलाच नाही. त्यामुळे आता पावसाळ्याचा अर्थच वेदना होऊन बसलाय...
         *कुणासाठी रोमँटिक तर कुणासाठी वेदना बरसणारा, पण कसाही असला तरी मात्र सर्वांच्या मनात घर करून राहणारा असाच असतो हा पहिला पाऊस आणि त्याच्या त्या आठवणी...*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************