@70...लाल परीचा प्रवास लाल डब्याकडे!

@70...लाल परीचा प्रवास लाल डब्याकडे!

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

@70... लाल परीचा प्रवास लाल डब्याकडे!


Source: INTERNET
-संदीप थोरात,
अहमदनगर
  
            ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, सुख- दुःखाला धावणारी आणि आंदोलकांची पहिली टार्गेट असलेल्या, अशा तुमच्या आमच्या एसटीचा  1जूनला वाढदिवस आहे.

1 जून 1948 रोजी अहमदनगर - पुणे मार्गावर पहिली एसटी बस धावली. या सत्तर वर्षाच्या प्रवासात एसटीनं अनेक उन्हाळे , पावसाळे अनुभवले. सव्वा लाख कर्मचारी हा एसटीचा एक अविभाज्य भाग आहे. या सत्तर वर्षाच्या कालावधीत सरकार बदलले, तसे तसे एसटीचे रंग बदलत गेले.एसटीची रचनाही बदलत गेली.
एसटीचे आधुनिकीकरण करण्याबाबत दुमत नाही. मात्र यासोबतच त्यासाठी असलेल्या प्राथमिक सुविधांना बाधा निर्माण होणार नाही, याची दक्षता एसटी प्रशासनाने घ्यायला हवी. बस स्थानक परिसराजवळ खासगी बस वाहतुकीला बंदी असताना, काही बस स्थानकाच्या परिसरातून खासगी वाहतूकदार एसटीचे प्रवाशी वळवतात . यामागे असलेल्या रॅकेटवर आजतागायत कारवाई होत नसल्यानं, हे रॅकेट कोणाच्या आशीर्वादानं एवढी दादागिरी करतंय , हे सुज्ञाला सांगण्याची गरज नाही.
एसटीचे वर्कशॉप, तिथे स्पेअर पार्टसचा पुरेसा साठा आहे का ? इंजिन ऑईलची काय अवस्था आहे ? टायरची स्थिती काय ? रेडिएटरची परिस्थिती काय? हेडलाईटची स्थिती काय ? सगळ्यात महत्वाचे म्हणजे एसटीचे ब्रेक उत्तम काम करतात का? एसटीमधील आसनाची स्थिती काय? याचा आढावा वेळोवेळी घेतला जातो काय? यासर्व बाबींचं ऑडिट होतं का? हेदेखील एसटीचे आयुष्य वाढवण्यासाठी महत्वाचं मुद्द आहे. मात्र चालत आहे चालू द्या अशी सध्या स्थिती आहे.
ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना विविध सवलती दिल्या जातात, त्याचप्रमाणे आता एसटीदेखील ज्येष्ठ नागरिक झाल्याने एसटीला सरकारनं विविध सवलत द्यायला हवी. जसे की, प्रवासी कर, इंधन कर , टोल टॅक्स, यातून एसटीला सवलत दिल्यास एसटीला आणखी भरभराटीचे दिवस येतील.

Source: INTERNET
-प्रदीप इरकर,
वसई जि. पालघर

लाल परी ,लाल डब्बा ,एस टी बस 🚌अशा अनेक नावांनी  आपण जिला ओळखतो तिला नुकतीच 1 जुन 2018 ला 7⃣0⃣ वर्ष पूर्ण झाली.आपल्या महाराष्ट्रातील🚩 सर्वानाच ह्या लाल परीचे चांगले वाईट अनुभव असतीलच.
गावाला तर खूप लांब लांब बस थांबे असतात ,अशातच एखाद्या छोट्या थांब्यावर ती नाही थांबली की येणारे शब्द 🤬🤬...
पण ह्याच लाल परित चढलेल्या एखाद्या म्हातारीला चढताना व उतरताना मदत करणारे वाहक ही हिची शान वाढवतात.😎😎
स्पीड ब्रेकरवर थोडेही स्पीड कमी न करता जाणारी जाणारी गाडी बहुतांश वेळा लाल डबाच असते.आम्ही जेव्हा कॉलेज ला होतो ठेवा घर ते कॉलेज आशा 7 किमी च्या अंतरात जवळपास 8 ते 10 स्पीड ब्रेकर असतील.त्यावेळी आमच्या सारखी टवाळ मुले स्पीड ब्रेकर वरून बस आपटली की 'ऊईइईई.....उईईईई.....📢' असे जे मुद्दाम आवाज काढत असू तेच कदाचित ड्राइवर ला प्रोत्साहन देत असावेत😅.
ह्या लाल परिबाबतीत आमच्या तर अनेक आठवणी आहेत.
जेव्हा आमच्या वसईत महानगरपालिकेची स्थापना झाली व एस टी ने त्या मार्गांवर  सेवा देण्यास नकार दिला तेव्हा सर्व प्रवाशांनी केलेल्या आंदोलनावरून च लाल डब्यावरील प्रेम दिसून येते.आताही महानगरपालिकेच्या बसने प्रवास करत असताना अनेक प्रवाशांच्या तोंडून शब्द येतात 'आपली एस टी च बरी होती'.❤
इतके सर्वांना जवळ असणारी लालपरी असून ही कोणालाही राग आला तर पहिला राग एस टी वर च निघतो😡.
साधा मोर्चा निघाला तर बस च्या काचा फोडणे.
आंदोलन झाले की हवा काढणे💨,
दंगल झाली की बस पेटवणे 🔥हे प्रकार नेहमीचेच आहेत.
हे आपले स्वतःचे वाहन आहे हे आपण विसरून जातो व आपणच(आपल्यातील काही समाजकंटकांनी)केलेल्या नुकसानाबद्दल जेव्हा तिकीट दरवाढ करायची वेळ येते तेव्हा आपणच गळे काढतो.
ह्या एस टी तही झालेल्या सुधारणांची गती नक्कीच पाहिजे तेवढी नाही😒.सुधारणांची  गती फारच कमी आहे.
60℅ एसटी बस मध्ये अस्वच्छता दिसून येते(ती करणारेही आपणच😒😤).
सुरक्षेच्या बाबतीत शिवशाही😍 मध्ये लावलेले CCTV कॅमेरे हे नक्कीच चांगले पाऊल आहे.लवकरच अशी सुविधा सर्व बस मध्ये केली पाहिजे😊😊


Source: INTERNET
-मयूर डुमणे,
उस्मानाबाद

महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी ST बस प्रत्येकाला एक जिवाभावाची सोबती वाटते . राज्यातील पहिली बस 1 जून 1948 रोजी नगर पुणे मार्गावर धावली या घटनेला 70 वर्ष पूर्ण होत आहेत  .
खेड्यांना शहरांशी जोडणारी ST bus ला सर्वसमावेशक विकासाचे इंजिनच म्हणावे लागेल.  खेड्यातील विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहचवणाऱ्या ST ने शिक्षण प्रसारासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे , देत आहे .मी 4 थी मध्ये असताना माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेने शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते. त्या सहलींमुळे माझा आणि ST बस चा जवळून संबंध आला . आजही महाराष्ट्रातील शाळांकडून शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते तेव्हा सहलीसाठी ST बसचीच मदत घेतली जाते . विद्यार्थ्यांनी रायगड किल्ला फक्त पुस्तकात पाहिलेला असतो त्याच्या भव्यतेचे दर्शन विद्यार्थ्यांना ST बस मुळे मिळते . ST मुळे खेड्यातून शहरात कामासाठी, शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना, कामगारांना 'जेवणाचा डबा' मोफत पोहचविण्याची सोय उपलब्ध झाली . आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी होय, म्हणून खाजगी वाहतूकीत वाढ होऊन सुद्धा आपलं स्थान टिकवून ठेवणारी ST प्रत्येकाला आपलीशी वाटते . खाजगी वाहतूकीशी स्पर्धा करण्यासाठी ST ला देखील स्वतःमध्ये बदल करावे लागले . लाल डबा अशी ओळख असणारी ST आता काळानुसार बदलत आहे .अश्वमेध,शिवनेरी,हिरकणी,शिवशाही ही ST ची आधुनिक रूपे आपल्याला अनुभवायला मिळत आहेत .
सर्व सामान्य लोकांना सेवा देणारी ही आपली ST दंगल खोर लोकांना,समाज कंटकांना देखील फार प्रिय आहे . जनजीवन विस्कळीत करण्यासाठी अशा लोकांना ST बस चा आधार घ्यावा लागतो यातून च ST चे महत्व अधोरेखित होते . समाजाला जोडणाऱ्या, विकासाला चालना देणाऱ्या ST चे काच फोडून तिला जाळून या लोकांना कोणते समाधान मिळत असावे ? असा प्रश्न मला नेहमीच पडत आला आहे . अशी अनेक संकटे येत असली तरी ST बस धावायच बंद करत नाही . 'प्रवाशांच्या सेवेसाठी' या ब्रीद वाक्याला जागून ST बस अखंडपणे कार्यरत आहे .


Source: INTERNET
-जयंत जाधव, लातूर

मध्यमवर्गीय माणसाच्या मनात लालपरी अर्थात एस.टी. बसला आजही अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वतःच्या चार चाकी कारमध्ये प्रवासाला निघाल्यावर जेवढा आनंद होत नाही तेवढा आनंद लालपरीत बसल्यावर होतो.मी तर आजही लांबचा प्रवास म्हटला की लालपरीने प्रवास करतो. ती गर्दीत दाटीवाटीने शेअर केलेली जागा,अनोळखी माणसांशी झालेल्या ओळखी व नंतर झालेले मित्रत्वाचे नाते हे सर्व मला लाभले ते लालपरीच्या सहवासामुळे.या लालपरीवर माझे ऐवढे प्रेम होते की बहुदा जगात मी एकमेव मुलगा असेल ज्याला वडिल स्कुलबसचे पैसे भरुन शाळेत पाठवायची तयारी ठेवत पण मी बंड करुन माझ्या लहान भाऊ-बहिणीला घेऊन ६ किमी दूर अंतरावरील शाळेत लालपरीने जात होतो.
विषयाला अनुरुप वळू या. लालपरी ते शिवशाही पर्यंतचा@70 ऐवढा प्रवास कौतुकास्पद व संघर्षपूर्ण  आहे. १.मी सरकारला सरळ साधा एकच प्रश्न विचारतो,तुम्हांला लालपरी अर्थात एस.टी.ला खरच वाचवायचे आहे का? किंवा लालपरी नुकसानीत असायला सरकारच सर्वात दोषी आहे.सरकार प्रवासांना विविध योजनापोटी ज्या सवलती देते ते कित्येक वर्षापासूनचे थकविलेले पैसे एस.टी. कधी परत देणार?

२.एस.टी. तोट्यात असायला अधिकारी लोक व भ्रष्ट व्यवस्थापन जबाबदार आहे. दरवर्षी एस.टी.महामंडळ नफ्यात यावे म्हणून नवीन उपाययोजना अंमलात आणतात.त्यातून एखादी योजना यशस्वी झाली की लगेच ती बंद करतात.उदाहरणार्थ ‘हात दाखवा बस थांबा’ मध्यंतरी ही योजना खूपच छान प्रभावी ठरुन एस.टी.चे प्रवासी वाढले व उत्पन्न पण वाढले होते. पण

३.बस चालकांचा उद्दामपणा,अरेरावीपणा व प्रवाशांसी वाईट वागणूक कारणीभूत ठरली आहे.
मध्यंतरी महाराष्ट्राच्या एका माजी मंत्र्याचा खाजगी गाड्यांचा प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय एस.टी.मुळे नुकसानीत चालला होता.मग काय एस.टी.च तोट्यात कशी चालेल असे धोरण त्यांनी आखले होते.त्यावेळचे एक कर्तव्यदक्ष अधिकारी नाव गुपीत ठेवून सांगतो त्यांनी प्रभावी असे प्रत्येक एस.टी डेपोला भेट देवून जनसंपर्क अभियान राबवून एस.टी. नफ्यात आणून दाखविली.पण त्या मंत्रीने असल्या प्रामाणिक व कर्तव्यदक्षअधिकारीची लगेचच तडकाफडकी बदली केली सरकारचे एस.टी.प्रतीचे धोरणच दुटप्पीपणाचे आहे. एका कृतीने आम्ही एस.टी.च्या बाजूला आहे दाखवायचे व दुसऱ्या बाजूला खाजगी प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन द्यायचे.
आजच्या घडीलाही परिस्थिती बदलली नाही.सध्याच्या परिवहनमंत्री यांची वागणूक व धोरण एस.टी.ला मारक असेच आहे. तिखट लागेल पण वास्तव सत्य आहे. लालपरीला खरच सुखात पाहायचे असेल तर सरकारला व व्यवस्थापनाला त्यांची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावी लागेल.


Source: INTERNET
-अश्विनी खलिपे,
तोंडोली(सांगली)

         लाल परी म्हटल की सर्वांची जिवाभावाची, सुख-दुःखात साथ देणारी एसटी आठवते. आपण तिला लाल परी, लाल डबा, एसटी, बस अशा अनेक नावांनी संबोधतो. गरीब असो वा श्रीमंत असो, कोणत्याही जाती-धर्माचा असो, अपंग असो वा आंधळा-बहिरा असो, स्त्री असो वा पुरुष असो, म्हातारा असो वा तरुण असो, लहान असो वा मोठा असो कोणताही भेदभाव न करता सर्वांना वर्षानुवर्षे एकत्र घेऊन जाते-येते ही आमची लाल परी. कुणाला तिच्यासोबतचा प्रवास आवडतो तर कुणाला आवडत नाही, तरीही ती आजपर्यंत प्रत्येक खेडोपाड्यातून, शहरातून सर्वांची मदत करत दिमाखात धावते आहे म्हणूनच तिला जीवनवाहिनी मानलं जातं. मनात खोलवर बसलेल्या ह्या लाल परिसोबत अनेकांचे चांगले-वाईट अनुभव जोडलेेले आहेत. काहींना मित्र मिळाले, तर काहींना शत्रू इथंच मिळाले, काहींना जीवनसाथी मिळाला, तर काहींची प्रेमकथा इथंच संपली, काहींना आयुष्याचा अर्थ कळला, तर काहींच आयुष्य याच लाल डब्यातचं संपलं. असे अनेक प्रसंग मोठ्यांपासून अगदी लहानांपर्यंत सर्वांनी अनुभवले आहेत. काही समाजकंटक, दंगली करणाऱ्यांना ही आपली लाल परी जवळची भासते, कारण जेंव्हा कधी सरकारच्या विरुद्ध बंड पुकारला जातो तेंव्हा ह्याच लाल परीवर दगडफेक केली जाते, त्यावेळी आपल्याला तिच्याबद्दल कधीच कळकळ वाटतं नाही आणि एवढं सारं होऊन पण ती प्रवाशांसाठी सतत कार्यरत राहते, त्यामुळे लाल परीला आपल्या जीवनातील अविभाज्य घटक जरी बोललं तरी त्यात काही गैर ठरणार नाही.
         बीएसआरटीसीची पहिली बस जून १, इ.स. १९४८ यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. सदरची बस पुणे येथील पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे यांनी चालवली. सध्या आपल्या याच लाडक्या लाल परीला १ जून २०१८ ला ७० वर्षे पूर्ण झालीत. या ७० वर्षात लाल परीचा प्रवास बऱ्याच टप्प्यातून गेलेला अनेकांनी पाहीला व अनुभवला आहे. "डॉ.पतंगराव कदम साहेब" बोर्ड ऑफ डायरेक्‍टर ऑफ महाराष्ट्र राज्य रस्ते वाहातुक महामंडळ या पदावर 6 वर्षे कार्यरत होते, त्यावेळी "गाव तिथं एसटी" हे ब्रीदवाक्य नजरेपुढे ठेऊन त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक खेडोपाड्यात, अनेक दुर्गम ठिकाणीही एसटी ची वाहतूक चालू केली, याचा सर्वात जास्त फायदा विद्यार्थ्यांना झाला, कारण परगावी जाण्यासाठी काही साधन नसल्यामुळे अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहत होती, अशांना साहेबांनी शिक्षण घेण्याची चांगली संधी उपलब्ध करून दिली.
         प्रथम रस्त्यावर धावणारी एसटी ही लाकडी होती, त्यांनंतर कालांतराने तिचं रूपांतर लाल डब्यात झालं आणि आता शिवशाही पर्यंत ची मजल तिने घेतली आहे. सध्याच्या शिवशाहीच्या बस मध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, आरामदायी आसन, स्वच्छता अशा अनेक सुविधा करण्यात आल्या  आहेत त्यामुळे त्यातील प्रवास हा सुखाचा वाटतो आहे तरी लाल परीची मनातील जागा शिवशाहीने घेणं शक्य नाही. तसेच शिवशाहीच्या बसमधला प्रवास अगदी सुखाचा जरी असला तरी तो सर्वांनाच परवडेल असा नाही, कारण त्याच्या तिकिटांचा दर हा जवळपास १०% नी जास्त आहे. शिवशाहीच्या बस मुळे खरतर लाल परीला चांगलाच आर्थिक धक्का बसलाय, त्यात आणखी काही भ्रष्टाचारी अधिकारी, प्रवाश्यांशी उर्मटपणे बोलणारे चालक-वाहक आणि स्वतःच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दगडफेक करणाऱ्यांनी मिळून लाल परीला दिवाळखोरीत काढली. शिवशाहीच्या बसेस उपलब्ध करून देताना म.रा.प.म. यावर चांगलाच ताण पडत आहे. त्यापेक्षा लाल परीमध्येच काही सुधारणा करून, त्यात स्वच्छता ठेऊन तिचं पुन्हा नव्याने उपलब्ध करून देता येईल.
         काहींना असंही वाटेल की मग आपण काय नवीन गोष्टींचे स्वागत करायचेच नाही का.? पण नवीन गोष्टींचे स्वागत करताना जुन्यांना अडचणीत ठेवणं त्यांच्याकडे पाठ फिरवणं कितपत योग्य आहे.?


Source: INTERNET
-अक्षय पतंगे,
आ.बाळापूर
जि. हिंगोली

बस शहरापासून ते खेड्या-पाड्यात, वाडी-वस्ती-तांड्यावर अनेक खड्डे चुकवत प्रवास करत आहे. बस आली तेव्हा प्रत्येकाला ती आपली वाटायची, बसण्याचा आनंद निराळा असायचा, चालक-वाहक यांना गावात मान असायचा, त्यांचे सत्कार व्हायचे. सामान्य माणूस समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात बसचे योगदान महत्वाचे आहे. आजही बसमध्ये काही जागा पत्रकार,अपंग, आमदार, खासदार यांना राखीव असल्याचे वाचण्यात येते. इतके निश्चित की 70 वर्षांपूर्वी आमचे लोकप्रतिनिधी बसने प्रवास करायचे. काही दिवसांपूर्वी सांगोल्याचे आ.श्री गणपतरावजी देशमुख बसने नागपूर अधिवेशनात जाताना आपण पाहिले. जेष्ठ नागरिकांसाठी असलेली बस, दिव्यांगांसाठी असलेली बस खरचं काळाप्रमाणे यशस्वी पाऊल टाकते का ? तर माझ्याकडे उत्तर नाही असेल. महामंडळाचे अधिकारी, महामंडळाचे अध्यक्ष,परिवहन मंत्री यांनी बसने प्रवास करावा, प्रत्येक बसस्टँड वर विश्रांती घ्यावी. प्रवाशी, वाहक, चालक, कर्मचारी यांच्याशी चर्चा करावी आणि मग धोरणे ठरवावी. पावसाळ्यात बसस्टँडवर पाणी, उन्हाळ्यात प्रचंड धूळ हे प्रश्न तेव्हाच वरिष्ठांना लक्षात येतील तेव्हा ते याची देही-याची डोळा लाल परी पाहतील मला कळते तेव्हापासून महाराष्ट्राची बस कस काय तोट्यात जाते. तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटकच्या बसेस का नेहमी तोट्यात जात नाहीत ? तामिळनाडूच्या आणि आणि आपल्या बसमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. तिथे बसची रचना आपल्यापेक्षा वेगळी आहे. आपल्या बसपेक्षा जास्त लोक बसू शकतात. तिकीट सुद्धा कमी आहे. आपल्याकडे एसटीची भाडेवाढ वारंवार केली जाते पण शुद्ध पाणी सुद्धा पुरवले जात नाही त्यामुळे पुन्हा 20 रुपये पाण्यासाठी खर्च करावे लागतात. पाकीट कापणारे, रोडरोमिओ यांची काही संख्या पण कमी नसते. त्यामुळे ही सुरक्षितता देणे ही महामंडळाची जबाबदारी आहे. महिलांना स्वच्छतागृह पुरवण्यात सुद्धा एसटी अपयशी ठरली. मोठया शहरात जश्या सुविधा पुरवतात तश्या ग्रामीण तालुका पातळीवर पण पुरवायला हवा. खासगी वाहतूक आता वाढत आहे त्यामुळे एसटी मध्ये आतातरी सुधारणा होणे गरजेचे आहे. खराब रस्त्यामुळे बसचे नुकसान होते हे सुद्धा नाकारता येणार नाही. तंबाखू सेवन करून प्रवासाचा आनंद घेणाऱ्यांनी आतून एसटीला लाल रंग देण्याची कामगिरी बजावली हे पण नाकारता येणार नाही. पण लाल परी आणि लाल डब्बा यात फरक राहिला तरी कुठं !


Source: INTERNET
-डॉ. दिलीप कदम,
अहमदनगर

लाल परीच कौतुक आहेच हो!
पण माझी एक तक्रार  आहे.
ST स्टैंड मधली शौचालये किती घाण असतात.
आणि दुसरी एक गंभीर समस्या आहे.
ज्यांना खाली बसता येत नाही अशा जेष्ठ नागरिक आणि अपंग यांच्यासाठी इंग्लिश कमोडचे संडास एकाही ST स्टैंड वर नाहीत.
अशी व्यवस्था करण्याची विनंती पत्र लिहून आपल्या शेजारच्या डेपो मैनेजरला कराल का?
प्लीज🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************