तुमची आमची नैतिकता...!


🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿

१)अर्जुन रामहरी गोडगे सिरसाव, ता. परंडा, जि. उस्मानाबाद

‌          सध्याच्या काळात जो तो स्व विचारत मग्न असतो. 'आपण भलं आपलं काम भलं' ,या विचारात जीवन जगत आहे. आपण ज्या समाजात वाढलो त्या समाजच आपण काहीतरी देणं लागतो हे विसरता काम नये. मानवाच्या चुकीच्या वागण्यामुळे अनेक समाजात दुही निर्माण होते. जगभरात भारतच्या नैतिकता चे दाखले दिले जात होतो त्याला काळिमा फसण्याचे प्रकार घटत आहेत. नैतिकता ही बोलून दाखवण्याची गोष्ट नाही. सध्याच्या काळात चंगळवाद, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अत्याचार यासारखा घटनांमुळे मानवी गाबर्यातील नैतिकतेचा ऱ्हास झाला आहे. वरच्यावर माणूस नुसता बोलतच आहे वागणूक मात्र कृतीशानुन्य करत आहे.

___________________________________________________________________________________________
___________________________________________________________________________________________

२)संगीता देशमुख,वसमत जि. हिंगोली

         नैतिकता म्हणजे समाजात सुव्यवस्था रहावी म्हणून माणसांनी माणसांसाठी घालून दिलेले नियम म्हणा अथवा माणसांनी पाळावयाचे संकेत म्हणा,पण कायदे नाही. कायदा आणि नैतिकता ही वेगळी आहे. कायदे म्हणजे समाजात,राज्यात,देशात सुव्यवस्था रहावी म्हणून घालून दिलेले अनिवार्य बंधने आहेत. कायद्याचे उल्लंघन झाले की नियमाने शिक्षा होते पण नैतिकतेमध्ये तसे नाही. नैतिकतेचे उल्लंघन झाल्यास त्या व्यक्तीला कमी दर्जाचे समजल्या किंवा वेळप्रसंगी समाजबाह्य ठरविल्या जाते. नैतिकतेचे उल्लंघन म्हणजे व्यक्तीचे दुराचरण. ढोबळमानाने परस्त्री किंवा परपुरुषाशी असलेल्या विवाहबाह्य शारीरिक संबंधाना आपण अनैतिकता म्हणतो. त्यातही पुरुषाचे परस्त्रीशी संबंध असल्यास त्या पुरुषाला ते क्षम्य असतं पण त्याच संबंधात स्त्रीला मात्र अनैतिक समजल्या जाते. पण ही तुमची आमची नैतिकता पहायची असेल तर, मद्यप्राशन,भ्रष्टाचार,चोरी,खोटारडेपणा,फसवणूक,स्वार्थ,देशद्रोह हेही लक्षात घ्यावे लागेल. अशी अनैतिकता समाजाला,देशाला कलंक आहे. यात पण ही नैतिकता व्यक्तिपरत्वे,समाजपरत्वे बदलत असते. उदाहरणार्थ आदिवासी समाजात स्त्रियांनी दारू पिणे,हे वाईट समजल्या जात नाही. पण तीच दारू मध्यमवर्गीय स्त्रियांनी पिली तर ते अनैतिक ठरवल्या जाते. म्हणून ढोबळमानाने नैतिकता-अनैतिकतेच्या संकल्पनाही व्यक्तिपरत्वे बदलतात.
           एकमेकांशी प्रेमाने,प्रामाणिकपणे  वागून 
एकमेकांना सुखदुःखात साथ देऊन आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण करून तुमची आमची नैतिकता जोपासू शकतो.
___________________________________________________________________________________________

३)अनिल गोडबोले,सोलापूर

नैतिकता... हा शब्द खूपच गम्मतशीर आहे. जो तो हा शब्द आपल्या सोयीने दुसऱ्यासाठी वापरतो.
खर तर नितीमत्ता ही... क्रूरता किंवा मानवी हक्क आणि अधिकार विरोधी माणसाने वागू नये या साठी अलिखित नियम लागू करावेत या पलीकडे काहीच नाही असं मला।वाटत.

जे विज्ञानाला धरून नाही किंवा ज्याने मानवी जीवनाचे नुकसान होईल किंवा ज्याचा हेतू चांगला नसेल ते सर्व नैतिकतेच्या बाहेर असले पाहिजे..

आता नैतिकता आपल्याकडे कशी मानतात ते पाहू.मला आलेले अनुभवा वरून मत मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

जेव्हा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत मत व्यक्त करतो किंवा एखादी गोष्ट करतो तेव्हा.. त्याला नकळतपणे नैतिक आणि अनैतिकतेची फुटपट्टी लावली जाते.

काही उदाहरणे पाहू. (मला आलेले अनुभव)

1. जर विज्ञान या विषयाला धरून जर मत मांडले तर प्रथम त्यावर प्रतिक्रिया अशी असते की हे पूर्वी पासून आमच्याकडे आहे. उलट काही प्रश्न विचारले की अनैतिक.. म्हणजे आता नवीन पिढीला(बोलणारा विज्ञान वापरत असतो हे विशेष) नैतिकता नाही.. कारण पूर्वीचे काय वेडे होते का?

2. प्रेम हा मुद्दा तर अनैतीकच . "आज काल काही शुद्ध प्रेमच उरलेलं नाही.." का? तर मुली निर्णय घेऊ लागला तर मुळीच नैतिकता सोडून वागतात.

एखाद्याने प्रेम करून लग्न केले किंवा प्रेम आहे... म्हणजे परंपरे च्या विरोधात.. अनैतिक

3. सेक्स... सगळ्यात जास्त अनैतिकता तर या विषयावर आढळली मला, 
असुरक्षित लैंगिक संबंध हा शब्द अनैतिक संबंध या अर्थाने वापरतातच आणि व्यभिचारी वृत्ती असा शब्द वापरला जातो.
एखाद्याने सेक्स वरती मत जरी व्यक्त केलं तरी तो अनैतिक 
असंस्कृतिक.. आपली संस्कृती किंवा नैतिकता नाही .. 
एड्स आणि गुप्तरोग तसेच वाढते गर्भपात किंवा विवाह बाह्य तसेच पूर्व समंध हे अनैतिक मानले गेले..
पण हे होत।आहे याचा अर्थ हे कुठेतरी चालू आहेच ना "मांजराने डोळे बंद केले तरी बाकीच्यांना दिसतच."

4. देवा धर्माच्या विरोधी बोललं।की अनैतिक बोलणं. एखाद्याला होणाऱ्या त्रासातून वाचवलं तरी अनैतिक.
अशी खूप उदाहरण देता येतील 
पण 
1. आम्ही अंधश्रद्धा पाळून एखाद्या ला त्रास देतो किंवा जीवे ठार मारतो तरी ती गोष्ट अनैतिक होत नाही.

२. आम्ही टेबलाखालून पैसे घेतो लोकांना फसवतो, काम करत नाही.. तरी आम्ही अनैतिक होत नाही

3. आयुष्यभर एका विशिष्ठ पद्धतीने जगणार जीवन धुडकावून दिल की त्यांना टोचून बोलणारे अनैतिक नाहीत(या मध्ये कोणत्याही व्यसनाला मी पाठीशी घालत नाही ते शारीरिक व मानसिक रित्या चुकीचे आहे.. पण पुरुष करत असेल तर टेन्शन मुले आणि बाई करत असेल ते अनैतिक.!)

4. गपचूप पणे संबंध ठेवणे, बाईला छेडछाड करणे, विनयभंग करणे आणि बलात्कार करणे हे अनैतिक नाही मानत... का?... तर ती बाईच तशी आहे, कपडे तशे वापरते किंवा तिला पण तेच पाहिजे होत.. अस करणारे पुरुष अनैतिक नाहीत.!

5. एखाद्याच्या भावनेशी खेळणे अनैतिक नाही.

6. अवैज्ञानिक।गोष्टी मानणे आणि चर्चा करणे.. दुसऱ्याला करायला भाग पडणे अनैतिक नाही!

7. वाद घालणे, संस्कृती रक्षक भूमिका दाखवण्यासाठी जुने बरोबर कसे आहे या साठी खरे खोटे बोलणे, शब्दांचा खेळ करणे अनैतिक नाही.!

8. कट्टर समर्थक किंवा विरोधक बनून हीन पणे बोलणे. आडणाववरून जात शोधणे, पूर्वज शोधणे, दूषण लावणे. अनैतिक नाही!

तर असो... उपहासात्मक रित्या वरील 9 मुद्ध्ये लिहिले आहेत.
या मध्ये कुठेही विकृतीला पाठिंबा नाही.

शेवटी .....त्रास देणारी किंवा अवैज्ञानिक नैतिकता ही अनैतिकताच..!!

___________________________________________________________________________________________

४)डॉ. विजयसिंह पाटील, कराड

हजारो लाखो वर्षांपासून मानवाची उत्क्रांती होत आहे. सुरुवातीची हजारो वर्षे, माणूस व प्राणी /जनावर , ह्यात फारसा फरक नव्हता. जंगली प्राण्यांच्या प्रमाणे, माणूसही दोन वेळच्या अन्नासाठी धडपडत होता. आपण प्राण्यासमोर , हतबल होतोय हे लक्षात आल्यावर, तो टोळीने राहायला लागला व कालांतराने,अशा अनेक टोळ्या बनून, त्या त्या ठिकाणी एक समूह बनत गेला. प्राथमिक अवस्थेत, फ़क्त अन्नासाठी व सुरक्षेसाठी एकत्र आलेल्या ह्या समाजात, बरेच कलह, वाद सुरू झाले,(कारणे--मुख्यतः, श्रेष्ठत्व, लैंगिकता). त्या काळातील समाज धुरीणांनी, परिस्थिती लक्षात घेऊन, काही कायदे बनवले असावेत व प्रत्येकाने आपल्या परीने कसं वागायचं ह्याचे काही नियम घालून दिले.
अर्थात हे नीती नियम, ज्यांनी घालून दिले हे ,त्या त्या वेळी विचारवंत वा हुशार / ज्ञानी असणार हे निश्चित. 
पुढं समूहाचे, समाजात, समाजाचे तत्कालीन धर्मात रूपांतर झाले. 
धार्मिक गुरूंनी,  आपल्या धर्माची नीती नियमाची चौकट  घालून दिली व जो त्या नियमाप्रमाणे वागेल तो आदर्श , असं शिक्कामोर्तबच झाले...
धर्मप्रमाणे  नीती नियम झाले, कायदे झाले...
बऱ्यापैकी कालावधीनंतर, एक धर्म आपले नियम दुसऱ्या धर्मावर लादू लागले. 
हे झाले सामाजिक..
पण , वैयक्तिक रित्या, माणूस,, आप आपल्या बुद्धिनुसार, आपण कसे वागायचं ते ठरवू लागला, समाजाच्या नैतिकतेच्या , व्याख्येत पळवाटा शोधू लागला,
जस जसा, समाज/ धर्म वाढू लागला, नीतीची चौकट त्याप्रमाणात विस्तारत गेली नाही.
कायदे आले. पण जे कायदेशीर आहे ते नैतिक असेलच असे नाही. 
पाश्चिमात्य देशांच्या नीतीच्या कल्पना वेगळ्याच.
आताच्या, "जग हे जागतिक खेडे", ह्या संकल्पनेने, सर्वांच्या नीतीच्या कल्पनांची सरमिसळ होऊ लागले. काय नैतिक व काय अनैतिक, हे कोणच ठामपणे सांगू शकत नाही.

___________________________________________________________________________________________

५)प्रा. रोहन बाळकृष्ण वर्तक रा. लोणावळा, ता-मावळ, जिल्हा-पुणे

नैतिकता..... मला उमजलेला ह्या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे आपल्या मुळे इतरांना कोणताही मानसिक, शाररिक त्रास न होणे, किंवा आपल्या कृतीमुळे समाजात वैचारिक अस्थिरता, अराजकता उद्भउन न देणे होय.

पृथ्वीवर राहणाऱ्या असंख्य जीव सृष्टीकडे बघाताक्षणी असे वाटते की नैतिकता ही मनुष्य निर्मित समाजहित राखण्यासाठी निर्माण केलेली नियमावली होय.

खरंतर आपल्या सर्वांच्या आयुष्यातील बहुतांशी वेळ हा, अमुक गोष्टी बरोबर आणि अमुक गोष्टी चूक , किंवा हे योग्य आणि ते अयोग्य अशा वर्गवारी करण्यातच निघून जात. 

उदारणार्थ दारू पिणे अयोग्य आहे आणि दारू न पिणे ही एक नैतिकता आहे. परंतु समाजात एखाद्या झोपडपट्टीतील अशिक्षित व्यक्ती ने दारू पिणे हे असभ्यतेचे लक्षण मानले जाते तर प्रतिष्ठित पार्टीत मान्यवरांनी दारू पिणे सहजच आणि सोपस्कर पणे स्वागतार्हय ठरते. म्हणजेच आपण केलेली चूक आणि बरोबरची वर्गवारी ही खरच गरजेची आहे का? 

माझ्या दृष्टिकोनातून नैतिकता ही पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष असते आणि बऱ्याच वेळा ती काळ सापेक्ष देखील असते.

व्यक्तिसापेक्ष म्हणजे परक्या व्यक्तीने एखाद्या मुलीला छेडले तर अनेक लोक नैतिकतेचे धडे गिरवताना दिसतील परंतु, स्वतःच्या मुलाने एखाद्या मुलीची छेड काढली तर मात्र हीच नैतिकता कुठे निघून जाते कुणाचं ठाऊक. कारण येथे नैतिकते पेक्षा प्रेम महत्वाचे ठरते.

काळसापेक्ष नैतिकता सांगायचे म्हटले तर भ्रष्टाचार करणे हा गुन्हा आहे किंवा अनैतिक आहे परंतु निवडणुकीच्या वेळी एका मताला उमेदवाराकडून पैसे घेताना काही काळा पुरती नैतिकता बांधून ठेवली जाते.

नैतिकता... ही प्रत्येकाच्या दृष्टीकोनावरून ठरते, आणि स्पष्टपणे सांगायचे तर सध्या नैतिकता म्हणजे "पकडला तो चोर आणि लपवला तो नैतिकतेचा पुतळा"...अशीच झाली आहे.

जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छा आकांशा आणि पूर्ण करताना नैतिक तत्वाचा वापर करून यशाची सर्वोच्च शिखरे गाठतो असे नाही मात्र सर्वोच्च स्थानी पोहचल्यावर नैतिकतेचे गुणगान मात्र सतत गात राहतो हे तेवढेच सत्य आहे.
आणि त्यामुळेच समाजातल्या कोणत्या व्यक्तीकडे आज नैतिकता शिल्लक राहिली आहे हे शोधणे खूपच अवघड झाले आहे.

___________________________________________________________________________________________

६)बायस करण,जि. हिंगोली

नैतिकता आणि अनैतिकता ही समाजाने घालून दिलेली बंधने आहेत.नैतिकता आणि अनैतिकता यांच्या व्याख्या व्यक्तीनुसार, वेळेनुसार वेगवेगळ्या बदलत जातात.आणि प्रत्येक गोष्टीची नैतिकता आणि अनैतिकता यांचा दर्जा हा त्या-त्या व्यक्तीने त्याच्या मनात ठरवलेला असतो.
प्रत्येकाचे ज्याचे त्याचे अनुभव, त्यांवर असलेले संस्कार, त्यांचे वाचन यांवरून त्या विषयावर त्यांचे मत,नियम,धोरण हे ती गोष्ट नैतिक की अनैतिक हे ठरवत असते.
समाजात काही अशा गोष्टी असतात किंवा समाजात अमुक अमुक गोष्टी आधी पासून करतात किंवा करत नाहीत अशी समजूत लोक काढतात. मग इथं कोणतीही गोष्ट करण्याआधी आपल्याकडे दोन मार्ग असतात ती गोष्ट नैतिक की अनैतिक हे ठरवण्यासाठी.
बऱ्याच गोष्टी आहेत जे की आधी पासून ठरलेल्या आहेत जर एखादा मनुष्य इतरां पेक्षा काही वेगळं वागला किंवा बोलला तर ते समाजाला पटत नाही मग समाज त्या व्यक्तीच्या अनैतिक कृती बद्दल प्रश्न करतात. त्यात बरंच काही उदाहरणे आहेत जसे स्त्रिया कडे बघण्याचा दृष्टिकोन, प्रेमाविषयी बोलणे किंवा प्रेम करणे, एखादा व्यक्ती जर दुसऱ्याची चूक काढत असेल तर इ.
जर समाजाने ठरवलेल्या गोष्टींच्या विरोधात गेले की ती गोष्ट समाजासाठी अनैतिक कृत्य ठरते,अशी समाजाची समजूत आहे.
*मला एक गोष्ट समजत नाही समजतील प्रत्येक जात, धर्मातील लोक ठरवलेल्या पध्दतीने का वागतात?*
मला असं म्हणायचं की समाजानं जे नियम दिले ज्यांना समाज 
नैतिकता म्हणतो त्यावर लोकांनी चाललं पाहिजे तरच ती नैतिकता होय, असं का?
प्रत्येकजण स्वतंत्रपणे विचार करू शकतो.

___________________________________________________________________________________________

७)अश्विनी शोभा श्रीकांत खलिपे, तोंडोली(सांगली)


          एखादी गोष्ट करणं अथवा न करणं, तसेच ती एका विशिष्ट पद्धतीने केली जावी हे स्वतःच्या मनाने ठरवतो आणि तसंच आपलं वागणं ही असतं, आपलं हे वागणं आपल्या दृष्टीने नैतिकतेने वागणे असते त्या तत्वाच्या विरुद्ध वागणं हे आपल्या दृष्टीने अनैतिकता ठरू शकते. त्यामुळे नैतिकता ची व्याख्या नक्की काय हे व्यवस्थित मांडता येणार नाही. कारण नैतिकता ही प्रत्येक व्यक्तीच्या विचारांवर ठरते.
          बऱ्याचदा नैतिकतेला धर्माची जागा दिलेली दिसून येते आणि जिथं धर्म येतो तिथं परंपरा येतातच. परंपरेने जर नैतिकतेचा अर्थ लावायला गेलं तर कोणाशी वाईट वागू नये, कोणाबद्दल वाईट चिंतू नये, इर्शा करू नये, कोणावर जबरदस्ती करू नये इ. गोष्टींचा विचार करून वागणं म्हणजे धर्माचे पालन करणे. पण धर्म हा परंपरा नसून तो जगण्याची कला आहे. धर्मातूनच नैतिकता निर्माण होते. सध्या नैतिकता माणसांपेक्षा जास्त महत्त्वाची ठरतं असल्याने माणूस नक्की कसा आहे हे कळलं जात नाही. समाज्यातून माणसांना नैतिकतेसंदर्भात जी काही बंधन घालून दिली आहेत त्याप्रमाणे माणसाचे वागणे आहे. त्यामुळे सगळेच लोक नैतिकतेच्या दृष्टीने योग्य असले तरी त्यांना योग्य मानले जाऊ शकत नाही. समाज्याने घालून दिलेली बंधन ही कृतीतून दर्शवली जातात पण नैतिकता ही मनावरून ठरते.
          माणसाच्या अंतःकरणाच्या सांगण्यावरून जी कृती घडते ती खरी नैतिक आणि जी कृती प्रयत्नातून घडते ती कृती अनैतिक असते. नैतिकता ही माणसाचा स्वभाव दर्शवते, मनाचं खरं दर्शन घडवते. धर्मातील परंपरा ह्या काळानुसार बदलू शकतात पण नैतिकता ही काळानुसार बदलणारी गोष्ट नाही. नैतिकतेचा खरा अर्थ माणुसकी असा जरी लावला तरी त्यात काही गैर वाटणार नाही, कारण आपल्या कोणत्याही कृतीमुळे इतरांना त्रास होऊ नये असं वागणं हे नैतिक वागणं मानलं जातं.

___________________________________________________________________________________________

८)जयंत जाधव,लातूर

नैतिकता ही मानवीय आचरणासंबंधी विषयी योग्य-अयोग्य,चांगले-वाईट,गुण-दोष यातील फरक स्पष्ट करण्यास मदत होते.यामुळे मनुष्य जेव्हा कोणत्याही परिस्थितीत त्रस्त असला तरी तो नैतिकतेच्या बाबतीत विचार करतो.
नैतिकता ही समाजात राहणाऱ्या लोकांसाठी असते.हा काही जणांना याचा त्रासदायक ठरते. उदा. पूर्वी महिलांना फक्त चूल व मुल यापर्यंत सिमित केले होते. आज मात्र महिलांनी हा सिमित केलेला उंबरठा ओलांडून कितीतरी क्षेत्रात पुरुष यांच्या बरोबरीने वा त्यापेक्षा सरस यशस्वी प्रगती केली आहे. पुरुषी नैतिकता आज महिलांच्या या यशस्वी विकासाला अनैतिक समजतात.
म्हणूनच समाज विकासाचा गाडा व्यवस्थित सुरू राहावा किंवा चालण्यासाठी लोकांमध्ये नैतिकता असायला पाहिजे.यासाठी वेळोवेळी समाजातील प्रत्येक व्यक्ती सोबतच संपूर्ण समाजाच्या विकासासाठी नैतिकतेच्या व्याख्यांना नवीन आयाम मिळून देणे आवश्यक आहे.

___________________________________________________________________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************