शेतकऱ्यांना खाल्लं कोणी....आणि का?


 शेतकऱ्यांना खाल्लं कोणी....आणि का?

शिरीष उमरे,नवी मुंबई.
        🌿🎋🌾शेतकरी ... वर्हाडी भाषेत कास्तकार... नडल्या गेला शेतकर्याकडुन च...
  श्रीमंत शेतकर्यांनी लॉबी करुन सरकारी योजनेचे लोणी लाटले. कृउबास व जिमस बँक मध्ये राजकारण आणुन छोट्या कास्तकारांना मिंधे केले. 
   व्यापारी लोकांनी कच्चा माल कवडीमोलाने घेऊन दलाली खाऊन कींवा मामुली प्रक्रीया करुन करोडो रुपयांचा फायदा करुन घेतला. यांच्या लॉब्या उच्चस्तरीय राजकारण्यांची व सरकारी अधिकार्यांच्या हीताची काळजी घेतात. 
   कायद्याचे निर्मीक व रक्षक (आमदार/खासदार) इंग्रजांच्या काळापासुनच्या घातक नियमांना कालानुरुप न बदलवता त्यांना अजुन जाचक बनवतात. सरकारी कुठल्याही योजना कास्तकाराशिवाय इतर सगळ्यांच्या फायद्याच्या बनवण्यात ह्यांचा पुढाकार असतो. 
   पोलिसांच्या वरदहस्ताखाली बेकायदेशीर अनैतिक सावकारी करणारे व दारु बनवणारे यांचे गाजरगवतासारखे फैलावलेले रान आता सुरक्षीत कुरण बनलेले आहे भ्रष्टाच्यार्यांचे... 
   बहुदेशीय व आंतर्देशीय कंपन्यांनी बीज संशोधन, रासायनिक खते व  कीटक नाशके आणि गॅट करार याचे असे मजबुत जाळे तयार केले आहे की ज्यात शेतकरी च नाही तर आपण प्रत्येक जण अडकलो आहो आणि हळुवार स्वत: व पुढच्या पिढ्यांचा सर्वनाश करुन घेतोय. 
     सुपीक जमीन व जमीनीतले पाणी ज्या सपाट्याने आपल्या पीढीने संपवले त्या साठी पुढची पीढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. 
    पिकविमा व कार्पोरेट शेती यातील अपारदर्शिकता, सबसिडी व कर्ज वाटप यातला भेदभाव, बाजार हमी भाव न मिळणे, पर्यायी जोडधंदा साठी भांडवल व सल्ला याचा अभाव, योग्य ठीकाणी  साठवणुक केंद्रे व वितरणा साठी परिवहन सुविधा उपलब्ध न होणे, बेशिस्त आयात निर्यात ह्यासारखी कीतीतरी जीवंत व ज्वलंत उदाहरणे देता येतील ज्यामुळे कास्तकाराचे लचके तोडल्या जात आहेत. 
      कृषीकेंद्राकडुन होणारे चुकीचे व स्वार्थी मार्गदर्शन, करोडो रुपयांचा चुराडा करणारे शेती शिक्षण, संशोधन व विकास सरकारी संस्थेंचे पांढरे  निष्कामी हत्ती अप्रत्यक्षरित्या रक्त शोषतात कास्तकारांचे.
       शेवटी शेतकरी स्वत: च स्वत:ला खातोय... भाऊबंदकीत वाटल्या गेलेल्या जमीनी, मोडकळीस आलेली संयुक्त कुटुंब पध्दती, पारंपारिक शेतीचा विसर व नविन तंत्रज्ञानाचे अज्ञान, बाजाराची शुन्य माहीती, मेंढरासारखे इतरांचे अंधानुकरण, मानसिक खच्चीकरणातुन जीवन संपवण्याचा प्रघात हे खातात कास्तकाराला जिवंतपणी !!! 
🙏🏼😔😞😐😶🍂🥀



अभिजीत गोडसे,सातारा

            'पूर्वी उत्तम शेती , मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. असे मानले जायचे. भारत देशात अजूनही ७० टक्के लोक शेती करतात. शेतीनेच देशाला तारले आहे. अगदी पूर्वीपासून पाहिले तर दिसून येईल छ. शिवाजी महाराज , जोतीबा फुले , लोकमान्य टिळक , महात्मा गांधी आणि आत्ता अलिकडचे शरद जोशी यांनी शेतीच्या प्रश्नावर अभ्यास केला. विविध धोरणे आखली , ती राभवण्याचा प्रयत्नही केला शरद जोशी यांना वगळे. तर बाकी सर्वांनी देश पारतंञात असताना , विविध आक्रमणे होत असताना. शेतीकडे लक्ष दिले. वेळोवेळी प्रश्न मांडले. शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिले. त्या - त्या वेळी सरकारचे कान उपटायला सुद्धा कमी पडले नाहीत. ते ही चांगल्या मार्गाने . हे खरच वाखण्या जोगे आहे. टिळकांनी पहिल्यांदा शेती आणि पैसा म्हणजेच 'शेतीचे अर्थशास्त्र' मांडले.याच प्रकारे पुढे  शरद जोशी यांनी शेती किती किफायतशीर आहे , मालाला हमी भाव हा किती  महत्त्वाचा आहे. एकूणच शेतीचे पूर्ण अर्थशास्त्र मांडले. पहिली 'शेतकरी संघटना' शरद जोशी यांचीच आहे. आपल्या मागण्या विधायक पद्धतीने सरकारच्या दरबारी मागणे , शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे. ही त्यांची खुबीच. संपूर्ण आयुष्य शेतकरी प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी वेचले. 
           देश स्वातंत्र्य झाल्यानंतर १९५१ ते १९५६ या पहिल्या पंचवार्षिक योजनेत. शेतीच्या विकासासाठीच अमाप खर्च केला विविध धरणांचे नियोजन करून बांधनी केली. हळूहळू आर्थिक सुबत्ता देशात आल्यानंतर नोकरशाही उदयास आली.आर्थिक , सामाजिक , वैज्ञानिक अशा विविध क्षेत्रात  प्रंचड प्रमाणात देश प्रगल्भ होत गेला. नोकरीला मोठ्या प्रमाणात किंमत येवू लागली. याच वेळी 'उत्तम नोकरी , मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती' असे. रसमळीत चित्र झाले. सततचा दुष्काळ , पाणी टंचाई इ. कारणांमुळे शेती फायद्याची असताना सुद्धा दुर्लक्ष होऊ लागले. आणि येथेच शेतकऱ्यांना खायला सुरवात झाली. शेतकरी प्रश्नावर जोतो बोलायला लागला. वेगवेगळ्या पक्षांना निवडणूकीत आयते कोलीत मिळायला लागले. पाण्यावरुन , शेतीच्या बियानावरूण , दुष्काळावरून राजकारण झाले. एकीकडे शरद जोशी शेतकरी प्रश्नावर लढत होते. शरद जोशी जरी प्रामाणिक पणे लढत असले तरी. काही धुर्त राजकीय लोकांनी अशा संघटनांचा राजकारणात कसा फायदा होऊ शकतो हे जाणले. अशातच 'शेतकरी संघटना'  फुटून स्वाभिमानी शेतकरी संघटना उदयास आली. अचानक शेतकरी विषयी कळवळा निर्माण झाला. तो जरी योग्य असला तरी त्याच्या मागे छुपे राजकारणच होते. हे पून्हा काही काळाने सिद्ध झालेच. या संघटनेच्या मागण्या त्याच पण मागायची पद्धत वेगळी. हळूहळू शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करणाऱ्या उदंड संघटना निर्माण झाल्या. त्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्या की या संगठण्याच्या मधे स्पर्धा निर्माण झाली. आमीच कसे शेतकऱ्याचे तारणहार. थोडक्यात 'माझ दुकान कस वेगळ' हेच दाखवण्यात वेळ गेला. संघटनेचे शेतकरी नेते मोठे झाले. पण शेतकरी संमस्या तेथेच राहिल्या.परिणामी शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या. शेतीला भाव नाही , पाणी नाही अशाच जोडीला जोड व्यवसाय असला तरी हातात पैसा नाही अशा पद्धतीने शेतकरी पूर्णच खालावला गेला. इकडे विरोधात  असलेला पक्ष जेव्हा मते घेऊन  शेतकरी प्रश्न सोडविण्यासाठी जातो.  पण सत्तेत गेल्यावर सर्व शेतकरी प्रश्न विसरतो . हे प्रत्येक सत्तेवर आलेल्या पक्षाला लागू पडते . शेतकरी मुद्दावर आपल्याकडे येवढे राजकारण शिजते ते कोचीत इतर मुद्दावर होत असेल. शिकलेला वर्ग हा नोकरी करता शहरात राहीला. या वर्गाला मागे पहायला वेळ नाही. पण पैशाला हापापलेल्या  या वर्गाला शेतीची जमीन माञ लागते. हे वैशिष्ट्यच .
         शेतकऱ्यांन मधे खर तर दोन वर्ग आहेत. एक 'प्रस्थापित' आणि दुसरा 'विस्थापित'. सरकार जे कर्जमाफी करते ते विस्थापित वर्गालाच मिळने हे खरे गरजेचे आहे. हा वर्ग कसायला जमीन नसलेला, दुसऱ्याच्या शेतात राबराब राबनारा. अत्यंत गरीब शेतकरी असे याचे वर्णन होऊ शकते. यांनाच खरी कर्जमाफी ची गरज आहे. दुसरा जो वर्ग आहे तो प्रस्थापित. बागायतदार. एक काळ असा होता. बलोरो , सुमो अशा गाड्या फक्त मंञ्याकडे आणि पुढाऱ्यांनकडे दिसायच्या आता अशा गाड्या ह्या शेतकऱ्यांच्या दारात दिसतात. आँइलपेंटचे डबल मजली बंगले गावात रस्त्याच्या कडेला असतात. लाडक्या पोराला बुलेट गाडी असते. आणि वैशिष्ट्य म्हणजे कर्जमाफी द्या म्हणून हेच शेतकरी पुढे असतात. ग्रामपंचायती, सोसायटी , बाजार समिती अशा पदांनवर राजकारण करणारी ही मंडळी विस्थापित शेतकऱ्यांला वर येवुच देत नाहीत. परिणामी खरा शेतकरी पिचलेल्या अवस्थेत तसाच राहतो. तसाच तो राहीला आहे. हे नाकारून चालनार नाही. आपल्याकडे मंञीपद भुषवनारे यांचे व्यवसाय हे शेती असतात. आपण माञ शेतकरी नेता म्हणून अशांना निवडून देतो. तरीसुद्धा शेतीचे प्रश्न सुटत नाहीत. हे आश्चर्यच म्हणावे लागेल. शेतीच्या प्रश्नावर पूर्वीपासून लढलेल्या , शेतीवर प्रेम केलेल्या थोर नेत्यांचा हा आपण अपमानच करत आहोत !  शेतकऱ्यांना खाल्लं कोणी. तर कुणा एकाकडे बोट दाखवून चालनार नाही. खाल्लं..तुम्ही , आम्ही , सर्वांनी.


जयंत जाधव ‘क्षितिज’,लातूर.

       शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणी शेतकरी अर्थातच लोकशाही व्यवस्थेचा आधार.कल्पना करा हा कणा व आधार जर मोडला किंवा नष्ट झाला तर तुमच्या आमच्या जीवनात किती वादळ येईल….बरोबर ना मित्रांनो. सध्या शेतकऱ्याला खाल्लं कुणी व का? यावर चर्चेसाठी एखादा शो करणे व  टि.व्ही चॕनेलचा टि.आर.पी वाढवण्यासाठी करण्या पलीकडे कुणालाच स्वारस्य नाही.
मुळ विषय शेतकऱ्याला खाल्लं कुणी व का? यावर उत्तर असे देता येईल सर्वात जास्त सरकार व राजकीय पुढारी.सर्वात अगोदर सरकार शेतकऱ्याला कसे मारक आहे,मारते किंवा खाते ते पाहु या.सरकारी पॕकेजमुळे आत्महत्त्या थांबत नाही,असा काहींचा निष्कर्ष आहे. परंतु ते पॕकेज स्वरूपावर अवलंबून आहे. कर्करोगाच्या रुग्णाला  तापीच्या औषधाचे  पॕकेज म्हणूनच डोस द्यायचा. रुग्ण बरा झाला तर ठिक पण मुळातच बरा होईल कसा? व समजा रुग्ण मेलाच तर तो अज्ञानी ,मनोरुग्ण,दारुडा होता,त्याने औषधे घेतले नाही, असा काहीसा बावळट आरोप लावले जातात .त्या ऐवजी पॕकेजच्या मूळ स्वरूपातच गफलत झाली, रोगाचे निदान करण्यात,औषधांची निवड करण्यात चूक झाली हे कबूल करण्यासाठी लागणारी मानसिक औदार्यता सरकारमध्ये केव्हा  येणार ?
         कुणी एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली की त्यावर उपाय शोधण्या ऐवजी अथवा मदत करण्या ऐवजी राजकीय पुढारी घाणरेडे राजकारण करतात.जिवंत पणी जितके हाल झाले नसतील तेवढे हाल त्या आत्महत्यावाल्या शेतकऱ्यांची मेल्यावर होते."शेतकरी मरतोय तर मरू द्या पण त्याच्या आत्महत्येची कारण-मीमांसा करणे आणि उपाय सुचविणे बंद करा" अशा स्वरुपाची आत्मक्लेशी प्रतिक्रिया शेतकरी समाजमनात निर्माण झालेली आहे.
      सामान्य माणूस ही शेतकऱ्यांना मारक ठरतोय. पंचतारांकित हॉटेलात वेटरला १००/- टिप बक्षिसी देतील पण शेतकरी भाजी विकत असताना दोन तीन रुपयाची घासाघीस वाद घालणे, भांडण करतानाची वृत्ती सर्वांनाच परिचयाची आहे.
         पॕकेजची रक्कम हडप करणारे राजकीय पुढारी आणि आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मिळणाऱ्या शासकीय मदतीचा चेक काढण्यासाठी लाच खाणारी नोकरशाही अशा अनेकांनी शेतकऱ्याला स्वतःच्या स्वार्थासाठी खाल्ले आहे. जोवर शेतीविषयक धोरणात कणखरपणा सरकार आणत तोवर शेतकऱ्यांविषयी वरवरची सहानुभूती व वरपांगी देखावा सरकार,सामान्य नागरिक,राजकीय नेते,सरकारी नोकरशाही यांनी करु नये.जगाचा पोशिंदा जगला तरच आपण सर्व जगू हे वास्तव सत्य जाणून सर्वाना विनंती आहे की प्रत्येकाने आपली योग्य कृती करावी.



संजय साळुंके, जळगाव. 
            शेतकऱ्याला खाल्ल ते स्वतःच्या अज्ञानाने , निरागसतेने , लबाड व धूर्त शिकलेल्या , व्यापारी   , राजकीय व्यक्तींवर ठेवलेल्या अतिविश्वासाने . शेतात राबायचं उन्हाची, पावसाची, थंडीची पर्वा न करता. निसर्गाने साथ दिल्यास , उत्पादन चांगले आल्यास व्यापारी भाव पाडणार . मग घामाचा मोबदला सोडा पण बियाणे, मजुरी व खतावर केलेला खर्च पण निघणं मुश्कील. पुन्हा व्यापारी माल मोजताना मापात लबाडी करणार, कोणी माल घेऊन गेल्यावर पळून जाणार, कधी रात्री चोर शेतातून माल चोरून नेणार. मग वर्षभर घरखर्च कसा भागवणार? यात फक्त अल्पभूधारक शेतकरी च भरडला जातो. मोठे शेतकरीच शासकीय योजनेचा लाभ घेतात . यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला माल स्वतः विकला पाहिजे. मधल्या दलालांना बायपास करण आवश्यक आहे. शेतकऱ्याचा माल 20 रुपये किलो घेऊन चकचकीत पॅकिंग करून मॉल मध्ये 100 रुपये किलो विकतात.गरीब शेतकऱ्याचा घाम व रक्त पिऊन व्यापारी परदेशवारी करतात. शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये. माझ्या कडे शेती नाही पण शेतकऱ्यांचं दुःख समजू शकतो. आपण जय जवान जय किसान अशी हाक देणारे पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी पुन्हा जन्माला येण्याची वाट पाहूया.
           


सानप बालाजी,बीड.
         शेतकऱ्याला खाल्लं त्याच्या लोभीपणाने, सरकारने, आणि रासायनिक खताने. ज्या देशाची ओळख कृषिप्रधान आहे त्या देशात शेतकऱ्याची ही अवस्था आहे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. शेतकरी जास्त उत्पनाच्या हव्यासापोटी जास्त रासायनिक खताचा भडिमार वाफर करताना दिसून येतो, यामुळे तात्पुरते तर उत्पन्न जास्त येते पण शेतीचा कस कमी कमी होताना दिसून येतो, यामुळे भावी पिढीचे नुकसान होताना दिसून येतो. येथे शेतकऱ्याची संकुचित वृत्तीचे दर्शन होते.
         शेतकऱ्यांच्या सद्यपरिस्थितीसाठी शेतकाऱ्याइतकेच सरकारही जीम्मेदार आहे. कारण शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही. आणि हमीभाव जरी जाहीर झाला तरी तो मिळत नाही.अशी बरीच कारणे सांगता येतील.



अश्विनी खलिपे, तोंडोली(सांगली).
          भारत हा शेती प्रधान देश आहे असं म्हंटल जातं आणि शेती करणारा शेतकरी असतो. शेती पुरातन काळापासून केली जाते आणि ती खेड्यात जास्त प्रमाणात केली जाते त्यामुळे शेतकरी हे खेड्यातंच आढळतात.
          शेतकऱ्यांना शेतीसाठी पाच गोष्टींची सर्वाधिक गरज असते त्या म्हणजे  १.सुपीक जमीन,   २.पाणी,  ३.मनुष्यबळ,  ४.भांडवल आणि  ५.बाजारपेठ इ. आधुनिकीकरणामुळे सेंद्रिय खतांचा वापर कमी झाला आणि  रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे तसेच जास्त औषध फवारणीमुळे जमिनीची सुपीकता कमी झाली, जमीन नापीक होतं गेली. तसेच माणसांच्या स्वार्थीवृत्तीमुळे निसर्गचक्र असंतुलित झालं त्यामुळे पावसाचं वेळी-अवेळी येणं, कधी वेड्यागत धो-धो पडणं तर कधी नुसती उघडीप, त्यामुळे पिकांना हवं तेव्हा पाणी मिळालं नाही. शहरीकरणामुळे खेडीही ओस पडली, खेड्यात राहणाऱ्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे योग्यवेळी नांगरणी, पेरणी, खुरपणी, काढणी होऊ शकत नाही. खेड्यातील लोक पैशाच्या बाजूने कमकुवत असतातच व त्यात शेतजमिनीवर बँक कर्ज देत नसल्याने तुटपुंज्या पैशात शेती करणं खुप कठीण जातं अशा साऱ्या समस्यांमुळे आधिच उत्पादन क्षमता ढासळते. तरीही यासाऱ्याला तोंड देत शेतकरी शेतातून उत्पादन घेतो. त्यानंतर त्याच्यापुढे खरी समस्या उभी राहते ती बाजारपेठेची. इथं व्यापरीवर्ग त्याच्या मालाला योग्य तो भाव देत नाहीत आणि शेतकऱ्याने स्वतः बाजारपेठेत उतरायचं ठरवलं तर ग्राहकवर्ग अगदी २-३रु.च्या दराबाबतीत ही खुप घासाघीस करतात, पण हाच ग्राहक जर एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर तिथं १००रु ची टीप देताना कधीच हिचकीचत नाही.
          शेतीसाठी शासन ज्या योजना आखते, त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहचतंच नाहीत आणि जर पोहोचल्याचं तर शेतकरी भ्रष्टाचारातून वाचत नाही. म्हणजे काय तर, शेतकऱ्याने पुन्हा पैसा ओतायचा. शेतीसाठी लागणारी अवजारे सरकारकडून येतात आणि मधल्यामध्ये गायब होतात. नाहीतर त्यातही भ्रष्टाचार करून गरज नसते त्याला दिली जातात. देशात उत्पादीत मालाचा साठा असतानादेखील बाहेरून माल आयात करायचा आणि इथल्या शेतकऱ्याच्या पोटावर पाय आणते हे असलं आहे आपलं सरकार. आजकाल कर्जामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण ही खूप वाढलं आहे.
          शेतकऱ्याला खाणाऱ्यांपैकी आणखी एक गोष्ट म्हणजे अज्ञान. शेतकऱ्याच्या सर्वात जास्त आडवं येतं त्याचंच अज्ञान. उत्पादन जास्त होते तेंव्हा बाजारपेठे घसरते हे माहीत असतानाही एखाद्या गोष्टीला चांगला दर मिळाला की सगळे शेतकरी त्याच पिकाच जास्त उत्पन्न घेतात आणि स्वतःच नुकसान करतात. वातावरणाप्रमाणे पीक घेणं, सेंद्रिय खतांचा वापर करणं, ठिबकद्वारे पाणी देणे अशा पद्धतीने सगळेच शेतकरी शेती करताना दिसत नाहीत. उत्पन्न जास्त झालं की तो माल फेकून देण्याऐवजी त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रक्रिया करून बाजारपेठेला आणणे हे क्वचित एखादा शेतकरीच करतो. कधीकधी काही जुन्या पध्दतीचा वापर करणं गरजेचं असताना त्याचा वापर केला जातं नाही. पूर्वी शेतीला जोडव्यवसाय केले जायचे पण आता ते ठराविक ठिकाणीच आढळतं.
     साप, बेडूक, फुलपाखरे, मधमाश्या कोंबड्या, शेळ्या अशा अनेक प्राण्यांना पूर्वीपासून शेतकऱ्याचे मित्र मानलं जातं. पण आजच्या शेतकऱ्यांचं अस मत आहे की पक्षी शेतातील धान्य खातात. पण खरंतर काही पक्षी शेतातील धान्य खात नसून पिकाची काढणी झाल्यावर शेतात पडलेले दाणे टिपतात. कीड नियंत्रण आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम पक्षी करतात. अति रासायनिक खतांच्या वापराने शेतकऱ्यांचे मित्रही संपुष्टात आले आणि याचा परिणाम शेतीवर परिणामी शेतकऱ्यावर झाला.
          माझ्या मते एकंदरीत शेतकऱ्याला खाल्लं ते त्याच्या अज्ञानानेचं, तसेच माणसाने निसर्गाला धक्का लावला, त्यामुळे जो निसर्ग पुर्वी शेतकऱ्याला जपायचा त्यानेही आता त्याला खायला चालू केलं आहे आणि उरलेलं खाल्लं ते सरकारने तेही स्वतःच्या स्वार्थासाठी...




यशवंती होनमाने,कराड.
     "साहेब आम्ही मेल्यावर लाख रुपये देण्यापरीस जिवंत रहायला दहा हजार दया" गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटांतील एक संवाद,अगदी काळजाला घाव करून जातो.किती विदारक सत्य आहे.आज जगाचा पोशिंदा उपाशी मरतो आहे.आत्महत्या करतो आहे.याला जबाबदार कोण ? तर आपणंच आहोत,कारण उत्तम शेती अशी  म्हण फक्त नावाला उरली आहे.सध्या शेती कशी उपयोगीच नही अस चित्र उभ केलय,शेतात कोणाला कष्ट नकोत फक्त आयत पाहिजे.अस सगळ आयत कस मिळेल.काहीतरी चांगल मिळवण्यासाठी कष्ट हे केले पाहिजे.शेतकऱ्यांना खाल्लं या समाजाने,राजकीय नेत्यांनी.सगळे फक्त राजकारण पुरता वापर करून घेतात.
        यासाठी शेतकऱ्यांना एकत्र आल पाहिजे,शेती विकासाचे नवे नवे तंत्रज्ञान माहिती करून घेतले पाहिजे आणि असा सुवर्णकाळ आणला पाहिजे की लोकानी म्हंटल पाहिजे की "उत्तम शेती,मध्यम व्यापार,कनिष्ट नौकरी.शेतकऱ्यांनी शेती सोबत शेती पूरक व्यवसाय पण केले पाहिजेत.फक्त शेतीवर अवलंबुन न रहता शेतीपुरक जोड धंदा करवा.आत्महत्या करून आपले कुटुम्ब वार्यावर सोडायचे नाही.
      आपण कष्ट करून नवीन आदर्श ठेवायचा.



पल्लवी मंगल राधेश्याम वाघ,बुलढाणा (पुणे) .
      जगाचा पोशिंदा ना तो..? मग त्याचच का मरण..? त्याच्यावरच का येते आत्महत्येची वेळ त्याला कारण आपलच सरकार,आपलाच नेता -आपणच निवडुन दिलेला, आपलीच मुले, आणि आपणच. दुसर खाणार तरी त्याला कोण..? 
तर तुम्ही आम्हीच खाललय त्याला.
       आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ते कस तर ऐका.. 
सगळ्याबाबतीत विचार केला जातो. पण शेतकऱ्याचा प्रश्न तर नेहमीचाच असतो.कितीही केल तरी त्यांच रडणचं असत अस म्हणुन विषय बदलतो तो आपलाच नेता असतो. आपल्यालाच तो हवा असतो.आपणच त्याला मत देतो. त्यांचा तुरीच्या भावाचा प्रश्न नेहमीचाच असतो तर दररोज जेवणात तुरीच्या दाळीचे वरण तुम्ही का खाता. तुरीची दाळीचे भाव वाढवले तर चालणार नाही आणि जेव्हा वर्षभर राबराब राबुन शेवटी शेतकऱ्यावरती तुर विकण्याची वेळ येते त्याच वेळी त्याचे दर कमी केले जातात.. का अस मग ऐरवी माञ तुरीच्या डाळीचे भाव वाढलेलेच असतात. अस तुरीबद्दलच नाही तर प्रत्येक पिकाबाबत आहे. आणि वरतुन परत हेच बोलणार शेतकरी कधीच समाधानी नाही. अहो कर्जमाफी केली जाते ती नावाला आणा नोंदणीला पण वास्तव पाहता ज्या शेतकऱ्याला त्याची गरज आहे त्याचा लाभ त्याला होतच नाही. त्याच्यापर्यंत ती पोहचतच नाही. मग काय म्हणायच शेतकऱ्याला खाल्ल कुणी तर सगळ्यांनी कुणी एकट्यानी नव्हे.याला कारणीभुत सगळेच आहेत.साधी पालक भाजी 1रुपया ने वाढली तर आपलीच मंडईमध्ये कुचकुच सुरु होते आणि चिञपटाची तिकीटं कितीही वाढली तरी आपण चिञपट बघणं नाही सोडत अथवा जिओ च्या नेट पँक चे रेट वाढवले तर आपण अंबानी ला नाही शिव्या नाही घालत. तो आपल्याला लागतोच तिथे नाही आपण कमीजास्त करत मग मंडई मध्ये गेल्यानंतर त्यांच्याशी का भाव केला जातो. मांडायला गेले तर अशी अनेक उदाहरणे आहेत.परंतु प्रत्येकानी यावरती विचार करावा म्हणुन परत एकदा म्हणते की शेतकऱ्याला कुणा एकानी नाही तर सर्वांनी खाललय.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************