संत कबीर यांचे विचार..आजच्या काळात किती उपयोगी.?

संत कबीर यांचे विचार..आजच्या काळात किती उपयोगी.?

शिरीष उमरे. नवी मुंबई

      संत कबीर पंधराव्या शतकातील उत्तरप्रदेशी प्रसिध्द कवी... हींदु व इस्लाम धर्मातील वाईट गोष्टींवर प्रकाश टाकुन त्या नाकारण्याचे धाडस लोकांमध्ये जागवल्यामुळे त्यांचे मित्रांएवढेच शत्रु होते. मानवता धर्म, एक ईश्वर, कर्मकांडावर अविश्वास, प्रेम, शांती सारख्या मुलभुत विचारसरणीचे पर्वक्ते... त्यांचे दोहे आजच्या युवकासाठी डोळ्यात अंजन घालण्याजोगे... पण वाचनार कोण ? महात्मा बसवेश्वरांनी कर्नाटकामध्ये ह्याच गोष्टी कबीरांच्या चारशे वर्षा अगोदर सांगितल्या होत्या. 
      गाडगेबाबांनी खुप मेहनत घेतली होती महाराष्ट्रात तरी पण अंधश्रध्दा व अज्ञान मिटवु शकले नाहीत. संत कबीरांच्या विचारांना शिख धर्मग्रंथ *गुरु ग्रंथ साहीब* मध्ये मानाचे स्थान आहे पण नवयुवकांना आपल्या संतांबद्दल फार कमी माहीती आहे. आपली थोर व खरी परंपरा माहीती होणे आवश्यक आहे. 


जयंत जाधव,लातूर.

        संत कबीर यांनी संपूर्ण आयुष्य मानव कल्याणासाठी प्रयत्न केले.त्यांची कबीरवाणी मध्ये बरेचसे प्रसंग आजच्या काळातही अनुकूल आहेत.भारताला जर खरच एक आदर्श देश निर्माण करायचे असेल तर कबीरवाणीतील विचार खूपच महत्त्वपूर्ण ठरतील.
       संत कबीर एक महान क्रांती असलेले विचारवंत म्हणून नेहमी लक्षात राहतात.सध्या जगात फक्त भारतच नाही तर बरेचसे देशांमध्ये त्यांच्या केलेल्या रचनांवर वेगवेगळ्या प्रकारे शोध सुरू आहेत. आज समाजात जी अशांतता,गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे ती दूर करण्यासाठी संत कबीर यांचे आदर्श एक अनमोल ठेवा आहे.त्या दृष्टीने कबीर यांच्या विचारांनी आपण प्रत्येक सामान्य व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे.
           “ दुर्लभ मानुष जनम है, देह न बारंबार।
          तरुवर ज्यौं पत्ता झरै, बहुरि न लागे डार।।”
      संत कबीर यांचा जन्म अशा काळात झाला कि त्यावेळी सर्व जग हे अशांतीने ग्रासले होते.त्यांनी आपल्या विचारांनी पूर्ण जगात शांती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
संत कबीर यांचा प्रामुख्याने सामाजिक न्यायावर आधारित समाजाच्या निर्मितीवर भर दिला व लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यावर भर दिला व याची आजच्या काळातही आवश्यकता आहे.
       संत कबीर यांनी आपल्या दोहेंमधून जातीभेद व वर्णभेदाला कडकडीत विरोध करुन समानतेचा शंख फुंकण्याचे,प्रेम संदेश निर्माण करण्याचे अनमोल कार्य विश्व नेहमी चिरंतन लक्षात ठेवेल.





डॉ विजयसिंह पाटील. कराड

संत कबीर हे मानवजातीचे, मानवतेचे पुजारी होते, धर्म जात, पंथ, या पलीकडे ते पोहोचले होते.
त्यांनीच हिंदू मुस्लिम समाज एकत्र येण्यासाठी "राम-रहीम"ही ऐक्याची भावना प्रकट केली
माणसाच्या विविध विकारावर त्यांनी, सुंदर दोहे रचले व समाजाला उपदेश केला, जो सद्यस्थितीतही लागू पडतो.
त्यांचे काही दोहे पाहू..
कहे कबीर देय तू, जब लग 'तेरी देह।
देह खेय हो जायेगी, कौन कहेगा देह।।
किती सुंदर दोहा आहे हा, हे माणसा जोपर्यंत जिवंत आहेस, दान देत राहा. एकदा मातीत गेल्यावर तुला मागायला येणार आहे?
धर्म किये धन ना घटे, नदी न घट्ट नीर ।
अपनी आंखो देखिलें, यो कथि कबीर।
धर्म,(परोपकार दान सेवा) केल्याने संपत्तीत घट होत नाही..
जीवन का मर्म समझे।
सही समय की प्रतिक्षा करे।
संतोषी परम सुखी।
कोई भी इंसांन छोटा नही होता।
प्रेम ही सच्चा ज्ञान।
जीवन का मर्म समझे।
सही समय की प्रतिक्षा करे।
संतोषी परम सुखी।
कोई भी इंसांन छोटा नही होता।
प्रेम ही सच्चा ज्ञान।
आसन मार बैठे,
मन मे बहुत गुमान(गर्व)|
पीपल (पेंड), पाथर (मूर्ती)
पूजन लगे,,
गर्व, अहंकार ग्रस्त माणसाने कितीही देवपूजा केली तरी निरर्थकच ..
ह्या सर्व दोह्यातून, त्यांनी मानवाच्या सर्व विकारांवर आसूड ओढलाय...
तोल मोल कर बोल ।
कबीर म्हणतात, भाषा/वाणी यांचा वापर फार विचार करून केला पाहिजे,
मन पर काबू रखें।
आपल्या मनात चांगले विचार जपल्यामुळे मन काबूत राहते
भले जाय बद्री,
भले जाय गया|
कहे कबीर सुनो भाई,
सबसी बडी दया ||
दया क्षमा शांती, हे गुण माणसातून नाहीसे झाले की काय अशी शंका येण्याचा काळ आहे हा !
ईश्वर अंश जीव अविनाशी,
इसिमें काबा (मक्का), इसिमें काशी |
आजच्या घडीला, धर्मद्वेष, जाती द्वेष,  याचे प्रमाण प्रचंड वाढलंय हे आपण पाहतोय. माणसातच, देव आहे, मक्का पण आहे व काशी पण,,.. किती बरोबर लागू पडतो ना हा दोहा ?
अपने को परखो, दुसरो को नहीं...
संत कबीर म्हणतात,'जेंव्हा मी विश्वातील वाईट शोधायला गेलो, तेंव्हा मला काहीच वाईट मिळालं नाही, पण जेव्हा मी माझ्यातच डोकावून पाहिलं, तेंव्हा लक्षात आलं की माझ्या इतके वाईट काही नाही..
आजच्या काळाला हा दोहा बरोब्बर लागू पडतो. बहुसंख्य समाजाला, नीती अनीती, चांगलं वाईट, हे लक्षात येईना झालंय. लोक नीती आचरण मर्यादा व संस्कार ह्यापासून लांब चाललेत. 
म्हणूनच प्रत्येकाने आपल्यात डोकावून पाहिलं पाहिजे.

माझ्या मते, संत कबीर यांनी ज्या काळात हे दोहे लिहिले, परखड टीका केली ती तीस टक्के लोकांसाठी...
आज ती सत्तर टक्के लोकांना लागू पडते.. आपलं काय मत?





*पी.प्रशांतकुमार*
*अहमदनगर*

तुम्ही जसजसा कबीर वाचत जाता तसतसे त्याच्या प्रेमात पडत जात..
कबिराचे विचार आणि आजचा काळ याबद्दल विचाराल तर.. ... तर मला कबिराचा आता हेवा वाटतो की तो आज नाहीये .. कारण...
*पाथर पूजे हरि मिले, तो मैं पूजू पहाड़ !*
*घर की चाकी कोई ना पूजे, जाको पीस खाए संसार !!*
किंवा...

.. *"कंकर पत्थर जोड़ी के मस्जिद लयी बनाय*
*ता चढ़ी मुल्ला बांघ दे क्या बहिरा हुआ खुदाय "*

यात पण हेच तर आहे की परमेश्वराला आत शोधा..
पण आज जर कबीर असता तर भाव न समजता अस लिहिल्याबद्दल दोन्ही समाजांनी त्याला सुळावर चढवलं असत..

आता आजच्या काळातील तथाकथित संतांना खालचा दोहा म्हणजे चपराक आहे .. संतच नाही तर त्यांच्या भक्तमंडळींनीसुद्धा हे समजून घ्यावं..
दोहा:-
*साधू भूखा भाव का, धन का भूखा नाहिं*
 *धन का भूखा जी फिरै, सो तो साधू नाहिं।*
*****
अर्थ:- कबीर सांगतात की साधू नेहमी करुणा और प्रेमाचा भूखा असतो.धन दौलत, पैसा यांची त्याला लालसा नसते.. आणि ज्याला असते तो नक्कीच साधू असत नाही

...धर्म /जात वगैरेंवरून भांडणाऱ्या कत्तरपंथीय लोकांना कबिराचे हे विचार निश्चित अंजन घालणारे ठरतील
*ना कुछ देखा राम भजन में, ना कुछ देखा पोथी में।*
*कहत कबीर सुनो भाई साधो, जो देखा दो रोटी में।।*

मला कबीरजी म्हणजे विद्रोही विचारांचे संत वाटतात..
आज शिक्षणपद्धतीत कबीर असायला हवा..पण नाही आहे तेही बरं.. नाहीतर आपण कबीराच एकूण योगदान 7 मार्क(परीक्षेपुरते) एव्हढच केलं असतं आणि काहींनी तर कबीर optioलाच टाकला असता

असो जाता जाता एव्हढच.
*बुरा जो देखन मैं चला ... बुरा न मिलिया कोय*
*जो दिल खोजा अपना ...  मुझसे  बुरा न कोय*




अश्विनी खलिपे, तोंडोली(सांगली).


          संत कबीर 15व्या शतकातील संत होते. कबीर हे मानवजातीचे व मानवतेचे पुजारी होते. कुठल्याही प्रकारचा धर्मभेद, पंथभेद, जातीभेद मानत नव्हते. भारतातील सर्व समाज एकमताने चालावा व सर्वांनी एकजुटीने राहावं यासाठी अनेक महापुरुषांनी कार्य केलं त्यापैकी संत कबीर एक होते.
          संत कबीरांना हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते. कबीरांचं असं मानणं होतं की राम व अल्लाह हे एकच परमेश्वराची दोन रूपे आहेत. परमेश्वराच्या स्वरूपाला कुठलेच बंधन मर्यादित ठेवू शकत नाही, म्हणूनच कबीर साधुसंतांना व सगळ्या देवांना एकाच परब्रह्मस्वरूप परमेश्वराची लेकरे मानत. संत कबीरांनी तत्कालीन रुढींवर प्रहार केला. तत्कालीन समाजाचे अवगुण त्यांनी अत्यंत परखडपणे दाखवले. निर्भीडता हेच त्यांच्या दोह्यांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यांचे दोहे आजही सर्वांना जीवन योग्यप्रकारे जगण्यास चालना देतात. त्यांनी त्या काळात लिहिलेले दोहे आजच्या समाज्यावर योग्य रीतीने लागू होतात. त्यांनी जीवनाचा खरा अर्थ सांगितला आहे. मी हिंदू नाही, नाही मी मुसलमान माझे शरीर हे पंचमहाभूतांनी बनलं आहे आणि अखेरीस ते त्यातच विलीन होणार आहे हे विदारक सत्य त्यांनी आपल्या दोह्यातून मांडलं आहे.
          संत कबीरांना खऱ्या अर्थाने लक्षात ठेवणं म्हणजे जणू स्वतःला थोडंस कबीर बनवण्याजोग आहे आणि आजच्या काळात संत कबीरांना आपल्या आयुष्यात जगवणं खूप गरजेचं आहे. संत कबीरांनी आपल्या दोह्यातून अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, मानवाने मानवजातीशी कसं वागलं पाहिजे, ऐक्याने राहायला हवे हे मांडले आहे. त्यामुळे जर आपण संत कबीर यांनी सांगितलेल्या मार्गाने जगलो तर आपल्या आयुष्यातील तसेच समाज्यातील अनेक समस्या सुटतील व आपण एकीने राहू शकू. त्यांच्या दोह्यातील प्रत्येक शब्द हा आजच्या पिढीचे मनोबल वाढविण्याजोगा आहे. संत कबीरांच्या तत्वानुसार आपण वागलो तर जगात सुख, शांती निर्माण होईल आणि सर्वच मानवजात गुण्यागोविंदाने नांदेल.

(सर्व प्रतिमा इंटरनेट वरून घेतलेल्या आहेत )

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************