मार्क... हे नुसतेच गुण की गुणवत्ता !

मार्क... हे नुसतेच गुण की गुणवत्ता !

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

मार्क… हे नुसतेच गुण की गुणवत्ता !



Source: INTERNET
-शिरीष उमरे, नवी मुंबई
विषयाचे शिर्षक च आपल्या शिक्षणप्रणालीची शोकांतिका दर्शवते. कालबाह्य पाठ्यक्रम व तात्पुरत्या काळासाठी नेमलेले शिक्षक व त्यांचा शिकवण्याचा दर्जा आणि राजकीय पक्षांचे अतिक्रमण व लुडबुड यामुळे ह्या शियणाच्या बाजारात विद्यार्थी कसे राहणार हे स्पष्ट दिसते आहे. लाखो बेरोजगार इंजिनियर्स, अवाढव्य खर्च केल्याने पेशंट ला कस्टमर समजणारे डॉक्टर्स, करप्शन ला सरकारी मान्यता मिळवुन देणारे वकील व सीए अशी अवस्था असतांना सरकारी नोकरी साठी आस धरुन बसलेले करोडो नवयुवक... स्वयंरोजगार साठी सरकारचे शुन्य प्रयत्न... आणि दलाली, बाबागिरी, गुन्हेगारी व स्मगलींग मधुन मिळणारा झटपट पैसा बघुन ह्यामुळे दिशाहीन झालेला आजचा विद्यार्थी ह्यावर आमुलाग्र बदलाची गरज आहे असे मला वाटते.

Source: INTERNET
-संदीप बोऱ्हाडे, पुणे

    दहावीचा निकाल 8 जून रोजी जाहीर झाला .सर्व यशवंताचे खूप खूप अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा !
ज्यांना यश मिळाले नाही त्यांनी हताश न होता आपल्यातील कलागुण आणि आवड याची जोड देऊन पुढील वाटचाल करावी. फक्त मार्कांवरच आपले यश याचे मापन करू नये आणि पालकांनीही मुलांची तुलना करून त्यांचे खच्चीकरण न करता त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे. आज बऱ्याच वाटा मोकळ्या आहेत ज्यावर कोणी गेलेले नाही.

    आज बऱ्याच मुलांचे मार्क्स पाहून मला तर  आश्चर्य वाटले..कुणालाही विचारले तरी 80 च्या 90 च्या पुढेच मार्क. बोर्डाने बेस्ट ऑफ फाईव्ह याच्या बेसवर निकाल जाहीर करून मार्कांचा फुगा फुगवण्याचा उद्देशच मुळात समजत नाही???? मग परीक्षा सहा विषयांची तरी कशाला ????
बेस्ट ऑफ फाईव्ह याच्याच बेसवर घ्यावी. त्यात ग्रेस मार्क कशाच्या बेसवर????
यामुळे हा निकालाचा फुगा अधिकच फुगत जातो आहे. ७० , ८० आणि 90 त्याच्याही पुढे जाऊन १०० % मार्क्स मिळणेही सहजच झाले आहे. आणि इतके मार्क मिळवूनही पालक  मात्र नाराज आहेत. आजच्या स्थितीला बेस्ट ऑफ फाईव्ह चा फुगा पाहिल्यानंतर आमचे १० वर्षापूर्वीचे कसलेही ग्रेस मार्क्स वैगेरे न मिसळता आणि बेस्ट ऑफ फाईव्हचे मापन न करता मिळवलेले अधिक मोलाचेच मला आज वाटत आहेत.

    माझ्या काळात 10 वीला 35 मार्क मिळवून पास होणे देखील  खूप अवघड होते खूप मुले गणित आणि इंग्रजी मध्ये नापास होत असत मी तर 10 वि ला कसेतरी इंग्रजी मध्ये 35 मार्क मिळवून पास झालो...risult च्या दिवशी तर जीव नुसता खालीवर होत राहायचा पण चेहऱ्यावर आनंद पण असायचा की मी नक्की पास होईल तेव्हढा आत्मविश्वास पण असायचा..आणि निकाल लागल्यानंतर पास झाल्यावर तो आनंद शब्दात नाही व्यक्त करता यायचा. आमच्या काळात मराठी , हिंदी आणि इंग्रजी या भाषा विषयाला कधीही 100 पैकी 100 मार्क कोणाला मिळालेले मला ऐकायला मिळाले नाहीत. आणि आज मुले 100% पाडतात हे विशेष..!!

  दोन दिवसांपूर्वी पेपरमध्ये अस वाचायला मिळाले की,  
125 विद्यार्थ्यांना 100% मार्क मिळाले आहेत ,त्यांच्या कष्टाला सलाम, परंतु त्यांना नाही माहित हे मार्क म्हणजे नुसताच फुगवटा आहे. उदाहरण द्यायचे झाले तर ,
एका मुलाला किंवा मुलीला ९९ % गुण मिळाले आणि त्याला किंवा तिला इंग्रजी किंवा गणित विषयात जेमतेम 50 ते 60 च्या आसपास गुण मिळाले आहेत. पण टक्केवारी जास्त असल्यामुळं ते नक्कीच इंजिनिअरिंग मेडिकल किंवा science ला नक्कीच जाणार. आणि या क्षेत्रामध्ये गणित आणि इंग्रजीचेच वर्चस्व आहे, मग मला सांगा त्या विद्यार्थ्यांचा तिथे निभाव लागेल का ? मग पुढे जर त्याला किंवा तिला तो कोर्स नाही झेपला तर वर्ष आणि पैसे दोन्हीही खर्च होणार आणि नापास झाल्यामुळे त्या मुलाची, मुलीची मानसिकतेचा विचार तर करूच शकत नाही..आणि 10 वी topper science ला जाऊन fail झाल्यावर इतर लोकांचे टोमणे वेगळेच. दहावीला एवढे मार्क्स पाडणारे साधारण ९०% मुलं बारावीला कुठेच दिसत नाहीत...आणि नेमकं त्यावेळी ही मुलं ६०..७० च्या रेंजला आलेली असतात...मेडिकलला, इंजिनिअरिंगला किंवा नीट ला दहावीचे टॉपर्स कुठे गायब होतात यावर सुद्धा संशोधन केले पाहिजे.

    दहावीच्या मार्कांच्या बाबतीत जे लिबरल धोरण ठेवलं मग ते कोणतेही बोर्ड असो त्यांनी या शिक्षणाची वाट लावली हे मात्र नाकारता येणार नाही.
चुकीच्या शैक्षणिक धोरणांवरील मलमपट्टी म्हणजे हे १०वी बोर्डाचे मार्क्स. जखम बरी करण्याऐवजी, एखादे चांगले गोंडस बँडेज बांधणे म्हणजेच हे मार्क्स होत.
मग भले आत ती जखम चिघळली तरी हरकत नाही.
आपली शिक्षण प्रणाली व संबंधित धोरणे वरचेवर चुकीची ठरताना दिसत आहेत.
मूल्यमापन पध्दतीचीच पध्दत कुणी आत्मसात करीत नाही.
काहीही निकष ठरविले जातात.
अजून एक उदाहरण आहे माझ्या परिचयाचे चुक बोर्डाची आहे माझ्या परिचयातील एक उदाहरण आहे मागच्या वर्षी एका मुलाला 102% पडले होते
98 + स्पोर्ट 25 ..अजब कारभार आहे.

    कस आहे माहितीये का ?? जर 90% मार्क्स नाही मिळाले तर science ला लोक कमी जाणार Classes चा बाजार बंद पडणार . इंजिनिअरिंग ला खूप कमी जण जातील.. मेडिकल ला पण संख्या कमी होईल आणि हा सगळा जो पैश्यांचा बाजार चालतो तो पूर्णपणे कोलमडून पडेल त्यासाठी हा फुगवटा सुरू आहे. सुरुवातीला science नको म्हणणारे मुलांचे मार्कस पाहुन science ला प्रवेश घेण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. ही मुलांची आणी पालकांचीही फसवणुक आहे.फक्त निकालाचा आलेख वाढवला जात आहे. नाहीतर हा बाजार बंद झाला की , जे राजकारणी शिक्षणसम्राट आहे त्यांचा शिक्षणाचा धंदा बंद पडायला वेळ लागणार नाही..आणि बहुतेक मंत्री कोणत्याही पक्षातील असो यांचीच शाळा आणि कॉलेजेस आहेत.

     वाईट याचेच वाटते की यात ग्रामीण भागातली मुले सर्वात जास्त भरडली जात आहेत कारण ते काहीतरी स्वप्न घेऊन शहरातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करायला आपल्या तुटपुंज्या साधनांसह येतात आणि मोट्या प्रमाणावर निराशा पदरी घेऊन जातात. वास्तवाचे भान सुटले की काय होते त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे दहावीच्या निकालाचा फुगवटा.
१० वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या
सर्व विदयार्थ्यांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा...!!
आणि हो १० वी मध्ये थोडे चांगले मार्क मिळाले म्हणून भावनेच्या भरात Science ला जाऊ नका..तुमची आवड कश्यामध्ये आहे तिकडे जा..!!


Source: INTERNET
-किरण पवार, औरंगाबाद

                  निकाल लागला की, जवळपास पुढच्या विचारांची म्हणजेच *फ्युचर प्लँनिंगची* तयारी सूरु झालेली असते आणि हालचालींना वेग आलेला असतो. मग ती परीक्षा दहावीची असो, बारावीची असो वा इतर मेडीकल,  फार्मसी, इंजिनीअरींग अशा क्षेत्रांच्या परीक्षा असोत. बऱ्याच वेळेला दिसून येत की, मार्कस् मुलांना चांगले मिळतात पण पुढे काही निर्णय चुकीचे होऊन लाईफ रिव्हर्स येते. *गुणवत्ता इतक्या लवकर कधीच ठामपणे ठरवली जाऊ शकत नाही जितक्या लवकर आपली प्रवेश प्रक्रिया होते.* मुल चुकतात ऐन उमेदीच्या वळणावर कारण दहावीच्या आधीच्या जगात पालक मुलांना *निर्णयक्षमता* काय असते? याची प्रचितीच येऊ देत नाहीत.
                 ही गोष्ट आपण सकारात्मकतेने घेतचं नाही, हीच मोठी मेख आहे. आपण बोलतो, एकदा पाण्यात पडला की, शिकेल आपणहून. माझ्या मते तरी आपण हा आपला कॅज्युअल ॲप्रोच शिक्षणाच्या बाबतीत तरी काढून टाकला पाहिजे. कारण बऱ्याचदा या दबावाखाली मुलं आयुष्य मन मारुन जगतात. काही आत्महत्येच टोकाचं पाऊल उचलतात; हे आणखी वेगळ सांगायलाच नको. बऱ्याच वेळा नातेवाईक काय म्हणतील? यासाठी मुलांना एखाद्या विशिष्ट शिक्षणासाठी प्रवृत्त केलं जातं. सवांदही अशा ऐन निर्णयाच्या उंबरठ्यावर पालकांनी त्यांच्या पाल्याशी जास्त करायला हवा जो की, सहसा फारसा होतं नाही.
                विद्यार्थी आत्महत्या कमी झाल्या पाहिजेत; एवढचं महत्वाच. कारण प्रत्येक सजीव स्वत:त एक विशिष्टता घेऊन जन्माला येतो आणि ती हक्काने त्याला जगासमोर मांडता यायला हवी. *कमी गुण असणाऱ्यांकडे गुणवत्ता नसतेच हा विचार चुकीचा आहे.* बाकी मार्कस... हे नुसतेच कागदावर मर्यादित राहण्यापेक्षा त्या जिवात दिसावे असं मी मानतो.......


Source: INTERNET
-वैभव डेंगळे

मार्क हे नुसतेच गुण आहे गुणवत्ता अजिबात नाही
निकाला वरील मार्क पाहून मुलगा खूप हुशार वाटतो पण ज्या विषया मध्ये टॉपर आहे त्याच त्याला प्रेझन्ट करता येत नाही कारण त्याला फक्त गुण पाडून पुढे जाऊन उभे राहायचे असते
पण तो हे एक गोष्ट विसरून जातो की मार्क मिळवायच्या नादात तो आपली गुणवत्ता हरवून जातो


Source: INTERNET
-स्वप्नील चव्हाण, बुलढाणा

  विषय थोडा मजेशिर आहे ....कारण एक बाजू अशी येते की फक्त परीक्षेत आलेले गुण म्हणजे तुमची गुणवत्ता म्हणता येत नाही......पण त्याच गुणांच्या आधारे गुणवंत कोण आहे...हे ठरवलं जात......मग नेमकं गुणवंत म्हणायचं तरी कोणाला.....??
गुणवत्ता म्हणजे काय....??

जर सरळ विद्यार्थी दशेबद्दल बोलायचं झालं तर....कर्मवीर भाऊराव पाटील नेहमी म्हणायचे...वर्गात शिकवलेल विसारल्यानंतर जे तुमच्या डोक्यात उरतय त्याला आपण विद्यार्थ्यांची गुणवत्ता म्हणूयात.......... म्हणजे फक्त गुणपत्रिकेला आलेली मार्कांची सूज म्हणजे गुणवत्ता नव्हे........
पहिले तर फक्त शैक्षणिक क्षेत्रातच गुणवंत असावं असं काही नाही....गुणवत्ता ही आपल्या व्यक्तिमत्व विकास करणाऱ्या कोणत्याही क्षेत्रात असू शकते.....
पहिले तर जे"शिक्षण" आपण घेतोय तेच आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी असत हे आपण बऱ्याचदा विसरून जातो......महात्मा गांधी शिक्षणाबद्दल बोलताना नेहमी म्हणायचे....."EDUCATION IS THE POWERFUL WEAPON WHICH BRINGS NEW CHANGE IN OUR PERSONALITY"
...म्हणजे शिक्षण हे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी एक महत्वाच शस्त्र आहे.........म्हणून येणाऱ्या गुणांबरोबर ज्याचा सर्वांगीण विकास होतोय त्याला आपण गुणवंत म्हणूयात........

"3 idiots" या चित्रपटामध्ये खूप महत्त्वाच वाक्य आहे एक......"कामयाब मत बनो ....काबिल बनो....कामयाबी झक मारके आपका पिछा करेगी...."

तर या "कामयाबी" ला आपण गुणवत्ता म्हणूयात......कारण फक्त नोकरी मागे पाळणारे चांगले मार्क्स नक्की मिळवतील पण ते यशस्वी होतील हे नक्की सांगता येत नाही.........
सगळं इंग्रजी येत असतानाही जर तुम्ही कोणापुढे दोन वाक्य बोलायला घाबरत असाल तर तुम्ही गुणवंत नाहीत......कारण" चाबकाच्या भीतीने तर सर्कस मधला वाघ पण खुर्ची वर बसतो.... पण त्याला आपण well trained म्हणतो.... well educated नाही...." हे पण "3idiots" मधलं एक वाक्य.......
तर फक्त गुण मिळाले म्हणून तुम्ही गुणवंत झालात अस काही नाही......पण गुण मिळालेले गुणवंत नाहीच अस पण मी म्हणणार नाही.....कारण कोणतंही काम करायचं असू द्या ....गुणवत्ता शेवटी लागतेच......
पण परीक्षेत कॉपी करून चांगले गुण मिळवणे म्हणजे गुणवत्ता नव्हे........
एक थोडा सामाजिक हेतू पण असतो शिक्षणाचा...जो कदाचित सर्वात जास्त दुर्लक्षित विभाग आहे.......डॉ.बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे....''EDUCATION IS A POWERFUL WEAPON WHICH BRINGS NEW CHANGE IN OUR PERSONALITY.... It's true but when....IF EDUCATION SYSTEM TEACHES WHAT HAPPENS IN SOCIETY..OR ...STUDENTS DO THAT TYPE OF WORK WHICH TEACHES IN CLASSROOM"...म्हणजे एक तर वर्गात जे शिकवलं जातं ते समजात घडू दे....किंवा जे समाजात घडतं ते वर्गात शिकवल जाऊ दे......पण आपल्या शिक्षण व्यवस्थेची शोकांतिका म्हणजे या दोन्हीपैकी एकही गोष्ट समाजात घडत नाही.......
तर या आपल्या शिक्षणाच्या आपल्या गुणांमागचे हे व असेच अजून उद्देश जाणून घेत जो वाटचाल करतोय त्याला आपण गुणवंत म्हणूयात........
गुणवत्ता ही फक्त मार्क्स पुरती विशिष्ट नसते.....डॉक्टर बनायला पण गुणवत्ता असावी लागते.....अभियंता बनायला पण गुणवत्ता लागते.....नेता...बनायला राजकारण करायला पण गुणवत्ता लागतेच..........
म्हणून गुणवत्तेच्या नावाखाली आपण कुणाच्या तातखलच मांजर होत नाहीयेत याची काळजी घ्यावी......आपली आवड आपलं करिअर बनलं...तर त्या क्षेत्रात तो व्यक्ती गुणवंत झाला असं आपण म्हणूयात.....

"विद्या बलंच उपास्व"

किंवा "विद्या विनएन येते"
ह्याप्रमाणे जर वागलात आणि ती विनयशीलता आणि ते बल आपल्या अंगी आले तर नक्कीच आपण...समाजात चांगली प्रतिमा निर्माण करू शकतो....आणि एक चांगला व्यक्ती बनणे.... ही माझ्या मते तरी सर्वश्रेष्ठ गुणवत्तेचं प्रतीक आहे........

कारण पुस्तकं सगळे वाचतात पण त्यातील विचारांचे आपल्या जीवनात वापर फारच कमी जण करतात....कारण गुणवत्ता शेवटी लागतेच .....।।।
तर सर्व युवकांना माझं आव्हान राहील की गुणवंत व्हा.....गुण सर्वच मिळऊ शकतात......

धन्यवाद.....!!

Source: INTERNET
-R. सागर, सांगली
.
परवाच 10वीचा निकाल जाहीर झाला. एखादं अपवादात्मक वर्ष सोडलं तर नेहमीच 60-70 टक्क्यांच्या घरात असणारा माझ्या शाळेचा निकाल गेल्या काही वर्षांमध्ये मात्र सातत्यानं 90 टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. तेच वैयक्तिक विद्यार्थ्यांच्या बाबतीत. आमच्या वेळी 70 टक्के मिळवणारा विद्यार्थी फक्त शाळेतच नव्हे तर संपूर्ण परीक्षा केंद्रात टॉप 10 मध्ये नक्कीच असायचा. पण आता 90 टक्के घेणारादेखील टॉप 10 मध्ये असेलच याची खात्री नाही. इतकी गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. आणि ते विद्यार्थीही अभिनंदनास पात्र आहेत.
.
पण खरी परिस्थिती काय आहे? खरंच गुणवत्ता इतकी वाढली आहे का? कारण परवाच एक बातमी आली की सध्याच्या पद्धतीनुसार शाळेमधून द्यायचे जे 20 गुण आहेत त्या 20 पैकी सरासरी 18 गुण दिले जातातच. आणि कदाचित यामुळे देखील यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.
.
साधी गोष्ट आहे. एखादं लहान रोप वाढत असताना ऊन, वारा, पाऊस या सगळ्यातून तावून-सुलाखून निघत असेल तर नक्कीच ते एखाद्या मोठ्या वादळात तग धरू शकेल. करण त्याची मुळे कुठेतरी खोलवर गेलेली असतील. पण जर त्या रोपाच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्याच गोष्टी जर त्याला सहज मिळत गेल्या तर मात्र रोपाची वाढ नक्कीच चांगल्या प्रकारे होईल पण एखाद्या वावटळातदेखील ते रोप उध्वस्त व्हायची शक्यताच जास्त. अगदी तसंच गुणवत्तेचंही आहे. जर तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर आणि तरच तुम्ही या स्पर्धेच्या वातावरणात टिकून राहू शकाल. आणि म्हणूनच हा जर गुणांचा फुगवटा असेल तर तो कमी करून गुणवत्ता निर्माण करायची जबाबदारी पालकांनी आणि शिक्षकांनी घ्यायला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनीही त्याला योग्य तो प्रतिसाद देण्याची गरज आहे.
.
शेवटी एकच कुठेतरी वाचलेलं. जर तुम्ही पहिल्यांदा यश मिळवलं तर कदाचित तो अपघात असू शकतो. दुसऱ्यांदा यश मिळवलंत तर तो योगायोग असू शकतो. पण जर तुम्ही तिसऱ्यांदादेखील यशस्वी झालात तर मात्र ते तुमचं आणि तुमच्या प्रयत्नांचं यश आहे. आणि सध्याच्या सर्व यशवंत-गुणवंत विद्यार्थ्यांकडून याच तिसऱ्यांदा मिळणाऱ्या गुणवत्तापूर्ण यशाची अपेक्षा आहे..
Source: INTERNET
-सीमाली भाटकर, रत्नागिरी

      या विषयावर चर्चा सुरू केली आणि अनेक प्रश्न डोळ्यासमोर येऊ लागले. थोड्याच दिवसांपूर्वी10 वी व 12 वि चे निकाल लागले आणि प्रचंड मार्क मिळवुन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पण मुळात हे मार्क्स त्यांच्या बुद्धी चा कौल देतात की फक्त कागदावरील आकडेमोड काहीच कळत नाही याला कारण आहे कारण10 वी ला 100 % मार्क मग ते मूल नेमका कसा अभ्यास करते हा शोधाचा विषय होऊन बसेल.

       बेस्ट ऑफ फाईव्ह , आठवी परयंत पास करायचे ही शैक्षणिक धोरणे किती योग्य यातून मूल पास होतात पण त्यांना भविष्यात काय करावे किंवा नेमके त्यांची बुद्धिमत्ता काय हे न त्यांच्या पालकांच्या लक्षात येत ना मुलांच्या आणि जेंव्हा वास्तव समोर येते तेंव्हा खूप उशीर झालेला असतो. कारण विद्यार्थ्यांना असच वाटत की त्यांना सर्व येत आणि इथेच त्यांचं नुकसान होऊ लागले आहे. कारण अभ्यास कसा करावा मेहनत करून मार्क मिळवणे याची जाणीव त्यांना राहिलीच नाही.
      शिक्षण यंत्रणेने गणित सारखा विषय उच्च गणित मध्यम गणितं अशा प्रकारे ठेवला त्यामुळं गणिताची भीती बाळगून अभ्यास करणारे विद्यार्थी बिनधास्त पास होऊ लागले . पण याचे तोटे लक्षात घेणे फार गरजेचे आहे कारण आज ही मुलं पास होतात पण भविष्यात त्यांची बुद्धी आणि विचार क्षमता कमी होते त्यांचा अभ्यास कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.
      आणि म्हणूनच आज स्पर्धा परीक्षा सारख्या ठिकाणी महाराष्ट्र मागे पडला. कारण बेस्ट ऑफ फाईव्ह च्या नादात आपण खरा आपल्या विद्यार्थ्यांना मागे पाडू लागलो.
   या मुलांच्या मार्क वरती किंवा त्यांच्या गुणांवरती आक्षेप नाही परंतु आपली शिक्षण पद्धती सुधारली पाहिजे. कारण तिथेच आपला त्या विद्यार्थी मित्रांचा आणि संपूर्ण महाराष्ट्रा चा विकास घडू शकतो असे मला वाटतं.
नाहीतर आज 7 वी पास शिपाई भरती साठी BE, BA, सारखे पदवीधर लोक फॉर्म भरून देऊ लागलेत हा बेरोजगारी चा प्रश्न आहे परंतु याला जबाबदार शिक्षण पद्धती आहे.
       म्हणून इतकंच म्हणायचे आहे की शिक्षण पद्धती बदला आणि व्यक्तिमत्त्व विकास घडवा.
    कारण कागदोपत्री गुणांनी काहीच साध्य होत नाही.  
धन्यवाद



Source: INTERNET
-गणेश मोरे,चिपळूण

   चार दिवसांपूर्वी दहावीचा `फुगा` फुटला ; म्हणजेच वर्षभरात त्या फुग्यात किती हवा भरली हे समजलं. फुग्यात भारदार हवा भरलेल्या पोरांचं अभिनंदन ( रितीनुसार ).आणि बाकीच्यांनी पुन्हा एकदा दीर्घश्वास घेऊन हवा भरायला लागा.
दहावीच्या/ बारावीच्या निकालावर माझे वयक्तिक मते, जी तुम्हाला पटाविच अशी माझी काडीमात्र इच्छा नाही.
#1 दहावीचा निकाल लागल्यानंतर दहा दिवसांनंतर बाजारात कोथिंबीरच्या जुडीला जेवढी किंमत मिळते तेवढी किंमत ह्या निकालाच्या कागदाला सुद्धा मिळत नाही ( काही कागद अपवाद असतात ); म्हणजेच त्या कागदाचा उपयोग पुढील इयत्तेच्या एडमिशनची फी करण्यासाठी मात्र नक्की होतो.
#2  दरवर्षी महाराष्ट्रात `कोंकण` बोर्ड जरी अव्वल येत असलं तरी, कोकणची पोर किती हुशार आहेत हे कोंकण सोडून संबंध महाराष्ट्राला माहित आहे; भविष्यात ते दिसतच म्हणा. (मी कोंकणी आहे )
#३ `13% अभियंते फक्त कार्यशम`,`बेरोजगरीचा दर 0.7% ने वाढला`, `हतात degree असून सुध्दा घरी बसव लागत` ह्या सगळ्यांची पाल~मुळ ह्या निकालात रोवली जातात...
दहावीची परीक्षा घेणे म्हणजे `ठोकले` निर्माण करण्याचं काम आहे. साचा आमचा तयारच असतो.
    आज शिक्षणाची आवस्था ही `बढा घर पोकळ वासा, वारा जाई भसा भसा` ह्याप्रमाणे काहीशी झाली आहे. कारण आमच्या हातात जरी विद्यावाचस्पती (P.Hd.) सारख्या जरी डिगर्या असल्या तरी आम्हाला एखाद्या वनवास्याप्रमाणे भटकाव लागत आणि अनुभवाची जोड असली तर जॉब मिळतो नाहीतर फक्त P.Hd (अन्य डिगर्यांचे) पेटंट घेऊन नावाच्या पुढेमागे चीपकाव लागतं. आजचे शिक्षण हे गुणांचे प्रशस्तीपत्रक देण्यापुरते राहील आहे. असे गुण ज्यांची किंमत कागदावर जास्त असते आणि बाहेरच्या जगात कमी. आजचा विद्यार्थी हा गुणांच्या मागे जीव तोडून धावत आहे त्यामुळे त्याच्या ज्ञानाच्या कक्षा आकुंचित पावत आहेत. विद्यार्थी आपल्यातील सुप्त कौशैल्यांना कधी वावच देत नाही. कारण त्याचे आयुष्यात एकच उद्दिष्ट असते ते म्हणजे दोन अक्षरं शिकून चार पैसे कमावणे नी घरच्यांची उपजीविका करणे. ह्या गोष्टीला विद्यार्थी जितका जबाबदार  आहे त्याहून जास्त समाज आणि महाविद्यालये जबाबदार आहेत अस मला वाटतं. चांगल्या नोकरीसाठी जितकी गुणांची अवशक्याता आहे त्याहून जास्त गुणवत्तेची आहे, हे विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे.
       शेवटी `वपू`ना स्मरून ``कबुतराला गरुडाचे पंख लवता    येतीलही,पण गगनभरारीचे वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.``
समजलं ना, अर्थातच तुम्ही टॉपर अहात. तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप (सावधानी) शुभेच्छा.


Source: INTERNET
-यशवंती होनमणे, कराड

 मार्क म्हंटल आपल्याला फक्त आकडे दिसतात 90%,95%,98%,100% ....पण विचार केला तर सध्याच्या युगात हे कितपत उपयोगी आहे ? आपण बघतो फक्त टक्के बाकी काहीच नाही.कारण आपल्याला वाटत की फक्त टक्केवारी महत्वाची आहे.पण अस नसत.समजा एखाद्याला असतील चांगले टक्के म्हणजे तो खूप हुशार झाला का?नाही कदाचित तो फक्त अभ्यासात हुशार असतील पण जगाच्या बाजारात त्याची काय किम्मत.अभ्यासात चांगले मार्क्स मिळवणारे जगाच्या बाजारात कुटेतरी कमी पडतात कारण त्याना फक्त अभ्यास माहीत असतो बाकी काही नाही.
       हल्ली तर घरचे लोक त्या टक्केवारी च्या इतके मागे लागतात की मुल frusted होऊन आत्महत्या करतात.कोणी सांगितल की चांगले मार्क्स मिळले म्हणजे खूप हुशार झालात  का ? अहो जगाच्या बाजारात कुट किम्मत आहे.तिथे लागते ती गुणवत्ता.माज्या ऑफीस मधील मैत्रीण आहे तिच्या मुलीला 10 वी ला 89% टक्के मिळाले तिला डाँस मध्ये करीअर करायच आहे.घरचे तयार झाले.त्याना महत्वाची आहे ती तिची आवड.असच जर सगळे पालक विचार करू लागले तर विध्यार्थी आत्महत्या होणार नाहीत.
    थ्री इडियत मध्ये रँचो चा डायलॉग आहे "काबिल बनो कामयाबी झक मारते हुये आयेगी ".त्या फिल्म मधील जसे farhan चे वडील वागले तसच आपले ही वागतील का ? सगळ्याला हे थोडं फ़िल्मी वाटेल.वाटेल की ती फक्त फिल्म आहे खऱ्या आयुष्यात हे अस नसत.पण विचार करा .....आपल्याला काय महत्वाचे आहे मार्क ...गुणवत्ता ...की ...आपले मुल ....


Source: INTERNET
-समीर सारागे, नेर

सद्या निकालांचा हंगामा सुरु आहे. 10 वी व 12 विच्या परीक्षेत मिळालेल्या घसघशित यशामुळे गुणवंत विद्यर्थ्यांचे  अभिनंदन स्पर मोठ मोठे शुभेच्छा फलक व वृत्तपत्रात जाहिराती सर्वत्र झळकत आहे. या सर्वच विद्यर्थ्यांना मनापासून शुभेच्छा व अभिनंदन ,

या सर्व घडामोडित एक बाब प्रखर्शाने जाणवते की,  आपल्या राज्यातील आज सर्वच विद्यालय व महाविद्यालयाचा 10 वी 12 वी चा निकाल  हा सरासरी 90 ते 92 % च्या वरच लागला आहे.हे येथे विशेष.
आज सर्वत्र खाजगी शिकवनीचे अमाप पिक आलेले आपल्याला दिसून येईल, इतकेच नव्हे तर गल्ली मोहल्यात देखील खाजगी शिकवनी(Coaching Classes) सुरु झाल्या आहेत. 10 वी ,12 वीत जायच्या आधी पासुनच म्हणजे अगदी बाल वया पासुनच मुलांचे शिकवनी वर्ग सुरु होऊन जातात आणि या शिकवनी म्हणजे अलीकडे थाटलेल्या दुकाणदारयाच म्हणा ! आमची शिकवनी किती दर्जेदार आणि ऊत्तम आहे हे पालक व मुलांना पटवून देण्याचा प्रयत्न यांच्या द्वारे केल्या जात असतो मग आकर्षक जाहिराती, विविध ऑफर्स , आमच्याच शिकवनी मध्ये जर मुलांना टाकल्यास तो 99 टक्के गुनानी पास होईल वैगरे वैगरे अमिषे दाखविलि जातात आणि हा बिजिनेस अलीकडे फार तेजीत आहे. त्याचे कारण देखील तसेच आहे. कारण सर्वच  पालकाना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी असते. आपल्या मुलाने परीक्षेत जास्तीत जास्त गुण प्राप्त करावे व तो या स्पर्धेत टिकावा आणि हिच एक महत्वकांक्षा आणि प्रामाणिक उद्देश्य प्रत्येक पालकांचा त्यामागे असतो. आणि तो असणे स्वाभाविक आहे.

प्रत्येकच पालकाला आपला मुलगा डॉक्टर इंजीनयर व्हावा हिच अपेक्षा असते. आणि तो चांगले मार्क्स मिळाले की सहज डॉक्टर किंवा इंजीनयर होईल व त्याला विदेशात एका चांगल्या पैकेजची नोकरी मिळेल  व भविष्यात तीथे स्थाईक होऊन आरमात आपल्या कुटुंबाचा मतीतार्थ चालवेल बस्स इतक्या सोप्या भाषेत ते आपल्या पाल्याच्या सुखी व समृद्ध जीवनाचे स्वप्न रंगवत असतात. परंतु ईथ पर्यंत जाने देखील इतके सोपे नाही. केवळ 10 वी 12 वीत 99% मार्क्स मिळाले म्हणजे समोरची वाट सहज पार करता येईल असेही नाही. कारण चांगल्या कॉलेज मध्ये अभियांत्रिकी करिता प्रवेश मिळविण्यासाठी जेव्हा AIEEE व JEEE सारख्या पूर्व परीक्षा द्याव्या लागतात तेव्हा हेच 90%, 95% वाले तीथे मुळीच टिकाव धरु शकत नाही ही वस्तुस्थिति आहे. मग क़ाय चाटायचे  का तुमचे 95% मार्क्स ? मग या सर्व शिक्षण संस्थावर प्रश्नचिन्ह उपस्थित होने स्वाभाविक आहे. आज 35 %वाला देखील इंजीनियरिंग करत आहे. परंतु IIT ,MIT ,VNIT सारख्या दर्ज़ेदार अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळविण्या करिता तुमचे मार्क्सची टक्केवारी नाही तर पूर्व परीक्षेत तुम्ही किती यश मिळविले यावर प्रवेश निश्चित केला जात असतो.
90 च्या दशकात जितका इंजीनियरिंग  करण्याच अप्रूप वाटायच तितकं आता राहिलं नाही. कारण इथे गुणवत्ता नाही तर डोनेशनची दुकाने सर्वत्र  थाटल्या गेली आहेत. व हा एक व्यवसाय होऊन बसला आहे. आज केवळ एकटया महाराष्ट्र राज्यातील विविध महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या 80  हजारच्या वर जागा आज रिक्त आहेत ईतकी दैणा अवस्था आज या क्षेत्राची आहे. मग भारतात तर विचारायलच नको!
अलीकडे जेवढी औद्योगिक क्रांति झाली तेवढ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला नाही
मागच्या दोन तीन दशकच्या आधिच्या परिस्थितिचा आपण विचार करु ! उदा.तेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला 90% गूण मिळाले की तो सहज अभियांत्रिकी या क्षेत्राची निवड करायचा चार वर्षाच्या या शैक्षणिक कालावधीत त्याला महाविद्यालयीन कैम्पस द्वारे  एखादी कंपनी त्याची निवड करायची व चांगल्या पैकेजची नौकरी त्याला सहज प्राप्त व्हायची देखील. म्हणून कोणताही पालक वर्ग आपल्या पाल्याला इंजीनियर बनविन्याचे स्वप्न उराषि बाळ गत असे ! कारण तेव्हा बोटावर मोजन्या इतकेच अभियंते तयार व्हायचे याचे कारण आता सारखी कुत्र्याच्या छत्रर्या सारखी इंजीनियरिंग कॉलेजेस तेव्हा नव्हती  व 21 व्या शतका सारखी औद्योगिक प्रगती देखील झाली नव्हती तरीही सहज जॉब मिळत असे कारण तेव्हा मोजकीच आणि दर्जेदार अभियांत्रिकी महाविद्यालये होती मात्र आता हजारों अभियांत्रिकी महाविद्यालये आणि त्यातून लाखो बेरोजगार अभियंते निघत आहेत मग यातून गुनवत्तेचा शोध घ्यायचा कुणी ? कारण 4% भारतीय अभियांत्रिकी महाविद्यालये जर सोडली तर बाकी गुनवत्ता शून्य आहेत असा मागिल दोन महिन्या आधीचा अहवाल होता

आता त्याची जागा 10 वी व 12 वी ने घेतली आहे. कारण आपले शैक्षणिक धोरणच पूर्णता बदलले आहे. की, कोण्याच विद्यर्थ्यांला नापास न करणे व टक्केवारीची खिरापत वाटन्याचे धोरण आज राबविल्या जात आहे यामुळे आपले राज्य जगाच्या पटलावर शैक्षणिक दृष्टया प्रगतशील जरी दिसत असले तरी गुणवत्त्ता आणि दर्जात्मक शिक्षणा विषयी कमकुवतच आहे.

अलीकडे एका ताज्या आकडेवारी नुसार ज्या महाराष्ट्रात केवळ SSC चे 48000 च्या जवळपास 90 पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी आहेत आणि त्यात भर CBSE आणि ICSE ची घातली तर हा आकडा 60000 च्या आसपास जाईल तिथे राज्याच्या MHTCET मध्ये 200 पैकी 190 च्या वर गुण घेणारे केवळ 10 विद्यार्थी आणि 75 टक्के म्हणजे 150 गुण घेणारे केवळ 2889. म्हणजे 60000 पैकी केवळ 5 % विद्यार्थी. आता बोला. काय करायचं या दहावीच्या गुणवत्तेचं.
MHTCET त हे हाल आहेत  तर JEE, AIEEE तर विचारायलाच नको.

म्हणून आभासियुक्त या टक्केवारीच्या खेळाचा भविष्यात  विचार होने अत्यंत गरजेचे आहे.


Source: INTERNET
-अश्विनी खलिपे,तोंडाली(सांगली)

         नुकताच दहावी-बारवीचा निकाल लागला आणि त्याबाबतीतल्या अनेक बातम्या कानावर आल्या. अमुक शाळेचा निकाल एवढा, तमुक शाळेचा निकाल तेवढा, तर कुणाचं काही वेगळंच... त्यात एक बातमी वाचण्यात आली की ५८% मार्क्स मिळालेल्या एका मुलीने कमी मार्क्स मिळाले म्हणून घरच्यांचा जराही विचार न करता आत्महत्या केली आणि डोक्यात विचार चालू झाले.
         ३५%...काटावर पास...असं ऐकूनही आमच्या काळात उड्या मारून आनंद व्यक्त करणाऱ्यांचा १% ही आनंद होत नसेल आताच्या ९०% मार्क्स मिळवणाऱ्या या मुलांना... आजची पिढी तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे नुसती प्रगतशील झालेली भासते, पण खऱ्या आयुष्यात पाहायला गेलं तर त्यांची बौद्धिक क्षमता वाढीस लागली नाही तसेच त्यांच्यात स्वतः विचार करून निर्णय घेण्याची ताकद कुठंच दिसत नाही. आजची पिढी ही हातचं सोडून सतत एका शर्यतीत धावत असते आणि ते त्यांना मिळालं नाही तर त्यांना ते सहन होत नाही , त्यामुळेच ते आत्महत्येचा मार्ग अवलंबतात.
         देशाचे भविष्य हे तरुणपिढीच्या हातात असतं आणि जर देशातील तरुणपिढी अशी वागत असेल तर भविष्य धोक्यात येईल या विचाराने शासनाने निर्णय घेतला की ८वी पर्यंत कुणालाही नापास करू नये, गणित, सा.विज्ञान, समाजशास्त्र यासारखे विषय १५० गुणांवरून १०० गुणांचे केले, त्यातलेही २० गुणांचे प्रात्यक्षिक ठेवले म्हणजे ते शाळेतील शिक्षकांच्या हाती दिले, बेस्ट फाईव्ह इ. अनेक नवनवीन बदल घडवून आणले.
         मुलांनी शिकावं, आत्महत्या करू नये, देशाचं भविष्य सुधारावं यासाठी जरी हे प्रयत्न केले गेले असले तरीही प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात अगदी तसंच प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात एक चांगली व दुसरी वाईट. आत्महत्येच प्रमाण कमी झालं असं जरी दिसून येत असलं तरी यामुळे मुलांची अभ्यास करण्याची वृत्ती तसेच गुणवत्ता ढासळते यावर कुणाचंच प्रकर्षाने लक्ष नाही असं म्हणणं वावगं ठरणार नाही...
         आधीच्या काळातील एक म्हण "छडी लागे छमछम, विद्या येई घमघम" यातून शिक्षणाचे स्वरूप स्पष्टपणे दिसून यायचं आणि सध्याच्या काळात हे कुठंच आढळत नाही. याचाच अर्थ असा की नुसता गुणांनी उच्चांक गाठला पण गुणवत्तेने मात्र तळ गाठला...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************