माणुस नेमका हारतो कुठे?

सैनपाल पाटील, आजरा, कोल्हापुर.
         आपण नेमके हारतो कुठे हे जर माणसाला कळले असते, तर प्रत्येक वेळी त्याने यशाची नवीन रेसिपी तयार करून हर क्षेत्र पादाक्रांत केले असते. पण असे होत नाही. आपल्या प्रत्येकाला जीवनात विजय हवा असतो, हार कुणालाही नको असते. पण हार आणि जीत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सांगायला कुण्या विद्वानाची गरज नाही. पण अनुभवायला काही ऊन पावसाळे पाहिले पाहिजे.
     यशासंदर्भातील महत्त्वाच्या निर्णयाबाबत काही गोष्टी वर लक्ष केंद्रित केल्यास निर्णयातील अचूकता आणि त्याच्या शक्यतेच्या जास्त जवळ जाता येऊ शकते.
     प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी निर्णायक क्षण येतात. आयुष्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी तो क्षण खूप महत्त्वाचा असतो. यावेळी तुम्ही जो निर्णय घ्याल तो तुमच्या आयुष्याला बरी वाईट कलाटणी देणारा असतो. तुमचं यश आणि अपयश हे त्यावरून ठरते. तुमचा सामाजिक दर्जा आणि वैचारिक पातळीहि असे छोटे मोटे निर्णयच ठरवतात.
    सर्वच निर्णय बरोबर किंवा सर्वच निर्णय चूक असे काही होत नसते. फक्त तो निर्णय घेताना ज्या गोष्टी तुम्ही विचारात घेता किंवा विचारात घ्यायला हव्यात या सर्व गोष्टींशी तुम्ही स्वतःला अवगत करत नाही. तोटक्या माहितीवर घेतलेला निर्णय हा कधीही परिपूर्ण निर्णय असू शकत नाही. कालांतराने तो निर्णय चुकीचा होता असे वाटते, खरेतर तुम्ही सर्व गोष्टींची योग्य ती कारणमीमांसा केलेली नसते किंवा निर्णय घेताना निर्णयावर परिणाम करणाऱ्या सर्व बाबींचा परामर्श घेतला नसतो.
   आपल्या अपयशाचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आपण हरलो तर काय याची वाटणारी भीती. लोक काय म्हणतील? त्यांना कसे सामोरे जायचे? बघा आपण प्रत्येक वेळी जगाचा विचार करत असतो. खरंतर यशाची अपेक्षा धरणाऱ्या प्रत्येकाने लोकापवादावर विजय मिळवायला हवा. त्यात तटस्थता राहिली तरच निर्णयात पुरेशी योग्यता राहिल.
    वैचारिक परिपक्वता नसताना माणूस चांगले निर्णय घेवु शकत नाही, ते चुकीचे असण्याची जास्त शक्यता असते. असा माणूस निर्णयप्रक्रियेला दोष देतो. त्यास वेळीच योग्य ते मार्गदर्शन घेणे गरजेचे असते.
   तुलनेत नव्या असणाऱ्या कामामध्ये जाणकारांचे मत विचारात घेणे आवश्यक असते. अशा वेळी जास्तीचा विश्वास धोकादायक ठरू शकतो. एखादे काम कितीहि आकर्षक असले तरी आपल्याला गती नसणाऱ्या कामांमध्ये नसीब आजमावून नये. आपल्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या कामामध्ये सुरुवात केल्यास संबंधित अनुभव व माहितीचा उपयोग होतो.
    आपण घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी स्वतः स्वीकारली पाहिजे. नंतरच्या प्राप्त यशापयशाची जबाबदारी ही तुमचीही असली पाहिजे. पण यश आपल्या खाती जमा करून अपयशाचे खापर मात्र इतरांच्या माथी मारत राहाल तर ही सोय जास्त वेळ साथ देत नाही.
    एखाद्या विषया संदर्भात निर्णय घेतल्यावर त्याच्याशी ठाम राहणे हे निर्णयकर्त्याचे आद्यकर्तव्य आहे. त्या निर्णयाला मूर्त रूप देणे हे त्याच्याच ईच्छाशक्तिवर अवलंबुन राहते. शेवटी काय तर प्रयत्नांतील सातत्य, प्रामाणिकता आणि तीव्रता हिच तुमचे यश सुनिश्चित करत असते.

_________________________


रुपाली आगलावे, सांगोला.
       माणुस हरतो, जेंव्हा त्याला त्याच्या जवळच्याच व्यक्तीने फसवलेल असत तेंव्हा.......... कारण आपण वैर्याच्या वाराला झेलायला तैयार असतो पण..... आपल्या माणसांनी केलेल्या वारावर लावायला कोणतंच मलम किंवा औषध अजून तैयारच झालेलं नाही कारण..... कोणाला ते expected नाही.... त्यामुळे माणुस तेंव्हा हरतो.....
    कित्तेक वेळा पडलेला माणुस उठताना पाहिलाय... हरलेला माणुस जिंकताना पाहिलाय.... पण मनातुन खचलेला माणुस कधीच जिंकलेला नाही पहिला...
        कोणतीही परिस्थिती माणसाला हारायला किंवा जिंकायला कारणीभुत नसते तर त्याचे विचार, त्याची इच्छाशक्ती, त्याची जिंकण्याची जिद्द या गोष्टींचा त्यावर परिणाम होतो... व त्यानुसारच त्याचे परिणाम समोर येताना दिसतात....
      या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी माणसाला हरवू शकते फक्त त्याच स्वतःच मन सोडून..... जर माणसाने स्वतःच्या मनावर ताबा मिळवला तर तो या जगावर सुद्धा ताबा मिळवू शकतो.. एवढी ताकत माणसांमध्ये आहे.... 
    शेवटी एवढंच सांगणं... हार जित तर चालूच राहणार आज हरलो तर उद्या जिंकणार.... ही आशा मनात बाळगा.... कितीही कशातही हरलात तरी चालेल पण मनाने कधीच हार मानू नका.... Life is yours... Keep smiling.

_________________________

वाल्मीक फड नाशिक.
       जेव्हा जेव्हा माणसाच्या मनाविरुद्ध घडते त्याच वेळेला त्या माणसाच्या
 संवेदना त्याचा रागावर नसलेला कंट्रोल पाहिला की,माणूस हरलायअसं वाटतं.
एखाद्या प्रिय व्यक्तीने माणसाला म्हणजे जी व्यक्ती त्याचा जिव की प्राण असते,त्या व्यक्तीशिवाय तो कल्पांतिही राहू शकत नाही ज्याच्यावर या माणसाचा अतुट असा विश्वास आहे आणि त्यानेच ह्याचा जर केसाने गळा कापला तर तेव्हा माणसाला हारल्याची अनुभूती होते.
तरुणपणात खुप कष्ट करुन राब राबून आपल्या मुलाबाळांना चांगले शिक्षण देऊन त्यांना समाजात ताठ मानेनं जगायला ऊभं करतो,परंतु तेच मुलंबाळं त्याला वृध्दाक्ष्रमात नेऊन घालतात त्याच वेळेला आपण हारलो आहोत ह्या गोष्टींचा आभास होतो.
सारासार विचार म्हणजे आपल्या आसपास आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडणे,आपल्या पत्नी,मुलांनी आपल्या भावना समजून न घेणे,आपण केलेला व्यवसाय व्यवस्थित न चालणे,अशा गोष्टि घडल्यानंतर जो माणूस आत्महत्येसारखा विचार करतो तोच माणूस खराखुरा हारतो असं मला वाटतं.

_________________________

राजश्री ठाकूर , मुंबई
   अस्मानी - सुलतानी , आप्त - स्वकीय - परकीय , पारतंत्र्य - स्वातंत्र्य , विश्वासघात , अवसानघात या सगळ्या बाबी माणसाला कमकुवत करतील कदाचित .. थोड्या काळासाठी थांबवतील पण माणसाला हरवणारी गोष्ट एकच - मृत्यू ; स्व - मृत्यू . 

   बाकीची सर्व संकटे परतवून लावता येतात , त्यांच्या विरुद्ध उभ ठाकून लढता येते .. ज्या संकटात माणूस विजयी होतो तिथे आत्मविश्वास आणि संकट विजयी झाले तर अनुभव गाठीशी जमा होतो . पण जगाच्या प्रारंभापासून अंतिम विजय केवळ आणि केवळ एकाच गोष्टीचा - मृत्यू . 
  ऍडम ईव्ह , प्लुटो , सॉक्रेटिस , बुद्ध , नित्शे , सिकंदर , पुरू ,  गांधी - गोडसे , सावरकर , लिंकन , अल्बर्ट एलिस , आईन्स्टाईन हि सगळी मंडळी नामवंत , बुद्धिवंत , विचारवंत आयुष्यात अपयशी ठरली पण मेहनतीने , विचारांनी परिस्थितीवर विजय मिळवला .. पण या सगळ्यांना कुणी जिंकून घेतलं तर मृत्यूने . 
   अमुक व्यक्ती शिवाय मी जगू शकणार नाही असं जवळ जवळ प्रत्येकाला वाटत पण कित्येक वेळा त्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतरही आपण आहोत .. आत्ता हा लेख लिहितांना , वाचतांना जाणवतंय मृत्यूवर सध्यातरी विजय आपला आहे .. पण कधीतरी तो हरवणार .  
   कितीही उत्तम मानसिकता असो अथवा आरोग्य , सांपत्तिक स्थिती उत्तम असो वा अठरा विश्वे दारिद्र्य , आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असो , नकारात्मक असो वा दृष्टिकोनाचा अभाव असो अंतिम लढाई मृत्यू जिंकणार  
   मग या मृत्यूला हरवायच तरी कसं ? मृत्यूचा मृत्यू करायचा तरी कसा ? विज्ञान अध्यात्म कधीतरी हे कोड उलगडेल . पण मग तोवर काय ? 
  सहज जिंकू द्यायचं त्याला ? आपण उभ्या केलेल्या निर्मिती अशाच सोडून द्यायच्या ? की कार्यातून अंशरुपी उरत राहायचं या पृथ्वीवर ? 
जगणं फुकट मिळालंय म्हणून झुगारून द्यायचं की न मागता मिळालं म्हणून अमूल्य म्हणायचं ? पण कसंही केलं तरी माणूस मृत्यू पुढे हरतो. हे नक्की .
  पण असं होईल का , तो एकदाच हरवेल त्या आधी प्रत्येक लढाई माणूस जिद्दीने लढेल , कुठेतरी स्वतः ला शोधेल .. सेवा वगैरे खूप मोठे शब्द झालेत किमान जगण्याविषयी निष्ठा बाळगेल ... मृत्यूला जिंकायचं असेल  तर जगताना  त्याचा विसर पडून जगण्याचा प्रयत्न करता येईल , भान राखून बेभान होऊन जगून बघता येईल.. कदाचित आपली कुण्णी कुण्णी म्हणून आठवण काढत नाही म्हणून रुसून मग येणारच नाही तो .. तेव्हा कदाचित म्हणता येईल आधी कुण्या एका काळी हरवायचा मृत्यू माणसाला पण आता नाही ..

_________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************