लग्नामधील खर्च.

लग्नामधील खर्च.


१.संदिप बोऱ्हाडे( वडगाव मावळ,पुणे)
आजच्या घडीला कोणी किती आलिशान लग्न केले याचे प्रदर्शन करण्याची चढाओढ समाजात लागलेली दिसत आहे. अमुक अमुकने एवढा खर्च केला तमुकने तेवढा. अगदी बाहेर देशात जाऊन खर्चिक  लग्नसोहळे करण्याचीच प्रथा सुरु झालेली आहे. कुठेही लग्न केले तर काय फरक पडणार आहे ते समजत नाही ??? त्यात श्रीमंत आणि गरीब पण आले अगदी हे सर्वसामान्य लोक कर्ज काढून लग्न करण्याची स्पर्धा करतात..

   काही लोकांना आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची भारी हौस असते. आता काहीजण म्हणतील आहे त्यांच्याकडे पैसे आहेत काय करायचे ते... अहो ! जावयाला लेकीला कपडे ,काही भेटवस्तू दिली तर ठीक परंतु जावयाच्या पूर्ण घरबाराला कपडे ,जावयाला 51 ,101 सोन्याचे धोंडे असली हौस केली जाते आणि तीही एकमेकांच्या चढाओढीत ....याचा परिणाम म्हणून दुसरे आपल्या सासर्यांकडून त्याची परिस्थिती नसताना असल्या अपेक्षा धरतात, मुलीची छळवणूक करतात आणि स्वतः च्या संसारात विष कालवून घेतात. याला काय म्हणायचे ???

   आजकाल तर लग्न समारंभावर भरपूर खर्च केला जातो. जो तो आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात मग्न असतो. रोषणाई, फटाके यावर मुक्तहस्ते खर्च केला जातो. लग्न जमेल तितके अलिशान करण्याचा प्रयत्न चालू असतो. यातून माणूस काय मिळवतो. उलट गमवतोच. निरर्थक पैसा.
खेडोपाडी ६ ते ८ तास विद्युत कपात चालू असताना शहरातून मात्र लग्न मंडप रोशनाईने दिपून निघत असतात. .उपासमारीमुळे लाखो जनता मरत असताना नुसत्या आतीषबाजीवर लाख लाख रुपये सहजच उधळले जातात. अक्षरश: लाखो  रुपये तरी असेच उडवून टाकतात फटाक्यात.. आजचा शेतकरी लाख दोन लाखाचे कर्ज झाले म्हणून जीव देत आहे. हि मात्र शोकांतिका.

  नवरदेवाने आणि नवरीने  घातलेले किमती कपडे हे परत कधीही वापरले जात नाहीत. ते तसेच कपाटात आठवण म्हणून पडून राहतात. मग  पुन्हा वापरता येतील असे बऱ्यापैकी कपडे घेता येत नाहीत का? नवरा नवरी सोडा परंतु जवळजवळ संपूर्ण घरबार वऱ्हाड अशी उंचीवस्त्र घालून मांडवात मिरवत असतात. हे कपडे परत दुसऱ्या कार्यक्रमात वापरायचे म्हटले तर परत प्रतिष्टेचा प्रश्न ? मग हे कपडे परत काहीच कामाचे नाहीत कारण एरवी हे असले कपडे आपण वापरू शकत नाही. मग कशाला हा वायपट खर्च ? जेवणात तर विविध पंचपकवान त्याला जोड फाष्ट फूड, चायेनीज वगैरे प्रकार. अन्नाची तेवढीच नासाडी. अर्धवट खावून टाकलेली ताट. उगाचच ताट भरभरून घ्यायचे आणि न खाताच टाकून द्यायचे??? कुठे अन्नाची नासाडी करणारे हे लोक आणि कुठे भुकेने कचर्यात अन्नाचा शोध घेणारी मुले ??
  
  पण या श्रीमंत लोकांनी थोडा विचार केला असता तर...??
देशातील बरेच शेतकरी कर्जमुक्त झाले होतील. बर्याच बेघरांना निवारा मिळु शकेल.लग्नासाठी पैसे नाहीत म्हणुन आत्महत्या करणार्या मुलींचे लग्न लावता येतील. बेकारीमुळे आत्महत्या करणार्या तरुणांना रोजगार निर्मिती करुन देता येऊ शकेल,  परिस्थितीमुळे शिक्षणापासुन वंचित असणार्या होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षण देता येईल. हा ठेवा कायमस्वरुपी स्मरणात राहणारा जीवनदान देणारा आहे....परंतू आपल्याला आपल्या श्रीमंतीचेच प्रदर्शन करण्यात जास्त आनंद मिळणारा असतो जो क्षणभंगुर आहे...

 बऱ्याच लग्नात काही विशेष अतिथींचे फेटा ,शाल ,नारळ देवून स्वागत केले जाते. लग्नाला येणारी प्रत्येक व्यक्ती आपले काम-धंदा सोडून वेळ काढूनच आलेली असते. त्यामुळे लग्नाला आलेली प्रत्येक व्यक्ती आदरणीय समजून असे काही लोकांचाच सत्कार करण्याचा प्रकार थांबवला गेला पाहिजे. नाहीतर आपल्या आदरणीय मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत आपले कार्य उरकून घ्यावे. बाकीच्या मंडळीना कमी लेखून त्यांचा वेळ कशाला फुकट वाया घालवता??

      सायना नेहवाल, काही दिवसांपूर्वी लग्न झालेले नवरा अभय देवरे (I.R.S.)  प्रीती कुंभारे सहायक प्रबन्धक (IDBI,Bank) ....तसेच अजीम प्रेमजी यांच्या मोठ्या मुलाचे लग्न आणि आजच एक बातमी वाचली श्रीमंतीचे प्रदर्शन न करता आपले धन सत्कारणी लावावे याचा आदर्श घालुन देणारे हे हिरे व्यापारी महेशभाई सवाणी...यांनी 3000 अनाथ मुलींचे कन्यादान करून फक्त लग्न लाऊन न देता संपूर्ण जबाबदारी घेतली आहे.
आणि अशी लोकच समाजासाठी आदर्श असली पाहिजेत.

 काही जण म्हणतील पैसा आमच्या बापाचा आहे आम्ही तो कसाही खर्च करू.. तुम्ही कोण सांगणारे?? तुमचे धन तुम्हाला कसे खर्चायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे . परंतु एक माणूस म्हणून आपण कमावलेले धन योग्य ठिकाणी कामी आले तर ते नक्कीच मानसिक समाधान देऊन जाईल. या धनिक लोकांनी समाजात साधेपणाने लग्न लाऊन त्या संपत्तीचा वापर दीन- दुबळ्यांसाठी केला तर समाजात नक्किच एक आदर्श निर्माण होईल.
********************************

वाल्मीक फड(महाजनपूर नाशिक)
लग्न हा हिंदू संस्कृती प्रमाणे एक प्रकारचा संस्कार आहे.तसेच जिवनातील तीन सोहळ्यापैकी एक सोहळा आहे.लग्न ह्या प्रकाराला एक सोहळा तसेच संस्कृती चा भाग म्हणून साजरा करायला हवा आहे परंतु आज तसे आजिबात होत नाही.
आज लग्नासारखा संस्कार वेगळेच रूप धारण करीत आहे.लग्न प्रक्रियेला समाजाने प्रतिष्ठेचा विषय बनविले आहे.मोठाले खर्च क्ष्रीमंतिचे प्रदर्शन मांडून लग्नासारखा संस्कार एक खेळ बनविला आहे.अफाट  खर्च,रोषणाई,अन्नाचे नुकसान अशा अनेक प्रकारांनी लग्न सोहळा बदनाम होत चालला आहे.दारु पिणे,अश्लील गाणे स्पिकरवरती लाऊन त्यावर अस्लील नाच करणे अशा ह्या गोष्टीमुळे लग्न सोहळ्याची पुरती वाट लावलेली आहे.भेटवस्तुंचा ऊत अशा अनेक खर्चीक बाबी आपल्याला सांगता येतील.
जुन्या काळात लग्न असायची कमी खर्चाची अगदी साधा मंडप व त्यावर आंबा,जांभळं,कडुनिंब अशा झाडांचे डगळे असायचे.एका बैलगाडीत वाजत गाजत मंडपात आणले जायचे ,यथोचित पुजा करुन ते मांडवावर टाकले जायचे आणी तेही एक रुपया खर्च न करता.
चिक्कार पैसा खर्च करुन जेवणावळ दिली जाते परंतु एकत्र जेवताना दिसत  नाही ऊभ्या ऊभ्या जेवण ऊरकतात तेही पायात बूट चप्पल ठेवून.तसं जुन्या काळात जेवण साधं असायचं पण एकत्र पंगत बसायची आग्रह केला जायचा सगळं अगदी प्रेमाने केले जायचे तेही एकदम कमी खर्चात.पहिले सनईच्या सुरात लग्न साजरे व्हायची परंतु आता कर्कश डिजेचा आवाज आणी त्या आवाजात मद्यधुंद होऊन नाचनारे तरुण.सारा खर्चच आत्ताच्या लग्नांचा.मुठभर धनिक लोकांनी लग्न ह्या संस्काराची पुरति वाट लावली आहे.
*********************************

भर्तरी उद्धव कोळेकर, (पिंपरखेड)
मुळात कोणत्याही विवेकशील माणसाला जर विचारले तर लग्नात खर्च कमी करावा असेच उत्तर मिळेल. मी विवेकशील यासाठीच म्हणतोय कि, आताचा युवक,युवती पूर्ण समाज भलेही तो शिकलेला असो किंवा नसो तो लग्न कार्यामध्ये अनआवश्यक  खर्च करताना दिसतो. विवेकशील , शिक्षित,अशिक्षीत, अडाणी यांमध्ये मूलभूत फरक आहे,कारण शिक्षितच फक्त विवेकशील असतात असे नाही.स्वताला शिक्षीत म्हणणारे डॉक्टर, वकील, इंजिनीर, राजकारणी(अंबादास दानवे च्या मुलाचा लग्न खर्च) आपला विवेक गहाण ठेवून प्रचंड खर्च करताना दिसतात.याला काही युवक अपवाद आहेत,साखर पुडा,dj, सोहळवा,घोडा, भपकेबाज कपडे,येतीजाती, चुळण्या-गुळण्या, घरगुस्नी,पायधुनी,ताटाला टेकन(टेकणाला जावयाला टू व्हील बुर पण दिली जाते) अशा कित्येक प्रथा लग्न खर्च वाढवतात.अशा वेळी प्रथा,परंपरा   आणि पर्यायाने धर्म समोर येतो कारण वरील सर्व धार्मिक विधी आहेत आणि धर्म हि तर अफू ची गोळी आहे तिथे विवेक कसा टिकणार.शहाण्यास सांगणे ना लगे
*********************************

मुकुंद बसोळे,(लातूर)
स्थळ- गण्या आणि मन्याच निसर्गाच्या कुशीत लपलेलं गाव...'टेंभुर्णी'....सकाळची 9 ची वेळ....मस्त अलहदायाक  वातावरण....पण बोचरी थंडी वाजत होती त्यामुळे चहाच्या दुकानात चांगलीच गर्दी पडली होती....सगळेजण चहा पिऊन गरम होत होते....आपला गण्या सुद्धा चहा पित-पित वर्तमानपत्र वाचत होता.... तेवढ्यात मन्या आला......

मन्या- काय राजे काय करत आहात.....

गण्या- (थोडंस गोंधळून आणि वाचनाची तंद्री भंग पावली असा तोंडावर आव आणून... सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात )  ये ऐका सगळेजण....ह्या मन्याला 'मोस्ट इंटेलिजेंट मॅन ऑफ टेंभुर्णी' अवार्ड द्या रे........ (हे वाक्य ऐकून चहाच्या स्टॉल वर एकाच हशा पसरतो).....बंबूऱ्या दिसत नाही व्हय रं वर्तमानपत्र वाचतोय ते.....मग तरीही थोबाड वर करून कशाला विचरतोस....तू खरंच डोक्यावर पडला होता....कॉमन सेन्स चा भागच नाही तुझ्याकडे....बंबूऱ्या.....

मन्या-गप ये किती शहाणा आहिस माहीत आहे.... सरक तिकडं...आणि चहा सांग मला पण....( स्वतःशीच)  आयला थंडी लै पडली आहे मायला....पार कुठून कुठून धूर निघत आहे ते सुद्धा कळेना झालंय..... काय ओ अण्णा....

अण्णा-  होय रे मन्या.... सकाळी सकाळी परसाकडं जायला बी नग वाटायलाय रे....थंडीच्या भीतीने....( परत सगळे हसतात)

मन्या- बरोबर बोललात अण्णा....(आपला मोर्चा मण्याकडे वळवून).....एवढं काय रं हाय त्या वर्तमानपत्रात....आम्हला बी वाचून दाखव की.....

अण्णा-होय रे गण्या वाचून दाखव की आम्हाला पण.....

गण्या-(अण्णा वयस्कर असल्यामुळे त्यांचा आदेश गण्याला मानावाच लागणार होता तर त्याने वाचायला सुरुवात केली....)  छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोराम राज्यात भाजप पिछाडीवर....अण्णा काँग्रेस ने चांगलीच पकड निर्माण केली म्हणायची......(दुसरी बातमी वाचत) राफेल वरून सरकार अडचणीत.....अण्णा हा सुद्धा मुद्दा चांगलाच चघळतोय हं..... इशा अंबानीचे लग्न धुमधडाक्यात साजरे... बॉलीवूड च्या सर्व प्रसिद्ध  अभिनेत्यांची हजेरी.....

अण्णा- ( मधेच गण्याला तोडत...) झालं का बाबा तीच लग्न....लै भारी केलं असेल बाबा....भारतातल्या सगळ्यात श्रीमंत बापाची 'पोरगी' ती...

गण्या-हो 'अण्णा' झालं....खूप भारी केलं अंबानीने लग्न....काय ती रोषणाई अबब....काय तो खर्च.....

अण्णा- हं मोठे माणसे बाबा ती....बरं ते जाऊदे.... तुझ्या पोराचं... नितेश चं लग्न ठरलय ना....नाही म्हंटलं तरी तू सुद्धा आपल्या 'गावाचा'अंबानीच म्हणायचास....मग काय काय ठरवलं आहेस....

मन्या- (मधेच)  हो तर मग.... 'द  आर्मी बॉय - नितेश' चं लग्न धुमधडाक्यातच होईल.... काय रे गण्या....

गण्या-( अभिमानाने छाती फुगवून जसं काय अंबानीच आहे तो आणि मिश्यावर ताव मारून)  हो तर बघा कसं धुमधडाक्यात करतो का नाही लग्न.... ( एवढ्यात त्याचा गावातील प्रतिस्पर्धी विनायकराव  चहा पेयायला येतात.....त्यांना बघून तर गण्याला लईच चेव सुटतो आणखीन आवाज चढवून) सार गाव बघताच राहील पाहिजे नुसतं....जाळ आणि धूर संगटच....निस्त बघत राव्हा तुम्ही....

अण्णा- होय बाबा करशील तू सगळं कारण अंबानी आहेस तू.....(तेवढ्यात नितेश येतो चहाच्या स्टॉल वर येतो)

मन्या-काय 'नवरदेव'...  द आर्मी बॉय.....काय म्हणतेय नवरी....फोनवर बोलतोस का नाही तिला....नाही बाबा आजकालचा ट्रेंड आहे म्हणे ते सोयरीक झाल्या झाल्या फोन गिफ़्ट करायचं म्हण....

नितेश-  नाही ओ काका....अजून नाही बोलत आम्ही.....

अण्णा-  बरं झालं नितेश....चांगली आहे म्हण पोरगी....गुणांची आहे म्हण....आता बंधनात आडकशील तू.....आता सुटका नाही.....

नितेश-( स्वतःशीच कुजबुजत) सुटायचय कुणाला....

अण्णा- अ.... काय बोललास....

नितेश-काही नाही....

अण्णा- तुझा बा तर काही नाही...खूप उत्सुक आहे तुझं लग्न करायला.....

गण्या- अहो अण्णा माझा एकुलता एक मुलगा आहे तर करणारच ना हो....अहो अण्णा लग्न म्हणजे आपल्या आयुष्यातील एक अमूल्य ठेवा....ते काही परत परत परत होत नाही...आणि असंही परत परत करायला तो काही चहा नाही....एकदाच करायचं धुमधडाक्यात करायचं....बाकी कर्ज का काढणं होईना आपल्याला....पोराला ह्या  त्याच्या जीवनातील आनंदाच्या क्षणी अमूल्य भेट नको का दयायला....त्याच्यासुद्धा आठवणीत राहायला पाहिजे ना...हा अमूल्य क्षण जीवनभर....उद्याच कर्जासाठी अर्ज करतो बघा....एक दोन वर्षीत फिटून जाईल कर्ज....पण साऱ्या गावाने नाव घेतला पाहिजे....आणि पोराने सुद्धा आठवणीत ठेवला पाहिजे.....होय की नाही.....

नितेश- ( काहीतरी 'निश्चय' करून) बाबा मी काही बोलू का?

गण्या-तू नाही तर कोण बोलणार तुझंच तर लग्न आहे बोल तू....

( एव्हाना गावातील बरीचशी प्रतिष्ठित मंडळी आली होती...आणि मघापासून चाललेली चर्चा मन लावून ऐकत होती....आता 'नवरदेव' काय बोलणार म्हणून सगळ्यांनी माना नितेश कडे वळवल्या आणि नितेश बोलू लागला....)

नितेश-    बाबा.... 'लग्न'.....लग्न म्हणजे  माणसाच्या जीवनातील अविस्मरणीय ठेवा असतो....तुमच्या जीवनात पुढची व्यक्ती तुमच्याबाबत कोणतीही शंका मनात न ठेवता...तुम्हाला तुमच्या जीवनातील सुख आणि दुःखात साथ देण्यासाठी येत असते....ती सात जन्मापर्यंत तुम्हाला साथ देणार असते....तुमची ती अर्धांगिनी असते....आणि ती तुमची अर्धांगिनी बनण्याचा 'अभूतपूर्व'सोहळा म्हणजे 'लग्न'....आईनंतर सगळ्यात मायाळू स्त्री तुमच्या जीवनात प्रवेश करत असते....तर बाबा मला ह्या लग्नाच्या सोहळ्याला 'विसरता' न येण्याजोग करायचे आहे....माझी एक विनंती आहे बाबा....

गण्या-बोल बेटा काय करू?....

नितेश- माझ्या लग्नात किती रुपये खर्च करणार आहात तुम्ही.....

गण्या- गण्या तू माझा एकुलता एक पोरगा आहेस तू म्हणशील तितका खर्च करू....बोल तुझी इच्छा काय आहे...

नितेश-  ऐका तर.... माझी अशी इच्छा अशी आहे की  माझ्या लग्नात तुम्ही वायफळ खर्च करण्याऐवजी तुम्ही गावात एक ग्राउंड तयार कराव  जिथे गावातील पोरांना सैन्यात जाण्यासाठी लागणार शरीर तयार करता येईल....जेणेकरून गावातील जास्तीत जास्त मुलं 'सैन्यात' भरती होऊन देश्याची सेवा करतील...आणि गावात ग्रंथालय स्थापन करावं जिथे आपल्या गावातील पोरं स्पर्धा परीक्षेची तयारी करतील... माझी शेवटची इच्छा.... तुम्ही 2-2  लाख रुपये दोन शहिदांच्या कुटुंबियांना द्यावेत......बस्स येवढीच ईच्छा आहे माझी....आणि यात मी सुद्धा माझे सगळे आतापर्यंत जमा झालेले पैसे तुम्हाला देईन.....बाबा लग्नात केल्या जाणाऱ्या इतर खर्चपेक्ष्या तुम्ही जर अश्या पद्धतीने माझं लग्न केलंत तर खरंच माझ्यासाठी तुमच्याकडून माझ्या लग्नाची अमूल्य भेट ठरेल....(सगळे थक्क होऊन नितेश कडे बघत असतात.... सगळ्यांनाच नितेश चा अभिमान वाटतो आणि टाळ्यांचा आवाज ऐकू येतो.....आणि विनायकराव उठून नितेश कडे येतात जे की गण्याचे प्रतिस्पर्धी आहेत....)

विनायकराव-   जिंकलास तू पोरा....खरंच तू सिद्ध केलंस की ह्या भारतमातेचा तू वीर सुपुत आहेस....मी सुद्धा माझ्या पोराचं लग्न खूप खर्च करून धुमधडाक्यात करणार होतो....पण नाही...आता मी आणि तुझा बा मिळून गावासाठी ग्राउंड,ग्रंथालय करू....काय गणपतराव.....  ( आणि नितेश ला सॅल्युट मारतात.....त्यांचं बघून बाकीचे सगळे सुद्धा नितेश ला सॅल्युट करतात..... गण्याची तर छाती 102 इंच फुगलेली असते)

गण्या- होय विनायकराव....जस पोरगा बोलला तसंच होईल.....(गण्याच्या डोळ्यात अश्रू  येतात)

मन्या-  खरंच तू ' द आर्मी बॉय'आहेस पोरा.... कडक सलाम तुला.... मानाचा मुजरा.....

(ह्या लग्नानंतर टेंभुर्णी गावात असा पायंडा पडतो की प्रत्येक लग्नात वायफळ खर्च करण्यापेक्षा तेथील गावकरी तो खर्च गावातील समाजकार्यात आणि शहिदांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी खर्च करतात).....
********************************

राजश्री ठाकुर,(मुंबई)
मुळात लग्न करावं का हाच  जटिल प्रश्न या पिढीपुढे आहे. त्यातून कसाबसा निर्णय घेत.. लग्न करावं पर्यंत जर जोडपी पोहोचली , तर लग्नातील खर्च यावरून खडाजंगी ठरलेली . समाजाचे निकष , लग्नाविषयीच्या इतरांच्या अपेक्षा , स्वप्ने आणि आर्थिक स्थिती यातून एक रक्कम ठरते त्यातून विवाह सोहळा संपन्न होतो .

 अत्यंत खाजगी अशा या बाबीत कुणी किती खर्च करावा हा तितकाच वैयक्तिक प्रश्न .  

सध्याच्या परिस्थितीत वधू वर , दोन्हीकडचे पालक नोकरी करणारे . गाठीभेटी दुर्मिळ . याच निमित्ताने गोतावळा निवांत जमतो , गप्पांचे फड जमतात , लहानपणीच्या आठवणी , थट्टा मस्करीस पुन्हा बहर येतो .. सोहळ्यास येऊन चार घटका आनंद घेणारे पाहुणे बघून लग्न पारंपरिक विधीने का , या प्रश्नाचे आपसूक उत्तर मिळते . मंडळींच्या आतिथ्यात कमतरता नको म्हणून खर्च करणे अगदी स्वाभाविक . या सरबराईची प्रत्येकाची पद्धत स्वतः च्या जीवनमानास , पद्धतीस अनुसरूनच असणार पण त्यावरून कुणी कुणाचा दर्जा ठरविणे अगदीच टाकाऊ.
 जगातील कुठल्याही संस्कृतीत विवाह हा एक महत्वाचा संस्कार आहे . या भूतलावर आपल्यासाठी योग्य अस कुणीतरी मिळालं आहे , हि सुखावणारी बाब , हा आनंद सगळ्यांसोबत वाटून घ्यावा हे या सोहळ्याचे प्रयोजन ..यात समाजाचा सहभाग कसा असावा तर शुभेच्छा देणारा .  पुढील आयुष्याचा जोडीदार त्यासोबतच हे पाहिलं पाऊल कसं , कुठे , कशाप्रकारे टाकावं हे टिका न करता स्वीकारण्याइतका समाज प्रगल्भ व्हावा . अतीव हर्षाच्या समयी खिसा थोडा सैलावला... हरकत नाही .. भान राखून खर्च केला तरी हरकत नाही .. त्यावरून त्या माणसाच्या सामाजिक दायित्व आणि जाणिवा यावर बोट ठेवण्याची गरज च काय ?
  कामाच्या ठिकाणची गेट टुगेदर्स चालतात , मित्रांसोबत पार्ट्या चालतात तिथले खर्च विरंगुळ्याचे कारण असते मग जिथे हि सगळी मंडळी एकत्र येऊन आपला परीघ विस्तारतो अशा विवाह खर्चा विषयीच आकस का ?
  अनाथ मुलांची लग्ने धूमधडाक्यात लागली की समाजाला कोण आनंद आणि यदा कदाचित त्या लग्नाचा सोहळा नाही झाला तर कष्टी होणारी , उसासे टाकणारी माणसे आहेत . त्यामागची मिमांसा म्हणजे , त्या लोकांना आयुष्यात पालकांचा सहवास , आणि इतर आनंद मिळाले नाहीत म्हणून त्यांची लग्ने धडाक्यात झालेली चालतील . पण जे सनाथ आहेत , आर्थिक परिस्थिती उत्तम आहेत , खर्च निभावू शकतात अशा माणसांनी मात्र ते अजिबात करू नये . नाहीतर आहेच सामाजिक टीकेचा बागुलबुवा उभा .

  आम्ही अंबानीस खुले पत्र लिहू , त्याची कानउघाडणी करू ( ते पत्र नेमके अंबानी सोडून सगळ्यांना मिळालंय )  पण हा दिवस अशा पद्धतीने साजरा करण्यासाठी त्याने स्वतःस त्या पात्रतेचे बनविले आहे हे सर्रास विसरू ..
   हेच कुणा आर्थिक सबळ व्यक्तीने कुठल्याही कारणांमुळे लग्न लहान प्रमाणावर केले तर आजवर जितक्या जेवणावळीत ते कुटुंब जेवले असेल त्याचा उद्धार ..
   
  अजुन एक ट्रेण्ड , आम्ही लग्नात खर्च करणार नाही ते पैसे अमुक संस्थेला देऊ , पाहुण्यांनी सुद्धा जो आहेर करायचा असेल ती रक्कम या संस्थेच्या द्यावी .  वाह रे सक्तीचा दानधर्म .. जुजबी माहितीच्या आधारे , तुमच्यावरील प्रेमापोटी , नात्याच्या बंधनापायी लोकांनी हे का करावं ? स्वतः च्या उच्च सामाजिक जाणिवा दाखविण्याच्या नादात निवड येणाऱ्या पाहुणयांची निवड करण्याच्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली होऊ नये .
 
  थोडक्यात काय , आमंत्रण असेल , शक्य असेल तर आनंदी भावनेने लग्नास उपस्थित रहावे , मेजवानीचा , सजावटीचा आनंद घ्यावा , वधू वरास शुभेच्छा द्याव्या . खर्च किती , वायफळ कुठला आवश्यक कुठला यावर आपला वेळ खर्च करू नये . चलन चल आहे , विनियोग होतोय यात समाधान मानावे . कुणी लग्नात खर्च केलाच नसेल , बोलावलं नसेल तर वेळ वाचला म्हणून खुष व्हावे , आणि त्या आठवड्यात वि४ वर एक ऐवजी दोन विषयांवर लेख लिहावे ..

 कुर्यात सदा मंगलम् !
*********************************

मयुर डुमणे,(उस्मानाबाद)
लग्न ही मुलगा आणि मुलगी यांची समान गरज आहे, त्यामुळे लग्नाचा जो काही खर्च होईल तो दोघांनी केला पाहीजे.
हुंडा,मानपान,आहेर,वरात,DJ, बस्ता, विडिओ शूटिंग,ब्राह्मण या सगळ्या पैशाचा अपव्यय करणाऱ्या गोष्टींना फाट्यावर मारून महात्मा फुले यांनी घालून दिलेल्या सत्यशोधक पद्धतीने लग्न केलं पाहिजे. हुंडा घेणाऱ्या नालायक मुलाशी मी लग्न करणार नाही असा निर्धार मुलींनी करावा. सत्यशोधक पद्धतीने लग्न आणि दोन्ही कडील लोकांना छान जेवण. लग्नाचा खर्च आपोआप कमी होईल. महात्मा फुले यांच्या विचारांप्रमाणे जगल्याचा आणि ब्राह्मणी लग्न पद्धत झुगारून दिल्याचा मानसिक आनंद यांमुळे होईल. कमी खर्चात लग्न करण्याची पद्धत आपण समाजात रुजवू शकलो तर शेतकरी वर्गाला याचा सर्वात मोठा फायदा होईल. श्रीमंतीचा बडेजाव दाखवणारी लग्न आपण मोडीत काढलीत पाहीजे. श्रीमंत, भांडवलदार लोक अशा भपकेबाज लग्न करण्याच्या पद्धती जोपासतात आणि त्यांच अनुकरण सामान्य वर्ग करतो. लग्न ही प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाची घटना आहे ती घटना संस्मरणीय करण्यासाठी भरपूर पैसा खर्च केला पाहीजे असं काही नाही. खर्च करायचाच असेल तर विधायक गोष्टींवर करा. लग्नात येणाऱ्या लोकांना पुस्तक वाटा. यांसारखे अभिनव प्रयोग आपण करू शकतो. पारंपारिक लग्नाची पद्धत ही शोषणकारी पद्धत आहे, तिला सत्यशोधक पद्धत किंवा कोर्ट मॅरेज हा चांगला पर्याय आहे.
*********************************   
                    
मनोज वडे,(पंढरपूर)                      
  ‎          लग्नातील खर्च काही गोष्टी केल्या पाहिजेत परंतु काही त्यातील म्हटले तर वाईपट जेवढा खर्च वाटतो तो टाळला पाहिजे जेणे करून त्याचा योग्य ठिकाणी वापर झाला तर फायदा होऊ शकतो .बगा जर आपण अक्षता म्हणजे तांदूळ जर टाकत असेल तर तो वाईपट खर्च आहे त्या ऐवजी जर फुल टाकली तर फुलांना भाव चांगला येईल आणि शेतकरी ही सुखी होईल दुसरे म्हणजे वरातीत चिरमुरे न टाकता जर त्याचा चिवडा करून गरिबांना वाटला तर फायदा होऊ शकतो ,जेवढा आपल्या परीने खर्च वाईपट वाटतो तेवढा जर टाळला तर नक्की लग्नाचा खर्च वाईपट म्हणता येणार नाही कारण त्यानिमित्ताने लोक एकत्र येतात नवीन काय करायचे काय केलं पाहिजे ह्याचे विचार त्याचे विचाराची देवाण घेवाण होती त्यामुळे एक मनाला सुखद आंनद मिळतो आणि त्या उर्जेनी लोक आपापल्या घरी जातात म्हणजे लग्नातीलखर्च हा मुद्दा घेतला तर ह्या मध्ये दोन मुद्दे येतात जर आपण वाईपट खर्च टाळला तर त्यातून होणारे फायदे ही तेवढेच आहेत...म्हणून ह्याचा बाऊ करून चालणार ही नाही.
*********************************
(यातील संबंधित छायाचित्र इंटरनेटवरून घेतलेली आहेत)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************