मानसिक आजाराकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन

 मानसिक आजाराकडे  पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन

- क्षितीज गिरी,  (सातारा)

खूप लोकांना आपल्याला मानसिक आजार आहे याची कल्पना पण नसते.कारण खूप प्रकारचे मानसिक आजार असे आहेत ते लवकर कळून येत नाहीत. मानसिक पण आजार असतात हे मुळात खूप जणांना माहितीच नसते.त्यामुळे त्याची लक्षणे दिसू लागली की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.जसे की बायकांच्या अंगात येणे हे पण एक मानसिक आजाराचे लक्षण आहे.आणि असे भरपूर मानसिक आजार आहेत त्याला आपण देव धर्म चमत्कार या प्रकारे बघतो आणि अंधश्रद्धेला बळी पडतो.काही सुशिक्षित लोक पण याला बळी पडतात.
अचुत गोडबोले यांनी आपल्या मनात या पुस्तकात याबद्दल खूप खोल वर जाऊन माहिती दिली आहे.
गावात काही लोक हे वेडे असतात.म्हणजे गावातील लोक त्यांना वेडे म्हणतात,पण खर तर त्यांना योग्य प्रकारच्या उपचाराची गरज असते आणि त्यांस बरोबर आपल्या व समाजाच्या मानसिक आधाराची.ती त्यांना भेटते का.हा खरा प्रश्न आहे.मध्यंतरीच्या काळात काही सामाजिक संस्था या कामात पुढाकार घेऊन त्यांनी पुण्यातील रस्त्यावर फिरणारे  मानसिक रुग्ण बरे करण्यासाठी त्यांच्या परीने प्रयत्न केले.पण मुख्य प्रश्न समाजाची मानसिकता बदलण्याचा आहे.काही ठिकाणी तर लोकांना संमोहित करून खून सुद्धा करवून घेतले आहेत.नंतर पोलीस रिपोर्ट मध्ये त्याचा खुलासा लागला.
प्रत्येक ठिकाणी जेव्हा काही चमत्कार घडतो तेव्हा तिथे देव नाहीतर भूत असेल आसा विचार करण्यापेक्षा आपण त्या चमत्काराच्या खोलात जाऊन असे कसे घडू शकते काय असेल याच्या पाठीमा गचे  कारण असा  विचार केला पाहिजे.पण जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा बाकी लोकांची  उत्तरे खूप सोपी असतात जशी की 'अरे त्याच्या अंगात भूत शिरले आहे म्हणून तो वेड्या सारखा करत आहे' असे म्हणून ते आपले मोकळे होतात.हा समाजाचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.आणि त्याची सुरुवात आपण आपल्या पासून केली पाहिजे.
____________

 किरण पवार, औरंगाबाद.

             सहसा समाजाचा मानसिक आजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्रात तरी खेड्यात नी शहरात थोड्या शिकलेल्या लोकांचा वेगवेगळा असलेला जाणवतो. सहसा ग्रामीण भागात मुळात असा आजार असतो; याची तितकी जाणीवच नसते. आणि एखाद्याला मानसिक त्रास होतोयं तर त्यालाही ते लवकर उमजत नाही. अशात बऱ्याचदा काहींना नंतर थेट वेड घोषित केल्या जात. गावात याचे पडसाद चित्रविचित्र उमटलेले पहायला मिळतात. मी आमच्याच गावात असे दोन मानसिक रूग्ण पाहिलेत ज्यांच्यावर जर वेळीच काही उपचार झाला असता तर आज परिस्थिती काही वेगळी असती. आणि मुळातच आपल्याकडे ग्रामीण भागात एखाद्या जिल्ह्यात फार फार तर एखादा डाॅक्टर मानसिक आजारासाठी असलेला पहायला मिळतो. त्यातही त्याची ख्याती त्या एकाच शहरापुरती मर्यादित असते. खरतरं या गोष्टीबाबत जागरूकता मोठ्या प्रमाणात होणं आज गरजेचं आहे. एवढे अंधश्रद्धेचे मेसेजेस फिरतात व्हाॅट्स-अॅपवर एखादा मानसिक आजारावर लेख का असू नये? ग्रामीण भागात तालुक्यातील सरकारी रूग्णालयांमधे प्रत्येक तालुक्यात किमान एक डाॅक्टर सरकारने मानसिक आजारावरील नेमायला हवा. आता या गोष्टींची एखाद्या सरकारला जाण कधी येईल, आपल्याला नाही माहित.
           शहरांच म्हणाल तर, त्या त्याबाबतीत शहरे थोडी नशीबवान. पण इथेही विचारांची मोठी आडकाठी आडवी येतेच बऱ्याचदा. त्यामुळे मला प्रामाणिकपणे वाटतं की, यावर चांगला उपाय जनजागृती ठरू शकतो. मानसिक आजारातून जो जात असतो त्याची खरी कसोटी पणाला लागलेली असते नी जनता मात्र त्याची टिंगल करत राहते, किती हे विदारक म्हणायचं? तूर्तास एवढ्यरच थांबतो. धन्यवाद!
________________


अंजली प्रविण, नागपूर.

मी कारागृहात काम करते.  समाजात ज्यांनी अगदी क्रूरतेने निर्घुण हत्या करणाऱ्या कैद्यांशी माझा संबंध असतो.  मी त्यांच्या सोबत त्यांना मिळायला हवे असणारे समान मुलभूत  हक्क आणि अधिकारासाठी काम करते. यामध्ये बहुतेक स्वतःच्या आई, वडील, पत्नी, मुल यांचा खून करणारे कैदी असतात.  यांच्या मानसिकतेचा अभ्यास करताना लक्षात आले कि, यात बहुतेक मानसिक आजाराचे बळी आहेत. त्यांच्या बालपणापासूनच्या जीवन घडणीचा हा परिणामाने त्यांच्या हातून गुन्हा घडलेला असतो.  एका उदाहरणातून सांगायचं तर एक २८ वर्षाच्या मुलाच्या मानसिकतेचा अभ्यास करत असताना लक्षात आले. लहानपणापासून त्याने  सतत आई वडिलांचे भांडण बघितले, त्यांचा तुटलेला विस्कळीत संसार बघत मोठा झाला,  वडील रोज दारू पिऊन आईला पूर्ण गावात रस्त्यावरून मारत फिरायचे हे तो रोज रोज बघत होता. वयाच्या नवव्या वर्षी वडिलाने दुसरे लग्न केले. ते घर सोडून निघून गेले.  त्याच्या मोठ्या भावाला पण वडील तिकडून घेऊन गेले. पण मध्येच आठवण आली कि पुन्हा येऊन आईला दारू पिऊन तशीच मारहाण सुरु होते. त्या आईला सतत डोक्यावर मारून मारून वेड्यासारखे वागायला भाग पाडले.  त्याचे वडील व त्या भावाने कधीच कोणत्याही प्रकारे मदत केली नाही. या सर्व जीवन घडणीत न त्याचे कधी शिक्षण झाले न कोणी मित्र झाले न कोणी नातेवाईक त्यांच्याकडे यायचे.  मजुरी काम करत असताना हि ३ ते ४ वेळा उंच झाडावरून डोक्यावर पडल्याचे अपघात झाले पण या साठी  गावातील छोट्या सरकारी रुग्णालयात त्या बाहेरील जखमेवर उपचार झाले. पण मेंदू वरील आघाता वर उपचार झाले नाही.  अखेरीस तो हि सतत चिडचिड –शिवीगाळ करू लागला  – व्यसनाच्या  अति आहारी गेला – अगदी जसे वडील त्या आईला रस्त्यावरून मारत असे तसेच तो हि करू लागला. छोट्या छोट्या रागामुळे कुत्र्यांना कुऱ्हाडीने मारू लागला. आणि अखेरीस आईलाही कुऱ्हाडीने मारून टाकले.  आज तो स्वतः ची दैनंदिन सर्व कामे स्वतः करतो म्हणून तो मानसिक रुग्ण नाही असे समाज, शासनयंत्रणा आणि न्यायव्यवस्थेने घोषित केले. 

 आपल्याकडे एखाद्या व्यक्तीचा मानसिक आजाराचा रुग्ण आहे हे सिद्ध करायला त्याने वेड्या सारखे म्हणजे अंघोळ न करणे, कपडे नीट न घालणे, स्वतः ची दैनंदिन काम स्वतः न करणे अश्या काही  सवयीनुसारच मानसिकतेचे निदान होते. अश्या सवयी असणारी व्यक्ती म्हणजे मानसिक रुग्ण आणि यावर उपचार म्हणजे मनोरुग्णालय आणि तेथील गोळ्या व इलेक्ट्रिक शॉक पद्धती.   आपल्याकडे अत्यंत कमी  प्रमाणात सायकेट्रिक आणि सायकोलॉंजीस्ट आहेत देखील पण त्यांच्याकडे कधी व का जावे ? हे देखील साधे अजून समाजात कोणाला माहिती नाही. एकीकडे  ती उपचार पद्धती हि परवडणारी नसते.   तसेच दुसरीकडे त्याच्या उपचाराच्या वेळी त्याला साथ न देता कुटुंब समाजापासून  वेगळे केले जाते.

 खूप अवघड आहे समाज आणि न्यायव्यवस्था या दोघांचा हि मानसिक आजाराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे.  पण आज मला इतकं कळले कि बघण्याचे दृष्टीकोन बदलण्याचे प्रयत्न सुरु ठेवले पाहिजेत.
_______________________

संगीता देशमुख, वसमत.

       मानसिक आजार म्हणजे आजार आहे,तो एक रोग आहे हे मानायलाच तो रोगी आणि समाजही तयार नसतो. आपल्या देशात तर ९०% मानसिक आजार हे  अंधश्रध्देचेच बळी ठरलेले आहेत. अशिक्षित,मध्यमवर्गीय कुटुंबात  करणी,भूतबाधा,भानामती या  सर्व मानसिक आजाराना आजार न मानता,यावर  कुठलेही शास्त्रीय वैद्यकीय उपचाराविना
भोंदूबाबा,धूप अंगारे याचे बळी ठरतात. सुशिक्षित कुटुंबात  अनेकजण मानसिक आजार आढल्यास ते बाहेर सांगणे म्हणजे प्रतिष्ठेचा प्रश्न समजून त्याचे दमनच करतात. एकदा असा आजार झाला की तो जीवनभर बरा होणारच नाही,असाच भ्रम समाजाने करून घेतलेला आहे.  या सर्व प्रकारामुळे मानसिक रुग्णाला जे समजून घेऊन उपचार भेटायला पाहिजे ते उपचार भेटतच नाही. त्यामुळे मानसिक आजार ही  आपल्या देशातील सध्याची  ज्वलंत समस्या आहे. मानसिक रुग्णाकडे पाहण्याचा सर्वप्रथम त्याच्या कुटूंबातील लोकांना,मित्रमैत्रिणीना आणि  समाजाला निकोप दृष्टीकोण स्वीकारावा लागेल. मानसिक रुग्णाचे जेवढे समुपदेशन महत्वाचे आहे तेवढेच त्या रुग्णाच्या सहवासात येणाऱ्या लोकांचेही समुपदेशन आवश्यक आहे. मानसिक रुग्णाला वैद्यकीय उपचारासोबतच सहानुभूती,प्रेम,सामंजस्य याची जास्त गरज असते,जी आज आपल्या समाजात नाही.
माणसामाणसातील दुरावा,संवादाचा अभाव,भौतिक सुखाचा अतिरेक,चंगळवाद,राक्षसी महत्वाकांक्षा, त्यासाठीची स्पर्धा,आहार विहाराच्या चुकीच्या पध्दती, ही सगळी कारणे मानसिक आजाराची प्रमुख कारणे आहेत. समाज निकोप बनवायचा असेल तर या सगळ्या कारणाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
_______________________________
-करण बायस, हिंगोली.

प्रत्येकाच्या आयुष्यात बऱ्याच अनपेक्षित गोष्टी घडतात आणि नैराश्याला सामोरे जावे लागते.अशा गोष्टींचा जीवनावर खूप परिणाम होतो. अशा परिस्थितीतुन सवरताना सतत एक विचार येतो की माझ्यावर पुन्हा ही परिस्थिती येऊ नये.कारण अशा परिस्थितीना सामोरे जाण्याची प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते.तणाव हाताळण्याची क्षमता वेगळी असते.
जास्त तणावामुळे शरीरावर दुष्परिणाम होतातच.आजच्या या धावपळीच्या जीवनात मानसिक आजरांचे प्रमाण वाढत आहेत. माणूस आता डिजिटल होत आहे,म्हणजेच माणूस बाहेरील जगाच्या, निसर्गाच्या, मित्रांच्या, कुटुंबाच्या दूर जात आहे आणि एका आभासी जगात हरवत चालला आहे. ज्यामुळे मानसिक आजार वाढत आहे.
एखादा मनोरुग्ण मनोरुग्णालयात भरती होतो त्यावेळेस तो घरच्यांपासून, आपल्या माणसांपासून, एकटे न पडू देणाऱ्या मित्रांपासून दुरावतो,कारण हे सगळे लोक त्याच्याकडे पाठ फिरवतात, आणि मनोग्णालयाच्या चार भिंतीत तो कैद होतो.
मनोरुग्णाला खरंतर गरज असते ती आपल्या माणसांची ज्यांच्या सोबत तो मोकळेपणाने राहू शकतो.जर हा आपलेपणा ह्या मनोरुग्णाना मिळाला तर त्यांचा आजार कमी होण्यास मदत होईल.

विजया दशमी...नेमका विजय कशावर.!

📄 आठवडा 1⃣0⃣0⃣वा 📝
विजया दशमी...नेमका विजय कशावर.!


श्रीनाथ कासे , सोलापूर


भारत देश खूप विशाल आहे. यामध्ये विविध धर्म, विविध जाती, विविध भाषा आढळतात, पण ' सांस्कृतिक एकता ' आणि ' उत्सव ' आपल्याला एका धाग्यात राहायला मदत करतात.
उत्सव आपल्या जीवनात आनंद, उत्साह, सर्जनशीलता आणण्याचे काम करते. कालिदास यांच्या मते, " उत्सव प्रिय: मानवा: "  माणूस हा उत्सव प्रिय असतो.
आज विजयादशमी (दसरा) महिषासुर या दैत्याला देवीने हरवले हा तो दिवस, राम आणि रावण यामध्ये प्रभू रामाचा विजय झाला हा तो दिवस, यादिवशी रावणाचे पुतळे बनवून जाळले जातात. हा दिवस वाईट विचारावर विजय दर्शवणारा, सकारात्मक ऊर्जा देणारा, नवचैतन्य आणणारा आहे.
या दिवशी सरस्वती पूजा, शस्त्र पूजा केली जाते. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे शुभ मानला जातो त्यामुळे नवीन वस्तू, सोने खरेदी या दिवशी केली जाते.
या दिवशी आपट्याची पाने ' सोने ' म्हणून दिले जाते. यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. याविषयी कौत्स आणि रघुराजा यांची कथा प्रसिद्ध आहे.

आपल्यामध्ये जे वाईट विचार, फाजील धर्माभिमान, कामचुकार गुण, आपल्यातील क्रोध, मत्सर यावर विजय मिळवून आपण विजयादशमी साजरा करावा एवढीच अपेक्षा.
------------------------------------------

संदिप बोऱ्हाडे,वडगाव मावळ, पुणे

रावण ज्याला जगातील
सगळ्या वाईट गोष्टींचे प्रतीक मानतात..आणि म्हणूनच या राजाला दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी जाळून वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींचा विजय म्हणून नेहमीच सांगीतले जाते..

     रावणाबद्दल आपल्याला ज्या ज्या गोष्टी माहिती आहेत किंवा सांगितल्या जातात त्या सगळ्या वाल्मिकी आणि तुलसीदास यांनी लिहिलेल्या रामायण यामधून..परंतु देशात या दोन रामायणा व्यतिरिक्त अनेक रामायणे आहेत.. त्यातून  रावणाची वेगळीच ओळख सांगितलेली आहे.

   सीतेचे अपहरण या एका कारणासाठी जर रावण इतका मोठा खलनायक ठरू शकत असेल..
तर..
कृष्ण का नाही..?? ज्याने रुक्मिणी चे अपहरण केले होते.
अर्जुन का नाही..?? ज्याने सुभद्रेचे अपहरण केले होते..
आणि भीष्म का नाही..?? ज्याने काशीराज यांच्या तीन मुलींचे अपहरण केले होते..
वृंदेला फसवून तिचा विनयभंग करणारा विष्णू का नाही..??
अहिल्येचा विनयभंग करणारा इंद्र का नाही..??
वालीला मारून जबरीने त्याच्या पत्नीला तिच्या दिराच्या हवाली करणारा, शूर्पणखेचे नाक कान कापणारा  लक्ष्मण का नाही..??
सख्ख्या आईची चारित्र्याच्या भंपक कारणावरून हत्या करणारा परशुराम का नाही...??

   अजून एक सांगितले जाते रावण वाईट कारण तो क्रोधीत स्वभावाचा होता एका भावाच्या बहिणीचा अपमान केल्यावर साहजिकच कोणीही कोणालाही राग येणारच..
रावण क्रोधीत होता तर मग दुर्वासा का नाही दुर्वासा च्या बद्दल कालिदास आपल्या ज्ञान शकुंतलम या ग्रंथात लिहितात सुलभकोपो महर्षी..
प्रत्येक गोष्टीत लक्ष्मण पण क्रोधीत होत होता मग लक्ष्मण का नाही..??

अजून एक संगीतले जाते रावण घमंडी होता..
घमंडी तर मग परशुराम पण होता मग परशुराम का नाही...??

 थोडक्यात, आमचा तो देव...तुमचा तो बलात्कारी राक्षस...पण मी सांगतो रावण एक न्यायप्रिय , समानतावादी असणारा एक लोकप्रिय राजा होता..परंतु कोणतेही ऐतिहासीक पुरावा नसल्यामुळे रावण हे पात्र एका वेगळ्या पध्दतिने दाखविले गेले. महाराजा रावण चे चरित्र मुळात असे नाहीच की दरवर्षी वाईटांचे प्रतीक म्हणून दरवर्षी त्यांना जाळले जावे..थोडा जर आपण बुद्धीचा वापर केला तर नक्कीच रावण इतका मोठा खलनायक नाही की, दरवर्षी त्याला जाळले जावे ही मानवता नाही. नैतिकता आणी न्यायाच्या दृष्टीने हे चरित्र कायम निर्दोष साबीत होते.

      तुम्ही जाळलं त्याला, राक्षस, दृष्ट, वाईट म्हणून हिणवल..तो संपला म्हणून अतिषबाजी केलीत..पण तो पुन्हा उभा रहाणार ताठ मानेने.. कारण तो मरत कधीच नाही.आयुष्यात संघर्ष करणारा, शून्यातून साम्राज्य उभं करणारा, आईच्या अपमानाचा बदला घेणारा.. बहिणीच्या सुखासाठी सगळी दुनिया उलथापालथ करणारा..रावण आपल्या सगळ्यांमध्ये जीवंत राहो.

नेमका कशावर आपण हा विजय साजरा करत आहोत याचा विचार जरूर सर्वांनी करवा..!!
------------------------------------------

प्रविण, मुंबई


विजय नेमका कोणावर मिळवायचा यावर विचार करत असताना पहिला हाच विचार डोक्यात आला. प्रत्येकला कुठे तरी पोहचायचे आहे, प्रत्येकाला विजय मिळवायचा आहे. पण नेमक कुठे पोहोचायचं आहे किंवा नेमक कोणावर/ कशावर विजय मिळवायचा आहे हे अस्पष्ट आहे.

धर्माच्या निर्मात्यांनी माणसांसाठी धर्म बनविला, धर्माने माणसाच्या जीवन पद्धती ठरवल्या,  खान-पिन उठण-बसण  यावर प्रभाव टाकला , मग जाती भेद, धर्मभेद, वर्णभेद, लिंगभेद, कर्मकांडे आली , धर्माने माणसातल्या माणूसपणावरच घाव घालायला सुरवात केली आणि माणसांसाठी बनलेला धर्माचा माणूस गुलाम झाला. दुसर्याच्या धर्मावर विजय मिळवला या उन्मादात असलेला माणूस स्वतःशी च हरला.

माणसाने स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी अगदी निसर्गावर विजय मिळवून अनेक गोष्टींचा शोध लावला. प्रत्येक शोधाबरोबर त्याची भागलेली एक गरज अनेक गरजांना जन्म देऊ लागली आणि माणूस तेवढ्याच जोमाने गरज भागवू लागला; विज्ञानावर आरूढ होऊन गरजांवर विजय मिळवू लागला. या विजयोन्मादात निसर्गाचा ऱ्हास होत होता पण विजयाच्या नशेत स्वतः पराभूत होत राहिला.

सामाजिक माध्यमांनी कैक मैलांच्या भौगोलिक अडथळ्यांवर विजय मिळवून जग जोडले. पण जग जोडणारी हि माध्यमे मन जोडण्यात अपयशी ठरली किंबहुना असत्या, अफवा पसरवण्याची साधने बनली. या अफवांना बळी पडणारी माणसे पुन्हा एकदा स्वतःशीच हरली.

सुखाच्या पाठी लागून सुखाचा चुकीचा अर्थ काढत अनेक गोष्टींची निर्माती झाली. दारू, सिगारेट, जुगार , देहव्यापर इ सामाजिक व्याधिचा जन्म झाला, ती वाढू लागली आणि समाजाचा अविभाज्य भाग बनू लागली. सुखी होताहोता व्यसन आणि वासनेच्या सागरात हा माणूस बुडू लागला आणि स्वतःशीच हरू लागला.

निसर्ग, समजा, देश आणि माणूस जपायचा असेल तर विजयादशमी ला प्रत्येकाने स्वतः मधील जातीवाद, स्वतः मधील सामाजिक आणि आर्थिक भेद तसेच वासना, मत्सर, द्वेष इ चा पराभव करून स्वतः वर विजयमिळवण्याचा संकल्प करावा. विजयादशमीला नेमका विजय कोणावर तर तो स्वतःवर, स्वतःमाधल्या रावणावर .
------------------------------------------

संगीता देशमुख,वसमत

          विजयादशमी म्हटलं की डोळ्यासमोर येते महिषासुरावर देवीचा विजय,रावणावर रामाचा विजय! त्या अनुषंगाने अनेक आख्यायिका आपल्याला ऐकायला भेटतात. त्यात तथ्य किती हे त्या त्या साहित्यिकालाच माहीत! आम्ही मात्र परंपरा म्हणून त्यावर काहीही विचार न करता संस्कृतीरक्षण म्हणून अंधानुकरण करत असतो. अंधानुकरण यासाठी म्हणतेय की,कदाचित काही परंपरा त्याकाळी गरजेच्या किंवा कालानुरूप योग्य असतील परंतु आज  मुठीत तंत्रज्ञान घेऊन फिरणारी ही  विज्ञानयुगात देखील अनेक अनिष्ट रुढीपरंपरा पाळत असते. महिषासुराचा वध करणाऱ्या देवीचा नवरात्री महोत्सव साजरा करतो. पण त्यातही चपला सोडणे,अंगात येणे,लिंबू उतरविणे,नऊ दिवस विना अन्नपाण्याचे उपवास करणे,अजून बऱ्याच अंधश्रद्धा यानिमित्ताने खेडूतासह शहरी लोक,अशिक्षितांसोबत सुशिक्षित(?)लोक जोपासताना दिसतात. मूठभर लोक अशा बाबींना विरोध करतात,तेव्हा त्यांच्यावरच  धर्मविरोधी म्हणून टिकास्त्र सोडल्या जाते. त्याबरोबरच रावणाचे दहन हेही असेच अंधानुकरण! दहा मेंदूइतका अत्यंत कुशाग्र बुध्दीचा समजला जाणारा रावण फक्त सीतेचे अपहरण करतो आणि रामाकडून पराजित होतो एवढ्या कारणाने त्याचा दरवर्षी पुतळा जाळून पैशाचा,वेळेचा अपव्यय करत प्रदुषणाला खतपाणी घालत ही संस्कृती(?)जपल्या जाते.
           आज या बाबी किती योग्य आहेत,याचा कोणी विचात करतो का? जर देवीने महिषासुराचा वध केला असेल तर गर्भापासून वृध्दावस्थेपर्यंत असुरक्षित असणाऱ्या स्त्रीला किंवा एखाद्या बंडखोर स्त्रीला आज समाज काय वागणूक देतो!! रावणाने सीतेचे फक्त अपहरण केले. त्यानेही त्याच्या बहिणीवरच्या प्रेमापोटी आणि कर्तव्यापोटीच केलेले हे कृत्य होते. एवढच आपल्याला सीतेबद्दल प्रेम आणि आदर असेल तर हलक्या कानाच्या रामाने सीतेचा सर्वश्रुत जो छळ केला त्यासाठी तर रामाचाही पुतळा जाळायला हवा. आपण इथेच चुकतो. आम्हाला स्त्रीशक्तीबद्दल आदर दाखवायचा असेल तर पुराणातल्या स्त्रियांबद्दल प्रेम दाखविण्याऐवजी आज आम्ही स्त्रीला काय वागणूक देतो हे पहायला हवे. रावणापेक्षा नीच वृत्तीने आज स्त्रियांवर,बालिकेवर करणाऱ्या बलात्काऱ्याला भर चौकात जाणण्याचे धाडस करावे. पण असं काहीही घडणार नाही. दरवर्षी रावण जाळण्यापूर्वी  आम्हाला खरच विजय कशावर मिळवायचा हे एकदा तरी विवेकाने विचार करायला हवा. असे कागदी पुतळे जाळण्यापेक्षा समाजातील आज दुष्कृत्य करणाऱ्या नराधमाला शोधून,त्याला  जाळून त्यावर विजय मिळवायला हवा.
हे खरे संस्कृतीरक्षण !
------------------------------------------

सचिन पाटील


अर्चना आणि सचिन अगदीच लक्ष्मी नारायणाचा जोडा.चार महिन्यापुर्विच संसार बंधनात अडकलेत,आनंदाचा संसार आणि विशेष म्हणजे एकाच शाळेत शिक्षक म्हणून कामावर.अगदीच सर्व आनंदी आनंद...
त्यात झाल असं,
दसर्याला शाळेत रामालीला करायच प्राचार्यांनी ठरवल आणि अर्चनाला त्यात सीतेचा रोल मिळाला,पण नेमक घोड अस अडलं की सचिनला रावणाचा रोल मिळाला.मग काय विचारायच जणू दोघांच्या मनात आणि संसारात सुंदरकाड संपुष्टात येऊन फक्त काय सीता हरणच सुरु झाला....

तिला माझ्या विषयी काय वाटत असेल.चार-सहा महिन्याच्या संसारात तीने माझ्यात रावण तर पाहीला नसेल,तीच अपहरण नाटकात करतांना वैयक्तिक आयुष्यात एका मुलीची लग्नानंतर होणारी ताटातुट तर तीला दुःखद करणार नाही ना? ह्या विचारांनी सर्वांना नेहमीच वैचारिक वाटणाऱ्या सचिनच्या मनात गोंधळ सुरु झाला.अर्चना आपली नेहमी सारखी शांत, मितभाषी आणि फारस मनावर न घेणारी.म्हणजे एकूणच नेहमी गृहीत धरली जाणारी त्यावरुन तीच्या मनाचा ठाव लागणेही शक्य नाही..अश्यातच वेळ जात राहीली आणि रामालीलेचा दिवस उजाडला......

आधीच नाट्यप्रेमी असणाऱ्या  सचिनने रावणाचा रोल अतिशय चांगला सुरु केला पण सीता हरण करण्याआधी त्यांचा मनाची घालमेल त्यालाच माहीत...
सीताहरणाचा प्रसंग सुरु झाला आणि अहो आश्चर्य सीतेच्या रुपात असणारी सीता रावणाच्या रुपातल्या सचिन सोबत हसत हसत जाऊ लागली आणि सर्वांनाच हसू आले.....
पण सचिनच्या मनात सुरु झाले प्रश्नाचे थैमान...त्याला वाटू लागलं की एकदाच अर्चनाला विचारतो...

संध्याकाळी एकांतात अर्चनाला विचारलं तेव्हा अर्चनाची प्रगल्भता अवाक करणारी होती..
अर्चना- सर्वांनाच सीतेचा राम मर्यादा पुरोषोत्तम भासतो पण खरी मर्यादा सांभाळली ती रावणाने.खर्या अर्थाने ईद्रियावर विजय मिळवणारा रावण हा उत्तम शासक,राजकारणी,निष्ठावंत आणि शुध्द चारित्र्याचा परम शिवभक्त होता.तुम्ही रावणाच्या रुपात माझ हरण करत असतांना चार महिन्याच्या संसारतला तुमच्यातला राम मला आठवला तेव्हा मला बर वाटलं पण रावाणाच रुप साकारतांना बहिणीच्या अपमानाचा बदला घेऊण्यासाठी सीतेच हरण करणारा,सीतेसारखी स्त्री आपली बंदी असुनही आपली मर्यादा सांभाळणारा,अफाट वैभव असतांनाही भक्तीत तल्लीन होऊन सर्वश्रेष्ठ भक्त ठरणारा,भाऊ विरोधात जाऊनही बंधूप्रेम जोपासणारा मर्यादा पुरोषोत्तम रावण मला दिसला,म्हणून हसत हसत मी रावणासोबत आले.....अगदी काव्यात्मक भाषेत सांगायचं तर नितीन देशमुखांच्या शब्दात

सीतेने दिली अग्नीपरीक्षा
तेव्हा चारित्र्य खरे रावणाचे उजडले

नेहमीच गृहीत धरली जाणारी अर्चना/बायको/ स्त्री अंतकरनातून बोलत होती आणि नेहमीच वाचाळ असणारा,स्वतःला वैचारिक समजणारा सचिन/नवरा/पुरुष फक्त ऐकत होता एकाच विचाराच्या तंद्रीत...
की विजया दशीमत नेमका विजय कशावर ...
------------------------------------------

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************