विजया दशमी...नेमका विजय कशावर.!

📄 आठवडा 1⃣0⃣0⃣वा 📝
विजया दशमी...नेमका विजय कशावर.!


श्रीनाथ कासे , सोलापूर


भारत देश खूप विशाल आहे. यामध्ये विविध धर्म, विविध जाती, विविध भाषा आढळतात, पण ' सांस्कृतिक एकता ' आणि ' उत्सव ' आपल्याला एका धाग्यात राहायला मदत करतात.
उत्सव आपल्या जीवनात आनंद, उत्साह, सर्जनशीलता आणण्याचे काम करते. कालिदास यांच्या मते, " उत्सव प्रिय: मानवा: "  माणूस हा उत्सव प्रिय असतो.
आज विजयादशमी (दसरा) महिषासुर या दैत्याला देवीने हरवले हा तो दिवस, राम आणि रावण यामध्ये प्रभू रामाचा विजय झाला हा तो दिवस, यादिवशी रावणाचे पुतळे बनवून जाळले जातात. हा दिवस वाईट विचारावर विजय दर्शवणारा, सकारात्मक ऊर्जा देणारा, नवचैतन्य आणणारा आहे.
या दिवशी सरस्वती पूजा, शस्त्र पूजा केली जाते. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे शुभ मानला जातो त्यामुळे नवीन वस्तू, सोने खरेदी या दिवशी केली जाते.
या दिवशी आपट्याची पाने ' सोने ' म्हणून दिले जाते. यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. याविषयी कौत्स आणि रघुराजा यांची कथा प्रसिद्ध आहे.

आपल्यामध्ये जे वाईट विचार, फाजील धर्माभिमान, कामचुकार गुण, आपल्यातील क्रोध, मत्सर यावर विजय मिळवून आपण विजयादशमी साजरा करावा एवढीच अपेक्षा.
------------------------------------------

संदिप बोऱ्हाडे,वडगाव मावळ, पुणे

रावण ज्याला जगातील
सगळ्या वाईट गोष्टींचे प्रतीक मानतात..आणि म्हणूनच या राजाला दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी जाळून वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींचा विजय म्हणून नेहमीच सांगीतले जाते..

     रावणाबद्दल आपल्याला ज्या ज्या गोष्टी माहिती आहेत किंवा सांगितल्या जातात त्या सगळ्या वाल्मिकी आणि तुलसीदास यांनी लिहिलेल्या रामायण यामधून..परंतु देशात या दोन रामायणा व्यतिरिक्त अनेक रामायणे आहेत.. त्यातून  रावणाची वेगळीच ओळख सांगितलेली आहे.

   सीतेचे अपहरण या एका कारणासाठी जर रावण इतका मोठा खलनायक ठरू शकत असेल..
तर..
कृष्ण का नाही..?? ज्याने रुक्मिणी चे अपहरण केले होते.
अर्जुन का नाही..?? ज्याने सुभद्रेचे अपहरण केले होते..
आणि भीष्म का नाही..?? ज्याने काशीराज यांच्या तीन मुलींचे अपहरण केले होते..
वृंदेला फसवून तिचा विनयभंग करणारा विष्णू का नाही..??
अहिल्येचा विनयभंग करणारा इंद्र का नाही..??
वालीला मारून जबरीने त्याच्या पत्नीला तिच्या दिराच्या हवाली करणारा, शूर्पणखेचे नाक कान कापणारा  लक्ष्मण का नाही..??
सख्ख्या आईची चारित्र्याच्या भंपक कारणावरून हत्या करणारा परशुराम का नाही...??

   अजून एक सांगितले जाते रावण वाईट कारण तो क्रोधीत स्वभावाचा होता एका भावाच्या बहिणीचा अपमान केल्यावर साहजिकच कोणीही कोणालाही राग येणारच..
रावण क्रोधीत होता तर मग दुर्वासा का नाही दुर्वासा च्या बद्दल कालिदास आपल्या ज्ञान शकुंतलम या ग्रंथात लिहितात सुलभकोपो महर्षी..
प्रत्येक गोष्टीत लक्ष्मण पण क्रोधीत होत होता मग लक्ष्मण का नाही..??

अजून एक संगीतले जाते रावण घमंडी होता..
घमंडी तर मग परशुराम पण होता मग परशुराम का नाही...??

 थोडक्यात, आमचा तो देव...तुमचा तो बलात्कारी राक्षस...पण मी सांगतो रावण एक न्यायप्रिय , समानतावादी असणारा एक लोकप्रिय राजा होता..परंतु कोणतेही ऐतिहासीक पुरावा नसल्यामुळे रावण हे पात्र एका वेगळ्या पध्दतिने दाखविले गेले. महाराजा रावण चे चरित्र मुळात असे नाहीच की दरवर्षी वाईटांचे प्रतीक म्हणून दरवर्षी त्यांना जाळले जावे..थोडा जर आपण बुद्धीचा वापर केला तर नक्कीच रावण इतका मोठा खलनायक नाही की, दरवर्षी त्याला जाळले जावे ही मानवता नाही. नैतिकता आणी न्यायाच्या दृष्टीने हे चरित्र कायम निर्दोष साबीत होते.

      तुम्ही जाळलं त्याला, राक्षस, दृष्ट, वाईट म्हणून हिणवल..तो संपला म्हणून अतिषबाजी केलीत..पण तो पुन्हा उभा रहाणार ताठ मानेने.. कारण तो मरत कधीच नाही.आयुष्यात संघर्ष करणारा, शून्यातून साम्राज्य उभं करणारा, आईच्या अपमानाचा बदला घेणारा.. बहिणीच्या सुखासाठी सगळी दुनिया उलथापालथ करणारा..रावण आपल्या सगळ्यांमध्ये जीवंत राहो.

नेमका कशावर आपण हा विजय साजरा करत आहोत याचा विचार जरूर सर्वांनी करवा..!!
------------------------------------------

प्रविण, मुंबई


विजय नेमका कोणावर मिळवायचा यावर विचार करत असताना पहिला हाच विचार डोक्यात आला. प्रत्येकला कुठे तरी पोहचायचे आहे, प्रत्येकाला विजय मिळवायचा आहे. पण नेमक कुठे पोहोचायचं आहे किंवा नेमक कोणावर/ कशावर विजय मिळवायचा आहे हे अस्पष्ट आहे.

धर्माच्या निर्मात्यांनी माणसांसाठी धर्म बनविला, धर्माने माणसाच्या जीवन पद्धती ठरवल्या,  खान-पिन उठण-बसण  यावर प्रभाव टाकला , मग जाती भेद, धर्मभेद, वर्णभेद, लिंगभेद, कर्मकांडे आली , धर्माने माणसातल्या माणूसपणावरच घाव घालायला सुरवात केली आणि माणसांसाठी बनलेला धर्माचा माणूस गुलाम झाला. दुसर्याच्या धर्मावर विजय मिळवला या उन्मादात असलेला माणूस स्वतःशी च हरला.

माणसाने स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी अगदी निसर्गावर विजय मिळवून अनेक गोष्टींचा शोध लावला. प्रत्येक शोधाबरोबर त्याची भागलेली एक गरज अनेक गरजांना जन्म देऊ लागली आणि माणूस तेवढ्याच जोमाने गरज भागवू लागला; विज्ञानावर आरूढ होऊन गरजांवर विजय मिळवू लागला. या विजयोन्मादात निसर्गाचा ऱ्हास होत होता पण विजयाच्या नशेत स्वतः पराभूत होत राहिला.

सामाजिक माध्यमांनी कैक मैलांच्या भौगोलिक अडथळ्यांवर विजय मिळवून जग जोडले. पण जग जोडणारी हि माध्यमे मन जोडण्यात अपयशी ठरली किंबहुना असत्या, अफवा पसरवण्याची साधने बनली. या अफवांना बळी पडणारी माणसे पुन्हा एकदा स्वतःशीच हरली.

सुखाच्या पाठी लागून सुखाचा चुकीचा अर्थ काढत अनेक गोष्टींची निर्माती झाली. दारू, सिगारेट, जुगार , देहव्यापर इ सामाजिक व्याधिचा जन्म झाला, ती वाढू लागली आणि समाजाचा अविभाज्य भाग बनू लागली. सुखी होताहोता व्यसन आणि वासनेच्या सागरात हा माणूस बुडू लागला आणि स्वतःशीच हरू लागला.

निसर्ग, समजा, देश आणि माणूस जपायचा असेल तर विजयादशमी ला प्रत्येकाने स्वतः मधील जातीवाद, स्वतः मधील सामाजिक आणि आर्थिक भेद तसेच वासना, मत्सर, द्वेष इ चा पराभव करून स्वतः वर विजयमिळवण्याचा संकल्प करावा. विजयादशमीला नेमका विजय कोणावर तर तो स्वतःवर, स्वतःमाधल्या रावणावर .
------------------------------------------

संगीता देशमुख,वसमत

          विजयादशमी म्हटलं की डोळ्यासमोर येते महिषासुरावर देवीचा विजय,रावणावर रामाचा विजय! त्या अनुषंगाने अनेक आख्यायिका आपल्याला ऐकायला भेटतात. त्यात तथ्य किती हे त्या त्या साहित्यिकालाच माहीत! आम्ही मात्र परंपरा म्हणून त्यावर काहीही विचार न करता संस्कृतीरक्षण म्हणून अंधानुकरण करत असतो. अंधानुकरण यासाठी म्हणतेय की,कदाचित काही परंपरा त्याकाळी गरजेच्या किंवा कालानुरूप योग्य असतील परंतु आज  मुठीत तंत्रज्ञान घेऊन फिरणारी ही  विज्ञानयुगात देखील अनेक अनिष्ट रुढीपरंपरा पाळत असते. महिषासुराचा वध करणाऱ्या देवीचा नवरात्री महोत्सव साजरा करतो. पण त्यातही चपला सोडणे,अंगात येणे,लिंबू उतरविणे,नऊ दिवस विना अन्नपाण्याचे उपवास करणे,अजून बऱ्याच अंधश्रद्धा यानिमित्ताने खेडूतासह शहरी लोक,अशिक्षितांसोबत सुशिक्षित(?)लोक जोपासताना दिसतात. मूठभर लोक अशा बाबींना विरोध करतात,तेव्हा त्यांच्यावरच  धर्मविरोधी म्हणून टिकास्त्र सोडल्या जाते. त्याबरोबरच रावणाचे दहन हेही असेच अंधानुकरण! दहा मेंदूइतका अत्यंत कुशाग्र बुध्दीचा समजला जाणारा रावण फक्त सीतेचे अपहरण करतो आणि रामाकडून पराजित होतो एवढ्या कारणाने त्याचा दरवर्षी पुतळा जाळून पैशाचा,वेळेचा अपव्यय करत प्रदुषणाला खतपाणी घालत ही संस्कृती(?)जपल्या जाते.
           आज या बाबी किती योग्य आहेत,याचा कोणी विचात करतो का? जर देवीने महिषासुराचा वध केला असेल तर गर्भापासून वृध्दावस्थेपर्यंत असुरक्षित असणाऱ्या स्त्रीला किंवा एखाद्या बंडखोर स्त्रीला आज समाज काय वागणूक देतो!! रावणाने सीतेचे फक्त अपहरण केले. त्यानेही त्याच्या बहिणीवरच्या प्रेमापोटी आणि कर्तव्यापोटीच केलेले हे कृत्य होते. एवढच आपल्याला सीतेबद्दल प्रेम आणि आदर असेल तर हलक्या कानाच्या रामाने सीतेचा सर्वश्रुत जो छळ केला त्यासाठी तर रामाचाही पुतळा जाळायला हवा. आपण इथेच चुकतो. आम्हाला स्त्रीशक्तीबद्दल आदर दाखवायचा असेल तर पुराणातल्या स्त्रियांबद्दल प्रेम दाखविण्याऐवजी आज आम्ही स्त्रीला काय वागणूक देतो हे पहायला हवे. रावणापेक्षा नीच वृत्तीने आज स्त्रियांवर,बालिकेवर करणाऱ्या बलात्काऱ्याला भर चौकात जाणण्याचे धाडस करावे. पण असं काहीही घडणार नाही. दरवर्षी रावण जाळण्यापूर्वी  आम्हाला खरच विजय कशावर मिळवायचा हे एकदा तरी विवेकाने विचार करायला हवा. असे कागदी पुतळे जाळण्यापेक्षा समाजातील आज दुष्कृत्य करणाऱ्या नराधमाला शोधून,त्याला  जाळून त्यावर विजय मिळवायला हवा.
हे खरे संस्कृतीरक्षण !
------------------------------------------

सचिन पाटील


अर्चना आणि सचिन अगदीच लक्ष्मी नारायणाचा जोडा.चार महिन्यापुर्विच संसार बंधनात अडकलेत,आनंदाचा संसार आणि विशेष म्हणजे एकाच शाळेत शिक्षक म्हणून कामावर.अगदीच सर्व आनंदी आनंद...
त्यात झाल असं,
दसर्याला शाळेत रामालीला करायच प्राचार्यांनी ठरवल आणि अर्चनाला त्यात सीतेचा रोल मिळाला,पण नेमक घोड अस अडलं की सचिनला रावणाचा रोल मिळाला.मग काय विचारायच जणू दोघांच्या मनात आणि संसारात सुंदरकाड संपुष्टात येऊन फक्त काय सीता हरणच सुरु झाला....

तिला माझ्या विषयी काय वाटत असेल.चार-सहा महिन्याच्या संसारात तीने माझ्यात रावण तर पाहीला नसेल,तीच अपहरण नाटकात करतांना वैयक्तिक आयुष्यात एका मुलीची लग्नानंतर होणारी ताटातुट तर तीला दुःखद करणार नाही ना? ह्या विचारांनी सर्वांना नेहमीच वैचारिक वाटणाऱ्या सचिनच्या मनात गोंधळ सुरु झाला.अर्चना आपली नेहमी सारखी शांत, मितभाषी आणि फारस मनावर न घेणारी.म्हणजे एकूणच नेहमी गृहीत धरली जाणारी त्यावरुन तीच्या मनाचा ठाव लागणेही शक्य नाही..अश्यातच वेळ जात राहीली आणि रामालीलेचा दिवस उजाडला......

आधीच नाट्यप्रेमी असणाऱ्या  सचिनने रावणाचा रोल अतिशय चांगला सुरु केला पण सीता हरण करण्याआधी त्यांचा मनाची घालमेल त्यालाच माहीत...
सीताहरणाचा प्रसंग सुरु झाला आणि अहो आश्चर्य सीतेच्या रुपात असणारी सीता रावणाच्या रुपातल्या सचिन सोबत हसत हसत जाऊ लागली आणि सर्वांनाच हसू आले.....
पण सचिनच्या मनात सुरु झाले प्रश्नाचे थैमान...त्याला वाटू लागलं की एकदाच अर्चनाला विचारतो...

संध्याकाळी एकांतात अर्चनाला विचारलं तेव्हा अर्चनाची प्रगल्भता अवाक करणारी होती..
अर्चना- सर्वांनाच सीतेचा राम मर्यादा पुरोषोत्तम भासतो पण खरी मर्यादा सांभाळली ती रावणाने.खर्या अर्थाने ईद्रियावर विजय मिळवणारा रावण हा उत्तम शासक,राजकारणी,निष्ठावंत आणि शुध्द चारित्र्याचा परम शिवभक्त होता.तुम्ही रावणाच्या रुपात माझ हरण करत असतांना चार महिन्याच्या संसारतला तुमच्यातला राम मला आठवला तेव्हा मला बर वाटलं पण रावाणाच रुप साकारतांना बहिणीच्या अपमानाचा बदला घेऊण्यासाठी सीतेच हरण करणारा,सीतेसारखी स्त्री आपली बंदी असुनही आपली मर्यादा सांभाळणारा,अफाट वैभव असतांनाही भक्तीत तल्लीन होऊन सर्वश्रेष्ठ भक्त ठरणारा,भाऊ विरोधात जाऊनही बंधूप्रेम जोपासणारा मर्यादा पुरोषोत्तम रावण मला दिसला,म्हणून हसत हसत मी रावणासोबत आले.....अगदी काव्यात्मक भाषेत सांगायचं तर नितीन देशमुखांच्या शब्दात

सीतेने दिली अग्नीपरीक्षा
तेव्हा चारित्र्य खरे रावणाचे उजडले

नेहमीच गृहीत धरली जाणारी अर्चना/बायको/ स्त्री अंतकरनातून बोलत होती आणि नेहमीच वाचाळ असणारा,स्वतःला वैचारिक समजणारा सचिन/नवरा/पुरुष फक्त ऐकत होता एकाच विचाराच्या तंद्रीत...
की विजया दशीमत नेमका विजय कशावर ...
------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************