मयुर डुमणे,उस्मानाबाद.
विराज जगताप हत्या प्रकरणानंतर सोशलमीडियावर उफाळून आलेला जातीयवाद गंभीर आहे. या प्रकरणानंतर सोशलमीडियावर मराठा विरुद्ध दलित असा वाद पेटला. टिकटॉक अँपवरून जातीय द्वेष पसरविणारे व्हिडिओ तयार झाले. यातून पेटलेल्या वातावरणात तेल ओतले गेले. या सगळ्या परिस्थितीवरून समाजातील जातीय अस्मिता वरचेवर तीव्र होत चालल्याचे दिसून आले. हे समाजासाठी खूप घातक आहे. भीमा कोरेगावची दंगल याच टोकाच्या जातीय अस्मितेतून घडलेली घटना आहे. अशावेळी समाजसुधारकांच्या महाराष्ट्रात या जातीय अस्मिता तीव्र का होत आहेत हा प्रश्न पडतो. याला अनेक कारणं आहेत.
आरक्षण
यापैकी एक कारण म्हणजे आरक्षण. आरक्षण जातीय आधारावर दिले जाते. पण ते जातीय आधारावर का दिले जाते हे अनेकांना माहीत नाही. आरक्षण म्हणजे काय हे समजून न घेताच त्यावर आजची पिढी प्रश्न उपस्थित करते. वर्षानुवर्षे ज्यांना शिक्षणाची संधी नाकारण्यात आली. ज्यांच्यावर समाजाने जोपासलेल्या जातीव्यवस्थेने अन्याय केला त्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आलीय. हे इतिहासाचा गंध नसणाऱ्या पिढीला पटत नाही. इंजिनिअरिंगच शिक्षण घेतलेल्या तरुणाला सामाजिक इतिहास माहीत नसतो.काही अपवाद आहेत. सध्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. अशा या बेरोजगारीच्या काळात ज्या जातींना सरकारी नोकरीत आरक्षण नाही त्यांना आपल्यावर अन्याय होतोय. आपल्याकडे गुणवत्ता असूनही नोकरी मिळत नाही असं वाटण साहजिक आहे. यातून मग आपल्याही जातीला आरक्षण पाहिजे ही मागणी जोर धरू लागते. या परिस्थितीमुळे जातीय अस्मिता जागृत होऊन जातीयद्वेष वाढीस लागतो. नोकरी न मिळण्याच मुख्य कारण जरी वाढती बेरोजगारी,कौशल्याची कमतरता इत्यादी असले तरी त्याच्यावर आरक्षणामुळे आपल्याला नोकरी मिळत नाही हे बिंबवलं जातं.
सोशलमीडिया
जातीय अस्मिता अजून तीव्र होण्यास महत्वाचं कारण म्हणजे सोशलमीडिया. सोशलमीडिया येण्याआधीही जातीच अस्तित्व होतं पण काही प्रमाणात मर्यादित होतं. सोशलमीडियाच्या आगमनानंतर जातीयवादाची व्याप्ती वाढली. जातीयवादी शक्ती एकत्र येण्यास हातभार लागला. प्रत्येक जातीचा whatsapp ग्रुप, फेसबुक ग्रुप निघाला. या माध्यमातून जातीय अस्मितेला खतपाणी घालणारे मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. जातीयवादी पोस्ट मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्यावरील कमेंट प्रतिकमेंटमुळे सोशलमीडियावर टोकाचे वाद होऊ लागले. जातीचे ग्रुपस एकमेकांच्या जातींना लक्ष्य करू लागले. 'एक करोड अमुक जातीचा ग्रुप' अशा ग्रुप्सनी सोशलमीडियावर जातीयद्वेष पसरविण्यात मोठी भूमिका बजावलीय. आताही तुम्ही अशा प्रकारचे ग्रुप्स फेसबुकवर सर्च करून या ग्रुप्सवरून पसरवला जाणारा जातीयद्वेष किंवा जात कशाप्रकारे जोपासली जातेय हे पाहू शकता. टिकटॉक सारख्या अँपच्या माध्यमातून जातीयद्वेष पसरविणारे व्हिडिओ तयार केले जातात. सोशलमीडियाने जातीयवादी शक्तींना संघटनात्मक बळ मिळाले. जातीयवादी मानसिकतेची लोकं एकत्र आले.
महापुरुषांची वाटणी
जातीय अस्मिता तीव्र होण्याचं अजून एक कारण म्हणजे महापुरुषांची जातीयवाद्यांनी केलेली वाटणी. शिवाजी महाराज मराठ्यांचे, आंबेडकर दलितांचे त्यातही महारांचे, अण्णाभाऊ मातंगाचे, महात्मा फुले माळ्यांचे. ज्या लोकांनी इथल्या जातीव्यवस्थेविरोधात संघर्ष केला त्याच लोकांना जातीयवादी लोकांनी जातीत विभागले. आंबेडकर, शिवाजी महाराज किंवा फुले या लोकांना समजून न घेता यांचा वापर जातीय अस्मिता रुजविण्यासाठी करण्यात आला आणि यापुढेही होत राहणार.
डॉ. आंबेडकर त्यांचे शिवाजी महाराज आपले हा जातीयवादी विचार इथल्या अज्ञानी, जातीयवादी जनतेत रुजण्यास वेळ लागला नाही. आमचा महापुरुष कसा ग्रेट हे सांगण्याची स्पर्धा जातीयवाद्यांमध्ये नेहमी सुरू असते. या महापुरुषांच्या इतिहासाशी त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्यासंघर्षाशी यांचा काडीमात्र संबंध नसतो. महापुरुषांचा संघर्ष, विचार समजून न घेता त्यांचेच विचार ही जातीयवादी मंडळी पायदळी तुडवताना दिसुन येतात.
एका बाजूला असा जातीयवाद रुजत असताना दुसरीकडे आंतरजातीय विवाहाचे प्रमाण वाढताना दिसतेय. आधुनिकतेकडे वाटचाल करणारी, जातीला फाट्यावर मारणारी पिढी जातीयवादी शक्तींना तोंड देत आंतरजातीय विवाह करत आहेत. पण हा पुढाकार जातीयवादी शक्तींना सहन होत नाही यातून ऑनर किलिंगसारख्या घटना घडतात. असा पुढाकार घेणाऱ्या लोकांवर जातीय बहिष्कार टाकला जातो. जातीयवादी लोक आपला विचार बळकट करण्यासाठी स्त्रीला जातीय अस्मितेशी जोडतात. आपल्या जातीतील स्त्री दुसऱ्या जातीतील पुरुषाशी लग्न करते हे जातीयवाद्यांना सहन होत नाही. अशा घटनांचा वापर जातीय भावना भडकाविण्यासाठी केला जातो.
प्रबोधनाच्या चळवळीतील उदासीनता
ज्या प्रमाणात जातीच्या विषाची पेरणी केली जातेय त्या प्रमाणात प्रबोधनाची चळवळ अपुरी पडतेय. भरकटलेल्या तरुणाईला योग्य मार्गदर्शन करायला पुढे येणारे फार कमी लोक आहेत. प्रबोधनाची थंड पडलेली चळवळही जातीय अस्मिता तीव्र होण्यास कारणीभूत आहे. सोशलमीडियामुळे जशी जातीयवादी मानसिकता एकत्र आली तशी जात न मानणारे किंवा प्रबोधनाच्या चळवळीतील लोकं मोठ्या प्रमाणात एकत्र आले नाहीत. किंवा त्यांना तशी गरजही वाटली नाही. यांत काही अपवाद असतीलही. महाराष्ट्रातील समाजसुधारणेचा इतिहास काय आहे. महाराष्ट्राला शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र का म्हंटलं जातं हे महाराष्ट्रातील तरुणाईला समजणं गरजेचं आहे. कारण यांना खरा इतिहास समजला नाही की मग whatsapp वर सोशल मीडियावर पसरवला जाणारा दिशाभूल करणारा, खोटा इतिहास यांच्या लक्षात राहतो. शिवाजी महाराज मराठा जातीचे आंबेडकर दलितांचे हा विचार इथल्या मातीत रुजतोय हेच प्रबोधनाच्या चळवळीचे, समाज म्हणून आपले अपयश आहे. आंतरजातीय विवाह करू इच्छिणारी तरुणाई आपल्या समाजात तयार होतेय पण त्यांच्या मागे ठामपणे उभी राहणाऱ्या संघटना किती आहेत? जातीयतेची धार कमी करायची असेल तर समाजप्रबोधन होणं गरजेच आहे.
अमोल चाटे,पुणे.
जातींचा उगम हा वैदिक काळातील चतुर वर्ण व्यवस्थेतून झाल्याचे इतिहासकार मानतात. वैदिक काळातील वर्ण व्यवस्था ही जन्मावर आधारित नसून ती कर्मावर आधारीत होती.पण नंतर च्या काळात वर्ण व्यवस्था ही जन्मावर आधारित झाली व त्यातूनच पुढे अन्यायकारक, शोषणकारी जातीव्यवस्था जन्मास आली.
स्वातंत्र्याआधी व स्वातंत्र्यानंतर अनेक समाजसुधारकांनी आपले जीवन जातीव्यवस्था निर्मूलनासाठी घालवले, पण तरीसुद्धा जातीव्यवस्थेला अजूनही तडे गेले नाहीत. एकविसाव्या शतकात जातीव्यवस्था ही नव्या रूपात उभी आहे तिनी फक्त तिची कात बदलली आहे. एकविसाव्या शतकात जातीव्यवस्था ही वोट बँक आहे , दबाव गट आहे, सत्ता मिळवून देणारी शिडी आहे , आपल्या मागण्या मान्य करायला लावणारा समूह आहे.
जातींच्या उद्धाराचे अनेक प्रयत्न झाले पण पूर्णपणे जाती निर्मूलनाचा एकही प्रयत्न झाला नाही. कारण राजकारण्यांनी जाती धर्माच्या उपयोग फक्त राजकारण साठी व स्वतःच्या फायद्या साठी केला. दुर्दैवाने भारतीय राजकारण जाती धर्माच्या पलीकडे कधी गेलेच नाही.विकासाच्या मुद्यांवर एकही निवडणूक लढली गेली नाही.
आजकाल प्रत्येका कडे सोशल मिडियाची उपलब्धता आहे त्यामुळे आपण आपले म्हणने लाखो लोकांपर्यंत क्षणार्धात पोहचवू शकतो. याचे फायदे जसे आहेत तसेच दुष्परिणाम देखील आहेत. सोशल मीडियावर अफवा, खोटी माहिती , खोटया बातम्या देऊन भडकविण्यात येत आहे .राजकारणी तसेच काही समाजकंटक सोशल मीडियाचा वापर करून जाती धर्मात फूट पाडत आहेत. लोकांच्या भावना तिव्र केल्या जात आहेत, यातुन जातीय व धार्मिक कट्टरता वाढत चालली आहे.यामुळे जातीय धार्मिक तेढ वाढून दंगली व हिंसक आंदोलने होत आहेत.
ह्यावर एकच उपाय आहे राजकारणातील जात धर्माचा वापर बंद व्हावा यासाठी कडक कायदे करून ते आमलात आणले गेले पाहिजेत.
अनिल गोडबोले,सोलापूर.
या बाबतीत दोन विचारप्रवाह आहेत. काही व्यक्ती जात/धर्म ही गोष्ट फार महत्त्वाची मानत नाहीत. शहरामध्ये आणि काही अंशी खेड्यामध्ये सुशिक्षित आणि पुढारलेल्या व्यक्ती असा विचार करतात.
बऱ्याच ठिकाणी मात्र जात ही गोष्ट अती तीव्र होताना दिसते. शहरात आणि खेड्यात तर भरपूर प्रमाणात.
"आपण विरुद्ध ते" असा झगडा लावून देण्यात आणि स्वतःची पोळी भाजून घेण्यात प्रत्येक जातीचे नेते पटाईत आहेत.
लग्न करत असताना जात, धर्म, गोत्र, कुंडली, गुण सगळं बघतात. प्रेम करून लग्न करण्याची वेळ आली की जात आडवी येते.. आणि त्यातून एखाद्या ने निर्णय घेतला तर त्याचा 'सैराट' होतो.
प्रत्येक जातीचे एक महापुरुष आहेत. त्यांना काही बोललं की लगेचच जातीवर अन्याय होतो.
जस जसे आपण नवीन युगात जाऊ तसे जातीला फार अर्थ नसेल असे वाटत होते, पण या उलट घडताना दिसत आहे.
खालच्या आणि वरच्या जातीचे असे विभाजन सर्व ठिकाणी आहे. आपल्या-आपल्या जातीच्या लोकांमध्ये जमले की दुसऱ्या जातीला नाव ठेवायला मोकळे होतो आपण. हे धडधडीत वास्तव आहे.
जो पर्यंत आपण आपल्या खांद्यावर आपले डोके ठेवून विचार करणार नाही व दुसऱ्याच्या विचारांनी भडकणार नाही तो पर्यंत हे असेच चालणार.
आरक्षण ही जातिवादाच्या नाण्याची दुसरी बाजू.. म्हणजे ज्यांना कायद्याने आरक्षण दिले आहे ते लोक आपले आरक्षण टिकण्यासाठी वाट्टेल ते करतात.... ज्यांना आरक्षण नाही ते एकतर आरक्षण वर जळतात किंवा मग सरकार कडे आमच्या जातीला पण आरक्षण द्या म्हणून मागणी करतात.
शाळेच्या दाखल्यावर जात कशासाठी पाहिजे म्हणणारे व्यक्ती लग्न करताना मात्र सगळ्या गोष्टी बघतात याला आपल्याकडे "संस्कार" असे म्हणतात.. अशा गोष्टीना महत्त्व भरपूर आले असल्याने दुर्दैवाने म्हणावे लागते.. हो जातीय अस्मिता तीव्र आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा