महेश कामडी,नागपूर.
भन्नाट पाऊस
बेभान सुसाट हा वारा
बेधुंद या पाऊसधारा
प्रेमाचा तुझा हा इशारा
मिळता अंगात भरला शहारा
फिक्कट अंधुक काळोखात
वीजही देही मज साथ
कडकडत घेऊन सोबत
येती एक लख्ख प्रकाश
बघता हे भिजले अंग
वरुनी साडीचा गुलाबी रंग
अंगाला मिळाली अंग
ऐकता विजेचा मृदुंग
गोड गुलाबी ओठांवरूनी
उतरती पावसाच्या धारा
बघून त्यास असं वाटतंय
फुटते प्रेम रस लाव्हा
विज, वारा सोबत साथ देती
भन्नाट पाऊस धारा
एकमेकांच्या प्रेमात गुंतलोय
नको आता थांबण्याचा इशारा
श्रीनाथ कासे,सोलापूर
या पावसात
या पावसात भिजत असतील
कित्येक गरिबांची आडोसा नसलेली घरे ...
या पावसात भिजत असतील
कित्येक गुरं-ढोरं आणि शाळेवरून ५-१० कि.मी चालणारी मुलं ...
या पावसात कुजत असतील
गोदामाशिवाय स्टेशनवर टाकलेले कित्येक टन सरकारी गहू ...
या पावसात शिजत असतील
कित्येक शासकीय योजना ए.सी मध्ये, ज्या कधी पोचल्याच नाहीत जनतेपर्यंत ...
या पावसात रुजत असतील
शहरामध्ये येणाऱ्या नवतरुण सृजनशिलांचे स्वप्ने ...
या पावसात विझत असतील
ग्रामीण भागातील दिवे,शेतीपंप आणि कित्येकांची शिक्षणाचे दारे ...
या पावसात गळत असतील
कित्येक एस.टी, बसेस आणि शोषित कर्मचाऱ्याचे संसार ...
या पावसात जगत असतील
जीव मुठीत धरून प्रवास करणारी मुंबईमधील जनता आणि वैफल्यग्रस्त सरकार ...
या पावसात भिजून उघडे पडले असतील
कित्येक आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे थडगे ...
या पावसात लढत असतील
सीमेवर सैनिक जिद्द, चिकाटीने माझ्या आणि माझ्या देशाच्या संरक्षणासाठी ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा