हस्तमैथुन




मयुर डुमणे,उस्मानाबाद


हस्तमैथुन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग. हस्तमैथुन करतात सगळे पण निःसंकोचपणे यावर कोणीच बोलत नाही. मागे एकदा अभिनेत्री स्वरा भास्करने एका चित्रपटात हस्तमैथुनाचा सिन चित्रित केल्याने हा विषय चर्चेत आलेला होता. हस्तमैथुन हा खरंतर लैंगिक शिक्षणाचा भाग असायला पाहिजे. . यावर मोकळेपणाने बोललं जात नसल्यामुळे अनेकांच्या मनात या हस्तमैथुनाविषयी अनेक गैरसमज आहेत. हा विषय सध्याच्या काळात आपण बोलायला संकोचतोय पण र.धो. कर्वे यांच्या सारख्या समाजसुधारकाने या विषयावर स्वातंत्र्यापूर्वीच त्यांच्या समाजस्वास्थ्य या पत्रिकेतून विचार मांडले होते. 


काय असतं हे हस्तमैथुन? 

सेक्स ही मानवाची मूलभूत गरज. केवळ मुलं जन्माला घालणे एवढाच उद्देश सेक्सचा नाही. त्यातून माणसाला परमोच्च आनंद मिळतो त्यासाठीही सेक्स केला जातो. सेक्स करण्यासाठी विरुद्ध लिंगी जोडीदाराची गरज असते. पण प्रत्येकवेळी असा जोडीदार उपलब्ध असेलच असे नाही. आपल्या समाजात तर सेक्स करण्यासाठी विवाहाची अट आहे मग तोपर्यंत करायचं काय? वयात आलेला मुलगा, मुलगी यांच्या लैंगिक भावना वाढीस लागल्या असतात. वयात येत असताना म्हणजे साधारणतः 9 वी 10 वीत असताना ( सध्या अनेकजण त्या आधीही वयात येतात) शारीरिक बदल व्हायला सुरुवात झालेली असते. विरुद्ध लिंगी व्यक्तीविषयी म्हणजे मुलगा मुलीकडे, मुलगी मुलाकडे आकर्षित व्हायला सुरुवात होते. या वयातच लैंगिक भूक वाढीस लागते. ही लैंगिक भूक भागविण्याचा सोप्पा उपाय म्हणजे हस्तमैथुन. वयात आलेल्या मुलगी किंवा मुलीने हस्तमैथुन केल्यास त्यात काहीही चुकीचं नाहीय. अनेकांचा असा समज आहे की फक्त मुलंच हस्तमैथुन करतात. पण नाही मुली देखील हस्तमैथुन करतात आणि त्यात काही चुकीच नाही. फक्त मुलांच्या तुलनेने मुलींच्या हस्तमैथुनाचं प्रमाण कमी आहे इतकंच.  आपल्या लैंगिक गरजा आपण पूर्ण करतोय यात काहीही चूक नाही. लघवी करणं ही जशी नैसर्गिक प्रक्रिया आहे तशीच हस्तमैथुन ही देखील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपण आपल्या शरीराच्या गरजा रोखून ठेवू शकत नाही. शिक्षण, करिअरमुळे लग्नाचं वय वाढत चाललं आहे. अशा वेळी लैंगिक गरज भागविण्यासाठी हस्तमैथुनासारखा दुसरा चांगला पर्याय नाही.   चार भिंतीच्या आत सुरक्षित जागेत हस्तमैथुन केलं जातं. 


स्त्रियांचे हस्तमैथुन 

हा एक वेगळाच विषय आहे. पुरुषांच्या लैंगिक अभिव्यक्ती विषयी जेवढया मोकळेपणाने आपल्या समाजात बोलले जाते तितके स्त्रियांच्या लैंगिक अभिव्यक्ती विषयी बोलले जात नाही. तिचीही लैंगिक गरज असते. स्त्रियांना हस्तमैथुन करण्यासाठी बाजारात काही डीलडो, vibrator यांसारखी साधने उपलब्ध आहेत. पण बऱ्याच स्त्रिया अशी साधनं वापरायला लाजतात. शहरासारख्या ठिकाणी याचा जास्त वापर होतोय. सेक्स टॉइज अस या साधनांना म्हणतात. आपल्या देशात हे संस्कृतीच्या विरोधात आहे असं म्हंटल जातं पण अस काही नाहीय. स्वतःची लैंगिक गरज भागविण्याचे ते एक साधन आहे. स्त्रियांच्या हस्तमैथुनाविषयी स्त्रियाच स्त्रियांशी बोलत नाहीत. कमालीची गुप्तता पाळली जाते. हे कुठे तरी थांबलं पाहिजे. यावर मोकळेपणाने बोलल्यास गैरसमज वाढीस लागणार नाहीत. 


समज - गैरसमज

हस्तमैथुन केल्याने लिंगाचा आकार कमी होतो, वीर्य संपते, लैंगिक कमजोरी येते, हस्तमैथुन करतोय म्हणजे आपण काही तरी चुकीच कृत्य करतोय वगैरे असल्या काही बकवास समजुती प्रचलित आहेत. त्या खोट्या आहेत. आपण या विषयावर मोकळेपणाने बोलत नसल्यामुळे असे गैरसमज पसरविले जातात. लैंगिक भूक पूर्ण होईपर्यंत आपण हस्तमैथुन करू शकतो. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. हस्तमैथुनाचे आपल्या शरीरावर काही परिणाम होत नाहीत. उलट हस्तमैथुन केल्याने मानसिक आरोग्य चांगले राहते. 


लैंगिक शिक्षणात या विषयाची गरज

आपल्याकडील मुलांना किंवा मुलींना पॉर्न पाहिल्याशिवाय काय लैंगिक शिक्षण भेटतच नाही. लैंगिक शिक्षणात सेक्स काय असतो इतकंच शिकवलं जातं. ते तर पॉर्न पाहून अनेकांना कळत. पण हस्तमैथुनाविषयी कोणतीही माहिती दिली जात नाही. ही माहिती वयात येणाऱ्या मुला मुलींना वेळीच देणं गरजेच आहे.


निःसंकोचपणे व्यक्त व्हा,लाजायचं काहीच कारण नाही.

हस्तमैथुन,  सेक्स, मासिक पाळी या विषयावर मी निःसंकोचपणे बोलू शकतो कारण मी या गोष्टींकडे व्यापक दृष्टीकोनातून पाहतोय. विषयाची समज आल्यामुळे या विषयावर बोलायला काहीच वाटत नाही. माझ्यासाठी हा विषय आता नवीन राहिलेला नाही. हा विषय मी माझ्या मित्रांमध्येही बोलायला लाजायचो पण या विषयाची संपूर्ण शास्त्रीय माहिती मला मिळाल्यामुळे या विषयावर बोलायला काहीच वाटत नाही. मला वाटतं आजच्या तरुण पिढीने हा विषय नीट समजून घ्यावा आणि फक्त समजून न घेता यावर मोकळेपणाने व्यक्त होणं गरजेच आहे. Sex chat with papa या नावाने काही video youtube वर आहेत ते नक्की पहा. हस्तमैथुनाविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर डॉ.राहुल पाटील यांचा 'लैंगिकतेवर बोलू काही' हे youtube चॅनेल आहे.तिथे याविषयी सर्व माहिती मिळेल. तुम्हीही या विषयावर मोकळेपणाने व्यक्त व्हा.


योगेश नंदा,सातारा

सुरुवात - लैंगिक भावनांना वाट मोकळी करुन देण्याचा सहज, सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे हस्तमैथुन. अनेक जण याला साध्या गावठी भाषेत मूठ मारणे, हलवणे, बट्ट्या मारणे, गाळणे असंही म्हणतात. सध्या माध्यमिक इयत्तेत शिकणाऱ्या मुलांना याची पुरेपूर माहिती झालेली असते. हातवारे  करुन, किळसवाणं हसून ते या गोष्टीची थट्टाही करतातच. पण या गोष्टीची माहिती सांगून त्याविषयी मनमोकळं बोलायला कुणी तयार होत नसतं. 


म्हणजे काय? - स्वप्नदोष, वीर्यस्खलन हे त्याला जोडून येणारे काही शब्द आहेत. मुलांना किंवा पुरुषांना त्यांच्या संपर्कातील मित्रांकडून या प्रकारच्या कृतीविषयी माहिती मिळते. लग्न झाल्यानंतर स्त्री-पुरुषांमध्ये जी लैंगिक क्रिया घडून येते, (अनेक जण लग्न न करताही त्याचा आनंद घेतातच, लग्न ही फक्त त्या गोष्टीला अधिकृत मान्यता मिळवून देते) त्या क्रियेत जो आनंद लुटता येईल, तो आनंद स्वतःच्या शरीराशी खेळून मिळवण्याचा प्रयत्न हस्तमैथुनात केला जातो. पुरुषांच्या बाबतीत लिंगाची त्वचा पुढे-मागे करुन तर स्त्रियांच्या बाबतीत योनी स्पर्शाद्वारे लिंगाला उद्दीपित केलं जातं आणि या क्रियेचा आनंद घेतला जातो. शरीरात उत्साह संचारल्याची, मोकळं वाटल्याची भावना या क्रियेनंतर अनेकांना वाटते. लिंगावाटे पांढरा चिकट द्रव बाहेर पडल्यानंतर ही क्रिया पूर्ण झाली असं समजलं जातं. 


का? - हस्तमैथुन ही नैसर्गिक क्रिया आहे. वयात आल्यानंतर लैंगिक भावना उद्दीपित होतात, त्यांना वाट मोकळी करुन देण्यासाठीचा सुरक्षित मार्ग हस्तमैथुन आहे. कमी वयात शारीरिक संबंध ठेवण्यात येणाऱ्या अडचणींमुळे अनेकांसाठी हस्तमैथुन हा जिवलग दोस्तासारखा मार्ग आहे. अनेकजण टेन्शनमध्ये असताना वारंवार हस्तमैथुन करतात. अनेकांना पॉर्न फिल्म पाहून तर काहींना चावट कथा वाचूनही हस्तमैथुन करायची सवय असते. आपल्या आवडत्या किंवा हव्या त्या व्यक्तीशी ठेवलेला काल्पनिक लैंगिक संबंध हा ना समोरच्या व्यक्तीला घातक असतो ना स्वतःला. हा मात्र सारख्या लैंगिक भावना उद्दीपित होतात म्हणून त्या व्यक्तीचा भोगवस्तू म्हणूनच विचार करु लागलो तर अवघड होईल, किंबहुना वासनेच्या अधिक आहारी जाण्याचा धोकाही संभवतो. 


गैरसमज - हस्तमैथुन हे वाईट आहे, पाप आहे, त्यामुळं शरीरातील वीर्य संपतं अशा प्रकारचे गैरसमज समाजात आहेतच. रक्तदान केल्यानंतर ज्याप्रकारे शरीरात नवीन रक्त तयार होतं, त्याचप्रमाणे शरीरातील वीर्य बाहेर टाकल्यानंतर नवीन वीर्य तयार होण्याची प्रक्रिया घडून येते. हस्तमैथुन वारंवार करावं लागत असेल तर कोणताही संकोच मनात न बाळगता आपल्या आई-वडिलांशी, जवळच्या मित्र-मैत्रिणींशी, लैंगिकता विषयातील तज्ञांशी (गल्लीतील नव्हे, अनुभवी - मान्यताप्राप्त), मानसोपचार तज्ञांशी बोलायला हरकत नाही. 


या विषयावर माहितीपर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. letstalkaboutsexuality.com वरही लैंगिकतेसंदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरे सहज-सोप्या भाषेत दिलेली पहायला मिळतात. माझ्या मते माध्यमिक शाळेतून कॉलेज जीवनात पालकांनी आपल्या पाल्याला याविषयी माहिती दिली तर या गोष्टीचा बाऊ पुढे केला जाणार नाही. शिवाय लैंगिकतेकडे बघण्याचा एक निकोप दृष्टीकोनही समाजामध्ये तयार होईल.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************