ऑनलाईन शिक्षण शक्य आहे का ?

ऑनलाईन शिक्षण शक्य आहे का ?






Source: INTERNET


- अनघा नंदाने


लहानपणी दूरदर्शन वर एक कार्यक्रम यायचा: तरंग।

त्यात मा. अरविंद गुप्ता सर विज्ञानाच्या वेगवेगळ्या संकल्पना खूप सोप्या भाषेत खेळण्यांच्या माध्यमातून समजावून सांगायचे.

मी बऱ्याच छोट्याछोट्या संकल्पना त्यातूनच शिकले. 

अशा पद्धतीने ऑनलाईन शिक्षण यशस्वीरित्या मुलांपर्यंत पोहचू शकतं अशी या लेखाची सुरूवात हा विषय पाहिला तेव्हा मला सुचली होती. 


पण सोमवारी इंडियन एक्स्प्रेस वर पहिल्याच पानावर बातमी वाचली - बिहारमध्ये लाँकडाऊन मुळे शाळा बंद असताना मध्यान्ह भोजन मिळत नसल्याने तिथली कुपोषणाची समस्या वाढली आहे, हे वाचल्यानंतर ऑनलाईन शिक्षणाची मर्यादा लक्षात आली.


ज्या घरांमध्ये एक वेळची चूल पेटवायला पैसे नसतील, त्यांना कसं देणार आहोत आपण हे आँनलाईन शिक्षण? 


ऑनलाईन शिक्षणामुळे देशातील एक मोठया वर्गाची चिंता मिटली असली तरी त्याहीपेक्षा मोठा वर्ग शिक्षण व्यवस्थेतून आणि त्यातूनच पुढे मिळणाऱ्या संधींपासून बाहेर फेकला जाण्याची शक्यता जास्त आहे. 


यात "जेंडर" हा मुद्दा तर अजून विचारात घेतलेलाच नाही.


आपल्या देशात "ऑनलाईन" हा शब्द सध्यातरी फक्त मध्यमवर्गापर्यंत पोचला आहे. ( तेही अनलिमिटेड रिचार्ज मुळे. सध्या तेही महाग होत आहेत, त्यामुळे पुढे त्याचा वापर सुद्धा मर्यादित होऊ शकतो. ) त्याखालच्या वर्गापर्यंत "ऑफलाईन" सुविधा सुद्धा नीट पोचलेल्या नाहीत.


त्यामुळे असं म्हणता येईल कि - ऑनलाईन शिक्षण काहींसाठी शक्य आहे. पण प्रत्येकासाठी नाही. ते सर्वसमावेशक व्हायला अजून बराच काळ लागेल.




Source: INTERNET


-हितेन्द्रसिंग सिसोदिया


शिक्षण विभागाने पुरवलेले ई-साहित्य हे फुकट ते पौष्टिक तत्वावर गोळा करण्यात आले आहे. त्याचा दर्जा, परिणाम, तपशील यांची कोणत्याही प्रकारची तपासणी करण्यात येत नाही. पाठ्यपुस्तक मंडळाच्या म्हणजेच बालभारतीच्या स्थापनेपूर्वी खासगी पाठ्यपुस्तके होती. त्यातील तपशील वैविध्याचा समाचार घेणारा होता. ‘तुमची पृथ्वी नेमकी कोणत्या दिशेने फिरते?’ असा प्रश्न उपस्थित करणारा लेख आचार्य अत्रे यांनी लिहिला होता. आज उपलब्ध ई-साहित्याच्याबाबतीत हाच प्रश्न पुन्हा विचारण्याची वेळ आली आहे. आणि म्हणून लवचिकता हे खरेतर ऑनलाइन किंवा डिजिटल शिक्षणाचे बलस्थान. सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन शाळा या तत्वाशीच फारकत घेताना दिसतात. वर्गात उभे राहून शिकवण्याऐवजी कॅमेरासमोर फळा ठेवून शिकवणे इतक्या मर्यादित संकल्पनांच्या कक्षेत हे वर्ग सुरू आहेत. प्रत्यक्ष वर्गात शिकण्याएवढी परिणामकारकता या आभासी वर्गांमध्ये अर्थातच नाही. सध्या ऑनलाइन भरणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या काही शाळांमध्ये वर्गात होतो तेवढाही संवाद मुलांशी होताना दिसत नाही. वर्गातील वातावरण नियंत्रित असते तेथे मुलांचे लक्ष खिळवून ठेवणे जेवढे शक्य होते तेवढे अनियंत्रित आभासी वर्गांमध्ये शक्य नाही. माझ्या वाचनात अल्येल्या लेखा वरून भारतातील विद्यार्थीसंख्या अर्थातच शैक्षणिक साहित्याच्या बाजारपेठेला खुणावणारी आहे. करोनाकाळात टोकाचे नुकसान आणि त्याचवेळी नव्या संधी असा विरोधाभास दिसतो. शिक्षण क्षेत्र त्याला अर्थातच अपवाद नाही. एकीकडे आर्थिक घडी विस्कटल्यामुळे करोडो रुपयांची गुंतवणूक करून उभ्या राहिलेल्या चकचकीत, तारांकित शाळांसमोर अनेक आव्हाने आहेत. त्याचवेळी ई-साहित्य, ऑनलाईन शिक्षणाच्या बाजारपेठेने संधीचा फायदा घेऊन पाळे-मुळे घट्ट केली आहेत. शाळा आणि वर्गातील शिक्षण कधी सुरूच होणार नाही अशा आविर्भावात सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणाच्या आग्रहामागे झपाट्याने विस्तारणाऱ्या या क्षेत्रातील बाजारपेठेचाही मोठा वाटा आहे. बाजारपेठेतील संधींचे विश्लेषण करणाऱ्या खासगी संस्थांच्या अहवालानुसार भारतातील ऑनलाइन शिक्षणाच्या बाजारपेठेतील उलाढाल ही २०२४ पर्यंत १,४३३ कोटी अमेरिकन डॉलरच्या घरात असेल. मात्र त्यासाठी मूल्यांकन प्रणालीपासून अनेक गोष्टींत भारतीय विद्यापीठांनी किवा शिक्षण पद्धतीने बदल करणे गरजेचे आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांचा दर्जाही सुधारावा लागेल. केंद्राच्या स्वयम प्रणालीत उपलब्ध असलेल्या पाठांच्या दर्जाबाबतही अनेक स्तरावरून शंका उपस्थित करण्यात येतात. येत्या काळात मिश्र शिक्षण पद्धती अवलंबण्याला पर्याय राहणार नाही. त्यासाठी बदलांचा वेळीच अदमास घेऊन बाजारपेठेच्या दृष्टीने आणि विद्यार्थी हितासाठीही भारतीय शिक्षण विभागाने जागे होणे आवश्यक आहे. 

    येणाऱ्या काळात विविध विषयातील अभ्यासक्रम जसे कला, शास्त्र, तंत्रज्ञान, संगीत, व्यवसाय आणि व्यवस्थापन, तत्त्वज्ञान, रोजगार, राजकीय अशा विविध क्षेत्रांतील असल्याने आपली जी आवड असेल त्या विषयाचे अधिक ज्ञान या अभ्यासक्रमांमुळे मिळू शकेल. त्यामुळे कुठल्याही दुर्गम भागातील विद्यार्थ्यांला दर्जेदार शिक्षण मिळणे सोपे होईल. यामध्ये व्हिडीओच्या आधारे विषय समजावून सांगितला जातो. त्यामुळे त्याचे आकलन लवकर होते. पण याला थोडा वेळ लागू शकतो कारण सवय हि लगेच बदलत नाही. तसेच वेगवेगळया परीक्षांद्वारे या विद्यार्थ्यांचे आकलन किती झाले अथवा त्यास तो विषय किती समजला, हे वेगवेगळ्या स्थरावर पाहिले जाते. व्हिडीओ तास ऑनलाइन असल्याने विद्यार्थी लॉगइन केल्यावर केव्हाही पाहू शकतात. परिणामी, वर्गातील वेळ हा त्या विषयावरील चर्चेला उपयुक्त ठरतो पण अत्ता तसे होताना दिसत नाही. कदाचित यालाही बराच वेळ लागेल. अश्या अभ्यासक्रमांचा उद्देश फक्त शिकवणे हा नसून विद्यार्थ्यांने स्वत:हून शिकणे हा आहे. अजून तरी किती पालक किवा विध्यार्थी याला किती तयार असतील हा हि एक प्रश्न अजून. पण याच्या साहाय्याने विद्यार्थ्यांने गरजेनुसार आपले कौशल्य विकसित करणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल भविष्यात कदाचित. आता काही प्रमाणत याची तयारी वजा सराव म्हणवा लागेल. काही अभ्यासक्रमांना प्रमाणपत्रे मिळतात. ते अजून विद्यापीठाच्या पदवीसारखं ग्राह्य धरलं जात नाही. बऱ्याचदा असेही वाटत असेल की, ते व्हिडीओ पाहण्यात आपला वेळ तर जात नाही ना! नक्कीच नाही, कारण ते नामांकित विद्यापीठांकडून चालवले जातात. दुसरे म्हणजे विद्यार्थी जी पुस्तके वाचतात, ती सर्व दर्जेदार आहेत याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. पारंपरिक तास आणि पुस्तकासोबत अशा दर्जेदार अभ्यासक्रमांची भर पडली तर नक्कीच विद्यार्थ्यांला उत्तम शिक्षण मिळेल. विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढल्याने देशाची निर्मिति क्षमता वाढते. कौशल्यपूर्ण आणि निर्मितिक्षम व्यक्ती कोणत्याही देशाचे मानवी धन असून त्याचा उपयोग देशाच्या आर्थिक  विकासात होतो. आता येणारा काळ हा नक्कीच ऑनलाइन शिक्षण पद्धतीत बदलून जाईल, हेच खरे. तूर्त असाही आपला पाल्य नुसताच वेळ वाया घालवतोच ना इंटरनेट वर मग त्यातून त्याने काही शिकण्या योग्य गोष्ट घेतली तर काही वाईट होणार नाही…




Source: INTERNET


चैतन्यकुमार देवकर


खरं तर या कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या उद्देशाने अनेक ठिकाणी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला गेला आहे.

यामागचा उद्देश जरी योग्य असला तरी ऑनलाइन शिक्षणा समोर आव्हानही खूप आहेत.

वरील एका लेखामध्ये मी वाचलं की शाळा बंद असल्यामुळे बिहार मध्ये कुपोषण वाढले आहे त्याचबरोबर ऑनलाईन शिक्षणाची व्याप्ती श्रीमंत आणि मध्यमवर्गीय लोकांपर्यंत आहे. ज्या घरात चुल  पेटणे सुद्धा मुश्किल आहे तिथे  कस पोहोचणार? अगदी रास्त आहे..

परंतु काही शैक्षणिक संस्थांच्या आणि बहुतेक करून पैसे भरून शिक्षण देणाऱ्या संस्थानी आपल्या फायद्यासाठी आपले उत्पन्न कसं सुरळीत राहील हे पाहत अगदी पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याचा घाट घातला. आणि सरकार आणि आपण सर्वजण त्यामागं फरपटत चाललो आहोत.

मोठ्या मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी म्हणून ठीक आहे परंतु लहान मुलांचे शिक्षण लगेच सुरू करण्याचे काहीएक गरज नाही..

मोबाईल न मिळाल्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेण्यात अडचण येऊन आत्महत्या सारखे प्रकार ही घडत आहेत.

या विषयाची थोडीशी पायरी सोडून परंतु विषयाशी निगडीत असा एक मुद्दा  मांडू इच्छितो ..यूजीसी म्हणत आहे की 'विद्यापीठाच्या परीक्षा व्हायला हव्यात' तर विविध  सरकारं म्हणत आहेत नको .. सीबीएससी ने 30% अभ्यासक्रम कमी केला आहे. यूपीएससी आणि सर्व स्पर्धा परीक्षांबद्दल गोंधळाचे वातावरण आहे.. आणि एकूणच या संस्थांमध्ये कोणत्याही प्रकारची सुसूत्रता किंवा एकवाक्यता दिसत नाही त्यातून मार्ग काढायला आणि एकच स्पष्ट निर्णय होण्याची आवश्यकता आहे आणि न्यायसंस्थेच्या हस्तक्षेपाशिवाय हा गोंधळ संपणार नाही....



 

Source: INTERNET


श्रीनाथ कासे

सोलापूर


ह्या विषयाला समजून घेण्याअगोदर आपल्याला भारतीय शिक्षण व्यवस्थेला समजून घ्यावे लागेल. भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक १०+२+३ अशी रचना आढळते. शाळा ही जेवढी विद्यार्थी केंद्रित असेल तेवढी उत्तम ठरते पण शाळेला गुणवत्तापूर्ण बनवणारा शिक्षक हा महत्त्वपूर्ण घटक असतो. जेव्हा तुम्ही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीकडे अभ्यासू दृष्टीकोनातून व्यवस्थित बघता तेव्हा तुमच्या लक्षात येईल. लाखो रुपये भरून, हजारों शिक्षकांची भरती झालेले आहे. ते शिक्षक गुणवत्तापूर्ण असतील का ? आणि असते तर पैसे भरून शिक्षक झाले असते का ? हे महत्वपूर्ण आहे. 

तुम्ही लॉकडाऊन नंतर युट्युब वर ऑनलाइन टिचिंग फन व्हिडिओ बघितलेच असणार. त्यात विद्यार्थी मिया खलिफा, सनी लियोनी इ. असे नाव बदलून लॉगिन करतात आणि शिक्षकांची मजा घेतात. शिक्षकांना त्यांना काढून टाकता येत नाही किंवा पकडता येत नाही. तेथे तुम्हाला शिक्षक लाचार झालेले दिसून येतील. शिक्षक आणि तंत्रज्ञान या दोन गोष्टी भिन्न आहेत आत्ताच्या शिक्षकांना तंत्रज्ञानातील सर्व गोष्टी येतातच असे नाही. तंत्रज्ञानामध्ये भरपूर शिक्षक अडाणी दिसून येतात. त्यांना ट्रेनिंग ची गरज आहे. आजही शाळेत कम्प्युटर धूळ खात पडलेली दिसून येतील. प्रत्येक शाळेत कॉम्प्युटर लॅब दिसतील पण त्याचा वापर जास्त होत नाही. 

याच विरुद्ध विनाअनुदानित शिक्षक आता 20 टक्के, 30 टक्के, 50 टक्के पगार घेत आहेत म्हणजे  त्यामुळे इंटरनेटचे दर यांना परवडतील का ? आणि ज्यांना लाखो मध्ये पगार आहे त्यांना इंटरनेट जमेल काय ? 

जेव्हा शाळा भरायच्या तेव्हा विद्यार्थ्यांना मूर्त आणि अमूर्त गोष्टी समजावून सांगणे जमायचे. िद्यार्थ्याचे कन्सेप्ट क्‍लिअर असायचे. विद्यार्थ्यांमध्ये शाळेत संस्कार व्हायचे शिवाय इंटरनेट हे दुधारी तलवार आहे. यात शिक्षणापेक्षा वेळ वाया जाण्याचे प्रमाण जास्त असणार आहे. तुम्हाला वारंवार मोबाईलवर कॉम्प्युटरवर किंवा टॅबवर नोटिफिकेशन्स येत राहतील. फेसबूक, व्हाट्सअप इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया, मेसेज येत राहतील आणि काही चॅट ना उत्तर देणे फारच गरजेचे वाटणार. 

थोडक्यात ऑनलाईन शिक्षणाचा बाजार होणार या सर्व भीती अस्तित्वात असतानाच भारतीय ऑनलाईन शिक्षणामध्ये बायज्यूज, वेदांतू, खान अकॅडमी, टॉपर यासारखे हजारो कंपन्यांनी हजारो ॲप बाजारात उपलब्ध केले आहेत. सगळीकडे भांडवलशाही वाढलेली होती पण शिक्षणामध्ये तेवढी दिसत नव्हती पण आत्ता लॉकडाऊन नंतर या कंपन्यांना अरबो रुपयाचा फायदा झालेला आहे कारण हा पर्याय सगळ्यात सुरक्षित आहे. काळाची गरज आहे. लॉक डाऊन आणि कोरोनामुळे या कंपन्यांच्या फायद्यात वाढ झालेली आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे घरी बसून देशातील सगळ्यात चांगल्या शिक्षकाकडून तुम्ही शिक्षण घेऊ शकता. यामध्ये सध्या भरपूर पीडीएफ, व्हिडिओ, ऑडिओ उपलब्ध आहेत. शिवाय प्रत्येक व्हिडिओ खाली रिव्यू ,स्टार रेटिंग, फीडबॅक पाहायला मिळतील. ऑनलाइन शिक्षणामध्ये सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होतात त्यामुळे शिक्षक चांगली तयारी करून येतात. एकंदरीत विद्यार्थी गुणवत्ता पूर्ण होतीलच यामध्ये काही वाद नाही. आता तुम्ही म्हणाल, गरीब , आदिवासी विद्यार्थ्यांचा काय होणार ? ज्यांच्याकडे मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर नाही, ज्यांच्याकडे रेंज नाही, जे दुर्गम भागात राहतात त्यांचं काय होणार ? ज्यांच्याकडे दोन वेळचे जेवण नाही, जो मध्यान भोजन खाण्यासाठी शाळेत येत होता, तो शिक्षण घेईल काय ? याचं उत्तर तुम्हाला भांडवलशाही अर्थव्यवस्था देऊ शकणार नाही. हे प्रश्न तुमच्या सरकारला, व्यवस्थेला विचारा.

1 टिप्पणी:

  1. 1️⃣ *शाळांची दुरवस्था आणि ऑनलाईन शिक्षण*

    माणिक शिंदे,
    रावराजुर,
    ता.पालम, जि. परभणी

    मी शाळेत असताना माझ्या एका वर्गमित्राला एक विषय फारसा जमत नसे. त्या विषयाचे अध्ययन करताना इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत तो नेहमी मागे राहायचा आणि ,"मी खूप प्रयत्न करूनही मला थोडसच का जमत, सगळं का जमत नाही?" असा प्रश्न तो त्या गुरुजींना नेहमी विचारायचा. त्यावर सरांनी एक चांगली गोष्ट त्याच्या डोक्यात भरवून दिली होती की, *something is always better than nothing*.

    आज सरांचे ते शब्द ..विचार केला तर खरे ठरताहेत. सद्य परिस्थितीत प्रत्येक्ष शाळेत जाऊन शिकणे शक्य राहिले नाही म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय नाईलाजाने अंगिकरला जातोय, ठीक आहे... काहीतरी होतंय, हे पाहून बरं वाटतंय. आता प्रश्न आहे तो हा की, त्यात दर्जा (quality) कितपत टिकवला जातोय? आणि त्यासाठी इच्छाशक्ती किती प्रबळ आहे.?

    ऑनलाईन शिकवायचे म्हटले तर अध्ययन आणि अध्यापन करणाऱ्या दोघांकडे ही काही 'डिजिटल साधने' असणे गरजेचे आहे. जसे मोबाईल/टॅब्लेट/संगणक (संगणक असणे अधिक सुविधेचे). एक चांगल्या प्रतीचे इंटरनेट connection. विद्यार्थ्यांकडे आज हे सर्व आहे. मग प्रश्न येतो, की शाळांकडे हे सर्व काही आहे का?
    अर्थात बहुतांशी शाळेत लोकवर्गणीतून या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत आणि उपलब्ध सुविधांचे *फोटो सेशन* करून त्या त्या शाळांनी social media वर आपली वाह-वाह करून घेतली.. हे वेगळे सांगायला नको. काही शाळांमध्ये शासनामार्फत *ICT@School* या योजने अंतर्गत 12 संगणक, 1 प्रोजेक्टर, 1 प्रिंटर ,त्यात 1 ली ते 12 वी चा सर्व अभ्यासक्रम (मराठी आणि इंग्रजी माध्यमाचा) इंटरनेट डोंगल, इत्यादी गोष्टी उपलब्ध झाल्या. सोबत शासनाने एक तज्ञ संगणक शिक्षक मानधन तत्वावर उपलब्ध करून दिला होता, पण फक्त 5 वर्षांसाठी.

    आज राज्यात अशा 8000 शाळांमध्ये या सर्व सुविधा (संगणक शिक्षकाविना) उपलब्द्ध आहेत. पण तज्ञ संगणक शिक्षक नसल्यामुळे संगणक मात्र धूळ खात पडले आहेत.

    मग एवढे *चणे* असूनही केवळ *दात* नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया मंदावली आहे. यात शाळांनी काय केले पाहिजे? तर मानधन तत्वावर का होईना, किमान एका संगणक शिक्षकाची भरती शाळेने त्यांच्या मार्फत करावी.
    किंवा जे तंत्रस्नेही शिक्षक आहेत त्यांना मुख्याध्यापक यांनी प्रवृत्त करून सर्व शिक्षकांना ऑनलाईन कसे शिकवावे याचे प्रशिक्षण द्यावे. या गोष्टी अपेक्षित आहेत. पण, इथे कोणाचे कोणाला काही पडले नाही. संगणक शिक्षक सोडाच, पण अकार्यरत संगणकांमुळे त्याच्यात काही तांत्रिक बिघाड झाले आहेत, ते शाळांना सुधारता येत नाहीत. त्यात जुन्या अभासक्रमाचे सॉफ्टवेअर्स update करून नवीन syllabus काहीसे पैसे मोजून मिळवता येतो. शाळा ते सुद्धा करत नाहीत... नव्हे, त्याची इच्छाशक्तीच मेली आहे, असे वाटते. म्हणजेच, लाखो रुपयांची संसाधने उपलब्ध असून देखील काहीशे पैसे खर्च न करण्याची प्रवृत्ती किंवा कोणाकडून तरी मोफत का होईना, ते करवून घेण्याच्या मानसिकतेचा आभाव.

    तर, मला असे वाटते की, ऑनलाईन शिक्षण हे सद्यपरिस्थितीत व्हायलाच हवे.. पण त्यासाठी फक्त शाळांचीच दुरवस्था झाली नसून शाळा चालवणाऱ्या मेंदूच्या इच्छाशक्तीची ही दुरवस्था झाली आहे.

    उत्तर द्याहटवा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************