समता


मयुर डुमणे

            या मूल्यासाठी शाहू, फुले, आंबेडकरांनी अविरत संघर्ष केला. समता समजून घ्यायची असेल पहिले विषमता समजून घ्यावी लागते. आपल्या समाजात आजही जिवंत असलेली जातीव्यवस्था आणि पुरूषप्रधान व्यवस्था ही या समतेची विरोधक व्यवस्था आहे. सावित्रीबाई फुलेंच्या काळात मुलींना, अस्पृश्याना शिक्षणाची बंदी होती. अस्पृश्यांना सार्वजनिक हौदावर पाणी भरण्यास, पिण्यास मनाई होती. ब्राह्मण वरच्या जातीतले महार, मांग खालच्या जातीतले अशी ही विषमतावादी व्यवस्था आजही अस्तित्वात आहे. आजही गावकुसाबाहेरील वस्ती ही महार मांगाची असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आजही काही गावांत महार मांगांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. म्हणजे तुम्ही खालच्या जातीत जन्माला आल्यास विषमतेचे चटके भोगतच जीवन जगाव लागतं हे ठरलेलं. याउलट तुम्ही वरच्या जातीत जन्माला आल्यास जातीव्यवस्थेचे फायदे तुम्हाला सहज मिळून जातात.   याच व्यवस्थेविरोधात शाहू, फुले, आंबेडकरांनी संघर्ष केला. शाहूंनी मागास घटकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची सोय केली. शिक्षणासाठी  वेदोक्त प्रकरणात शाहू राजांना देखील शूद्र समजण्यात आलं. महात्मा फुल्यांना मित्राच्या वरातीतुन हाकलून देण्यात आलं. आंबेडकरांना वर्गाबाहेर बसुन शिक्षण घ्यावं लागलं. जातिव्यवस्थेची चटके सहन करत या लोकांनी जातीव्यवस्थेविरोधात संघर्ष केला. शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य उभा केलं. पण जातीव्यवस्था आपल्या समाजात इतकी खोलवर रुजलीय की आपल्या समाजाने या लोकांनाच जातीत वाटून घेतलं.
             शिवाजी महाराज झाले मराठ्यांचे, फुले माळ्यांचे, आंबेडकर महारांचे. माझा एक ब्राह्मण मित्र म्हणत होता. आता कुठय जातीव्यवस्था. आपण सर्वांशी सारखंच वागतो की... त्याला फक्त एवढंच म्हणलं, घरी आई बाबांना जाऊन विचारायचं की मला एका महाराच्या मुलीशी लग्न करायचंय? त्यावेळेस तुला जातीव्यवस्था कळेल. पुरोगामी महाराष्ट्रात रुजलेल्या टोकाच्या जातीय अस्मिता त्यावरून होणाऱ्या दंगली. यातून जातीय मानसिकता आजही अस्तिवात असल्याचं पुनःपुन्हा जाणवतं. आंतरजातीय विवाह करणं आजही या समाजाला पचत नाही. केल्यास खून होतात.
          जितकी जातीव्यवस्था इथे रुजलीय तितकीच पुरूषप्रधान व्यवस्था येथे ठासून रुजलीय. आजही मुलगी झाल्यावर अनेकांचा चेहरा पडतो. कारण इथल्या समाजव्यवस्थेत स्त्रीला दुय्यम स्थान आहे. येथे रुजलेली विवाहसंस्था ही तर स्त्री पुरुष विषमतेचे ज्वलंत उदाहरण. मुलगी म्हणजे परक्याचे धन. स्त्रीला पुरुषांप्रमाणे स्वतंत्र अस्तिव नाही. आपलं नाव आणि आडनाव यामध्ये कोणाच नाव असतं ? बापाचं !  लग्न झाल्यावर कोणाच नावं असतं? नवऱ्याचं !  मनुस्मृतीतील ही व्यवस्था आजही घट्ट रुजून आहे. संस्कृतीच्या नावाखाली घातलं जाणार स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्र हे ही तिच्यावर लादलेलं बंधनच. समाजाला कळलं पाहिजे हीच लग्न झालंय. समाजाच्या वाकड्या नजरांपासून जणू तिचं रक्षण करायलाच ते मंगळसूत्र असतं. संसदेत, विधानसभेत असलेलं महिलांच प्रमाण हे येथील विषमताच अधोरेखित करतं. राजकारणच काय कोणतंही क्षेत्र घेतलं तरी या विषमतेचं अस्तित्व जाणवतं.  पाऊलोपाऊली विषमता पेरलीय. ही विषमता जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत समता कळत नाही.
          शेवटी समता म्हणजे काय हो? माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार. लिंग, काळा, गोरा, धर्म, जात या समाजनिर्मित ओळखीपलीकडे जाऊन माणसाकडे माणूस म्हणून बघणं, वागणं म्हणजे समता. समता म्हणजे कसलाही भेदभाव नसणे अशीही व्याख्या करता येईल.
         आर्टिकल 15 हा चित्रपट इथल्या जातीव्यवस्थेचं वास्तव आपल्यासमोर मांडतो.  त्या चित्रपटाचा शेवट देखील फार उत्तम पद्धतीने केला आहे. गावाच्या वेशी बाहेर एक आज्जी बाई हॉटेलवर बसलेल्या आहेत. आयुष्यमान खुराणा आणि इतर पोलीस शेवटचा महत्वाचा तपास करून थकले आहेत. आयुष्यमान खुराणा त्या आजीबाईंना सर्वांना काही तरी खायला द्यायला सांगतो. सर्वजण त्या आज्जी बाईंचे खाद्य खात असताना आयुष्यमान त्या आज्जीला  विचारतो. आप कौनसी जात की हो. या प्रश्नावर सर्वजण हसतात आणि त्याच वेळी त्यांच्या समोरून एक ट्रक जाते. त्या ट्रकवर मेरा भारत महान असे लिहिलेले असते. आपल्या भारताला महान बनवायचंय ना मग ही जात, लिंगभेद फाट्यावर मारा. समता ही काय लगेच प्रस्थापित होणारी नाहीय ही एक अखंड चळवळ आहे. या चळवळीत आपण सामील होऊन हे मूल्य या मातील आपण रुजवूया.

-----------------------------------------------------------------

राहुल क ना आनपट (मी कवी)

Social justice and equality law in society as diverse people holding the balance in a legal scale as a population legislation with 3D illustration elements.
समता या विषयावर विचार व्यक्त करताना मी या विषयाला न्याय देईल इतकं लिहू शकतो का ...? हा प्रश्न मला सारखा सतावत होता...पण प्रश्नाचं उत्तर मला काही मिळालं नाही...आजपर्यंत समता या शब्दाबद्दल मी शालेय जीवनापासून ऐकत आलो आहे,वाचत आलो आहे परंतु त्या शब्दाचा योग्य वापर झालेला आजपर्यंत मी पाहिला नाही....
जेव्हा मी डिग्री ला ऍडमिशन घ्यायला गेलो तेव्हा समतेचा अपमान पाहिला...प्रत्येक जातीच्या मुलांच्या ऍडमिशन ला वेगवेगळे चार्ज..... जातीचा उल्लेख केला की फी कमी व्हायची....अस का होतं याचा मला प्रश्न सतावत राहायचं......कॉलेज चालू झाल की EBC फॉर्म भरताना पण समतेचा अपमान....मुळात हा शब्द मला आला कुठून याचाही नीट अभ्यास होत नव्हता...एकीकडे आम्ही छत्रपती, शाहू, फुले,आंबेडकर, अहिल्याबाई, यांना आदर्श मानतो ....आणि त्यांच्या झेंड्याखाली आम्ही जातीयवादी होतो,त्यांच्या झेंड्याचा वापर आम्ही समतेच्या नावाखाली विषमतेचा पाया रचतोय का...?हे कधीच का पहात नाही.

एकीकडे सीमारेषेवर शहीद होणार जवान व दुसरीकडे प्रत्येक माणसाचं पोट भराव म्हणून शेतात राबणारा बळीराजा यांनी मात्र समतेचा पाया मजबूत ठेवलाय.....ना कुणाशी वैर ना कुणाशी स्पर्धा....
एकीकडे ऑनलाईन शिक्षण देणारी व्यवस्था व दुसरीकडे घरात वीज नसलेली विद्यार्थी पोरं... कशी काय समता साधू शकू आपण...? समता शब्द जगाला एकत्रित बांधू शकतो पण एकमेकांच्या मनाला बांधू शकेल का..? हा प्रश्न अनुत्तरित राहील....

पोकळ आश्वासन देणारी
आमची सुशिक्षित जनता
माझ्या सुशिक्षित भारता
कुठे दिसते तुला समता....
------------------------------------------------------------------


अनिल गोडबोले,सोलापूर

समता आणि समानता हे शब्द एकाच पद्धतीने वापरले जातात..
समरूप होणे, समान पातळीवर येणे आणि सम पातळीवर येण्यासाठी व्यवस्था उभी करणे या मध्ये फरक आहे..
या मध्ये जर गडबड झाली की मूळ धाचा निघून जातो. संपूर्ण भारतात समरसता येणे गरजेचे आहे पण ते कठीण आहे. कारण भारतातील सर्व भाग वेगवेगळे आहेत. वातावरण, जीवन पद्धती, संस्कृती, धर्म आणि जन्मस्थान यामुळे प्रत्येक जण स्वतः उच्च किंवा नीच समजतात.

उदा. " मी जात मानतच मुळात, माझे सगळे मित्र खालच्या जातीचे आहेत." हे वाक्य समानता असल्याचा आभास निर्माण करते, त्याप्रमाणे समता हे मूल्य नाही.

समता म्हणजे एखादा व्यक्ती कोणत्या कारणामुळे मागास ठरत आहे?.. त्या कारणांचा अभ्यास करून त्याला संबंधित कारणापासून त्रास होऊ नये म्हणून केलेली उपाययोजना.

भारतात फक्त जात आणि धर्म यावरून उच्च किंवा मागास ठरवले जाते.. ते आता नाही, गेल्या कितीतरी वर्षापासून.

मग अशा व्यक्तींना समता मिळाली पाहिजे म्हणून आपली व्यवस्था त्यानुसार उपाय- योजना बनवत असते..
आपल्या मागे आपण जात लावत असतो किंवा शाळेत विचारली जाते.. कारण त्या आधारावर एखादा मागास आहे की नाही हे व्यवस्थेला कळलं पाहिजे.

आम्हाला जात रहित समता युक्त समाज निर्माण करायचा आहे. पुढारलेल्या राष्ट्रांमध्ये जायचे आहे.. तर एखाद्याची गळचेपी वर्षानुवर्षे एकाच गोष्टीने होत असेल तर... ते चलनार नाही.

मला अभिमान आहे या संविधान मूल्याचा.. ज्या समाजात समतेचा विचार आहे आणि लोक ते मानतात, तो समाज कधीच मागास राहू शकत नाही.

हे मूल्य लोकांना कळू नये म्हणून एखाद्या व्यक्तीच्या उदाहरणावरून उलट आभास देखील निर्माण केला जातो. मी स्वतः उच्च जातीत(म्हणजे काय.. ते अजून कळलं नाही) जन्माला आल्या मुले मी देखील मेरिट असून मागे पडलो असे मला बरेच वेळा वाटत होते..

पण जसा जसा समाजात मिसळू लागलो, आणि हे आयुष्य जवळून बघितले तेव्हा मात्र लक्षात आलं, ' आपल्याला एवढी घुसमट होत आहे.. ज्यांना काहीच मिळत नाही त्यांची अवस्था काय होत असेल'.

प्रत्येक व्यवस्थेत काही मुजोर लोक असतात, पण त्यामुळे सम्पूर्ण व्यवस्था किंवा मूल्य चुकीचे आहे असे होत नाही..

समता राबवण्या साठी घरा घरात "आपण आणि ते" याच्या चर्चा वास्तववादी झाल्या पाहिजेत, मनातून उच निचता काढली पाहिजे, रोटीबेटी व्यवहार जात न बघता झाले पाहिजेत.
------------------------------------------------------------------

जगताप रामकिशन शारदा.बीड

फ्रान्सच्या राज्यक्रांती ने जगाला दिलेल्या तीन तत्त्वांंपैकी एक म्हणजे समता. समता हा जरी तीन अक्षरी शब्द असला तरी त्याचा अर्थ आणि अर्थाचा आवाका खूप व्यापक आहे. म्हणूनच तर भारतीय राज्यघटनेच्या सारनाम्यामध्ये आपणास हे तत्त्व आढळते. समतेचा अर्थ जर आपण समानता घेतला तर तो खूपच संकुचित ठरेल आणि समान दर्जा असा घेतला तर तो समतेच्या आसपास येऊ शकतो. कारण समतेला नैतिकता आणि मानवी प्रतिष्ठा यांचीही जोड आवश्यक असते.

इतिहासात डोकावून पाहिले तर दिसून येत की क्रांतीपूर्व काळात फ्रान्स मध्ये तीन वर्ग होते आणि प्रत्येक वर्गाला एक अस मतदान होते. वर्गाच्या संदर्भात विचार केला तर मतदान आधिकारात समानता होती पण समता नव्हती कारण प्रत्येक वर्गातील लोकसंख्या ही सारखी नव्हती आणि तिसऱ्या वर्गाला असणारे एक मतदान त्या वर्गाला प्रतिनिधित्व करण्यासाठी अपुरे होते आणि याच कारणामुळे जी क्रांती झाली आणि प्रतिनिधीत्वाच्या बाबतीत जे तत्त्व पुढे आले ते म्हणजे समता समानता नाही.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात समतेच्या तत्वाला खूप मोठे स्थान होते आणि राज्यकर्ते म्हणून आपण इंग्रजांकडून ज्या अपेक्षा ठेवून होतो त्याच अपेक्षा आता आपण स्वतः राज्यकर्ते बनलो असताना पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे हे ओळखून भारतीय घटनाकारांनी समतेच्या तत्वाचा समावेश आणि त्यासाठीच्या मार्गदर्शक सुचनांचा आंतर्भाव आपणास राज्यघटनेत मिळतो.

120 करोडपेक्षा आधिक लोकसंख्या असणाऱ्या आणि जागतिक पातळीवर सातव्या क्रमांकाचा देश असणाऱ्या भारतामध्ये आपणास राज्यांच्या क्षेत्रफळापासून लोकसंख्येपर्यंत आणि ग्रामपंचायत सदस्य संख्या ते राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांची संख्या यात कोठेही समानता नाहीये पण समता नक्कीच आहे कारण यामध्ये प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व मिळेल आणि कोठेही अन्यायाची भावना तयार होईल अशी योजना नाहीये.
Gender Equality Concept. Male And Female Balancing On Seesaw
भारतीय संविधानकारांना अपेक्षित समता ही पूर्णपणे राज्यघटनेतून व्यक्त होते तीला आरक्षणाला धरून स्पष्ट करणे संकुचितपणाचे होईल कारण दर्जाची व संधीची समता उपलब्ध करून देणे महत्त्वाचे म्हणटलेले आहे आणि आरक्षण हा त्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग आहे आणि आरक्षणामुळे समता येईल ही धारणाही चूकीची आहे.

आजकाल आपण पाहतो बऱ्याच गावांच्या आणि शहरांच्या लोकप्रतिनिधी ह्या महिला आहेत आणि त्या प्रतिनिधी म्हणून सक्षमही आहेत पण फक्त महिला म्हणून त्या नामधारी प्रतिनिधी असतात आणि कारभार हा सगळा पती अथवा मुलगा हे करत असतात आता मला सांगा पंचायतराज व्यवस्थेत50% जागा  महिलांसाठी राखीव आहेत आणि कारभार जर असा चालणार असेल तर मग समता प्रस्थापित होईल का हे सांगणे महाकठीण आहे.

पडेल त्या संधीच सोन करण्यासाठी तत्पर असणाऱ्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि तिला मिळणाऱ्यासोयीसुविधा यांसाठी आपण किती आग्रही भूमिका घेतो हे ही पाहणे गरजेचे आहे. सर्वकाही उपलब्ध असताना आपला जो नकार त्यांची वाट बंद करतो तो समतेच्या तत्वाला घातक आहे कारण समतेच्या तत्वाचा पुरस्कार करणारे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री शिक्षण आणि संधीची समानता समतेतून प्राप्त व्हावी यासाठी सदैव आग्रही राहिलेले.
------------------------------------------------------------------

हितेंद्रसिंग सिसोदिया,

         
   समता म्हणजे काय..? सर्वात सोप्या शब्दात याचा अर्थ असा कि निष्पक्षता, समानतेसारखी समान गोष्ट नाही. म्हणजेच प्रत्येकाला समान गोष्ट मिळवण्या बद्दल नाही. तर प्रत्येकाला त्याच्या परिस्थितीची गुणवत्तेचा सुधारकरण्यसाठी आवश्यक ते मिळविण्याबद्दल आहे. समता आणि समानता मुळात भिन्न असू शकतात. परंतु हे एकत्र बांधलेले देखील असतात. संधीची खरी समनता निर्माण करण्यसाठी, प्रत्येकाला तिथे जाण्याची समान संधी मिळेल याची खात्री करण्यसाठी समतेची आवशकता आहे. तथापि समतेचा व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ज्यांना गरज आहे त्यांना खूपच कमी प्रदान करणे आणि ज्यांना गरज नाही त्यांना जास्त दिले तर असमानता वाढेल. बर्याच वेळा, वैयक्तिक गरजा आणि बारकाव्यकडे लक्ष न देता बहुतांश लोकांचा फयद्यासाठी निर्णय घेतले जातात. संपूर्ण समता हि एक आदर्श आणि काल्पनिक गोष्ट आहे. कारण सपूर्ण निसर्गातच विषमता आहे. अर्थात विषमतेला विविधता म्हणणे अधिक योग्य होईल. निसर्गाने व्यक्ती-व्यक्तीमध्ये रंग, रूप, उंची, कौशल्य, बुद्धिमत्ता या बाबतीत विषमता (विविधता) निर्माण केलेली आहे. निसर्गाने निर्माण केलेली विविधता उपकारक असते. मनावाने निर्माण केलेली विषमता अपायकारक असते. मानवाने निर्माण केल्लेल्या विषमतेमुळे समाजात, अन्याय, शोषण, अस्थर्य, असुरक्षितता निर्माण होते. 
भारतीय संविधानाने ठामपणे नमूद केले आहे की भारत हे लोककल्याणकारी राष्ट्र आहे. तेथील लोकांना सुखी आणि समृद्ध बनवण्यासाठी आहे. पण हे स्वप्न विरले, प्रत्येक क्षेत्रात, भारत विध्वंसक भविष्याकडे गटांगळ्या खात झपाट्याने चालला आहे. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून अस्थिरता प्रकट होत आहे. ग्रामीण भारतात दुष्काळ, आत्महत्या वाढल्या आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था कर्जावर उभी राहिली आहे . उत्पन्न दिसत नाही. शहरी भागात श्रीमंत अति श्रीमंत होत चालले आहेत तर कष्टकरी झोपडपट्टीत गलिच्छ जीवन जगत जिवंतपणी मरत  आहेत. राजकारणी उद्योगपतींच्या तालावर नाचत आहेत.  ज्यांनी निवडून दिले त्या रयतेला विसरले. राजकीय नेत्यांच्या  सत्ता व संपत्तीच्या हव्यासापोटी न्याय, बंधुत्व, समता व स्वातंत्र्य मृगजळ बनले आहे. भ्रष्टाचार शासन  यंत्रणेचा अविभाज्य भाग झाला आहे. सरकार लोकांचे कल्याण करण्यासाठी आहे ही संकल्पना हळूहळू लुप्त होत जातेय.  हल्ली  सरकारे किवा मंत्री, अधिकाऱ्यांच्या  आणि श्रीमंतांच्या कल्याणासाठी आहे असे जनतेला वाटत आहे. आजवर वेगवेगळी पॅकेज घोषित करून समस्येचा सुवर्णमध्य काढून अनेकदा राजकीय व्यवस्थेने कळीचे प्रश्न रेटले आहेत. परंतु सद्यस्थितीत व त्यानंतरच्या काळात शासनाला अशा तात्पुरत्या धोरणांपालिकडे जाऊन काही दीर्घकालीन कार्यक्रम राबवावे लागतील. कोरोनामुळे भारतातील जाती व वर्गांमधील विषमता अधिक खोल झाली आहे. यामुळे समाजात अस्वस्थता असेल. हक्काधिष्ठित दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवर पायाभूत सुविधा व सुधारणांसाठी आंदोलने किंवा चळवळी उदयास येण्याची शक्यता आहे. डार्विनच्या तत्वज्ञानाचा स्वीकार करत गुणवत्ता आणि स्पर्धात्मकतेवर आधारलेली ही शासन प्रणाली वरवर जरी आकर्षक दिसत असली तरी मुळातच असमानतेवर आधारलेल्या समाजात ही व्यवस्था आणखी विषमता निर्माण करते. आपल्यातील प्रत्तेक माणूस स्वाभिमानी, स्वावलंबी असायला हवा. आपल्यात द्वेष, ईर्ष्या, वैर यांना स्थान नसावे. असे झाले की समाजात समता आणि सुख शांती निर्माण होईल. मानवी समाजात समता नेमकी कधी होती, हे ठरवणे कठीण आहे. विषमता मात्र नित्य असतेच असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************