कोरोना: वाढती बेरोजगारी व नैराश्य. (भाग-2/3)

प्रविण दळवी,नाशिक

कोविड-१९ महामारीमुळे जगासमोर अभूतपूर्व संकट निर्माण केले आहे हे संकट अनेक पातळ्यांवर आहे. वैद्यकीय, आर्थिक, सामाजिक, मानसिक अशा विविध पातळ्यांवर मानवजातीसमोर संकट उभे राहिले आहे. कोविड-१९ महामारीचा प्रसार रोखण्यासाठी बहुतांश देशांनी लॉकडाऊनची उपाययोजना केली आहे. कोविड-१९चा प्रसार रोखणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे मात्र लॉकडाऊनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. आर्थिक व्यवहारच थांबल्यामुळे किंवा फारच कमी प्रमाणात सुरू असल्यामुळे त्याचा विपरित परिणाम मनुष्यबळावर झाला आहे. कोविड-१९च्या संकटामुळे जगभरात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे आणखी एक नवे संकट उभे राहिले आहे. काही रोजगार आतापर्यतच्या कालावधीत गेले आहेत, तर काही रोजगार आगामी काळात जाणार आहेत. कोविड-१९ महामारीला रोखण्यावर सध्या सर्वच सरकारांचे लक्ष केंद्रित झाले आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेचे चक्र मंदावण्यात झाले आहे. अलीकडच्या काळात भारतात आणि जगभरातदेखील हळूहळू लॉकडाऊनमधून बाहेर येत अर्थचक्राला चालना देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र अजूनही कोविड-१९चे गांभीर्य मोठे आहे त्यामुळे ही दीर्घकालीन लढाई आहे. दुर्दैवाने नकळत या सर्व घटकांचा दीर्घकालीन मोठा परिणाम समाजातील कमजोर घटकांवर झाला आहे त्यांच्यासमोर आगामी काळात मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व परिस्थितीत मानसोपचार सेवा योग्यरितीने उपलब्ध होणे आणि त्यांचा सर्वसामान्यांना योग्य तो प्रतिसाद मिळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.


मीकवी,मंगळवेढा,सोलापूर

ह्या रोगराईला सामोरे जात असताना कित्येकांना आपला जीव गमवावा लागला तर कित्येकांना आपला रोजगार गमवावा लागला.मी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवारांपैकी एक आहे.खरं तर या स्पर्धेत जागा असतात 250 आणि उमेदवार असतात 4 लाख 50 हजार.उरलेल्या  4 लाख 49 हजार 750 उमेदवारांचं काय होईल...? आता ह्या सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगार कुठून उपलब्ध व्हायचा....


दुसरा मुद्दा :- प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत मुलांना प्रशिक्षण दिलं गेलं पण ते खरंच योग्य आणि दिशादर्शक होत का...? हा प्रश्न मुळात मला सतावतो.


कोरोनाच्या काळात ना परीक्षा झाल्या ना कोणता रोजगार भेटला... मग आपलं जीवन जगायचं कस हा प्रश्न वारंवार आजच्या युवकाला पडतो....खरं तर याच प्रभाव उभरत्या भारतातील युवकावर पडत आहे.ना रोजगार उपलब्ध ना रोजगारक्षम मार्गदर्शन वा शिबिर. 


वाढतं नैराश्य :- जर रोजगार नसेल तर प्रत्येकजण तणावाखाली येणार हे साहजिकच आहे.आजचे युवक म्हणजे वय 18 ते 35 च्या आतील सर्व जण नैराश्याने जगत आहेत....एकीकडे कोरोना तर दुसरीकडे कोरोनाच्या प्रभावाने कमी होत असलेल्या नोकऱ्या.नैराश्याची अनेक कारणे येतात परंतु बेरोजगारी हे प्रमुख कारण आजकाल दिसत आहे.यावर उपाय सापडेल अस मला वाटत नाही...२०२७ पर्यंत भारत लोकसंख्या बाबतीत जगात एक नंबर होईल तेव्हा बेरोजगारी अजून कोणत्या थरापर्यंत जाईल हे अंदाजही लावू शकत नाही.


शुभम देशमुख,नांदेड़.

कोविड-१९ महामारीमुळे जगासमोर अभुतपुर्व संकट निर्माण झाले आहे. या महामारीमुळे आनेक क्षेत्र माघे पडले आहेत. आनेक बाबींवर याचा गंभीर असा परिणाम दिसून येत आहे, ज्यामध्ये आर्थिक, मानसिक, वैधकीय, सामाजिक आशा आनेक बाबी आहेत. मानवजातीसमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे.हे संकट रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशानी वेगवेगळी उपाययोजना केली आहे पण बहुतांश देशांनी लॉकडाउनची उपाययोजना केलेली आहे. लॉकडाउन मुळे कोविड-१९ चा प्रसार रोखण्यास मदत तर होत आहे परंतु आर्थिक द्रश्ट्या आनेक देश मागे पडले आहेत. याच लॉकडाउनमुळे जागतिक आर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आनेक उद्योग-धंदे थांबले आहेत काही तर बंद पण पडले आहेत. उद्योग-धंदे बंद पडल्यामुळे किंवा जे सुरु आहेत ते खुप कमी प्रमाणात सुरु आहेत त्यामुळे बेरोजगारी पण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 


बेरोजगारी वाढल्यामुळे खुप जणांना नैराश्य आले आहे. त्याचा परिणाम आत्महत्येच्या प्रमाणावरदेखिल झालेला आहे. त्यामुळे आनखी एक मोठे संकट आपल्या पुढे उभे टाकले आहे. आता सर्वसामान्य माणूस जीव वाचवणार की आपली उपाजिविका वाचवणार काही कळत नाहिये. या संकटा मुळे पुर्ण मानवजाती खचली आहे. आपण सर्वानी मिळुन या संकटाला सामोरे जा लागेल. नियम पाळुनच आपल्याला या कोरोनाला टाळता येईल.



कोरोना: वाढती बेरोजगारी व नैराश्य. (भाग-1/3)


शिरीष उमरे,नवी मुंबई.

जानेवारी २०२० ला अंतर्देशिय विमान प्रवासी कोरोना भारतात घेवून आले. तेंव्हापासुन आज १६ महिने झालेत, कोरोना थैमान मांडतोय सगळीकडे... ह्या पाचशे दिवसात सगळी उलथापालथ झाली आहे देशात...


२०१४ च्या मध्यापासुन धार्मिक उन्मादाचा उगम मागिल सात वर्षात त्सुनामीचे रुप धारण करुन थयाथया नाचतोय संविधानाच्या छातीवर... भस्मासुरासारखी गत झाली आहे मतदारराजाची !! वणवा पेटतो तसे सगळीकडे आग पसरत चालली आहे. त्यात चुकीचे राजकिय निर्णय पेट्रोल सारखे काम करत आहेत... हा भडका आता सगळ्यांना भाजत चालला आहे. 


नोटबंदी व जीएसटी ह्यासारखे अवकाळी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणजे माकडाच्या हातात कोलित दिल्यासारखे झाल होतेे. कित्येक करोडो छोटे व्यवसायी, उद्योजक व सेवा पुरवठादार ह्यांची अर्थव्यवस्था कोलमोडुन पडली होती. नविन नोकरभरती तर सोडाच, जुन्या स्टाफची छाटणी सुरु झाली होती.


 ह्यातच एनपीए माफीच्या माध्यमातुन काही ठराविक कार्पोरेट घराण्यांना फायदा पोहचवुन बँका मोडकळीस आणल्या गेल्या. सामान्य लोकांना कर्ज मिळणे तर दुरच, त्यांच्या कष्टाच्या बचतीच्या ठेवी धोक्यात आणुन टाकल्या.  लघुउद्योग संपुष्टात येत गेलेत. सरकारी नियंत्रणातल्या कंपन्या विकण्याचा सपाटा लावलाय त्यातुन खाजगी क्षेत्राला फायदा पोहचवणे व आरक्षण संपवणे अशी दुहेरी कुटनिती अंमलात येत आहे.

शेतकरी, आदिवासी व मजुर वर्गाला जगणे मुष्कील करणाऱ्या पॉलिसी संसदेत पाशवी व अनैतिक मतदानाने मंजुर करवुन अर्थव्यवस्थेच्या कबरीवर शेवटचा दगड ठेवण्यात आलाय. 

ह्या सगळ्या अराजकतेत कोरोना ही आंतराष्ट्रीय आपदा आली. केंद्र सरकार व राज्य सरकारने ह्याचा योग्य फायदा उचलुन लॉकडाउन च्या शस्त्राचा वापर करुन बेरोजगारीचा पहाड तात्पुरता झाकण्यात यश मिळवले. 


लॉकडाउनच्या काळात झालेल्या मानवी हक्काची ऐशीतैशी व करोडो मजुरवर्गाची पायपीट हृदय पिळवटुन टाकणारी होती. एक वर्ष आख्खी भारतीय जनता घरी बसवुन ठेवली होती. -२३ ही जीडीपी ची निगेटिव ग्रोथ ह्याचेच ध्योतक आहे... 

कोरोनाचा मृत्युदर १% सुध्दा नाही आहे. ह्यापेक्षा दहापटीने जास्त मृत्युदर असणारे रोग भारतात आहेत त्यावर मुलभुत आरोग्य सुविधा कुठलेच सरकार पुरवत नाही. आर्थिक अंदाजपत्रकात आरोग्य व शिक्षणावर असलेली तुटपुंजी व्यवस्था व त्यात सरकारी यंत्रणेचा प्रचंड भ्रष्टाचार ह्यामुळे जागतिक पातळीवर १९६ देशाच्या यादीत १६४ वा नंबर आहे आपल्या देशाचा. हे सगळे दारिद्र्य लपवण्यासाठी जनतेला वेठीस धरणे सुरु आहे. 


कोरोना वर आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सरकार जवळ ना पुरेसा मेडीकल स्टाफ आहे ना हॉस्पीटल बेड...ना आवश्यक औषधी ना वेंटिलेटर्स ... त्यातच महागाई चे जनतेला रोजचे झटके !!


आरोग्य व शिक्षणातील खाजगी क्षेत्रे तर जबरीची वसुली करुन राहिली आहे जनतेकडुन. मिडीयाद्वारे कोरोनाची प्रचंड भिती निर्माण करुन बेरोजगारी ह्या महत्वाच्या मुद्द्या वरील लक्ष वळवण्यात सरकारी यंत्रणेला यश मिळाले आहे. पण ही तात्पुरती थोपवणूक भयंकर रुप धारण करणार ह्यात शंकाच नाही. 


सध्याचे बेरोजगार तरुणवर्गाचे नैराश्य त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त आहे. प्रचंड प्रमाणात लोक डीप्रेशनचे बळी पडत आहेत. ह्यातुन त्यांना सावरणे गरजेचे आहे.  आज मुठभर सधन लोक सोडले तर ९०% भारतिय आर्थिक चणचणीला सामोरे जात आहेत. 


ह्यात वेळेवर योग्य उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर भविष्यात  जनक्षोभातुन गृह युध्द व गुन्हेगारीत नियंत्रणाबाहरील वाढ आणि नंतर  हुकुमशाही सारख्या अरिष्टके नाकारता येणार नाहीत. 


लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व कोरोना संपवण्यासाठी आणि देशाला पुर्वपदावर नेण्यासाठी एकजुट महत्वाची... पुढील ३ वर्षे देशासाठी खुप महत्वाची !!! जागते रहो ....


किरण पवार,औरंगाबाद.

          ध्या कोरोनामुळे एक गोष्ट फार विचित्र झालेली पहायला मिळते आहे, ती म्हणजे नैराश्य येणं. नैराश्य येणं आणि त्याविरोधात मानसिक लढा देणं हे एका मर्यादेपर्यंत आधी बऱ्यापैकी सहज वाटतं होतं. परंतु कोरोनामुळे गोष्टी अशा काही बद्दलच्या की, पुढे दिसू लागणारी प्रत्येक शाश्वत गोष्ट अंधारात दिसू लागली किंबहुना नाहीशीच झाली. थोडक्यात यात करियरचा एखादा महत्वाचा टप्पा असेल, एखाद्या व्यवसायाचा जम बसवणं असेल, काहींच्या ठराविक स्पर्धा परिक्षा असतील, वा इतर विविध गोष्टींचा यात समावेश येतो. काही गोष्टी अशाही घडत आहेत की, अनेकांना दोन वर्षांच शिक्षण थेट ऑनलाईन मिळून नंतर त्यांच कॅम्पस इंटरव्हू, नंतर सिलेक्शन आणि थेट काम भेटलं तर वर्क फ्रॉम होम. कुठेतरी आपण आधीपासूनच अशा अचानक आलेल्या बदलाला सामोरे जाण्यासारखे नव्हतोच, आत्ताही अनेकांची ती मनस्थिती तयारच नाही होतं. नैराश्य यायला कारणीभूत ठरलेल्या ठराविक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे, अनेकजण आज सर्वांसोबत, सर्वांमधे असूनही एकटे पडले आहेत. त्यांना त्यांच्या एकटेपणाची चाहूल आहे पण ती उलगडून दाखवता येत नाहीये. आपण माणूस म्हणून अनेकदा दिखाव्यांना अधिक महत्व देतो, ज्याने गोष्टी आपल्याच आंगलट येतात; आणि हे कोरोनाकाळात अनेकांचं झालं आहे. आज बेरोजगारी वाढलेली आहे तरीदेखील आम्हाला यासारख्या महत्त्वाच्या विषयावर पाठ फिरवायला अधिक आवडतं. कारण इन्स्टाग्राम रिल्स आनंद द्यायला सोबत आहेतचं की! मुळात आपण कोरोनामुळे व्यवस्थापन, नियोजन, आयुष्यात तयारीत रहाव्या लागणाऱ्या करियरसाठी इतर प्लॅन्सची अशी कुठली तसदीच घेतलेली नाही. बेरोजगारी कुणा एकाच्या अमुकतमुक निर्णयाने तयार झाली असं नाहीये, बेरोजगारी वाढीस लागायला अनेक घटक जबाबदार आहेत असं मला वाटतं. आणि राहिला प्रश्न नैराश्यातून बाहेर पडायचा तर ते आपण साध्य करू शकतो फक्त थोडासा खंबीरपणा मनाला जाणवून देण्याची गरज आहे. तुर्तास इथेच थांबतो, धन्यवाद!


सौदागर काळे,पंढरपूर.

वळपास दीड वर्ष झाले कोरोना हा आजार आपल्यात आहे.सध्या तो जास्तच वेगाने आपले साम्राज्य तयार करतो आहे. त्याच्या या शक्तीपुढे जगातील अणवस्त्रधारी देश सुद्धा नांगी टाकत आहेत.त्याने सर्वांची अर्थव्यवस्था खिळखिळी केली.तहान लागली की विहीर खोदण्याचा प्रकार करावा तशाप्रकारे सर्व देशांतील सरकारांनी आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देण्याचा चंग बांधला.पण तो किती तकलादू आहे याचा आपण रोज  मीडियाद्वारे तमाशा पाहतो आहे.आता कोरोना वर लस आली.लसीकरण चालू झाले.या पार्श्वभूमीवर आपल्या राज्याचा विचार केला तर केंद्र-राज्य , सत्ताधारी-विरोधक यांच्या भांडणात केव्हाही राज्याची परिस्थिती हाताबाहेर जाईल की काय! असे चित्र उभे राहत आहे.


उद्या कोरोना जेव्हा जाईल तेव्हा त्याने किती हानी केली याच्यापेक्षा त्याने आपल्या या व्यवस्थेप्रती आपले कितपत डोळे उघडले,हे अनुभवणे खरं महत्त्वाचे ठरणार आहे. 

मानवाच्या मूलभूत गरजांपैकी अन्न ही जगण्या-मरण्याच्या अस्तित्वाची गरज आहे. वस्त्र,निवारा,आरोग्य व शिक्षण या गरजा पोट भरल्यानंतर येतात.तरीपण या साऱ्या गरजांची पूर्तता होण्यासाठी या व्यवस्थेत आपण धडपडत असतो. अशावेळी योग्य वयात काम मिळणे खूप गरजेचे आहे.ते मिळत नसल्याने खुपजण नैराश्यात जीवन जगत आहेत.कोरोना येण्यापूर्वी आपल्या देशात बेरोजगारी व त्याच्या मुळे लोक नैराश्यामध्ये जाण्याचे प्रमाण होतेच.हे नाकारून चालणार नाही.फरक एवढाच होता तेव्हापर्यंत ते पद्यावर अंधूकपणे दिसण्याची व्यवस्था सरकारने केली होती ती आता कोरोनाने हातामध्ये सूत्रे  घेताच  पडद्यावर स्पष्टपणे दिसू लागले. कोरोनापूर्वी नवा रोजगार मिळावा म्हणून काम करण्यासाठी तरुण वर्ग प्रतीक्षेत आहे.


आता कोरोना काळात अर्थव्यवस्था बेजार झाल्याने जे रोजगार होते ते सुद्धा जात आहेत.ज्यांचा रोजगार जात आहे, तो वर्ग कौटुंबिक जबाबदारीचे ओझे वाहणारा आहे.ज्याच्यावर अख्खे कुटुंब अवलंबून आहे. जॉब नसल्यामुळे लग्न न होणाऱ्या तरुणाईपेक्षाही हा वर्ग सर्वात जास्त नैराश्यात असणार यात शंका नाही.या कोरोनाच्या काळात जे असंघटित क्षेत्रात काम करत होते.त्यांचे रोजगार गेले. सुरुवातीच्या लॉकडाउनच्या काळात रस्त्यावरून घरी चालत जाणारे लोक पाहिले की अजूनही ते विचलित करून जातं. त्यांनी ते अनुभवलं.आजही ते पोटाला चिमटा काढत येणाऱ्या दिवसाला सामोरे जात आहेत.


हे कधीपर्यंत चालेल.माहीत नाही.उद्या कोरोना या जगातून जाईल सुद्धा.पण बेरोजगारीवर राज्यकर्ते लस तयार करतील का! याचे सध्यातरी उत्तर नाहीच. त्यामुळे आपण नैराश्याला सोशल डिस्टिंग प्रमाणे सध्यातरी दूर ठेऊनच जगूया.यातच भले आहे.


वसुंधरा सुंदर राहिली नाही

गजानन घुंबरे,परभणी

कधीकाळी नैसर्गीक साधनसंपत्तीने  संपन्न ,तिला पुरक जैवविविधता यांना आश्रय असणारी व आतापर्यंत तरी एकमेव असणारी सजीवसृष्टी म्हणजे ' पृथ्वी ' अर्थात वसुंधरा.या पृथ्वीवर आतापर्यंत बरेच युग झाले, उलथापालथ झाली. पण यादरम्यान तीची जी हानी झाली नाही , ती मात्र ( मानवी उत्क्रांतीचा सिंद्धात थोडा वेळ सोडला तर कुठून तरी एलीयन रुपी आलेल्या ) मानव नावाच्या स्वार्थी प्राण्याने हळू हळू भक्कास केली. एलियन यासाठी म्हणतो कि, मानव सोडून इतर सर्व जीव निसर्गाचे मित्र आहेत. त्यामुळे पृथ्वीवरिल नैसर्गीक समतोल राखल्या जायचा व जातो.या भुतलावर फक्त मानवालाच  फक्त  घ्यायचे कळते.ओरबाडणे, हिसकावणे, निचरा करणे एवढचं त्याला जमतं. मग मानव समुहातील त्याच्या सारख्या हाडामासाच्या व्यक्तीसोबत त्याचा हा व्यवहार तुम्हाला पहायला मिळेलं.

   आता हेच पहा पृथ्वीला सुंदर ठेवण्यात खरा वाटा असणारे, तीला सजीव ठेवणारे पाणी ज्याच्यावर सर्वांचा हक्क आहे. मानवाने केलेल्या बेसुमार , अमाप वापराने निसर्गहानी करण्यास कारणीभूत ठरलायं. जमीनीवर उपलब्ध साठे कमी पडले म्हणून पाचशे फुट खोलीवरून उपसा केला.मानवाच्या या कृत्यांने जमीनीच्या वरच्या भूस्थरात पाणी न राहील्याने झाडे नष्ठ झाली व होत आहेत. यामुळे हिरवळ कमी झालीयं, वाळवंट वाढलेत. जमिनिच्या आत ५० फुटांपर्यंत पाणी निचरा होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लोटतो. त्याखाली दोनशे फुटांपर्यंत जाण्यासाठी ५०ते १०० वर्ष जातात. कधी कधी आपण एखाद्या नवीन घेतलेल्या ५०० फुट बोअरवेलला लागलेले पाणी तीनशे वर्ष जुने असु शकते. पण त्याचे ते आपल्याला काय? तहान भागली ना बस्स ! आपल्या या वागण्याने निसर्ग समतोल मात्र बिघडला. जमीन कोरडी पाडली, झाडे वाळली, पाऊस कमी झाला आणि पाणीचं कमी झाल्याने जैवविविधतेचा पृथ्वीचा दागिना लुप्त होण्याच्या मार्गावर आलायं.

  आपल्याला फक्त घेता येत देणं जमतंच नाही.आपल्या अन् दुसऱ्याच्या हिश्याचेही घ्यायचे. घेतानाही बेमाप घ्यायचं मग त्याची किंमतही कळत नाही. मानवाने तयार केलेल्या पाणी मोजण्याच्या पर्जन्यमापकात जेंव्हा १०० मिमी पाऊस पडतो ना त्यावेळी १० लाख लिटर पाणी १०० गुंठ्यात पडलेलं असत. असे एक दोन पाऊस पडल्यावर ते पाणी वाहत  त्यातील फक्त १०% पाणी जमिनीत मुरल्या जातं.३०% वाफ होते तर उर्वरीत नदी व शेवटी समुद्रास मिळतं.

यातील मुरलेलं पाणी उपसा करताना आपण हे भान विसरतो  कि किमान आपल्या गरजे इतके तरि पाणी भूगर्भाला आपण परत दिलयं का? आपण किंमत असणाऱ्या वस्तुंच मोजमाप करतो . त्याचप्रमाणे सृष्टीला सजीव ठेवणाऱ्या पाण्याचे मोजमाप करण्यास शिकलो तर निसर्गाची अनमोल देण असणाऱ्या पाण्याची किंमत कळेल .

 आपल्या गरज इतके निसर्गा कडून हवं असेल तर परत देण्यास शिकावं लागेल ,उपशा इतके पाणी जमिनीत मुरवावे लागेल , एक झाड तोडण्यापूर्वी दोन आधी जोपासावी लागतील .तरचं समतोल साधला जाईल अन्यथा या वसुंधरेला कुरुप करत दुसऱ्या सजीव सृष्टीचा शोध घेत स्वार्थी ( सुरुवातीस एलियन यासाठी म्हणालो) मानव एके दिवशी निघून जाईल आणखी एखाद्या वसुंधरेला बेचिराख करण्यासाठी .

बलात्कार आणि त्यावरील घाणेरडे राजकारण..



करिश्मा डोंगरे,पंढरपूर

           जाती कशाला उकरून काढता.गुन्हा हा गुन्हाच असतो.आणि गुन्हेगार कोणत्याही जातीचा असला तरी तो गुन्हेगारच असतो.असले भंपक युक्तीवाद करणार्या,वरून सात्वीकतेचे भजन आणि आतुन जातीच्या वर्चस्वाचा तमाशा करतात.उच्चवर्णिय पुरूषी मानसिकतेमुळे दलित स्रीचा शरीराचे लचके तोडण्याची वृत्ती कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.जातीच्या विखारातून कोवळया कळ्यांना चुरगळनारा कुसंस्कृतीच्या कणाकणात भरला आहे.पीडितेचा जबाब नेहमी दाबला जातो.परंपरेने चालत आलेले आरोपींना जातिनिहाय संरक्षण.अत्याचार झालाच नाही,असे सांगण्यासाठी प्रशासनाचा वापर केला जातो.धडक पोलिस पुरावेच नष्ट करतात,हे कसले मोठे राजकारण म्हणावे लागेल.माध्यमानांही त्यांच्यापर्यंत पोहचू देत नाहीत,याला काय म्हनायचं?यामुळेच त्यांची नियत सिद्ध होतेय.

         आईसोबत गवत काढण्यासाठी गेलेल्या मुलीची कसली कपडे असतील ओ?आणि त्यांना धड जेवनाचा रोज प्रश्न पडत असेल,तिच्याजवळ कसला आलाय मोबाईल?उगीच मनाच बडबडून मुलींना दोषी नका ठरवू.ती साधी सरळ मुलगी तिने कोणाच काय वाईट केले.एवढी कसली जातीयता आणि राजकारण?

             कधीही असले करण्याअगोदर किंवा वाईट नजरेने बघान्याचं धाडस नाही झाले पाहीजे,असे प्रशासन हवं आहे की,डायरेक्ट निकालचं लागला पाहीजे.खाकी वर्दितल्यांनी पकडायचं नाही किवा तारखेवर तारीख मिळन्याची वाट न बघता,त्यांच वरचं तिकीट काढले पाहीजे.आपल्या घरातील स्रीयांना हेच शिकवा की, एखाद्याच तोंड कसे फोडायचे आणि हात पाय कसे मोडायचे.गरिबाची मुलगी असो किवा मुख्यमंत्र्याची मुलगी ही मुलगीच असते.स्वत:च्या घरातली मुलगी रडताना कसे लगेच वाईट वाटते,तसेच दुसर्यांच्या मुली काय रस्तावर पडलेत काय?रडत बसायला.जात बघून मानसाचं जनावरं बनू नका.माणुसकी हाच आपला धर्म आहे.आमच्या हातात कोणी मेणबत्या दिल्या तेव्हाच तलवार दिली असती तर,आज तोंड वर करून कोणी बघितले पण नसते.


वृषाली वाघ,मुंबई 

आपल्या भारतात बलात्कार हे काय नवीन कृत्य नाहीये.... अनेक वर्ष हे असले क्रूर कृत्य होत आहेत....रोज बातम्यात एक न एक तरी असली बातमी असते परंतु आपणच त्याला दुर्लक्ष करतो.... जो पर्यन्त पीडित व्यक्ति (मुलगी किंवा मुलगा) सोबत  काही राक्षसा ने केल्या प्रमाणे कृत्य होत नाही किंवा राजकिय नेत्यांना, पक्षांना त्याचा काही लाभ नाही भेटत तो पर्यन्त ना न्यूज मीडिया ना सोशल मीडिया मध्ये त्याचा विषय येत.... 

आपल्या सारख्या सर्व सामान्य लोकांचा कानावर आपल्या ओळखी मधील अशी एखादी बातमी सहजासहजी ऐकला नाही भेटत कारण मिडल क्लास वर्ग  कधी ही कोर्ट किवा पोलिस ठाण्यात जाऊ इच्छित नाही.... ह्याला देखील कारण आहे आपल्या देशात ला राजकारण आहे... कारण कधी एखादी घटना गंभीरतेने लक्ष ओढून घेत असल तर... राजकीय लोक पीड़ित व्यक्ति चा घरी जाऊन फोटो काढून मोकळे होतात...... त्या घटनेचा 4 - 5 वर्षात निर्णय (कोर्टात) लाऊन विसरून जातात...... परत अशी गंभीर घटना होऊ पर्यन्त ....

एखाद्या घटनेचा बोध घेऊन सरकारने, राजकिय पक्षाने, मीडियाने पुढाकार घेऊन लक्ष देऊन जर काम केल आणि  एखादा गंभीर कायदा (न्यायालयात) बनवला तर अशे कृत्य करणार्‍याना, करायचा आधी हजारो वेळा विचार करावा लागेल.....

आणि आपन आपल्या जाग्या वर राहून आपल्या पुढचा पीढ़ी ला,  समोरचा व्यक्ति ची मदत आणि इज्जत करायची शिकवण दिली तरी देशात असल्या घटना कमी होतील.... 


अनघा नंदाने

दिवस पहिला: अरे बातम्या पाहिल्या का? खूप वाईट झालं बिचाऱ्या त्या मुलीसोबत. 

दिवस दुसरा: काय चाललय काय आपल्या देशांत? तिची बाँडी परस्परच जाळली पोलिसांनी. हे पोलिस गुंड झालेत. आता कुठे गेली मिडिया, कुठे गेले विरोधी पक्ष? 

दिवस तिसरा: काय नौटंकी चाललीये देशांत.... ती ABP वाली आणि तो पप्पू.... नुसता पब्लिसिटी साठी चाललाय हा खेळ...

दिवस चौथा: काय राव चार दिवस झाले तेच तेच, मस्त पिक्चर लाव एखादा... बोअर झालंय, तेच तेच 


असंच होतं ना? 

तिसऱ्या दिवशी राख थंड झाली कि आपणही थंड होतो. आपापल्या कामाला लागतो. 


पण तुम्हाला एक लक्षात येतय का? या संपूर्ण चार दिवसांच्या संभाषणांत बहुतेक लोकांनी, पोलीस, मिडिया, काँग्रेस, यांच्यावरच चर्चा जास्त केली. जणूकाही सत्ता "काँग्रेसची" आहे. यांत खूप कमी लोकांनी "मुख्यमंत्री योगी" कुठे आहेत हा प्रश्न विचारला आणि मोदींना तर लोक विसरलेच. लोकांच्या लक्षातच आलं नाही, येत नाही, किंवा आणून दिल्या जात नाही कि आता गेली 6 वर्षे सत्तापक्ष बदलला आहे. वर्तमान पंतप्रधानांनी संपूर्ण घटनेवर एक वाक्य उच्चारलेलं नसताना, आपण पूर्व प्रधानमंत्री कसे मुके होते याच्या अजूनही चवीने चर्चा करतो आहे. 


आपण सरकार चं उत्तरदायित्वच विसरलो आहोत. ज्याप्रमाणे वर्तमान सरकार अजूनही "विरोधी पक्षाच्या" भूमिकेतून बाहेर आलं नाही, तसंच आपणही आपल्या डोळ्यातला "सत्ताधारी" पक्ष बदललेला नाही. 


प्रजासत्तेतला "राजाच" स्वतःची भूमिका, हक्क, जबाबदाऱ्या विसरला असतांना, त्याने निवडून दिलेल्या "नौकरांकडंनं" काय अपेक्षा ठेवणार? 130 कोटी राजांच्या राज्यांत, 1 एका राजकुमारीवर "बलात्कार" होतो, तेव्हा राजे आपापसांत लढत बसतात, शाब्दिक चकमकी रंगतात, कुणी निवडून दिलेला नोकर चांगला आहे हे सिद्ध करायला! मग नोकर मनमानी करणार नाही, घाणेरडं राजकारण करणार नाही तर काय करतील? 

राजांना कळायला हवं, कुणाचेही असले तरी ते नोकर आहेत, आणि ते नीट काम करत नसतील तर त्यांना जाब विचारणं, प्रत्येक राजाचं काम आहे आणि हक्क आहे. 


राजकारण घाणेरडं झालं आहे. वादचं नाही. झालंच आहे. पण पुढे काय? उपाय का? हे शोधायला हवं. आपल्याला माहिती असतं, सरकारचं चुकलं आहे पण आपण नेहमी मुख्यतः दोन भूमिका घेतो, एक, जाऊदे, आपल्याला काय करायचं आहे? आणि दुसरी, सगळे तसेच असतात... 

या दोन मतांमुळे आपण "नागरिक" होऊन सरकारला कधी प्रश्नच विचारत नाही. प्रजासत्तेत राहून राजसत्तेचं गुणगान गांत राहतो आणि कुणी "हिरो" आपल्याला वाचवायला येण्याची वाप बघत बसतो. चांगल्या राजंच्या राज्यात, प्रजा आपले हक्क आणि कर्तव्य कधीच विसरायची नाही आणि विसरली तर चांगले राजे प्रजेला त्याची जाणीव करून द्यायचे. "खबरदार जर टाच मारूनी याल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या" किंवा "राजा, माझा 1 रुपया अजूनही परत का नाही मिळाला?" असे प्रश्न शिवाजी महाराजांना सुद्धा रयतेनं विचारलेच. मग आता आपलीच सत्ता असताना आपण आपल्या सेवकांना प्रश्न विचारायला का घाबरतो? का गरज नसताना त्यांचं गुणगान करतो? या प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधली पाहिजेत. 


आपल्या पुर्वजांनी चांगले मावळे बनून दाखवलं, आपण चांगले "नागरिक" बनू शकू का हे आपण आपलं बघायला हवं.



प्रतिक्षा बुध्दे,गडचिरोली 

कुण्यातरी गावात कुण्यातरी मुलीवर अत्याचार झाला, 

लगेच लावली गेली जाती-धर्माची, राजकिय पक्षांची फिल्टरं त्याला!

'ती' असते कधी दोन दिवसांची तर कधी ऐंशी वर्षांची,

जी नाहक शिकार होते समाजातील राक्षसी सत्तेची 


पुर्वी बलात्कार झाले की छत्रपति छाटुन टाकायचे हात पाय त्या नराधमांचे भर चौकात... 

मग नराधमांचंच राज्य आलं ज्यात पिडितेच्या लुटलेल्या आब्रूचेच धिंडवडे काढतंय समाज.


कधी तिच्या कपड्यांची तर कधी उच्चशिक्षणाची चुक पटवुन देण्याची थेरं आरोपींच पक्ष करतंय

आम्हीच इथले तथाकथित राजे म्हणत आरोपींनाच संरक्षण देतंय


बाहेरचे लोक काय म्हणतील म्हणुन आधी

घरचेच तोंड दाबुन मुक्का मार द्यायचे

आज त्याहीपेक्षा वाईट झालीय परिस्थिती, कोर्टाची पायरी चढण्यासाठी ही वेळ आलीय लढण्याची.


तिथं न्यायासाठी ऊभं रहायला सुद्धा पूर्व पडताडणी केली जातेय, 

पिडिता अन् आरोपी दोघांच्याही जाती-धर्माची टेहाळणी होतेय.


विरोधी पक्ष लागतो लगेच कामाला, ओतुन टाकतो सगळी जिव्हाळी

आणि मग भडकली आग सामान्य माणसांत की भाजुन घेतो आपली राजकिय पोळी


कुणाचा राजिनामा मागितल्या जातं तर कुणावर फेकली जाते शाई

मात्र आरोंपीना लवकरच शिक्षा नक्की होईल अशी हमी कुणीच देत नाही


वर्षानुवर्षे ताटकळत बसावं लागतं मग झालेला अन्याय सिद्ध करायला

तेव्हा येतं लक्षात की वास्तवात कोणताच पक्ष नाही आहे आपल्या मदतीला


पिडीतेच्या घरच्यांनाही बेआब्रू व्हावचं लागतं, पोरगी गेली ती गेली पण पैसे कमावुन गेली असंही ऐकावं लागतं. 

कधी संपेल कुणास ठाऊक आपल्या समाजाचे अधःपतन बघवत नाही मला आता हे बलात्कार आणि त्यावरील घाणेरडे राजकारण…


चैतन्यकुमार देवकर,माळशिरस

खरंतर बलात्काराची घटना घडली.. असं ऐकलं तरी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला प्रचंड राग येतो. अशा नराधमांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी आपली तीव्र इच्छा असते. कधीकधी तर आपल्याला वाटतं की प्रियांका रेडी प्रकरणात जसं एन्काऊंटर करून आरोपींना ठार मारण्यात आलं ते योग्य होतं बऱ्याच वेळा अनेक अमानवीय शिक्षांकडेही आपण एक पर्याय म्हणून पाहतो.हेच बरोबर आहे असं मानायला लागतो तर दुसरीकडे बऱ्याच वेळा आरोपीं हेच गुन्हेगार आहेत असं सिद्ध होईपर्यंत तरी थांबायला हवं असा सूर निघतो. या दोन्ही चा  सुवर्णमध्य म्हणजे  फास्टट्रॅक अर्थात जलदगती न्यायालयांची व्यवस्था असणे ठरु शकते.आणि विशेषता बलात्कारासारख्या गंभीर होण्यासाठी तर असायलाच हवी. आता अगोदर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला या घटनांचा प्रचंड राग येतो यातून आपल्यामध्ये संवेदनशीलता असल्याचं दिसून येत. ते आपसूकच असतं. परंतु ती संवेदनशीलता ,ती तीव्र इच्छा  गुन्हेगारांप्रती राज्यकर्ते, अधिकारी यांच्यात कशी नसू शकेल?? केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तर ' इथिक्स' चा स्वतंत्र पेपर असतो. तरीदेखील हाथरस मध्ये घडलेल्या घटनेमध्ये जबाबदारीची पदे भूषवणारे अधिकारी असं बेजबाबदार आणि असंवेदनशील कसं काय वागू शकतात?? भलेही राज्यकर्त्यांनी त्यांना वेगळे निर्देश दिले असतील परंतु एक अधिकारी म्हणून त्यांनी त्यांचं कर्तव्य करणं भाग होतं. आणि राज्यकर्ते त्यांनी तर... लोकांचं प्रतिनिधित्व करायचं असतं.. परंतु ते तर अगदीच बेजबाबदार वागले उलटपक्षी गुन्हेगारांना पाठीशी घालू लागले ...  आपला  विषय आहे , बलात्कार आणि त्यावरील घाणेरडे राजकारण. मला वाटतं की, कोणतीही गोष्ट राजकारणापासून अलिप्त राहणं तसं अवघडच .. पण त्याच्या माध्यमातून संवेदनशीलतेचं दर्शन घडणं , आणि न्यायासाठी , सत्यासाठी पराकाष्ठा करणारे नेते , राजकारणी असणं , तयार होणं...हे फार आशादायी चित्र असतं…


क्षितीज गिरी,सातारा

     काही जण म्हणतात बलात्कार हा बलात्कार असतो त्यामध्ये तुम्ही जातीचा धर्माचा विषय का  आणता आरोपी कोणीही असू दे त्याला शिक्षा झाली पाहिजे.पण  निर्भया प्रकरणामध्ये झालेला बलात्कार आणि  खैरलांजी , हातसर  मध्ये झालेला बलात्कार यामध्ये तसा खूप फरक आहे.तुम्ही म्हणाल तसे कसे. बलात्कार तर शेवटी बलात्कार असतो.पण माझ्या मते कोणताही बलात्कार करणाऱ्या आरोपीचा उद्धेश हा खूप महत्त्वाचा असतो.निर्भयाच्या प्रकरणात तो फक्त सेक्स हाच होता.पण सगळी कडे तो सारखाच असेल असे नाही.आणि तसा तो नसतो पण ...

             हातसर च्या घटनेकडे पाहू. ठाकूर आणि वाल्मिकी समुदायाच्या वादातून हा बलात्कार झाला आहे.तो पण खुले आम धमकी देऊन.संदीप ठाकूर यातला मुख्य आरोपी.6 महिने आदोगर ठाकुरानी  धमकी दिली होती.तेव्हा पासून मनीषा वाल्मिकी कोठे घरा बाहेर पडली नव्हती.पण त्या  दिवशी म्हणजे 14 सप्टेंबरला ती तिची आई गवत आणण्यासाठी रानात गेले.गवत कापणे चालू होतो.मनीषा बाजूला बसली होती तिची आई गवात कापता कापता थोडी  लांब निघून गेली.अश्या वेळी  सरेआम तिची आई तिच्या बरोबर असताना. मुली ला उचलून संदीप आणि त्याच्या मित्रांनी  तिच्यावर बलात्कार केला.आई ला ऐकू कमी येत होते .त्यामुळे मनीषचा आवाज ती ऐकू शकली नाही. बलात्कार करून झाल्यावर ती कुठे बोलू नये म्हणून तिची जीभ कापली. मानेची हाडे मोडली.शेवटी 29 सप्टेंबरला सकाळी 5 वाजता तडफडून तिला मरण आले.14 ते 29 तारखे पर्यंत तिच्यावर दवाखान्यात उपचार पण नीट झाले नाहीत.याच्या आगोदर पण तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला होता.

त्याच्यानंतर  आसपासच्या 12  गावातल्यांनी  त्यामध्ये ठाकूर आणि ब्राम्हण यांनी गुपचूप पंचायत लाऊन आरोपीचा साथ देणे आणि गावामधे कुणाला घुसून न देणे असा निर्णय घेतला.डॉक्टरांनी पोलिसांनी  मुख्यमंत्र्यांनी आरोपीच्या बाजून  साथ दिली.कारण आरोपी ठाकूर होता.योगी आदित्यनाथ बोलले आरोपीची आणि मनिष्याच्या घरातल्यांची  नार्को  टेस्ट करा.कारण सगळे अधिकारी यांचेच.डॉक्टररांचा रिपोर्ट पण चुकीचा दिला गेला.आपल्या मुलीला शेवटी जाळण्याचा अधिकार पण दिला जात नाही.लावारिस लाश जाळावी तसे जाळले जाते तिला.आणि नंतर बोलले जाते बलात्कार झालाय नाही.आमच्यावर खोटं आरोप केला जातोय.

आज पूर्ण कुटुंब दहशतीखाली राहत , वावरत आहे.त्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मनीषा वाल्मिकी सारख्या भरपूर घटना  भारतामध्ये घडतात.त्यातल्या काहीच घटना प्रकशाझोतात आणल्या जातात.पण दुर्दुव त्यांना पण लोकशाही मार्गाने संघर्ष करून नीट न्याय भेटीत नाही.म्हणून बाबासाहेब नेहमी सामाजिक न्यायासाठी संघर्ष करायला सांगत.

 माझ्या मते या घटनांकडे पाहताना फक्त बलात्कार म्हणून पाहणे चुकीचे आहे.जसे निर्भया कडे पाहतो तसे.हा तर जातीय द्वेष भावनेतून केलेला बलात्कार आहे.जसा खैरलांजी मध्ये घडला.न्याय मागता मागता भोतमांगे परिवार संपला पण न्याय???

या आरोपींना फाशी मिळाली पाहिजे पण ते वाटते इवढे सोपे नाही.सगळी न्याय  व्यावस्था आरोपीच्या  बाजूने खंभिरपणे उभी आहे. पण शेवटी दिली तरी फाशी देऊन फक्त न्याय भेटेल पण सामाजिक न्याय ? 

आज एक संदीप गेला तरी उद्या हजारो लाखो संदीप तयार होतील.कदाचित झालेही असतील.

जोपर्यंत लोकांची या जतिव्यवस्थेकडे  बघण्याची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हे असले जातीय द्वेषातून बलात्कार होतच राहतील.उत्तर प्रदेश सारख्या राज्यात अजुन पण अस्पृश्यता पाळली जाते.

यावर उपाय म्हणजे  समानतेच्या विचार करणाऱ्या प्रत्येकाने आता एकत्र येऊन या ना त्या मार्गाने या व्यवस्थे विरुद्ध लढले पाहिजे.कारण उद्या यामध्ये कदाचित तुमची पण मुलगी असू शकते.

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************