श्यामच्या आईने माझ्यातला श्याम असा घडविला...

🌱वि४🌿 व्हॉट्सअप ग्रुपवरून
     
          वि४हा ग्रुप 6 नोव्हेंबर पासून चालू झाला.प्रत्येक आठवड्यात प्रत्येक सोमवारी एक विषय दिला जातो.6 नोव्हें ते 11 नोव्हें आठवड्याचा विषय होता-"श्यामच्या आईने माझ्यातला श्याम असा घडविला.." निमित्त होतं श्यामच्या आईला म्हणजेच यशोमाईला 2 नोव्हेंबरला 100 वर्षे पूर्ण झालेली.

त्यावर या ग्रुपमधील अनेकांनी आपले मत अंतःकरणातून व्यक्त केले. त्यांच्या भावनांचा ,मताचा खूप आदर वाटतो म्हणून ते एडिटिंग न करता तुम्हाला जसेच्या तसे काही निवडक जणांचे विचार वाचायला देत आहोत.


मयुरी देवकर लिहितात....

ज्याप्रमाणे आपण जन्माला आल्यानंतर बोलता येत नसते तेव्हापासूनच आईला आपल्याला काय हवे , काय नको ते समजत असते , यापाठीमागे असते ते ' आईचे प्रेम ' ते श्यामच्या आई मुळे समजले .लहानपणीच आई आपल्या बाळाला संस्कार देते , अगदी त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने अखंड महाराष्ट्राला आईचे प्रेम , वात्सल्य , संस्कार श्याम च्या आई ने दिले .खऱ्या अर्थाने सध्याच्या भरकटलेल्या तरुणायीला श्याम च्या आई च्या संस्कारांची आज गरज निर्माण झाली आहे .श्याम परगावी राहत असताना आई ला भेटण्यासाठी तो किती व्याकूळ होतो , त्याचे प्रेम , त्याची वात्सल्यता याचे दर्शन या पुस्तकात होते .आणि म्हणूनच हे वाचून झाल्यानंतर आपणही समाजातील समस्या सोडवण्यासाठी त्याच प्रेमाने , त्याच व्याकूळतेणे व वात्सल्याने प्रयत्न करायला हवेत आणि हीच खरी सुरवात होय ...

     

         अनिल गोडबले सर म्हणतात की, माझे लहानपण कोकणातल्या एका गावात गेले.टी व्ही अजून ही घरात पोहोचला नव्हता. परंतु आकाशवाणी "मुंबई ब" अस एक केंद्र लागत असे. माझी आई सोलापूरची आहे आणि वडील कोकणातले त्यामुळे सोलापूरला येण जाण असायचं. मोठा नातू म्हणून आजीने एकदा मला खूप पुस्तक दिली.त्यांची नाव लक्षात नाहीत आता

पण सोहराब आणि रुस्तम, श्यामची आई या दोन पुस्तकांची नावे लक्षात राहीली. त्यानंतर काही दिवसांनी आकाशवाणी वर श्यामची आई या पुस्तकाचे अभिवाचन होत होंते. त्यावेळी माझी परिस्थिती आणि कथा त्यातून शिकवण्यात आलेली मूल्ये या गोष्टी जुळून येत होत्या

        त्या नंतर परिस्थिती बदलली आणि मी सोलापूरला आलो. समाज कार्य करताना "साधना' हातात पडला. नेट सेट चा अभ्यास करताना... काही गोष्टी बारकाईने कळू लागल्या. तेव्हा अचानक पुन्हा "राष्ट्र सेवा दल" आणि साने गुरुजी यांच्याशी नाळ जोडली गेली.डॉ. दाभोलकर यांच्या हत्ये नंतर तर खूप प्रभावाने जाणवू लागलं की किती मोठे व्यक्ती आणि त्यांचे विचार आपण वाचत आहोत. त्याच वेळी श्यामची आई आणि त्याचे विवेचन पुन्हा वाचनात आले.

मागे वळून पाहताना माझी परिस्थिती आणि माझ्या आई आणि वडील यांची मानस्थती काही वेगळी वाटली नाही. कोकणातली परिस्थिती फार काही बदलली नाही अजून.

त्यात साने गुरुजी यांची शिकवण मला मदत करत गेली.कधी कधी उलट त्रास होत होता"गोडबोले' आडनावाचा....लोक आताही बोलताना "तुम्ही बामनाचे...." अस म्हणून सुरुवात करतात तेव्हा जाणवलं की खरा तो एकचि धर्म.... जगणे किती अवघड आहे. पण या प्रेरणादायी श्यामच्या आई कडून लढण्याच बळ मिळत आहे

देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी काम करत असताना देखील आपली मूल्य राखण्याचे आणि "मनाला घाण लागू न देण्याचे" कौशल्य श्यामच्या आई ने दिले.

        आपली परिस्थती सांभाळता सांभाळता देखील नीती मूल्य बाळगता येऊ शकतात याची जाणीव श्यामची आई अजूनही देत आहे.. अजूनही श्यामची आई... सॅम च्या मम्मी मध्ये बदलत गेली तरी तिला तिचे अपत्य नीती मूल्य सोडून वागलेलं चालत नाही . श्यामची आई आणि माझी आई मला वेगळी वाटत नाही कारण दोघा नाही माझ्या सोबत देशाचीही काळजी आहे


रत्नागिरीच्या तिलोत्तमा मांजरेकर थोडक्यात म्हणतात,श्यामची आई मला प्रत्येक मुलात असणारा श्याम बघण्यास भाग पाडते. हळूवार शब्दांनी साधलेल्या संवादाची ताकद स्पष्ट करते. गरीबीतही स्वाभिमान जपायला शिकवते. ती श्यामचीच नव्हे तर बहूदा माझी ही आई होते.


अनिकेत भंडारे म्हणतात:

          सातवीत उन्हाळ्याच्या सुट्टीत (गावाकडे असताना) 'श्यामची आई' वाचनात आले. त्या वेळी वाचताना लक्षात येऊ लागले की तो पर्यंतच्या आयुष्यात यातले बरेच मला माझ्या आई कडून वेगवेगळ्या प्रसंगी सांगितले गेले होते(फक्त प्रसंग पुस्तकात होते तसे नव्हते).

         पुस्तक जसे जसे पुढे सरकत होते तसतसे मला खात्री पटली की आईने नक्कीच हे पुस्तक वाचले असणार. सुट्टीवरून घरी आल्यावर पहिल्यांदा आईला विचारले,"श्यामची आई कधी वाचलेस ?" आईचे उत्तर होते की तिने आजच या पुस्तकाचे नाव ऐकले... मला आता कळून चुकलं होते की आई ही आई का आहे...

           आजही मी तिच्याकडून खुप काही शिकत असतो. ज्या वेळी मोठ्या अडचणीत सापडतो आणि डोके चालायचचे बंद होते त्या वेळी तीच डोळ्यासमोर येते, त्या अडचणी वर आईला विचारले तर म्हणते,"आज मदत केली तर उद्या परत येशील... Fight ur own Battle...सोपे solution आहे थोडा विचार कर अजून... " आणि खरंच  आता पंखात नवीन बळ आलेल असत... मार्ग मिळतो...

            आज जिथे आहे तो आई-वडीलांच्या कृपेनेच... आणि भविष्यात ही जिथे असेन ते ही त्यांच्याच पाठिंबा आणि आशीर्वादाने..


गणेश सावित्री हे आईबद्दलची दुसरी बाजू परखडपणे लिहितात की,आपल्या मधील अनेकांची या विषयावरची मत वाचली. पहिलीपासून ते जवळपास पदवीपर्यंत ज्या उत्स्फूर्तपणे निबंध ते भाषण यामधून लोक उगाचच  आईचं गौरवगाण (ज्याचा वास्तवतेशी फारच कमी संबंध असतो) करताना दिसायचे, त्यात अन या प्रतिक्रियांमध्ये जास्त फरक वाटला नाही. म्हणजेच आपली आईकडे बघण्याची मानसिकता अजूनही पारंपारिकच आहे.


आपण तिला फालतू बिरुद-पदव्या व फालतू अपेक्षांच्या ओज्याखाली एवढं दाबलं आहे की, तीच माणूस म्हणून असणार स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला आपली मानसिकता अजूनही तयार झालेली नाही. (स्त्रीवादाचा सखोल अभ्यास करणार्यांनी लक्षात घ्याव की अजून किती काम ग्राउंड पातळीवर करणं बाकी आहे.)

श्यामचे बाबा सॅम चे पप्पा झाले म्हणून आम्हाला वाईट वाटत नाही तर कौतुक वाटत, कारण ते आधुनिक झाले! श्यामच्या आई प्रमाणे श्याम चे बाबा का होऊ शकतं नाहीत हे प्रश्न विचारणारे सहसा भेटत नाहीत. पण श्यामची आई सॅम ची मम्मी झाली तर आम्हाला त्याचं दुःख वाटत. कारण तिचा तथाकथित "स्त्रीपणा" लोप पावल्याचं अन त्यामुळं पुरुष म्हणून मिळणाऱ्या सोईना मुकल्याचं दुःख ही आहेच म्हणा. यापाठीमागच्या आपल्या "पुरुषप्रधान" मानसिकते बद्दल विचार करण्याच धाडस आपण दाखवणार का??


श्यामच्या आईच्या किंवा आपल्या अनेकांच्या आईच्या वाट्याला जन्मभर येणाऱ्या कंटाळवाण्या घरगुती कामांचा निम्मा वाटा जरी आपण किंवा आपल्या बापानीं उचलला असता तर आपल्या आयांना स्वतःच स्वतंत्र अस्तित्व बनवता आलं असतं.  फक्त "तथाकथित संस्कार" देणार दुकान न राहता स्वतःचा आर्थिक उदरनिर्वाह करण्याचा आत्मविश्वास आला असता तसेच या मिळालेल्या स्पेस मूळ स्वतः ची राजकीय, सामाजिक मतं बनवण्याचा प्रयत्न केला असता. अशी आईच आपल्या मुलांना सुद्धा एक स्वतंत्र अस्तित्व असलेला नागरिक बनवू शकते.


मला साने गुरुजींच्या नैतिक ताकठीचा व त्यांच्या अत्यंत संवेदनशील मनाचा अभिमान वाटतो व तस बनण्याचा मी प्रयत्न ही करतो. पण तरीही मला माझी  आई श्यामच्या आई सारखी सर्व काही सहन करणारी नकोय तर ती घरगुती हिंसेचा किंवा इतर कोणत्याही अत्याचाराचा ठामपने विरोध करणारी हवी. फक्त  चूल व मूल यात न रमता स्वतःला साहित्य, कला, राजकारण, समाजकारण, वादविवाद, व्यवसाय यात स्वतःला रमवणारी व मुलांचं स्वतंत्र अस्तित्व (स्वतंत्र म्हणजे स्वैराचार नव्हे, अगोदरच सांगितलेलं बरं. उदा. किमान मनाप्रमाणे लग्न करण्याचं स्वतंत्र तरी देणारी हवी) मान्य करून त्यांना त्याप्रमाणे जगू देणारी हवी.


शेवटी एवढच की, काहीवर्षा पूर्वी भारतात एक महिलांच्या सर्वेक्षणात जवळपास 70% महिलांनी मान्य केलं की, जर समाजाने व्यवस्तीत वागणूक दिली तर आम्ही नवऱ्या पासून वेगळे राहू. आई बदल तथाकथित भाबडी पोपटपंची करत असताना हे वास्तव कसे काय विसरता येईल??


अक्षय पतंगे असे व्यक्त होतात:कवी फ.मु.शिंदे आईचे वर्णन करताना लिहीतात,"आई एक नाव असतं,घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं".श्यामची आई ग्रंथाने मला साधेपणा दिला,भारतीय समाजाचे दर्शन घडवतं, जगाला प्रेम अर्पण्याचा खरा धर्म शिकवला.श्यामच्या अंगणातील तुळशी पंढरी झाली,म्हणजेचं पुर्णत्वाकडे पाहण्याचा डोळसपणा दिला.

   मी अजुनही श्याम झालो नाही,होण्याचा प्रयत्न करीत आहे.फ.मुं च्या शब्दांत "आई असतो एक धागा,वातीला उजेड दावणारी समईतील जागा"...!!


महेश देशपांडे सर आई विषयी खूप मस्त विचार मांडतात. ते लिहितात की,

मराठीत आ =आत्मा  ई = ईश्वर

मराठी मातृभाषा आहे म्हणून आपण आई म्हणतो आणि मला वाटतं या शब्दांमध्ये खूप सामर्थ्य आहे.

वास्तववादी विचार करायचा म्हटलं तर

महाराष्ट्राला पुरोगामी का म्हटलं जातं याच खर मूळ यातच आहे. प्रत्येक जण जन्मदाती आई बरोबरच आपल्या भूमातेवर, देशमातेवर अनंत प्रेम करत आलेला आहे आणि करत राहील याची नक्की खात्री. आपल्याला खूप मोठी पार्श्वभूमी आहे. ती समजून घ्यायची असेल तर वाचन आवश्यक आहे. प्रत्येकाला आई असतेच असते कारण त्याशिवाय जन्म शक्यच नाही. महत्व सांगायचं झालं तर तुम्ही तुमच्या आईच किती महत्व सांगाल....

म्हणाल मला आईच सगळ्यात महत्त्वाची आहे. खरंच का हो ? मग 2 मिनिट नाक दाबून बसा, मग तुम्हाला कळेल तुमचा जीव महत्वाचा आहे. हे नक्कीच खर आहे. यात आईच महत्व मग कुठे आलं, तर तुम्ही जो जीव म्हणताय ना तोच तिच्यामुळे मिळालाय. त्यामुळे आईच महत्व खूप आहे. तुलना करणे चुकीचे आहे, कोणीही याची तुलना करू नये.

         आता, श्यामची आई याविषयी बोलायचं झालं तर मी खूप दिवसांपूर्वी वाचलं आहे पुस्तक. प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे, प्रत्येक गोष्ट. आपण काय अनुकरण करतो, हे आपण स्वतःला विचारले तर खूप बरे होईल. जीवनमान विचारात घेतले तर, त्याकाळची परिस्थिती आता नक्कीच राहिली नाही. पण साने गुरुजींनी जे काही सांगितले आहे ते सदासर्वकाळ जगण्यासारखे आहे. प्रत्येकाला त्यांच्याप्रती आदर आणि विश्वास आहे की यांचे विचार नक्कीच पिढी घडवणारे आहेत.

         यानिमित्ताने मला अजून काही आकलन झाले तर नक्की सांगेन. तूर्तास आपण सर्वांनी आपल्यामध्ये स्वतःच जे अस्तित्व आहे त्याची जाणीव ठेवून *नेहमी* आपल्या जन्मदाती आईला, मातृभूमीला वंदन करावे. साने गुरुजींच्या बऱ्याच गोष्टी भारताच्या स्वातंत्र्याशी निगडित आहेत. पण त्यांचा मूलतत्त्ववाद हा एकेश्वर, म्हणजे जगात ईश्वर आहे जो सगळ्या जीवितांना चेतना देतो आणि तो *एकच* आहे.


बदलत्या काळानुसार तिनं सुद्धा बदललं पाहिजे हे सांगताना वैशाली सावित्री लिहितात:पहीली गोष्ट "आई" वर लिहताना मला खूप विचार करावा लागला कारण काही काही गोष्टी (अठवणी)आशा असतात की त्या  शब्दात व्यक्त करुच वाटत नाहीत,त्या आपल्या मनात घट्ट रुतून बसलेल्या असतात . पण मला वाटलं की आई ने दिलेल्या संस्काराची शिदोरी येथे खाली करावीच लागेल कारण भविष्यात कधी आई ह्या विषयावर व्यक्त व्हायला व्यासपीठ मिळेल याची शाश्वती नाही .माझी आई पण अगदी तशीच होती जशी शामची आई होती, तुमची आई आहे ,समाज्याला जशी हवी आहे तशा साच्यात बसणारी,मला कळत असं तीनं फक्त आणी फक्त तिच्या आयुष्यातला सगळा वेळ संसार आणि मुलांना चांगले संस्कार लागावेत ह्यासाठी खर्च केला .स्वताःच म्हणून कधी आयुष्यच जगली नाही .तिन तिच्या  आयुष्यात खूप काही सहन केलं ,अनूभवलं तरीही कधीच डगमगली नाही.स्वताःच्या विचारावर अगदी शेवटपर्यत ठाम राहीली व आमच्यावर संस्कारही त्याचपद्धतीने केले .ती अत्यंय प्रामाणीक ,कोणाबद्दल कधी  मनात व्देष नाही , आणि कायम कष्टाला प्राधान्य देणारी आणि आम्हालाही कायम सागणार की ह्या जगात कष्टाशिवाय आणि प्रामाणिकपणाशिवाय पर्याय नाही .आणी तिची तीच शिकवण घेवुन आमची वाटचाल चालु आहे.पण आत्ताच्या समाज्यात मला आईच सहनशील रुप नकोय,तिन एक स्वतंञ व्यक्ती म्हनून स्वताची सामाजीक प्रतीष्टा  स्वतावर अवलंबून ठेवावी नाकी वडीलांवर , मुलांना संस्कार लावतालावता आणी घर संभाळत संभाळतच तिचं पूर्ण जीवन अस वाया जाऊ नये वडीलांची पण ती जबाबदारी आहे आणी ती त्याना  पार पाडावी लागेल ह्याची जाणीव आपण वडीलांना  करुन द्यायलाच हवी .


सीताराम पवार अंतःकरणातून लिहितात की: आई विषयी लिहिताना खरंच मन भरून येते कारण कितीतरी  वाईट ,दुखी प्रसंगी अगदि कणखरपणाने सामोरे जाण्याचे संस्कार तीने माझ्यावर केले.समता, प्रामाणिक प्रयत्न ,सहनशीलता, करुणा,माया करणे शिकवले. ऐक प्रसंग मी सातवीत होतो घराची परिस्थिती गरीब होती तेव्हा मी दर शनिवार ,रविवार तिच्या बरोबर खुरपायाला जायचो ,शनीवारी अकरा वाजता जाऊन राहिलवले काम सुट्टीझाल्यावर दोघ मिळून करायचो.तेव्हपासू कष्ट करण्याची वृत्ती निर्माण झाली . व त्याची लाज कधी वाटली नाही कारण बायकांमध्ये काम करावे लागे.तसेच लहानपणी दुसऱ्या जातीची लोक घरी आल्यावर चहा पिऊन कप बाशी कधी आइने त्याना धुवू दिली नाही मी एकदा विचारल तर मला मनली" आपल आन त्यानंच रक्त एकच आहे तर भेदभाव कशाला?"त्यामुळे माझ्या मनाची जडणघडण माणुसकी ह्या तत्त्वावर झाली व त्याचं खूप चांगला अनुभव भावी आयुष्यात आला,खरंच लहानपणी चांगल्या  विचाराचा माझा पाय भक्कमपणे माझ्या आ ई    उभारला मनून मी आज ह्या विषयावर लिहिताना एवढच म्हणतो की ,आ ई माझी मायेचा सागर ,तिने दिला जीवना आकार,, शेवटी आई माझी कल्पतरू आहे, माझं सर्वस्व ,माझा विश्व हे आ ईचं आहे.


सोमनाथ आदमीले सर म्हणतात की,'श्यामची आई' ही आईवर लिहलेली एकमेव मराठी कादंबरी अजरामर ठरली आहे.या पुस्तकातील आईचे प्रेम हे श्यामपूरते नाही तर विश्वव्यापक आहे .व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या  मग ती व्यक्ती  मी असेन किंवा आपण सर्वजन अपराधीपणा, अहंकार,स्वार्थ,द्वेष,दुर्गुणांवर मात करायला हे पुस्तक शिकवते. अपमान सोसायला, गैरसमज स्वीकारायला व लोकनिंदा झेलायला शिकवणारी आणि प्रयत्नपूर्वक सद्गुणांची जोपासना करायला लावणारी आई 'श्यामची आई' या साने गुरुजींच्या पुस्तकातून आपणाला भेटते आणि ह्याच सद्गुणांचा मला माझ्या जीवनात खूप फायदा होतो आहे ,हेच माझ्या आईने मला शिकवले आहे .माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईमुळे आहे .

आई माझा गुरु

आई माझी कल्पतरू'

बुद्धीतर सर्वांनाच असते परंतु सद्सद्विवेक बुद्धीने विचार करायला हे पुस्तक भाग पाडते या जगात प्रेम आणि दया असून चालत नाही तर प्रेम ,ज्ञान, आणि शक्ती या तीन गोष्टी असेल तरच जीवन सुंदर व यशस्वी होते.                           मला या श्यामची आई यापुस्तकाने निरपेक्ष,निरतिशय ,मातृप्रेमाचाआदर्श घालून दिला.लहानपणीआईकडून चांगले संस्कार झाल्यामुळे विचार करण्याची कक्षा रुंदावली .माणूस म्हणून जगायला शिकवले म्हणूनच म्हणतात की ,

'आईविना स्वामी तिन्ही

जगाचा भिकारी'


धुळ्याचे निलेश महाले विषयाला धरून सुंदर विचार मांडतात :


श्यामच्या आईने माझ्यातला शाम असा घडवला...!


श्यामची आई या पुस्तकातून साने गुरुजींनी आपल्या बालपणी भावनांचा विकास क्रमशः कसा होत गेला याचं मार्मिकतेने आणि अंतःकरण हेलावून सोडते अशा पद्धतीने या पुस्तकात वर्णन केले आहे.

आता पर्यंत अनेक पिढ्यावर संस्कार करण्याचे काम या पुस्तकाने केलं आहे असे मला वाटते.आईच्या प्रेमळ शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथात्मक चित्राच्या स्वरूप श्यामची आई आपल्या समोर पुस्तकाच्या माध्यमातून अवतरते.अनेक गोष्टी ह्या माझ्या आईत आणि श्यामच्या आईत समान दिसून येतात. माझ्या आणि श्यामच्या आईने अनेक संस्कार माझ्यावर केलेत. "खोटं बोलून कोणीही मोठा होऊ शकत नाही ही दोघांची शिकवण"."प्राणी मात्रावर दया करणे" श्यामची आई स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देते. हीच शिकवण माझ्या आईने सुद्धा दिली.

आपली आई कीतिही गरीब कींवा अशीक्षीत असो ति आपल्या पेक्षा नेहमीच मोठी आसते. हे यातून स्पष्ट होते. आई ही नेहमी आपली काळजी घेत असते परंतु आपण तिच्याकडे लक्ष देत नसतो."अरे पावसांची चिन्हें आहेत रेनकोट घेउन जा अस ती म्हणते, आपण नेहमीपणे,दुर्लक्ष करतो, अन मधे कुठेंतरी नेमका पाउस गाठतो. तेव्हा आपल्याला कळतं आई काय आहे?

आशा प्रकारे माझ्यातला श्याम घडवला.



             ‎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************