मेंढरे आणि आम्ही: साम्यता

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप
मेंढरे आणि आम्ही: साम्यता


संदिप बोऱ्हाडे वडगाव मावळ,पुणे.
 मी थोडे विषय बदलतो कारण मेंढरे म्हणजे सर्वच प्राणी बोलले तरी योग्यच राहील..आणि आम्ही खूप सभ्य आहोत पण मेंढरे आणि माणसांची तुलना करणे कदापी शक्य नाही म्हणून मी असा विषय सुचवितो सभ्य माणसांपेक्षा चांगली आहेत जंगली जनावरे..??

   आमचा जन्मच जंगलात झाला...जंगली जनावरांपासून सामान्य माणूस बनण्याची इतकी मोठी प्रक्रिया कधी पूर्ण झाली समजलेच नाही. आता आम्ही पूर्णपणे सभ्य झालो आहोत कारण आम्ही जंगल केव्हाच सोडले आहे..आता आम्ही जंगली जनावर नसून माणूस बनलो आहोत. आम्हाला चूक आणि बरोबर या गोष्टी कळायला लागल्या आहेत. आता आमच्याजवळ धर्म , समज, विज्ञान , लोकशाही , एकमेकांचे सहाय्य, आणि बरोबरी आहे.

  परंतु आम्ही ज्या ठिकाणाहून निघून आलो त्या जंगलात आजही चारही बाजुंनी भयंकर अराजकता, असमानता, अन्याय, मारामारी, एकटेपणा याव्यतिरिक्त काहीही नाही.
जंगलातल्या अन्नसाखळीमध्ये कोणी सगळयात मोठा असतो तर कोणी सगळ्यात खालच्या थरावर असतो. काही पशु हिसकावून खाण्यात तर कोणी सगळे गमावून बसलेला आहे. जंगलात कोणी शाकाहारी तर कोणी मांसाहारी, कोणी शिकार आहे तर कोणी शिकारी , आम्ही जे जंगल सोडून आलो तिथे आजही जीवन मरणाचा खेळ चालू आहे. कोणी मारत असत तर कोणी मरत असत. कोणी चिरत असत तर कोणी चारत असत. जंगलाचा फक्त एकच नियम आहे जगायचे असेल तर मरा नाहीतर मारा, लढा नाहीतर पळा. जो जिंकेल तोच फक्त जगेल. कमजोर प्राण्याला जंगलात कोणतीही संवेदना अजिबात नाही. Servival of fitest हाच जंगलाचा मुलमंत्र आहे.

   आम्ही कायमस्वरूपी जंगल सोडले आहे. आता आम्ही सभ्य माणसात राहतो. आम्ही माणूस बनलो आहोत...परंतु हा आमचा कदाचित भ्रम आहे, हे खोटे आहे हे पाखंड आहे. ती फक्त माणसांची झुंड आहे. आणि आमच्यासारख्या माणसांनी  याला समाज म्हणून समजूत घातली आहे. या समाजात देखील तेच नियम आहेत जे जंगलात चालतात परंतू माणसांच्या या सामाजिक जंगलामध्ये खूप भयानक अवस्था आहे..

   जंगलामध्ये खुप अराजकता असते परंतू कोणताही पशु पक्षी जनावरे आत्महत्या करत नाही. कोणीही भुकेने मरत नाही , कोणी पोटासाठी देह विकत नाही. जनावरांमध्ये कदाचित संवेदना नसतीलही परंतु कोणतेही जनावर आपल्या प्रजातीची हत्या करत नाही.  सर्व सोबत असतात इथे कोणताही भेदभाव नाही. जे मिळेल ते सर्वांना दिले जाते.

  माणसांच्या समाजात मात्र न्याय हा प्रत्येकाला वेगवेगळा आहे.  गैर बरोबरी जंगलात नाही तर माणसांमध्ये चालते. जंगलात एकाला जगण्यासाठी दुसऱ्याच्या मरावे लागते. तिथे वाघाच्या मुलालाही जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. माणसांमध्ये मात्र दुसऱ्यांना लुटावे लागते, हिसकावून घ्यावे लागते, शोषण केले जाते आणि त्याचाच व्यापार केला जातो. जंगलात नर आणि मादी समान असतात ते आपले कर्तव्य कामे नीट बजावत असतात. जंगलात नर मादीचे शोषण बलात्कार करत नाही मादी मात्र जंगल सृजन करते जंगलाला घडविते म्हणूनच
जंगल नारीप्रधान आहे. परंतू मानवी समाजामध्ये नारी
सर्वकाही कायम करत असते तरीही ती अपवित्र, त्यांना अग्निपरीक्षा दयावी लागते. भरलेल्या बाजारात तिला नागडे केले जाते. तिच्या देहाचा व्यापार केला जातो. तिला विकली जाते. तरीही तिची औकात शून्यच..

  जंगलात बलात्कार होत नाहीत.
मानवी समाजात मात्र बलात्कार पुरुषप्रधान परंपरेचा अविभाज्य घटक मानला जातो. जंगलात कोणताही धर्म नाही फक्त तिथे एकच नियम जीवन जगण्यासाठी संघर्ष..या नियमात कोणालाही सुटका नाही मग तो वाघ असो नाहीतर बकरी.. हरीण असो वा हत्ती.. सगळेच नियमाला बांधील.
मानवांमध्ये पण हे नियम आहेत परंतू  सगळ्यांसाठी नाहीत. काहींना संघर्ष नाही तर षडयंत्र करावे लागते. तर काही लोकांना कठोर संघर्ष.. संघर्षवाली लोक अनेक पिढ्या संघर्षच करत राहतात तर षडयंत्रवाले अनेक पिढ्या संघर्षच करत राहतात.

   षडयंत्र करून ही लोक संसाधने हडप करतात. सत्ता आणि धर्माच्या माध्यमातून समाजाचे नियम तयार करतात हे नियम फक्त त्यांच्याच फायद्यासाठी असतात. या धार्मिक नियमांना संघर्ष करणाऱ्या लोकांना अविभाज्य घटक बनवीला जातो.  हाच माझा समाज ज्यामध्ये बोटांवर मोजण्याइतके लोकांचे राज चालत आहे. माणसांकडून माणसांचे शोषण, अत्याचार, भ्रष्टाचार , गुलामी चाललेली आहे.

  आजादीच्या नावावर अनेक बंधने आहेत, इंसानियतच्या नावावर जातींच्या बेड्या, धर्माच्या नावावर पाखंड, सभ्यतेच्या नावावर चित्कार, शांतीच्या नावावर अत्याचार, भय, भूक, आणि भ्रष्टाचार. आणि धर्माच्या नावावर व्यापार..

यापेक्षा जंगल बरे! तिथे संघर्ष तर आहेच पण शोषण नाही. डर आहे पण भय नाही. भूक आहे पण भुकेने कोणी मरत नाही. धर्माच्या नावावर कोणी कुणाशी लढत नाही. माणसांच्या या समाजात संवेदना मेली आहे.

म्हणूनच जंगले कित्येक पटींनी चांगली सभ्य समाजापेक्षा असभ्य जनावरे खूप चांगली.. माणूस म्हणून मी लाचार आहे..अजूनही आम्ही माणूस बनलेलो नाही.

प्रदिप इरकर.वसई,पालघर.
राहायलाच मी वसईत,त्यात कामानिमित्त रोजचे मुंबईला जाणे होते आणि मुंबई लोकलचा प्रवास
या लोकल मधील गर्दीला जर मेंढरांची उपमा दिली तर मेंढरे देखील लाजून असे म्हणतील की आम्ही खरेच असे आहोत काय?😳😱
अहो अशा किती घटना रोज लोकल मध्ये किंवा प्लॅटफॉर्म वर घडतात ज्या मेंढरामध्ये कधीच घडत नसतील.कधी एका मेंढराला अक्षरशः तुडवत दुसरी मेंढरे गेलेले ऐकवलाय का तुम्ही?
डाउन लोकलमध्ये सीट मिळवण्यासाठी समोर येईल त्याला नको तिथे धक्के मारून गेलेले ऐकलंय का?
आपला रस्ता ओलांडून झाला पाहिजे म्हणून झुंड करून रास्ता ओलांडण्यासाठी गाड्या जागेवर थांबवल्या जातात काय कधी मेंढरांकडून?
ज्याप्रकारे माणसाच्या खुशीसाठी मेंढरू स्वतःचा जीव देतो त्याप्रमाणे माणूस दुसऱ्याच्या खुशीसाठी काहीतरी करतो का?

अहो छे छे... नाही आपल्यात व  मेंढरात साम्यता त्यापेक्षा कधी कधी आपल्यापेक्षा मेंढरेच परवडतील.

नामदेव डफळे ,सोलापूर.
नमस्कार मी या ग्रुपमध्ये नवीन आहे आणि पहिल्याच वेळी लिहीत आहे. लिहिण्यासाठी दिलेले विषय खरंच छान आहेत आणि ज्यावेळी त्याबद्दल आपण स्वतः लिहायचा प्रयत्न करतो त्यावेळी लक्षात येतं की ते बराच विचार करायला लावणारे आहेत.
  सर्वप्रथम विषय निवडणाऱ्या ऍडमिनना एका गोष्टी साठी दाद द्यावी वाटते ते म्हणजे त्यांनी विषय देताना 'मेंढरं आणि माणसं'असा न देता  'मेंढरं आणि आम्ही:साम्यता' असा थोडा विस्तृतपणे दिला , जे की अत्यंत गरजेचं आहे.कारण आपण बऱ्याचदा मेंढरांची प्रवृत्ती हा शब्दसमूह दुसऱ्यांचे दोष दाखवायला किंवा टीका करण्यासाठी वापरत असतो त्यावेळी स्वतःला त्यापासून आवर्जून वेगळं ठेऊन बोलत असतो.पण काही अपवाद वगळता , खरंच आपण त्या मेंढरांपेक्षा  वेगळे असतो का ??याबद्दल विचार करायला लावणारा हा अत्यावश्यक असा विषय आहे.
   आता आपण वरील विषयानुरूप मेंढरं (म्हणजेच त्यांची एक विशिष्ट वृत्ती/गुणधर्म या अर्थाने )आणि मेंढरांशी साम्य दर्शवणारं आपलं वागणं याबद्दल बोलूया.
 सुरुवातीला ,काय असते ही मेंढरांची वृत्ती ? इंग्रजीत त्याबद्दल काहीसं असं वाचायला मिळतं की 'Get one to go and they will all go'.  एकंदरीत सांगायचं झालं तर ' मेंढरं कळपाने राहतात आणि चालताना एक जात असेल तर बाकीचे सगळे त्याच्यामागे जातात '.हे झालं मेंढरांचं पण आपलं वागणं तर याच्यापेक्षा कुठं वेगळं आहे ?? यातलं साम्य म्हणजे आपल्या लोकांची सार्वजनिक जीवनातली कळपाने राहायची , एकामागे एक कुठल्याही गोष्टीचं अंधानुकरण करायची वृत्ती. या आपल्या वृत्तीच सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे आपली सोशल मिडियावरची वागणूक( हे फक्त एक उदाहरण देत आहे , बाकी आपल्या एकूण वागण्यालाच हा गुणधर्म लागू असल्याने देता येतील तेवढी उदाहरणे शक्य आहेत).माहितीस्फोटाच्या युगात ( माहिती - खरी , खोटी आणि जाणीवपूर्वक पसरवलेली खोटी  माहिती )सोशल मिडियाचा वापर करत असताना आपण बऱ्याच येणाऱ्या पोस्ट कोणतीही शहानिशा न करता , त्याबद्दल स्वतः काहीही स्थिरपणे विचार न करता , आणि त्याचा पूढे नक्की किती गंभीर परिणाम होणार आहे हे न पाहता व्हाट्सअप्प , फेसबुक आणि इतर माध्यमातून पुढे पाठवत असतो जे की खूपच घातक ठरत आहे. मी हेच उदाहरण निवडलं कारण त्याला तसा पुरावाही आहे तो म्हणजे - 'केवळ सोशल मिडियावरच्या अफवांमुळे आपल्या देशात मागच्या वर्षी जवळपास ३१ लोक अतिशय वाईट पद्धतीने mob lynching मध्ये जीवानिशी मारले गेले आहेत. हे खूपच भीतीदायक आणि आपल्यातल्याचसाठी धोकादायक असल्याने यावर लगाम म्हणून फक्त भारतासाठी व्हाट्सअपला msgs पुढे पाठवण्यासाठी ५ इतकी मर्यादा लागू करावी लागली आहे.'हे एकच उदाहरणसुद्धा आपण आणि मेंढरं काही वेगळं नाही आहोत हे उघडपणे दर्शवतं .
का वागतो आपण अस ? किंवा का वागतात मेंढरं अशी ? मेंढरं अशी वागतात कारण रस्त्याने एकटं चालताना दुसऱ्या जनावरांमूळे त्यांना जीवाची भीती वाटते म्हणून ते सतत एकमेकांच्या सोबत राहतात .तशाच प्रकारे आपणही सोशल मिडियावरती प्रस्थापित परिस्थितीशी विरुद्ध एखादी वास्तविक पोस्ट केली , सद्सद्विवेकाला अनुसरून वेगळं मत धारण केलं तर आपल्याला सोशलमीडियावरच्या ट्रोल्सरूपी जनावरांकडून ट्रोल होण्याची किंवा समूहातून एकटे पडण्याची भीती वाटते म्हणून आपणही  जास्त विचार न करता येणाऱ्या पोस्ट ( ज्या की बऱ्याचदा कुठल्यातरी विषारी प्रोपौगंडाचा भाग असतात )आपल्या हातून घडणाऱ्या जणू मानवी कल्याणासाठी म्हणून किंवा आपणही सगळ्यांच्या सोबत आहोत हे दाखवण्यासाठी पुढे पाठवत असतो.
आतापर्यंत आपण साम्य पाहिलं पण आपण एक मोठा फरक विसरतो त्यामुळे आपल्याला साम्य असलेली उदाहरणे जास्त दिसतात आणि तो फरक म्हणजे मेंढराना हाकायला मेंढपाळ असतो ज्याच्यावर विश्वास ठेवून ती मेंढरं वावरत असतात परंतु आपल्याला हाकणारा कुणी मेंढपाळ असण्याची गरजच नाही कारण आपल्याला दिशा दाखवायला ,स्वतंत्रपणे विचार करायला लावायला आपलं डोकं( बुद्धी )आपल्या धडावर अजून तरी टिकून आहे.  त्यामुळे आपण त्या बुद्धीचा जास्तीत जास्त वापर करून मेंढरांसारख अंधानुकरण न करता वास्तविकता काय आहे हे समजून घेऊन सोशलमिडियावरती आणि प्रत्यक्षात वागण्याची, बोलण्याची आज सर्वात जास्त गरज आहे. आज सगळीकडे माहितीचा विस्फोट होतोय ज्यात माणूस स्वतःला हरवून जात चालला आहे , त्यात स्वतःला हरवू द्यायचं नसेल तर स्वतःच्या चौकस बुद्धीचा वापर करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. या विषयावर अजून खूप उदाहरणं देता येतील आणि लिहिता येईल असा हा विषय आहे.
  शेवटी सारखं सारखं एक जुनं गाणं आठवतंय म्हणून लिहावंसं वाटतं की आपण जर असचं मेंढरांप्रमाणे वागत राहिलो तर दादा कोंडकेंच्या  गाण्याचे बोल खरे ठरू लागतील. एकटा जीव सदाशिव मधल्या या गाण्यात दादा कोंडके म्हणतात -
जरा जपून चाल ग पोरी ,
गेली सांगून ज्ञानेश्वरी ,
अन मांसापरास मेंढरं बरी

डॉ. विजयसिंह पाटील. कराड.
आम्ही फिरून झाल्यावर हॉटेलकडे वळलो. आज फिरायला घारे गैरहजर होते. आदल्याच दिवशी कावळे सर आणि घारेंची कश्यावर तरी शाब्दिक धुसपुस झाली होती. आम्ही आत शिरताच समोरच घारे शेजारच्या एका आम्हाला अनोळखी असलेल्या व्यक्तीबरोबर मोठया तावातावाने चर्चा करत होते. आत शिरताना पुढं कावळे,(हे कायम पुढेच असतात ) मी , घोलप साहेब आणि इतर मागे होतो आबा काठी टेकत सगळ्यात मागे होते.  "काय तुम्ही पण त्याच्या मागे मेंढरागतं ' आणि याक्षणी त्यांचं लक्ष समोरून येणाऱ्या कावळे आणि आमच्या कडे गेले. कावळे तात्काळ शीघ्र संतापाने गरजले , " मेंढरं कुणाला म्हणता ?ऑ आम्ही मेंढरे आहोत ? जरा तोंड सांभाळून बोलावं , नॉनसेन्स ". छद्मी पणाने घारे उत्तरले ' छे छे, आपण कावळे आहात, मेंढरे नाही ' असं म्हणून बरोबर च्या व्यक्तीला ' तू जा घरी , मी आलोच मागून ' असं सांगितले.
तेव्हड्यात आबा आले . अबानी फक्त मेंढरे हा शब्द ऐकून
' काय घारे, ह्यो मेंढरांचा उद्योग कदी सुरू केला ? '
असं म्हणतात हॉटेल मध्ये थोडा हशा पिकला.
घारे पण हसले, कावळेनी नाईलाजाने हसल्यासारखे केलं.
घारे म्हणाले ' हा आता गेलेला किश्या माझा पुतण्या, गावी शेती करतो. ह्यानं '
हिथं कावळे सर त्यांना थांबवून ' करुद्या की त्याला मेंढीपालन , मेंढीपालन हा एक चांगला व्यवसाय आहे . ' आणि आबांनी जोरात काठी आदळली, दचकून कावळे सरांचं भाषण बंद झालं. पुढं घारे ' पुतण्याने आणि त्याच्या बायकोने मुलाला इंग्रजी शाळेत घालायचा विचार केलाय, तेच सांगण्यासाठी तो आलाय , मला काही ते पटलं नाही, सगळे जण करतायत म्हणून आपण पण तसं करायचं का ?मेंढरासारखे वागायचेच काय ? असं त्याला समजावून सांगत होतो .
गोडबोले आणि शेडगे एकदम म्हणाले ' घालू दे की त्याला इंग्रजी शाळेत ,  अडचण काय आहे ?'..

आबा  ' घारेंचं बराबर हाय , कायवो घारे तुमच्या पुतण्या आनी सून किती शिकलेत ? त्याना इंग्रजी येतं का ?नातवाला घरात कोन शिकवनार ? उगाच पैशाची नासाडी '.

घोलपसाहेब म्हणाले '  अगदी बरोबर बोलला आबा . कसं आहे की, हल्ली एकानं काही केलं तर बाकी सगळे मेंढरागतं त्याच्या प्रमाणे करायचं याची फॅशनच आलीय. घारेंचा पुतण्या खेड्यात राहतोय. दोघे नवरा बायको मराठीतून शिकलेले. पहिली दुसरी पर्यंत ठीक आहे. पुढं काय ? प्रत्येक विध्यार्थ्यांकडं शाळेने शिक्षकाने जातीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा ठेवणंच गैर आहे. घरात अभ्यास घ्यावा लागतोच, तो कोण घेणार ? शिवाय घरातील सर्व मराठीत बोलणार, चुकून एखादा इंग्लिश शब्द कानावर पडायची मुश्किल, शिकवायचं तर दूरच. आणि त्याही पेक्षा आपण आपल्या मातृभाषेत विचार करतो, मराठीत विचार करतो, बंगाली माणूस बंगाली भाषेत, तर इंग्रज इंग्लिश मध्ये. आपला पोरगा मराठीत विचार करणार, त्याचं इंग्लिश मध्ये मनातल्या मनात भाषांतर करणार आणि मग इंग्लिश बोलणार, हे किती अवघड आहे हे लक्षातच येत नाही लोकांच्या . बरं एव्हडं व्याप करून , तिप्पट चौपट खर्च करून त्याचं अपेक्षित फळ मिळते का ? माझं स्पष्ट मत नाही असे आहे.
त्याला चांगल्या मराठी शाळेत घाला , सगळे विषय त्याला समजून घेऊ द्या, घरी आपल्यालाही लक्ष देता येईल, बरोबर आहे का मंडळी ?  '
पुढं ' हल्ली जो तो कश्याच्या पण मागं लागतोय, उदा. आणि ती फाटकी जीन प्यांट. चांगली पॅन्ट घ्यायची  आणि मग फाडायची. एक एक छेद असलेली जीन्स घालतोय , तर दुसरा दोन छेद असलेली तर तिसरा तीन छेद असलेली पॅन्ट घालतोय,  ह्याला फॅशन म्हणायचं ?. एकानं घातली की लागली सगळी लेंढारं त्याच्या मागे. जस्ट हॉरीबल,, आय जस्ट कान्ट इमाजीन , काय चाललंय हे...
आबा म्हणाले ' अक्षी बराबर बोलला बगा सायेब, अवो चार दिसाच्या मागं, म्या शेतात होतु. एक छलपाट पोरगं आलं, त्याचा अवतार बगून मला कसं तरीच झालं. पिवळा शर्ट आनी गुढघ्यावर फाटलेली पॅन्ट. डोक्याला बुचडयासारखे केस, डोळ्यावर धा रंगाचा चष्मा.
रानात म्या एकलाच हुतो, पांडा ( आबांचा मोठा मुलगा ) कसल्यातरी कार्यक्रमाला गेलता. कुठल्या तरी कंपनीचा माणूस व्हता त्यो. लै काय बाय सांगत व्हता. मी गप कान पाडून त्येच्या अवतारकडं बगत बसलू. त्याच बोलुन झालं. म्या ईचारलं ' सायेब ,  कंपनी काय हजरी , पगार बिगार देती का न्हाय ?. मोठया ऐटीत त्यानं सांगितलं मग भरपूर पगार देते आमची कंपनी. मंग म्या ईचारलं ' मंग अशी कापडं का घातलीस ? ह्यो बायमाणसाच्या चोळीसारका अंगाला घट्ट शर्ट , ही फाटकी प्यांट, पायात शिल्पर , अरं कसला अवतार केलास म्हणायचा ?'
पोरगं जे xxx ला पाय लावून पळालं म्हणता ' असं म्हणून आबा आणि आमच्या सकट सगळं हॉटेल हसायला लागले. त्यात दोन तीन कॉलेजच्या फाटक्या जीन्स घातलेल्या कॉलेज वीरांनी  हळूच तिथून पोबारा केला.
त्यो इंदुरीकर महाराज म्हनतो ते काय खोटं न्हाय. मध्येच इंदोरीकर महाराज कुठून उगवले हे काही आम्हाला कळेना. आबाच पुढं म्हणाले 'इंदोरीकर म्हनतात ' ती केसांची कसली स्टाईल म्हणायची , अवो दोनी कानाच्या बाजूनं रान नांगरलेल्या सारकं डोकं भादरलेलं , एका बाजूला लसणाचा वापा आनी दुसऱ्या बाजूला कांद्याचा वापा , आनी वरती भोंगळा ' इथं हसून हसून सगळ्यांच्या पोटात दुखायला लागले. अजून दोन तीन मुलं हॉटेलातून गायब झाली.
कावळे सरांनी बऱ्याच वेळानं तोंड उघडलं ' अबसोलुटली करेक्ट , पटलं बुवा आपल्याला, आणि  हो , अमुक दुकानात सेलचा फंडा, म्हणे दोन ड्रेस घ्या आणि त्यावर तीन फुकट घ्या , किती गर्दी तिथं, युसलेस ..' पण तुम्ही तिथं काय करत होता असं विचारताचं ' अहो बायको घेऊन गेली. बायकोला नाही म्हणायची टाप आहे का कुणाची ?  
अहो साड्यांचा ढीग पडलेला होता, एक बाई साडी हिकडून ओढतीय, तर दुसरी दुसऱ्या बाजूने, भांडणं व्हायची वेळ आली होती, बायकोनं चांगल्या दहा साड्या घेतल्या. पाच हजाराना लागला चुना '
घोर चिंतेत पडलेले घारे  चुना हा शब्द ऐकताच भानावर आले आणि चटदीशी त्यांनी तंबाखूचुन्याची डबी कावळे सरांच्या समोर धरली. तंबाखू दर्शनाने त्यांचं दुःख कमी झाल्याचे आम्हाला जाणवलं .

शेवटी घोलप साहेब ' थोडक्यात प्रत्येकजण दिखाऊ पणाच्या मागं लागलाय मग ते शिक्षण असुदे नाहीतरी गाडीघोडा असुदे, माझा मुलगा यावं शाळेत आहे, मी सिंगापूरला जाऊन यायचं म्हणतोय, शेजाऱ्यांनं गाडी घेतली की झाली यांची तयारी गाडी घ्यायची, मी इतकं भारी इंटेरिअर केलं आणि मी त्यांव केलं.राजकारण हा विषय वेगळा तिथं पण  सगळा मेंढरांचा बाजार . मेंढरं परवडली , ती निदान मालकाच्या सूचनेनुसार तरी चालतात. पण माणूस विचारच करायचा बंद झालाय. ना कुणाची भीती ना कुणाचा धाक. हे विश्व ज्याच्या जोरावर चाललंय, त्या देवाला पाया पडलं की झालं . आपण मंदिरात देवाच्या पायाशी कायतरी मनापासून वाहायचं याचा सोयीस्कर अर्थ काढून देवाला दहा रुपये दान करायचे आणि शंभर मागायचे असं झालंय हल्ली. विकारांच्या अहारी गेलाय माणूस ..
दिवसेंदिवस परिस्थिती अवघड होत चाललीय..


शिरीष उमरे,नवी मुंबई.
विषयाचे शीर्षक वाचताच आठवले मेंढरांचे लांबच लांब कळप खासकरुन रस्ता ओलांडतांना डोके खाली करुन एकामागोमाग एक चिपकुन लगबगीने चालणारी मेंढरे....

एक कॉर्टुन फील्म आठवली ज्यात सगळी मेंढरे  पटांगणात जमलेली असतात व माइकवर त्यांचा नेता (मेंढीची लोकर ओढलेला लांडगा) त्यांना सांगत असतो की ह्या हीवाळ्यात सगळ्याना थंडीपासुन बचावासाठी ब्लँकेट दिल्या जातील. सगळी मेंढरे खुष होतात. नंतर त्यांच्याच अंगावरची लोकर काढुन त्यांना पातळशी ब्लँकेट दीली जातात.

आपणही काय करत असतो वेगळे ?!! इलेक्शनच्या वेळी नेते लोक मोठीमोठी आश्वासने देतात व आपण खुष होतो. मग टॅक्स च्या पैश्यातुन काही तुकडे आपल्यासमोर फेकतात व स्वत: केक खातात.

मेंढरांच्या कळपासोबत काही रानटी कुत्रे असतात. मेंढरांना वाटते की लांडग्यांपासुन बचाव करण्यासाठी आहेत ही कुत्री पण खरेतर कळपापासुन कोणी पळुन जाऊ नये म्हणुन ठेवली असतात धनगराने...

आपलही सेम आहे की हो... पोलीस आपल्या रक्षणासाठी आहेत असे वाटते पण ते गुलाम असतात सरकारचे. कोणी अन्यायाविरोधात आंदोलने केली तर त्यांच्यावर लाठीमार करणे, गोळीबार करणे असल्या कामासाठी त्यांची नेमणुक होते की काय असे वाटते.

मेंढरांना स्वत:चे मत नसते. मेंढपाळ लाठीने जी दिशा देईल तिकडे चालणे, जिथे चरायला सांगितले तिथे चरणे व जिथे राहायला सांगितले तिथे राहणे आणि मालकाला दुध, लोकर व कधीकधी स्वत:चे मास देणे ह्यालाच ती जीवन समजतात. फारसे डोके लावत नाही...

माफ करा पण काही साम्य वाटते का त्यांच्यात व आपल्यात ?

जे शिकवले ते शिकायचे... जेवढे सांगितले तेवढे काम करायचे.. सकाळी कामावर जायचे... संध्याकाळी परत यायचे... कुत्र्याच्या व लांडग्याच्या भितीने एकत्र राहायचे... टॅक्स इमानदारीने भरायचा. कधीकधी देशासाठी जीव द्यायचा... वेगळे स्वप्न बघण्याचा गुन्हा केला तर कत्तलखाना आहेच. पळुन जाण्याचा कींवा कळपाचा नियम मोडला तर मार आहेच...

ही लोकशाही आहे की मेंढरांची लांडगेशाही ?? जागृत व्हा मित्रांनो ...मेंढरे नाही .. चांगला माणुस बना ... योग्य नेता निवडा.

किशोर शेळके. लोणंद,सातारा.
मला माणसात अन् मेंढरात साम्य दिसत नाही. माझ्या मते, मेंढरं जरा बरी, पण माणूस नितीमत्तेला सोडूनच वागतो....

      परवा काही कामानिमित्त पुण्याला गेलो होतो. पुण्याच्या बाहेरच टोलनाक्यावर गर्दी असल्याने आमची गाडी रांगेतच उभी होती. समोर चार गाड्या असल्या कारणाने मी माझी गाडी बंद केली, आणि थोडं बाहेर डोकावून पाहिलं, पलिकडच्या रांगेत एक कार उभी होती. रांगेतच समोर दुसरी कार उभी होती. पुढिल कार थोडी पूढे गेली आता दोन्ही कारच्या मध्ये थोडी जागा होती. पाठीमागच्या बाजूने बीएमडब्ल्यू ची महागडी कार आली आणि दोन्ही कारच्या मधे घुसवली. पण घुसवत असताना मागच्या कारला थोडी धडक बसली. धडकेचे नुकसान वेगळेच, पण अर्धा पाऊण तास त्यांचे भांडण बघून सगळं ट्रॅफिक जॅम झालं. आता या सुशिक्षित वर्गाची ही बोंब असेल, तर यांच्यापेक्षा मेंढरं बरीच ना!. निदान मेंढरांचा कळप व्यवस्थित, लयात, एका रेषेत चालतो. माणसांसाठी नियम असतात, तरी त्यांच्याकडून पाळले जात नाहीत. आणि मेंढरांसाठी नसतात, पण वागतात मात्र नियमबद्ध.

        हे एक उदाहरण झाले, पण हे मानवी वागणं खरंच मेंढरांपेक्षा खालच्या दर्जाचे आहे. आपण स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेतो आणि क्षुल्लक कारणातही आपण आपला अडाणीपणा दाखवतो. आणि हा सुशिक्षितमधला अडाणीपणा फक्त रस्त्यापुरता मर्यादित नाही. प्रत्येक क्षेत्रामधे हीच परिस्थिती आहे. मेंढरांचं दिवसभराचा दिनक्रम ठरलेला असतो. हा दिनक्रम मेंढरांचा मालक ठरवतो. पण माणसाचा दिनक्रम, आठवड्याचे सहा दिवस जरी बांधील असला तरी सातव्या दिवशी स्वतःच राजा. मेंढरांच्या मनात असो वा नसो, मालक ठरवेल तिथे दिवसभर चरावे लागते, पण माणसाच्या थोडं तरी काही मनाविरुद्ध घडलं की त्यांची चिडचिड सुरू झाली म्हणून समजा.

      याचे विश्लेषण करताना 'एकटा जीव सदाशिव' या चित्रपटातील दादा कोंडकेचे हे गाणे आठवतंय.

 माणसा परास मेंढरं बरी
त्याला खायाला दिलं तर खातंय
न्हाय दिलं तर उपाशी राहतंय
दिलं हाकलून माघारी येतंय
काय बोलत न्हाय, काय मागत न्हाय, जीव लावतंय माणसावरी.

         आणि माणसांत वरिल एक तरी गुण दिसतो का? माणूस उपाशी राहू शकतो का? का स्वतःचा स्वार्थ साधण्याखेरीज जीव लावतो कुणावर?

         याचं सुंदर उदाहरण म्हणजे 1987 ला प्रदर्शित झालेला निळू फुले आणि सरला येवलेकर यांचा मराठी सिनेमा 'माणसा परीस मेंढरं बरी'. सावकारकीचा माज असलेल्या लांडग्यानं समाजरूपी मेंढरांना कसं चिरडलं हे प्रत्यक्ष अनुभवलेलं, हा सिनेमा खय्राखुय्रा जिवनात घडत असलेल्या अन्यायाला उजाळा देतो. आणि शेवटी हे म्हणावंच लागतं की, 'माणसा परी मेंढरं बरी'....


शीतल शिंदे.दहिवडी ,सातारा .
माणसा पेक्षा  मेंढरे केव्ह्याही बरीच म्हणावे लागतील .
माणसांपेक्षा मेंढरांत चांगले दोनच गुण आहेत ते म्हणजे एकिने राहणे आणी  दुसरा म्हणजे कोणाला ईजा न पोहोचवणे .
  उलट लोक स्वतःचे  पोट भरण्यासाठी दुसऱ्याच्या पोटावर पाय देतात .एकमेकांची माथी भडकवतात .
   स्वतःच्या बुद्धीचा वापर न करता दुसऱ्यांचे क्रुत्य करायचे , त्यांचे तरी काय चूकतेय म्हणा आपली रुढी परम्परा .वेगळे काही केले की धर्म बुडेल .धर्म काय घरात खायला आणून दे तोय काय ?  बाप दादांनी केले तेच मुलांनी , नातवंडानी करायचे .
  
कोणी काय सांगितले की छो  कुत्र्या 🐰उभे कान .निवडणुकित  चार पैसे कोणी फेकले की त्याच्या मागे पळायचे .मग त्या पार्टीने पाच वर्षे किती का अन्याय करेना .आपल्याला काय पैसे मिळाले की बास .मत विकले सम्पला विषय म्होरक्या म्हणेल✌ ती पूर्व दिशा .ही आपली मेण्ढक 🐑🐑  व्रुत्ती .स्वतःचे अस्तित्व विकून टाकून आपणच आपल्या पुढच्या पिढीला भ्रष्ट आणी लाचार बनवून समाजामध्ये प्रामाणिकपणे भ्रष्टाचार करणारे नेते तयार करायला हातभार लावायचा .

मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत पण तेच .त्यांचे मत , आवड - निवड जाणून न घेता शेजाऱ्यांनी मुलाला जे शिक्षण दिले तेच आपण पण दयायचे .आणी मग जबरदस्तीने ईछ्या नसताना  लादलेल्या गोष्टीं मुले ताण - तणाव निर्माण होवून मानसिक द्रुष्ट्या खचीकरण होते याकडे पालकांनी लक्ष्य देणे गरजेचे आहे.

अलीकडे मुलांची  हेअर स्टायल पहिली तर मेंढीच्या पाठीवर काढली जाणारी लोकरीची डिज़ाइन आठवते.जसे गझणी मधे डोक्याला ओरबडलेले हेअर कट आहे तसे मेंढी च्या पाठीवर डिज़ाइन , गोंडे राखलेले असतात. मेंढीचा आदर्श्य घेण्यापेक्षा एखादया  महापुरुषांचा आदर्श घेवून त्यांच्या विचारांचा आदर्श घेतलेला केव्हाही चांगलेच.

सर्व बाबतीत आपल्याला हेच पहायला मिळते .एखादया बाबांनी , गुरुंनी काही सांगितले की त्यांच्या मागे पळायचे .त्यांनी दिलेले मल मूत्राचे पाणी प्रसाद म्हणून प्यायचे .लगेच अंध विश्वास ठेवायचा .हात पाय न हलवता बघू बरे घरात पैसे येतात काय 🤔? पण विचार कोण करतो .विरोध केला तर कोप होईल आणी धर्म बुडेल .धर्माच्या नावाखाली हातात कटोरि का घ्यायचे  होईना .सर्वानुमते काय व्हायचे ते होईल .अधोगतीची
पाऊले चालीती ....   . ...वाट .

      आपला एकच देश असा आहे की तेथे देवाला दुधाने आंघोळ घातली जाते आणी माणसांना मूत्र प्यायला लावला जातो .
  मेंढरे असे तर काही करत नाहीत ! !


अनिल गोडबोले,सोलापूर.
आता गम्मत अशी आहे की साम्यता लिहायला बसल की विरोधी गोष्टी आठवायला लागतात. पण साम्यता आहे ही शरमेची बाब आहे की अभिमानाची हेच आम्हाला कळत नाही.

मेंढरे एका लाईन ने चालतात. एका मागोमाग जातात. एकत्र खड्यात पडतात. त्या प्रमाणे प्रगत असलेले आपण सुद्धा कोणाच्या तरी सांगण्यावरून "असेल बरोबर तो म्हणतोय तर.. आपल्याला काय करायचं!" या विचारांनी अंधानुकरण करून मेंढरे आहोत हे सिद्ध करतो.

मेंढरे झाडपाला खातात आणि मालकाला आपली लोकर देऊन टाकतात. त्या बदल्यात त्या फार काही मिळवत नाहीत पण मालक मात्र त्यावर भरपूर कमाई करतो... त्या प्रमाणे आपल्या कडे काहीजण सेवा करतात आणि त्यांचे मालक त्यांना आयुष्यभर वापरून घेतात.. पूर्ण सुविधा आणि सन्मान न देता

मेंढरे कळपात राहतात आणि तिथे सुरक्षित समजतात आता मानासाविषयी फार काही बोलायची गरज आहे असे मला।वाटत नाही.

मेंढरे शेतात लेंडुक टाकण्यासाठज चरवली जातात.. म्हणजे यांची किंमत तेवढीच वर या कामाचा काही जणांना फार आनंद वाटतो.

मेंढरे जास्त किमतीला विकली जातात आणि एका काळापातून दुसऱ्या काळापात जातात... माणसात देखील शिकून कम्पनीत नोकरी करणार्यांना वेगळी वागणूक नसते..

असो... काहीजण धडपडतात, बाजूला पडतात पण सतत वाघाची नजर यांच्या सारख्या वेगळ्या झालेल्या पिल्लावर असते.. काळ झडप घालून गडप करून टाकतो.. (स्वतंत्र निर्णय घेणाऱ्यांची अवस्था)

तर.... मेंढरे बनायचं की माणूस हे आपणच ठरवू.. नाहीतर दादा कोंडके म्हणूनच गेलेत.
"सांगून गेली ज्ञानेश्वरी.. माणसा परास मेंढरं बरी!"


हरीभाऊ यादव,मंगळवेढा,सोलापूर.
मेंढरे आणि आम्ही,साम्यता हा विषय जेव्हां वाचला, तेव्हां मला माझ्या लहानपणीची दिवाळी आठवली, आडीच एक हजार लोकसंख्या असलेल, माण नदीच्या काठावरील मारापूर हे खेड, सगळे सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे व्हायचे. दिवाळीच्या पाडव्यादिवशी मेंढरांचा एक मजेदार कार्यक्रम असायचा, गावातील दोन चार जणांचे मेंढरांचे कळप एकत्र करुन वाजत गाजत गावात आणले जायचे, गावचे ग्रामदैवत खंडोबाच्या मंदीराच्या कडेनी त्यामधील ज्या मेंढीला आगोदर प्रशिक्षण दिलेले असायचे, ती मेंढी सगळ्या मेंढ्यांच्या पुढे असायची व तिच्या पुढे  भाकरीचा एक तुकडा हातात घेवून मेढपाळ मंदीराला प्रदक्षिणा घालत पळायला सुरुवात करायचा.
पुढची मेंढी भाकरीसाठी पळायची,  तिच्या मागे दुसरी मेंढी पळायची, व एक एक करत सगळ्या मेंढ्या पळायच्या व ज्यावेळी शेवटच्या मेंढीजवळ मेढपाळ पोहोचायचा, त्यावेळी तो हळूच बाजूला निघायचा, परंतू मेंढ्या मात्र एका मागून एक पळत राहायच्या, गोल रिंगन तयार झाल्यामुळे तो खेळ बघायला खुप मजा वाटायची, पण त्याबरोबर एक विचार मनात यायचा की मेंढ्या एवढ्या अनुकरणप्रीय कशा असू शकतात. परंतू पुढे महाविद्यालयामद्धे शिक्षण शिक्षण घेत असताना, कांही व्यावसायिक मंडळी तरुण विद्यार्थ्यांना  व्यसनाच्या विळख्यात अडकवून बाजूला निघायचे, व एकामागून एक तरुण कोणताही विचार न करता, व्यसनात आडकत जायचे, हे पाहताना माझ्या डोळ्यासमोर मंदीराच्या कडेनी पळनारी मेढ्यांची रांग दिसू लागली,व माणसात आणि मेंढरात फार मोठ साम्य असल्याची प्रचीती आली.

(यातील सर्व छायाचित्रे इंटरनेटवरून घेतलेली आहेत.)

ऑनलाइन मार्केट.... काळाची गरज की जुन्या मार्केटचे मरण.


ऑनलाइन मार्केट.... काळाची गरज की जुन्या मार्केटचे मरण.



स्पर्धेच युग आणि सतत अपडेट होणारे तंत्रज्ञान यातूनच जन्म झाला ONLINE मार्केट चा. याच विषयावर विचार तरुणाई व्यक्त झाले अगदी बिनदास्त.

1)शिरीष उमरे, नवी मुंबई.
2)डॉ. विजयसिंह पाटील, कराड.
3)निखिल खोडे, ठाणे.
4)दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे,वाशिम.
5)गणेश पिस, (एम्.एसी.ऍग्री).



शिरीष उमरे,
नवी मुंबई.

मला आठवत की १९९८-९९ मध्ये मी आयबीएम चा ईकॉमर्स च्या साफ्टवेअर कोर्स चा मार्केटींग मॅनेजर होतो तेंव्हाच या वादळाची पुर्व कल्पना आली होती. त्यावेळी आम्ही नागपुरच्या आठरस्ता चौकातील पुर्ती सुपरमार्केट ची वेबसाइट लाँच केली होती. परदेशात नोकरी करणारी मुले कॅटलॉग बघुन ऑनलाइन ऑर्डर द्यायची व त्यांच्या आईवडीलांना घरपोच डीलीव्हरी मिळायची. कीराणा च नव्हे तर वाढदिवसाची, दीवीळीची मिठाई व गुलाबाची फुले सुध्दा !! २००० मध्ये खुप गाजावाजा करुन ई-बिझनेस सुरु तर झाला पण पेमेंट गेटवे व लॉजीस्टीक्स सेक्टर रेडी नसल्याने पार कोसळला...
नंतर हळुहळु प्रगती करत मागील १८ वर्षात ह्याचे महाकाय रुप बघुन माणुस विस्मीत होतो. विश्वास बसणार नाही अशी परीकथाच जणु 🤗

दुख ह्या गोष्टीचे वाटते की जगाभरात सॉफ्टवेअर तज्ञ आपले पण ऑनलाइन मार्केट हे परकीयांचे !! 😒... अॅमॅझान ची लायब्ररी पासुन "ए टु झेड" ची प्रचंड झेप बघता आपण चकीत राहतो. जगाभरातल्या उत्तमातल्या उत्तम वस्तु अतिशय कमी कीमतीत एका आठवड्याच्या आत तुमच्या दारी सहीसलामत पोहचवण्याची कीमया साधुन ह्या कंपनीने आपले अबाधित साम्राज्य उभे केले.  सगळ्या पारंपारिक व्यावसायिकांचे धाबे दणाणुन टाकले.  काहींनी सपशेल शरणागती पत्करली तर काहींनी अनुकरण करुन बघितले. ह्यात गुगल तर अत्यावश्यक मित्र बनुन गेला. त्यातच स्वस्त स्मार्ट फोन व हायस्पीड इंटरनेट ने मार्केटच्या व्याख्याच बदलवुन टाकल्या. लहान उद्योजकांचे कंबरडे च मोडुन टाकले. बराच धुराळा उडालाय....

पण मला विश्वास आहे की अत्याधुनिक तंत्रज्ञान अंगिकारुन नविन मार्केटमधल्या संधीचे सोने करण्याची ताकद आपल्या युवांमधे आहे. अँड्राइड बेस अॅप विकसीत करण्यात भारत आघाडीवर आहे. त्यातुन लाखो स्टार्टअप वेंचर्स मागील पाच वर्षात सुरु झालेले आहेत. फीनिक्स सारखी परत झेप घेत आहे भारतीय उद्योजकता ... पुढील पाच वर्षे महत्वाची आहेत. मोठ्या कार्पोरेट पेक्षा सामान्य छोट्या उद्योजकासाठी प्रामाणिकपणे चांगली धोरणे राबवणारी शासनयंत्रणा हवी. तेंव्हाच हा बदल संभव आहे 🙏🏼😇
________________________________________________________________________________

डॉ. विजयसिंह पाटील, कराड.

तसा माझा ऑनलाईन खरेदीसाठीचा संबंध तीन वर्षांपासूनचा. त्यावेळी मी ऑनलाईन खरेदीबाबत थोडा साशंकच होतो. व्यायामाचे बूट घ्यायचे होते, भरपूर दुकाने हुडकली पण काही केल्या मला कुठलाच शूज पसंत पडेना. जुना शूज कधी जीव सोडेल याची ग्यारंटी नव्हती. मग कुणीतरी सुचवलं ' जरा ऑनलाईन साईट पहा '. मी जास्त अपेक्षा न ठेवता, ऑनलाईन साईट्स धुंडाळत बसलो. आणि पहिला आश्चर्याचा धक्का बसला. अबब किती व्हरायटी . एव्हडी व्हरायटी बघून माझे डोळेच फिरले. दुसरा धक्का बसला, तो त्यांच्या किमती बघून. विश्वासच बसेना, इतक्या कमी किमतीत इतका चांगला शूज ? ( त्यावेळी कसली तरी ऑफर चालू होती).हे काय डुप्लिकेट विकतात की काय अशी मनात शंका होतीच. ऑफर संपायला दोन तास उरलेले होते. तोपर्यंत मी पसंद केलेला शूज च्या ठिकाणी ' आऊट ऑफ स्टॉक ' असा शिक्का पडलेला दिसला. लगेच धाडस करून दुसऱ्या पसंतीच्या शूजची ऑर्डर करून मोकळा झालो. साधारण आठवड्यात शूज आला. प्याकिंगच एव्हडं सुंदर आणि नीटनेटकं होतं की, जणू त्यात सोनं नाणं भरलेलं आहे. मोठ्या कुतूहलाने काळजीपूर्वक उघडलं. मला पाहिजे होता तोच शूज होता, घालून बघितला आणि आश्चर्याचा तिसरा धक्का बसला. परफेक्ट फिटिंग. तरीही पुढं, हा किती टिकतोय याबाबत मनात अधूनमधून शंका टोच मारत होतीच. ( भरपूर टिकला, कंटाळा आल्यावर कामगाराला देऊनही टाकला, असो ).
एव्हाना माझा ऑनलाइन खरेदीवर पूर्ण विश्वास बसलेला होता.
थोडा काळ लोटला. एके दिवशी टीव्हीवर अमुक साईटवर सेल चालू असल्याची जाहिरात पहिली. निव्वळ वेळ घालवायचा म्हणून, ती साईट उघडली. पूर्वी फक्त शूज बघितले होते. आता सगळा खजिनाच पुढं. आवडेल तसं निवडत गेलो. ऑर्डर दिली. आलेल्या कपड्यात फक्त एक शर्ट मोठया साईजचा होता. तो परत पाठवला. आठवड्यात करेक्ट साईजचा शर्ट आला पण. आता मात्र मी पूर्ण ऑनलाईनचा भक्तच झालो होतो.

घराचं रिनोव्हेशन सुरू झालं होतं त्यावेळची गोष्ट . पडदे घेण्यासाठी बाजारपेठेत गेलो. एकतर व्हरायटी कमी त्यात मूलखाची जास्त किंमत. बघूया नंतर, असं मी बायकोच्या तीव्र विरोधाला न जुमानता तेथून काढता पाय घेतला. घरी आल्यावर सहज ऑनलाईन साईट वर पडदे पहायला लागलो. तर एकसे बढकर एक पडदे दिसू लागले. मापं माहीत होती. गुपचूप ( म्हणजे बायकोला कळू न देता )ऑर्डर दिली. चार दिवसात पडदे आले. ते बसवले पण. बायकोनं नाक मुरडलं,(तसंही ती मी केलेल्या कशालाही नाक मुरडत असते म्हणा ) पण मी त्याला दाद दिली नाही.( तसा मी फार धाडशी आहे हो !)..जसं शेजारीपाजार्यांनी आणि पाहुण्यांनी पडद्यांचं कौतुक केलं तसं कुठं बायको थंड झाली. मग आज एखादा शोपीस मागव , उद्या पायपूसणे मागव असा माझा रोजचा उद्योगच झाला.
एकदा का दोन तीनदा मात्र माझी चांगलीच फजिती झाली. एकदा स्वतात मिळतंय म्हणून जमिनीवर अंथरायचे म्याट मागवले. साधी सतरंजी आली हो.  खाली टाकून कसं दिसतंय हे बघत असताना, त्यावरच चहाचे चार थेंब पडले. परतही पाठवता येईना . पुढची करुण कहाणी सांगत बसत नाही.(सुजाण वाचकांना लक्षात आले असेलच. )
एकदा एक टी शर्ट मागवला. त्या वेळी नेमके घरात पाहुणे. मी मोठ्या अभिमानाने बॉक्स खोलून सगळ्यांना दाखवला. रंग कंपनी बरोबर होती , पण साईझ पाचवीतल्या मुलाचा होता .सगळेजण खो खो हसायला लागली. (एकानं तर मला ' तुझी बुद्दी पाचवीतल्या मुलासारखी आहे हे त्यांना कसं काय कळले बुवा, असा खोचक टोमणा मारला .).
फोटोत पाहून एक मारबलचा हत्ती मागवला. फोटोवरून हत्तीची उंची फूटभर असावी असा माझा अंदाज. प्रत्यक्षात आलेला हत्ती दीड इंचाचा. मलाचं हसावं की रडावं ते कळेना.मात्र बायकोनं बोलून मला रडवलं..

तरीही, एकंदरीत ऑनलाईन खरेदीवर मी तरी खुश आहे.

मला आठवतंय, मी मेडिकलला 84 साली गेलो. त्याकाळी घरची परिस्थिती यथातथाच होती. साधे तीन चार ड्रेस होते. बरोबर च्या काही मित्रांचे छान छान ड्रेस पाहून थोडी असूया ही वाटायचीच. वैश्यम्य वाटायचं. त्याकाळात ' डबल बुल आणि चिराग दिन ' हे नामवंत शर्टाचे ब्रँड आणि बफेलो, रँग्लर हे जीन्स चे फेमस ब्रँड.
असेच पैसे साठल्यावर ठरवलं की चला आपणही एक वरील पैकी एका ब्रॅंडचा शर्ट घ्यावा. आख्या मिरज सांगलीत दुकान सापडलं नाही. नंतर मित्रानेच सांगितले ' अरे या ब्रॅंडच दुकान फक्त मुंबईत आहे, दुसरीकडे कुठंही याची शाखा नाही '. हे ऐकताच मी जरा हिरमुसलो. पण करतो काय ? काळाच्या ओघात तीव्र स्पर्ध्ये मूळं आणि हेकेखोर प्रवृत्ती मुळे हे ब्रँड दिसेनासे झाले.
पुढं कमवायला लागल्या वर, पीटर इंग्लंड, लुई फिलिप्स, अँरो , हे ब्रँड फार फेमस झाले. त्यांच्याही शोरूम्स मोठया शहरातच.
नंतर काही कालावधीने आंतरराष्ट्रीय ब्रँड्स जसे की, पोलो, बेनीटन , नायके, पुमा, आदिदास हे बाजारात आले. तरीही त्यांची दुकाने जिल्ह्याच्या ठिकाणीच असायची, अजूनही तीच परिस्थिती आहे. .
दुकानात/मॉलमध्ये जाऊन खरेदी करणे हे एक दिव्य काम आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. एकतर दुकानापर्यंत पोहोचायला वाढत्या रहदारीमुळे फार वेळ लागतो. माझ्या आवडीचा रंग आहे पण साईझ नाही तर साईझ बरोबर आहे पण रंग भलताचं, असा प्रकार. चुकून पसंद पडला तर बार्गेनिंग( जे मला अजिबात जमत नाही) करायची भानगड. बार्गेनिंग नाही केलं तर परत बायकोचे टोमणे खायला लागतात. ( मॉल मध्ये ती भानगड नसते हे एक चांगली गोष्ट )..
बरं बायकांच्या खरेदीत आपल्याला शुन्य किंमत असते हे जगजाहीर आहे. मी शक्यतो त्या भानगडीत पडत नाही.

मागच्या पंधरवड्यात एक बातमी वाचली. दिल्लीत आणि मीरत मध्ये ऑनलाईनच्यावर धाड पडली म्हणून. प्रचंड डुप्लिकेट माल पकडला. असं होऊ शकते. पण ही शक्यता दुकानातही असू शकतेच की..
सध्या जग हे एक मोठं खेडं झालंय असं म्हणतात. लोकांचा सय्यम फार कमी झालाय. झटकीपट सगळं पाहिजे असते. वेळच नाही म्हणतात. ( हे फार बिजी लोक असणार असा माझा समज आहे ).
भारतातील स्थिती पहिली तर किमान सत्तर टक्के लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. त्यांचा खरेदीचा कार्यक्रम, यात्रा आणि दिवाळी. ओळखीचा दुकानदार उधारी ठेवतो. ती सोय ऑनलाइन खरेदीत नाही.
माझ्या मते, अजून दहा वर्षे तरी दुकानदारांना अडचण नाही . (त्यांच्या धंद्यावर किमान तीस टक्के तरी फरक पडलाय हे सत्य )..
ऑनलाईनचं प्रस्थ दिवसेंदिवस वाढत जाणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हळूहळू ते सर्व बाजारपेठ व्यापणार हे निश्चितच.
हे ओळखून दुकानदारांनी वेळीच सुधारणा केली नाही तर एकंदरीतच परिस्थिती वाईट होऊ शकते...
________________________________________________________________________________

निखिल खोडे, ठाणे.

             ऑनलाईन मार्केटने जवळपास सगळ्याच लोकांना आकर्षित केले आहे. त्यामागची कारणे आहेत भरगच्च मिळणारी सुट, डिस्काउंट कुपन, होम डिलव्हरी, खुप सारे पर्याय, कॅश बॅक मिळणे, आकर्षक पॅकिंग, खरेदी करण्यासाठी वाचणारा वेळ, वस्तूंच्या किमती तुलना करण्याचे स्वातंत्र्य, मोठ मोठे अभिनेते/अभिनेत्या यांच्या कडून जाहिराती करून घेऊन ऑनलाईन विक्रते जाहिरातीद्वारे त्यांच्या वस्तूंचे आपल्या मनामध्ये घर करतात.

                सद्यस्थिती मध्ये आपण काही खरेदी करायचा म्हटल की ऑनलाईन खरेदी करायचा विचार करतो. नवनवीन स्कीम, नवीन आकर्षक वस्तु या सर्व गोष्टी आपल्याला ऑनलाईन खरेदीच्या मोहात पाडतात. यामध्ये नुकसान होते ते फक्त छोटेे व्यावसायिक आणि व्यापारी यांचं. छोटे व्यावसायिक आपला व्यवसाय डिजिटल मार्केटिंग सोबत टायअप करून होणारे नुकसान टाळू शकतो. डिजिटल मार्केट मध्ये त्याला जगभरात व्यवसाय करण्यासाठी मार्केट उपलब्ध असते. 

               याचेच एक उदाहरण म्हणून सांगतो आपल्या कडे छोट रेस्टॉरंट असेल तर आपण zomato/swiggy/foodpanda फूड डिलीव्हरी ऍप आहे ज्यामध्ये आपण कमीत कमी गुंतवणूक करून बिझनेस मिळवू शकतो. घरून सुद्धा आपण अश्या ऍपद्वारे व्यवसाय करू शकतो.

               ऑनलाईन मार्केट काळाची गरज असली तरी, त्याचे तोटे भरपूर आहे वस्तु हाताळण्याचा अभाव, ज्या वस्तू ची आपण ऑर्डर केली ती वस्तु कधीकधी न मिळणे, किमतीमध्ये तफावत इत्यादी गोष्टीची खात्री करून ऑनलाईन खरेदी करावी. शक्य झाल्यास छोटे व्यासायिक, व्यापारी यांच्याकडुन वस्तूची खरेदी करा जेणेकरून त्यांना व्यवसाय मिळेल.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे,
वाशिम.

अरे आज सेल लागणार आहे फ्लिपकार्ट " बिग बिलियन डे "चा मला माझ्या मित्राने सांगितले तसा मी पण फ्लिपकार्ट वर नेहमीचाच ग्राहक आहे पण सतत ऑनलाईन राहत नसल्याने मला माहिती नवत...

ऑनलाईन शॉपिंग केली सेल होता १० ते १४ ऑक्टोबर पर्यंत बापा बपा काय त्या ऑफर्स काय ते ब्रँड्स डोळे आणि डोकं दोन्ही पण फिर्तयय डेबिट कार्ड ल १०% डिस्काउंट आणि 5000 च्यां खरेदीवर एक्स्ट्रा डिस्काउंट 5 टक्के... अश्या ऑफर्स असल्यावर मग काय खरेदी होणारच की...पण अश्या ऑफर अपल्ये जुने मार्केट नाही ना देत राव...आणि जरी देत असतील तरी आपल्याला जी वस्तू पाहिजेत ती वस्तू एकाच दुकादारांकडून मिळेल याची काय ग्यारंटी...पण ऑनलाईन मार्केट मध्ये एका जागी सगळं भेटत...

आणखी खरेदी करताना कसली तरी क्विझ होती आणि 1 लाख जिंकायची संधी...1 लाख बर का... लालच येणार सहजाच... खेळलो ती क्विझ पॉईंट कमी मिळाले पण जनरल नॉलेज ची क्विझ अर्थातच वाचन अस्त अफाट तर जिंकलो असतो...अशी क्विझ कोणता दुंकांदर आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी घेतो हो आपल्याकडे? नाही ना...मग मरण पक्क की!

खरेदी केली वस्तू मिळाली ती परत करण्यासाठी 10 दिवसाचा रिटर्न पेरियोड मिळतो वस्तू खराब, पसंत नसणे, ई करणं हा आता बोला पण इथ घरी येऊन वस्तू घेऊन जातात आणि पूर्ण किँमत परत मिळते दुकादार ती वस्तू बदलून देण्याच्या मागे असतो...

हे पण खरं आहे ऑनलाईन मार्केट हे सणा - सुदिताच ऑफर्स देतात...आता दिवाळी पण आली आहे परत ऑफर्...करा खरेदी ग्राहकांनो...

काय वाटते? ऑनलाईन शॉपिंग/मार्केट बद्दल काळाची गरज...हो आहे काळाची गरज वाढणाऱ्या गरजा साठी... लोकसंख्या अफाट त्यांच्यासाठी...आणखी काही आठवत नाही राव पण काळाची गरज आहेच "ऑनलाईन मार्केट."

________________________________________________________________________________

गणेश पिस, (एम्.एसी.ऍग्री).

                   परवाची गोष्ट दिवस मावळण्याची वेळ होती टीव्ही वर बातम्या पाहत बसलो होतो आणि अचानक ब्रेकींग न्युज आली की डॉलरच्या तुलनेत आज पण भारतीय रुपया घसरला. ऐकून वाईट वाटले पण घसरला म्हणजे काय झालं ते मात्र समजलं नाही आणि त्यानंतर बातमी आली की अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन खरेदी विक्री करणाऱ्या अमेरिकी कंपण्यानी दिवाळी बंपर सेल सुरू केलाय आणि घसघशीत सूट मिळतेय. जेवढं रुपया घसरला म्हणून वाईट वाटले त्याच्या दहा पट आनंद झाला का तर 40-50% सूट मिळतेय.सुई पासून ते टीव्ही फ्रीज पर्यंत सूट. मनात विचार आला की कमी किमतीत मिळतेय तर मागवावे काहीतरी.पुन्हा त्यामध्ये ऑनलाईन पैसे भरून डिजिटल इंडिया-कॅशलेस इंडियाला हातभार लागेल तेवढाच.ऑर्डर करता करता मनात विचार आला  तो म्हणजे शेजारच्या काका आणि काकूंचा कारण काका एक  स्टेशनरी दुकान चालवतात आणि काकू दिवाळीच्या निमित्ताने रांगोळी,आकाशदिवे,पणत्या विकतात.त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो.आज भारतामध्ये कितीतरी कुटुंब आहेत की ज्यांचा उदरनिर्वाह दिवाळी,दसरा,रमजान ईद यासारख्या सणामुळे होतो दिवाळीमुळे अश्या लहान लहान व्यवसाय करणारीची दिवाळी साजरी होते. विचार करता करता डोकं विचारांनी भरले होते सुचत नव्हते काय कराव
             शेवटी ठरवले की काही खरेदी करायची असेल ते दुकानातून खरेदी करू कारण सर्व बाजूनी विचार केला असता अस वाटले की दुकानातून खरेदी केली तर तो जो पैसा आहे तो आपल्याच देशात राहील आणि लहान व्यवसायिक मोठे होण्यास मदत होईल आणि जर ऑनलाईन खरेदी केली तर सर्व पैसा आणि त्याच्यातून मिळणारा फायदा परदेशातील व्यवसायिकांना होईल.आणि जर  याच ऑनलाईन खरेदी-विक्रीवर जर मर्यादा आली तर आपल्या रुपयांची घसरण पण थांबेल नि आपली अर्थव्यवस्था टिकेल हेच ऑनलाईन मार्केट भारतीय अर्थव्यवस्थेला लागलेली कीड आहे आणि जर आपला रुपया वाचवायचा असेल तर हे थांबवले पाहिजे. किरकोळ सूट देत आहेत म्हणून बळी ना पडता जर 1₹=75$ आहे तर 75$=1₹ का नाही होऊ शकत? म्हणून ऑनलाईन मार्केट थांबवा नि जुन्या मार्केट वाचवा

________________________________________________________________________________
शीतल शिंदे - 
दहिवडी  जि .सातारा .

    ऑनलाइन मार्केटिंग हे घरबसल्या शॉपिंग करण्याचे साधन आहे .ज्यांना खरच वेळ नाही अश्या लोकांसाठी चांगले माध्यम आहे .शिवाय चांगल्या पद्धतीने सेवा पुरवल्या जातात .रीप्लेस सुद्धा करता येते .मात्र ही काळाची गरज झाली असली तरी जुन्या मार्केटला वाईट दिवस यायला लागलेत .असेही नाही म्हणता येणार कारण तोही एक व्यापारच आहे .फक्त स्पर्धक वाढलेत .मला सांगा ऑनलाईन एवढ्या छान , स्वस्त , परवडणाऱ्या मिळत असतील तर जुने व्यापारी किती पटीने फायदा मिळवत असतील .

मात्र कोणतीही गोष्ट , सवय लागेपर्यंत कमी किंमतीत देवून मग व्यसन लावण्याप्रमाणे करायचे आणी पुन्हा त्याचप्रमाणे  सवय लावून आपल्याला लुबाडणे हे असे काही होवू नये एवढीच अपेक्षा .नाहीतर अग्णीतुण उठून फुफाट्यात पडायचे असे व्हायला नको .

शेवटी स्वदेशी माल वापरण्याचा भर असावा .आणी स्वदेशी व्यापाऱ्यांना प्रौस्थाहण द्यावे .आणी दोन्हीही प्रकारच्या मार्केटिंग ची सवय असावी जेणे करून आपण आपल्या भावी पिढीवर संस्कार घालणार आहोत .नाहीतर त्यांचे चोचले पुरवता पुरवता नाकी नौ यायचे 🙋🏻
________________________________________________________________________________

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************