जाण आई बापाची(भाग:२)

जाण आई बापाची(भाग:२)

🌱वि४🌿या व्हाट्सअप्प ग्रुपवरून

जाण आई बापाची(भाग:२)

Source: INTERNET
-शीतल शिंदे,दहिवडी

आई म्हणजे धरती नी  वडील म्हणजे आकाश .

 आई - वडील म्हणजे चंद्र , सूर्य तारे .आई वडील म्हणजे अनमोल रत्नांची खान .

आई म्हणजे मायेचा सागर ! जीवनाचा आधार ! आई वडील म्हणजे सर्व काही त्यांची तुलना कशाशीही होवू शकत नाही .

आज आपण ह्या सुंदर आशा जगात प्रवेश केला तो फक्त आणी फक्त आपल्या आई बाबा मूळे .त्यांच्या मूळे हे जग पाहायला मिळतेय .आपल्या जीवनामध्ये सतत आधार देणारे , चांगल्या वाईटाची जाणीव करून देणारी .त्यांचे उपकार तर नाही फेडू शकत पण त्यांच्या व्रूधापकाळात त्यांची सेवा करून , त्यांना समाधानी ठेवून थोडाफार प्रयत्न करू .

जो करतो आई बाबांची जाण त्याला नक्की मिळेल सुख - शांती समाधान !

ज्याच्या पाठीशी आहे आई बाबांचा हात तो तरेल या विश्वात !

जो ठेवील  आई बाबांची  जाण तो करेल सम्रुद्धीची नौका पार !

जो ठेवील आई बाबांना सुखात तो सहज करेल संकटावर मात !

आई बाबांसारखे दुसरे दैवत नाही!

या जगात आई बाबांशिवाय दुसरा  कोणताही परमेश्वर नाही !

त्या आईने स्वतः अर्धा पोटी राहून मुलांचे पोट भरलेले असते हे काही मी वेगळे सांगायला नको .सांगताना डोळ्यातून अक्षरशहा डोळे पानवतात .आणी ज्यांचे डोळे नसतील पानवत त्यांना स्वतःच्या मुलांची निगा राखताना , संगोपन करताना तरी नक्की आठवेल की आपल्या माता पित्याने आपल्याला कसे संभाळले असेल .दिवसभर शेतात राब राब राबून , पोटाला चिमटे घेर लहानाचे मोठे केले शिक्षण दिले आणी सोन्याचे दिवस दाखवले .

या जगात असे कोणतेही असे  न्यायालय नाही की जेथे मुलांच्या सर्व चुकांचा माफी मिळते .

ते न्यायायालय म्हणजे फक्त आई नी बाबा  

मात्र मुलांना त्याची जाणीव असणे फार गरजेचे आहे .त्यांचा तिरस्कार करू नका .कारण पुढे जावून आपण पण आई बाबा , आजी आजोबा होणार आहोत याची सर्वांना जाणीव असणे गरजेचे आहे .

समस्त माज्या भगिनींना मी एवढेच सांगेन की आपल्या सासू सासऱ्यानी  कष्ट घेतले म्हणून आपण साधरण जीवन जगतोय.त्यांच्याशी वागाताना आपले आई वडील आठवा .

सर्व बांधवांनी हेहि लक्षात ठेवले पाहिजे आपले आई वडील तसेच अर्धांगिनीचे आई वडील आहेत ...

source: INTERNET
-सुधाकर पार्वती प्रभाकर, पंढरपूर

जगामध्ये असा कोणी नाही की ज्याला आई बाबा बद्दल आपुलकी नाही किंव्हा प्रेम नाही .

परंतू एक समाजकार्याचा विद्यार्थी म्हणून मी जेंव्हा समाजामध्ये पाहतो तेंव्हा समजत की खरंच आज ज्या आई बाबानंमुळे आपण आहोत त्या आई बाबांबद्दलचा आजच्या मुलांचा आपुलकीचा किंव्हा प्रेमाचा झरा आटलेले दिसतो .

ज्या आईने ९ महिने ९ दिवस मरणयातना सहन करून आपल्यला जन्म दिला , स्वतःच्या पोटाला चिमटा कढून आपल्या मुलांना लहानाचं मोठं केल . ज्या बापाने आपल्यासाठी काबाडकष्ट करून आपल्यला लहानच मोठं केल त्या आई बाबांच्या नशिबी म्हातारपणी मात्र घरामधे जागा नसते.

बदलती जीवनशैली , शहराचे आकर्षण , एकांतपणा , ग्रुहकलह यामुळे आजकालच्या मुलांना आईबापाची जाणीव राहिली नाही.
वाढती व्रूधाश्रमांची संख्या हे याचे उदहरण आहे.

हम दो , हमारे दो आई बाप को फेक दो ही भवना वाढीस लागली आहे .
एखाद्या आई बापाला ३ \ ४ मुले असताना सुध्दा ७०/७५ च्या वयामध्ये वेगळं राहून सवतःचा संसार करावा लगतो ही शोकांतीका आहे .
मात्रूदेव भव , पितृदेव भव ही भावना कमी झाली .
जिवंतपणी आई बापाच्या नशिबी मारणयातना आल्या .

मुलांना शिकवून मोठ केल , त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं ती मुलं परदेशात नोकरी साठी गेली. तीच मुलं आईच्या म्रुत्यू नंतर ही परत आली नाहीत.

काहींनी तर जमिनीच्या वाटणी वरून स्वतःच्या बापाला ट्रँक्टर खाली टाकले .
कित्येक आई बाप वेळेवर जेवण न मिळाल्याने मरण पावले .
हे सगळं पाहिल्यावर असं वाटत की खरंच या आई बाबांनी आपल्यला जन्म देवून चुकी तर केली नाही ना !

मला वाटत की प्रत्येकाने जर आपल्या आई बाबांच्या कष्टाची , त्यांच्या प्रेमाची जाणीव ठेवली तर नक्कीच ही वेळ त्यांच्यावर येणार नाही.

कारण  
आई माझा गुरु , आई माझी कल्पतरू . सौख्याचा सागरु आई माझी.

लहानपणी त्यांनी आपल्याला सांभाळल आता आपली वेळ आहे . याची जाणीव सर्वांनी ठेवू. मात्रूदेव भवं ,पितृदेव भवं !!

source: INTERNET
-वाल्मिकी फड, महाजनपुर

बर्याच वेळेस अनेक ठिकाणी मी बघतो की जसे आई आणी बाप आपले शत्रुच आहेत असे असं काही लोकांना वाटतं पण माझंतर परखड मत आहे की,आई बाप आपले दैवत आहे .आपण देव मिळवण्यासाठी किती प्रयत्न करतो तिथॅयात्रा करतो दानपुण्य करतो वाटेल ते करतो.माझे काही मत नाही पण ज्यांच्यामुळे आपण या जगात आलो हे सुंदर जग पाहीलं त्यांनाच आपण विसरू लागलो.बघा काय लागतं हो या म्हतार्या माणसांना जेवण तर त्यांच कमी झालेलं असतं त्यांना चांगल्या भरजरी वस्राचीही गरज नसते हवं असतं फक्त तुमचं प्रेम कुठेही बाहेर जाताना फक्त म्हणा की,आई किंवा बाबा मी येतो बघा ती बापडी तुम्ही रात्रभर नाही आलात तरी ते झोपणार नाही काही वाजलं तरी ऊठून बसतील .त्यांना असं वाटेल माझा बाळ आला वाटतं.आपल्या लोकांना आई बापा पेक्षा कुत्रे महत्वाची वाटायला लागलीय .नाही नाही मी काही म्हणत नाही कि,कुत्रे पाळू नका तोही मुका प्राणी आहे आपण त्यांनाही सांभाळले पाहीजे.पण आई बाप हे मायेचा सागर प्रेमाचा झरा आहेत जसं त्यांनी आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं जपलं आपल्यासाठी रात्र रात्र जागून काढली  त्यांची काळजी घेणे प्रत्येक मुलांची वा मुलींची नैतीक जबाबदारी आहे.भगवान गणेश आणी कातीॅकेय हे भगवान शिव आणी माता पावॅती यांचे पुत्र जेव्हा त्यांना सांगण्यात आले की,जो प्रथम प्रुथ्वीला प्रदक्षिणा मारून येईल त्याला पत्नी वगैरे काय असेल ते पण जेव्हा त्यांची शयॅत सुरू झाली तर कातीॅकेय आपले वाहन घेऊन प्रदक्षिणा मारायला गेले आणी इकडे गणपती बाप्पाने आपल्याच आईवडीलांना पाच प्रदक्षिणा घातल्या.थोडक्यात सांगायचे म्हणजे आईबापापेक्षा कोणीही मोठा नाही प्रत्यक्ष इश्वर सुद्धानाही म्हणून वाटतं प्रत्येक आपत्त्यांनी आपल्या आईबाबांची काळजी घ्यावी कमीत कमी त्रास देऊ नये फार प्रेम करत असतांत ते आपल्यावर,निष्काम प्रेम.

.Source: INTERNET
-महेश देशपांडे,ढोकी

या विषयी खरच मला शब्द अपुरे पडतात, कारण हे सगळं शब्दांच्या पलीकडे आहे.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की, तुमचं अस्तित्व हे फक्त आणि फक्त आई वडील यांच्यामुळेच आहे. त्यांच्याशिवाय आपण या जगात येऊ शकलो नसतो. आज जे कोणी आहोत. ते सर्व त्यांच्या कृपाशीर्वादाने आहोत...
आईच्या मनातलं जाणन किंवा वडिलांच्या मनातलं जाणन हे फक्त एक प्रामाणिक माणूसच करू शकतो...

प्रत्यकाने, जगात कुठेही असा अगदी कुठेही.
फक्त आपल्या आई वडिलांना विसरू नका बस्स..


Source: INTERNET
-सिद्धेश्वर आघाव, जालना

आई आणि बाप म्हणजे आपले अस्तीत्व.
आई बाप म्हनजे आपल कर्तुत्व.
आई बाप म्हणजे जगाण्याची कला.
आई- बाप म्हणजे अम्रुताचा झरा
आई-बाप म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील तो क्षण जो अजुन आलेलाच नाही.
आई-बाप म्हणजे जगण्याची ती कला जी अजुन जाणलीच नाही .
आई-बाप म्हणजे श्वास आणि पहीला घास आघाव सिध्देश्वर
                   

Source: INTERNET
-सचिन कंनाके,यवतमाळ

या विषयी खरच मला शब्द अपुरे पडतात, कारण हे सगळं शब्दांच्या पलीकडे आहे.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की, माझं अस्तित्व हे फक्त आणि फक्त आई वडील यांच्यामुळेच आहे. त्यांच्याशिवाय मी  या जगात येऊ शकलो नसतो. आज मी जे काही आहो. आणि ते सर्व त्यांच्या कृपाशीर्वादाने आहोत...
आईला मुलाच्या मनातलं जाणन किंवा वडिलांना त्याच्या मुलांच्या मनातलं जाणन हे फक्त  आई-वडीलच करू शकतात...

        मी माझ्या जीवनात माज्या आईला खूप कष्ट करताना पाहिले माझ्या जीवन माझ्या आयुष्याने अशी कलाटणी घेतली की त्या दुःखातून आज पण आठवण काढली तर खूप रडू दुःख वाटते.
     याचे कारण म्हणजे आम्ही लहान होतो आम्हाला तेव्हा कळत ही नव्हते तेव्हा माझ्या वडीलांचा मृत्यु झाला. तो दिवस हा आमच्या आयुष्यातला काळा दिवस आहे.
 तेव्हा अमच्यावरतर नाही पण जास्त विचार आईवर आला होता की जो घराचा आधार स्तंभ असतो. तो म्हणजे वडील असते. तेव्हा माझे वडील मृत्यु झाला तेव्हा पासून सर्व भार आईवर आला.
    
        आणि त्यामध्ये आम्ही दोन भाऊ एक बहीण
त्याची सर्व जीमेदरी आईवर आली.
त्यावेळेस आम्ही 3 4 व 6 वर्षाचे होतो
 आणि तेव्हा पासून आमचे पालन पोषण पूर्ण माझ्या आईने केली मानून माझे आई वडील सर्व माझी आई आहे तिचे कर्ज आम्ही मारणार तरी उतरू शकत नाही.

       तरी माझ्या आईबद्दल दोन शब्द दयाचे आहे
    माझी आई पहिले मुंबईला राहत होती खूप सुन्दर
दिसत होती. ती तिथे कोणत्याच कामाला पण जात नव्हती म्हणजे वडील आईला कोणत्याच कामाला पाठवत नव्हते. तरी जेव्हा आम्ही गावाला आलो तेव्हा तर खुपच झाले. आई बाबा व आम्ही तरी उन्हाळ्यात आम्ही गावी हिंडायला आलो पण आम्हाला काय माहित की इकडे आलो तर गावीच राहणार तेव्हा जीवनात वडील एका एकी वारले तो एवढे मोठे संकट आले की आईला कोणताच गावाकडील कामाचा अनुभव नव्हता पण तीने तिच्या मनात आमच्या भविष्याचे पाहत होती जे काम तिने केले नाही पण
आमच्या साठी तिला उन्हात सगळे शेतीतले काम        शिकले  कष्ट काम केले
तिने स्वतः साठी काही केले नाही पण आम्हला काही कमी पडू दिले नाही.

 माझ्या आईला तीला कितीक बिमार आहे ते आम्हला सांगत नाही जिवनात तिचा पाय दुखतो, कानातून पस येतो, दात ठणकतो, डोके दुखते पण ती माझी आई आम्हाला  आज पर्यंत कळू देत नाही
    पण तिच्या मनातले दुःख मी जाणतो तिचे कर्ज खूप आणि खूप पण ते तिथे लिहून काही अर्थ नाही
    माझ्या आईने आमच्यासाठी स्वतःचे दुःख विसरली पण आम्ही माझ्या आईला लवकर माझ्या जवळून दूर जाऊ देणार नाही
    कारण माझ्या जीवनात माझी आई गेली तर
सर्वात अनाथ आम्ही राहणार त्याचे कारण वडिलांचे पण कोणीही नाही. आणि आईला पण कोणीच रिलॅटिव्ही नाही आहे. म्हणून जे काही आहे ते माझी आई आहे तिला आमच्या आयुष्यातुन व जीवनातून
केव्हाच दूर जाऊ देणार नाही.

     आई तुझ्या मूर्ती वाणी
                     या जगात मूर्ती नाही।
अनमोल जन्म दिला ग आई
             तुझे उपकार फिटणार नाही।१।
*******
  आपण या जगात आल्यानंतरआपले
        पहिले गुरू आपले आई-वडील
    त्याचा प्रेमळ आशिर्वाद हा
             आपल्याला मिळालेला व कधीही
    न सपंणारा प्रसाद आहे
आपण आपल्या आई वडिलांची जाण ठेवा कारण जे आई वडील स्वतासाठी एक पैसा खर्च करत नाही पण आपल्या मुलासाठी  खुल्या मनाने कोणतीही वस्तूची कमी पडू देत नाही. त्याच्या कष्टाची जाण ठेवा फालतू उधळ पटी करू नका
व कधीही आई वडिलांना स्वतःकडून दूर करू नका
Source: INTERNET
-ज्ञानेश्वर तात्या टिंगरे, उस्मानाबाद

अतिशय महत्वाचा विषय एडमीन टीमने लिखाणासाठी घेतला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो.

आई वडिलांना डावलून , आईवडिलांच्या कष्टाचं मोल न ओळखता मी स्वतः कसा आणि किती कालावधीत इतकी झेप घेतली हेच सांगण्यात बऱ्याच लोकांना हौस असते.. म्हणून की काय म्हातारपणी त्यांना वृद्धाश्रमात पाठवून त्यांच्यापासून सुटका करून घेतली जाते..
आजकाल आई वडिलांशी मनमोकळा संवाद साधला जात नाही, त्यांना हवा तो मानसन्मान दिला जात नाही, त्यांच्या कष्टाचं चीज करून शेवटी त्याचं श्रेय आई वडिलांना द्यावं असं कोणाला वाटत नाही, याला कारण काय ... ?

बदलत्या काळात संदर्भ बदलत गेले , लोकांची विचारशैली, आई वडिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलत गेला , माणूस कोडग्या वृत्तीने वागू लागला, स्वतःही कोणाचे तरी आईवडील आपण होणार आहोत या गोष्टीचे भान तो विसरून गेला. नकळतपणे आई वडिलांची त्यांच्या माघारी टर उडवून आनंद घेणे त्याला सुखदायक वाटू लागले, प्रत्येक आईमध्ये एक बाप आणि प्रत्येक बापामध्ये एक आई लपलेली असते हे साधं सूत्र तो विसरून गेला.

त्या ईश्वराने निर्माण केलेली आई हा अलंकार असतो बाप हा त्यातील वर्ण असतो व आपण त्यातील अक्षर असतो आणि त्याशिवाय कुटुंबाची बाराखडी पूर्ण होत नसते हे त्याच्या मनात येत नाही.. आणि म्हणूनच की काय आईबापांची जाण तो आजकाल ठेवत नाही.

धन्यवाद.


Source: INTERNET
-नावनीता(शैलेश भोकरे),आळंदी

आपली संस्कृती सांगते,

मातृ देवो भव:
पितृ देवो भव:

लहानपणी स्वाध्याय असायचा तेव्हा रोज म्हणायचो आम्ही पण...

आता ही वचनं वाचून खरं तर हसू येतं! आजच्या संदर्भात जर ह्या ओळी वापरल्या तर विचारात मग्न होईल प्रत्येकजण. डोळ्यात अंजन घालणारी सूत्रं आहेत ही....

किती आहे आपल्याला आपल्या माय बापाची जाण?

लहान होतो तोपर्यंत त्यांच्या बोटाला धरून किंवा कडेवर घेऊन फिरल्याशिवाय बाहेर पडावं वाटत नव्हतं. दिवस त्यांचा सहवास लाभल्याशिवाय अपूर्ण वाटायचा....

पण जसजसं जग कळायला लागलं, तसतसं जग हुशार आणि आई बाप वेडे भासायला लागले. मग हळूहळू "शांत बसा तुम्हाला काय कळतंय!" ही वाक्यं रोजची होऊन गेली.

तारुण्यात तर वेगळीच नशा असते... माणूस हवेत असतो. अवलंबून असणारा मनुष्यप्राणी स्वयंपूर्ण व्हायच्या मार्गावर असतो. तेव्हाचा त्याचा तोरा काही निराळाच...

वडिलांचा कचरा होतो,
आई वेडी ठरते आणि
मित्र मैत्रिणी हुशार वाटायला लागतात.
संगत कशीही आणि कितीही टुकार असो,
घर नको नको वाटायला लागतं
आणि बाहेरचं जग हवंहवंसं.

लग्नानंतर तर बोलायलाच नको. अक्कल शिकवायला बाई येते... मग आई बापाचा सल्ला दुय्यम ठरतो.
"तुम्ही शांत बसा. पाहतो मी!"
ही वाक्यं मग नित्याची होऊन जातात. आणि ते, ज्यांनी आपल्याला या सुंदर विश्वात आणलं त्यांना कोपरा दाखवला जातो.
खूप गोष्टी आहेत बोलण्यासारख्या पण आटोपतं घेतो.
कारण दुसऱ्याला ज्ञान शिकवण्यासाठी स्वतः अनुकरण करायला हवं!
आईवर खूप प्रेम करतो मी पण वडिलांशी तेवढा प्रेमळ संबंध नाही. त्यांच्याशी जेव्हा नाळ जुळेल तेव्हा लिहिण्यातव खरी मजा आहे....


शेवटी एवढंच सांगेल....
जाण तर नाहीच आपल्याला;
ध्यान तरी असू द्या?!

जाण आई बापाची(भाग:१)

जाण आई बापाची(भाग:१)

🌱वि४🌿या व्हाट्सअप्पग्रुपवरून

जाण आई बापाची (भाग:-१)



Source: INTERNET
-निखिल खोडे, ठाणे

            आई एकमेव स्त्री जी माझ्यावर जन्मा आधीपासून प्रेम करते आणि बाबा जे स्वतःपेक्षा सर्वात जास्त जीव लावते ते खरच! यांच प्रेम आणि माया कधीही न संपणारी... स्वतःच आयुष्य आपल्या मुलांसाठी खर्च करणारे आई वडील सर्वात श्रेष्ठ आहे.

              घरची परिस्थिती बिकट... घरात बारा शिवारचे दारिद्र्य... मातीचे घर.. पावसाळ्यात घरात पाणी येईल याची भिती,.. हातावरच पोट.. काम केलं तर खायला मिळणार ही परिस्थिती... दुसऱ्या कडून कर्ज घेऊन मक्त्याने केलेल्या शेतीत सतत नपिकी... त्यानंतर दुसऱ्याकडे मजुरी करण्याशिवाय पर्याय नाही... सावकाराचे टोमणे... मदत करायला कोणीच नाही... आणखी खूप साऱ्या अडचणी असुन सुद्धा मला व माझ्या ताईला काटकसर करून का होईना आमच्या शिक्षणाचां खर्च, सण उत्सवाच्या वेळी नविन कपडे व आणखी कुठल्याही गोष्टी असो ... कधीच कमी नाही पडली. खरच आई बाबा तुम्ही महान आहात.

                वयाने जसजसा मोठा होत गेलो तसा कळायला लागल की आपल्या आई वडिलांनी खुप जास्त कष्ट घेतले आपल्याला मोठ करण्यात. लहानपणी प्रत्येक गोष्टीत पुरवलेली माझी हौस,  कोणत्याच गोष्टी साठी मनाई केली नाही परंतु त्यांच्या साठी मी आजपर्यंत काय केले हाच प्रश्न कधी कधी पडतो. लहानपणी आई बाबा सोबत शेतात कामाला गेल्यावर त्यांच्या कपाळा वरून पडणारा घाम आठवला की आजही हृदय भरून येत. म्हणूनच आई म्हणायची की आमच्या साठी काहीही नको.. सावलीत काम बघा रे. आज जाणीव होते त्या गोष्टीची की का आईबाबा का असे बोलायचे.

                 आई बाबा ना सांगावस वाटते की तुम्ही केलेल्या प्रत्येक कष्टाची, मेहनतीची, काटकसरीची व त्यागाची जाणीव आहे मला. आता फक्त आयुष्यात एकच स्वप्न आहे की माझे आई-बाबा म्हणेल की पोराने काहीतरी करून दाखवलं. वाट आहे त्या दिवसाची ... प्रयत्न करतोय. सरतेशेवटी धन्यवाद परमेश्वराचे ज्याने मला  स्वर्गाहून सुंदर आई-बाबा आणि ताई दिली त्याबद्दल हाच परिवार सात जन्मी मिळो.!!



source: INTERNET
-शिरीष उमरे, नवी मुंबई

आई... काय ताकद आहे शब्दात ! जननी ती माझी ! नऊ महीने मी तिचा अंग होतो आणि ती नाळ जी जुळते ती अनंतकाळासाठी !! माझा अणुरेणु तिचा असतो ... तिची कुस माझी च असते.. मायेची निस्वार्थ सावली जणु वात्सल्याची साय... माझी माय !!

बाप म्हणजे माझा आधारवड ! ज्याच्या अंगाखांद्यावर खेळण्यात बालपण जाते... त्याच्या पारंब्यांवर झुलता झुलता तारुण्यात अलगद येणे हे अदभुत च ! मग काय केमिकल लोचा होतो काय माहीत... बापाचा राग यायला लागतो... जिवनातल्या पायवाटेवरचे खडे रुतु नये म्हणुन त्याने अंथरलेला हात अडथळा वाटु लागतो... त्यानेच चालायला शिकवले हे विसरुन आपण त्याचाच विरोधात धावायला लागतो... मग येतो जगाचा खराखुरा खडतर महामार्ग... स्वप्नाचे विश्व संपुन पुढची कठीण वाटचालीत आठवतो आपला बाप... पदोपदी.. आठवतात त्याने आपल्यासाठी केलेला व लपवलेला त्याग... आपल्या प्रत्येक अडखळण्यामागे सावरायला असलेला त्याचा अदृश्य हात... मग कळते त्याच्या घामाची व आटवलेल्या रक्ताची कीमंत... तरीही कसला इगो असतो काय कळत नाही... व्यक्त होता येत नाही त्याच्यापाशी.. तो बांध तुटतो तेंव्हाच जेंव्हा आपण स्वत: बाप होतो.... हमसाहमसी रडलो होतो मिठी मारुन त्याला... माझ्या डोळ्यात कृतज्ञेतचा पुर तर त्याच्या डोळ्यात लेकरु बाप झाला याचे कौतुक... मग त्याचातला आजोबा बघतांना परत जाग्या होतात सुुप्त मनातल्या  लहानपणाच्या गोड आठवणीचे मोहोळ ... तोपर्यंत कुठल्या मनाच्या तिजोरीत लपल्या असतात ह्या भावना कुणास ठाऊक !!

आता मला बनायचे असते माझ्या आईची आई व बापाचा बाप !! कर्तव्य म्हणुन नाही कींवा परतफेड म्हणुनही नाही... हा सहजिवनाचा सहज मार्ग असतो... आपल्या संस्कृतीला सलाम ! कीत्येक वर्षापासुनचा हा अविट गोडवा पिढ्यानपिढ्या वारसाहक्काने पुढे चालतच आहे....


source: INTERNET
-अमोल धावडे

प्रथम माझ्या आईला आणि वडिलांना नमन....
आई वडील यांचे उपकार कधीही न फिटणारे असते त्यामुळे आई वडिलांना कधीही दुखवू नका. मला वडिलांचे प्रेम खुप कमी भेटले कारण मी पाच वर्षाचा असताना त्यांना देवआज्ञा झाली. वाईट वाटते की खुप कमी वेळ वडिलांचा सहवास लाभला. वडील गेल्यानंतर आम्हा चार भावंडांची जबादारी आई वर येऊन पडली. चार भावंड आम्ही त्यांचं सर्व शिक्षण याचा न झेपणारा खर्च तरी आईने खुप सारे कष्ट करून आम्हा सर्वांचे शिक्षण पूर्ण केले बहिणीची लग्न केली.

आत्तापर्यंत माझे शिक्षण पोटाला पीळ मारून करत राहिली आईचे स्वप्न आहे की मुलाने खूप मोठे होऊन नाव कमवावे माझ्यासारखे कष्ट त्याच्या वाटायला येऊ नये त्यामुळे तिने माझे स्वप्न पूर्ण केले आता मला तिचे स्वप्न पुर्ण करायचे आहे.

आईने माझ्यासाठी खुप सारे कष्ट सोसले आहे त्याची परतफेड म्हणून आईचे स्वप्न पूर्ण करावयाचे आहे व तिच्या चेहऱ्यावर आनंद पहायचा आहे. माझ्या आयुष्यात आईला कधीही दुःख होणार नाही यांची काळजी मी नेहेमी घेईल कारण तीने मला जन्म दिला व आज मी जे आही आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे.
माझे माझ्या आईवर खुप प्रेम आहे.  Love you aai........



Source: INTERNET
-मुकुंद बसोळे,लातूर

स्थळ- गण्या आणि मन्याचे लाडके गाव.....'टेंभुर्णी'...ह्या गावाला निसर्गाने खूप काही दिल होत....मस्त चोहीबाजूने डोंगर आणि त्या डोंगराच्या कुशीत निश्चितपणे असलेलं गाव....जसं काही आईच्या कुशीत 'बाळ'झोपलं आहे....निवांत...मजेत..... आपल्याच धुंदीत.....सकाळी सकाळी सूर्यदेव 'पृथ्वी'मातेच्या उदरातून उगवून आपलं मायेचं पांघरून ह्या गावावर घालत असत....आणि घसा कोरडा पडल्यावर तेवढ्याच 'मायेनं' तहान भागवायला  नदी होतीच....असं निसर्गाचं देणं लाभलेलं गण्या आणि मन्याचं अप्रतिम गाव.......'टेंभुर्णी'..... एका सकाळी मन्या घाई गडबडीत रस्त्यावरून.... बस स्टँड कड जात होता....तेंव्हा अचानक त्याला गण्या घावला पण गडबडीत त्याच त्याच्याकडे लक्षच गेलं नाही.....

गण्या-  "ऐ...ऐ.... 'चेन्नई एक्सप्रेस' कुठं निघाला बे येवढ्या घाई गडबडीत....आणि ते सुद्धा मला न सांगता....

मन्या-  (नेहमीचंच 'ख्या-ख्या' हसत..)  आबे तुला तर नाही पाहिलं न बे मी....'मुंगसावणीचं' आलास अचानक....

गण्या- ऐ.... बंबूऱ्या....पण चालला कुठं आहिस तू एवढ्या घाई गडबडीत.....

मन्या- काही नाय रे....थोडं तालुक्याच्या गावाला जावं म्हणतोय....

गण्या-(पाठीत धपाटा घालून) तालुक्याच्या गावी चाललायस.....ते पण मला सोडून....हानीन तुला लै....बरं जाऊदे कोणता पिकचर (चित्रपट)  आलाय....मी पण येणार आहे तुझ्याबरोबर.....पिक्चर बघू...भेळ खाऊ...मजा करू...चल....

मन्या-  (चेहऱ्यावर गंभीर भाव, डोळयांच्या कडा 'ओल्या' झालेल्या) नाय रे मी 'पिक्चर' बघायला नाय चाललोय.... माझं थोडं दुसरंच काम आहे....

गण्या- (गण्याने 'मन्याच्या' चेहऱ्यावरील गंभीर भाव लगेच 'टिपले' काही झालं तरी तो चड्डीदोस्त होता 'मन्याचा')  ऐ.... बंबूऱ्या.....'चड्डीदोस्त' ना आपला तू आणि माझ्यापासून काय लपवतोस रे....भाड्या....चल बस गाडीवर शेताकडे जाऊ.....(मन्या त्याला नकार देऊ शकला नाही आणि ते शेताकडे आले....एका झाडाखाली गण्याने गाडी थांबवली....मन्या अजून कसलातरी विचार करत होता....त्याची विचाराची तंद्री गण्याने मोडली)....हम्म आता बोल....काय झालं....(हे ऐकून आतापर्यंत थांबवलेला 'मन्याचा' 'अश्रू' चा बांध फुटला..... तो हमसून हमसून रडू लागला....गण्या त्याच्याकडे नुसताच बघत होता...)

गण्या- (शेवटी कंटाळून) तुझं रडणं झालं असलं तर सांग आता काय झालंय....

मन्या- ( याच सुद्धा रडणं आता थांबलं) गण्या अरे यार 'मायला' आणि 'बाप्पा' ला भेटायला   'वृद्धाश्रमाला' जात होतो तालुक्याला...आबे ज्या बापाने मला आपलं पोट रिकामं ठेऊन मला जगवलं.... ज्या 'मायच्या' कुशीत निर्धस्तपणे मी लहानपणी झोपलो....ज्या बापाने मला रांगायला, चालायला ,पळायला शिकवलं....पळता पळता कुठे ठेच लागली तर त्या जखमेवर आईने मायेने हळद लावली...त्या हळदीची सर आज कुठल्याच 'मलमाला' येणार नाही...ज्यांनी मला निवारा दिला...त्यांनाच आज मी बेघर केलं बे....(हे सांगताना 'मन्याच्या' डोळ्यात दुःख स्पष्ट दिसत होतं...)

गण्या- आबे मग आन ना त्यांना घरी तुझे कुणी हात धरलेत का...आबे 'मन्या' आपण कितीही मोठे झालो तरीही आईच्या कुशीत झोपण्याचा 'आनंद' काही औरच असतो...( हे सांगताना कुठेतरी रमल्यासारखे भाव होते तोंडावर...)

मन्या- आबे मला काय नको वाटतंय का....पण बायडी ऐकत नाही बे....

गण्या- ओ...होहोहो.... इथं आहे तर गोम....(काहीतरी विचार करत...आणि विचार करून काहीतरी सुचलंय असे भाव चेहऱ्यावर आणून.....) चल मी करतो सगळं बरोबर.... ( आता गण्याने गाडी मन्याच्या घराकडे आणली....ते दोघं मन्याच्या घरी हॉल मध्ये बसले होते....)

गण्या-( मुद्दाम मोठ्या आवाजात) मन्या... काही वेळापूर्वी  तेरे सालेसाहब का फोन आया था ना?...काय म्हणत होते ते.....

मन्या- आबे कधी...काय बोलतोयस तू....

गण्या- (डोळे वटारून) आबे आपण नाही का चौकात बसलो होतो...तेंव्हा....अर्ध्या तासापूर्वी....

मन्या- (अजून सुद्धा गोंधळलेलाचं पण डोळे वाटरल्यामुळे त्याने फोन आला होता ते मान्य केलं) हम्म...अर्ध्या तासापूर्वी ना...हो आला होता ना आला होता...त्याच काय....

गण्या-  (आवाज अजून मोठा करून) आबे  किती विसारभोळा आहेस तू...सालेसाहब... तुझ्या सासू सासर्याना आता 'वृद्धाश्रमात' ठेवण्याचा विचार करत होते ना...चूक आहे बे ते....

मन्या- ( आता कुठे याला आपल्या चड्डीदोस्ताचा गेम लक्षात आला होता...आता हा सुद्धा मोठ्या आवाजात...)  हो तर बे ते साफ चुकीचं ना...पण काय करावं आता आपण काय त्याना सांगू शकतो...वहिनी आणि सासू च पटत नाही ना....( हे ऐकून मण्याची बायडी हॉल मध्ये आली)

बायडी- (मोठयाने...जवळ जवळ ओरडतच) काय म्हणताय तुम्ही...सुन्या आईला आणि बाबाला 'वृद्धाश्रमात' ठेवणार आहे...थांबा त्याची खडपट्टी च घेते चांगली....दया तो फोन इकडे....

गण्या- अहो वहिनी हे काय करताय....अहो सुनीलरावांच्या बायकोच आणि सासू च पटतं नाही...मग राहुद्या ना त्यांना तिथे....तिथे तर त्या निवांत राहतील....

बायडी- अहो...हे काय बोलताय तुम्ही भावजी....अहो असं कसं राहू द्या म्हणताय तुम्ही.....अहो ज्या आईने त्याला रात्रंदिवस कष्ट करून सांभाळलं,आपलं मायेचं पांघरून त्याच्या अंगावर घातलं...ज्या आईने त्याच्या जखमेवर हळद लावली आणि ज्या बापाने  त्याला रांगायला,चालायला, पळायला शिकवलं.....आयुष्याच्या प्रत्येक संकटात खंबीर साथ दिली...त्याना तो असे कसे बाहेर ठेऊ शकतो.....

गण्या- (दीर्घ निश्वास घेऊन)  वहिनी असाच विचार फक्त एकदा 'मन्या' बाबतीत सुद्धा करून बघा....बस येवढच सांगायचं होत मला....
(हा घाव चांगलाच 'वर्मी' बसला होता....आणि संध्याकाळी मन्याचे 'माय आणि बप्पा' घरी होते..... आणि मन्याच्या डोळ्यात त्या दिवशीपासून 'खुषी' मावत नव्हती आणि असा 'चड्डीदोस्त' दिल्यामुळे तो देवाचे आभार मानत होता....


source: INTERNET
-कु.समीर भाऊ इंदुलकर, पेण (रायगड)

      खरं तर या विषयावर काही लिहताना मनाला प्रश्न पडतो की खरच मी ,तुम्ही आपण सर्वजण "जाण आईची बापाची" या विषयावर लिहायला पात्र आहोत का ? किंवा फक्त या विषयावर काही चांगले शब्द लिहून त्यांची म्हणजे आपल्या आई वडिलांची महती त्यांचे कार्ये जगासमोर मांडू शकू का ? तर याच उत्तर आहे .नाही. खर तर संपूर्ण समुद्राची शाइ आणि आकाशाच कागद केला ना तर तेही कमी पडेल. थोडक्यात सांगायचं झालं तर आई वडीलांविषयी लिहायला आपल्याला शब्द अपुरे पडतील,आपली विचार करण्याची शक्ती कमी पडेल.
पण त्यांचे कार्ये आपण आपल्या शब्दात लिहू शकणार नाही .कारण त्यांची माया,त्यांचं उपकार,त्यांचं आपल्या प्रति असणार प्रेम ,त्यांनी आपल्या साठी घेतलेली मेहनत,कष्ट, हे फक्त शब्दातून व्यक्त करणे शक्य नाही.

    माझ्या आईवडीला विषयी सांगायचं तर मला वडिलांचं प्रेम जास्त काही मिळालं नाही मी ११ वर्षाचा असताना माझे पप्पा अनंतात विलीन झाले .पण जेवढे दिवस मी त्यांच्यात सोबत होतो त्या दिवसामध्ये त्यांच्या कडून भरपूर प्रेम,माया,चांगली शिकवण सर्व काही मिळालं .आजही त्यांची आठवण आली की डोळ्यात अश्रू यायला लागतात. मला आजही आठवत मी सहावीत असताना पप्पा आजारी होते आणि तालुक्याच्या ठिकाणी मी आणि पप्पा गेलो होतो.खरं तर पप्पा दवाखान्यात आले होते आणि मी त्यांच्या बरोबर एक सोबत म्हणून आलो होतो. पण ते दवाखान्यात न जाता सरळ मला एका कपड्याच्या दुकानात घेऊन गेले आणि मला माझ्या शाळेचा त्यांच्या कडून शेवटचा ड्रेस घेऊन दिला होता.त्यांना विचारलं पप्पा आपल्याला तर दवाखान्यात जायचं आहे हे कपडे कशाला ? तेव्हा त्यांनी मला उत्तर दिलं दवाखान्यात जाऊ कधीतरी तुला अगोदर शाळेचा ड्रेस, पुढे तुला खूप शिकायचं आहे. बस्स खर तर त्यांच्या निधनांनंतर त्यांच्या याच शब्दांमुले माझी शिकण्याची परिस्थिती नसताना सुद्धा मी आज एम.ए.च शिक्षण घेतलं.

   आई विषयी बोलायचं झालं तर कोणत्या शब्दात तिची महती मांडू हेच कळत नाही.एक सुंदर वाक्य आहे की.. "आई सारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही."' 'आई म्हणजे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर यांचं मिलन करून देणारी शक्ती म्हणजे आपली आई .

   माझ्या वडिलांच्या निधनांनंतर आम्हा तीन भावंडांची   जबाबदारी तिने उचचली लोकांच्या शेतात कष्ट करून आम्हाला लहानाचे मोठे केले आमचं शिक्षण पूर्ण केलं.अजूनही घरातली प्रत्येक जबाबदारी स्वतःवर घेऊन ती पूर्ण करते, अशी माझी आई.शाळेच्या सहलीला जाताना शेतात मजुरी करून मुलांच्या सहलीचा हट्ट पूर्ण करायची , आपल्या मुलांना शाळेत कोणत्याच  शालेय साहित्याची कमी पडू नये म्हणून भर उन्हात काबाडकष्ट करून ते साहित्य पुरवण्यात आर्थिक बाजू भक्कम करायची .रात्रीच्या वेळी अगोदर आपल्या मुलांना जेवू घालते आणि स्वत मात्र उपाशी राहते जेणेकरून माझी मुले उपाशी राहणार नाही.ती आई फक्त आईच नाही तर साक्षात ईश्वराचं रुप आहे...
    
  अश्या माझ्या महान ,थोर , देवाहून ही श्रेष्ठ माझ्या आई पप्पांना शतशाः प्रणाम

source: INTERNET
-जयश्री खोडे, मुंबई
                  
                  आई वडील हे असं व्यक्तिमत्वे आहेत की आपण त्यांच्याबद्दल जेवढे बोलण्याचा
वा लिहण्याचा प्रयत्न करू तेवढं कमीच आहे.

            मराठीमधील प्रसिद्ध कवी यशवंत यांनी आपल्या कवितेतून म्हटले आहे की,
"स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी "!!  ही ओळ लिहून आई या शब्दाची महती थोडक्यात सांगितली आहे.

              घरची परिस्थिती खूप हलाखीची असून सुध्दा आम्हा दोघा बहीण भावाला कशाचीही कमी पडू दिली नाही. मुलगा - मुलगी असा भेद ही कधी मी माझ्या घरी बघितला नाही. आम्हाला समान वागणूक मिळाली. शिक्षण असो की कोणतीही गोष्ट त्यामध्ये आमच्या आई - वडिलांनी तफावत केली नाही.

             खरं सांगायचं झाल्यास  माझ्या सर्वात जवळचे म्हणजे माझे बाबा. बाबाच शिक्षण जरी  तिसरी पर्यंत झालं असेल तरी त्यांना शिक्षणाबद्दल खूप कळकळ नेहमीच राहिली . त्यांना नेहमी वाटायचं की  माझी मुलगी खूप शिकायला पाहिजे. आई ने जरी माझ्या शिक्षणासाठी विरोध केला असेल पण त्यांनी मला नेहमी आधार दिला . माझ्या शिक्षणासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. आयुष्यात मी खूप चुका केल्या पण त्यांनी मला नेहमी माफ केलं आणि समजाऊन घेतल.
            आता बऱ्याच प्रमाणात आईचे ही विचार बदलेले आहे तरी सुद्धा मला माझे बाबा खूप जवळचे वाटतात . आई ने मला ९ महिने पोटात ठेऊन मला जन्म दिला त्यामुळे आईची मी खूप आभारी आहे. आई - वडिलाचे ऋण परतफेड करणे शक्यच नाही पण प्रयत्न नक्की च करेल.

            बाबांना म्हणाली होती  की मला मुंबई ला जायचं आहे नोकरी करायला तर आधी त्यांनी नाही म्हटले पण नंतर दादांकडे बघुन त्यांनी मला परवानगी दिली. मुंबई मध्ये मी दादांसोबत आली त्यांना कोणत्या नात्याने हाक मारावी हे मला कळत च नाही कारण त्यांनी मला कधी गुरु  म्हणून मार्गदर्शन केलं तर कधी माझे भाऊ म्हणून माझ्या निर्णयामध्ये सोबत राहीले, कधी बाबा बनून माझी काळजी घेतली तर कधी आई म्हणुन ताप आला किवा मला काही झालं तर प्रेमाने मला जेवण बनवुन खाऊ घातले त्यामुळे मला कधी कळलच नाही की मी त्यांना काय म्हणू....

माझ्या मध्ये आता असलेला आत्मविश्वास , स्वतः बद्दलच प्रेम , माझे विचार मांडणे हे सर्व मी त्यांच्या पासून शिकली.. माझ्यासाठी तेही आई बाबा पेक्षा कमी नाही.

              असं म्हणतात की घरच्या मोठ्या लोकांनीच कर्तव्ये पार पाडायची असतात पण माझा लहान भाऊ याला अपवाद आहे.. तो माझ्यापेक्षा वयाने लहान आहे पण दिसायला मोठा दिसतो. मोठ्या भवासारखी काळजी घेणारा माझा लहान भाऊ.. तो सर्व जबाबदाऱ्या घरातील वडीलधार्यासारखा पार पाडतो .

          या सर्वांबद्दल शब्दात सांगणे खरच खूप कठीण आहे , एवढच बोलू शकते ह्या सर्व व्यक्ती माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत.

source: INTERNET
-संदीप बोऱ्हाडे, वडगाव मावळ(पुणे)

   आई आणि वडील या दोनही लोकांची सोबत आपल्या जीवनाचा अनंतकाळापर्यंत सर्वांना हवी असते...पण यामधील एकाने समजा मध्येच साथ सोडली तर..??
जीवन अंधारमय होऊन जातं दरोरोजच्या आठणींने आणि नकळत डोळ्यांमध्ये अश्रू येतात..

 अशीच एक दिवस माझ्या आईने एक्सिट घेतली या जीवनातून. तेव्हा मी होतो फक्त 10 वर्षाचा
आईशिवाय कोणत्याच गोष्टीची कल्पनाही करता येत नाही.
एकही दिवस असा जात नाही की आई आठवत नाही. आई ज्या दिवशी  सोडून गेली..त्या दिवशी तर माझा अर्धा जीवच निघून गेला होता..पण आयुष्य सुंदर आहे जगायला पाहिजे. या विषयानिम्मित थोडेसे आईबद्दल..

 ज्यावेळी तुझी सोबत महत्वाची होती, नेमकी त्याच वेळी एक्झिट घेतलीस. आजपर्यंत या गोष्टीला 16 वर्ष होऊन गेली.
तुझ्या सोबतचा एकही फोटो नाहीये. अगदी तुझा स्वतःहाचा  फोटो देखील माझ्याकडे नाहीये. आयुष्यभर खस्ता खाण, अपयश पचवण, तरी पुन्हा पुन्हा उभं रहाणं म्हणजे काय असत हे तुझ्यामुळ अनुभवलं. तरीही तु कधीही खचली नाहीस. खुप काही केलस तु, तरी आमच्यासाठी सारं काही करत होतीस.

 गेल्या 15 वर्षात अनेक प्रसंग आले. पण खचलो नाही. जिथं आमची आई खचली नाही तिथं आम्ही तरी कसं खचणार ! स्वाभिमान म्हणजे काय हे तु शिकवलंस.

 आम्हीही चुकतोय, धडपडतोय. तुझ्यानंतर वडीलच सगळं काही. आई आणि बाप दोघांची भूमिका वडीलांनीच आजपर्यंत निभावली.
आज बऱ्यापैकी स्थितीत आहोत. पण हे सगळं पाहायला तु आज नाहीस. तू असतीस तर खूप खूप पुढे गेलो असतो. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. फक्त प्रयत्न आपल्या हातात. तुझ आयुष्यात नसण सहन होत नाही.

तु सोबत नसण्याने जे गमावलयं ते शब्दात मांडता येत नाही...अपयश आल्यावर तुझी खूप जास्त आठवण येते. पण नवं काही मिळवलं की तुझ नसणं जास्त छळत. स्वतंत्र विचार करायला, निर्णय घ्यायला तु शिकवलं. आणि चुकलं तर त्याची जबाबदारी घ्यायलाही तुच शिकवलं.

एक मात्र नक्की की तुझ्या नसण्यामुळे जे आयुष्यात नुकसान झाले आहे ते कधीही भरून येऊ शकत नाही..आणि त्याची कायम खल मनात राहील. आजही तुझ्याच नावाने माझी ओळख आहे. आयुष्यात सर्वांना आई वडिलांची साथ अनंत काळापर्यंत मिळो..!!

Lot of Miss U..


source: INTERNET
-अंजली आमकर, रत्नागिरी

मी आकाश, वय 22 वर्षे पूर्ण, राहणार : पत्ता नाही, पूर्ण नाव माहिती नाही. कुटुंबा विषयी माहिती देखील मला माहिती नाही. मला जेव्हा समजू लागले तेव्हा मी अनाथ आश्रमात होतो. वयाची मर्यादा पूर्ण झाल्यावर ते आश्रम ही पोरके झाले.  माझ्याकडे साधी एक डिग्री होती जेव्हा मला आश्रम सोडावे लागले. आई वडील कोण हेच माहिती नाही तर घरदार नातेवाईक कुठून असतील?
आश्रमात माझ संपूर्ण बालपण गेल. आश्रमातुनच मला शाळेत शिकायला मिळाले.  शाळेत शिकु लागलो तस तसा माझा मनातील प्रश्नतील गोंधळ सुरु होऊ लागला. "ऐ आई मला पावसात जाऊ दे..अशी बाल गीत शिकवू लागले की मला हे "आई" म्हणजे काय ते कळतच नसे. कारण मी जिथे राहतो तिथे फक्त अंकल, काकी, मावशी आणि भाऊ इतकेच शब्द व नाती समजली. मग ही आई, बाबा, आत्या, मामा वैगरे काय ते कळेना. जर ही बाकीची नाती पण सर्वाना असतात मग मला का नाही ?
मला आठवत मी शाळेत असताना जेव्हा जेव्हा "माझे आई आणि बाबा"  या विषयावर निबंध लिहायला सांगायचे. तेव्हा तेव्हा माझ्या निबंधाच्या वहीचे पान कोरेच राहिले. "मी लिहू काय?"  मला काहीच समजेना. कारण कधी अशी हाक कोणाला मारली देखील नाही. तर मला काय माहित असणार...त्यावेळी प्रत्येक जण मला "आई बाबा" याचे वेगवेगळे अर्थ समजावून देऊ लागले.  
माझ्या एका वर्ग मित्राने सांगितले की,  सकाळी शाळा भरताना आणि सूटताना जे मुलांना घेऊन येतात व घरी घेऊन जातात. त्यांना कपडे आणि खाऊ देतात ते "आई-बाबा" असतात. पालक सभेला जे येतात ते "आई बाबा". कोणी तरी असं हि  सांगितलं कि आई बाबा म्हणजे "मम्मी पप्पा". जी घरात जेवण बनवते ती मम्मी व नोकरीला जातात ते पप्पा असतात. मला हे सर्व आश्रमात असताना अंकल आणि मावशी करते मग मला वाटले हेच  माझे आई-बाबा आहेत का? मग मी त्यांना अंकल आणि मावशी अशी का हाक मारतो ? आई बाबा असे का नाही म्हणू शकत? तेव्हा मावशीने समजावल की "ज्यांच्या पोटातून जन्म घेतो ती 'आई' व ज्याच नाव आपल्या नावा पुढे लावतात...जो आईचा नवरा म्हणजे "बाबा".  हा एक नवीन अर्थ समजल्यावर माझा अजुनच गोंधळ वाढला...व अनेक असे प्रश्न पडले की ज्याचे उत्तरे अजुनही सापडले नाही. "मला जन्म दिला कोणी?" जर शाळेत सर्वाना आई बाबा आहेत तर मला का नाही? माझे नाव का असे आहे? प्रत्येकाला घर असत तर मला कोणी व का इथे ठेवले? देव सर्वाना "आई बाबा" देतो किंवा आई बाबा देवासारखे असतात तर देवाने माझ्यावर का अन्याय केला?

असं म्हणतात कि , "समुद्राची शाई , हिमालयाची लेखणी आणि आकाशाचा कागद करून आई बाबांचे गुणगान लिहिण्यासाठी बसलो तरी त्यांचे प्रेम शब्दात मांडता येणार नाही. सर्व गोष्टी पैशाने विकत मिळतात पण आई बाबा विकत मिळू शकत नाही. त्यांच्या इतकं प्रेम हि कोणाला करता येणार नाही.
सर्वजन आई बाबाचे  गोड़वे गातात.... एकमेकांवर प्रेम करतात... काळजी घेतात...पण मी अजूनही "आई बापची जाण"  यासाठी पूर्णतः पोरका आहे. लहानपणी जसा गोंधळलेलो होतो आज ही तसाच गोंधळलेलो आहे. माझे जे आई बाबा आहेत ज्यांनी मला इथं सोडून गेले . त्यांच्या विषयी कधी राग येतो तर कधी तितकंच प्रेम हि वाटत. पण यातील काहीच मला व्यक्त करता येत नाही.... जेव्हा कधी पेपर मध्ये वाचतो कि  नोकरी निमित्त किंवा घरात अडचण म्हणून आपल्या आई बाबांना वेगळं करतात किंवा आश्रमात सोडून येतात. तेव्हा खूप अस्वस्थ होऊन जातो. एका बाजूला आमच्या सारखी मुलं जे "आई बाबा" शोधत असतो... त्यांच्यासारखं प्रेम शोधत असतो. तर दुसऱ्या बाजूला अशी मुलंही आहेत जे "आई बाबा" ना आश्रमात सोडत असतात.

"जाण आई बापाची" साठी बहुतेक सर्व जण आई बाबा यांनी काय काय केलं ....व मुलं आई बाबा साठी काय काय करतात... किंवा त्यांच्या सोबतच्या न विसरू शकणाऱ्या आठवणी सांगतात. पण अशी हि मुलं आहेत जे यापासून पोरके आहेत व त्यांची एकही आठवण नाही. पण तरीही एक अशी जाण आहे जी आपण सहज समजू शकत नाही.

दिवाळी - भाग १ (पहिला )

संदिप बोऱ्हाडे (वडगाव मावळ , पुणे)

  दिवाळी सण केवळ आपल्या कुटुंबातच नाही तर सर्व समाजात आनंद वाटण्याचा सण. हा सण आनंदाचा , आपुलकीचा आणि सामाजिक भान जपण्याचा..
   आजही समाजात अशी खूप मुले आहेत ज्यांना स्वतःहाचे कुटुंब नाही. त्याच बरोबर अनेक आजीआजोबा आहेत त्यांना बोलायला माणसे नाहीत. अनेकांना एक वेळेचे जेवण नाही , कित्येकांचे पैश्यांच्या अभावी शिक्षण अपुरे राहिले आहे.. जर त्यांनाही आपण अविभाज्य घटक बनविला तर तश्या दिवाळी सारखी दुसरी दिवाळी नाही. उगीच फटाके ,लायटिंग, वर पैसे खर्च करण्यापेक्षा आपण अश्या लोकांना मदत केली तर , अश्या दिवाळी सारखी दुसरी दिवाळी होऊच शकत नाही. आणि आपला आनंद द्विगुणित होईल आणि आशीर्वाद देखील मिळतील ते वेगळेच.
    4- 5 दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने दिवाळीमध्ये फटाके फक्त 8 ते 10 पर्यंत वाजवावेत असा निर्णय दिला..पण लगेच काही लोकांना हिंदुद्वेष दिसायला लागला..काय बोलावे अश्या लोकांना..फटाके फोडुन होणारे ध्वनी, वायु प्रदुषण हे पर्यावरणाला घातकच आहे.
मग ते कोणत्याही निमित्ताने अथवा कोणत्याही धर्माच्या लोकांनी केलेले असोत.
यामुळे वृद्धांना ,लहान मुलांना,रुग्नांना ,पशु,पक्षांना खुप त्रास होतो. फटाके उडवताना भाजून अनेकजण गंभीर जखमी होतात. त्यात लहान मुलांची संख्या अधिक असते. डोळ्यांना इजा होऊन अंधत्व येऊ शकते. प्रदूषणामुळे सर्वांनाच त्रास होतो.
दिवाळी आनंदाचा सण , परंतु इथेपण शेजारी शेजारी यांच्यात आतीशबाजीसाठी चढाओढ , स्त्रीवर्गात तेलांच्या दिव्याने घर सजावट करण्यात स्पर्धा लागलेली असते. एकंदर पैशाचा धूर करण्याचीच स्पर्धा.
दिवाळी सणानिमित्त आतिषबाजीसाठी होणारी पैशाची नासाडी टाळावी.
    फटाके ही काही कुठल्याच धार्मिक परंपरेमधे नाही
हिंदू धर्मात तर नव्हेच नव्हे.
धर्म हा मनुष्य जैवविविधता पर्यावरण संरक्षण पूरक असेल तरच टिकतो. सर्वच पक्षी सृष्टि पशूंना फटाके त्रासदायक असून कित्येक पक्षी जनावरे यांचा मृत्यु निव्वळ फटाके यामुळेच होतो
निव्वळ परंपरा म्हणुन फटाके फोड़ने हा अंधळेपणा आहे.
हिंदू धर्मात दिवाळी च्या वेळेस दिवे लावणं महत्वाचं असतं फटाके फोडणे नाही....दिवाळीत उत्सव म्हणून एखादा फटाका, फुलबाजे उडविणे ठीक आहे. मात्र हजारो रुपयांच्या फटाक्यांचा कचरा करून काहीच मिळत नाही.
   गरिबांना  ,महागाईने पिचलेल्यांना होळी काय आणि दिवाळी काय’ कष्टकरी, हातावर पोट भरणारे, उपेक्षित, वंचित, अनाथ, अपंग कित्येक जीव आपल्या सभोवती वावरताना दिसतात. त्यांच्या विकासासाठी, आधारासाठी, दिशाहीनतेतून वाट दाखवण्यासाठी नसावा काय असा एखादा सण?
यंदाची दिवाळी आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याला आनंद द्या न त्याच्या आनंदात आपण सुद्धा आनंदी व्हा!!
पहिल्यांदा आपल्या ग्रुपवरील सर्व मित्र-मैत्रीणींना, आणि तुमच्या सर्व कुटुंबीयांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शिरीष उमरे, नवी मुंबई
        फराळाचे ताट ... ती मिठास.. तो आग्रह... सगळ कस लख्ख डोळ्यासमोर उभे राहीले दिवाळी म्हणताच !
माझ्या लहानपणी ३६ वर्षापुर्वी शाळेला भरपुर दिवाळीच्या सुट्टया असायच्या. आमची दिवाळी सुरु व्हायची पाचवीत घेऊन दिलेल्या टीकल्याच्या रोलवाली पिस्तोल ने. पिस्तोलला खोबरेल तेल पाजुन टीकली रोल टाकुन चोर पोलीस खेळ रंगायचा. थकुन घरी आलो की आई ने बनवलेला पोह्याचा चिवड्याचा बकणा भरुन खिश्यात शंकरपाळे भरुन परत पसार... मग रोल मधल्या उरलेल्या चार पाच टिकल्या फोडण्यात जाम मजा यायची.
वडीलांसोबत कीराणा आणायला जायचो. तिथुनच मग  चिरंगीचे फटाके, फुलझड्या, भुईनळ, रेल्वेचा फटाका, मटका अनार, डबलबार रॉकेट, सापाची गोळी काय काय खरेदी असायची... शेवटी कुंभारवाडीत जाऊन दीवा पणती घेऊन आनंदात तरंगत घरी यायचो!
       ज्या दिवशी पहाटे गुलाबी थंडीत उठवुन बंबातल्या गरम पाण्याने तेल उटणे लावुन घास घास घासुन आंघोळ व्हायची तेंव्हा लक्षात यायचे की दिवाळी आली.
तोपर्यंत आकाश कंदील छतावर लावलेला असायचा. मग आई द्यायची फराळाचे ताट ! अनरसा, लाडु शेव चकल्या करंजी... पोटभर न्याहारी करुन मित्रांसोबत भटकायचे व खेळायचे...  दुपारच्या जेवणानंतर फटाके फोडणे सुरु... लवंगी फटाक्याची लड काळजीपुर्वक खुल्ली करुन एकेक फटाका वेगळा करायचा आणि बनवलेल्या मातीच्या कील्ल्यावरील तोफेतुन फोडायचे. संध्याकाळी कलर वाले फटाके उडवायचे. काय भन्नाट दिवस होते ते ! रेल्वे चा फटाका वा भुचक्र आणि रॉकेट वैगेरे म्हणजे जय्यत तयारी व मोठ्यांच्या निगराणीतली ती मोहीम फत्ते करणे हा म्हणजे कौटुंबिक सोहळा असायचा. उदबत्तीचा व सुतळी बाँब चा टाइम बाँब बनवुन फोडणे व त्यानंतर मनसोक्त मार खाणे ह्याची पण आपली एक वेगळी मजा होती.

पुढचे पाचसहा दिवस कापरासारखे भुर्र उडुन जायचे. रोज तिन घरी फराळाचे निमंत्रण असायचे. प्रत्येक घरची तव वेगळी... अजगर होइपर्यंत खायचे.. लोळायचे.. खेळायचे...  मग हा दिनक्रम तुळशीपुजनापर्यंतचा असायचा. अगदी शेवटचा फटाका फोडेपर्यंत... झाडलेल्या कचर्यातुन फुसके फटाके गोळा करुन त्यातली बारुद काढुन कागदावर जाळेपर्यंत...
मग जड अंत: करणाने शाळेचे दप्तर भरणे व जाताजाता भग्न झालेला कील्ला पाहतांना घराच्या दरवाज्यातुन पाय निघायचा नाही...
त्यावेळी जसे डोळे भरुन यायचे तसे आताही आले आहेत...
ती निरागसता... ते कुतुहल... ते स्वप्नील क्षण... ते बालपण...  खुप मीस करतो...
आता ती मजा च नाही उरली दिवाळीची...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अमोल धावडे.
दिवाळी म्हटली की सर्व आनंदीआनंद सर्व रोषणाई व  खुप सारी धम्माल. दिवाळी आली सर्व घर आवराआवर नंतर घराला रोषणाई असे सर्व प्रकार दिवाळी आली की सुरू होतात दिवाळीमध्ये लोक अडमाप पैसे उडवतात.

दिवाळी ही गरीब लोकांचे दिवाळे काढून जाते मला आठवत आहे की मी लहान असताना आमच्याकडे दिवाळी साजरी केली जायची परंतु एकदम साधी फटाके वाजवाचे नाही कारण खरेदी करण्यासाठी आमच्याकडे पैसे नसायचे त्यामुळे शेजारी जे फटाके उडवतील त्यात आनंद मानयचो.

आजही विचार केला तरी कित्येक लोकांच्या घरी दीपावली साजरी केली जात नाही समाजामध्ये खुप गरीब लोक रहात आहे ते दिवाळी साजरी करू शकत नाही त्याना दिवाळी मध्ये बनवले जाणारे फराळ खायला भेटत नाही. जर समाजामध्ये आजही असे गरीब लोक असतील तर आपण आपली दिवाळी कशी आनंदात साजरी करू शकतो.

तर प्रत्येक दिवाळीमध्ये आम्ही एक उपक्रम करतो तो म्हणजे जे लोक दिवळी साजरी करू शकत नाही अश्या लोकांसोबत आम्ही दिवाळी साजरी करतो त्यांच्या मुलाना कपडे घेतो व त्यांना फराळ वाटप करतो. यातून मिळणार आनंद व त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो गगनात न मावणारा असतो. खुप छान उपक्रम आहे आपण ही असे उपक्रम राबवून गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद देऊ शकता व गरिबांची दिवाळी साजरी करू शकता.

चला तर ही दिवाळी गरिबांसोबत............
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
निखिल खोडे, ठाणे.

              भारतामध्ये दिवाळी सण जवळपास सगळीकडेच साजरा केला जातो. अत्यंत आनंद देणारा पण खुप खर्चात पाडणारा हा सण पाच दिवस चालतो. दिवाळी म्हटल की सगळीकडे विद्युत रोषणाई, चमकणारे आकाशकंदिल, दिव्यांचा झगमगाट, सुरेख रांगोळी, वेगवेगळ्या प्रकारचे रुचकर खाद्य पदार्थ.. प्रत्येकजण त्याच्या परीने दिवाळी सण उत्साहात साजरा करत असतो.
 
                शाळा किंव्हा कॉलेज मध्ये सहामाही परीक्षे नंतर दिवाळीच्या सुट्टया लागायच्या. सहामाही परीक्षा कधी पासुन सुरु होते आहे यापेक्षा दिवाळीच्या सुट्टया कधी लागणार याची घाई जास्त असायची. सुट्ट्यांमध्ये घराची साफसफाई करणे, घरी आईला कामात मदत करणे, दिवाळी साठी बनविलेला फराळ खाणे, मित्रांसोबत खेळणे आणि वेळ मिळाला तर पुस्तक वाचणे असा वेळ निघुन जायचा. साधारणपणे ज्युनिअर कॉलेज कॉलेज पर्यंतची दिवाळी अश्याप्रकारे साजरी केली. त्यानंतर मात्र कामासाठी बाहेर पडल्यावर परिस्थिती थोडी बदलली. रेल्वेचे तिकिट न मिळणे, खाजगी बसेस चे जास्त दर, जॉब वरती सुट्टया नाही यामुळे मागच्या २ वर्षापासून दिवाळीला घरी जाणे सुध्दा शक्य झाले नाही.

                 दिवाळी साजरी करण्यामागे कोणतेही कारण असो, बाजारात दिवाळी दरम्यान मोठे उत्साहाचे वातावरण असते. दिवाळीला लोक नविन कपडे, मिठाई , दागदागिने खरेदी करतात. सर्वसामान्य माणूसही या सणाच्या वेळी मनमोकळे पणाने खरेदी करतो. खरेदी करता वेळेस देशी बनावटीच्या वस्तु, छोटे व्यासायिक ज्यांचे घरदार सणांवर चालते अशा लोकांकडुन खरेदी करण्यास प्राधान्य द्यायला पाहीजे.

               आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढत चाललेल्या प्रदुषणामुळे जीव धोक्यात येतोय. त्यामुळे सण उत्सवा मध्ये प्रदूषण कमी करण्याचा व दीव्याची आरास पणती लावण्याचा प्रयत्न करुया. दिवाळी आनंद आणि अारोग्यमयरित्या पणे साजरी करूया.. शुभेच्छा सगळ्यांना !!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मुकुंद बसोळे, लातूर.

वेळ सकाळी सहाची.....थोडीफार बोचरी थंडी वाजत होती.... त्या 'बोचऱ्या' थंडीला सगळ्यांनी केंव्हाच झुगारून लावलं होत..... वातावरणात उत्साह होता...आणि असणारच कारण ती 'दिवाळी' ची पहाट होती.....वातावरणात उत्साहाच्या बरोबरच नवीन चैतन्य, अंधार चिरणारा प्रकाश....आणि फटाक्यांचे 'धडाम- धूम' आवाज सुद्धा होते...सूर्यनारायण नुकतेच उगवून ते फटाक्यांचे 'कर्णभेदी' आवाज ऐकत होते....दररोज 'सोनेरी' दिसणारा त्यांचा प्रकाश आज मात्र 'फटाक्यांच्या' धुरामुळे 'धुराडी' रंगाचा दिसत होता....चिमण्यांचा 'चिवचिवाट' त्या 'फटाक्यांच्या' 'धडाम -धूम' आवाजात केंव्हाच विरून गेला होता.....आणि इकडे 'छोटा'निशांत  आपला अभंग्य 'स्नान' नुकतंच आटपून कपडे परिधान करत होता....त्याच कपडे लेऊन झालं होतं....आणि असाच आपल्या खिडकीबाहेर बघत थांबला होता....बाहेर रस्त्यावर त्याचा 'वर्गमित्र' आदित्य त्याच्या 'पप्पासोबत'  'अनार'पेटवत होता....ते 'अनार' पेटलं होत आणि  त्याचे 'स्पार्क' हवेत उंच उडाले होते...आणि त्याचा 'धूर' सुद्धा हवेत उडत होता....निशांत खरं तर खूप खोडकर....पण आज तो थोडा शांतच होता....आज वेगळ्याच आठवणीत त्याच्या मनाचा तो 'पक्षी' घिरट्या घालत होता....आणि रस्त्यावरच त्याच्या वर्गमित्राचं त्याच्या वडिलांसोबत 'मस्ती' करतानाचं ते दृश्य बघून तर आता 'फक्त' त्याच्या डोळ्यातून 'अश्रू' टपकायचेच तेवढे  बाकी राहिले होते....मोठ्या मुश्किलीने त्याने ते रोखले होते.....
                  तेवढ्यात 'निशांत' ची 'आई' त्याच्या रूममध्ये आली....."काय रे ओवाळून घ्यायचं नाही का तुला!".....या त्याच्या आईच्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली....तो आईकडे वळाला.... आणि त्याने थरथरत्या आवाजात आईला विचारले  "आई, पप्पा ह्यावेळेस तरी दिवाळी ला घरी येणार आहेत ना"!.........आणि त्याची आई फक्त आपल्या लाडक्या 'निशांत'ला खुश करण्यासाठी म्हणून गेली होती..."हो रे बाळा ह्यावेळेस तुझ्या पप्पानी दिवाळीला घरी येण्याचं 'प्रॉमिस' केलं आहे"!..... पण खरं तर तिला सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तरं माहीत नव्हतं.....लग्न होऊन  12 वर्ष झाली होती...त्यात फक्त दोन वेळेस 'निशांत' चा 'पप्पा' घरी आला होता.....शेवटच्या वेळेस जेंव्हा 'निशांत' चा  पप्पा 'दिवाळी' ला घरी आला होता त्याला आता 5 वर्ष झाली होती...ही प्रत्येक वेळी वाट बघायची आणि 'निशांत' ला काहीतरी सांगून वेळ निभावून नेयाययची...तिला आता त्याची सवय झाली होती......पण 'निशांत' चा  पप्पा तरी काय करणार...दरवेळेस तिकडे सीमेवर काहीतरी आणीबाणी यायची आणि त्याला सुट्टी कॅन्सल करून 'ड्युटी' वरचं थांबावं लागायचं.....शेवटी 'फॅमिली' पेक्षा 'देश' महत्वाचा होता ना......कारण तो फौजी होता आणि 'फौजी के लिये सबसे पहले देश,फिर उसका रेजिमेंट, फिर उसके साथी और सबसे लास्ट मे  फॅमिली'......हे तो विसरला नव्हता....ज्यांच्या विश्वासावर सारा देश 'दिवाळी' साजरी करत होता असा तो 'फौजी'.....
                कर्नल 'विजय महाडिक'......निशांत चा 'पप्पा'......कालच उद्या 'दिवाळीसाठी' घराकडे जाणार ह्या खुशीत झोपी गेले होते...आणि आज 'नरकचतुर्दशीच्या' सकाळी-सकाळीच कॅम्प वर बातमी येऊन धडकली होती की काही 'शत्रू' घुसकोरी करून बाजूच्या जंगलात लपून बसले आहेत....आणि लगेच यांनी आपली सुट्टी 'रद्द' केली होती....ते त्यांची 'टीम' घेऊन 'सर्च ऑपरेशन' साठी निघाले होते.....हळू - हळू ते   जंगलात शिरत होते....सूर्याच्या प्रकाशाला सुद्धा खाली जमिनीवर पडायला कसरत करावी लागत होती इतकं ते दाट 'जंगल' होत....तरीही तशेच ते पुढे पुढे सरकत होते...आता कॅम्प सोडून त्यांना एक तास झाला होतं... दाट जंगलात ते शिरले होते आणि सूर्याच्या प्रकाशाने सुद्धा आता त्यांची साथ सोडली होती.....आणि आणि अचानक एक गोळी सु-सु करत कर्नल च्या टीम मधील एका साथीदाराच्या छाताडावर आदळली....आणि रक्ताची एक 'चिळकांडी' उडून एका झुडपावर स्थिरावली....कर्नल ने आपल्या त्या पडणाऱ्या 'साथीदाराला' पकडले आणि झाडाचा 'आश्रय'घेऊन ते थांबले...त्यांच्या इतर साथीदार सुद्धा तसेच झाडाच्या आडोश्याला थांबले.... आता 'दिवाळी' सुरू झाली होती....तिकडून गोळ्यांचा वर्षाव होत होता....कर्नल आणि त्यांचे साथीदार सुद्धा त्यांना चोख प्रतिउत्तर देत होते....पण ते सुद्धा माघार घेयायला तयार नव्हते....शेवटी 'कर्नल' ने निर्धार केला...आता खूप झालं....आता दिवाळीचा 'बॉम्ब' फोडणार...त्याच्या एका साथीदाराला हे कळालं आणि त्याच्या तोंडावर विजयी हास्य उमटलं....आणि कर्नल ने 'हॅन्डग्रेनेड' चा लॉक तोंडाने काढून तो 'हॅन्डग्रेनेड' गोळ्या ज्या दिशेने येत होत्या त्या दिशेने भिरकावला.....आणि स्फोट झाला....आकाशात आगीबरोबर तीन देह उडताना त्याच्या सहकाऱ्यांना दिसलं आणि बाकीच काम त्यांनी पूर्ण केलं...गोळ्यांचा वर्षाव त्या तीन देहांच्या दिशेने केला...आणि काम संपवलं....आणि 'ऑपरेशन' संपवलं.....ते तीन 'मृतदेह' घेऊन त्यांची टीम कॅम्प मध्ये आले होते आणि कर्नल चे वरिष्ठ अधिकारी त्यांचं अभिनंदन करत होते....पण त्यांना त्यांचा एक साथीदार गमवावा लागला होता....ते सुद्धा आज 'दिवाळीच्या' दिवशीच.... म्हणून ते खूप दुःखी होते....'ऑपरेशन' यशस्वी झाल्याचा 'आनंद' या दुःखात कधीच विरून गेला होता.....
                    आणि आज दिवाळी झाल्या चार दिवसानंतर 'कर्नल' घरी आले होते....'निशांत' भलताच उत्साहात होता....तसं तर त्यांना त्याला खूप 'मनवावं' लागलं होतं....पण लवकरच तो 'पप्पासोबत मिसळून गेला....आणि आज टी. व्हि  वर गाणं लागलं होतं......  'जावो जो लौटके तुम तो घर हो खुषी से भरा.... साथी मुबारक हो तूम्हे  जष्ण ये जित का.....बस इतना याद रहे एक साथी और भी था....'

              आणि हे गाणं ऐकताच कर्नल च्या डोळ्यातून कधी 'अश्रू' आले आणि कधी त्यांनी जमिनीचा वेध घेतला हे त्यांचं त्यांनाच नाही कळालं..... आपल्या साथीदारांच्या आठवणीने......

 कुठल्याही स्तरावरचा त्याग करणाऱ्या 'भारतीय सेनेला' समर्पित........
 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


दत्तात्रय डोईफोडे,वाशिम.

चाल रे मण्या चाल रे गण्या बाजाराला,
खूप सारे फटाके, फराळ घेऊन येऊ घराला,

दिवाळीचा सिझन सुरू झाला की आता,
दुकानदार साहेब जरा स्वस्तात फटाके देता,

खरेदीच्या नादात घरी जायला खूप उशीर झाला,
देवालाच काळजी शेवटचा रिक्षावाला भेटला,

आता काय दिवाळीचा सगळीकडे  आपलाच धडाका,
कोणी समोर नाही येणार तेवढा फटाक्यांचा भडका,

कोणाला इथे आहे काळजी पर्यावरण प्रदूषणाची,
सगळेच करताहेत आपल्यापरीने आपल्याच मनाची,

लख्ख लख प्रकाश किती सगळीकडे दाटला,
कोण लक्ष देतो त्या प्रकशासाठी किती कोळसा अटला,

घरी सगळे जमलेत ताई, बाई, आणि अक्का,
आता सगळे मिळून देऊ एक आनंदाचा धक्का,
या दिवाळीत आमच्या सगळ्यांचा वि4 आहेच असा पक्का,
ही दिवाळी अशी साजरी करू पर्यावरणाला नाही लागणार बुक्का...
आणि पर्यावरणाचा समतोल ही राहील अगदी हक्का पक्का...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
किशोर शेळके,
लोणंद.

      आय. सी. यू. मधील ती भयाण शांतता, त्या मशीन मधून येणारा तो टिंग टिंग आवाज, डाॅक्टर आणि नर्सच्या काहीही आवाज न येऊ देता चाललेल्या हालचाली. बाहेरच्या बाजूला बसलेल्या नातेवाईकांचे हिरमुसलेले चेहरे, आणि समोर मरणासन्न अवस्थेत एकेका बेडवर पडलेले ते रूग्ण. या सर्वांच्या मधे, अगदी मधल्या बेडवर बारा वर्षांचा अथर्व मृत्यूशी झुंज देत होता. आज पाचवा दिवस आहे, तो आजिबातच हालला नव्हता, की डोळेदेखील उघडले नव्हते. त्याच्या डोक्याला चारही बाजूने पांढ-या पट्ट्या गुंडाळलेल्या होत्या. आय. सी. यू. च्या दाराजवळील काचेतून अथर्व चे बाबा अथर्व कडे एक टक बघत होते. दोन्ही गालांवर ओघळलेले अश्रू पुसायचेही भान नव्हते.

      पाच दिवस अंगावर एकच ड्रेस, तोंड धुण्यापलिकडे या पाच दिवसात अंगाला पाणी लागेलच नव्हते. कुणाच्यातरी आग्रहाखातर कसेबसे दोन घास घश्याखाली उतरत होते, तेही बेचवच. त्यांनी स्वतःलाच असे खाऊन टाकलेले की, हे जिवन नकोसं वाटत होतं. त्यांच्या बेचाळीस वर्षांच्या आयुष्यात पहिल्यांदाच ते स्वतःचा राग-राग आणि तिरस्कार करत होते. स्वतःलाच दोष देत होते. असेच विचार करत ते हाॅस्पिटल च्या गॅलरीत येऊन ऊभे राहीले, समोर अंधूक अंधूक धूर होता. हाॅस्पिटल च्या आतमध्ये असलेली शांतता बाहेर फटाक्यांच्या कर्कश्श आवाजात बदलली. आणि अथर्वचे बाबा आठवू लागले.....

      ऑफिसमधून आठ दिवसांची दिवाळीची सुट्टी घेतली होती. आता दिवाळी आहे म्हटल्यावर तेवढी सुट्टी पाहिजेच ना! बायको आणि एकच मुलगा, इतर वेळी या दोघांसाठी वेळ नसतोच मग दिवाळीत जरा जास्त वेळ देऊ, या हेतूने मी चार दिवस अगोदर च सुट्टी काढली. बरीच खरेदी करायची होती आणि एकुलत्या एका मुलाला हा सगळा वेळ द्यायचा होता. एक दिवस जरा आरामच केला, कोणतेच काम हाती घेतले नाही. जरा कंटाळा घालवावा या हेतूने घरातच बसून राहिलो. दुस-या दिवशी सर्वांनीच लवकर आवरलं. मी गाडी बाहेर काढली, तेवढ्यात शेजारचे घुले गुरूजी माझ्याजवळ आले आणि म्हणाले,
" काय अथर्वचे पप्पा, कुठे चाललात"?
मी म्हणालो,
" दिवाळीची खरेदी करायला, आता आठवड्याची सुट्टी काढली आहे. आता बायकोची अन् मुलाची हौस पुरवतो."
घुले गुरूजी म्हणाले,
" दिवाळी आनंदाने साजरा केली जाते, हौसेने नाही. मजा करा पण हवा तेवढाच खर्च करा."

      मी काही बोलणार इतक्यात माझी बायको अन् अथर्व आला. आम्ही गुरूजींचा निरोप घेतला अन् निघून गेलो. दिवसभर भरपूर खरेदी केली. संध्याकाळी घरी आल्यावर, गुरूजी बाहेरच बसलेले, म्हणाले,
 " काय काय खरेदी केली अथर्व."

   अथर्व म्हणाला, " आजोबा आम्ही भरपूर फटाके घेतलेत, अन् खाऊ पण आणलाय."
" आणि चित्रे आणलीस का रे किल्ल्यावर मांडायला ".- गुरूजी
"नाही आजोबा, मला नाही आवडत किल्ला बिल्ला."
असे म्हणून अथर्व आणि अथर्वची आई घरात गेली, मला घुले गुरूजींनी बोलवून घेतले.
" अथर्वचे पप्पा, मुलांनी या वयात ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी शिकल्याच पाहिजेत."
"म्हणजे?" मी.
        गुरूजी बोलले, " आपला इतिहास साधू संतांच्या विचारांचा, शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, किल्ले अन् पर्वतांच्या. आपण मुलांना या सर्वांचे महत्व सांगितले पाहिजे. फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करायची आपली संस्कृती नाही. फटाक्यांचे दुष्परिणामांचा आणि प्रदुषणाचा तुम्हाला अंदाज असलेच की, बाकी तुम्ही जास्त शिकलाय तुमच्या लक्षात आले असेलच.".

       मी मनातून खुप रागावलो, पण काही बोलू शकत नव्हतो. "बर" म्हटले आणि घरात निघून गेलो. त्यावेळी मला राग आला, पण रागाचा दृष्टिकोन नकारात्मक होता. जर सकारात्मक असता तर आज अथर्व इथं बेडवर नसता. तो घरीच असता, खेळत, मातीच्या किल्ल्यावर. एक शूर मावळा असता रात्रंदिन गड राखत. आणि मलाही अभिमान असता.
     इतक्यात समोर घुले गुरूजी दिसले. थांबलेले अश्रू पुन्हा वाहू लागले. आणि मी मान खाली घालून थोडं साईडला आलो. आणि घुले गुरूजी धीर देण्याच्या सुरात म्हणाले, " अथर्वचे पप्पा, मी गावी गेलेलो, रात्री उशिरा घरी आलो, आणि आत्ता सकाळी लवकर इकडे आलो. अथर्वला नेमकं..."
    मी त्यांचे वाक्य अर्धवट तोडून बोलू लागलो.
       "गुरूजी, तुम्ही मला जे सांगितलं ते मी ऐकायला पाहिजे होते. परवा सकाळी अथर्व लवकर उठून फटाके फोडण्यासाठी खाली रस्त्यावर आला. मी घरातच होतो. काॅलनीतील इतर मुले होती तिथे. फटाके फोडत होता. फटाक्यांच्या धुराने एवढा अंधार होता की, सामोरचं काहीच दिसत नव्हतं. रस्त्यावरून एक कार जोरात येत होती, अथर्व फटाका लावून पलिकडच्या बाजूने पळतच अलिकडे आला. आणि त्या येणा-या कारने...."


      माझा हुंदका अनावर झाला. गुरूजी पुन्हा धीर देत म्हणाले. " होईल सगळं ठीक, थोडा धीर धर".

      थोड्या वेळाने मी हाॅस्पिटलच्या खाली आलो. तर तिथे एक मुलगा फटाका फोडत होता, मी त्याच्याजवळ गेलो, त्याला घेऊन त्याच्या बाबांकडे गेलो. आणि त्याच्या बाबांना घुले गुरूजींनी सांगितलेलं सगळं सांगितलं....... ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


   डॉ. विजयसिंह पाटील,कराड.

         दिवाळी चार दिवसावर आलेली. व्यायामाला बऱ्याच जणांनी दांडी मारलेली. इंजिनिअर , गोडबोले गावी गेलेले . आबा रानात मुक्कामी , लानीच्या कामात व्यस्त, घोलपसाहेब पुण्याला मुलांकडे  दिवाळी साजरी करायला गेलेले.
हॉटेलात घारे, मी आणि मुळे टेलर एव्हढेच हजर होतो.  तेव्हड्यात कावळे सर तोंडातल्या तोंडात बडबडतं आत आले. भयंकर चिडलेले दिसत होते. ( हे एक तर चिडलेले असतात नाहीतर विचारात असतात.!)
भुई उडवून घारेनी काय झाले आता ? असं विचारताच , बंदुकीच्या गोळ्यांप्रमाणे त्यांच्या तोंडातून शब्द पडू लागले. ' हल्लीच्या मुलांना सगळं रेडिमेड पाहिजे, स्वतः काही करायला नको, नुसतं पैसे खर्च करायचा उद्योग , नॉनसेन्स ". अहो पण झालं तरी काय असं विचारताचं " तयार रेडिमेड किल्ला घेण्यासाठी नातवाने काल दिवसभर डोकं खाल्लं, वैतागून संध्याकाळी गेलो बाजारात. आणि घेतला एक तयार किल्ला, दोन हजार रुपयांना लागला चुना " चुना हा शब्द ऐकताच अर्धवट झोपेत असलेल्या घारेंनी रिफ्लेक्स ऍक्शनने पुडी सरांच्या पुढं धरली. तंबाखू हातात घेऊन ती खाण्याच्या बेतात असताना मुळे म्हणाले ' सर तुमचा आक्षेप नक्की कशाला आहे ? मुलं काही कष्ट करत नाहीत याला की पैसे खर्च करायला ?'..
उत्तर देणे अवघड आहे हे लक्षात आल्यावर सर  मुकाट्यानं तंबाखूची गुळणी धरून बसले.
शेजारच्या टेबलावर मेडिकल कॉलेजची(परप्रांतातील, युपी. कडील) हायफाय मुलं बसली होती. त्यांनी हिंदीत विचारले  ' मग तुम्ही किल्ला कसा करायचा ?' .
घारे पेंगत होते, कावळेंनी गुळणी धरली होती. आणि मी नेहमी फक्त ऐकायचं काम  करायचो (अहो मी मंद बुद्धीचा,, ऐकायला बुद्धीची गरज लागत नाही असं मी ऐकून आहे.) .
तेव्हड्यात मुळे म्हणाले ' सांगतो मी  ' ह्यावेळी मुळेंच्या डोळ्यात एक वेगळीच चमक मला जाणवली. पुढं मुळे म्हणाले 'सहामाही परीक्षा संपली, की आपोआप जवळ आलेल्या दिवाळीचं वेगळं वातावरण जाणवायचं . त्या वातावरणाची जादू म्हणा किंवा थोड्याच दिवसात आलेल्या दिवाळीचं आकर्षण जाणवू लागायचं  म्हणा .. सुट्टी लागल्याने दिवसभर आम्ही मोकळेच, मग  आमची किल्ला तयार करायची धामधूम सुरू व्हायची. आजूबाजूला पडलेल्या विटा, दगड गोळा करून ठेवोयचो.
मग आमचा दौरा नदीकडे.दरडीची माती ठिक्यात भरून घरी यायचं. (कधीकधी ठिकी मिळाली नाही तर घमेल्यातून माती आणायला लागायची .)
एव्हडं काम झालं की आमची मित्रांची मिटिंग बसायची. मग किल्ला कसा करायचा ह्याची चर्चा.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सगळेजण जमायचे. पहिलं काम पाया तयार करायचं. भिंतीलगत विटांचे तुकडे अगदी मापात बसवायचे. मग वर दगडं रचायचं भिंतीला लागून.
मग वरून मापात माती टाकून ओभडधोबड किल्ला तय्यार व्हायचा .मातीवर पाणी मारून कच्चं सावरायचं . संध्याकाळी परत मिटिंग बसायची. प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या.
कोणतीतरी कल्पना पसंद पडायची. किल्ल्याच्या एका बाजूला गुहा करायचं ठरलं. झालं... आम्ही एक गोल लोखंडी डब्याच्या शोधात प्रत्येकाचं घर धुंडाळायचो . डबा सापडला की आमचा दौरा कुंभारवाड्याकडे कूच करायचा. निरखून पारखून वाघ घ्यायचा.
तिसऱ्या दिवशी किल्ल्याच्या एका बाजुची माती काढून डबा आतं अश्या प्रकारे पुरायचा की नुसतं त्याचं उघडं तोंड दिसावं . झाली गुहा.. वाघ त्यात बसवला की आम्ही दूर जाऊन गुहा पहायचो. पोजीशन पसंत पडली की हुश्श करत घरी जायचो.

मग किल्ल्याच्या पायऱ्यांचे काम सुरू व्हायचे. काडेपेटीच्या आतील भागात माती भरून त्याचा ठसा उठवला की झाली एक पायरी. त्यावर दुसरी, अश्या चढत्या श्रेणीने, वळणं वळणं घेत पायऱ्या थेट वरपर्यंत शिवाजी महाराजांच्या सिंहासना जवळ जायच्या. पायऱ्या वाळवत ठेवायच्या. पक्या वाळेपर्यंत..
सैनिक/ मावळे कुठं कुठं ठेवायचे याच्यावर चर्चा , क्वचित वादही व्हायचे. (आम्हाला मावळे मिळायचेच पाच सहा , तेही तीन चार इंच उंचीचे ).
जागा फिक्स झाली की तिथंली जागा सपाट करून हातानं थापायची.
आणि मग किल्ल्याच्या माथ्यावर शिवाजी महाराजांचे सिंहासन करायला जुपी करायची. आडव्या दोन विटा ठेवायच्या. त्या मातीने लिंपायच्या. पुढील दोन कोपऱ्यात दोन मातीचं वेढणं करायची. मग सर्व किल्ल्यावरून मातीचं हलकं लिंपण द्यायचं. शेवटी
किल्ल्याच्या समोर आणि आजूबाला माती पसरून हाळीवाच्या बिया टाकायच्या , रोज  पाणी शिंपडायचं, दोन दिवसात रोपे यायची. झालं किल्ल्याच्या सभोवतालचं जंगल.
कुंभारवाड्यात जाऊन शिवाजी महाराजांचा पुतळा आणि मावळे घेऊन किल्ल्यावर ठेवायचे..' असा हा आमचा किल्ला तयार व्हायचा ...
मुलं नवीन इंटरेस्टिंग माहिती मिळाल्याने खुश झाली. कावळे सरांनी अगदी असंच आम्ही किल्ला बनवायचो अशी टिपण्णी केली. पण दोन हजार गेल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही स्पष्ट दिसत होते...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************